Wednesday 18 June 2014

गाडा – आरतीप्रभू





खानोलकरांचे सगळे लेखन, हा सावल्यांचा खेळ, दिवेलागणीचा, संधीप्रकाशातील, अंधुक, अस्पष्ट असा शाब्दिक आविष्कार आहे. कळत आहे म्हणेपर्यंत आशय चिमटीतून निसटतो, पारा पकडण्याचा विफल प्रयत्न करण्यासारखा आहे!! एकाच वेळी मोहित करणारे तसेच दुसऱ्या बाजूने नि:शब्द करणारे असे “अवाक” करणारे, त्यांचे लेखन आहे. कलावंताचा हा अखंड प्रवास आहे – बाहेरून आतल्या मध्यभागाशी जाण्याचा!! कधी प्रकाश मंदावतो तर कधी आकृती अस्पष्ट होतात आणि काहीतरी मनावर अर्धुकलेले साकळते!! प्रतिमांचा अप्रतिम असा, अमूर्त अनुभव देणारा हा कवी समजत आहे, असे वाटत असताना दूरस्थ होतो!! अशा वेळी, त्या जाणीवेच्या रसास्वादाला, विश्लेषणाच्या एकेरी पण जाचक धाग्याने बांधणे, खरच फार कठीण आहे.
आधीच कविता म्हणजे शब्दांचा अंतिम समृद्ध आविष्कार, त्यातून खानोलकरांची “अळुमाळू” प्रतिभा रसिकत्वात मांडणे, खरोखर अवघड आहे. अनुभवविश्व आणि त्याचा आविष्कार, या दोन्ही दृष्टीने सगळ्या निर्मितीत एक सलगपणा, एकसंधपणा आहे.
“कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर
रेटायचा ऐसा गाडा इमानाने जन्मभर?
गाणे सुरु झालें तेंव्हा चंद्र होता डोईवर,
गाणे मध्यावर आले – चंद्र झाला रानभर,
गाणे संपले आणिक पक्षी फडाडला तमी,
आणि तसाच मिटला घरट्यात …. अंतर्यामी.”
पहिल्याच ओळीत अस्वस्थतेची, विखारी हतबलतेची सामायिक जाणीव दिसते आणि तिथूनच कवितेचा आशय आणि विषय समजून घेता येतो. खानोलकरांचे सगळे साहित्य वाचताना, एक जनिब प्रखरतेने होते आणि ती म्हणजे, ते सतत कसला तरी शोध घेत आहेत, त्या विषयाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. वाटचाल कुठलीही असू दे, हातातील होकायंत्राने सतत उत्तर दिशा दाखवावी त्याप्रमाणे ते एकाच दिशेने प्रवास करीत आहेत!! पूर्वनियोजित असलेली अशी “नियती” आणि आपले आयुष्य आपल्याला हवे तसे घडविता येण्याचे माणसाचे स्वातंत्र्य – या दोहोंतील नाते नेमके काय असते, या प्रश्नाशी, त्यांचे गुंतलेपण आपल्याला चकित करते!! ह्या प्रश्नाच्या आधारे, माणसाचे या विश्वात काय स्थान आहे? याचाच इथे शोध चालू आहे!!
“वाट रानांतली किर्र, हुरहूर सर्वदूर,
चक्रे फिरती फिरती, करकरे चराचर,
कळ्या फुलतात येथे, पानें गर्द वाजतात,
फुलें घळतात येथें तरी पानें वाजतात,
पानें झडतात येथें तरी वारे वाजतात,
वारा पडला तरीही दूर घंटा वाजतात.”
आयुष्यातील हतबलतेची जाणीव देताना, “रानांतली वाट” ही प्रतिमा आणि त्या अनुरोधाने, त्या रानातील स्थित्यंतराची वाटचाल, किती अप्रतिमरीत्या मांडलेली आहे. खरेतर “नियती” आणि “आत्मस्वातंत्र्य” याचे खरे स्वरूप काय? हा प्रश्न इथे आपल्याला पडतो. बरेचवेळा “नियती” असे काहीच नसते, असे मत मांडले जाते कारण नियती म्हटली की त्यामागे “नियत” करणारी एखादी शक्ती अस्तित्वात असल्याचे मान्य करावे लागते. मग, प्रश्न येतो, ती शक्ती कुठली? म्हणजे हाती येते, माणसाला आपले जीवन हवे तसे घडविता येण्याचे स्वातंत्र्य!! जोपर्यंत, आपली जीवनेच्छा प्रखर आहे, येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्याची विजगिषु वृत्ती दाखवतो, तोपर्यंत “आत्मस्वातंत्र्य” आपल्याला मान्यच करावे लागते. “कळ्या फुलतात येथे, पानें गर्द वाजतात” या घटना सगळ्या वास्तविक नैसर्गिक म्हणजे नियतीस्वरूप आहेत, असे आपण म्हणू शकतो. याचाच वेगळा अर्थ, जे पुढे येते, त्याचा मुकाटपणे स्वीकार करणे, इतकेच आपल्या हाती असते का? या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही आणि एकाच एक उत्तर अजिबात नाही पण कवितेच्या आधारे हा प्रश्न इथे आरतीप्रभूंनी किती सुंदर मांडला आहे!!
“कुणासाठी भरू पाहे डोळां ऐसे उष्ण पाणी?
कुणासाठी झरताहे झरा गप्प ऐशा रानी?
कुणासाठी झरताहे आयुष्य ऐसे क्षणोक्षणी?
कुणासाठी रस भरे सालोसाल फळातुनी?
प्रश्न नव्हे पतंग अन खेचू नये त्याची दोरी
आणि खेचली तरीही मिटेल का चिंता सारी?
कुणासाठी, कशासाठी, कुठे आणि कुठवर
ऐसे घोकीत घोकीत व्हावयाचे दिगंबर.”
काही लोकांना वाटते, माणूस जन्माला येतो तेंव्हा स्वत:चे असे प्राक्तन घेऊन!! पण हे प्राक्तन कसे? एखाद्या चित्रकाराने चित्र काढताना, पांढऱ्या Canvas वर रेखाटन केल्याप्रमाणे!! त्याला निश्चित आकार देणे, त्यात रंग भरणे, हे अखेर माणसाच्याच हाती असते. शतकानुशतकांच्या जीवनरीतीतून व्यक्तिमनात खोल रुजलेल्या भावना, जाणीव व मुल्ये, याचाच आकार या कवितेत मला आढळला. कवितेत बरेच प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांना कुठलीच ठाम उत्तरे मिळणे कठीण आहे – हेच का माणसाच्या आयुष्याचे प्राक्तन आहे? प्रश्नांशी झुंज देण्याची मनीषा ठेवण्याचेच आत्मस्वातंत्र्य आपल्या हाती असते. गंमतीचा भाग म्हणजे हे आपल्या आयुष्याशी निगडीत असे प्रश्न आहेत, याचीच बरेचजणांना जाणीव होत नसते आणि ते अंधारात “तीर” मारायचा प्रयत्न करतात!! मला ही कविता या दृष्टीने फारच अर्थपूर्ण वाटली. कवितेचा घेवत याच हतबलतेतून केलेला आहे – “कुणासाठी, कशासाठी कुठे आणि कुठवर; ऐसे घोकीत घोकीत व्हावयाचे दिगंबर” अर्थात, जरी “दिगंबर” झालो तरी “कुणासाठी” आणि “कशासाठी” याचे उत्तर मिळेल का? हीच तर आपली नियती!!

No comments:

Post a Comment