Wednesday 25 August 2021

पाऊस

पाऊस कधीच पडतो वाऱ्याने हलती पाने हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुरांनी डोळ्यांत उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती रक्ताचा उडाला पारा..... या नितळ उतरणीवरती पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा कवी ग्रेस यांनी ज्या काही असामान्य कविता लिहिल्या, त्यातील ही एक अप्रतिम कविता. वास्तविक बघता, या कवींवर अनेक लेबले लावली गेली जसे "दु:खाचा महाकवी" किंवा "अगम्य कवितांचा लेखक"(खरे तर हे आक्षेप घेतले जातात) इत्यादी.आता या लेखात, या आक्षेपांसह कवितेचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वसाधारणपणे आपण जेंव्हा कविता वाचण्यासाठी हातात घेतो तेंव्हा आपले लक्ष हे सुरवातीच्या शब्दांकडे,पुढे त्या शब्दांतून तयार होणाऱ्या ओळीकडे असते.जेंव्हा शब्दसंहती वाचत जातो, तेंव्हा जर का शब्दजोड नेहमीच्या ओळखीची असली की त्याचा आशय ध्यानात येतो. त्याचाच पुढील प्रवास संपूर्ण ओळीशी येऊन ठेपतो.कवितेची पहिली ओळ समाजलीकी मग आपसूकच आपण पुढील ओळीकडे वळतो.आपल्या वाचनाची अशी सर्वसाधारण पद्धत असते. खरी गोम इथेच होते. शब्द जरी परिचित असले तरी पुढील शब्दरचनेशी जर का आपण जवळीक साधू शकलो नाही की लगोलग बिचकतो. खरंतर आपण शब्दांच्या रचनेचा फार विचार करत नसतो. आपल्याला कविता "सरळसोट" समोर आली म्हणजे भावते (कविता समजणे, ही पुढील पायरी होय). अर्थात कविता "भावणे" यालाच कविता "समजणे", अशीच समजूत करून घेतो!! इथेच खरी अडचण निर्माण होते. कविता हे माध्यम कवीच्या उस्फुर्ततेचे माध्यम मानले जाते - या विधानाला नको तितके महत्व दिले गेले आणि कविता "अगम्य" होण्यात आपणच एक धोंड तयार केली कारण कविता समजली नाही की लगेच आपण बाजूला टाकतो. कवीने तिथे काही ठराविक शब्द का योजले आहेत? हा प्रश्नच स्वतःला विचारत नाही आणि आपणच आपली संवादकक्षा बंद करून टाकतो. आपण बरेचवेळा नको तितका अधिरेपणा दाखवतो. मला वाटते, इथेच ग्रेस यांच्या काही कविता आपण "अगम्य" या वर्गात ढकलून देतो. अर्थात ग्रेस यांच्या सगळ्याच कवितांचे समर्थन नव्हे. याच पार्श्वभूमीवर वरील कवितेचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करू. कवितेच्या ध्रुवपदात कवितेची संकल्पना ठळकपणे मांडली आहे. पाऊस कधीच पडतो वाऱ्याने हलती पाने हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुरांनी या ओळी वाचतानाच त्यातील शाब्दिक लय देखील आपल्याला सापडते आणि त्या शब्दचित्रात आपण गुंगून जातो. संततधार पाऊस आणि त्या पाण्याच्या नादात, मनात आलेले दु:खी स्वर!! आता इथे संततधारेची जोड, अशा