Sunday 29 September 2019

भावसंगीतातील व्यक्तिपूजा

नुकतीच लताबाईंच्या वयाला नव्वद वर्षे पूर्ण झाली. एकूणच त्यांचे भावसंगीतातील योगदान बघता, कौतुक सोहळा होणे अपेक्षितच होते आणि ते साहजिकच आहे. भावसंगीताच्या क्षेत्रात त्यांच्या सारखा स्वच्छ, सुरेल आवाज विरळाच ऐकायला मिळतो आणि कारकिर्दीच्या निदानपक्षी पहिली २५ वर्षे तरी त्यांनी आपल्या गळ्याची मोहिनी रसिक मनावर पसरवली होती, हे मान्यच करायला हवे. लताबाई आल्या आणि पार्श्वगायनाची क्षितिजे रुंदावली, त्याला आयाम मिळाले, भावसंगीतात अनेक प्रयोग केले. इतकी विस्तीर्ण कामगिरी इतकी वर्षे सातत्याने करणे, असे उदाहरण अभावानेच बघायला मिळते. परंतु आपल्या भारतीय समाजाला एक अश्लाघ्य खोड आहे, एखादा कलाकार लोकप्रिय झाला की त्याला लगेच देव्हाऱ्यात बसवायचे, त्या कलाकाराची पूजा आरंभायची. मुळात या पूजा करण्याच्या सवयीत आपण एक बाब वारंवार विसरतो, कलाकार हा मनुष्य योनीतूनच जन्माला आलेला असतो आणि एकदा का "मनुष्यत्व" मान्य केले की त्यामागोमाग येणाऱ्या "मर्यादा" स्वीकाराव्याच लागतात पण तसे आपल्याकडे अजिबात घडत नाही. लताबाईंचे गायन म्हणजे त्याला कसल्याच मर्यादा नाहीत, सगळा संगीतावकाश त्यांनी आपल्या ताब्यात घेतला, त्या "मां सरस्वती" आहेत, "हा ईश्वरी आवाज आहे" अशा अनाठायी बिरुदावल्या लावल्या जातात. जणू काही या बिरुदावल्या लावल्या नाहीत तर लताबाईंची श्रेष्ठत्व सिद्ध होणार नाही. हे बौद्धिक पांगळेपण आहे, भयानक व्यक्तिपूजा आहे. 
आता एका विचार करू, लताबाई गातात म्हणजे नक्की काय प्रक्रिया असते? चित्रपटातील प्रसंग एक व्यक्ती ठरावीत असते, त्याबर कवी आपली कविता लिहितात आणि त्या कवितेला संगीतकार चाल लावतो (कधी उलटा प्रकार असतो) आणि मग शेवटच्या टप्प्याला लताबाई अवतरतात. याचाच वेगळा अर्थ, जेंव्हा लताबाई गायला येतात तेंव्हा त्यांच्या हातात आविष्काराचा नकाशा तयार असतो, प्रश्न असतो त्या नकाशातून मार्गक्रमणा करायचा!! म्हणजे यात सर्जनशीलता ही अनेक व्यक्तींमध्ये विभागलेली असते. अर्थात याला दुसरे उदाहरण मांडता येईल. अभिनेता जेंव्हा प्रसंग रंगवतो तेंव्हा, तो प्रसंग लेखकाने निर्मिलेला असतो, पुढे दिग्दर्शक त्या प्रसंगाची मांडणी करतो, वेशभूषाकार अभिनेत्याला प्रसंगानुरूप कपडे आणि पुढे मेकप करतो. अभिनेत्याकडे जेंव्हा प्रसंग येतो तेंव्हा आपल्याला नक्की काय करायचे आहे, याचा नकाशा हातात असतो. मग ती अभिनेत्याची सर्जनशीलता कितपत वरच्या दर्जाची ठरवायची? नकाशात मार्गक्रमणा करणे कधीच सोपे नसते आणि तिथे खरी कसोटी असते. मुळात, रसिकांसमोर येते ती लताबाईंची गायकी आणि तीच जर चाळणी भोकाभोकांची असेल तर मग सगळा आविष्कार फसतो. लताबाईंना याची निश्चित जाणीव असते. अर्थात याचे उत्तर तसे सोपे नाही, हे मान्य आणि इतक्या ढोबळपणे शोधणे अशक्य. परंतु हा देखील विचार आहे, हे मान्य व्हावे. लताबाईंच्या बाबतीत तर "असा आवाज पुढे कधीही होणारच नाही" असे वारंवार म्हटले जाते. लताबाई मनुष्यकोटीतील जीव आहे, भविष्यात कशा प्रकारचा आवाज उदयाला येईल, याची इतकी ठाम भविष्यवाणी जरा आततायी वाटते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लताबाईंची गायकी म्हणजेच खरी गायकी, असा भ्रम बाळगणे. खुद्द लताबाई, आदर्श गायकी म्हणून "बडे गुलाम अली खान" किंवा "मेहदी हसन" यांच्या गायकीचा अतिशय आदराने उल्लेख करतात आणि काहीवेळा तर यांच्यासारखे आपण गाऊ शकत नाही, अशी खंत व्यक्त केली आहे. इतके ढळढळीत असूनही , त्यांचीच गायकी सर्वश्रेष्ठ ही निव्वळ व्यक्तिपूजा झाली, असे म्हणावेसे वाटते. 
