Tuesday 27 August 2019

एक असामान्य खेळी

क्रिकेट खेळाची खरी गंमत कधी येते? फलंदाज, दणादण गोलंदाजी फोडून काढत आहे तेंव्हा की, गोलंदाज, आपल्या गोलंदाजीने, फलंदाजांना सळो की पळो करीत आहेत, हे बघताना? वास्तविक, दोन्ही गोष्टी, प्रेक्षकांच्या दृष्टीने नयनरम्य पण तरीही, एक खेळ म्हणून विचार केला तर, हे सगळे एकांगी असते आणि इथे खेळाडूच्या कौशल्याची परीक्षा घेतली जात नाही.उदाहरण दिले तर हा मुद्दा अधिक चांगल्या प्रकारे पटू शकेल. ऑस्ट्रेलियातील पर्थची खेळपट्टी बहुतेकवेळा वेगवान गोलंदाजाना सहाय्य करणारी असते आणि त्यामुळे तिथे वेगवान गोलंदाज, गोलंदाजी करायला नेहमीच उत्सुक असतात. यात एक बाब प्रकर्षाने पुढे येते. खेळपट्टी अति वेगवान असल्याने, साधारण कुवतीचा वेगवान गोलंदाज देखील, आपला प्रभाव पाडू शकतो.हाच प्रकार, "पाटा" खेळपट्टीवर देखील उलट्या प्रकारे घडतो. तिथे गोलंदाजांना खेळपट्टीकडून कसलेच सहाय्य मिळत नाही आणि आपली गोलंदाजी फोडून काढली जात आहे, हे असहाय्य नजरेने बघत बसावे लागते. अर्थात, स्पिनर्स बाबत हाच प्रकार घडतो. स्पिनर्स, प्रमाणाच्या बाहेर चेंडू वळवू शकतात आणि फलंदाज हताश होतात. ज्यांना "खऱ्या" क्रिकेटमध्ये रस आहे, त्यांच्या दृष्टीने, हे सगळे दयनीय!!
ज्या खेळपट्टीवर, दोघांनाही समसमान संधी असते, ती "आदर्श" खेळपट्टी. गोलंदाजाने टाकलेला चेंडू सुंदर स्विंग होत आहे, छातीपर्यंत "बाउन्स" घेत आहे आणि फलंदाजाला देखील, आपला सगळा अनुभव पणास लावून खेळण्याची गरज भासत आहे. इथे हा खेळ खऱ्याअर्थी रंगतो आणि हे खरे "द्वंद्व"!! मला सुदैवाने, अशा प्रकारचे द्वंद्व एका सामन्यात, प्रत्यक्षात बघायला मिळाले होते.
२०१०/११ साली भारतीय संघ, साउथ आफ्रिकेत आला होता, त्यावेळी भारतीय संघ बराच नावाजलेला होता आणि त्याचे प्रत्यंतर टेस्ट सामन्यांच्या मालिकेत आले. मी ज्याला "द्वंद्व" म्हणतो, तशा प्रकारचा सामना, मला तिसऱ्या कसोटीत, केप टाऊन इथल्या सामन्यात बघायला मिळाले. वास्तविक केप टाऊन इथली खेळपट्टी, डर्बनप्रमाणे गोलंदाजी धार्जिणी नसते परंतु या सामन्याच्या वेळेस, खेळपट्टीवर थोडे गवताचे पुंजके दिसत होते आणि हे चिन्ह म्हणजे वेगवान गोलंदाजीला आमंत्रण!!
साऊथ आफ्रिकेने, सामन्याची सुरवात केली आणि पहिल्या डावात, ३६२ धावा केल्या. भारताची सुरवात अडखळत झाली. अर्थात, याला कारण डेल स्टेन. त्या दिवशीची स्टेनची गोलंदाजी बघताना, मला पूर्वीचे म्हणजे १९८० च्या दशकातले वेस्ट इंडियन गोलंदाज आठवले, विशेषत: मायकेल होल्डिंग!! पहिल्या ओवर पासून, स्टेनला लय सापडली होती आणि तो अक्षरश: खेळपट्टीवर "आग" ओतत होता. खेळपट्टी तशी गोलंदाजाला साथ देणारी नव्हती . म्हणजे स्टेन जरी १५० च्या गतीने गोलंदाजी करीत होता तरी, भयानक तुफान, असे नव्हते, विखार होता. पहिल्या षटकापासून, स्टेनला लय सापडली आणि त्याने चेंडू दिवसभर ऑफ स्टंप,त्याच्या बाहेर किंवा मिडल स्टंप, याचा रेषेत ठेवला होता. चेंडूला चांगलीच "उशी" मिळत होती. याचा परिणाम, फलंदाजाला सतत सतर्क राहणे आवश्यक!!
काहीवेळा सचिन खेळायला आला. तो आला, तशी स्टेनने वेग वाढवला आणि पहिलाच चेंडू, त्याने, ऑफ स्टंपवर टाकला आणि बाहेर काढला, आउट स्विंग - चेंडू छातीच्या उंचीवर होता आणि ऑफ स्टंपवर टप्पा पडून बाहेर निघाला!! अगदी सचिन असला तरी तो "माणूस" असल्याचा तो "क्षण होता, खरतर, सचिनचा अंदाज चुकला आणि चेंडू विकेटकीपरकडे गेला. प्रेक्षकातील, भारतीयांचा श्वास अडकेला, मोकळा झाला (यात अस्मादिक देखील!!) पुढील, ३ चेंडू म्हणजे खरे "द्वंद्व" होते. सचिनच्या आजूबाजूला क्षेत्ररक्षकांची साखळी होती आणि स्टेनने, आखूड टप्प्याचे चेंडू टाकले. सचिनकडे एकच पर्याय, चेंडू नुसता ढकलणे!! त्याने तेच केले. शेवटचा चेंडू मात्र, आजही माझ्या आठवणीत आहे. हा चेंडू, ऑफ स्टंपच्या किंचित बाहेर पडला होता आणि आतल्या बाजूला वळला - इन स्विंग - थोडा आखूड टप्पा होता आणि सचिनने आपली "गदा"फिरवली आणी ती इतकी अप्रतिम होती की, चेंडूचा टप्पा पडला आणि पुढल्या क्षणी चेंडू, Point दिशेने सीमापार!! मैदानावर क्षेत्ररक्षण करणारे, सगळे खेळाडू अवाक!!
चेंडूचा वेग १४८ कि.मी. होता (तिथल्या स्क्रीन बोर्डवर तो वेग दाखवला होता!!), चेंडू "बाउन्स" घेण्याच्या स्थितीत आला होता परंतु तो "बाउन्स" पूर्ण होण्याआधी सचिनने कमाल दाखवली होती. गोलंदाजावर "मानसिक" आघात करणारा क्षण होता, पण असे काही मानून घेणारा, स्टेन नव्हता, हे पुढील षटकावरून ध्यानात आले., या फटक्याने, जणू स्टेन चवताळला होता!! पुढील षटक, पूर्णपणे, सचिनने खेळून काढले. पहिले दोन चेंडू, सचिन चुकला पण, गंमत अशी होती, तिसरा चेंडू त्याने "कव्हर्स" मधून सीमापार धाडला!!
त्यापुढील जवळपास चार तास, हे दोन कोब्रांमधील द्वंद्व होते आणि सगळा स्टेडीयम, भान हरपून, ही लढाई बघत होता. स्टेनने त्या डावात, ३१ षटकात ५ बळी घेतले होते. खरेतर तो अधिक बळी सहज घेऊ शकला असता पण, त्याची गोलंदाजी बहुतांशी सचिनने खेळून काढल्याने, त्याचे यश मर्यादित राहिले. त्या डावात स्टेनने एकही चेंडू, ज्याला "हाफव्हॉली" म्हणतात तशा प्रकारचा टाकला नाही. म्हणजे पाय टाकून, चेंडू फटकावणे, जवळपास अवघड. असे असून देखील त्या डावात सचिनने दोन चौकार असे मारले होते, त्याला तोड नाही. दोन्ही फटके एकाच दिशेने मारले होते.
तेंव्हा सचिन पन्नाशी ओलांडून पंचाहत्तरीकडे शिरत होता. स्टेनने, पहिला चेंडू, असाच आखूड टप्प्याचा टाकला होता पण सचिनने, आपला डावा पाय पुढे आणला आणि "On the Up" प्रकारे त्याने "कव्हर्स" मधून सीमापार हाणला. हा फटका, अति अवघड म्हणावा लागेल कारण चेंडूचा टप्पा उशी घेत असताना(च) असा फटका खेळण्याचे धैर्य दाखवणे!! फटका चुकला तर झेल १००%!! त्या डावात सचिनने, १४६ धावा केल्या पण मला तरी असेच वाटते, या सारखी खेळी त्याने आयुष्यात फार कमी वेळा, अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल, इतक्या इनिंग्जमध्ये केली आहे - इथे मी फक्त टेस्ट सामन्यांचा(च) विचार करीत आहे. अशी खेळी खेळणे, हे कुठल्याही खेळाडूला संपूर्ण समाधान देणारे असते. मी, या खेळीचा साक्षीदार होतो, याचा आनंद काही वेगळाच.