पावसात हळुवार वाहणाऱ्या वाऱ्याचा नाद देखील, "हलती पाने" या शब्दातून स्पष्ट केला आहे. वातावरणातील थंडगार गडदपणा आपल्या शरीराभोवती वेढलेला आहे आणि त्यातून आपल्या मनात आलेल्या व्याकुळ आठवणींनी अवचितपणे करुण सूर आले आणि जाग आली. ध्रुवपदातील सगळ्या ओळींतील शब्दसंख्या जवळपास सारखी असल्याने, वाचताना देखील आपल्या मनात एक लय तयार होतो आणि कवितेशी जवळीक निर्माण होते. कवितेतील दुर्बोधता स्वतंत्रपणे विचारात घेतली तर एक मुद्दा समोर येतो. कवितेचा विकास आणि अभिरुचीचा विकास, यात तफावत पडते. त्यातुन कविता नेहमीच प्रत्येक कालखंडात वेगवेगळी रूपे धारण करून आपल्या समोर येत असते परंतु आपली अभिरुची त्या वेगाशी तादात्म्य पावू शकत नाही आणि म्हणून बहुदा कविता दुर्बोध आहे, या विधानाचे सरसकटीकरण झाले. डोळ्यांत उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती रक्ताचा उडाला पारा..... या नितळ उतरणीवरती आता या ओळींच्या संदर्भात वरील विधाने वाचली तर माझा मुद्दा स्पष्ट व्हावा. पहिली ओळ लगेच लक्षात येते परंतु त्याच्या पुढील ओळ, समजून घेताना थोडा प्रयास पडतो आणि याचे कारण पहिल्या ओळीतील कल्पना, केवळ शब्द उलटे फिरवून लिहिली आहे. अर्थात केवळ शब्द उलटे फिरवले, इतकाच मर्यादित अर्थ नाही. "रक्ताचा उडाला पारा" इथे प्रतिमेचा संघात केलेला आढळतो. थोडा विचार केल्यास, पाऱ्याचा संदर्भ थोडा खोलात जाऊन विचार केल्यास, रक्ताची चिळकांडी आणि त्याची लखलखीत वेदना, हे ध्यानात घेतल्यावर "पारा" शब्दाची संगती लागते. ग्रेस यांची कविता अशी विचारप्रवर्तक होते. "या नितळ उतरणीवरती" या ओळीतील "नितळ" शब्द फार महत्वाचा. या शब्दाने आतापर्यंतचा जाणवलेला आशय उलटापालटा होतो. शेवटच्या ओळीने उलट्या अर्थाने आशय अधिक गडद होतो. पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला शब्दाच्या प्रत्येक अक्षराचे रूप पाहून शब्दाच्या अर्थापर्यंत पोहोचू पाहण्यात जो धोका आहे टोचढोक अशा कवितांचे विश्लेषण करून त्या कवितांच्या अर्थापर्यंत पोचण्यात आहे. अशी कविता "भागायची" नसून "भोगायची" असते!! आणि खरे म्हणजे असली कविता भोगण्याची शक्ती अशा कवितांमागील सृजनशक्तीइतकीच दुर्मिळ असते. असे लिहून देखील असे म्हणावेसे वाटते, कविता आकळून घेण्याची प्रक्रिया ही वैय्यक्तिक संवेदनशक्तीवर अवलंबून असते, हेच खरे. कवितेत प्रतिमेचे संयोजन हे जितके सहज आणि स्वाभाविक असेल तितका आशय सघन होत जातो. आता या कडव्यात पहिल्या ओळीने एक कल्पना स्पष्ट केली पण दुसऱ्या ओळीत, त्याच ओळीला चकवा देणारी प्रतिमा आली आहे. वास्तविक "शुभ्र फुले" आणि "ज्वाला" हे शब्द अपरिचित नाहीत परंतु