दुसरे असे, लताबाई यांच्या तार सप्तकातील गायकीची वाखाणणी करतात आणि ती सर्वार्थाने योग्यच आहे. परंतु तार सप्तकात गायन करणे म्हणजेच उच्च दर्जाचे गायन नव्हे. आता एक उदाहरण देतो. उस्ताद अमीर खान साहेब किंवा पंडित भीमसेन जोशी यांच्या ताकदीचा मंद्र सप्तकातील स्वर लताबाईंच्या गळ्यातून अनुभवता येतो का? इथे मी फक्त "स्वर" हाच मुद्दा घेतलेला आहे. रागदारी संगीत आणि भावसंगीत, हे दोन्ही स्वतंत्र आविष्कार आहेत, याची योग्य जाणीव मला आहे. तेंव्हा त्या ताकदीचा "खर्ज" स्वर ऐकायला मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि याचे प्रमुख कारण पुरुष गळा आणि स्त्री गळा, यांची जडणघडण ही वेगळीच असते. लताबाईंचा तार सप्तकातील विलक्षण स्वर वरील दोन्ही गायकांच्या गळ्यातून ऐकायला मिळत नाही, हे देखील तितकेच खरे. कलाकाराचे सर्वार्थाने मूल्यमापन करताना हा मुद्दा महत्वाचा नाही का?
 आपल्याकडे व्यक्तिपूजा कशी भयानक प्रकारे पसरली आहे, याची आणखी काही उदाहरणे बघू. मोहम्मद रफी हे नाव हिंदी चित्रपट संगीतातील फार लोकमान्य नाव आहे. रफी कारकिर्दीच्या शिखरावर असताना, बरेचवेळा अति नाटकी पद्धतीने गायचे. उदाहरणार्थ, "बाबुल की दुआयें लेती जा" सारखे गाणे!! वास्तविक मुलीच्या पाठवणीचा प्रसंग परंतु गायन इतके बटबटीत, ढोबळ झाले की भावनांचा आकांत मांडलेला आहे. विरोधाभासाचे एक उदाहरण बघू. "मन रे तू काहे ना धीर धरे" हे यमन रोगावरील अतिशय सुंदर असे गाणे. असे संयत चालीचे गाणे अभावानेच ऐकायला मिळते आणि या गीताचे गायन याच रफींनी किती अप्रतिम केले आहे. याचा अर्थ संयतपणे गायन करणे अशक्य नव्हते परंतु कारकिर्दीच्या शिखरावर असताना, त्यांनी कारण नसताना (याहू सारखे गायन हा वेगळा विषय आहे) आपले गायन नाट्यात्म केले आणि आविष्कार डागाळला परंतु मोहम्मद रफींचा विषय निघाला की त्यांच्यातील या कमतरतेचा उल्लेख फारसा केला जात नाही, केली जाते ती पूजा! 
रागदारी संगीतातील प्रख्यात कलाकारांना भावसंगीताचा मोह होतो आणि ती आवड, त्यांनी जमेल तेंव्हा पुरवून घेतली आहे. आता, रागसंगीताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, सततच्या रियाझने, कलाकाराचा गळा "जड" होतो आणि या विशेषाची भावसंगीत गायनासाठी अजिबात जरुरी नसते. याचा परिणाम असा होतो, शास्त्रोक्त संगीत गायकांनी सादर केलेल्या रचना डागाळलेल्या आहेत परंतु असे स्पष्टपणे मांडायचे धाडस कुणीही करत नाही. आता मी ज्या कलाकारांची उदाहरणे घेणार आहे, ते कलाकार हयात नाहीत. पंडित वसंतराव देशपांडे - वसंतरावांनी भावसंगीतात बरीच मुशाफिरी केली, अनेक रचना अतिशय लोकप्रिय झाल्या. परंतु भावसंगीत गाताना, त्यांच्या गायकीचा जो मूळ स्वभाव आहे, स्वरांवर आरूढ होऊन गायन करायचे, तो स्वभाव जागोजागी ऐकायला मिळतो. "बगळ्यांची माळफुले" चाल म्हणून अप्रतिम आहे परंतु गायन म्हणून बघायला गेल्यास, कवी वा.