Thursday 19 June 2014

परिक्रमा – एक निमित्त.



सर्वसामान्यपणे, लोकांच्यात राजकारण या विषयाबाबत २ गट स्पष्ट दिसतात.एका गटाला, राजकारण म्हणजे आर्थिक उन्नती, सत्ता संपादन आणि भौतिक सुखाची चंगळ असा दृष्टीकोन भावतो. तर दुसरा गट, सरसकटपणे राजकारण या विषयाकडे संपूर्ण दुर्लक्ष करतो आणि नाराजी दर्शवितो. अर्थात, या मताला काही अपवाद सापडतात, पण ते केवळ अपवादच असतात. एकूणच, राजकारण या विषयात सर्वसामान्य माणूस “उदासीन” नजरेतून बघत असतो, हे निदान मान्य व्हावे. याचा कोण आणि किती फायदा उठवला जातो, हा वेगळा विषय आहे. अशा वेळेस, गोविंदराव तळवलकर यांनी लिहिलेला “परिक्रमा” ग्रंथ या विषयावर वेगळा झोत टाकतो. राजकारण म्हणजे कुटील नीती हे तर आहेच पण या पलीकडे देखील दृष्टी असू शकते, याचे अत्यंत वास्तव दर्शन त्यांच्या लिखाणात दिसून येते.
या ग्रंथात, केवळ राजकारण हाच विषय हाताळलेला नसून, “केवढे हे क्रौर्य”, ” चर्चिल यांचे निवासस्थान”,” जॉर्ज ऑर्वेल”,”शुमाकर-वेगळा अर्थशास्त्रज्ञ”, “इंग्रीड बर्गमन” असे अतिशय वेगळे विषय देखील हाताळलेले आहेत. अर्थात, राजकारण हा विषय पुस्तकात वेगवेगळ्या प्रकरणात दिसून येतो आणि लेखकाचा तोच प्रमुख उद्देश आहे. वास्तविक, कुठल्याही राजकीय लेखनाला कालची फार मोठी मर्यादा असते आणि तशी ती या लेखांना देखील आहे पण असे असूनसुद्धा सर्व लेख आजही ताजेतवाने वाटतात आणि आजच्या बदललेल्या काळात देखील ते विचार स्पृहणीय वाटतात. हेच लेखकाचे आणि त्याने अंगिकारलेल्या शैलीचे वैशिष्ट्य आहे. या दृष्टीने, १९८५ मधील लोकसभा निवडणुकीतील राजीव गांधींचा सार्वभौम विजय, हा लेख वाचण्यासारखा आहे. त्यावेळेस, त्यांना ना भूतो ना भविष्यति, असा विजय प्राप्त झाला होता पण, लोकशाही प्रणाली स्वीकारताना अशा प्रकारचा विजय कितपत योग्य आहे आणि यातून संसदीय विचारधारेचा कशाप्रकारे कोंडमारा होऊ शकतो, याचे सुरेख विवेचन आहे. तसेच याच दृष्टीकोनातून, “गुजरात आंदोलन”,”पंतप्रधान इंदिरा गांधी”,”नियतीशी संकेत” आणि “इंदिरा गांधीनंतरचा भारत” ही प्रकरणे वाचण्यासारखी आहेत. यातील काही विषय काळानुरूप नवीन विचार करायला प्रवृत्त करतात, तर काही ठिकाणी विचार फार तात्कालिक वाटतात, तरी देखील, एक विचार या दृष्टीने हे लेख सुंदर लिहिले गेले आहेत. मुळात, लेखकाचेच असे म्हणणे आहे की, कुठलीही विचारधारा काही कायमस्वरूपी असू शकत नाही आणि काळानुरूप त्या विचारांमध्ये बदल आवश्यक असतो. हाच विचार, जेंव्हा लेखकाने, “महाराष्ट्राची पंचवीस वर्षे” हा दीर्घ निबंध लिहिला, त्यात दिसून येते आणि त्यावेळची जी महाराष्ट्राची परिस्थिती होती, त्यात आजही काही बदल झालेला दिसून येत नाही, किंबहुना, राजकारण अति घृणास्पद अवस्थेला पोहोचलेले आहे. याच पार्श्वभूमीवर, “जर्मनी:एक दर्शन” हा लेख बघावा(त्यावेळी जर्मनी एकसंध झालेला नव्हता आणि तसे होणे देखील दृष्टीक्षेपात नव्हते.) वास्तविक, दुसऱ्या महायुद्धात जर्मनीची राखरांगोळी झाली होती पण तरीही त्या राखेच्या ढिगारयातून परत राष्ट्राची पुनर्बांधणी कशी केली, याचे यथायोग्य निर्देशन केले आहे. इथे एक विचार मात्र मनात खूप वेळा येतो. जर्मनी परत सक्षम आणि सुदृढ झाला हे वास्तव खरे पण , याच उभारणीसाठी इतर गरीब देशातून अनेक हलाखीत रहात असलेले मजूर, वेठ्बिगारासारखे वापरले, हे देखील तितकेच निरपवाद सत्य!!