अवाक करणारी गोलंदाजी

खेळपट्टीवर बऱ्यापैकी गवत, बाकीचे मैदान लुसलुशीत हिरवळीने भरलेले. वातावरण चांगल्यापैकी थंडगार आणि आभाळ काळ्या ढगांनी भरलेले!! असे वातावरण वेगवान गोलंदाजाच्या दृष्टीने पर्वणी असते. हातातील नवीन, चकचकीत लाल चेंडूची करमत दाखवायला यापेक्षा वेगळ्या वातावरणाची अजिबात गरज नसते. फलंदाजाची खरी कसोटी अशा वेळी लागते. गोलंदाज ताजेतवाने असतात. मला तर अशा वेळी गोलंदाजी करणारे गोलंदाज, हे भक्षाच्या शोधात निघालेल्या चित्त्यासारखे वाटतात. दुसऱ्या बाजूने विचार केला तर अशाच वेळी गोलंदाजाला आपल्या भावनांवर काबू ठेऊन, आलेल्या फलंदाजाच्या वैगुण्याची ओळख ठेऊन, आडाखे बांधणे आवश्यक वाटते. एकतर सलामीला फलंदाजी करणे, हेच मोठे आव्हान असते. खेळपट्टीचा केवळ "अंदाज" असतो आणि तो देखील त्या खेळाडूच्या अनुभवाच्या जोरावर बांधलेला!! इथे तर खेळपट्टीवर चांगल्यापैकी गवत आहे म्हणजे चेंडू अंगावर येणार,तो भयानक वेगाने आणि त्याचा "स्विंग" कसा आणि किती होणार, याचा देखील अंदाज केलेला!! क्रिकेट हा खेळ फसवा असतो, तो इथे. खेळपट्टीवरून चेंडू किती वेगाने आपल्याकडे येईल, किती "बाउन्स" घेईल. कशा प्रकारे "स्विंग" होईल, याबाबत कसलेच ठाम ठोकताळे मांडता येणे केवळ अशक्य!!
खरेतर चेंडू "स्विंग" होतो म्हणजे काय होतो? हवेतील आर्द्रता आणि चेंडूचा वेग, याचे गणित मांडून, चेंडू हवेतल्या हवेत किंचीत "दिशा" बदलून, फलंदाजाकडे येतो!! इथे एक बाब ध्यानात घ्यावीच लागेल, वेगवान गोलंदाज, म्हणजे कमीत कमी १४० कि. मी. वेगाने फेकलेला चेंडू. अर्थात, हवेत स्विंग होणारा चेंडू, खेळपट्टीवर टप्पा पडल्यावर देखील आणखी थोडा "आत" किंवा "बाहेर" जाऊ शकतो आणि इथे भलेभले फलंदाज गडबडून जातात आणि यातून कुठलाही फलंदाज आजतागायत कायम स्वरूपी वर्चस्व गाजवू शकलेला नाही!!
अर्थात, चेंडू कसा स्विंग करायचा याचे देखील शास्त्र आहे. चेंडूची शिवण दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटांमध्ये ठेऊन, चेंडू टाकताना आपला हात, स्लीपच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने न्यायचा. अर्थात, हा झाला पुस्तकी नियम आणि या नियमानुसार, याला "आउट स्विंग" म्हटले जाते. "इन स्विंग" अर्थात नावानुसार वेगळ्या पद्धतीने टाकला जातो. चेंडूची शिवण आडव्या प्रकारे तळहातात पकडून, हात "लेग स्लीप"च्या दिशेने न्यायचा आणि सोडायचा. "आउट स्विंग" हा खेळायला अतिशय कठीण, असे मानले जाते आणि याचे प्रमुख कारण म्हणजे, अशा प्रकारचा चेंडू खेळताना, Bat ची कड घेऊन, चेंडू, झेलाच्या स्वरुपात क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावू शकतो किंवा विकेट कीपरच्या ग्लोव्हजमध्ये!!
बाबतीत वेस्ट इंडीजचा, मायकेल होल्डिंग हा आदर्श गोलंदाज ठरावा. १९७५ साली आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलेला हा गोलंदाज, अल्पावधीत फलंदाजाचा कर्दनकाळ ठरला. त्यावेळी, त्याचा वेग केवळ अविश्वसनीय होता. विशेषत: इंग्लंडच्या थंडगार वातावरणात तर त्याच्या गोलंदाजीला तेज धार यायची. हुकमी स्विंग करण्यात, हातखंडा!! ताशी १५० कि.मी. वेगाने चेंडू टाकताना, केवळ मनगटाच्या हालचालीत किंचित बदल करून, चेंडूला अप्रतिम दिशा द्यायचा. एक उदाहरण देतो. इंग्लंडचा बॉयकॉट हा, तंत्राच्या बाबतीत अतिशय काटेकोर असा सलामीचा फलंदाज होता. १९७७ च्या वेस्टइंडीज दौऱ्यात, त्यावेळी, रॉबर्ट्स, होल्डिंग, क्रोफ्ट आणि गार्नर ही चौकडी भलतीच फॉर्मात होती आणि त्यांनी त्यावेळेस इंग्लंडला "त्राहीभगवान" करून सोडले होते. अशाच एका सामन्यात, होल्डिंगनेबॉयकॉटला त्रिफळाचीत केले, तो चेंडू कायमचा स्मरणात राहील असा होता. हवेत गारवा होता आणि होल्डिंग नव्या गोलंदाजी करायला आला. विकेट गेली, तो चेंडू नीट बघता, त्यातील "थरार" अनुभवता येईल.
होल्डिंगने तसा नेहमीच्या शैलीत चेंडू टाकला आणि त्याचा टप्पा, किंचित पुढे टाकला. बॉयकॉटने चेंडूची दिशा ओळखून, किंचित पाय पुढे टाकला आणि चेंडू थोपवण्याचा प्रयत्न केला. त्याला वाटले, चेंडू बहुदा "इन स्विंग" होईल आणि त्यानुसार त्याने हातातली bat किंचित तिरपी करून, चेंडूच्या रेषेत आणायचा प्रयत्न केला परंतु. एकाच शैलीत दोन्ही स्विंग टाकण्याच्या कलेत वाकबगार असलेल्या होल्डिंगने, तो चेंडू, "आउट स्विंग" केला आणि Bat व pad मध्ये किंचित "फट" राहिली आणि चेंडू त्यातून आत गेला आणि यष्ट्या उध्वस्त झाल्या!! प्रथम कुणालाच काही समजले नाही आणि जेंव्हा समजले तेंव्हा, केवळ बॉयकॉटच नव्हे तर वेस्टइंडीज मधील सगळे खेळाडू केवळ चकित झाले. आजही, ही delivery क्रिकेट इतिहासातील 'अजरामर" delivery मानली जाते.
आता यात नेमके काय घडले? चेंडूचा वेग तर अवाक करणारा नक्कीच होता परंतु जेंव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळता तेंव्हा चेंडूचा वेग, ही बाब जरी लक्षणीय असली तरी फार काळ कुतूहलाची बाब ठरत नाही. खरी गंमत होती, चेंडूचा असामान्य स्विंग!! चक्क, चेंडू "स्पिन" व्हावा, त्या अंशात आत वळला आणि फलंदाजाचा अंदाज, पूर्णपणे फसला!! क्रिकेट खेळात, वेगवान गोलंदाजीचा सामना करणे, किती अवघड असते आणि जो फलंदाज त्यात यशस्वी होतो, त्यालाच खरी मान्यता मिळते. याचा अर्थ स्पिनर्सना काहीच किंमत नाही, असे नव्हे पण त्याबद्दल पुढे कधीतरी.