रा. कांतांच्या कवितेतील नाजूक भाव कुठेच गायनात उमटत नाही. आपण वसंतरावांच्या दणकट स्वराविष्कारावर भाळतो. याच गायकाचे दुसरे अतिशय प्रसिद्ध उदाहरण बघूया. "ही कुणी छेडिली तार" हे केदार रागातील श्रवणीय गाणे. खुद्द संगीतकार पु.ल.देशपांड्यांची आवडती रचना परंतु इथे गायन करताना, वसंतरावांनी अकारण "ढाला" आवाज लावला आहे जो त्यांच्या स्वभावाच्या पठडीत बसत नाही आणि त्या स्वररचनेला आवश्यक देखील नाही. परिणामी गाण्याचा एकूण परिणाम घसरतो. 
हाच प्रकार पंडित कुमार गंधर्वांच्या बाबतीत घडलेला आहे. कवी अनिलांची "आज अचानक गाठ पडे" या भावकवितेचे गायन.  गायन करताना एकदम उसळी मारून स्वर घ्यायचा, ही कुमार गंधर्वांची सवय पण ही सवय भावसंगीताला शोभणारी नाही. कवितेतील "अचानक गाठ पडणे" स्वरांतून दृग्गोचर होत नाही. ऐकायला मिळते, ती रागदारी बंदिश. हाच प्रकार आणखी वेगळ्या पद्धतीने ऐकायला मिळतो. "ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी" ही स्वररचना गाताना तर चक्क चुकीचे शब्दोच्चार केलेले आढळतात आणि वाईट भाग म्हणजे त्या शब्दोच्चारांची भलावण केली जाते किंवा उल्लेखच टाळला जातो!! याच गाण्याच्या संदर्भात काही वर्षांपूर्वी माझे एका सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शकासह बोलणे झाले आणि मी हा मुद्दा काढला. अर्थातच त्या व्यक्तीला माझे बोलणे रुचले नाही आणि त्यांनी "हे कुमार गंधर्वांचे perception आहे" असे सांगून समर्थन करण्याचा प्रयत्न केला. मग मी देखील त्यांना दुसरे उदाहरण दिले. हिंदी चित्रपटात अनेकवेळा चाली उचलल्या जातात, कधी ठरवून तर कधी अनाहूतपणे (अनाहूतपणे ठरवणे तसे अवघड आहे तरी....) आता, हे देखील त्या संगीतकारांचे perception का म्हणू नये? Perception हे व्यक्तिगणिक बदलत असते आणि असे स्वातंत्र्य घेणे म्हणजे स्वैराचाराला निमंत्रण देणे नव्हे का? पण कुमार गंधर्व म्हणजे भारतीय संगीतातील दैदिप्यमान नाव, जणू ध्रुव तारा तेंव्हा त्यांचे सगळेच चांगले असते. पण ही भोळसट वृत्ती झाली. कलाकारांचा "देव" असा होतो. इथे मला या कलाकारांचा उपमर्द करण्याचा अजिबात हेतू नाही. या दोन्ही कलाकारांचे भारतीय संगीताला लाभलेले योगदान नि:संशय श्रेष्ठ आहे पण त्यांची आविष्कार क्षेत्रे निराळी आहेत, इतकेच माझे म्हणणे आहे. आणि आविष्कार क्षेत्रे वेगळी आहेत हेच त्यांच्या कलेचे मूल्यमापन करताना दृष्टीस आणायला हवे. लगेच कुठल्याही कलाकाराला "एकमेवाद्वितीयं" म्हणण्याची अजिबात जरुरी नसते. 
आपला भारतीय समाज एकूणच कधीही प्रगल्भ झालाच नाही की काय? असा प्रश्न वारंवार पडतो कारण आपल्याकडे ज्या प्रकारे व्यक्तीचे भलामण करतात, नको तितकी आरती ओवाळली जाते,स्तुतीचा गुलाल उधळला जातो त्यात त्यांच्या कलाकृतीचे योग्य मूल्यमापन करणे अशक्य होऊन बसते. सगळा समाज "महाआरतीमध्ये" तन-मन-धन गुंतलेला असतो. विवेकबुद्धी गमावून बसतो, तारतम्य वृत्तीच हरवून बसतो. कलाकार देखील "माणूस" असतो, हे लक्षातच घेत नाही आणि उदोउदो केला जातो. 

