Monday 24 June 2019

मल्मली तारुण्य माझे


12:12 PM (0 minutes ago)

माडीवर सारंगीचे सूर जुळत, तबलजी तबल्यावर हात साफ करायच्या प्रयत्नात आहे, खोलीतील दिवे हळूहळू मंद होत आहेत, आलेले रसिक मनगटावरील गजऱ्याचा सुगंध घेत आणि तोंडातील तांबुल सेवनाचा आनंद घेत आहेत. बाजूलाच पडलेला हुक्का आपल्याजवळ ओढून, एखादा रसिक, त्यातील सुगंधी तंबाकूचा स्वाद घेण्यात मश्गुल झाला आहे. तसे बघितले तर संध्याकाळ कधीचीच उलटलेली आहे परंतु नेहमीच्या मैफिलीतील मानिंद अजून आले नसल्याने, इतर रसिकांत किंचित चुळबुळ सुरु झाली आहे. खोलीत पसरलेल्या अलिशान लालजर्द गालिच्यावर, एका बाजूला अत्तरदाणी, दुसऱ्या बाजूला पिंकदाणी आणि तिसऱ्या टोकाला लवंगी,वेलची सहीत मांडलेला त्रिगुणी विड्याचा सरंजाम जारी होता. आजची शनिवार रात्र म्हणजे कधीही न संपणारी किंवा कधीतरी उत्तर रात्रीच्या पलीकडे संपणारी मैफिल!! काहीवेळाने प्रमुख गायिका मुख्य दिवाणखान्यात प्रवेश करते आणि तो दिवाणखाना अचानक "जिवंत" होतो. 
कवी मर्ढेकरांच्या भाषेत मांडायचे झाल्यास, 
"लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
सुंदरतेचा कसा इशारा;
      डोळ्यांमधल्या डाळिंबाचा 
      सांग धरावा कैसा पारा!!
आजच्या आपल्या गाण्याबाबत ही पार्श्वभूमी नेमकी आणि अचूक आहे. मराठी ललित संगीतात "बैठकीची लावणी" येते, बोर्डावरची लावणी तर नको तितकी आली आहे परंतु "लखनवी मिजाज" असलेल्या रचना अभावानेच आढळतात. आता लखनवी मिजाज म्हटल्यावर ठुमरी आणि गझलची  आठवण येणे क्रमप्राप्तच आहे. "मल्मली तारुण्य माझे" ही शब्दरचना नीटसपणे वाचली तर "गझल" वृत्त समजून घेता येते परंतु गझलेची सगळी वैशिष्ट्ये आली  आहेत,असे म्हणवत नाही. कवी सुरेश भटांनी मराठी कवितेत "गझल" खऱ्याअर्थाने रुजवली, असे म्हणता येईल. खरंतर चित्रपटासारख्या प्रसंगोत्पात आविष्कारात "संपूर्ण" गझल वृत्त राबवणे, फार कठीण असते. असे असून देखील अतिशय चांगल्या अर्थाने, प्रस्तुत कविता ही अप्रतिम "भोगवादी" कविता आहे, असे नक्कीच म्हणता येईल. "माझ्यात तू अन मी तुझ्यामाजी भिनावे" किंवा "मी तुला जागे करावे! तू मला बिलगून जावे" या ओळी माझ्या वरील विधानाला पूरक ठराव्यात. वास्तविक मराठी संस्कृतीत अशी रचना विरळाच आढळते आणि त्यात सुरेश भटांचा फार मोठा सहभाग आहे. इथे मला पु.शि.रेग्यांच्या कवितांची बरीच आठवण आली. 