Thursday 22 August 2019

साऊथ आफ्रिका - दुभंग समाज

ल्ली परदेशी नोकरीनिमित्ताने राहायला जाणे यात फारसे अप्रूप उरलेले नाही आणि ते फार बरेच झाले. अनेक बाष्कळ मुद्दे उपस्थित केले जातात आणि परदेशी जाणे, यातली गंमतच निघून जाते. असो, एखादा देश राहण्यासाठी स्वीकारल्यावर, त्या देशाबद्दल इत्थंभूत माहिती घेण्यासाठी काही वर्षे तरी सलगपणे राहणे आवश्यक असते अन्यथा जे काही अनुभव येतात ते फार वरवरचे असतात. मुळात, त्या देशातील समाजात सामावून जाणे (हे तसे फार अपवाद म्हणून गणले जातात) ही प्रक्रिया फार किचकट आणि वेळखाऊ असते, प्रसंगी तटस्थता स्वीकारून, पडते घेऊन वागावे लागते. तरच काही प्रमाणात तुम्हाला त्या देशाची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जडणघडण समजून घेता येते. अन्यथा सगळाच उथळपणा ठरतो. 
मला अशी संधी १९९४ मध्ये, साऊथ आफ्रिकेत नोकरी मिळाली. वास्तविक प्राथमिक विचार हा ४,५ वर्षांपुरताच होता. १९९२/९३ मध्ये मी लागोस-नायजेरिया इथे नोकरीसाठी गेलो होतो. पुढे सुट्टीनिमित्त भारतात आलो आणि अचानक साऊथ आफ्रिकेची संधी चालून आली. एक नवा देश, बघूया कसा काय आहे? या विचारानेच संधी स्वीकारली. वास्तविक त्यावेळेस, "नेल्सन मंडेला" सोडले तर कुठलीही व्यक्ती ऐकिवात देखील नव्हती, "जोहान्सबर्ग","डर्बन", "प्रिटोरिया" आणि "केप टाऊन" वगळता कुठल्याच शहराचे नाव माहीत नव्हते. थोडक्यात मनाची पाटी कोरी ठेऊन, या देशाला गेलो. पुढील विचार करता, मनात कसलीच कल्पना नव्हती, ही इष्टापत्तीच ठरली. प्रत्येक प्रदेश, प्रत्येक दिवस, भेटलेला प्रत्येक माणूस हा नवीन अनुभवच ठरला. नोकरी "पीटरमेरित्झबर्ग" शहरात होती. या शहराचे नाव सुद्धा त्यापूर्वी ऐकलेले नव्हते परंतु "डर्बन" शहराजवळील शहर, इतकीच माहिती, घर सोडायच्या आधी समजली होती. १९९४ साली एकूणच साऊथ आफ्रिका देशाबद्दल आपल्याकडे "अज्ञान" अमाप होते आणि तसे अनुभवी कुणीही भेटले नव्हते. परंतु अशी माहिती नव्हती, त्यामुळे पुढे आलेले सगळेच अनुभव आजही मनात ताजे राहिलेले आहेत. मुळात कसलाच पूर्वग्रह नव्हता त्यामुळे नवलाई भरपूर होती. 
देशाबद्दल थोडक्यात सांगायचे तर तिथे "वर्णद्वेषी" राज्यकर्ते होते (१९९४  सालीचा तिथे पहिली लोकशाही निवडणूक झाली आणि नेल्सन मंडेला अध्यक्ष म्हणून निवडून आले) आणि त्यांनी गौरेतर लोकांवर अनन्वित अत्याचार करून सगळ्यांना त्रस्त केले होते. नेमका काय अत्याचार केला होता, त्याचे काय परिणाम झाले वगैरे बाबींबद्दल मी अनभिज्ञ होतो. त्यामुळे जेंव्हा मी तिथल्या कंपनीत पहिल्या दिवशी शिरलो आणि माझी ओळख परेड झाली तेंव्हा तिथल्या लोकांनी जरी "स्वागत" वगैरे उपचार पाळले तरी त्यात स्नेहार्दपणा जराही नव्हता. माझ्या कंपनीतील  ऑफिसमध्ये, माझ्याआधी २ भारतीय नोकरीसाठी आले होते आणि त्यांची ओळख होणे, हेच मला उबदार वाटले. 
पहिल्या काही दिवसांत मला एक जाणीव झाली, माझे मौखिक इंग्लिश आणि इथल्या लोकांचे इंग्लिश, या उच्चारात बराच फरक होता. अर्थात त्याची आडवळणाने मला जाणीव करून दिली जात होती. मला जर का इथे नोकरी करायची असेल तर माझे उच्चार बदलणे आवश्यकच होती आणि ही जाणीव लखलखीतपणे जाणवली. उच्चार शिकण्याशिवाय तरुणोपाय नव्हता. इथल्या  ख्रिश्चन लोकांचे उच्चार पद्धती जिभेवर रुळण्यासाठी मला जवळपास ३ महिने लागले अर्थात मला कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याने सगळे घडले अन्यथा इथे राहणे अवघड गेले असते. जसजसे दिवस जायला लागले तशी इथल्या भारतीय वंशाच्या लोकांशी ओळखी व्हायला लागल्या. इथला भारतीय वंशीय समाज साऊथ आफ्रिकेत १८५० पासून यायला लागला आणि हा देश पुढे जगापासून तुटला तशी इथला भारतीय समाज इथलाच झाला, दुसरा काही इलाजच नव्हता. याचा परिणाम असा झाला, त्यावेळी ज्या भारतीय पद्धती होत्या, त्या आजही आंधळेपणाने चालू राहिल्या. त्यामागे तर्क वगैरे काहीही नाही. एक उदाहरण देतो, वास्तविक Good Friday आणि Ester Monday हे सण ख्रिश्चन लोकांचे पण इथल्या भारतीयांनी आपलेसे केले परंतु आपलेसे  करताना, भारतातील पूर्वीच्या प्रथा आजही स्वीकारल्या. विशेषतः डर्बन, पीटरमेरित्झबर्ग शहरात त्यादिवशी निर्जळी उपास  करतात,संध्याकाळी शहरातून प्रचंड मिरवणूक काढली जाते (शहरातील भारतीय मंदिरात ती मिरवणूक विसर्जित होते), त्या मिरवणुकीत काहीजण भ्रमिष्टाप्रमाणे उघड्या अंगावर अणकुचीदार आकड्याच्या साहाय्याने फळे लटकावतात - काहीजण तर जिभेवर आणि पापण्यांवर फळे खोचतात!! या व्यक्ती तो सगळा काळ भ्रमिष्टच असतात. पुढे मिरवणूक मंदिरात आल्यावर इथे जिवंत निखाऱ्यांवरून अनवाणी पायाने चालतात!! 
मी जेंव्हा पहिल्या वर्षी हा सोहळा बघितला तेंव्हा दुसऱ्या दिवशी ऑफिसमधील लोकांना काही प्रश्न विचारले परंतु मला एकदाही तर्कसुसंगत उत्तर मिळाले नाही. "बाबा वाक्यम प्रमाणम" हीच वृत्ती दिसली. वास्तविक भारतात देखील अंतर्भागात असले प्रकार चालतात परंतु शहरी भागात असे काही चालत असल्याचे मला तरी माहीत नाही किंवा माझ्या बघण्यात नाही. मी जेंव्हा असे इथल्या लोकांना सांगितले तर त्यावर कुणीही काहीही बोलले नाही. हाच प्रकार त्यांच्या नेहमीच्या विचारसरणीत कायम दिसून आला. आपण जे  वागतो,जी विचारसरणी स्विकारतो त्यामागे कसले तरी वैचारिक अधिष्ठान असावे, असे इथल्या भारतीय वंशाच्या लोकांना वाटतच नाही. कधीकाळी आपल्या आजोबांनी, वडिलांनी जे काही चालू ठेवले होते तेच अंधपणे चालू ठेवण्यातच त्यांना आनंद वाटतो. एका बाजूने या समाजावर अमेरिकन संस्कृतीचा प्रचंड पगडा आहे, उच्चार तसेच अंगवळणी पाडले, राहणीमान अमेरिकन लोकांवर अवलंबून स्वीकारले. सामाजिक चालीरीती एका बाजूने जुनाट भारतीय घेतल्या पण आधुनिकतेच्या नावाखाली जी संस्कृती स्वीकारली, ती निव्वळ अमेरिकन संस्कृती!! तिथला भारतीय समाज हा प्रामुख्याने "तामिळ", "हिंदू" (तामिळ बगैर) आणि "मुस्लिम" यात विभागला गेला आहे. अर्थात लग्न व्यवहार बघताना हा भेदाभेद आवर्जूनपणे बघितला  जातो,हे विशेष. एकवेळ "हिंदू" आणि "तामिळ" यांच्या अपवादस्वरूपात रोटीबेटी व्यवहार सापडतात परंतु "मुस्लिम" आणि "इतरेतर" यांच्यात विस्तव जात नाही. अर्थात व्यवहार वगैरे बाबतीत असली आडकाठी नसते. तिथे मात्र संपूर्णपणे व्यवहार्य दृष्टिकोन असतो. मी ज्या कंपनीत काम करीत होतो, ती मुस्लिम कुटुंबाच्या मालकीची होती. अगदी कर्मठ म्हणावे अशी विचारसरणी. अर्थात आमच्यासारख्या भारतातून आलेल्या लोकांवर तशी काही बंधने नव्हती. त्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरच्या मुलाने एका "हिंदू" मुलीशी, घरातून पळून जाऊन लग्न केले. ज्या दिवशी लग्न केले त्याच दिवशी त्याला धर्मातून बहिष्कृत करण्यात आले!! त्याच्या कुटुंबात नुसता हलकल्लोळ उडाला होता. 