Friday 27 September 2019

चक्रवाक पक्षी वियोगे बाहाती

मराठी भावगीत संगीतात भक्तिसंगीताला बरेच मोठे स्थान आहे. पारंपरिक स्वररचनांपासून ते आधुनिक स्वररचनांनी भक्तिसंगीत वैपुल्याने फुललेले आहे. आपल्याकडे नेहमीच एक विधान वारंवार केले जाते - भारतीय संगीत भक्तिपर आहे. अर्थातच हे विधान काहीसे एकांगी आहे. याचे कारण नं. १) भक्तिपर संगीताची स्वतंत्र अशी कोटी आहे, नं. २) प्रयुक्त होत असलेल्या एकंदर संगीतापैकी बरेचसे संगीत भक्तिपर आहे, असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. या बाबत असे म्हणता येईल, विशिष्ट संगीताविष्कार सादर करीत असताना संगीतकाराची मनोवस्था भक्तिपर आहे/होती म्हणून संगीत भक्तिपर ठरत नाही. सादरीकरणातील सांगीत आशय आणि साचे बहुसंख्य आणि गुणबहुल संगीतरचनांच्या संचांशी निगडित होतात. भक्तिसंगीत या कोटीस हाच न्याय लागू होतो. त्यामुळे सुमारे दोन हजार वर्षे लोकांत भक्तिमार्ग आणि भक्तिसंगीताची ओढ का अबाधित राहिली, हे समजून घेणे अशक्य नाही. संतकवी सुमारे इ.स. ८०० पासून देवळादेवळांतून फिरू लागले परंपरेत असे  ,भक्तिसंगीत हे कर्नाटकात भरभराटीस आले, पुढे तो मार्ग महाराष्ट्रात फैलावला. याच इतिहासातून पुढे संतकवी जन्माला आले. मराठीपुरते मांडायचे झाल्यास, ज्ञानेश्वरांपासून जो भागवत आणि वारकरी संप्रदाय सुरु झाला तो आजतागायत सुरूच आहे. आजच्या गाण्याचे शब्दकार संत नामदेव हे याच परंपरेतील एक ठळक नाव. 
कवी म्हणून विचार केल्यास, नामदेवांच्या रचनांवर ज्ञानेश्वरांचा प्रभाव जाणवतो परंतु ज्ञानेश्वरांच्या रचनांतून जी भाषिक श्रीमंती आढळते, तितकी नामदेवांच्या अभंगांतून आढळत नाही. गेयता हा गुण आहे परंतु उपमा, प्रतिमा याबाबत काव्य थोडे उणे पडते. अगदी याच शब्दरचनेतील उदाहरण घ्यायचे झाल्यास, "जीवनावेगळे मत्स्य तळमळती"! पाण्याला जीवनाची उपमा द्यायची कल्पना सुरेखच परंतु हीच उपमा, नंतर काही शतकांनी जन्माला आलेल्या तुकारामांच्या अभंगात लखलखून येते. संतसाहित्य हे प्रामुख्याने विठ्ठल भक्तीशी निगडित आहे आणि विठ्ठलाला प्रसन्न करून घेण्याचा उद्देश प्रच्छन्नपणे दिसतो. संतांनी त्यासाठी अनेक मार्ग अवलंबले आणि त्याप्रतिच आपल्या रचना निर्माण केल्या. "चक्रवाक पक्षी वियोगे बाहाती" ही पहिली ओळच तसे दर्शवून देते. किंबहुना, प्रत्येक अंतऱ्याची दुसरी किंवा अंत्य ओळ ही पुनरुक्तीच आहे अपवाद शेवटचा अंतरा. काव्य लिहिण्यामागचा उद्देश अतिशय ढोबळ पण स्पष्ट आहे.  विठ्ठलाची आळवणी करताना, आई-मूल किंवा वासरू-गाय या उपमा अनंत काळापासून चालत आलेल्या आहेत, आजही ही नाती काव्यात उपयोगात आणल्या जातात परंतु आशय वृद्धी करताना, त्यातील नेमकेपणा आणि सौंदर्य किंवा व्याकुळता यात सपकपणा जाणवला की ते शब्द शिळे होतात. 
संगीतकार कमलाकर भागवत यांची कारकीर्द प्रामुख्याने "अरेंजर " म्हणून गाजली परंतु अशा रचनांमधून त्यांनी संगीतकार म्हणून आपले वेगळेपण सिद्ध केले. सुधीर फडके, यशवंत देव सारख्या संगीतकारांच्या रचना सजविण्याचे काम त्यांनी प्रभाकर जोगांसमवेत बरेच वर्षे केले या गाण्याची चाल तशी सहज, सोपी आणि गुणगुणता येईल अशीच आहे. हाताशी सुमन कल्याणपूर सारखा सुरेल गळा असल्याने, चालीत काही अवघड हरकती घेतल्या आहेत. रचनेचा दुसरा अंतरा हा मुखड्यापासून वेगळा बांधला आहे तसेच चौथा / शेवटचा अंतरा वरच्या सुरांत घेतलेला आहे. खरंतर मुखडा अगदी साधा आहे पण अतिशय गोड आहे. लगेच चालीचे वळण ध्यानात येते. थोडक्यात मूल्यमापन (या गाण्याच्या आधारे) करायचे झाल्यास, संगीत रचनाकार म्हटला की त्याचा सर्वात पायाभूत गुण असतो तो गुणगुणण्यासारखी चाल बांधता येणे होय. तसेच चाल बांधताना, त्यात शक्यतो अवघडलेपण नसण्याकडे कल दिसतो जेणेकरून सामान्य रसिक श्रोता देखील आकर्षिला जाईल. याचा परिणाम असा होतो, स्वरांकित चलने मनात रेंगाळत राहतात. वाद्यवृंद फारच मर्यादित असतो जसे इथे बासरीचा वापर संपूर्ण रचनेत केलेला आहे. तसेच मुखडा आणि अंतरे गायले जात असताना पार्श्वभागी मंद नादाच्या घंटेचा उपयोग श्रवणीय आहे. 
गायिका म्हणून सुमन कल्याणपूर यांनी मराठी भावगीतात उल्लेखनीय अशी कामगिरी निश्चितच केलेली आहे. खरतर हे नाव चित्रपटबाह्य गीतांसाठीच अधिक लोकप्रिय झाले. गीताची चाल अचूक ओळखून त्यांनी इथे गायन केले आहे. चालीची जातकुळी सोपी आहे, भक्तिसंगीत आहे तेंव्हा शब्दोच्चार त्याच धर्तीवर केले आहेत. "वियोगे शब्द गाताना त्यातील व्याकुळता सुरेख दर्शवली आहे. तसेच शेवटचा अंतरा जेंव्हा वरच्या सुरांत जातो तिथे स्वर निमुळता करत, एक सुंदर टोक गाठले आहे. ही शैली लताबाईंच्या गायकीच्या जवळपास जाणारी. चालीत आर्तता आहे पण हताशता नाही, विसविशीतपणा नाही. गायन संथपणे परंतु आश्वासक पद्धतीने पुढे चालत असते. ही कामगिरी अजिबात सोपी नाही. 
सौंदर्य हे नेहमीच लखलखीत, डोळे दिपवणारे असायलाच हवे हा हट्ट एकांतिक आहे. निरांजनाच्या शांत ज्योतीप्रमाणे निरंतर तेवत राहण्यात देखील तितकेच अप्रतिम सौंदर्य असते आणि हेच या गाण्याचे खरे वैशिष्ट्य म्हणता येईल. 

चक्रवाक पक्षी वियोगे बाहाती
झालें मजप्रती तैसें आता 

चुकलिया माय बाळकें रडती 
झालें मजप्रती तैसें आता 
वत्स न देखता गाई हुंबरती 
झालें मजप्रती तैसें आता 