ज्या ढंगाने काव्य लिहिले गेले आहे, त्याच अंगाने संगीतकार सी.रामचंद्र यांनी चाल बांधली आहे. कवितेतील "नखरा" तंतोतंतपणे सुरांतून व्यक्त केला आहे आणि गाण्याची खुमारी वाढवली आहे. विशेषतः "मल्मली" मधील मादक हळुवारपणा ज्याप्रकारे व्यक्त झाला आहे, त्याचे श्रेय संगीतकार म्हणून सी.रामचंद्र आणि गायिका म्हणून आशाबाई भोसल्यांना द्यावे लागेल. या शब्दोच्चारातच पुढील रचनेची रंगत दडलेली आहे. पहिल्या अंतऱ्यातील "लागुनी थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी की"  या ओळीतील "गुलाबी शिरशिरी" ऐकणे हा अनिर्वचनीय अनुभव आहे. कुठेही भावनाविवश न होता, आशयाची वृद्धी कशी करावी, याचा सुरेख मानदंड आहे. संगीतकार सी. रामचंद्र यांनी मराठीत, हिंदी चित्रपटाच्या मानाने फारच कमी संगीत रचना केल्या अर्थात हा रसिकांचा तोटा झाला. परंतु जे काही चित्रपट केले त्यातील गाणी निश्चितच संस्मरणीय अशीच आहेत. 
गाण्याची लय द्रुत आहे, उडती "छक्कड" आहे. रूपक ताल अतिशय सुरेख वापरला आहे. मुखडा संपताना तसेच अंतरा संपताना लय अति द्रुत होते पण तरीही गाण्याची स्वररचनाच अशी केली आहे की रसिकांचे लक्ष केवळ तालाच्या मात्रांवर न  राहता,गाण्याच्या चालीवर राहील. संगीतकाराचे मूल्यमापन करायचे झाल्यास रागाधारित गाणे तयार  करताना,रागावर प्रक्रिया करून, त्याचा पुनर्रचित अवतार घडविणे, त्यांना अधिक मानवणारे होते. आता या गाण्यापुरते बोलायचे  झाल्यास, स्वररचना "रागेश्री " रागाशी जुळणारी आहे पण रागाची ठेवण सरळ आपल्या समोर येत नाही. गीत ऐकता ऐकता ज्यांचे सहज आकलन होऊ शकेल अशाच लयबंधांवर त्यांचा अधिक भर होता. इथे तर  कोठीवरील गाणे असल्याने, गायकी ढंग येणे क्रमप्राप्तच ठरते. सुरवातीलाच स्वरमंडळाच्या सुरांनी सुरवात होते आणि लगेच एका दीर्घ आलापाने गीताला आरंभ होतो. पुढे जलतरंग, सतार इत्यादी वाद्यांनी पार्श्वसंगीत सजवले आहे. वेगवेगळे अंतरे बांधणे ही या संगीतकाराची खासियत म्हणावी लागेल. त्यांच्यावर पाश्चात्य संगीताच्या उचलेगिरीचा वापर केला असा आक्षेप घेतला जातो परंतु अशा रचनांमधून भारतीय परंपरेचे यथायोग्य दर्शन घडवण्यात हा संगीतकार यशस्वी झाला, असे म्हणता येईल. 
आशा भोसल्यांच्या गळ्याच्या ताकदीची ओळख दर्शवणारे हे गीत. मुखड्याच्या आधीच पहिलाच दीर्घ आलाप आणि पुढे खास केलेले शब्दोच्चार मुद्दामून अभ्यासावेत असे आहेत. चाल अति द्रुत लयीत जाते परंतु क्षणात पुन्हा मूळ चालीशी येऊन मिळते, गायन कसे  करावे,याचा सुंदर नमुना आहे. कवितेतील शृंगार आणि आवाहनात्मक भाव मांडायचा पण कुठेही लालस वृत्ती येऊ द्यायची नाही. त्यामुळे गाणे फार वेगळ्याच प्रतीचे होऊन बसते. 

मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे 
मोकळ्या केसांत माझ्या तू जीवाला गुंतवावे 

लागुनी थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी की 
राजसा, माझ्यात तू अन मी तुझ्यामाजी भिनावे 

तापल्या माझ्या तनूची तार झंकारून जावी 
रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे 

रे! तुला बाहुत माझ्या रूपगंधा जाग यावी 
मी तुला जागे करावे! तू मला बिलगून जावे 


Thursday 20 June 2019

श्रावणात घननीळा

आपल्याकडे एखादी कलाकृती अपरिमित लोकप्रिय झाली म्हणजे लगेच त्यात काहीतरी दूषणे काढायची फार अश्लाघ्य अशी सवय आहे. आता कलाकृतीत दूषणेच काढायची झाल्यास, त्याला  फार काही त्रास घ्यावा लागत नाही. त्यातून ललित संगीतासारखे माध्यम असेल तर फार प्रयास पडत नाहीत. जणू  काही लोकप्रिय होणे, हा एक गुन्हा असल्यासारखी अपप्रवृत्ती आपल्याकडे फार बोकाळली आहे. वास्तविक याची काहीही गरज नसते. मुळात, कलाकृती ही नेहमीच कलाकृतीच्याच नजरेतून अनुभवावी, असा एक निकष असताना,  कलाकृती बाह्य निकष योजून, त्या कलाकृतीला डाग लावायचे काम इमानेइतबारे केले जाते.  अशा वेळी, "श्रावणात घननीळा बरसला" सारखी टवटवीत संगीतरचना कानी पडते आणि मनावरील मळभ दूर होते. प्रस्तुत गीत बाहेर येऊन आज जवळपास ५० वर्षे तरी झाली असावीत परंतु या गाण्याच्या लोकप्रियतेत खंड पडलेला नाही. किंबहुना, या गाण्यातील सौंदर्यस्थळे शोधण्याचा प्रयास निरंतर चालू आहे. प्रयास चालू आहे असे मी म्हटले कारण चाल ठामपणे कुठल्याही रागावर आधारित आहे असे आढळत नाही तसेच प्रत्येक अंतरा वेगळ्या सुरांवर सुरु होतो - इतका वेगळ्या सुरांवर सुरु होतो की मुखड्यावर चाल कशी येणार आहे, याचा सुरवातीला अदमासच लागत नाही. असे असून देखील हे गाणे आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवून आहे. कविता, स्वररचना आणि गायन, या तिन्ही पातळीवर हे गाणे जवळपास "निर्दोष" म्हणावे इतपत सुरेख झाले आहे. 
निसर्ग आणि प्रणय भावना, ही मंगेश पाडगावकरांच्या बहुतेक कवितेत आढळणारी वैशिष्ट्ये आहेत आणि असे असून देखील कवितेत "एकसाची"पणा दिसत नाही!! पावसाळ्यातील निसर्ग हा कवींना नेहमीच साद घालीत असतो आणि कवी देखील आपल्या अलौकिक नजरेतून पावसाला न्याहाळत असतात. या गाण्याचा मुखडाच किती वेधक आहे. पाऊस सुरु होत असताना, बाहेर अचानकपणे झाडांना पालवी फुटल्याचे ध्यानात येते आणि तीच झाडे आता फार वेगळी दिसायला लागतात. वास्तविक प्रत्येक पावसाळ्यात सहजपणे दिसणारे हे दृश्य आहे परंतु पाडगावकरांनी "हिरवा मोर पिसारा" म्हणून त्या ओळींची नव्यानेच ओळख करून दिली. 
पुढील कडव्यांतून हेच दृश्यभान अधिक विस्ताराने आणि खोलवर मांडलेले आहे. "स्वप्नांचे पक्षी","थेंबबावरी नक्षी" सारखे शब्द किंवा "पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले" सारख्या ओळींतून मांडलेला रंगोत्सव आणि उबदारपणा तसेच शेवटच्या कडव्यात "शब्दावाचून भाषा" म्हणत असताना "अंतर्यामी सूर" गवसणे, हे सगळेच कवितेची श्रीमंती वाढवणारे आहे. 
संगीतकार म्हणून श्रीनिवास खळे यांची कामगिरी निव्वळ अपूर्व आहे. गाणे तयार करताना, सर्वात आधी, हाती आलेली शब्दसंहिता ही एका विशिष्ट पातळीवरच असावी, तरच त्या कवितेला चाल लावायची असा काहीसा आग्रह खळेकाकांनी आयुष्यभर धरला होता. अशा फार थोड्या रचना आहेत, जिथे कविता म्हणून आपली फार निराशा होते अन्यथा सक्षम कविता असणे, हे खळेकाकांच्या गाण्यात अनुस्युतच असते. 
या गाण्यातील अंतरे फार वेगळ्याच पद्धतीने बांधले आहेत. सर्वसाधारणपणे, मुखडा हाताशी धरून, पुढील अंतऱ्यांची बांधणी केली जाते जेणेकरून, अंतरा संपत असताना, परत अस्थाई  गाठणे दुर्घट होऊ नये. इथे  मात्र,प्रत्येक अंतरा वेगळा आहे आणि तो इतका वेगळा आहे की अंतरा सुरु झाल्यावर पुढे चाल कशी "वळणे" घेत पुन्हा मुखड्याशी येते, हे अवलोकणे हे फार बुद्धीगामी काम आहे. खळेकाका इथे चाल फार अवघड करतात आणि गमतीचा भाग असा आहे, गायला अवघड असून देखील हे गाणे कमालीचे लोकप्रिय झाले आहे. असे भाग्य फार थोड्या गाण्यांना मिळते. थोडे तांत्रिक लिहायचे झाल्यास, "जागून ज्याची वाट पाहिली" ही ओळ ज्या "सा" स्वरांवर सुरु होते तो स्वर आणि मुखड्याचा "सा" स्वर हे भिन्न आहेत. तसेच शेवटचा अंतरा घेताना, "पानोपानी शुभशकुनाच्या" इथे तर "मध्यम" स्वरालाच "षड्ज"  केले आहे. परिणामी स्वरिक वाक्यांश फार वेगवेगळे हाताशी येतात आणि चाल अतिशय गुंतागुंतीची होऊन बसते. 
लताबाईंचे गायन हा तर आणखी वेगळा असा अपूर्व सोहळा आहे. "रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी" ही ओळ गाताना, "रंगांच्या" इथे एक छोटा आलाप घेतला आहे. एकतर हा अंतरा मुखड्याच्या स्वरांशी फटकून आहे तरीही लगोलग "सूर" पकडलेला आहे आणि तसा तो सूर घेताना, "आलाप" आलेला आहे. हे सगळे फार गुंतागुंतीचे आहे पण तरीही अतिशय गोड आहे. चालीतील लपलेला गोडवा लताबाईंनी आपल्या गळ्यातून अपूर्वपणे साकारलेला आहे. खरंतर या गाण्याविषयी लिहायचे झाल्यास, एखादा दीर्घ निबंध देखील अपुरा पडेल, अशी रचना आहे. व्यामिश्र आहे पण तरीही अप्रतिम गोड आहे. म्हणूनच आजही लोकप्रिय आहे. 

श्रावणात घननीळा बरसला, रिमझिम रेशीम धारा 
उलगडला झाडांतून अवचित हिरवा मोर पिसारा  

जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी 
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी 
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा 

रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी 
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी 
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा 

पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले 
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले 
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा 

पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा 
अशा प्रीतीचा नाद अनाहत, शब्दावाचून भाषा 
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा 


Monday 10 June 2019

रामा रघुनंदना

आपल्याकडे एक सुंदर गैरसमज आहे, चित्रपटातील गाणे म्हटले की भरजरी वाद्यमेळ असायला हवा, ज्यायोगे गाणे रसिकांच्या मनात ठसायला मदत होते. खरतर मराठी चित्रपटांचे आर्थिक गणित बघता, पहिली बरीच वर्षे तरी गाण्यातही वाद्यमेळ हा मोजकाच असायचा. सगळा भर असायचा तो गाण्याच्या चालीवर. वाद्यमेळ गुंतागुंतीचा करायला म्हणजे तसेच तरबेज वादक हवेत. जितके अधिक वादक, तितके आर्थिक गणित जास्त. असाच सरळसोट विचार असायचा. त्यामुळे वाद्यमेळाच्या अनुषंगाने मराठी गाणी ही नेहमीच चालीच्या अंगानेच अधिक प्रयोगशील राहिली. त्यांना हिंदी चित्रपट संगीतासारखे भाग्य लाभले नाही परंतु असे असूनही. निव्वळ चालीच्या स्वररचनेचा मागोवा घेतला तर मराठी गाणी खूपच "श्रीमंत" होती, हे मान्यच करावे लागेल. चालींमधील विविधता आणि त्याच जोडीने स्वरलयीची नवनवीन स्थाने आणि गायकी अंग ठसठशीतपणे पुढे येणे, हीच खरी वैशिष्ट्ये राहिली. आजचे आपले गाणे "रामा रघुनंदना" हे  धर्तीवर आधारलेले आहे. जरा बारकाईने ऐकले तर, पूर्वी रेडियोवर "भावसरगम" नावाचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम असायचा आणि त्यावेळी त्या कार्यक्रमातील गाणी ऐकली असतील तर माझ्या वरील विधानाची प्रचिती यावी. 
कविता म्हणून वाचायला घेतल्यावर रामायणातील शबरीची गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन, शब्दरचना केली आहे, हे समजते. अर्थात आता पुराण काळातील प्रसंग केंद्रस्थानी घेतल्यावर, कवितेतील रूपके, प्रतिमा या पुराण काळातीलच असणार, हे अध्याहृत होतेच. मुळात, ग.दि.माडगूळकर हे परंपरावादी कवी असल्याने त्यांची ही कविता त्या अंगानेच समोर येते. सिनेमातील कविता ही फार गुंतागुंतीची असून चालत नाही, सोपी, सरळ आणि ठाशीव अशीच असावी, असा एक मतप्रवाह फार पूर्वीपासून आजतागायत चालूच आहे, परिणामी सिनेगीतांत "काव्य" असण्याची जरुरी नाही, हे मत देखील फार जोरानेच आदळले जाते. अर्थात चित्रपटांत गाणी लिहिताना, काही मर्यादा नेहमी येतातच जसे इथे दुसरे कडवे वाचायला घेतले तर "एकदाच ये जाता, जाता" या ओळीत "जाता" शब्द दोनदा लिहिल्याने नक्की काय वेगळा अर्थबोध होतो? असा प्रश्न येऊ शकतो.  आपण "गद्य" भाषेत बोलताना "जाता, जाता इथे एक फेरी मार" असे सहज बोलून जातो परंतु कवितेच्या संदर्भात विचार करताना, ही निव्वळ एक "तडजोड" वाटते आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे ती ओळ स्वरिक लयीला सांभाळण्यासाठी केलेली शाब्दिक जोड वाटते. अन्यथा कविता अगदी सोपी आहे आणि संपूर्ण गाण्याच्या संदर्भात विचार करता गाण्यात जिथे "खटका" हवा तिथेच तो येतो. गाताना, कवितेतील शब्द कुठेही "अवजड" होऊ नयेत, ही एक प्राथमिक मागणी असते. या दृष्टीने माडगूळकरांची शब्दरचना ही मागणी सर्वार्थाने पूर्ण करते. 

रामा रघुनंदना 
आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना 

संगीतकार दत्ता डावजेकर आहेत. डावजेकरांच्या स्वररचना या नेहमीच "अर्थभोगी" असतात. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, कवितेतील आशय ध्यानात घेऊन, तो आशय स्वरांतून मांडताना अधिक विस्तारित कसा होईल, हा दृष्टिकोन त्यांच्या स्वररचनेतून नेहमी आढळतो. अर्थात काव्याची अर्थपूर्ण जाण जाणवते, हे ओघाने आलेच. चाल "बिलासखानी तोडी" रागावर आधारित आहे. तंबोऱ्याच्या रुणझुणातून आशाबाईंचा आलाप येतो, तो याच रागाची ओळख घेऊन. भजनी वळणाची चाल आहे आणि त्याला अनुसरूनच वाद्यमेळात प्रामुख्याने सतार आणि बासरी, याच दोन वाद्यांचा अंतर्भाव केलेला आहे. 

मी न अहिल्या शापित नारी
मी न जानकी राजकुमारी 
दीन रानटी वेडी शबरी 
तुझ्या पदांचे अखंड चिंतन, ही माझी साधना 

डावजेकरांच्या संगीतरचनांबाबत काही निरीक्षणे नोंदवता येतील. संगीतरचनेत कधीही वाद्यांचा गदारोळ नसतो. संगीत आणि शब्द आपल्या मनात झिरपत जातात आणि त्याचबरोबर सुंदर असा शांत भाव देखील. कदाचित याच सांगीत काटकसरीमुळे असेल पण गाण्यातील गायन हा विशेष फार ठळकपणे समोर येतो, जसा या गाण्यातून येतो. काही अपवाद वगळता त्यांची भिस्त पारंपरिक भारतीय वाद्यांवर अधिक होती. त्यांना सुरावटीच्या नाविन्याची फार अप्रूप असल्याचे दिसत नाही पण कदाचित आशय-सुरावट यांच्या दरम्यान एक अतूट नाते असते असते, हा विचार स्पष्टपणे त्यांच्या स्वररचनेंतून वारंवार आढळतो. 

पतितपावना श्रीरघुनाथा 
एकदाच ये जाता जाता 
पाहीन, पूजिन टेकीन माथा  
तोच स्वर्ग मज, तिथेच येईल पुरेपणा जीवना 

खरतर आशाबाईंची गायकी हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. गायन करताना, शब्दातील आशयाची अभिव्यक्ती जितक्या ठोसपणे आणि सुरेलता राखून करता येणे शक्य आहे, तितकी केली जाते. दीर्घ तान असो, जशी इथे गाण्याच्या सुरवातीला आहे किंवा अंत्य शब्द घेताना, एखादा खटका असो तसेच एखाद्या शब्दावर किंचित जोर देऊन उच्चारण असो, प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या गायकीचे वैशिष्ट्य ठेवायचे, हा दृष्टिकोन प्रबळ दिसतो. शब्दांचे उच्चारण हा तर आशाबाईंचा खास प्रांत. शब्द उच्चारताना त्यातील नेमका आशय रसिकांसमोर अशा प्रकारे ठेवतात की ऐकणारा चकित व्हावा. इथे या गाण्यातील पहिला अंतरा  संपताना, " तुझ्या पदांचे अखंड चिंतन, ही माझी साधना" ही ओळ संपवताना स्वरलय दुगणित जाते पण तशी  जाताना,"चिंतन" शब्दातील आशय स्वरांतून कसा मांडला आहे, हे अभ्यासण्यासारखे आहे. शेवट करताना लय द्रुत लयीत जात असताना,शब्दांतील मार्दव कायम ठेवले आहे. ही करामत साधणे नक्कीच सोपे नाही. 