अर्थात असा प्रकार तामिळ आणि हिंदू समाजात होत नाही पण इतरांची नजर थोडी तिखट होते, बोलण्यातून वाग्बाण निघतात. अशी काही लग्ने मी स्वतः बघितली आहेत. यात गमतीचा भाग असा देखील आहे - मुलगी जरी मुस्लिम समाजातील असली तरी तिला आधुनिक राहणीमान खूप भावत असते. घरात डोक्यावर पडदा ओढून घेतील ऑफिसमध्ये तशाच वावरतील पण बाहेर गेल्यावर मात्र ती बंधने बाजूला टाकली जातील. काही मुस्लिम मुली तर नाईट क्लबमध्ये धुंद होऊन नाचलेल्या, मी याची डोळा बघितलेल्या आहेत. अगदी स्पष्ट लिहायचे झाल्यास,इथला भारतीय खऱ्याअर्थी "दुभंग" आहे. एका बाजूने भारतीय म्हणून (वृथा) अभिमान बाळगतात पण दुसऱ्या बाजूने अमेरिकन संस्कृती आत्मसात करतात. गोऱ्या लोकांच्यात एकूणच सण, समारंभ याचे प्रमाण तसे कमीच असते परंतु इतकी वर्षे इथे गोऱ्या लोकांनी राज्य केल्यामुळे त्यांच्या सवयी, राहणीमान इथल्या भारतीय समाजाने आपल्याशा केल्या आहेत. याबाबत असे ठाम विधान करता  येईल, गोऱ्या राजवटीने इथल्या भारतीय समाजावर पूर्णपणे अधिष्ठान मिळवले आहे आणि दिवसेंदिवस वाढतच आहे. आता गेली काही वर्षे या लोकांचा भारताशी बराच संबंध यायला लागला परंतु १९९४ च्या सुमारास भारतीय वंशीय समाजाची सांस्कृतिक भूक ही भारतीय हिंदी चित्रपटांवर पोसलेली होती!! भारतातून त्यावेळी हिंदी चित्रपटांच्या व्हिडीओ तिथे भरपूर मिळत असत आणि त्यांच्यावरच त्यांची सांस्कृतिक गुजराण होत असे. त्यामुळे भारतीय संगीत म्हणजे हिंदी चित्रपट संगीत (काही अपवाद मला भेटले होते पण त्यांचे प्रमाण अत्यल्प असेच होते) असाच समज दृढ झाला होता आणि आजही यात फारसा फरक नाही. मी तिथे असताना, एकदा पंडित हरिप्रसाद चौरासिया यांची मैफल झाल्याचे स्मरते परंतु श्रोते  बघता,बव्हंशी वयस्कर होते, तरुणांचा सहभाग जवळपास नगण्य स्वरूपाचाच होता. 
भारतीय समाज हा अधिककरून डर्बन, पीटरमेरित्झबर्ग या शहराभोवतीच वसलेला आहे. केप टाऊन, पोर्ट एलिझाबेथ सारख्या शहरात तर फारच अल्प संख्येने भारतीय वंशाचे राहतात. अर्थात माझी नोकरीची ठिकाणे देखील बरीचशी शहरी भागातच असल्याने मला हा अनुभव आला. आजही भारतीय समाज वेगळ्या वस्तीत राहतो. एकेकाळच्या गोऱ्या लोकांच्या वस्तीत शक्यतो घर घेण्याचे टाळतो. अगदीच रहात नाहीत असे नाही पण प्रमाण अल्प!! आजही गोरे, काळे आणि भारतीय समाज यांमधील दरी बुजलेली नाही. माझ्या माहितीत, एकच "हिंदू" मुलगी अशी निघाली जिने एका गोऱ्या माणसाशी सूत जुळवले आणि लग्न करून स्थिरावली!! अर्थात दिसायला अतिशय देखणी अशीच होती पण तिच्याकडे सगळा भारतीय समाज "दिग्विजय गाजवलेली मुलगी" याच नजरेतून बघतो. आजही भारतीय वंशाच्या आणि काळ्या लोकांच्या मनावर अदृश्यपणे का होईना पण गोऱ्या लोकांचे मानसिक वर्चस्व आहे. स्पष्ट बोललो तर मान्य करणार नाहीत., पण मी स्वानुभवावरून लिहीत आहे. 
पुढे काही वर्षांनी मी प्रिटोरिया आणि शेवटी जोहान्सबर्ग इथे नोकरी करायला आलो. इथे मात्र माझा काळा आणि गोरा समाज यांच्याशी फार जवळून संबंध आला. काही जणांशी आजही संपर्क आहे. सतत दुसऱ्या समाजावर वर्चस्व गाजवायचे, अशीच आजही गोऱ्या लोकांची बव्हंशी मानसिक ठेवण आहे. मला सुरवातीला फार त्रास झाला पण हळूहळू त्यांच्याशी जुळवून घ्यायला शिकलो. माझ्या हाताखाली काही गोरे कामाला होते. सुरवातीला त्यांनी ढिम्मपणे वागायचे धोरण ठेवले, कुठलेच सहकार्य करायचे नाही, कामात सतत आडकाठी करायची असेच धोरण असायचे पण तोपर्यंत मला या देशाचा बराच अनुभव आला होता. जसजसे मी त्यांचे पाणी जोखायला लागलो तशी त्यांचे मला सहकार्य मिळायला लागले. गोऱ्या लोकांचे एक वैशिष्ट्य खरोखरच आत्मसात करण्यासारखे आहे, मी बघितलेल्या बहुतांशी गोऱ्या लोकांमध्ये "व्यावसायिक" वृत्ती भरपूर असते (अपवाद सगळीकडेच असतात) ऑफिसमध्ये काम करताना, वचावचा बडबड नसते, कामाप्रती निष्ठा असते तसेच ऑफिसमध्ये आवश्यक तितकी जवळीक दाखवली जाते परंतु बाहेर कुठे (विशेषतः मॉलमध्ये) भेट झाली तर ओळख दाखवतील याची खात्री नसते!! मला असे थोडेच गोरे भेटले ज्यांच्या घरापर्यंत मी पोहोचू शकलो. ही त्यांची मानसिक घडण आहे आणि "आपल्या कातडीला जगात मान आहे"  या वृत्तीतूनच जन्माला आली आहे. खासगी नोकरींमध्ये आपली चूक मान्य  करणे,सर्वसाधारणपणे घडत नाही. तुम्ही एखाद्या गोऱ्या व्यक्तीची चूक दाखवा, ती व्यक्ती अनेक प्रकारची कारणे  सांगेल, तुमच्याच अंगावर चूक ढकलून देईल प्रसंगी फडतुस देखील विनोद करून विषयांतर करतील. तुम्ही इतके सगळे होऊन ठाम राहिलात तर मग गळ्यात हात वगैरे टाकतील!! 
गोरा माणूस हा असा आहे, जन्मापासून आपण कुणीतरी वेगळे आहोत, असेच शिकवले जाते. त्याचे प्रत्यंतर पुढे अनेक प्रसंगातून लख्खपणे दिसते. एक मात्र मान्यच करायला हवे, गोरे लोकं उगीचच परंपरेचे ओझे वाहत नाहीत. भारतीय समाज, जोखड म्हणून वागवतो. गोरा माणूस, तुम्ही जर गोऱ्या कातडीचे नसाल तर एका ठराविक अंतरावरच ठेवणार. उगीच जवळीक वगैरे साधणार नाही, गळेपडूपणा तर अभावानेच आढळेल. आज मी साऊथ आफ्रिका सोडून ८ वर्षे झाली पण अपवाद म्हणून दोनच गोऱ्या व्यक्तींशी माझा संपर्क आहे!! असे असले तरी पार्टी रंगवावी तर गोऱ्या माणसांनीच. पार्टी म्हटली की गोरा माणूस मोकळा होतो. सुदैवाने मला काही ख्रिसमस पार्ट्या गोऱ्या लोकांच्या घरात साजऱ्या करता आल्या. परदेशात  राहताना,ख्रिसमस साजरा करणे, यात काही फारसे नवल नसते परंतु अशाप्रकारे एखाद्या गोऱ्या लोकांच्या कुटुंबात साजरे करणे, हा सुंदर अनुभव असतो. प्रसंगी अश्लील विनोद सांगितले जातील (बायकांच्या देखत!) किंवा आयुष्यातील फजितीचे प्रसंग खुलवत सांगतील. भारतीय समाजातील लोकं पार्टीचे तत्व सांभाळतील पण साजरी करताना बरेचवेळा खालची पातळी देखील गाठतील. 
काळ्या लोकांचा समाज तर फारच वेगळ्या स्तरावर वावरत असतो. इथला काळा समाज हा आजही बहुतांशी मानसिक कुचंबणेत अडकलेला आहे. वर्णद्वेषी काळाचा सर्वात जास्त फटका या समाजाला बसला. Inferiority Complex त्यांच्या वागणुकीतून सतत जाणवत असतो. मुळातच हाडपेर दणकट, देहयष्टी भरदार आणि एकूणच हालचाली दुसऱ्याला जरब बसवणाऱ्या, त्यामुळे या लोकांच्या वाटेला सहसा कुणी जात . इतकी वर्षे या समाजाला निव्वळ दाबून ठेवल्याने आणि रगडून घेतल्याने, सर्वसाधारण प्रवृत्ती ही काहीशी जहाल भासते परंतु हे काही प्रातिनिधिक चित्र नव्हे. मला काही काळ्या व्यक्ती अतिशय सहृदय भेटल्या आणि मुख्य म्हणजे त्यांच्या कामात वाकबगार होत्या. एक सर्वसाधारण निरीक्षण असे, या समाजावर वर्षानुवर्षे अन्याय झालाआणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या वागणुकीतून दिसते. १९९४ सालापासून या देशात लोकशाही आली आणि काळ्या लोकांना आपल्या हक्कांची वाजवी जाणीव झाली. या बाबतीत आणखी एक निरीक्षण असे नोंदवता येईल - १९९४ साली लोकशाही प्रक्रियेच्या निवडणुका झाल्या आणि नेल्सन मंडेला अध्यक्षपदी विराजमान झाले, त्यावेळेस एक धोका साऊथ आफ्रिकेत होता जो इतर आफ्रिकन देशांतून वारंवार दिसतो. स्वातंत्र्य मिळाले पण काळ्या लोकांच्यात आपापसात टोळीयुद्धे सुरु झाली आणि "राजवट" अधिक "रासवट" झाली. साऊथ आफ्रिकेत निदान त्यावेळेस तरी हा धोका टळला. अर्थात पुढे झालेली आणि अजुनही चालू असलेली सामाजिक घसरण मात्र टाळू शकले नाहीत.  