जीवनावेगळे मत्स्य तळमळती 
झालें मजप्रती तैसें आता 

नामा म्हणे मज ऐसें वाटे चित्ती 
करीतसे खंती फार तुझी  



Tuesday 10 September 2019

सी. रामचंद्र

हिंदी चित्रपट संगीतात एकेकाळी स्वतःचे अधिराज्य गाजवणारे म्हणून सी. रामचंद्र यांचे नाव घ्यावेच लागेल. जवळपास १८ वर्षे ( १९४२ ते १९५८ ) त्यांनी हिंदी चित्रपट संगीतावर आपली छाप उमटवली. आता इतकी प्रदीर्घ कारकीर्द म्हटल्यावर मूल्यमापन करणे बरेच सोपे जाते आणि तसे मी करणार आहे. पंडित विनायकबुवा पटवर्धन (पुणे) आणि पंडित शंकरराव सप्रे (नागपूर) यांच्याकडून कलासंगीताचे पायाभूत शिक्षण घेतले. ही सुरवातीलाच सांगणे आवश्यक आहे कारण त्यांच्यावर बरेचवेळा पाश्चात्य संगीतचोर म्हणून आरोप केला गेला (वास्तविक मुळातल्या पाश्चात्य चाली आणि त्यांची पुनर्रचना केलेल्या आवृत्ती हा अभ्यासाचा वेगळा विषय आहे) परंतु त्याचबरोबर त्यांनी भारतीय धाटणीची जी गाणी दिली, तिकडे या टीकाकारांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले. भारतीय कलासंगीताचा पायाभूत अभ्यास केल्याचा त्यांना आपल्या कारकिर्दीत बराच फायदा झाला. किंबहुना, कलासंगीताच्या अभ्यासाचा एक अटळ परिणाम होतो परंतु या संगीतकाराने स्वररचना करताना, निव्वळ आधारभूत स्वर घेतले आणि आपल्या रचना सजवल्या. त्या कशा सजवल्या, याचेच इथे आपण विवेचन करणार आहोत आणि उचलेगिरीबाबत झालेली टीका किती कोत्या मनाची आहे, हे दर्शवून देणार आहोत. कारकिर्दीची सुरवात एक सुंदर हार्मोनियम वादक म्हणून झाली (साधारणपणे १९३९साली)  पण लवकरच त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आणि आपलया परिपूर्ण कारकिर्दीला आरंभ केला.कारकिर्दीत साधारणपणे २५० चित्रपटांना संगीत दिले (इतर भाषिक चित्रपट यात अंतर्भूत आहेत). 
आनंदी ,जवानीच्या जल्लोषाने भरलेले तसेच पाश्चात्य हलक्याफुलक्या संगीताने प्रभावित झालेले भारतीय संगीत असे ढोबळपणे म्हणता येते परंतु त्यांना संगीतचोर म्हणणे तितकेसे योग्य नाही. आपण हलक्याफुलक्या पाश्चात्य संगीताचे सुजाण श्रोते आहोत, असे ते वारंवार म्हणत असत आणि  त्यात तथ्य आहे. सर्वात महत्वाचा विशेष म्हणजे संगीतरचनेस वर्णनात्मक आशय देण्याचा त्यांचा प्रयत्न लक्षणीय होता. गायक म्हणून विचार करायचा झाल्यास, त्यांच्या गायनात एक प्रकारचा फसवा सहजपणा होता. गुणगुणल्यासारखे ते गातात असे वाटते. तुम्ही पण माझ्या सोबत गाऊ शकता, नव्हे तसे करा, असे जणू ते सुचवीत असत. 
"आना मेरी जान संडे के संडे" (चित्रपट शहनाई) या गाण्याने त्यांना खऱ्याअर्थी अफाट लोकप्रियता मिळाली. पाश्चात्य संगीताचा वापर कसा करावा, याबाबत त्यांनी या गाण्याद्वारे नवीन पायंडा पाडला असे म्हणता येईल. गीतरचनेची या संगीतकाराची एक खास सर्वसाधारण पद्धत अशी, की निवडकपणे हलके - विशेषतः नृत्याच्या अंगाचे - पाश्चिमात्य संगीत घ्यायचे आणि त्याला भारतीयता प्रदान करायची. यामुळे हिंदी चित्रपट संगीतात "रंबा संबा (गोरे गोरे)", "रॉक एन रोल (मिस्टर जॉन किंवा इना मीना डिका)" ही वळणे त्यांनी पक्केपणाने रुजवण्याचे काम त्यांनी केले. परिणामतः ओबो, सॅक्सोफोन, चेलो, ट्रम्पेट, ड्रम्स, स्पॅनिश गिटार, हार्मोनिका सारखी वाद्ये त्यांनी मुबलकपणे वापरली, यात काही नवल नव्हते. 
त्यांच्या बहुतांशी रचनांनी आजही लोकमानसावर परिणाम का साधावा, याची कारणे समजण्यासारखी आहेत. सर्वात प्रथम असे, चालीची बांधणी इतकी साधी आहे की ही गीते ऐकून कुणालाही आपण देखील गाऊ शकतो, असा विश्वास वाटतो. दुसरा विशेष असा, वापरलेले ताल आणि लयीपण सहज उचलण्यासारखे आहेत. यात शारीर हालचाली सहजपणे जमणे हा भाग महत्वाचा आहे. त्यासाठी पूर्वशिक्षणाची काहीही गरज भासत नाही. रचनांचे साधेपण हे असे आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्वांतून एक वासनारहित मोकळेपणा खेळत असते. 
याचबरोबर या संगीतकाराने भारतीय संगीत परंपरांत बसू शकतील अशीही गीते यशस्वीपणे सादर केली आहेत. या संदर्भात "लोक","कला" आणि "जन" संगीतकोटींतील त्यांच्या रचनांचा मुद्दाम उल्लेख करावा लागेल. "ये जिंदगी उसीकी है" या गीतात उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांचे सतार वादन उल्लेखनीय आहे, याच वाद्याने पुढे, "मुहोब्बत ही ना जो समझे" या गीतात रंग भरला आहे. पहिल्या गीतात असाधारण चमकदारपणे वाजणारी सतार, या रचनाकाराने सहेतुकपणे दुसऱ्या गीताच्या शोकगंभीर परिणामास विरोधासंबंधी म्हणून योजली आहे, असे  वाटून जाते. "तू छुपी है कहाँ" या गीतामधील शहनाईचा वापर याच प्रकारचा आहे. "मालकंस" या "औडव" रागात बांधलेल्या चालीत शहनाईच्या भेदक आणि तीक्ष्ण स्वरवाक्यांतून एक साद वा हाक ऐकू येते. कालिक लय पुरवण्यासाठी बहुदा ताशा व नगारा ही काठीच्या आघाताने वाजणारी तालवाद्ये वापरली असावीत. आणखी एक सुरेख उदाहरण बघायचे झाल्यास, "कितना हंसी है मौसम" या गाण्यात "पिकोला" या उच्चस्वरी वाद्याच्या ध्वनीने या गीतात बासरी मुख्य चालीतून आतबाहेर करते. 
या संगीतकाराने काही अप्रतिम द्वंद्वगीते दिली आहेत. "ओ चांद जहाँ तू जाये" हे गीत लताबाई आणि आशाबाई यांनी गायलेले आहे. "वो हमसे चूप है" (सी. रामचंद्र आणि लताबाई), "गया अंधेरा हुवा उजाला" ( लताबाई + तलत मेहमूद), "भूल जाये सारे गम" ( नौशेरवाने आदिल), "तू छुपी है कहाँ" (आशाबाई + मन्ना डे), "गा रही है जिंदगी" ( आशाबाई + महेंद्र कपूर) ही सगळी गाणी ऐकावीत. यांत निरनिराळ्या आवाजात कुठलीही भावना आगळीवेगळी वाटली पाहिजे!! इथेच रचनाकाराचे कौशल्य पणाला लागलेले असते. फक्त चालच नव्हे तर त्या चालीचा आवाजानुसार बदलता रंगही ध्यानात आला पाहिजे. 
इतर रचनाकारांप्रमाणे हा संगीतकार आपल्या रचनासुत्रांतही भारतीय रागांच्या ठशांचा वापर समाविष्ट होताच. "कैसे जाऊं जमुना के तीर" (राग भैरवी), "ओ निर्दयी प्रीतम" ( राग भीमपलास), "जब दिल को सतावे गम" (राग जौनपुरी), "आधा है चंद्रमा" (राग मालकंस), "दिल लगाकर हम ये समझे" (राग पहाडी) इत्यादी गीते या संदर्भात लक्षात येतील. असे असले तरी या संगीतकाराला "बागेश्री" रागाने अधिक भावले होते. " ]राधा ना बोले", " जाग दर्द ए इष्क जाग" या गीतांत हा राग यथायोग्य वापरलाच आहे परंतु "मोहब्बत ऐसी धडकन है","हम कितना रोये", "मेरे जीवन मे किरन" ही गीते ऐकावीत. बागेश्री रागावर प्रक्रिया करून, त्याचा पुनर्रचित अवतार या गीतांतून घडवला आहे. 
पारंपरिक रचना वापरण्याशिवाय ( ये जिंदगी उसी की है - मूर्तिमंत भीती उभी किंवा कैसे जाऊं जमुना के तीर - याच नावाची भैरवी रागातील ठुमरी) त्यांनी अमलात आणलेले अधिक कुशल तंत्र म्हणजे स्वराकृती निर्माण करण्याची चित्रे अनुसरण्याची होय. 