या शब्दांची एकत्रित घातलेली सांगड वाचकाला स्तिमित करते. भावाकवितेचे हे एक प्रमुख अंग म्हटले पाहिजे. "फुलाची ज्वाला" हे प्रत्यक्षात अशक्य परंतु शुभ्रता प्रसंगी दाहक असू शकते किंवा एक प्रतिमा म्हणून तुम्हाला गुंगवून टाकू शकते. इथे असेच काहीसे झालेले आहे. पुढील ओळीत, ग्रेस नेहमीप्रमाणे अनघड प्रतिमेपाशी येतात "ताऱ्यांचा प्रहर" हा काही नेहमीच्या वापरला जाणारा शब्द नव्हे परंतु ताऱ्यांचा प्रहार या शब्दातून वातावरणातील अंधारी गडदपणा अधोरेखित केला, जो गडदपणा मी ध्रुवपदाच्या विवेचनाच्या वेळी लिहिला आहे. सगळी कविता अंधारी वातावरणाचीच आहे आणि त्या व्याकुळ ओल्या क्षणाची आहे. संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा कवी आणि रसिक यांच्यामध्ये बरेचवेळा "अपेक्षा" हीच खरी अडचण असते!! आपल्या कवितेला रसिकाश्रय मिळावा अशी निर्मिकाची अपेक्षा असते आणि काव्यात दाद देण्यासारखे काही असावे, ही रसिकाची अपेक्षा असते. कुठलीही पूर्वकल्पना मनाशी न धरता सृजन करणे आणि कुठलीच पूर्वकल्पना मनाशी न धरता सृजनाला सामोरे जाणे, ही कवी आणि रसिक यांच्यातील संबंधाची आदर्श व्यवस्था असे म्हणता येईल. ज्याला वस्तुस्थितीची दखल घ्यायची आहे त्याला अपेक्षा ही मूलभूत अडचण टाळता येण्यासारखी नाही. वेगळ्या शब्दात, कवीच्या कल्पना आणि रसिकांच्या कल्पना, यामधील अंतर कमी करणे, हेच श्रेयस्कर ठरते. ग्रेस यांच्या कवितेत बरेचवेळा "संदिग्धावस्था" निर्माण होते आणि प्रतिमांचे संयोजन कळणे दुरापास्त होते. शेवटच्या कडव्यात याच गोष्टीचे प्रत्यंतर येते. कविता "नि:संदिग्ध" असावी ही अपेक्षा ठेवणे जसे चूक तसेच अति "संदिग्ध" असणे देखील चूक!! "संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा" या ओळी काव्य म्हणून सुंदर आहेत परंतु आशयाची समज घ्यायला अवघड आहेत. जेंव्हा "आकाशाला वारा ढवळतो" तेंव्हा वातावरण "कुंद" असण्यापेक्षा वादळी होत असते. कवितेची प्रकृती तर वेगळीच आहे. कवितेतील सुरुवातीपासूनची संततधार आणि हलकेच जाग येणे, यांच्याशी वाऱ्याचे ढवळणे, याचे मेळ बसत नाही. परंतु कविता ही ठराविक काळाच्या संदर्भात तपासणे अयोग्य ठरते. तेंव्हा एक स्वतंत्र "आविष्कार" म्हणून या ओळींचा आस्वाद घेणे ठीक. अर्थात पुढील ओळी मात्र चिरंतन स्वरूपाच्या आहेत. "माझ्याच किनाऱ्यावरती, लाटांचा आज पहारा"!! माणसाच्या निर्बंधाबाबत तसेच अपुरेपणाबाबत या ओळी सुंदर आशय व्यक्त करतात. भावाकवितेचे एक लक्षण सांगता येते, त्यातील शब्द असे असावेत की तेच शब्द अपरिहार्य म्हणून आले पाहिजेत. तिथे दुसरा कुठलाच शब्द बसू शकत नाही. "पाऊस" ही कविता या निकषाला पुरेपूर उतरते.