अमेरिकन राज्यघटनेवरील लेख तर आपल्या डोळ्यात अंजन टाकणारा ठरावा. आज या घटना निर्मितीला २३५ वर्षे झाली आहेत, तरी देखील त्यावेळची घटना, काही तात्कालिक फेरबदल वगळता, तशीच कायम ठेवली आहे, विशेषत: व्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य इत्यादी अधिकार,अबाधित ठेवले आहेत. या मुलभूत अधिकारांची कधीच पायमल्ली झाली नाही. पण, याच जोडीने, “व्हाईट हाउस मधील ठग” हा दीर्घ लेख, लेखकाच्या विचक्षण वृत्तीचा प्रत्यय देतो. याच अमेरिकेत, १९७१ साली, निक्सन यांच्या कारकिर्दीत किसंजर आणि इतरांनी लोकांच्या डोळ्यात कशी धूळफेक केली आणि सत्यापासून सतत वेगळे ठेवले, याचा काळा पाढा वाचला आहे. हे वाचताना, आपल्या हेच लक्षात येते की, घटना कितीही सुसंगत तयार केली तरी, शेवटी वापरणारे हात हे माणसाचेच असतात. विशेषत: सध्या भारतात, “लोकपाल” विधेयकाचा जो उद्घोष आणि गदारोळ चाललेला आहे, त्याचा या संदर्भात विचार होणे, जरुरीचे वाटायला लागते.
“पंजाब समस्या” आणि “पंजाब:नवा अध्याय” ह्या दोन प्रकरणांना मात्र आता तात्कालिकतेचा वास येतो आणि याचे महत्वाचे कारण त्या विषयातच आहे. आज, पंजाब प्रश्न तेव्हढा उग्र राहिलेला नाही पण तीस वर्षांपूर्वी परिस्थिती फार वेगळी होती. अर्थात, हेच लेख वाचताना, इंदिरा गांधीनी स्वत:च्या फायद्याचा अति “कोता” विचार करून, भिंद्रनवाले नामक भस्मासुर कसा निर्माण केला आणि त्याची काय फळे भोगायला लागली, याचे फारच तौलनिक विचार वाचायला मिळतात. याच संदर्भात, अमेरिकेने उभा केलेला “ओसामा बिन लादेन” याची आठवण आल्यावाचून रहात नाही.
मला भावलेला असाच एक लेख वाचायला मिळतो.”Walter Lipman : राजकीय भाष्यकार” याच्या कार्याचे मूल्यमापन. राजकारण हे नेहमीच तात्कालिक अवस्थेत वावरत असले तरी विचार कधीही शिळे आणि कालबाह्य होत नसतात, हाच विचार ठामपणे मांडलेला आढळतो. आपले आजचे मत हे उद्या चुकीचे होऊ शकते आणि त्यानुरूप आपली विचारधारा ठेवावी, असा एक अत्यंत संय्युक्तिक विचार हा लेख वाचताना मनात तरळत राहतो. “मॉस्को आणि लेनिनग्राड” हा असाच काहीसा तात्कालिक स्वरूप असलेला लेख आहे. आता, रशियाचे स्वरूप पार बदललेले आहे पण चाळीस वर्षापूर्वी रशिया जगातील एक सार्वभौम सत्ता म्हणून विशेष अधिकार बजावीत होती आणि याच दृष्टीने हा लेख वाचणे क्रमप्राप्त ठरते. एक इतिहास म्हणून या लेखाची गणना व्हावी. याच संदर्भात,”झेक जनतेचा कोंडमारा” आणि “कामगार राज्याला कामगारांचा दणका” हे लेख वाचावेत. कुठल्याही देशात कुठलीही परिस्थिती ही कायम स्वरूपी असूच शकत नाही, तेंव्हा आजच्या पार्श्वभूमीवर, हे लेख तसे आपल्याला पटणारे नाहीत पण अशी परिस्थिती तेंव्हा होती, हे जर गृहीत धरले तरच या लेखाची संगती आपल्याला लागू शकते. तोच प्रकार “लंडन टाईम्स : दोन दशकांचा इतिहास” हे प्रकरण आहे. किंबहुना, वृत्तपत्र जग आणि तिथे लिहिले जाणारे लेखन, याचे यथार्थ दिग्दर्शन करणारा लेख आहे.