उदाहरणार्थ "जब दिल को सतावे गम" किंवा "धीरे से आजा री" पहिल्या गाण्यात सरगम गायनाचे शास्त्रोक्त कंठ संगीतातील तंत्र वापरले आहे तर दुसऱ्या गीताचे जन्मस्थान उघडपणे मराठी स्त्रीगीतावर आधारलेले आहे. या संगीतकारावर जेंव्हा पाश्चात्य संगीताची उसनवारी करणारा अशी टीका होते, त्यावेळी प्रस्तुत रचना करताना पारंपारिक संगीताची योजना करणारा संगीतकार म्हणून लक्षात घ्यावे. 
त्यांच्या अनेक गीतांना विनोदी गीते म्हणता येईल. तसे बघता, आवश्यक ते शब्द असल्याशिवाय विनोद कसा आणायचा हा नेहमीच प्रश्न असतो. बरेचवेळा गंभीर संगीतापासून फटकून वागणारे ध्वनिपरिणाम योजणे, बरेचसे संगीतकार पसंत करतात. वास्तविक गीताच्या लयींपासून विनोद निर्मिती करता येते. उदाहरणार्थ - " ओ बेटा जी" (अलबेला) या गीतांत जलतरंग वाद्यानंतर स्वयंपाकघरातील भांड्यांचे आवाज ध्वनी लयीच्या चौकटीत बसवून वापरल्याने गीत अधिक वेधक झाले आहे. याच उलट बोलायचे झाल्यास "मेरे दिल की घडी" (अलबेला) या गीतांतील विनोदी आशय मोजक्या वाद्यांचा वापर आणि ढाल्या आवाजातील गायन, यामुळे अधिक वेधक झाले आहे आणि विनोदी आशय ठाशीवपणे समोर येतो. 
दुसरा वेधक विशेष असा म्हटले येईल, एकंदर नेहमीची संचालन गीते किंवा मिरवणुकीतून शौर्य, निषेध व्यक्त करणारी गीते त्यांच्या पसंतीच्या कक्षेत नव्हती. "यही पैगाम हमारा"(पैगाम) किंवा "देख तेरे संसार की हालत"(नास्तिक) या घेतांना कुशलतेने रचलेली गीते असे म्हणता येईल. याउलट चित्रपटबाह्य "ऐ मेरे  वतन के लोगो" हे गाणे. खरेतर हे गाणे चित्रपटबाह्य संदर्भाने अमर झाले पण गीताच्या चलनात ज्या प्रकारचा रुंजी घालणारा भाव, करुणार्त भाव आहे, तो विशेष जाणवणारा आहे. पण असे विधान नक्की करता येईल, या संगीतकाराला राष्ट्रगीते रचायला आवडले असते, असे वाटत नाही. 
प्रत्येक रचनाकार काही गीते अशी काही करतो जी रूढ अर्थाने धडाक्यात लोकप्रिय झाली नाहीत तरी देखील टी गीते ऐकल्यावर एक सूक्ष्म पण काहीसा अस्वस्थ करणारा परिणाम घडतो. काही वेळा परिणाम एकदम न जाणवता त्या गीतांच्या वारंवार श्रवणाने लक्षात येतो. अशा गीतांचे यथार्थ मूल्यमापन देखील अवघड जाते तरी नोंद घेणे आवश्यक. उदाहरणार्थ "तुम क्या जानो" (शिनशिनाके बुबलबू). हे गीत बागेश्री रागाची छाया घेऊन अवतरते. परंतु विशेष असा आहे, आपण शास्त्रीय राग वापरलाय, असे दाखवण्याचा अट्टाहास कुठेच दिसत नाही. तसेच आपण रागापासून कसे दूर गेलो आहोत, हे देखील दर्शविण्याचा प्रयत्न नसतो. या गाण्याच्या संदर्भात लिहायचे झाल्यास, "रोये" शब्दावर कोमल गंधार ठेवून मग आवाहक गंभीरतेच्या शुद्ध धैवतावर अवरोह केला जातो. मग एकेक स्वरवाक्य येते आणि नंतर "षड्ज" या शांत स्वरावर विसावते. 
आता थोडक्यात मूल्यमापन - हा संगीतकार अष्टपैलू होता हे नि:संशय. त्यांचा रचनासंभार विपुलही आहे. सुरावटीचा प्रवाह खेळता ठेवणे जमत असे. काहीही करताना कसलाही प्रयास पडत नसे आणि संगीतरचनेतील त्यांचे हे सहजपण श्रोत्यांपर्यंत सहजपणे पोहोचत असे. त्यामुळे एखाद्या गीताने डोळ्यांत अश्रू आले तरी ऐकणाऱ्यास आरामदायी आनंद वाटे. त्यांचे संगीत सगळ्यांना समजे. अर्थात, ते संगीत साधे म्हणून समजे असे नसून, पुरेशा तांत्रिक प्रभुत्वामुळे आपले कौशल्य लपवून संगीत लोकांसमोर आणण्याची कला त्यांना साध्य झाली होती. हिंदी चित्रपट संगीताच्या रूढ शैलीविरुद्ध जाण्याचे धाडस दाखवले होते. त्यासाठी आपले वेगळेपण सिद्ध करण्याची त्यांना कधीही गरज भासली नाही. आपण कलाकार आहोत आणि ते पुरेसे आहे, हेच त्यांची भावना प्रबळ होती. संगीतकार म्हणून इथेच त्याचन्हे वेगळेपण सिद्ध होते. 

राधा ही बावरी

मराठी भावगीताला आधुनिक पेहराव देण्यात, ज्या संगीतकारांचे महत्वाचे योगदान आहे, त्यात संगीतकार अशोक पत्की यांचे नाव घ्यावेच लागेल. आज सत्तरी उलटून गेली तरी चालींच्या बाबतीत काहीतरी नवनवीन शोधून काढण्यात त्यांना बराच रस आहे आणि त्यामुळेच बहुदा आजही त्यांची गाणी शिळी, जुनाट अशी वाटत नाहीत. आजचे आपले  गाणे, "राधा ही बावरी" हे याच पठडीतील गाणे आहे. या गाण्याची एक गंमत आहे, या गाण्याचे कवी आणि संगीतकार अशोक पत्की आहेत. निदानपक्षी मराठीत तरी संगीतकार यशवंत देव वगळता अशी भूमिका एकाच व्यक्तीने साकारल्याची उदाहरणे मिळत नाहीत. अर्थात जे संगीतकार यशवंत देवांनी उघडपणे म्हटले आहे, त्याच चालीत संगीतकार अशोक पत्कींबाबत म्हणता येईल. हे दोघेही "कवी" नव्हेत. प्रसंगोत्पात घडलेला गोड अपघात, असे म्हणता येईल. 
याचा परिणाम असा झाला ( या गाण्याबाबत) शब्दकळा ही स्वरलयीला सुलभ अशीच झाली. ही कविता, सुरांना बाजूला सारून वाचायला घेतली तर त्यातील शाब्दिक लय सहजपणे जाणवतो. ललित संगीतात शब्दकळा ही नेहमीच उच्चारायला सुलभ असावी, असा एक निकष आहे. अकारण जोड शब्द नसणे, शाब्दिक लय जाणवून घेताना नेमके "खटके" असावेत, मुखड्याची पहिली ओळ वाचताना, "रंगात रंग" - "तो श्यामरंग" - "पाहण्यात" - "नजर भिरभिरते" अशी खंडित करून ओळ वाचता येते जेणेकरून गाण्याची चाल  बांधताना,तेच "आघात" कायम ठेवणे शक्य होते. वरील ओळ ही ४,५ अक्षरांत विभागून घेतली असल्याने चालीला आणि गायनाला कुठेही फारसा त्रास होत  नाही - फक्त शेवट करताना ८ अक्षरे आहेत पण ओळीचा शेवट करताना एखादी छोटी हरकत घेऊन स्वरिक लयीला कुठेही बाधा न आणता, सुंदर स्वरवाक्य पूर्ण करता येते. इथे "भिरभिरते" गाताना, लय लांबवली आहे पण तशी करताना सौंदर्यवृद्धीच दिसते. अर्थात हे संगीतकाराचे कौशल्य. कविता जरा बारकाईने वाचली तर ध्रुवपदाच्या शेवटच्या २ ओळी या, पुढील दोन्ही अंतऱ्याचा समाप्त करताना तशाच ठेवल्या आहेत. आधुनिक ललित संगीतात, हा एक नवीन प्रघात पडला आहे, चाल बांधताना, त्यातील शब्दांची पुनरावृत्ती करायची, जेणेकरून गाण्याची चाल आणि लय (शब्दांकडे पूर्वीपासून लक्ष कमीच असते म्हणा!!) ही ऐकणाऱ्याच्या मनात ठामपणे वावरते. या ठिकाणी तीच पद्धत वापरली आहे. 
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साद ऐकुनी होई - 
राधा ही बावरी हरीची, राधा बावरी !
या दोन ओळी दोन्ही अंतरे संपवताना योजल्या आहेत. परिणामी चाल मनात रुंजी घालते. अर्थात याचा उलटा परिणाम देखील काही वेळा होतो, जर का गाण्याची चाल टुकार असेल तरीही गाण्यात वारंवार तीच सुरावट ऐकवून, भुक्कड चाल देखील रसिकांच्या मनात उतरवली जाते. संगीतकार अशोक पत्की यांची बरीचशी सांगीतिक कारकीर्द ही "जिंगल्स" तयार करण्यात गेली. याचा एक चांगला परिणाम झाला, त्यांच्या चाली चटपटीत झाल्या, त्यातील गोडवा अधिक वेधक झाला तसेच स्वरवाक्यांश छोटे असल्याने रसिकांना ऐकायला फार प्रयास पडत नाहीत. या गाण्यात थोडे तांत्रिक लिहायचे झाल्यास, भारतीय तालाच्या वर्तुळात्मकतेऐवजी अखंड कालविभाजनाने लयावतार घडवलेला आढळतो. या पद्धतीच्या विभाजनास अनंततत्व असू शकते. त्यांचे लयबंध आधुनिक वाटतात, त्यामागे हे एक कारण असू शकते. त्यांच्या लयकारीत ६ किंवा ८ मात्रांनी कालावधी विभाजन करण्याच्या आकलनास सुलभ सार्वत्रिक आकृतीबंधांचाच पाठपुरावा असतो. या गाण्यात तालाची पाश्चात्य ड्रम वापरला असल्याने गीतात परिचित भारतीय ताल आढळत नाही परंतु जरा बारकाईने ऐकल्यास मात्रांचे विभाजन सम प्रमाणात केल्याने आकलनास कुठेही बाधा येत नाही. आणखी एक विशेष मांडायचा झाल्यास, सुरावटींबाबत रागचौकटीशी खेळण्याचे वावडे नाही. या गाण्यात यमन रागासारख्या परिचित रागाचे सूर सापडतात पण रागदर्शन नाही. संगीतकार म्हणून आणखी काही विवेचन करायचे झाल्यास, जिंगल्स सारखे माध्यम हाताळून देखील जिंगल्स करताना, आकर्षक संगीत पण भंग पावलेले आणि गीततत्वापर्यंत पोहोचू न शकलेले, अशी स्वररचना करण्याचा मोह होऊ शकतो पण संगीतकार म्हणून अशोक पत्कींनी त्यापासून अशा प्रकारचे ललित संगीत वेगळे ठेवण्यात नि:संशय यश मिळवले आहे. 
गायक स्वप्नील बांदोडकरांना या गाण्याने खरी ओळख मिळवून दिली. अतिशय स्वच्छ, मोकळा आवाज तसेच जास्तीत जास्त दीड सप्तक एकाचवेळी अवकाशात घेऊ शकेल इतपत लाभलेला गळा. याचा परिणाम गायनात उस्फुर्तपणा आणणे सहजशक्य होते. हेच गाणे मी खाजगी कार्यक्रमात गाताना ऐकलेले आहे. त्यावेळी गायन करताना, चालीतील स्वरविस्ताराच्या जागा हुडकून, आयत्यावेळी नाविन्याचा अनुभव देण्याची ताकद गळ्यात असल्याचे समजून घेता येते. गायन ऐकताना, शास्त्रोक्त संगीताची तालीम घेतल्याचे जाणवते. परिणामी, गाण्यातील हरकती, छोट्या ताना घेताना त्यातील सहजपणा दिसून येतो. स्वर लावताना, तो दाबून लावण्याकडे आधुनिक गायकांचा ओढा असतो परंतु स्वप्नील बांदोडकर असल्या क्लुप्त्या करताना दिसत नाहीत. गायक म्हणून हा विशेष नोंदवायलाच हवा. 

रंगात रंग तो श्यामरंग पाहण्यात नजर भिरभिरते 
ऐकून तान विसरून भान, ही वाट कुणाची बघते 
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साद ऐकुनी होई - 
राधा ही बावरी हरीची, राधा बावरी !

हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना 
चिंबचिंब देहावरून श्रावणधारा झरताना 
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई 
हा उनाड वारा गुज प्रीतीचे कानी सांगून जाई 
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साद ऐकुनी होई - 
राधा ही बावरी हरीची, राधा बावरी !
आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती 
तुज सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती 
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई 
हा चंद्र चांदणे ढगा आडूनी प्रेम तयांचे पाही 
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साद ऐकुनी होई - 
राधा ही बावरी हरीची, राधा बावरी !