Saturday 21 August 2021

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने बंदर मुंबापुरीचे उजळीत येई माघामधली प्रभात सुंदर. सचेतनांचा हुरूप शीतल; अचेतनांचा वास कोवळा; हवेत जाती मिसळून दोन्ही. पितात सारे गोड हिवाळा ! डोकी अलगद घरें उचलती काळोखाच्या उशीवरुनी; पिवळे हंडे भरून गवळी कावड नेती मान मोडुनी; नितळ न्याहारीस हिरवी झाडे काळा वायू हळूच घेती; संथ बिलंदर लाटांमधुनी सागर-पक्षी सूर्य वेचिती; गंजदार,पांढऱ्या नि काळ्या मिरवीत रंगा अन नारिंगी, धक्क्यावरच्या अजून बोटी साखरझोपेमधी फिरंगी; कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध; कुठे डांबरी रस्त्यावरच्या भुऱ्या शांततेचा निशिगंध; ह्या सृष्टीच्या निवांत पोटी परंतु लपली सैरावैरा, अजस्त्र धांदल, क्षणात देईल जिवंततेचे अर्घ्य भास्करा. साहित्याच्या क्षेत्रात दर कालखंडात काही संकेत रूढ होतात. साहित्याचे विषय काही ठरविक असावेत; त्या विषयाची ठराविक संगती असावी; साहित्याची रचना, त्यातील प्रतिमा आणि त्याची भाषा ठराविक प्रकारची असावी,असे काही निकष बरेचजण कळत-नकळत किंवा बहुतांशी जाणून बुजून मान्य करीत असतात. या निकषांच्या चौकटीत राहून देखील चांगली कविता लिहिता येते. त्यादृष्टीने विचार करता, प्रत्येक कवी काही प्रमाणात ती चौकट ढिली करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो. परंतु अशा प्रयत्नांमधून एखादाच कवी असा निर्माण होतो,तो ही सगळी चौकट मुळापासून मोडायला बघतो. रचनेची काही नवीन तत्त्वें तसेच काही नवीन पद्धती निर्माण करतो. असा कवी पुढील अनेक निर्मिकांना रूढ संकेतांच्या बंधनातून मुक्त करतो. साहित्याच्या क्षेत्रात त्या निमित्ताने वेगळे वारे वाहायला लागतात. परंपरेच्या मार्गाने लिहिणे चुकीचे असते, असे दर्शवायचा चुकूनही मानस नाही किंवा नव्या पद्धतीने लिहिलेले सगळेच सकस असते, असे मांडायची इच्छा नाही. परंतु नवीन विचारांनी, नव्या ध्यासाने लिहिल्यामुळे नव्या प्रकारची संगती लावणे शक्य असते हेच प्रतीत करायचे आहे आणि परिणामी साहित्याला अपरिहार्यपणे अधिक खोल आणि संपन्नता प्राप्त होते. मर्ढेकरांनी मराठी कवितेत आमूलाग्र बदल केलेअसे विधान बरेचवेळा सरधोपटपणे मांडले जाते. मी "सरधोपट" शब्द वापरला कारण "आमूलाग्र बदल" या शब्दाचा नेमका अर्थ आणि त्याची व्याप्ती,याबाबत संदिग्धता आढळते. " मर्ढेकरांच्या कवितेचा घाट तपासता,माझ्या डोळ्यासमोर हीच कविता प्रथम आली. कवितेचा घाट तपासणे म्हणजे मुलत:काव्यांतर्गत अनुभवाचा आकार तपासणे होय. असे करताना, अनुभवातील घटकांचे परस्परांशी आणि संबंधाशी असलेले नाते ज्या तत्वांनी नियमित होते ती तत्वे शोधून काढणे. काव्याचा घाट हा अनुभव आणि भाषा यांच्यामधील संबंधातून प्रकट होत असल्याने एका बाजूला आपल्याला अनुभवाला स्पर्श करावा लागेल तर दुसऱ्या बाजूने त्याच्याशी जुळणाऱ्या शैलीची दखल घ्यावी लागेल. प्रस्तुत कविता उधडपणे एका अजस्त्र