एक गमतीशीर उदाहरण द्यावेसे वाटते. प्रिटोरिया इथल्या इथे  करीत  असताना, एके दिवशी  सहाध्यायी म्हणून एक तरुण कला मुलगा आला. त्याचे टेबल माझ्याच  शेजारी होते. आता शेजारीच आला म्हणून ओळख वाढवली. आता आम्ही या देशाचे राजे आहोत, याचा काहीसा दर्पयुक्त बोलण्याचा सूर असायचा. अर्थात फारसे वावगे नव्हते कारण आता या देशाचे राज्यकर्ते कृष्णवर्णीय (च) असणार, हे उघड सत्य आहे. त्या ऑफिसच्या मुख्य दरवाज्यातून आत शिरताना लांबलचक लांबोळका असा पोर्च होता. एके संध्याकाळी रेमंड ( त्या काळ्या मुलाचे  नाव) काही कामनिमीत्ताने दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये निघाला. वाटेत त्याला आमच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा धक्का लागला. तो वरिष्ठ अधिकारी गौर वर्णीय होता. तिथे त्या दोघांचे काय  झाले,मला कल्पना नव्हती पण त्याच संध्याकाळी रेमंड आमच्या C.E.O. कडे तक्रार घेऊन गेला. तक्रारीच्या मसुद्यात, त्या गौरवर्णीय अधिकाऱ्याने मला मुद्दामून धक्का दिला आणि अनिल त्या घटनेचा साक्षी आहे!! लगेच मला बोलावण्यात आले. रेमंडला लेखी माफी हवी होती अन्यथा तो पोलीस तक्रार करणार होता - रेमंडचे म्हणणे असे होते, या गौर वर्णियाच्या मनात अजूनही वर्णद्वेष जागा आहे आणि म्हणून त्याने माझा अपमान करण्यासाठी मुद्दामून धक्का दिला!! हे ऐकताना मला तर मनातल्या मनात हसायलाच येत होते. परंतु जर का हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले असते तर नसता अनर्थ झाला असता. मनात विचार आला, मुंबईत अशा घटना नेहमीच होत असतात, धक्का लागल्यावर तिथल्या तिथे "sorry" म्हणायचे आणि पुढे चालायला लागायचे. असाच शिरस्ता असतो पण हा साऊथ आफ्रिका देश आहे. Protocol इत्यादी बाबींना इथे कमालीचे महत्व असते. सकाळी कामावर येताना कधीकधी आपण काही विचारांत गर्क असू शकतो पण तरीही "Good Morning" किंवा संध्याकाळी घरी जाताना "Good Evening" हे सोपस्कार पूर्ण करायचेच असतात अन्यथा  समोरच्याचा अपमान होऊ शकतो! मला देखील एक, दोनदा या अनुभवाला सामोरे जावे लागले होते. 
या बाबतीत इथला सगळा समाज एकवटलेला आहे. तसेच इथला materialistic  द्रुष्टीकोन स्विकारण्यासारखा आहे. इथे श्रमाला आणि शिक्षणाला किंमत आहे. भारताप्रमाणे इथे सरसकट पदवीधर बघायला मिळत नाहीत. शिक्षण अतिशय महागडे आहे. अर्थात शिक्षणाचे प्रमाण गोऱ्या लोकांमध्ये अधिक आहे आणि काळ्या लोकांमध्ये उदासीनता अधिक आहे. थोडा विचार केला तर १९९४ च्या आधी शिक्षणाच्या संधी या फक्त गौर वर्णीयांनाच उपलब्ध होत्या. युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवणे इतरेजनांना अशक्य होते. याचा परिणाम भारतीय समाज आणि काळा समाज यांच्यावर पडणे अपरिहार्य होते. इतरेजन हे आपल्या घरातील शेलकी कामे करण्यासाठी आहेत, हाच समज पक्का झाला होता. आजही यात फारसा फरक आढळत नाही. 
याचा विरुद्धार्थी परिणाम काळ्या लोकांवर झाला. रेमंडची प्रतिक्रिया या पार्श्वभूमीवर बघता येते. २००० नंतर इथे Law and Security हा प्रश्न भयानक झाला, त्याची पाळेमुळे इतिहासात सापडतात. 
वास्तविक १९९४ मध्ये रीतसर स्वातंत्र्य मिळाले. काळ्या लोकांसमवेत भारतीय वंशीय लोकांनीही सर्वस्वाची होळी केली होती. अनेक वर्षे रॉबिन आयलंडसारख्या (अंदमानप्रमाणेच हा तुरूंग आहे. विक्राळ समुद्रातील एकांतवासी बेट आहे) तुरूंगात आयुष्य व्यतीत केले आहे पण नव्या साउथ आफ्रिकेत भारतीय समाजाला फार काही मिळाले नाही. पुढे Black Empowerment कायदा झाला जो उघडपणे काळ्या समाजाला वर्धीत करणारा झाला. यामध्ये इथले भारतीय कुठेच नव्हते. असे नव्हे, सत्तेत वाटेकरी झाले नाहीत. प्रवीण गोरधन सारख्या व्यक्ती देशाची  Finance Minister झाली  पण संपूर्ण समाज हा "वंचीत" राहिला.आणि हे परखड सत्य आहे. याची जळजळ भारतीय समाजात ठुसठुसत आहे. 
अर्थात काळ्या समाजाला उजवे माप मिळाले म्हणून तो समाज वर्धिष्णू झाला का? तसे चित्र अजिबात दिसत नाही. गुन्हेगारी अतोनात वाढली आहे, भ्रष्टाचार रोजचा झाला आहे आणि सामान्य पातळीवर चालत आहे. यात काळा समाज आघाडीवर आहे. एक मुद्दा आणखी मांडायला लागेल, इथला काळा समाज म्हणजे आता लोकल + नायजेरियन असे समीकरण मांडायला हवे, इतक्या प्रमाणावर इथे नायजेरियन इथल्या गुन्हेगारीत सामावले आहेत. Easy Money हेच यांच्या आयुष्याचे महत्वाचे सूत्र झाले आहे. आजही अशा काळ्या लोकांची वस्ती प्रामुख्याने वेगळी आहे आणि त्याला  Location म्हणतात. अती भयानक अशी ही वस्ती असते. पोलीस देखील धाड टाकताना, पूर्ण तयारीनिशी जातात कारण पोलीसाचा खून होणे, ही नैसर्गिक घटना झाली आहे. 
एका बाबतीत हे तिन्ही समाज एकसंध आहेत. कुटुंबसंस्थेच्या विलीनीकरणाच्या बाबतीत कमालीचे साम्य आढळते. कुटुंबसंस्था अशी काय दोलायमान झाली आहे की काही बोलायची सोय नाही. लग्नाआधी मूल होणे ही आता सर्वमान्य घटना झाली आहे. एक नक्की, हे सगळे उघडपणे चालते. त्यात लपवाछपवी नसते. मला तर अशी भरपूर उदाहरणे माहित आहेत ज्यांची (विशेषत: मुलींची) आयुष्ये भरकटलेल्या पतंगाप्रमाणे भिरभिरत आहेत!! अशी उदाहरणे सगळ्या समाजात आढळतात. 
यात एक मजेदार निरीक्षण असे, आता काळ्या लोकांचे राज्य आले तरी गोऱ्या लोकांची गूर्मी तितकी कमी झालेली नाही. आपला पगार वाजवून घेतात. अर्थात ही विषण्णता भारतीय समाजात जास्त आढळते. वास्तविक काही भारतीय खरोखरच बुद्धीवान आहेत आणि त्यांना देखील वाजवी पगार मिळतो पण ते प्रमाण अजुनही अत्यल्प आहे आणि ही बाब खटकते. हाच मुद्दा आणखी पुढे नेला म्हणजे एक अत्यंत विदारक चित्र उभे राहते. आर्थिक विषमता जगात सगळीकडे आहे परंतु साऊथ आफ्रिकेत याचे अतिशय भीषण स्वरूप आढळते. मी काही वर्षे तिथल्या गावस्वरूप जागेत नोकरीनिमित्ताने काढली. नोकरीचा भाग म्हणून मला पार अंतरंगात जावे लागायचे. तिथल्या  वस्त्या, लोकांचे राहणीमान, त्यांची (तथाकथित) घरे इत्यादी गोष्टी फार जवळून बघायला मिळाले. ते सगळे बघताना, देशातील आर्थिक विषमतेचा पुसटसा अंदाज घेता आला. साउथ आफ्रिकेत "मध्यमवर्ग" आहे पण एकूण लोकसंख्येचा विचार करता "अल्पसंख्य" आहे. श्रीमंत आणि गरीब, यांच्यात प्रचंड मोठी दरी आहे. या देशातील गुन्हेगारी वाढण्यामागे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. अर्थातच काळा समाज आजही मोठ्या प्रमाणावर गरीब आहे. एकीकडे अवाढव्य सुबत्ता आणि दुसरीकडे शेणाच्या भिंतींची घरे, हा विदारक विरोधाभास आहे. जुन, जुलै महिन्यातील हाडे गोठविणाऱ्या थंडीत कसे रहात असतील?.हा अस्वस्थ करणारा अक्राळविक्राळ प्रश्न आहे. 
इथला समाज दुभंगलेला आहे, त्या मागचे हे इंगीत आहे. त्यामुळेच "अविश्वास" हवेत भरलेला आहे. प्रत्येकजण आपला एक कंपू करून रहात असतो. ज्याला सुबत्ता मिळवायची आहे त्याला बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. आयुष्य उबदारपणे व्यतीत करणे सहजशक्य आहे. बुद्धीमत्तेला मान्यता आहे पण यामागे मानसिक दुभंगलेपणाचे अभेद्य कवच आहे. 
या बाबतीत इथला सगळा समाज एकवटलेला आहे. तसेच इथला materialistic  द्रुष्टीकोन स्विकारण्यासारखा आहे. इथे श्रमाला आणि शिक्षणाला किंमत आहे. भारताप्रमाणे इथे सरसकट पदवीधर बघायला मिळत नाहीत. शिक्षण अतिशय महागडे आहे. अर्थात शिक्षणाचे प्रमाण गोऱ्या लोकांमध्ये अधिक आहे आणि काळ्या लोकांमध्ये उदासीनता अधिक आहे. थोडा विचार केला तर १९९४ च्या आधी शिक्षणाच्या संधी या फक्त गौर वर्णीयांनाच उपलब्ध होत्या. युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवणे इतरेजनांना अशक्य होते. याचा परिणाम भारतीय समाज आणि काळा समाज यांच्यावर पडणे अपरिहार्य होते. इतरेजन हे आपल्या घरातील शेलकी कामे करण्यासाठी आहेत, हाच समज पक्का झाला होता. आजही यात फारसा फरक आढळत नाही. 
याचा विरुद्धार्थी परिणाम काळ्या लोकांवर झाला. रेमंडची प्रतिक्रिया या पार्श्वभूमीवर बघता येते. २००० नंतर इथे Law and Security हा प्रश्न भयानक झाला, त्याची पाळेमुळे इतिहासात सापडतात. 