या ग्रंथात, सर्वात भावणारे लेख म्हणजे, “इतिहासातील काही भ्रम” आणि “केव्हढे हे क्रौर्य” हे लेख. आपण, कुठलीही व्यक्ती किती एकांगी नजरेने पहाट असतो आणि थोडी वेगळी माहिती हाती आली असता, त्याच व्यक्तीचे वेगळे पण तितकेच सत्य दर्शन दिसू शकते, याची काही सुंदर आणि काहीशी धक्कादायक उदाहरणे, लेखकाने दिली आहेत. त्यातून इतिहास कसा लिहावा आणि आपल्याकडे कसे चुकीचे मानदंड तयार झाले आहेत, याचे दर्शन होते. मार्टिन ल्युथर, कोपर्निकस,ट्रोटस्की, हिटलर,रूझवेल्ट यांच्या बद्दलची प्रचलित मते आणि वास्तवता, याचे फारच सुरेख विवेचन वाचायला मिळते. तसेच, श्रेय आणि अपश्रेय देताना आपण आपली विवेक्स्गाक्ती किती गहाण ठेवतो आणि त्यामुळे चुकीचा विचार धरून राहतो,हे, अमेरिकेतील प्रसिद्ध मंदी, रशियातील भरमसाट वर्णने इत्यादी गोष्टीतून समजून येते. तसाच प्रकार, माओ काळातील चीन बाबत बघायला मिळते. तसेच महात्मा गांधींबाबत काही एकांगी वर्णने केली जातात, त्यातील फोलपणा दाखवून दिला आहे. विशेषत: गोवा-सालाझार संदर्भातील त्यांचे वर्तन, मुळातून वाचण्यासारखे झाले आहे. तसेच मौलाना आझाद यांच्या बद्दलचे प्रचलित मत आणि त्यांची प्रतिमा याला पूर्ण छेद देणारी माहिती वाचायला मिळते. माझ्या मते, असे चारित्र्यहरण व्यक्ती समजून घेण्याच्या दृष्टीने अति आवश्यक असते. तसाच “केव्हढे हे क्रौर्य” हा लेख वाचताना मिळतो. साधारणपणे, अशी समजूत आहे की, दुसऱ्या महायुद्धानंतर “हिंसा’ किंचित थंडावली आहे!! प्रत्यक्षात, त्यानंतरच्या कळतच “मानवी”हत्या किती अघोरीपणे राबवली आहे, याचे विदारक चित्र बघायला मिळते. आदर्श समाज निर्माण करण्याची “गुरुकिल्ली” आपल्यालाच सापडलेली आहे, याच भावनेने हिटलरणे ज्यू लोकांचे नृशंस हत्याकांड केले पण त्यानंतरच्या काळात, त्याहून प्रचंड अशी हत्याकांडे झाली आहेत, हे लेखकाने, पॉल पॉट, व्हिएतनाम युध्द, स्टालिनचे भयानक अत्याचार, इराणमधील खामेनीची राजवट,दक्षिण अमेरिकेतील झुंडशाही आणि युगांडातील, नारळ फोडावे तशी डोके फोडणारी अराजक राजवट, वाचताना आपणच थक्क होऊन जातो. विशेष भाग म्हणजे, या क्रौर्यातून कुठलाच देश सुटलेला नाही. आपल्याकडील जमीनदारी पद्धत काय वेगळे दर्शन घडवते म्हणा.
शेवटचे प्रकरण “वठलेल्या वृक्षाची शताब्दी”. वास्तविक काँग्रेस पक्ष हा आपल्या देशातील सर्वात जुना आणि जनता पक्ष आणि तरीही त्या पक्षाची कशी वैचारिक शकले उडाली आहेत आणि कुणाचा कुणाच्यात कसलाच पायपोस नाही, याचे विदारक दर्शन घडते. हा लेख, पक्षाने शंभर वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने लिहिला आहे पण जरा विचार केला तर हेच लक्षात येईल की, आज तरी यात वेगळी परिस्थिती आहे का? किंबहुना, दिवसेंगणिक अधिकाधिक शरम वाटावी, इतके अश्लाघ्य वर्तन केवळ याच पक्षाकडून घडत नसून सगळेच पक्ष कमी जास्त अवस्थेत गुंतलेले आहेत. कसली शताब्दी आणि कसला आनंद!! याच उद्विग्न विचारात असताना, हा ग्रंथ संपतो. राजकारणासारख्या अत्यंत रुक्ष आणि गळेकापू विषयावर देखील किती विचार प्रवर्तक लिखाण करता येते, याचा हा ग्रंथ वस्तुपाठ आहे.

No comments:

Post a Comment