Tuesday 4 June 2019

सतीश हर्डीकर

सतीशची आणि माझी ओळख आहे यापेक्षा अधिक, तो माझ्या आई-वडिलांच्या संपर्कात जास्त होता. विशेषतः माझे वडील ट्रेकिंग वगैरे कार्यक्रमाला जात असत आणि त्यानिमित्ताने सतीश आणि इतर मित्रांनी स्थापन केलेला "यंग झिंगारो" या ट्रेकिंग क्लब मध्ये माझ्या वडिलांची ये-जा असायची. म्हणूनच सतीश मला नेहमी म्हणतो - अनिल तू अशा आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलास हे तुझे भाग्यच आहे. अर्थात असेच मत सुनीलचे पण आहे. फार मागे, एकेठिकाणी माझ्या आईबद्दल एकेठिकाणी बरेच काही छापून आले होते आणि सुनीलने ते कात्रण मला साऊथ आफ्रिकेत मेल केले होते आणि त्या कात्रणाखाली खाली,  सतीश जे म्हणतो, तसेच लिहिले होते. सतीश तेंव्हापासून माझ्या घरी येत असे. एका स्पष्ट आठवण - एकदा असाच रात्री गप्पा मारायला आला असताना, त्याने एका मांजरीच्या मृत्यूबाबतची कविता सादर केली होती. कवितेचे शब्द आठवत नाहीत पण मांजरीचा मृत्यू होणे, हा कवितेचा विषय होऊ शकतो, हे त्याने दाखवून दिले होते. 
तसा सतीश मृदुभाषी आहे, फार उंच स्वरांत बोलत आहे, घसा तारवटला आहे, डोळे गरागरा फिरवत आहे, असले दृश्य सतीशबाबत स्वप्नात देखील येत नाही. माझ्याशी बोलताना, "अरे अनिल...." अशी सुरवात करणार आणि अशा सुरांत की ऐकताना २ अन्वयार्थ निघू शकतात - १) "अरे अनिल बाळा, या संसाराचा भवसागर तू कसा बरे तरुन जाणार!!" (इथे अनिल "बाळा" हेच योग्य!!) २) त्याचा मूळ स्वभावच अशा सुरांत बोलण्याचा आहे, हे गृहीत धरून ऐकायचे. मी माझ्या फायद्याची बाजू घेतो!! एक नक्की, सतीशला अनेक मराठी कविता मुखोद्गत आहेत. आपल्या पहिल्या पिकनिकला, मी त्याला एका बाजूला घेतले आणि त्याच्याकडून पु.शि. रेग्यांच्या काही कविता म्हणवून घेतल्या. पु.शि. रेगे, जी.ए.कुलकर्णी, आरतीप्रभू हे लेखक आम्हा दोघांच्या अति आवडीचे. त्याने मला एकदा, जी.ए. वर बोलायला सुचवले होते पण बोलण्याची जागा चुकीची होती म्हणून मी ब्र देखील काढला नाही. 
या गृपमध्ये गंभीर विषयावर बोलायला अघोषित बंदी आहे. याचे मुख्य कारण हा गृप एकत्र भेटणार, जेंव्हा पिकनिक असते तेंव्हा किंवा कुठे कधीतरी Get-Together असेल तेंव्हाच. निव्वळ साहित्यिक गप्पा किंवा सांगीतिक गप्पा देखील मारायच्या असतात, हे या ठिकाणी मुद्दामून सांगायला हवे. सतीशचे मराठी साहित्याचे वाचन आणि त्याचे परिशीलन भरपूर आहे. वाचलेल्या पुस्तकाचा अचूक अन्वयार्थ काढण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. मला नाही पण इतर मित्रांना लिहिलेल्या पत्रातून त्याने आपली ही आवड मांडलेली आहे, असे मला त्या मित्रांकडून समजलेले आहे. त्याचा मित्रसंग्रह अफाट आहे आणि त्याला मित्र, खास करून मैत्रिणी जोडण्याचे व्यसनच आहे. एखादा देखणा चेहरा दिसला की लगेच सतीशचा "नाथा कामत" होतो !! ( हे मत विजयचे आहे आणि बहुदा याच सवयीमुळे विजयने त्याचे "झग्या" असे नामकरण केले आहे !!) अर्थात नवनवीन मैत्रिणी शोधणे, हा सतीशचा आवडता छंद आहे!! त्यातून सतीश चर्चगेट इथल्या K.C.college मध्ये होता, जे मुळातले सिंध्यांचे कॉलेज म्हणजे भरपूर सिंधी मुली!! एक गोष्ट मान्यच करायला हवी, मुलींशी बोलण्यात सतीश विलक्षण रमतो. आम्ही मित्र जे विषय काढायला सर्वसाधारणपणे कचरतो, ते विषय देखील मनोज्ञपणे मुलींसमोर मांडतो. एखाद्या मुलीशी सतीश बोलत आहे, हे दृश्य कुठल्याही कॅमेऱ्यात बंद करून ठेवण्यासारखे सुरेख असते. अर्थात तिथे देखील बोलताना, समजावून सांगण्याचा आव असतो. सतीश खरे तर शिक्षकच व्हायचा, चुकून बँकेत नोकरीला लागला !! दुसऱ्याला समजावणे, लोकांसमोर बोलणे, हे त्याला फार आवडते. माझ्या कानावर त्याचे दुसरे "निक नेम" - "पिळ्या" असे देखील आले आहे. 
माझ्याच वडिलांनी मला सांगितलेली  बाब, ट्रेकिंगला गेल्यावर, त्या रात्री शेकोटीचा कार्यक्रम आवश्यक असतो आणि तिथे बोलगाणी गायनात सतीश सगळ्यांच्या पुढे. त्याला असंख्य बोलगाणी पाठ आहेत. माझ्या  मते,आतापर्यंत महाराष्ट्रातील सगळे गड, किल्ले सर करून झाले  असून,हिमालयातील देखील काही टोके गाठली आहेत. या बाबतीत देखील त्याला बँकेची नोकरी दणक्यात लाभली.  
सुदैवाने त्याला बँकेच्या नोकरीत अपरिमित यश मिळाले आणि त्यानिमित्ताने तो बरेचवर्षे परदेशी देखील राहून आला आहे. परदेशी राहण्यावरून, मला एक सुचले. माणसाने जर का व्यामिश्र अनुभव घ्यायचे ठरवले आणि आत्मविकास करायचे ठरवले तर परदेशी काही काळ वास्तव्य करणे अत्यावश्यक आहे. 
सतीश रूढार्थाने बोलघेवडा नाही आणि याचा आम्ही मित्र पुरेपूर फायदा उठवतो. पहिल्या पिकनिकला रात्री, मी आणि विजयने अगदी ठरवून सतीशला "गिऱ्हाईक" करायचे ठरवले आणि सगळी रात्र तरंगत ठेवली होती. रात्रभर त्याच्या नावाने आहे/नाही ते किस्से रंगवले होते आणि कुणालाही झोपायला दिले नव्हते.  आत्ता लिहिताना एक किस्सा आठवला. पहिली किंवा दुसरी पिकनिक असावी ( हा तपशील महत्वाचा नाही)  बसमध्ये एकमेकांच्या टोप्या उडवणे चालू होते. नेत्रा आमच्यात येऊन बसली होती. कशावरून तरी मुलींबद्दल गप्पा सुरु झाल्या. एकदम नेत्रा सतीशला एका मुलीबद्दल तिरकस बोलली (तिरकस बोलणे हा नेत्राचा स्वभावच आहे!!) आणि महाशय लगेच नेत्राकडे बघून अतिशय संथपणे आणि थंडपणे उद्गारले - "नेत्रा तुला काय माहिती, आम्ही  मुले,तुम्हा मुलींच्यात काय बघतो ते !!" नेत्रा थक्क तर झालीच पण बस हास्यकल्लोळात बुडाली. सर्वसाधारणपणे असे कुणी बोलले असते का? पण सतीश बोलला!! 
सतीशच्या मोठेपणा असा, त्याने सगळी चेष्टा चेष्टेवारीच घेतली. आजही तो गृपच्या कुठल्याही कार्यक्रमात भेटला की विजय सुटतो!! सतीशला बायको पण अशीच मितभाषी मिळाली आहे. उमा आता माझ्या चांगली ओळखीची झाली आहे. उमा माझ्या अनेक नातेवाईकांना प्रत्यक्ष ओळखते. मध्यंतरी मी सतीशच्या गोरेगाव इथल्या घरी गेलो होतो, सतीश घरी नव्हता पण उमा आणि मी जवळपास तासभर गप्पा मारत होतो. अनेक जुन्या आठवणी निघाल्या. मला अजूनही असे ठामपणे वाटते, सतीशने आपल्या परदेशातील आठवणी संगतवार लिहाव्यात. मी त्याला तसे एक, दोनदा सुचवले होते पण अनिलला गंभीरपणे घ्यायचेच नसते,हा इथे बऱ्याच जणांचा समज असल्याने, सतीशने ते मनावर घेतलेले नाही. वास्तविक युरपमध्ये ४,५ वर्षे सलग काढणे, हाच अनिर्वचनीय अनुभव आहे आणि तो सलग अनुभव त्याच्या गाठीशी आहे. तसेच इतक्या मराठी कविता मुखोद्गत असताना, त्या कवितांबद्दल थोडे वैचारिक, विश्लेषणात्मक लिहावे. निदान प्रयत्न करायला काय हरकत आहे. फार तर लोकं म्हणतील - काय फडतूस लिहिले आहे ( ही शक्यता फारच कमी आहे तरी देखील....) वगैरे. खरतर लिहिताना लोकांचा कधी फारसा विचार करू नये हे माझे आवडते मत अन्यथा आजवर मी जे काही लिहिले आहे, त्याच्या १०% देखील लिहून झाले नसते. आणि जर का अनिल लिहू शकतो तर सतीशला लिहिणे म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे, हे मला प्रांजळपणे वाटते. 
असो, सतीशसारखा सुसंकृत मित्र माझ्या यादीत आहे, याचा मला म्हणूनच अभिमान वाटतो.