Saturday 10 August 2019

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

मी जेंव्हा प्रस्तुत सदर लिहायचे ठरवले तेंव्हा अर्थातच मराठी गाणी, हाच विषय ठरला होता आणि त्या हिशेबात, मराठी भावगीते हाच केंद्रबिंदू ठरावाला होता. अर्थात, मराठी चित्रपट गीते संपूर्णपणे वगळायची असा निश्चित हेतू नव्हता परंतु शक्यतो मराठी खाजगी भावगीते हाच प्राधान्यक्रम निश्चित केला होता. चित्रपट गीते विचारात घेतली म्हणजे मग, निव्वळ गाणे हाच प्रधान हेतू राहात नाही तर गाण्याचे चित्रीकरण, पडद्यावरील अभिनय, चित्रपटाची कथा इत्यादी अनेक मुद्दे विचारात घ्यावे लागतात आणि मग लेखाची लांबी पसरट होणार. त्यामुळेच या सदरात चित्रपट गीते तुरळकपणे घेतली आहेत. असे असून देखील आज मी असेच अतिशय सुंदर असे चित्रपटगीत विचारात घेत आहे. "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे" हे गाणे म्हणजे मुळात कवी आरतीप्रभू यांची सत्यकथेत आलेली कविता आहे. नंतर "नक्षत्रांचे देणे" या नावाने त्यांच्या कवितांचा संग्रह आला आणि पुढे संगीतकार भास्कर चंदावरकरांच्या ही कविता वाचनात आली.  "सामना" चित्रपटात, एक पार्श्वगीत म्हणून चपखल बसली. 
खरेतर आरतीप्रभू हे कधीही चित्रपटांसाठी गाणी लिहिणारे कवी नव्हते, त्यांचा तसा पिंडच नव्हता. अतिशय मनस्वी कलाकार म्हणून ख्यातकीर्त असल्याने फार कुणी संगीतकार त्यासारख्या वाटेला गेले नाहीत. एक कविता म्हणून वाचायला गेल्यास, या कवितेवर दीर्घ निबंध लिहावा लागेल, अशा वकुबाची कविता आहे. नीट वाचले तर ही कविता म्हणजे सुंदर भावकविता आहे. मनाच्या संत्रस्थ अवस्थेचे चित्रण आहे. भावकवितेचे एक लक्षण म्हणून असे सांगता येईल, कवितेत मांडलेला विचार आणि त्याची अभिव्यक्ती, यासाठी कविताच असणे अपरिहार्य व्हावे. तिला दुसरे कुठलेही स्वरूप अशक्यच आहे, असाच प्रत्यय येतो. कवितेचा आशय अगदी स्पष्ट आहे, आयुष्यातील अत्यंत निराशावस्थेतील अभिव्यक्ती आहे, अगदी टोकाची वाटावी अशीच आहे आणि त्यासाठी, "दिवे विझून जाणे" किंवा "वृक्ष झडत जाणे" अशा अगदी वेगळ्या आपल्याला सहज समजून घेता येणाऱ्या प्रतिमा वापरल्या आहेत. कवितेतील प्रत्येक ओळ आपल्याला निराशेच्या एका वेगळ्या जाणिवेची प्रतीती देते आणि ती देताना वाचक काहीसा झपाटला जातो. "कोण देते हळी, त्याचा पडे बळी आधी, हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे" या सारखी विलक्षण ताकदीची ओळ खरेतर चित्रपट गीतांसाठी अजिबात योग्य नाही. बहुदा म्हणूनच हे गाणे चित्रपटात पार्श्वगीत म्हणून वापरले असणार. 
संगीतकार भास्कर चंदावरकर हे मुळातले सतार वादक, पंडित रविशंकर यांचे गंडाबंध शिष्य. अर्थात रागदारी संगीताचा पायाभूत अभ्यास तरीही विशेषतः पाश्चात्य संगीताकडे अधिक ओढा दिसून येतो. विशेषतः "सिंफनी" संगीताचा अधिक बारकाईने अभ्यास केलेला आढळतो. आता या गाण्यापुरता विचार केल्यास, सुरवातीच्या व्हायोलिन आणि मेंडोलिन वाद्यांच्या सुरावटीतून याची प्रचिती घेता येते. अर्थात त्याकाळच्या एकूणच सगळ्या संगीत रचना बघता, अशा प्रकारे वाद्यमेळ रचणे, हा नवीन प्रयोगच होता. गाण्याची चाल देखील कवितेच्या आशयाशी पूर्णपणे तद्रूप झालेली आढळेल. तालाला तबला आणि पाश्चात्य बोन्गो ही तालवाद्ये आहेत. गाण्यात २ अंतरे आहेत आणि त्याची समान तत्वावर बांधणी केली आहे. गाण्यातील ताल फार सुंदर वापरला आहे. मुखडा किंवा अंतरा संपताना, शेवटची "मात्रा" विशेष वजनाने घेतली असल्याने त्याला एक वेगळेच वजन प्राप्त होते. तसेच दुसरा अंतरा सुरु होण्याआधी, व्हायोलिनवरील एक छोटी "गत" चालू असताना आणि संपत असताना त्यात ज्याप्रकारे स्वरांची "वळणे" घेतली आहेत, तशा प्रकारचा स्वराकाश मराठीत फारच अभावानेच  ऐकायला मिळतो. मघाशी मी पाश्चात्य संगीताचा उल्लेख केला तो इथे नेमकेपणाने ऐकायला मिळतो. खरेतर हे एकप्रकारे "फ्युजन" म्हणता येईल परंतु अंधपणा नव्हे. एक  नक्की,या गाण्याने मराठीत एक नवीन " पायवाट" निर्माण झाली. 
गायक रवींद्र साठे यांची ठाम ओळख या गाण्याने झाली असे म्हटले तर फार चुकीचे ठरू नये. आपल्या नावावर एखादी तरी अशी स्वररचना असावी तिथे त्याच्यावर आपली नाममुद्रा कायम स्वरूपी उमटलेली असावी, असे स्वप्न बऱ्याच जणांचे असते. अर्थात असे  होणे,ही दीर्घ कारकिर्दीच्या दृष्टीने मर्यादा देखील होऊ शकते. स्वच्छ, गंभीर प्रकृतीचा गळा तसेच तिन्ही सप्तकात वावर करण्याची क्षमता ही खास वैशिष्ट्ये मांडता येतील. याच गाण्यापुरते लिहायचे झाल्यास, पहिल्या अंतऱ्यातील तिसरी ओळ - "जीवनाशी घेती पैजा घोकून, घोकून" एकदम वरच्या स्वरांत घेतली आहे. तोपर्यंत गायन हे खालच्या पट्टीत चाललेले आहे. असे एकदम वरच्या पट्टीत सहजपणे आवाज  लावणे,हे कौशल्याचेच काम आहे. तिथे जाताना आवाज कुठेही चिरकत नाही तर तसाच स्वच्छ, निर्मळ लागतो. दुर्दैव असे इतक्या अवघड लयीचे गाणे यशस्वी गाउनही, आज त्यांच्या नावावर फार काही रचना दिसत नाहीत. ललित संगीतात एक नवा मानदंड या रचनेने निर्माण केला आणि तो यशस्वीपणे रुजवला, हेच खरेतर या गाण्याचे मोठे यश आहे. 


कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे 

कशासाठी उतरावे तंबू ठोकून 
कोण मेले कुणासाठी रक्त ओकून ? 
जगतात येथे कोणी मनात कुजून !
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे ?

दीप सारे जाती येथे विरून, विझून 
वृक्ष जाती अंधारात गोठून, झडून 
जीवनाशी घेती पैजा घोकून, घोकून 
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे !

अंत झाला अस्ताआधी, जन्म एक व्याधी 
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी 
कोण देते हळी, त्याचा पडे बळी आधी 
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे



Thursday 8 August 2019

रिमझिम झरती श्रावणधारा

मराठी भावगीत प्रांगणात अशी असंख्य गाणी तयार झाली ज्या गाण्यांत काहीही "बौद्धिक" नाही, काहीही प्रयोगशील नाही पण तरीही निव्वळ साधेपणाने त्या रचनांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. विशेषतः आकाशवाणीवर "भावसरगम" कार्यक्रम सुरु झाला आणि अनेक विस्मरणात गेलेल्या कवींच्या शब्दरचना असोत किंवा अडगळीत गेलेले संगीतकार असोत किंवा बाजूला पडलेल्या गायक/गायिका असोत, अनेक कलाकारांना अपरिमित संधी मिळत गेल्या आणि त्यांनी त्या संधीचे काहीवेळा सोने केले. ललित संगीतात रचना करताना, नेहमीच अभूतपूर्व काही घडते असे अपवादानेच घडते, खरेतर कुठल्याही कलेच्या क्षेत्राला हे विधान लागू पडते. असामान्य असे नेहमीच तुरळक असते तरीही निव्वळ साधेपणाचा गोडवा देखील तितकाच विलोभनीय असतो. यात एक गंमत असते, बहुतेक तथाकथित चोखंदळ रसिकांना वाटते, ज्या रचनेत काही "बुद्धिगम्य" नाही ती रचना टुकार असते!! जणू काही साधी, सोपी रचना करणे हे सहजसाध्य असते. खरंच तसे आहे का? 
आजचे आपले गाणे असेच साधे, सरळ गाणे आहे. कविता मधुकर जोशी यांची आहे. कविता नीट वाचली तर त्यात काही अगम्य नाही. किंबहुना, "धरतीच्या कलशात" सारखी थोडी सरधोपट प्रतिमा आहे. विरहणीची व्याकुळता आहे, प्रियकराची वाट बघणे आहे पण तसे दर्शविताना शब्दकळेत काहीही नावीन्य नाही किंवा शाब्दिक चमत्कृती नाही. वाचायला मिळतो तो केवळ आणि केवळ थेटपणा. थोडा विचार केला तर ललित संगीतातील कवितेत असा "थेटपणा" असणे एकादृष्टीने चांगलेच असते. रसिकांचे सगळे लक्ष हे स्वराकृतीकडे लागते. मुळात, प्रत्येक कलाकृतीत काहीतरी "वेगळेपण" असावे हा अट्टाहास का असतो? "कमळमिठीमध्ये भृंग भेटता" ही कालिदासांची कल्पना पण तरीही इथे चपखल बसली आहे. यात नावीन्य तसे काहीही नाही परंतु प्रत्येक गाण्याच्या चालीचा स्वतंत्र असा "मीटर" असतो आणि त्यानुरूप कविता असावी, असे संगीतकाराला नेहमी वाटत असते आणि इथे तसेच झाले आहे. आशय म्हणून बघायला गेल्यास, पावसाच्या धारांनी निर्माण झालेल्या वातावरणात, आपल्या प्रियकराने आपल्या जवळ असावे, ही भावना मांडली आहे पण त्याचबरोबर पावसाने सतत बरसत रहावे अशी अपेक्षाव्यक्त केली आहे!! हा थोडा विरोधाभास वाटतो. प्रियकर आल्यावर पावसाने संततधार धारावी, जेणेकरून प्रियकर परत जाणार नाही, हे म्हणणे योग्य आहे. 
संगीतकार दशरथ पुजारी हे नाव मराठी भावगीत संगीतात मान्यताप्राप्त झालेले नाव. जे मत कवितेबाबत मांडले आहे तेच मत स्वररचनेबाबत मांडता येते. ओठांवर सहज रुळणाऱ्या चाली या संगीतकाराने निर्माण केल्या. "सारंग" रागावर आधारीत स्वररचना आहे.खरतर रागाचे स्वर फक्त आधाराला घेतले आहेत. स्वरचनेचा विचार करायचा झाल्यास, "प्रियाविण उदास वाटे रात" ही ओळ मुद्दामून ऐकण्यासारखी आहे. मुखड्याची पहिली ओळ काहीशी आनंदी स्वरांत आहे पण लगेच दुसऱ्या ओळीतील उदासवाणा भाव तितक्याच प्रत्ययकारी पद्धतीने घेतलेला आहे. तसेच पुढील रचना ऐकताना " आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात " ही ओळ स्वरांत मांडताना, "अंधारात" शब्द तितक्याच आर्ततेने घेतला आहे. ललित संगीत हे असेच खुलत जाते. वाद्यमेळ प्रामुख्याने बासरी आणि सतार या वाद्यांनी खुलवला आहे. अंतरे मात्र मुखड्याच्या स्वररचनेला समांतर असे बांधले आहेत पण एकूणच चालीची जातकुळी बघता ती तशीच असणे योग्य वाटते. या संगीतकाराचे मूल्यमापन करायचे झाल्यास, त्यांच्या रचनांचे खास लक्षण असे की त्यात वाद्यरंग आकर्षक असतात. सर्वसाधारणतः वाद्यरंगात भिडलेले आणि काहीशी द्रुत लय पसंत करणारे, मुख्यतः वाद्यवृंदाच्या व गतिमान लयबंधांच्या साहाय्याने गीताची उभारणी करतात. संगीतकार आपल्या रचनेचा जाणीवपूर्वक असा रोख ठेवतात की रचना निदान काही प्रमाणात तरी सुरावटीकडे झुकलेली असावी. याचा एक परिणाम असा  झाला,त्यांच्या रचनांचे मुखडे कायम लक्षात राहतात. मी  वरती, "अंतरे समान बांधणीचे बांधले आहेत",  या विधानाला वरील विवेचन पूरक आहे. त्यामुळे गीत साधे असले तरी त्याची खूण मनात रेंगाळत राहते. यामधून एक नक्की सिद्ध होते, या संगीतकाराने "आपण काही नवीन देत आहोत" असला आव कधीही आणला नाही. साध्या, सामान्य श्रोत्यांसाठी रचना करण्यात समाधान मानले. अर्थात भारतीय संगीतपरंपरेत वाढलेला साधा श्रोता देखील संतुलित असतो आणि त्याची सांगीतिक गरज अशाच रचनांतून भागू शकते. 
अगदी स्पष्टपणे मांडायचे झाल्यास, या गाण्यावर गायिका सुमन कल्याणपूर यांच्या गायकीचा निर्विवाद हक्क पोहोचतो. सुरेल आणि स्वच्छ गायकी तसेच श्रोत्यांपर्यंत स्वररचना थेटपणे पोहोचवण्याची हातोटी ही खास वैशिष्ट्ये सांगता येतात. मुळात आवाजात कुठेही कसल्याच प्रकारचा भडकपणा नसल्याने, गायनात एकप्रकारची शालीनता नेहमी डोकावते. संयत अभिव्यक्ती, हे तर या गायिकेचे वैशिष्ट्य म्हणता येईल आणि प्रस्तुत रचना बघता, अशाच गायनाची आवश्यकता होती. याचाच परिणाम या गायनातून विस्तीर्ण असा भावपट धुंडाळता येतो. अर्थात असे असूनही ही गायिका प्रामुख्याने मराठी भावसंगीतापुरतीच सीमित राहिली, हे दुर्दैवच म्हणायला हवे. 

रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात 
प्रियाविण उदास वाटे रात 

बरस बरस तू मेघा रिमझिम 
आज यायचे माझे प्रियतम 
आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात 

प्रासादी या जिवलग येता 
कमळमिठीमध्ये भृंग भेटता 
बरस असा की प्रिया न जाईल माघारी दारात 

मेघा असशी तू आकाशी 
वर्षातून तू कधी वर्षसी 
वर्षामागून वर्षती नयने करती नित बरसात 



Monday 5 August 2019

कुब्जा

एका दृष्टीने मला इंदिरा बाईंची "कुब्जा" ही कविता फार विलक्षण वाटते. वास्तविक, "कुब्जा" हे व्यक्तिमत्व पुराणकाळातील, काहीसे दुर्लक्षित झालेले, किंबहुना दोन, चार प्रसंग वगळता फारसे महत्व नसलेली व्यक्तिरेखा. असे असून देखील तिचा प्रभाव महाभारताच्या संपूर्ण कथेत जाणवतो. अर्थात ही किमया महाभारतकारांची!!
"अजून नाही जागी राधा,
अजून नाहीं जागें गोकुळ;
अशा यावेळी पैलतीरावर
आज घुमे का पावा मंजुळ;
मावळतीवर चंद्र केशरी;
पहाटवारा भवती भणभण;
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकुन आपुलें तनमन.
विश्वच अवघे ओठा लावून
कुब्जा प्याली तों मुरलीरव;
डोळ्यांमधून थेंब सुखाचे :
हें माझ्यास्तव... हें माझ्यास्तव..."
ही कविता वाचताना, आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, कवितेत वापरलेल्या प्रतिमा आणि त्या प्रतिमांमधून साधली गेलेली कविता. इंदिराबाईंच्या कवितेतील विचार आपल्याला स्वतंत्रपणे करायला लावणारी ही कविता. तसे बघितले विस्ताराच्या दृष्टीने या कवितेत प्रतिमाविश्व अतिशय मर्यादित आहे. त्या प्रतिमा, त्यांच्या स्थायीभावाच्या जाणिवेने मर्यादित केले आहे. सरत्या रात्रीची वेळ आणि त्यावेळी भणाणणारा वारा!! या वातावरणाच्या भोवती दिसणारा केशरी चंद्र, कवितेतील वातावरण निर्मिती, हा वेगळा शाब्दिक खेळ असतो. प्रतिमा मोजक्या शब्दात मांडावी आणि मांडताना त्यातील आशय अधिक विस्तारित व्हावा!! हेच इथे नेमकेपणा आपल्याला वाचायला मिळते.
संवेदनानुभवातील उत्कटता हे त्या स्थायीभावातील अंगीभूत ताणांचे आणखी एक लक्षण. अनुभव संवेदनांतून जाणवल्याखेरीज तो अनुभव म्हणून प्रतीत होत नाही. पण त्यातही संवेदनाविश्व एका विशिष्ट उत्कटतेच्या पातळीवर गेल्याशिवाय ते संवेदनाविश्वही जाणवत नाही. त्या दृष्टीने, सपक, सामान्य पातळीवरील संवेदनाविश्व इंदिरा बाईंच्या कवितेत फारसे कधी आढळत नाही. या कवितेत, अर्थातच निसर्गरूपे आहेत पण ती सहजपणे डोळ्यासमोर दिसणारी नाहीत. आपल्या भाववृत्तीच्या स्पंदनांचे प्रतिबिंबच असे निर्माण केले जाते. अतिशय अरुप अशा भाववृत्तीने जाणवणाऱ्या निसर्गाचे रूप या कवितेत आढळते.
कवितेत प्रतिमा आढळणे आणि त्यातून मूळ आशय वृद्धिंगत होत जाणे, हे भावकवितेचे व्यवच्छेदक लक्षण मानावेच लागेल. बरेचवेळा प्रश्न पडतो, वापरलेली प्रतिमा, मूळ भावनेचा आशय अधिक अंतर्मुख होऊन व्यक्त होते की मूळ भावनेला गुदमरवून टाकते? नाकापेक्षा मोती जड, हे तत्व इथे देखील लागू पडते. प्रतिमासंयोजन म्हणजे तरी काय? जीवनात अनेक अनुभव आपणांस येतात. त्यातील काही संवेदनाद्वारे स्वतः:ला आलेले, काही कल्पनेने जाणवलेले तर काही वैचारिक स्वरूपाचे असतात. काहीवेळा मिश्र अनुभव देखील येऊ शकतात. यातीलच कुठल्याही एकाच्या किंवा एकत्रित अनुभवांचा अर्कभूत परिणाम म्हणजे भाववृत्ती!! तिच्याशीच खऱ्याअर्थाने भावकवितेला नाते जोडता येते आणि ते नाते, प्रतिमांच्या द्वारे सखोल होत जाते.
"कुब्जा" कवितेत, हेच नात्यांचे ताणेबाणे बघायला मिळतात. या कवितेत, इंदिरा बाईंच्या प्रतिमांना ताकद मिळते, टी संवेदनाविश्वाच्या भरीव आणि निकट अशा जाणिवेमुळे. कवितेच्या पहिल्या कडव्यात राधेचा उल्लेख आणि त्याबरोबर "गोकुळ" आणि "मंजुळ पावा" या प्रतिमा आपल्या मनात एक "जमीन" तयार करतात. पुराणकथेचा आधार घेतला तर कुब्जेने विषाचा प्याला घेऊन जीवन संपविले होते. या कृतीचे वर्णन करताना,
" विश्वच अवघे ओठा लावून
कुब्जा प्याली तों मुरलीरव;"
किती समर्पक शब्दयोजना आहे. कृष्णाचे नाव देखील कुठे घेतलेले नाही पण "मुरलीरव" या प्रतिमेतून कृष्ण तर उभा राहिलाच पण त्याच बरोबर, "विश्वच अवघे ओठा लावून" या कृतीने आपले अव्यक्त प्रेम व्यक्त केले आहे. बरे, तिची कृती "प्याला पिण्या" इतपत नसून, विष पिताना देखील डोळ्यातून सुख सांडत आहे आणि नुसते सांडत नसून ती भावना केवळ माझीच आहे, हे अधिक महत्वाचे आहे.इथे सगळी कविता कुब्जेची होते आणि सुरवातीची राधा पूर्णपणे लुप्त होते. शेवटच्या कडव्यात जो ताण आहे, तिचा प्रत्यय म्हणजेच भाववृत्तीची जाणीव.

