Thursday 19 June 2014

सुगम संगीत – एक तौलनिक विचार – भाग ८



मागील लेख संपविताना, चालीतील “काठीण्याचा” विचार स्थूल स्वरुपात केला होता. चाल जर गुंतागुंतीची असेल(इथे चाल आणि त्याबरोबर बांधलेला वाद्यमेळ, या दोन्ही गोष्टी ध्यानात घेतलेल्या आहेत!!) तरच ते गाणे चांगले म्हणावे, हा विचार अर्धवट ठरावा. मुळात, कवीने जे शब्द लिहिले आहेत, त्याचा आशय चालीतून अधिक समर्थपणे व्यक्त होणे, हेच अपेक्षित असते. गुंतागुंतीची चाल निर्माण कारणे, हा संगीतकाराचा व्यासंग दर्शवितो पण जर हा एक भाग झाला. काही वेळा, सरळ, सोपी पण अर्थवाही चालदेखील गायकाच्या गळ्याची परीक्षा घेऊ शकते. काही चालीच अशा असतात की, ऐकता क्षणीच तुमच्या मनाची पकड घेतात. उदाहरणार्थ, संगीतकार रोशन याचे एक गाणे बघूया. “चित्रलेखा” चित्रपटातील “छा गये बदल नील गगन पर, भूल गया कजरा सांज ढले रे”. यमन कल्याण रागावर आधारित असलेली चाल, खरोखरच अभ्यासपूर्ण आहे. सुरवातीचे अस्ताइचे सूरच रागाचे वळण दाखवतात. बासरीचे अतिशय मंद आणि ढाल्या वजनातील स्वर, संध्याकाळ सूचित करतात आणि त्याच लयीत अतिशय हलक्या ताल वाद्यांनी रचनेला वजन प्राप्त होते. ऐकायला अतिशय मधुर अशी धून पण त्याचबरोबर लयीला अतिशय पक्की असणारी चाल, गायकाची कसोटी बघते. तसे पहिले तर, चाल सरळ आहे, कुठेही अति तार स्वर नाही की अति खर्ज नाही. मध्यलयीत चाल फिरत असते पण ऐकताना आपली मान कधी डोलायला लागते, हेच समाजात अन्ही. इथेच संगीतकाराचे वैशिष्ठ्य दिसून येते. गंमत म्हणजे, रचनेत अनेक ठिकाणी चाल गुंतागुंतीची होऊ शकेल, अशा अनेक “जागा” स्पष्ट दिसत असतात पण संगीतकाराने, तिथेच चाल ताब्यात घेऊन, रचना वेगळे वळण घेणार नाही, याची दक्षता घेतलेली आहे. वाद्यमेळ देखील याच संदर्भात बघण्यासारखा आहे. व्हायोलीन आणि बासरी, याच वाद्यांचा प्रमुख उपयोग आहे. व्हायोलीन वाद्य असे आहे की , क्षणात ते तुम्हाला अति तार स्वरांचा अनुभव देते तार दुसऱ्या क्षणी अति खर्ज!! पण, इथेच संगीतकाराने, कोमल रिषभ इतका सुंदर वापरला आहे की ती चाल सहज वरच्या सुरात गेली असती,पण तिथेच चाल ताब्यात घेऊन, या कोमल रिषभाने मध्यलयीत कायम केली!! हे संगीतकाराचे वैशिष्ठ्य.
तेंव्हा, कठीण चाल,हे गाणे अप्रतिम मानण्याचा एकमेव निकष नव्हे, हे इथे ठरू शकते. असेच आणखी एक उदाहरण बघूया. सी.रामचंद्र यांचे प्रसिध्द गाणे ” ये जिंदगी उसीकी हैं”. भीमपलास रागावर आधारित असलेली चाल. वास्तविक जरी सी.रामचंद्र यांनी जरी मान्य केले असले की, “ही चाल, शारदा नाटकातील मूर्तिमंत भीती उभी – या गाण्यावरून घेतलेली आहे!!” तरीही जर का स्वरांचा सूक्ष्म मागोवा घेतला तर लक्षात येते की, इथे संगीतकाराने, त्या चालीचा मूळ आराखडा(च) उपयोगात आणलेला आहे. म्हणजे स्वर जरी तेच आले तरी ते स्वर लावण्याची पद्धत इतकी भिन्न आहे की, हिंदी गाण्यावर त्या नाट्यगीताची छाप आहे, हे जाणवतच नाही. इथे बघण्यासारखा भाग असा आहे की, हे गाणे दोन भागात आहे. पहिला भाग हा, एक प्रणयी, भावविभोर छटा दर्शविते तार दुसरा भाग आर्त विरही छटा दाखवते. पहिल्या भागातील गाण्यात, जो लडिवाळपणा आहे, अतिशय शांत आणि संयत शृंगार व्यक्त होतो, तो पाहण्यासारखा आहे. मध्येच सतारीची हलकी खेच तर त्याच्या पाठोपाठ गुंगवणारे बासरीचे हलके सूर, या स्वरानीच चालीला भरीवपणा मिळतो. तबला सुद्धा इतका शांत आहे की, त्यामुळे ती चाल अधिक अंतर्मुख होते आणि भरीव होते. चाल कुठेही अवघड होत नाही, एकाच लयीत, पुढे सरकत असते. या गाण्याची आणखी एक गंमत सांगता येईल. गाण्याची सुरवात एका स्वरसमुहावर होते पण, पुढील अंतरे हे वेगळ्याच स्वरांवर सुरु होतात, तरीही परत समेवर येताना गाणे, नेमक्या मूळ स्वरांवर येऊन ठेपते!! ही संगीतकाराची खासियत आणि व्यामिश्रता. आपण, सर्वसाधारणपणे, गाण्याचे सुरवातीचे सूर ऐकतो आणि त्यानुरूप ते सूर मनात घोळवीत असतो. पण काही संगीतकार असे असतात की, अस्ताईसाठी एक चाल आणि नंतरचे जे अन्तरे असतात, त्याला वेगळी चाल तयार करतात. खरेतर, हा भाग त्यांच्या बौद्धीकतेचा पुरावा असतो पण बहुतेकवेळा, असली संगीत कारागिरी बहुतेकवेळा कुणाच्याच लक्षात येत नाही. यादृष्टीने. सी.रामचंद्र, श्रीनिवास खळे, जयदेव असे काही संगीतकार होते, त्यांची गाणी ऐकावीत.
अशा प्रकारची लयीला सोपी पण गाण्यासाठी कठीण अशाही चाली तितक्याच महत्वाच्या ठराव्यात. सलील चौधरी, अनिल बिस्वास, एस.डी.बर्मन, आर.डी.बर्मन असे हिंदीतील तार मराठीत, सुधीर फडके, यशवंत देव, वसंत प्रभू हे संगीतकार वानगीदाखल सांगता येतील. इथे एक मुद्दा स्पष्ट करतो. हे लेख म्हणजे, सुगम संगीताचा इतिहास नव्हे, त्यामुळे वरील यादीत काही अतिशय महत्वाची नावे गळली आहेत.
मागे फार पूर्वी, मी सी.रामचंद्र यांना भेटलो असता, त्यांनी मला एक मुद्दा सांगितला होता. त्यांच्या मते, कुणाही संगीतकाराला, त्याच्या गाण्याच्या संदर्भात कधीही ९५% पेक्षा अधिक “रिझल्ट’ मिळत नाहीत!! सुरवातीला, याला या वाक्याचा नेमका अर्थ आणि अदमास लागला नाही. पण, नंतर मी या जसा या वाक्याचा मागोवा घ्यायला लागलो, तशी त्याचे प्रत्यंतर मिळायला लागले. म्हणजे असे की, संगीतकार जेंव्हा एखादी संगीत रचना तयार करतो, तेंव्हा त्याच्या मनात, त्या चालीचे एक चित्र असते, म्हणजे ती चाल पुढे कशी वळणे घेईल, शब्दांचा आशय कसा व्यक्त होईल आणि त्याच बरोबर गायकाला कसे आव्हानात्मक ठरू शकेल वगैरे,वगैरे…. इथे आपण एक उदाहरण बघूया. हृदयनाथ मंगेशकर यांचे अतिशय गाजलेले गाणे “जिवलगा, राहिले दूर घर माझे”. गाणे अतिशय सुंदर, लयीला अति अवघड, आणि शब्दातील आशय तितक्याच उत्तमपणे व्यक्त करणारी चाल!! तरीही, जेंव्हा गाणे संपायला येते, तेंव्हा, चालीचा अवघडपणा असेल किंवा इतर दुसरी काही कारणे असतील, पण, शेवटला येताना,”जिवलगा” हा शब्द “जिव” आणि “लगा” असा आपल्या कानावर येतो!! वास्तविक, कवितेत “जिवलगा” असा संपूर्ण शब्द आहे. म्हणजे, संपूर्ण गाणे अतिशय सुंदर असूनदेखील शेवटची अशी “शब्द्फोड” कुठेतरी खटकते!! आणि, बहुतेक सगळ्याच गाण्यात असा दोष असतो. हा या माध्यमाचाच दोष आहे. इथे शब्दाला महत्व असते पण ते शब्द, फक्त सुरांवाटेच आपल्यापर्यंत येत असल्याने, सुरांचा भार सहन करण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. इथेच सगळी गोम आहे. शब्दांचे औचित्य सुरांतून सादर करताना, कुठेतरी ओढाताण होतच असते आणि मग गाण्यात कुठेतरी उणीव निर्माण होते. प्रत्येक गाण्यात ही उणीव असते, फक्त आपण ती बारकाईने ऐकत नाही.
मला वाटते, संगीतकार आणि त्याच्या चाली, या विषयावर आतापर्यंत थोडीफार चर्चा झाली, त्यावरून, सुगम संगीतात, संगीतकाराचे स्थान काय आणि किती महत्वाचे आहे,याची कल्पना यावी. शास्त्रीय संगीत इथेच वरच्या पातळीवर जाते कारण रागदारी संगीतात “शब्द” हे माध्यम इतकेसे महत्वाचे नसते. केवक सुरांना “जोड” इतपतच शब्दांचा आधार असतो आणि त्यामुळे त्या संगीतात, स्वरांचे कैवल्यात्मक आणि नितळ स्वरूप आपल्याला ऐकायला मिळते. अर्थात, असे काही गायक आहेत की ते, राग गाताना, शब्दांचे महत्व राखण्याचा प्रयत्न करतात, पण तो प्रयत्न अखेर प्रयत्न(च) असतो. सुगम संगीतात अजूनतरी मला संपूर्ण “निर्दोष” अशी चाल ऐकायला मिळालेली नाही!!

No comments:

Post a Comment