शहराच्या सकाळच्या प्रहाराशी निगडित आहे. "न्हालेल्या जणू गर्भवतीच्या" अशा एका वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमेने कविता सुरु होते. इथे एक गंमत बघायला मिळते. एक तत्व दिसते - अनुभवांच्या परस्परानुप्रवेशाचे तत्व होय. कवितेतील एका अनुभवाची परिमाणे ही सतत बदलत आहेत. हा परस्परानुप्रवेश विचारात्मक, भावनात्मक आणि संवेदनात्मक पातळ्यांवर तर घडतोच पण या वेगवेगळ्या पातळ्यांवर तो सतत चाललेला असतो. "डोकी अलगद घरें उचलती,काळोखाच्या उशीवरुनी;" या ओळीतून वरील विधानाची सत्यता समजून घेता येते. कवितेच्या सुरावतीच्या ओळींच्या संदर्भात, कवितेला एकदम वेगळे परिमाण मिळते. आणखी एक वैशिष्ट्य दिसून येते - "शिशिरागम" मधील कवितेतील व्यक्तिगत जाणिवेपासून "काही कविता" मधील कविता अधिक "सामाजिक जाणिवेकडे" वळलेली दिसते. " पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी;"! आजच्या सामाजिक संदर्भात या ओळी कालबाह्य ठरतील परंतु एकेकाळी मुंबई शहराचे हे वास्तव होते,हे नक्की. या कवितेच्या संदर्भात २,३ मुद्दे मांडता येतील. १)विज्ञान आणि बुद्धीवाद मानवसन्मुख ठेवणे, २) भांडवलशाहीतील पिळवणूक, ३) अज्ञानी दलित आणि सामान्य मानवाविषयी अथांग सहानुभूती इत्यादी. तसे बघितले तर ही कविता थोडीशी साम्यवादाकडे झुकणारी दिसते. "ह्या सृष्टीच्या निवांत पोटी परंतु लपली सैरावैरा, अजस्त्र धांदल, क्षणात देईल जिवंततेचे अर्घ्य भास्करा." या ओळींतून वरील विधानांची सत्यता पटू शकेल. अर्थात साम्यवादात अटळपणे दिसणारी प्रचारकी पोपटपंची इथे दिसत नाही किंवा अभिनिवेशी आतषबाजी नाही. त्यांच्या चिंतनात्मक काव्यातील संयतशीलता या कवितेत स्पष्ट दिसते. गर्भवती स्त्रीच्या सृजनसन्मुख अवस्थेला मर्ढेकर निरपेक्ष सहजतेने सामोरे जातात. याचे महत्वाचे कारण असे संभवते - तिथे मर्ढेकरांना कलावंताची सृजनशीलता दिसते. मर्ढेकरांच्या कवितेतील हा एक अपवादात्मक पण अत्यंत उत्कट वृत्तिविशेष आहे. हा अनुभव झेलताना, त्यांच्यातील सामाजिक जाणिवेचा भाग प्रखरपणे गळून जातो. त्यामुळे इथे भाषा सनातन प्रतिमेची होते. काव्यातील नवे-जुने भेद क्षणभर तरी स्थगित होतात. "ह्या सृष्टीच्या निवांत पोटी परंतु लपली सैरावैरा, अजस्त्र धांदल, क्षणात देईल जिवंततेचे अर्घ्य भास्करा." या ओळींमधून पुन्हा मर्ढेकरांची सामाजिक जाणीव उघड होते परंतु तिला विखारी स्वरूप येत नाही. तसे बघितल्यास, या कवितेत "मौलिक" असे काहीही नाही. एका विविक्षित प्रहराचे शब्दचित्र आहे. परंतु काव्यात विचारांना विचार म्हणून महत्व नसते. खरी मातब्बरी असते ती ते विचार ज्या अनुभवातून ग्रथित झालेले असतात त्या अनुभवांची. विचारांचे महत्व असते ते अपरिहार्यपणे अनुभवाचे भाग असतात इतकेच. मर्ढेकरांच्या काव्यातील विचारांकडे आपण बघितले तर असे आढळून येईल, त्यांनी काव्याला अनेक परींनी समृद्ध केले. प्रस्तुत कविता हेच विधान अधिक ठळकपणे अधोरेखित करते.