Friday 2 August 2019

मग माझा जीव

सर्वसाधारणपणे उर्दू भाषिक गझला या बऱ्याच प्रमाणात प्रायोगिक असतात म्हणजे,  एखाद्या कलाकाराची, मग ती अति प्रसिद्ध चाल असली तरी देखील, दुसरा कलाकार आपल्या मगदुराप्रमाणे वेगळ्या चालीत तीच गझल सादर करीत असतो. काहीवेळा तर संपूर्ण वेगळी स्वररचना तयार केली जाते. हातात असलेल्या शायरीचा भावार्थ वेगळेपणाने टिपून, नवी चाल निर्माण करणे, बरेचवेळा घडत असते. त्यामानाने मराठीत असे फारसे घडत नाही. काही रचना अपवाद आहेत पण एकूणच प्रमाण अपवादस्तरावरच आहे. आजचे आपले गाणे असेच अपवाद म्हणून गणले जाईल. 
सुरेश भटांच्या या कवितेला प्रथम संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी लताबाईंच्या स्वरबद्ध केले आहे. पुढे हीच कविता, प्रसिद्ध कवी सुधीर मोघ्यांनी वाचली आणि त्यांनी याच कवितेला नव्याने चाल लावली आणि श्रीकांत पारगावकरांकडून गाऊन घेतली. या चालीच्या निमित्ताने कवी सुधीर मोघे, संगीतकार म्हणून अधिक प्रकाशात आले. प्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या बहुसंख्य कविता या "गीत" तत्वावर आधारित लिहिलेल्या असतात. कविता वाचतानाच त्यातील "लयीची" कल्पना येते. आजच्या मुक्तछंदाच्या काळात, छंदोबद्ध कविता काहीशी मागे पडली आहे. खरतर "मराठी गझलकार" म्हणून सुरेश भट यांचे नाव प्रसिद्ध झाले असले तरी "गझल" छंदांव्यतिरिक्त इतर छंदात देखील त्यांनी बऱ्याच अनुपमेय कविता केल्या आहेत. प्रस्तुत कविता ही गज़लेच्याच वजनात तरीही भावगीत स्वरूपात लिहिलेली कविता आहे. सुरेश भटांच्या कवितेत शब्द हे नेहमीच फार चोखंदळ वृत्तीने अवतरतात, काहीशा भोगवादाच्या अर्थाने येतात. शब्द नेहमीच्याच परिचयातले असतात परंतु ज्याप्रमाणे उर्दू शायरीत बरेचवेळा अचानक चमकदार प्रकारे शब्द समोर येतात आणि आशयाची उलटापालट होते आणि वाचणारा काहीसा चमकतो, तेच तत्व सुरेश भटांच्या कवितेत आढळते. "वाटेवर वणवणेल", "ज्योतीसह थरथरेल" किंवा "अंगणात टपटपेल" इत्यादी शब्दजोड स्वतंत्रपणे कुठेही अगम्य नाहीत परंतु एकत्रितपणे वाचायला मिळतात, तेंव्हा आपल्याला नव्या अनुभूतीची जाणीव होते. खरतर मुळातली कविता अजून दीर्घ आहे परंतु ललित संगीताचा आकृतिबंध हा मर्यादित असल्याने संगीतकार नेहमीच अशावेळी त्याला अधिक भावणाऱ्या ओळींची निवड करतो - तशी निवड करावीच लागते. 
सुधीर मोघे हे नाव मराठी कलेच्या प्रांगणात प्रामुख्याने "कवी" म्हणून ख्यातकीर्त आहे. "पक्षांचे ठसे" पासून अनेक वर्षे सुधीर मोघे हे कविता लिहीत होते. मी मघाशी म्हटल्याप्रमाणे आधुनिक काळात छंदोबद्ध कविता करणाऱ्या मोजक्या कवींपैकी हे नाव एक नाव होते. अर्थात कवी म्हणून नाममुद्रा झाली तरी संगीताचे पायाभूत शिक्षण न घेता, त्यांनी संगीत क्षेत्रात थोडीफार मुशाफिरी केली. "माझे मन तुझे झाले" सारखी रम्य स्वररचना त्यांच्या नावावर आहे आणि त्याच "यमन" रागात त्यांनी ही आणखी एक रचना सादर केली आहे. "यमन" राग कसा सगळ्या संगीतकारांना भारून टाकतो, याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. मुळात कविताच इतकी अप्रतिम आहे की त्याला स्वरबद्ध  करताना, वाद्यमेळाचा भरमसाट उपयोग करण्याची आवश्यकताच वाटत नाही. तालवाद्य म्हणून "तबला" तर स्वरवाद्य म्हणून प्रामुख्याने "बासरी" वापरली आहे. जेंव्हा एखादा कवी संगीतकाराच्या भूमिकेत शिरतो तेंव्हा अर्थाने अर्थानुकूल स्वररचना आपल्या समोर येणार, याचा अंदाज करता येतो. रचनाकाराच्या दृष्टीने बघायला गेल्यास, तिसरा अंतरा "जेंव्हा रात्री कुशीत" सारखी शब्दकळा येते तिथे स्वररचना वेगळी केल्याचे ध्यानात येते. अर्थात, रात्रीचा समय आणि कुशीत येणे अशी प्रणयानुकूल अवस्था लक्षात  घेता,चाल एकदम हळुवार होते. स्पष्टच लिहायचे झाल्यास, मुखड्याची चाल आणि हा अंतरा यात फरक फरक पडला आहे पण आशय व्यक्त होण्यात कुठेही किंतु निर्माण होत नाही.  
चाल म्हणून स्वतंत्रपणे ऐकली तर साधी, सरळ आणि सोपी आहे . कुठेही गुंतागुंतीच्या रचना ऐकायला मिळत नाहीत पण त्याची फारशी जरुरीची भासत नाही. गुंतागुंतीची स्वररचना करणे, हे एक सर्जनशीलतेचे लक्षण मानायला हवे पण आवश्यक मानदंड नव्हे. आपल्याकडे हा एक विचार अधिक प्रबळ आहे (कारण नसताना) चाल अवघड असेल तरच ती बुद्धीगामी म्हणावी. याचाच वेगळा अर्थ असा मांडता येईल, या टीकाकारांना साधी चाल बांधणे किती अवघड असते, याचा अवकाश कळलेला नसतो. 
श्रीकांत पारगावकर यांचा गायक म्हणून विचार करताना, अत्यंत सुरेल गळा, छोट्या हरकती अचूकपणे घेण्याचे कसब इत्यादी बाबी लक्षात येतात. थोडक्यात ललित संगीताला आवश्यक असा गळा आहे परंतु लोकप्रियतेच्या स्पर्धेत मागे पडला आहे. शक्यतो मंद्र आणि शुद्ध स्वरी सप्तकात गायचे, असा विचार दिसतो. इथे काहीशा हळव्या आठवणीतील रचनेत असा गळा शोभून दिसतो. तारता पल्ला फार विस्तृत नाही फार तर दीड सप्तक एकाचवेळी घ्यायची, इतपतच रेंज दिसते पण कुठेही चाचपडणे नाही. सलग हरकत घेणे अवघड जात नाही. असे असून देखील नाव का मागे पडले? हा प्रश्नच आहे. 

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल ! 
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल !

सहज कधी तू घरात; 
लावशील सांजवात;
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल !

जेंव्हा तू नाहशील 
दर्पणात पाहशील 
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल !

जेंव्हा रात्री कुशीत,
माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतून गुणगुणेल !

मग सुटेल मंद, मंद 
वासंतिक पवन धुंद ;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल !