Showing posts with label Cricket. Show all posts
Showing posts with label Cricket. Show all posts

Sunday, 12 May 2024

विश्वनाथ - मेलबर्न - १९८१

काही फलंदाज हे केवळ *स्वयंप्रकाशी* नसून चैतन्याचा नवनवीन आविष्कार घडवीत असतात. ते जेंव्हा मैदानावर असतात, तेंव्हा सगळ्या प्रेक्षकांचे आकर्षण बिंदू असतात, जणूकाही मैदानावर फक्त त्यांचेच अस्तित्व भासावे. त्यांच्या खेळातील लयकारी ही फक्त त्यांचीच असते. विश्वनाथ तसा बुटक्या चणीचा पण एकदा का लय सापडली की तिथे फक्त त्याचेच स्वामित्व असायचे. विश्वनाथच्या कारकिर्दीचे अत्यंत महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, जेंव्हा केंव्हा त्याने शतकी खेळी साकारली (त्याची शतकी खेळी बघणे, हा नयनरम्य सोहळाच असायचा) त्या प्रत्येक वेळी, एकतर भारत सामना जिंकला होता किंवा अतिशय सन्मानाने अनिर्णित ठेवला होता. एका दृष्टीने, विश्वनाथ हा ख-या अर्थाने match winner होता! असे खेळाडू फार दुर्मिळ असतात आणि अशाच खेळाडूने, १९८१ च्या Australia मालिकेत, वर दर्शविलेली असामान्य खेळी साकारली आणि पुढे कपीलला गोलंदाजीसाठी मैदान मोकळे ठेवले. मेलबर्नची खेळपट्टी ही पहिल्याच दिवसापासून *आखाडा* झाली होती. प्रतिस्पर्धी संघात त्यावेळी *लिली, पास्को आणि Hogg* सारखे प्रलयंकारी गोलंदाज होते. लिली जरी १९७१ वेळेचा वेगवान गोलंदाज नसला तरी त्याच्या भात्यात, अनुभवाच्या जोरावर बरीच आयुधे होती जेणेकरून समोरील फलंदाज, त्याला निमुटपणे शरण जात असत. बाकी दोघे तर तरूण आणि प्रचंड वेगवान गोलंदाज होते. सिडनीच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात, संदीप पाटीलने, पास्कोचा वेग अनुभवला होता. खेळायला लागणारा चेंडू किती आणि कसा उसळेल, याची खुद्द गोलंदाजाला देखील पूर्ण कल्पना नव्हती. भारताची सुरवात अत्यंत डळमळीत झाली. सुनील, चौहान, दिलीप फक्त *हजेरी* लावून परतले होते. एकतर, सिडनेचा सामना, भारत हरला होता आणि त्या पराभवाची पुनरावृत्ती होते की काय, अशी पाल चुकचुकायला लागली होती. मालिकेचा *हिरो* संदीप आणि विशी, एकत्र आले. When things go tough, player gets more tougher,  याची चुणूक दिसायला लागली. विशीने आपली कलाकारी पेश करायला सुरुवात केली. लिलीने किंचीत आखूड टप्प्याचा आऊट स्विंगर टाकला आणि विशी च्या मनगटाने, *स्क्वेअर ड्राइव्ह* मारून, ताटात पुढे काय वाढून ठेवले जाणार आहे, याची झलक दाखवली. वास्तविक पहाता, विशीने काय केले, चेंडू उसळत असतानाच, आपली बॅट उजव्या खांद्यावर अनंत, उजवा पाय ऑफ स्टम्पजवळ आणून, उसळणाऱ्या चेंडूला *स्क्वेअर पॉईंट* दिशेने भिरकावून दिला. लिलीसारख्या गोलंदाजाला अशी वागणूक मिळणे, हे सहन होण्याच्या पलीकडचे, विशेषतः एखाद्या भारतीय संघातील खेळाडूकडून!! त्यावेळी विश्वनाथ आपल्या खेळीला *आकार* देण्यात मग्न होता. पदलालित्य दिसायला नुकतीच सुरवात झाली होती आणि एक अजरामर खेळी सुरु व्हायला लागली होती. जरा वेळाने, पास्कोला याच मनगटाची चुणूक दिसणार होती. *लेट कट* हा फटका (वास्तविक हा रूढार्थाने फटका नव्हे तर चेंडूला दिलेली दिशा होय) अतिशय धोकादायक म्हणता येईल. चेंडूचा अंदाज जरा देखील चुकला तर स्लिपमध्ये झेल जाण्याची शक्यता अधिक.  पास्कोने आखूड टप्प्याचा चेंडू टाकला पण म्हणावा तितका उसळला नाही. विश्वनाथला याचा अंदाज आला (असा अंदाज येणे, इथेच खरा अनुभव कामाला येतो) आणि उजवा पाय ऑफ स्टम्पकडे आणला आणि चेंडूला स्लिपमधील गॅपमधून दिशा दिली!! निव्वळ मनगटी कौशल्य आणि वेळेचा ताळमेळ राखलेला. अर्थात क्रिकेट हा खेळ कायम वेळेशी गणित मांडून खेळला जातो. चेंडूला किंचित स्पर्श केले आटो आणि तितकीच गरज असते, ताशी १४०+ वेगाने येणाऱ्या चेंडूला, दंडातील ताकदीची गरज नसते.क्रिकेटमधील काही नयनरम्य स्ट्रोक्स पैकी हा स्ट्रोक. गोलंदाज आणि स्लिपमधील क्षेत्ररक्षकांचा अंदाज चुकणार, हा *भुलभुलैय्या* आहे. असाच एक फटका, त्याने पुन्हा लिलीला दाखवला. चेंडू किंचीत लेग स्टंपच्या दिशेने टाकलेला होता आणि क्षणार्धात पुन्हा उजवा पाय मागे सरकवून, पॅडवर येणाऱ्या चेंडूला *फाईन लेग* दिशेने दिशा दाखवली. चेंडू वाऱ्याच्या वेगाने सीमापार!! तरुणीच्या चेहऱ्याचे जे *आरस्पानी* सौंदर्य असे वर्णन केले जाते, तसेच सौंदर्य या फटक्यात दिसते. विशीचा खेळ आक्रमक होता, प्रसंगी धोकादायक वाटावा, असा होता पण तीच त्याची शैली होती. त्यामुळे त्याची हुकलेली शतके, अगदी नव्वदीत प्रवेश केल्यानंतरची शतके देखील बरीच सापडतात. अर्थात शतक हुकले, याची त्याला कधीच खंत नसायची. सुनीलला *टेक्निशियन* आजही मानले जाते. *फॉरवर्ड डिफेन्स* बघावा तर सुनीलचा. असे असून देखील विषयी त्या कलेत कुठेही कमी नव्हता. आपण शतकी खेळीचे वर्णन करताना, आपल्याला *सोडून दिलेले चेंडू* किंवा *नुसतेच बचावात्मक* खेळलेले चेंडू, गृहीत धरतच नाही, किंबहुना विस्मृतीत ढकलतो पण त्यामुळेच शतकी खेळीला जास्त मोल येत असते. या शतकी खेळीत, त्याने आपले *तंत्र* किती समृद्ध आहे, याची जाणीव करून दिली. *आखाडा* खेळपट्टीवर खेळताना, तंत्राची गरज अतिशय असते. लिली तसेच पास्कोचे कितीतरी चेंडू, विकेटकीपरकडे शेवटच्या क्षणी सोडून देण्यात, त्याचा अंदाज तितकाच अवर्णनीय होता. शेवटपर्यंत चेंडूवर नजर कायम ठेवायची आणि अखेरच्या क्षणी बॅट काढून घ्यायची आणि गोलंदाजाला हतबल करायची, ही कला देखील तितकीच मनोहारी म्हणायला लागेल. संपूर्ण सामन्यात हेच एकमेव शतक लागलेले. ऑस्ट्रेलिया संघात त्यावेळी, ग्रेग चॅपेल, डग वॉल्टर्स, बॉर्डर सारखे जगद्विख्यात फलंदाज होते पण खेळपट्टीवर,दोन्ही इनिंगमध्ये टिकता आले नाही.अर्थात दुसरी इनिंग तर ८३ धावात आटोपल्याने, शतकी खेळीचा प्रश्नच उभा राहिला नाही. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या खेळीत, कपिलने ६ बळी घेऊन, सामन्यावर आपला ठसा उमटवला, हे खरेच आहे पण कपिलला, तसे मोकळे मैदान, विशीच्याच शतकी खेळीने निर्माण करून दिले, हे देखील लक्षात ठेवायला हवे. याच सामन्यात सुनीलच्या कारकिर्दीतील अत्यंत अप्रिय प्रसंग घडला. पण तो वेगळ्या लेखाचा विषय आहे. विशीने शतक लावले आणि भारताने, सामना सन्मानजनक जिंकला आणि मालिका बरोबरीत सोडवली. 

Tuesday, 25 April 2023

सचिनची पन्नाशी - एक आढावा

कुठल्याही कलाकार, खेळाडूच्या निर्मितीचे विश्लेषण करायचे झाल्यास, ती व्यक्ती निवृत्त झाल्यावर किंवा उत्तर वयाला लागल्यावर केल्यास, तुमच्या लिखाणात वस्तुनिष्ठ दृष्टीचा प्रभाव दिसून येऊ शकतो. ती व्यक्ती जेंव्हा भरात असते तेंव्हा लोकमानस तसेच एकूणच त्याच्या निर्मितीचा प्रभाव तुमच्यावर पडू शकतो/पडतो. परिणामी तुमचा विचार एकांगी ठरण्याची शक्यता अधिक. विशेषतः ती व्यक्ती जर का खेळाडू असेल तर खूप सुकर होते. खेळातून निवृत्त झालेली असते, आणि आता नवीन निर्मिती अशक्य असते, त्यामुळे विचक्षण दृष्टीने तुम्ही एकूण कारकिर्दीचे अवलोकन करू शकता. आज हे लिहायचे कारण म्हणजे कालच सचिनची पन्नाशी देशभर साजरी झाली. आजमितीस कुना खेळाडूच्या वाट्याला असे भाग्य फार क्वचित आले असावे, विशेषतः भारतीय खेळाडूच्या संदर्भात तर अधिक जाणवते. सचिनची कारकीर्द २४ वर्षांची झाली . इतकी लांबलचक कारकीर्द खचित कुणा खेळाडूच्या वाट्याला आली असेल. अर्थात इतकी कारकीर्द लांबवण्यासाठी, तुमच्याकडे दृढनिश्चय तसेच आत्मविश्वास असावाच लागतो. आता इतकी दीर्घ कारकीर्द म्हटल्यावर त्या कारकिर्दीत चढ-उतार असणे क्रमप्राप्तच ठरते. खरंतर कुणाही कलाकाराचे श्रेष्ठत्व ठरवताना, त्याने आयुष्यात कितीवेळा शिखरे गाठली? हा निकष ठेवावा. एक तर नक्कीच, कुठलाही खेळाडू हा सातत्याने अत्युत्तम खेळ करूच शकत नाही. मानवी प्रयत्नांना नेहमीच मर्यादा असतात परंतु आपल्या मर्यादा जाणून घेऊन, आपल्या खेळात सतत सुधारणा करण्याचा ध्यास घेऊन,कारकीर्द सजवणे, हा एक खेळाडू म्हणून अवलोकनाचा भाग असतो. प्रत्येक खेळाडूला या चक्रातून जावेच लागते आणि इथे मग कधीतरी त्या खेळाडूवर Bad Patch येतो. खेळाडूची कसोटी इथेच लागते कारण अशा परिस्थितीत तुमच्या कडून आवश्यक असा खेळ होत नसतो आणि मानसिक कुचंबणा वाढू शकते. निर्धार अशाच वेळी उपयोगी पडतो. आता सचिनच्या कारकिर्दीकडे जवळून बघितल्यास, वयाच्या १६व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण म्हणजे स्वप्नावस्था म्हणता येईल. त्यातून त्याला इम्रान, वकार आणि अक्रम,असा तेजतर्रार माऱ्याला सामोरे जावे लागले. लोकांना याचेच औत्स्युक्य कायम वाटत आले. खरतर एकदा का तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर उतरलात की वयाचा मुद्दा गौण ठरतो. तुम्ही १६ वर्षाचे आहेत म्हणून कुणीही तुमच्याशी लुटुपुटुचा खेळ खेळत नाही. तिथे संहारक गोलंदाजीचा सामना करावाच लागतो. त्यातून त्या मालिकेतील शेवटच्या कसोटीत, वकारचा एक चेंडू अचानक उसळून, सचिनचे नाक फुटले!! वास्तविक आत्मविश्वास खच्ची व्हायचा हा क्षण पण इथेच सचिनचा मनोनिग्रह दिसला आणि पुढे खेळ चालू ठेवला. एक खेळाडू म्हणून हे स्फूर्तिप्रद होते आणि त्याचे कौतुक होणे रास्त होते. प्रश्न असा, कितीवेळा हा प्रसंग उगाळून सांगायचा? क्रिकेटमध्ये चेंडू लागून जखमी होणे, ही नित्याची बाब असते. सचिनच्या कारकिर्दीचे जवळून निरीक्षण केल्यावर, मला स्पष्टपणे, २००३ पर्यंतचा सचिन आणि पुढे १० वर्षांची कारकीर्द असे २ भाग पाडावेसे वाटतात. २००३ पर्यंतचा सचिन हा बेडर, साहसी नि आक्रमक फलंदाज होता. पुढे त्याने आपली शैली बदलली आणि वाढत्या वयानुसार नव्या शैलीचा अवलंब केला. १९९८ मधील शारजातील त्याच्या २ खेळी आजही अंगावर काटा आणतात. हाच मुद्दा पुढे खोलवर आणायचा झाल्यास, विशेषतः कसोटी सामन्यात सचिनकडून, त्याच्याच समकालीन ब्रायन लारा किंवा Steve Waugh खेळाडूंनी ज्याप्रकारे कसोटी सामन्यावर सातत्याने छाप उठवली आणि आपल्या संघाला पराभवाच्या खाईतून विजयाकडे नेले, अशा खेळी, विशेषतः २००३ नंतर फारशा आढळत नाहीत. बार्बाडोस इथे लाराने दुसऱ्या इनिंग मध्ये नाबाद १५३ काढून, संघाला अक्षरश: ऑस्ट्रेलियाच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला आणि आपली खेळी क्रिकेट इतिहासात अजरामर केली. एक दिवसीय सामन्यात देखील काहीसा असा प्रकार दिसतो. २००६ साली, ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय Common Wealth मालिकेतील अजरामर १०३ आणि ९७ या खेळी वगळता, बहुतेक अंतिम सामन्यात सचिनला आपला प्रभाव पडत आला नाही. २००३ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात, रिकी पॉंटिंगने अफलातून १३८ धावांची खेळी केली आणि संघाची धावसंख्या ३५० पार नेली. त्यावेळी ही धावसंख्या अशक्यप्राय वाटायची परंतु त्याच सामन्यात सचिनने थोडेफार तरी प्रत्युत्तर देणे अपेक्षित होते पण सचिन लगेच बाद झाला. तसेच आपल्या घरच्या विश्वचषक सामन्याच्या अंतिम फेरीत, समोर श्रीलंकेने फक्त २९० धावसंख्येचे आव्हान ठेवले होते परंतु तेंव्हा सचिनने अपेक्षाभंग केला. दुसरे आणखी उदाहरण आठवले. लॉर्ड्स वरील गाजलेला अंतिम फेरीतील सामना आणि गांगुलीने अवघड विजयानंतर काढलेला शर्ट - या सामन्यात सेहवागने घणाघाती ८०+ धावा करून संघाचा पाय रचला होता. पुढे मात्र भारतीय संघाची पडझड झाली आणि त्यात सचिनचा सहभाग होता. पुढे युवराज आणि कैफ, यांनी दैदिप्यमान खेळी करून भारतीय संघाला सामना आणि कप जिंकवून दिला होता. त्याआधी आपला भारतीय संघ काहीवेळा अंतिम फेरीत दाखल व्हायचा पण अंतिम फेरी ओलांडायची करामत करणे अशक्य झाले होते. त्यावेळेस सचिनचे नाव त्रिखंडात दुमदुमत होते पण शेवटचा वार करण्यात सचिन अपयशी झाला होता. २००३ नंतर सचिन फलंदाज पेक्षा जास्त करून Run Accumulator म्हणून अधिक काळ खेळला. विशेषतः कारकिर्दीच्या अखेरच्या काही वर्षांत तर त्याचे रिफ्लेक्सिस खूपच मंद झाले होते. अर्थात ही वेळ सगळ्या खेळाडूंच्या बाबतीत येत असते आणि इथेच खेळाडूने आत्मपरीक्षण करणे गरजेचे असते पण बहुदा सचिन २०० कसोटी सामने खेळायचे, या जिद्दीपोटी खेळत राहिला. २०११ चा विश्वचषक संपल्यानंतरची २ वर्षे (निवृत्त होईपर्यंत) अगदीच केविलवाणी झाली आणि १०० व्या शतकाची वेस ओलांडायला त्याला बांगला देशाच्या सामन्याची वाट बघावी लागली. त्या शतकात शान तर नव्हतीच पण एक प्रकारची मजबुरी दिसत होती. १९९२ च्या ऑस्ट्रेलियाच्या मालिकेत, त्याने पर्थ इथल्या कसोटी सामन्यात निव्वळ अजोड शतक लावले आणि चक्क रिची बेनॉचे मनापासूनचे कौतुक प्राप्त करून घेतले. तशा अद्वितीय खेळी २००३ नंतर फार अपवादस्वरूप दिसल्या. आता असे कारण देता येईल, त्यावेळे त्याला टेनिस एल्बोने ग्रासले होते. विचार करा, हाच सचिन इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया मध्ये असता, तर त्याला खेळायला मिळाले असते का? Steve Waugh २००१ साली निवृत्त झाला तेंव्हा देखील त्याने नाबाद ८५ धावा करून भारताविरुद्ध संघाला सुस्थितीत आणले होते.म्हणजेच त्याचा खेळ विकलांग झाला नव्हता. सचिनने स्वतःच्या बळावर सामना जिंकवून दिला, असे चित्र जितक्या वेळा दिसणे अपेक्षित होते, तितक्या वेळा दिसले नाही, हे महत्वाचे. कारणे अनेक देता येतील. सचिन तर नेहमीच बोलायचं, मला प्रेक्षकांच्या अपेक्षांचे ओझे जाणवत नाही आणि जर का ते खरे असेल तर मग कुठल्या दडपणाखाली, बव्हंशी अंतिम फेरीत लवकर बाद होत असे? १०० वे शतक लागले आणि त्याने प्रथमच कबुल केले, प्रेक्षकांच्या अपेक्षांचे दडपण असल्याने, मी मोकळेपणाने खेळू शकलो नाही. सचिन "माणूस" असल्याचा हा क्षण होता. मला तर असेच वाटते, सुनील गावस्कर वगळता,एकाही भारतीय खेळाडूला निवृत्त कधी व्हावे, हे समजून घेताच आले नाही आणि सन्मानाने निवृत्ती स्विकारता आली नाही. शेवटच्या २ वर्षांत, सचिन विरुद्ध अस्पष्ट का होईना पण निवृत्तीचे सूर ऐकायला येत होते पण अस्पष्ट अशासाठी कारण तोपर्यंत सचिन "देव" झाला होता आणि देव कसा निवृत्त होईल? ही आजारी भारतीय समाजाची मानसिक स्थिती आहे. खेळाडूची इच्छा असो वा नसो, आपला समाज त्याच्या नावाने देवघर तयार करून, त्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात!! असे करण्यात, या समाजाला कसलीच लाज वाटत नाही. मग जगप्रसिद्ध सचिन कसा अपवाद ठरणार!! सचिन खेळायला आला आणि त्याने भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती घडवली. अगदी लहान वयात देखील तुम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरू शकता आणि आपली निर्विवाद छाप सोडू शकता. तसेच भारतीय मुलांना "स्वप्न" बघायला शिकवले. अर्थात स्वप्न बघताना, सचिनने आपले बालपण आणि तारुण्य या खेळासाठी सोडून दिले, हा भाग कुणीच लक्षात घेत नाही. तसेच त्याने किती मेहनत घेतली (निव्वळ दैवी देणगी म्हणून स्वस्थ बसला नाही आणि कुणीही तसे बसत नसते) याचा लेखाजोखा घेतला जात नाही. आपल्याला फक्त सचिनचे लखलखीत यश दिसते पण भारतीय समाज असाच आहे. जितके सहज, सोप्या पद्धतीने मिळेल, ते ओरबाडून घ्यायचे, त्याला कोण काय करणार.

Tuesday, 18 April 2023

चटका लावणारा शेवट

क्रिकेटसारख्या क्षणभंगुर खेळात, कधीही, कसेही घडू शकते. एका चेंडूवर चौकार मारला तरी पुढील चेंडूवर तोच फलंदाज बाद होऊ शकतो, तसे कित्येकवेळा घडले देखील आहे. परंतु हीच तर या खेळाची खरी लज्जत आहे. It's one ball game. त्यामुळे एखाद्या खेळीत, खेळाडू "स्थिरावला" आहे, याला फार मर्यादित अर्थ आहे. याच अर्थ असा नव्हे, स्थिरावलेला खेळाडू, खेळावर वर्चस्व गाजवू शकत नाही. परंतु असे ठामपणे सांगणे अवघड आहे. अशा कित्येक खेळी मला पाहायला मिळाल्या आहेत, जिथे पूर्णपणे फलंदाजाचे खेळावर वर्चस्व आहे आणि गोलंदाज हताश झाले आहेत. अर्थात हा खेळाचा एकांगी भाग झाला. जिथे गोलंदाज आणि फलंदाज, दोघांनाही आपले कौशल्य दाखवायची संधी मिळत असते, तिथे घडणारे द्वंद्व हे या खेळाचे खरे सौंदर्य होय. अर्थात जिथे खेळपट्टी गोलंदाज धार्जिणी असते तिथे फलंदाजांची खरी कसोटी असते. कारण तिथे कुठल्याही क्षणी तुम्ही बाद होण्याची शक्यता असते आणि अशा खेळपट्टीवर अगदी "पन्नाशी" गाठणे देखील फार जिकिरीचे असते आणि तिथे फलंदाजांचा खरा कस लागgood length तो. हे सगळे फक्त कसोटी सामन्यात बघायला मिळते. तिथे फलंदाज आणि गोलंदाज, दोघांचीही खरी कसोटी लागत असते. दोघांना समसमान संधी उपलब्ध असते. म्हणूनच कसोटी क्रिकेट हाच खेळाडूंचा अंतिम मानदंड असतो. इथे खऱ्याअर्थी "घाम" गाळावा लागतो तसेच तुमच्या कौशल्याची इतिश्री घडत असते. अशीच एक खेळी १९८७ साली मला बंगळुरू इथल्या कसोटी सामन्यात बघायला मिळाली. आजही ती खेळी कसोटी सामन्यांच्या इतिहासात अजरामर म्हणून गणली गेली आहे आणि याचे मुख्य कारण खेळपट्टी पूर्णपणे मंदगती गोलंदाजीला पोषक होती. खेळावा लागणारा चेंडू हा किंग कोब्राच्या आवेशात येत होता आणि कधीही मरणोन्मुख डंख करू शकेल, असे वाटत होते. भारताला दुसऱ्या डावात जिंकण्यासाठी २२१ धावा करण्याचे आव्हान होते. पाकिस्तानचा इम्रान खान, मालिका जिंकण्याच्या इर्षेने भारतात आला होता आणि पहिल्या चारी कसूरी सामने अनिर्णित अवस्थेत संपले होते. ही कसोटी १००% निर्णायक होणार आणि इथे पाकिस्तानला विजयाची संधी प्राप्त झाली होती. अडसर होता तो फक्त सुनील गावस्करचा!! या खेळपट्टीवर प्रत्येक धाव शब्दाश: लाखमोलाची होती. इथे प्रत्येक धाव "कमवावी" लागत होती. कुठला चेंडू उसळेल, लिटी वळेल, याचा अंदाज खुद्द गोलंदाजांना अचूकपणे येत नव्हता. खेळपट्टीवर चेंडू पडला की धुळीचा लोट उठायचा आणि त्यात चेंडू अचानक गिरकी घ्यायचा. अक्षरश: शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजाला, चेंडूकडे "टक" लावून बघायला लागायचे. अगदी, good length वर पडलेला चेंडू छातीपर्यंत उसळत होता. इथे निव्वळ तंत्र उपयोगी नव्हते तर तुमच्या मन:शांतीची प्रखर कसोटी होती. फक्त एकाग्रता असून उपयोगी नसून, त्याच्या जोडीला "आयत्या" वेळी तंत्रात बदल करायला लागण्याचे अजोड कौशल्य आवश्यक होते. सुनील इथेच असामान्य ठरला. "इक्बाल कासीम"अशक्य गोलंदाजी करत होता. बहरात २२१ धावांचा पाठलाग करताना, १४७ धावसंख्येवर अर्धा संघ परतला होता. सुनील एका बाजूने खिंड लढवत होता. सुनीलने, या खेळीत, आपण काय दर्जाचे फलंदाज आहोत, याची जगाला जाणीव करून दिली. जर का चेंडू short pitch पडला तर मागे सारून चेंडूचा सामना करायचा, हे सर्वमान्य तंत्र पण इथे चेंडूचा टप्पा थोडा पुढे पडतो आणि चेंडू छातीपर्यंत उसळतो!! बरे, नुसताच उसळत नाही तर चेंडू अवास्तवरीत्या गिरकी घेतो!! सुनील ज्या प्रकारेक्रश चेंडूचा सामना करायचा, हे नुसते बघण्यासारखे नव्हते तर शिकण्यासारखे होते. असेच काही चेंडू त्याने सरळ सोडून दिले!! विकेटकीपर चकित व्हायचा. मिडल स्टंपवरील चेंडू, केवळ अंदाजाने सुनील सोडून देतो!! याचे कारण तो चेंडू स्टम्पवरून जाणार, याची खात्री सुनीलला होती. इतकी खात्री कुठून येते? इथेच अंदाज आणि कौशल्य याचा खरा मिलाफ दिसतो. चेंडू छातीपर्यंत अचानक उसळला आणि सुनीलने मागील पायावर जाऊन, हातातील बॅटीची पकड हलकी करून, तो चेंडू, आपल्या पायाशीच थांबवला!! कितीजणांना हे जमू शकेल? असा चेंडू खेळताना, बॅटीची कड घेतली जाते आणि झेल उडू शकतो. हे क्रिकेटमधील सर्वमान्य दृश्य. जिथे चेंडू खेळणे, हीच कसोटी असताना, सुनीलने एक चेंडू फारसा फिरला नाही आणि आयत्या वेळेस half volley असल्याचे समजल्यावर. त्याच इक्बाल कासिमच्या बाजूने स्ट्रेट ड्राइव्ह मारून, चौकार वसूल केला. निव्वळ अशक्यप्राय घटना होती. पाकिस्तानी समालोचक देखील अवाक झाले होते आणि इथे मैदानावर इम्रान चिंताक्रांत. इम्रानला पूर्ण माहीत होते, जोपर्यंत सुनील मैदानावर आहे, तोपर्यंत विजय अशक्य. सुनील सत्तरीत आला आणि इम्रानने defensive fielding लावली. इम्रानला असे क्षेत्ररक्षण लावावे लागले, हीच सुनीलच्या त्या खेळीला मानवंदना होती. अशा खेळपट्टीवर फलंदाजांचा अंदाज फसणे, हा अजिबात दोष नव्हता कारण तो अंदाज येणे अशक्य होते. काहीवेळा सुनीलचा देखील अंदाज चुकला आणि इथे नशिबाची साथ मिळते. परंतु त्यामुळे नाउमेद न होता, पुन्हा मन एकाग्र करणे, हीच फलंदाजाच्या कौशल्याची पावती असते. मध्येच एक चेंडू short pitch आला पण सरळ आला!! सुनीलने आयत्यावेळी मागे सरकून मिडविकेटला ड्राइव्ह मारून चौकार मिळवला. आयत्यावेळी तंत्रात बदल करून, कशा धावा मिळवता येतात, याचे हे असामान्य उदाहरण. आलेला चेंडू वळणार नाही याची खात्री केली आणि मिडविकेटला ड्राइव्ह केला. वर्षानुवर्षे जो अनुभव गोळा केला, त्या अनुभवाची प्रचिती होती. सुनीलची अतुल्य एकाग्रता, कायम सोबत असायची पण इथे निव्वळ एकाग्रता असून भागणार नव्हते तर एकाग्रतेसोबत धावा "गोळा" करणे जरुरीचे होये अन्यथा २२१ धावांचे शिखर गाठणे अशक्य. ९६ धावांच्या खेळीत फक्त ८ चौकार होते, म्हणजे ६४ धावा त्याने पळून काढल्या!! ही खेळी म्हणजे सुनीलच्या असामान्यत्वाची शिखर खूण होय. सुनील ९६ धावांवर पोहचला आणि इक्बाल कासीमचा चेंडू अचानक भयानक उसळला आणि सुनीलचा अंदाज लवणमात्र चुकला! चेंडू बॅटीच्या पट्टीतून निसटला आणि खरंतर ग्लोव्ह्ज देखील निसटले पण मनगटाला निसटता स्पर्श झाला. एका अजरामर खेळीचा अंत झाला. इम्रान तिथेच समजून गेला, सामना आपल्या खिशात आला आणि तसेच झाले. गोलंदाज धार्जिण्या खेळपट्टीवर कसे खेळावे, याचा अप्रतिम मानदंड या खेळीतून सुनीलने घालून दिला. आजही सुनीलची ही खेळी त्याच्या कारकिर्दीतील अजोड खेळी मानली जाते. अगदी इम्रान सारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्याने खिलाडू वृत्तीने या खेळीचे कौतुक केले आहे. जिथे संपूर्ण सामन्यात, पहिल्या इनिंग मध्ये दिलीप वेंगसरकरची ५० हीच खेळी, सर्वात मोठी खेळी झालेली असताना, (पाकिस्तानच्या कुठल्याच खेळाडूने पन्नाशी गाठली नाही. अर्थात ३०, ४० अशा धावा करून त्यांनी भारताला २२१ धावांचे आव्हान दिले) त्याच खेळपट्टीवर ९६ धावांची खेळी करणे, यातच सुनीलचे अलौकिकत्व दिसून येते. अर्थात सुनील बाद झाला तेंव्हा कुणालाच सुतराम कल्पना नव्हती, हीच सुनीलची शेवटची खेळी असेल परंतु पुढे त्याने निवृत्ती जाहीर केली आणि सन्मानाने निवृत्ती कशी घ्यावी, याचा असामान्य मानदंड प्रस्थापित केला आणि म्हणूनच या खेळीचा चटका मनाला लागला.

Sunday, 19 February 2023

गोलंदाजी - नयनरम्य सोहळा

केवळ आपल्याकडेच नव्हे तर जगभर क्रिकेट खेळात फलंदाजाला जितके महत्व दिले जाते, कौतुक केले जाते त्याप्रमाणात गोलंदाजाला डावलले जाते. वास्तविक पहाता, गोलंदाजांनी २० बळी घेतल्याशिवाय सामना जिंकणे अशक्य! अशी स्थिती असूनही, फलंदाजाने षटकार मारल्यावर जे कौतुक प्राप्त होते, तिथे गोलंदाजाने त्रिफळा उडवल्यावर, कौतुक होते पण प्रमाण कमी असते. शतक लावल्यावर सामनावीर पारितोषिक मिळते पण त्याच सामन्यात १० किंवा जास्त बाली मिळवलेल्या गोलंदाजाला तितके झुकते माप मिळत नाही आणि अशा प्रकारचा दुजाभाव फार पूर्वीपासून चालत आला आहे. त्यामागे एक कारणमीमांसा केली जाते, फलंदाजाकडे कर्तृत्व दाखवायला एकच चेंडू असतो, तिथे जर काही दाखवले नाही तर सरळ पॅव्हेलियनची वाट पकडणे क्रमप्राप्त असते. गोलंदाजाकडे, समजा षटकार मारला तरी पुढील चेंडू टाकून बळी मिळवण्याची शक्यता अजमावता येते. अर्थात हा मुद्दा नजरेआड करणे अवघड आहे. क्रिकेट खेळ क्षणभंगुर ठरतो तो अशा क्षणांच्या वेळी. ताशी १५० च्या वेगाने चेंडू जेंव्हा अंगावर येतो तेंव्हा फलंदाजाकडे केवळ निमिष, इतकाच वेळ हाताशी असतो आणि त्याच वेळात निर्णय घ्यावा लागतो. निर्णय चुकला तर खेळ संपला. इतका हा खेळ क्रूर आहे. तेंव्हा फलंदाजीच्या कलेला थोडे झुकते माप मिळणे, अगदीच चुकीचे नसते. परंतु मी वर म्हटल्याप्रमाणे, २० बळी मिळवणे, हेच कुठल्याही विजयाचे इप्सित किंवा गमक असते. खेळपट्टी फलंदाजी धार्जिणी असली तर गोलंदाजीची होणारी कत्तल, निमूटपणे सहन करण्यावाचून काहीही करता येत नसते. अशा वेळी गोलंदाजी म्हणजे वेठबिगारी वाटते. थोडा विचार केल्यास, गोलंदाज व्हायचे असेल तर प्रचंड प्रमाणात घाम गाळणे, मनाची स्थिरता कायम ठेवणे तसेच चेंडू टाकणे म्हणजे रेम्याडोक्याचे काम नोहे, हे मनावर बिंबवणे होय. प्रत्येक चेंडूवर बळी मिळवण्याची आस मनात ठेऊनच गोलंदाजी करावी लागते. मनोनिग्रहाची कसोटी जितकी फलंदाजांची असते, तितकीच गोलंदाजांची देखील असते. टाकलेल्या चेंडूचा शेवट कसा आहे, हे त्याच्या हातात फारसे नसते, विशेषतः मंदगती गोलंदाजाच्या बाबतीत. चेंडू वळवलेला असतो पण त्याचे नेमके काय करायचे, हे समोरच्या फलंदाजाच्या हातात असते!! हा एक प्रकारचा जुगार असतो. असे फार थोडे मंदगती गोलंदाज झाले आहेत, त्यांनी निव्वळ मनगटी कलेच्या आधारावर फलंदाजांना भ्रांतचित्त करून सोडले आहे. अन्यथा वाट बघत बसणे, इतकेच बव्हंशी मंदगती गोलंदाजाच्या नशिबी असते. इथे मला "बेदी" आणि "प्रसन्ना" या जोडगोळीची आठवण आली. केवळ ३,४ पावलांची धाव आणि शेवटच्या क्षणापर्यंत समोरच्या फलंदाजाला कसाही चुणूक न दाखवता, त्याला गुंगारा द्यायचा आणि जाळ्यात पकडायचे!! हे असामान्य कौशल्य या दोघांकडे होते.असे नव्हे, हे दोघे एकाच प्रकारची गोलंदाजी करायचे. त्यांच्या भात्यात विविध अस्त्रे होती. कुठल्याही खेळपट्टीवर चेंडू वळवायची त्यांची ताकद निव्वळ बेमिसाल होती. चेंडू तरंगत टाकायचा आणि चेंडूचा टप्पा "फसवा" ठेवायचा!! तो इतका फसवा ठेवायची की समोरच्या फलंदाजाला शेवटपर्यंत, पाय पुढे टाकून खेळायचे की पाय मागे ठेऊन खेळायचे? हे समजू द्यायचे नाही. हे बघणे, हा नयनरम्य सोहळा असायचा. फलंदाजाला चकवा देण्यात हे दोन्ही गोलंदाज माहीर होते. ऑस्ट्रेलिया इथल्या खेळपट्ट्या सर्वसाधारपणे वेगवान गोलंदाजीला धार्जिण्या असताताई अशा खेळपट्टीवर तिथेच ३ सामन्यांच्या मालिकेत प्रसन्नाने २५ बळी मिळवले होते, अत्यंत खडूस अशा आयन चॅपल कडून त्याने मनापासूनची वाहवा मिळवली होती. तसेच बेदी, इंग्लंडच्या थंडगार हवामानात, तिथल्या फलंदाजांना आपल्या मनगटावर नाचवण्याची किमया घडवणारा किमयागार होता. दुर्दैव असे होते, त्यावेळी भारतीय फलंदाजी तितकी "सखोल" नव्हती,परिणामी बरेचवेळा या दोघांचे पराक्रम मातीमोल झाले. खेळपट्टी कशी असावी? गोलंदाजाला थोडी तरी पोषक असावी जेणेकरून फलंदाजाला, त्याच्या कौशल्याला आणि प्रयत्नांना पणाला लावणे जरुरीचे व्हावे. दोघांना आपले कौशल्य दाखवण्याची समसमान संधी मिळायला हवी, अशाचवेळी खऱ्याअर्थी क्रिकेट खेळाची मजा घेता येते एकतर्फीपणा निरस ठरतो. एकतर वेगवान गोलंदाजी ही नेहमीच शारीरिक परिश्रमाची प्रचंड मागणी करत असते. सततच्या खेळणे, सर्वात आधी दुखापतग्रस्त कुणी होत असेल तर, तो वेगवान गोलंदाज. सातत्याने प्रचंड ताकद लावून, वेगवान गोलंदाजी करणे, हे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. त्यातून जेंव्हा फलंदाजाकडून mis time फटका बसून, चेंडू सीमारेषेबाहेर जाताना बघणे, हे त्रासदायक असते.वेगवान गोलंदाजी खेळणे, हा निमिषभराचाच खेळ असतो. टाकलेला चेंडू अंगावर शेकू शकतो, झेल जाऊ शकतो किंवा त्रिफळा उडू शकतो. टाकलेल्या चेंडूने यष्टी उडवली जाणे, यासारखे दुसरे सुख, वेगवान गोलंदाजाच्या नशिबात नसते. Cartwheeling बघणे, खरोखरच अनुपम सुख असते. नवीन चकचकीत चेंडू कसा उसळी घेईल,कितपत स्विंग होईल, याचा बरेचवेळा खुद्द गोलंदाला देखील पूर्ण अंदाज नसतो आणि फलंदाज तर थोडा भ्रांतचित्त असतो. त्यावेळचे द्वंद्व खरी, परीक्षा असते. अर्थात अशा वेळी मारलेला कव्हर ड्राइव्ह, डोळ्यांचे पारणे फेडत असतो, हे देखील तितकेच सत्य होय. हे साप-मुंगूस यांच्यातील युद्ध असते. एखादा लिली किंवा अँडी रॉबर्ट्स जेंव्हा चेंडू टाकत, तेंव्हा फलंदाजाला कायम दक्ष अवस्थेतच वावरायला लागायचे. येणार चेंडू कशा प्रकारचा असेल, किती स्विंग होणार असेल, याचा फक्त "अंदाज" बांधणे, इतकेच फलंदाजाच्या हातात असते. हवेत चेंडू स्विंग करणेआणि टप्पा पडल्यावर आणखी चेंडू स्विंग होणे, ही असामान्य ताकदीची कला आहे. तसेच वेगवेगळ्या वेगाचे बाउंसर्स टाकणे, अचानक "यॉर्कर" टाकून, फलंदाजांची भंबेरी उडवणे, ही वेगवान गोलंदाजाच्या भात्यातील प्रभावी अस्त्रे आहेत. फलंदाजांचा मनोनिग्रह आणि कस अशा वेळीच बघायला मिळतो. अचानक वेगात बदल करून, फलंदाजाला गंडवणे, ही उच्च प्रतीची कला आहे. विशेषतः इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया इथल्या वेगवान गोलंदाजी धार्जिण्या खेळपट्टीवर, म्हणूनच शतक लावणे, ही फलंदाजी कलेची उच्च श्रेणी ठरते. त्यातून अशा देशात, चेंडूची लकाकी बराच वेळ कायम असते, त्यामुळे फलंदाजाला उसंत मिळाली, असे फार कमी वेळा बघायला मिळते. वेगवान गोलंदाज नेहमीच आव्हान देत असतात. एखादा होल्डिंग किंवा थॉमसन सारखा गोलंदाज, अचानक sand shoe पद्धतीचा यॉर्कर टाकतात, तेंव्हा फलंदाजाला आपला त्रिफळा कधी उडाला, याचा पत्ताच लागत नाही. अर्थात अशा प्रकारचा चेंडू टाकायला, प्रचंड मेहनत घ्यावी लागते कारण जर का खोलवर अचूक टप्पा पडला नाही तर तो चेंडू "फुलटॉस" जातो आणि झणझणीत चौकार सहन करावा लागतो. एकूणच वेगवान गोलंदाजी ही क्रिकेट खेळाची खरी लज्जत आहे, खरे सौंदर्य आहे. खरतर टाकलेल्या चेंडूचा अंदाज घेऊन, तसाच विकेटकीपरकडे सोडून द्यायचा!! हा भाग देखील तितकाच विलोभनीय असतो. आपल्या सुनीलचा याबाबतीतला अंदाज निव्वळ थक्क करणारा होता. असे काही प्रसंग आठवत आहेत, जिथे द्वंद्व पराकोटीचे बघायला मिळाले आहे. एकदा वेस्टइंडिज इथे भारतीय संघ खेळायला गेला असताना, त्यावेळी मार्शल आग ओकत होता. मार्शलचा वेग म्हणजे तारांबळ नक्की, असेच सगळीकडे पसरलेले होते. अशाच एका सामन्यात, मार्शलचा चेंडू अचानक उसळला आणि सुनीलच्या कपाळावर आदळला!! बरोबर कपाळाच्या मध्यभागी आदळला!! वेडं पराकोटीच्या झाल्यास असणार परंतु ती वेदना सुनीलने मनातल्या मनात पचवली आणि पुढल्या चेंडूवर त्याने कचकचीत कव्हर ड्राइव्ह मारून चौकार मिळवला!! इथे मी खेळत आहे आणि मी इथला "बॉस" आहे, हे गर्जून सांगणारा तो क्षण होता. असाच आणखी एक प्रसंग आठवला. ऑस्ट्रेलियात वेस्टइंडीजचा संघ गेला होता, विव्ह रिचर्ड्सचा दबदबा जगभर पसरला होता. विव्ह नेहमीप्रमाणे हेल्मेट शिवाय खेळत असताना, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज, रॉडनी हॉग याने एक बाउन्सर टाकालाआणि विव्हचा अंदाज चुकला आणि डोक्यावर चेंडू शेकला. क्षणभर विव्ह दचकलाच!! असे फार कमी वेळा घडले पण कष्ट त्याने सावरून घेतले आणि पुढल्या चेंडूवर त्याने अफलातून षटकार मारला!! खच्चीकरण कसे करायचे असते, हे दर्शविण्यासाठी हे २ प्रसंग मी लिहिले परंतु यात मूळ मुद्दा असा, या दोन्ही गोलंदाजांनी, या फलंदाजांना आव्हान दिले, डिवचले आणि त्यामुळे या दोन्ही फलंदाजांना चेव आला. असामान्यत्व इथेच सिद्ध होते. हे दोन्ही गोलंदाज जगभर धुमाकूळ घालणारे होते. अशी आणखी अनेक उदाहरणे देता येतील. यात गंमत अशी आहे, वेगवान गोलंदाजी अत्युच्च टप्प्यावर सुरु असताना, आपले तितकेच अत्युच्च कौशल्य दाखवले गेले. वेगवान गोलंदाज तगडा असला की असे प्रसंग बघायला मिळतात. दोन घ्यावे आणि दोन द्यावे, यात खरी या खेळाची लज्जत आहे. इथे एका क्षणी एखादा यशस्वी होतो पण त्याला यशस्वितेचा "फॉर्म्युला"सापडला असेच कधीच होत नसते.येणार प्रत्येक चेंडू हा एक आव्हान घेऊन येत असतो आणि त्या आव्हानाचा सामना करण्यातच फलंदाजाची असामान्य कसोटी असते. क्रिकेट खेळ उच्च प्रतीचा आनंद असाच देत असतो.

Friday, 17 February 2023

Clive Lloyd

मुंबईत नव्याने झालेले *वानखेडे स्टेडियम*! खेळपट्टी कशी असेल याची सुतराम कल्पना नाही कारण जिथे हे स्टेडियम नव्याने बांधले आहे तिथे खेळपट्टी देखील नव्यानेच तयार केली असणार. वेस्टइंडीज संघाची पुनर्बांधणी सुरु होती. ग्रीनिज,रिचर्ड्स सारखे खेळाडू हळूहळू आपला दबदबा सिद्ध करण्याच्या प्रयत्नात होते. अँडी रॉबर्ट्सने आपले कर्तृत्व याच १९७४/७५ च्या मालिकेत सिद्ध केले होते. खरतर संघात *फ्रेड्रिक्स* आणि *लॉइड* हेच खऱ्याअर्थी अनुभवी खेळाडू होते. या पार्श्वभूमीवर या मालिकेतील शेवटचा सामना वानखेडे स्टेडियमवर सुरु झाला. दूरदर्शनवर सामन्याचे लाईव्ह चित्रीकरण होणार म्हणून शाळांनी देखील पहाटेचे वर्ग ठेवले होते. माझ्या घरी नुकताच टीव्ही आला होता आणि तेंव्हा मला वाटतं, आजूबाजूच्या परिसरात टीव्ही फारसे नसल्याने, माझ्या घरात मित्रांची रीघ लागली होती. लॉइडने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी स्वीकारली. याच काळात आपल्या फिरकी गोलंदाजांनीं अपालाजगभर दबदबा निर्माण केला होता. याही मालिकेत त्याचे प्रत्यंतर मिळाले होते. *बेदी* आणि *चंद्रशेखर* ही नावे घरोघर कौतुकाने घेतली जात होती. सलामीचा फलंदाज - फ्रेड्रिक्स तर कमालीच्या वेगाने धावा जमवत होता. अर्थात हळूहळू बेदीने आपली जादू दाखवायला सुरवात केली आणि पहिले काही बळी मिळवले. अशाच वेळी लॉईड मैदानावर अवतरला!! ६ फुटापेक्षा जास्त उंची,शरीराने अत्यंत काटक, चालताना पाठीला किंचित बाक देऊन चालायची सवय. तोपर्यंत लॉईडने आपले नाणे खणखणीत वाजवले असल्याने, एकूणच मैदानावर त्याचे अस्तित्व जाणवत होते. सुरवात हळू केली.मला वाटतं स्वतः:च्या ७,८ धावा झाल्या असताना, बेदीने स्वतःच्या गोलंदाजीवर लॉइडचा झेल सोडला!! लॉइडचा झेल सोडणे म्हणजे काय असते,याचे प्रत्यंतर पुढे ४,५ तास बघायला मिळाले. निर्दय कत्तल म्हणजे काय याचा वस्तुपाठ होता. भारतीय गोलंदाजीचा पालापाचोळा करून लॉइडने २४२ धावांची खेळी सजवली. आम्ही मित्र तर केवळ नाईलाज म्हणून ते *झोडपणे* बघत होतो. लॉइडने एकहाती सामना आपल्या ताब्यात घेतला. इतके दिवस या फलंदाजांचा *महिमा* फक्त ऐकून होतो, वर्तमानपत्रात वाचीत होतो पण आक्रमक खेळी कशी असते, याचे रोकडे उदाहरण, त्या दिवशी वानखेडे स्टेडियमवर बघायला मिळाले. एकाही गोलंदाजाला दया दाखवली नव्हती. अर्थात हा सामना आणि मालिका, वेस्टइंडीजने खिशात टाकली. लॉईडची ही खेळी आजही माझ्या मनात ताजी आहे. लॉइड तेंव्हाही आणि नंतरही वेस्टइंडीज संघाचा अविभाज्य भाग होता. आपण रिचर्ड्सचे अफाट कौतुक करतो आणि ते योग्यच आहे. परंतु एक मुद्दा विचारात घेणे आवश्यक आहे. सलामीला पूर्वी फ्रेड्रिक्स-ग्रीनिज आणि खाली कालिचरण/गोम्स व लॉइड अशी खंदी फळी असल्याने, रिचर्ड्सला मोकळे रान मिळत होते. असे कितीतरी सामने दाखवता येतील, जिथे रिचर्ड्स अपयशी झाला आणि इतरांनी फलंदाजी सावरून घेतली. अर्थात प्रचंड वेगवान ताकदीचा गोलंदाजीचा ताफा तेंव्हा कायम मदतीला होता, हे आणखी त्या संघाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. परंतु लॉइड हा कायम वेस्टइंडीज संघाचा आधारस्तंभ होता, हे मान्यच करायला लागेल. भारतीय फिरकी संघाची जवळपास दहशत पसरलेली असताना, लॉइड संघात आहे, ही भावना,या संघाला तारून न्यायची. हातात प्रचंड वजनाची बॅट, आणि कुठलीही गोलंदाजी फोडून काढण्याचा आत्मविश्वास. तो खेळपट्टीवर आहे, याचेच दडपण जगातील यच्चयावत गोलंदाजांना यायचे. सामना एकहाती फिरवून द्यायची ताकद मनगटात होती. लॉइड नुसताच फलंदाज नव्हता, वेस्टइंडीज संघ म्हणजे छोट्या देशांचा समुच्चय, त्यांना लॉइडने शिस्त लावली, संघ *घडवला*!! बरेचजण म्हणतात, त्या संघात सगळेच गुणवंत खेळाडू होते, हा आरोप मान्य पण त्यांची गुणवत्ता हेरून, त्यांना संघात स्थिर करून घेण्याचे काम, एक कर्णधार म्हणून लॉईडला श्रेय द्यायला लागेल. लॉइड नुसताच फलंदाज नव्हता, कुशल संघटक नव्हता तर, विशेषतः *कव्हर* किंवा *मिड ऑफ* इथला क्षेत्ररक्षणाचा वाघ होता, पुढे वयोमानानुसार तो स्लिपमध्ये उभा राहायला लागला आणू तिथेही त्याने अविश्वसनीय वाटावेत,असे झेल पकडले. तेंव्हा स्लिपमध्ये लॉइड, रिचर्ड्स आणि ग्रीनिज सारखे अफलातून क्षेत्ररक्षक असायचे.परिणामी, वेस्टइंडीजच्या वेगवान गोलंदाजांना खात्री असायची, बॅटीची कड घेतली की ती यांच्या हातात विसावणार. तशी १४५/१५० या वेगाने येणारा चेंडू , जेंव्हा बॅटीची कड घेतो, तेंव्हा झेलात रूपांतर होताना, त्याचा वेग आणखी भयानक असतो आणि तिथे *निमिष* हे काळाचे मापन देखील मोठे वाटते. बऱ्याचजणांना असे वाटते, स्लिप मधील झेल पकडणे, फार सोपे असते!! त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. क्षेत्ररक्षण करताना देखील लॉइड पाठीला किंचित बाक देऊन उभा राहायचा. डोळ्यावर कायम चष्मा असल्याने, त्याची दाहकता सुरवातीला जाणवायची नाही पण मैदानावर नुसता उभा राहिला तरी प्रतिस्पर्धी दबकून असायचे. अशी एक खेळी मला इथे आठवते. १९७९/८० सालातली वेस्टइंडीज/ऑस्ट्रेलिया ही जगप्रसिद्ध मालिका. फलंदाज म्हणून रिचर्ड्सने गाजवली असली तरी तिसऱ्या सामन्यात, एकेवेळी एकदम संघाचे ४ बळी १५० धावांच्या आतच गमावले होते आणि मैदानावर लॉइड अवतरला. *लिली*आणि *पास्को* आणि *हॉग* मैदानावर आग ओकत होते. अशावेळी बहुदा लॉईडला स्फुरण चढले असावे. मालिकेत वेस्टइंडीजने आघाडी घेतली होती. ३ सामान्यांच्या मालिकेतील हा ऍडलेड इथला शेवटचा सामना होता. सुरवातीला लॉइड शांतपणे खेळत होता आणि खेळपट्टीचा अंदाज घेऊन स्थिरावत होता. अर्धा तास असावाआणि लॉइडने भात्यातील अस्त्रे काढायला सुरवात केली. लॉइड म्हणजे काय चीज होता, याचे त्याच्या १२८ धावांच्या खेळीत पुरेपूर प्रत्यंतर येते. किंचित पुढे वाकून उभा राहायचा स्टान्स, बॅट काहीशी हवेत ठेवायची आणि अखेरच्या क्षणी अत्यंत बेदरकार पद्धतीने गोलंदाजाला हाताळायचे!! या खेळीतले दोन फटके केवळ अविश्वसनीय होते. १) हॉगने मिडल स्टॅम्पवर आखूड टप्प्याचा चेंडू टाकला आणि लॉइडने क्षणार्धात स्क्वेयर लेगला हूक मारला - चेंडू मैदानाच्या बाहेर!! अरेरावी म्हणतात ती अशी. २) लिलीने ऑफ स्टम्पच्या बाहेर पण छातीच्या उंचीएवढ्या उसळीचा चेंडू टाकला आणि लॉइडने पाय टाकून, कव्हर ड्राइव्ह मारला. हे कसे शक्य आहे? चेंडू जवळपास पाचव्या किंवा सहाव्या स्टॅम्पइतका बाहेर होता पण तरीही कुठल्यातरी अतर्क्य उर्मीने लॉइडने हा फटका खेळला. चेंडू निमिषार्धात सीमापार. एकाही क्षेत्ररक्षकाला साधे हलायची पण संधी मिळाली नाही. असे खेळायचे मनात आले आणि ते खेळून दाखवले, हेच अफलातून. संघाला ३०० पार नेले आणि इनिंग संपली. याच खेळीने ऑस्ट्रेलियाचे मानसिक खच्चीकरण झाले आणि वेस्टइंडीजने, प्रथमच ऑस्ट्रेलियात जाऊन,तिथे ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण पराभव केला. निव्वळ अविश्वसनीय अशी खेळी होती, समालोचक रिची बेनो यांनी मुक्तकंठाने लॉईडच्या या खेळीचे वर्णन केले आहे. अशीच अफलातून खेळी त्याने पहिल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात केली.लॉइड आला तेंव्हा संघाची परिस्थिती नाजुक होती. साथीला रोहन कन्हायला घेतले आणि ऑस्ट्रेलियाच्या वेगवान चौकडीवर, ना भूतो ना भविष्यती असा हल्ला चढवला आणि फक्त ८५ चेंडूत १०२ धावांची खेळी सजवली होती.ऑस्ट्रेलियन संघ हतबल झाला होता. वेस्टइंडीजने पहिला विश्वचषक जिंकला,हे सांगायलाच नको. आजही ती खेळी अजरामर म्हणून मान्यता पावली आहे. या खेळाडूने निरनिराळ्या प्रकृतीच्या, स्वभावाच्या खेळाडूंना एकत्र आणले आणि त्यांच्याकडून ऐतिहासिक कामगिरी घडवून घेतली. या सगळ्या दैवी प्रतिभेच्या खेळाडूंना एकत्र बांधून ठेवणे तसे सोपे काम नव्हतेच पण आपल्या अत्युच्च दर्जाच्या खेळाने,त्यांच्या समोर आदर्श निर्माण केला.. या बाबत विव रिचर्ड्सने आपल्या पुस्तकात लॉईडचे मुक्त कंठाने कौतुक केले आहे आणि त्याला श्रेय प्रदान केले आहे. लॉइड संघाचा खऱ्या अर्थाने आधारस्तंभ होता. आजच्या वेस्टइंडीज संघाच्या केविलवाण्या परिस्थितीकडे बघून, लॉईडच्या संघाचा अजिबात अंदाज येणार नाही. लॉइड त्याबाबतीत अजोड खेळाडू होता.

Wednesday, 9 November 2022

रणजी करंडक - हरपलेले श्रेय

१९७१ साली अजित वाडेकरच्या संघाने निव्वळ अभूतपूर्व यश मिळवून, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघांना, त्यांच्या भूमीत धूळ चारून, भारतीय क्रिकेटला नवसंजीवनी प्राप्त करून दिली. त्यावेळी, इंग्लंडवरून मुंबईला परतल्यावर, मुंबईच्या पोलीस कमिशनर ऑफिसने, सगळ्या संघाचा सत्कार कार्यक्रम योजला होता. माझी आई त्यावेळी त्याच ऑफिसमध्ये - क्रॉफर्ड मार्केट हेड ऑफिसमध्ये नोकरीला होती. त्यावेळी आई त्या ऑफिसच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सातत्याने भाग घ्यायची. परिणामी तिच्या बऱ्याच ओळखी असायच्या. त्या ओळखीच्या संदर्भातून, मी आणि माझे नाना, त्या सत्कार समारंभा गेलो होतो. एका आलिशान बस मधून सगळा संघ आला होता. बसपासून २,३ फुटावर मी, माझ्या नानांचे बोट धरून (१९७१ साली माझे वय वर्षे १२!!) उभा असताना, एकदम नाना बोलले, "अनिल, तो बघ सोलकर!!" एखादे अद्भुत प्रत्यक्ष डोळ्याने अनुभवावे, तसे मी डोळे विस्फारून सोलकरला बघितले. सोलकरने घेतलेल्या असामान्य झेलांची छायाचित्रे जमवण्याच्या आटापिटा सार्थकी लागला होता. नंतर मग वाडेकर, सरदेसाई, विश्वनाथ,गावस्कर आणि स्पिनर्स असे बाहेर पडले. कार्यक्रम बहुदा छानच झाला असणार कारण आता त्या स्मृती बऱ्याच अंधुक झाल्या पण सोलकरला प्रत्यक्ष बघितल्याचे चित्र मात्र आजही मनावर कोरलेले आहे. त्यावेळी आपल्या भारतीय संघातील हे सगळे खेळाडू म्हणजे भूलोकीवरील गंधर्व वाटायचे. याच पार्श्वभूमीवर पुढे रणजी सामने सुरु झाले. त्यावेळी ब्रेबर्न स्टेडियम म्हणजे क्रिकेट सामन्यांचे अद्वितीय श्रद्धाळू मंदिर!! अर्थात त्यावेळचा मुंबई संघ म्हणजे रत्नांची खाण होती. खेळाडू कितीही आंतर राष्ट्रीय ख्यातीचा झाला तरी, रणजी सामने, पावसाळ्यातील कांगा लीग सामने, कुणीही चुकवत नसे. मला आजही स्पष्ट आठवत आहे, याच काळात, मी नानांच्या बरोबरीने पहाटे उठून ब्रेबर्न स्टेडियमच्या तिकिटांच्या रांगेत उभे राहून, सामन्याच्या पहिल्या दिवसाचे तिकीट मिळवीत असे. गिरगावात रहात असल्याचा फायदा असा, मुंबईतील इतर प्रेक्षक ब्रेबर्न स्टेडियमपर्यंत येईपर्यंत, आम्हा दोघांकडे तिकीट मिळालेले असायचे. सगळ्यांच्या आता जाऊन, आपली जागा पकडण्याचे अपूर्व समाधान मिळवणे, हा आनंदाचा पुढील भाग. त्यावेळी बहुतांश जागी लाकडी फळ्या असायच्या पण त्याचे काहीही वाटत नसे. लवकर आत गेल्यामुळे या खेळाडूंची चाललेली "नेट प्रॅक्टिस" फार जवळून बघायला मिळायची. बहुतेक खेळाडू साध्या कपड्यात, हसत खेळत प्रॅक्टिस करत असताना बघणे, फार अपूर्वाईचे वाटत असे. त्यावेळी आमचे आनंद देखील साधेसुधे होते. सुनील अर्ध्या चड्डीत फलंदाजी करत आहे आणि हाच सुनील आंतरराष्ट्रीय सामन्यात आपली द्वाही फिरवून ख्यातकीर्त झालेला आहे आणि आज मी त्यालाच १५,२० फुटांवर फलंदाजी करताना बघत आहे - असे साधे आनंद होते. असेच समाधान, वाडेकर,सरदेसाई, सोलकर इत्यादी खेळाडूंना बघण्यात मिळत असे. जरा वेळानी सगळे आत पॅव्हेलियन मध्ये जात आणि मग अंपायर बाहेर पडत. अंपायर बाहेर येत आहेत, हे प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजराच्या आवाजाने समजून येत असे. एव्हाना, ब्रेबर्न स्टेडियम संपूर्णपणे भरलेले असायचे. पुढे मग वाडेकर आणि दुसऱ्या संघाचा कर्णधार "टॉस" करायला यायचे आणि पुन्हा टाळ्यांचा प्रचंड गजर व्हायचा. सारा आसमंत नुसता गर्जून जायचा आणि वातावरण क्रिकेटमय व्हायचे. समाज मुंबईने टॉस जिंकला की लोकांनाच दिवस सार्थकी लागल्या सारखे वाटायचे कारण आता, सुनील आणि रामनाथ पारकर यांची फलंदाजी बघायला मिळणार!! हे दोघे बुटुकले फलंदाज म्हणजे मुबई संघाची शान होती. पारकर तर विजेच्या गतीने धावायचा. त्याचे क्षेत्ररक्षण बघणे, हा अवर्णनीय सोहळा असायचा. संपूर्ण "कव्हर्स" क्षेत्र एकटा सांभाळायचा. त्याच्या आसपास जरी चेंडू गेला असला तरी धाव घ्यायची एकही फलंदाजांची टाप नसायची, इतकी त्याची दहशत होती. मुंबईचा संघ त्यावेळी संपूर्ण भारतभर आपली दहशत राखून असायचा आणि त्या संघातील बरेचसे खेळाडू कसोटी सामने खेळणारे असले तरी शक्यतो रणजी सामने खेळायचे आणि आपली कौशल्ये पुन्हा पारखून घ्यायचे. रणजी सामन्यांना त्यावेळी तितकी मान्यता होती. रणजी करंडकाचे उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने म्हणजे उत्सव असायचा. मला आठवत आहे, १९९० पर्यंत तरी रणजी करंडकाचे सामने म्हणजे ऑफिसमधून सुटी घ्यायची आणि वानखेडेवर ५ दिवस हजर राहायचे. हा माझा कित्येक वर्षे परिपाठ असायचा. अशोक मंकड म्हणजे आमचा रणजी सामन्यांचा "दादा" फलंदाज. तो "काका" म्हणूनच प्रसिद्ध असायचा आणि जोपर्यंत काका आहे, तोपर्यंत मुंबई संघ सुरक्षित!! ही भावना आम्हा सगळ्या प्रेक्षकांची असायची आणि त्याला या काकाने फारसा तडा जाऊ दिला नव्हता. पद्माकर शिवलकर, राकेश टंडन हे मुंबईचे अद्वितीय स्पिनर्स. शिवलकर तर निव्वळ दुर्दैवी. बेदी आणि राजिंदर गोयल, यांच्या काळात जन्माला आला. आपल्याला कसोटी सामने खेळायला मिळण्याची शक्यता शून्य तरीही शिवलकरने वर्षानुवर्षे मुंबईला सामने जिंकवून दिले होते, अगदी एकहाती सामने जिंकवून दिले होते. खरंतर मी, माझ्या तरुणपणात रणजी करंडकाचे वैभवाचे दिवस बघितले. कॉलेज बुडवून रणजी सामने बघितले आणि त्याची धुंदी बाळगत, पुढील कित्येक दिवस धमाल केली होती. पुढे "टाइम्स करंडक" आणि पावसाळी दिवसातील "कांगा लीग" मधील सामने बघणे, हे माझ्या पिढीचे आद्यकर्तव्य होते. गंमत म्हणजे, पुढे दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, अगदी संजय मांजरेकर पर्यंत सगळे खेळाडू आपले कर्तव्य मानून, या सगळ्या करंडकाच्या सामन्यातून भान हरपून खेळायचे. असे असंख्य सामने मला आठवत आहेत, जिथे मुंबई हरणार असे जवळपास नक्की व्हायचे पण मुंबईचा "काका" (कितीतरी वर्षे अशोक मंकड मुंबईचा कर्णधार होता आणि त्याच्या हाताखाली सुनील,एकनाथ, सरदेसाई, जीवाची बाजी लावून खेळायचे) कुठलीतरी क्लुप्ती लढवायचा आणि हरत असलेला सामना, मुंबईच्या खिशात जायचा. मला तर आजही असेच वाटते, अशोक मंकड सारखा कर्णधार झाला नाही. सचिनचा उदय झाला आणि हळूहळू रणजी सामन्यांचे आकर्षण कमी व्हायला लागले. वास्तविक खुद्द सचिन देखील वेळ मिळेल तसा रणजी सामने खेळतच होता. एकेवर्षी तर सचिनने द्विशतक करून, मुंबईला रणजी करंडक मिळवून दिला होता पण आता मुंबई बाहेरचे अनेक संघ तितकेच बलशाली व्हायला लागले. माझ्या तरुणपणी, मुंबई, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली आणि कधीकधी हैदराबाद किंवा तामिळनाडू संघ, यांच्यात जीवघेणी चुरस असायची. पुढे, या खेळात प्रचंड पैसा आला तसेच मुख्य म्हणजे मुंबई संघाची रया गेली आणि एकूणच मुंबईपुरते आकर्षण कमी होत गेले. आता तर रणजी सामने कधी होतात, कोण जिंकते, असते प्रश्नच पडत नाहीत आणि रणजी करंडकाचे "ग्लॅमर" कधी संपले, हेच ध्यानात आले नाही.

Saturday, 29 August 2020

सुनील गावस्कर - भाग २

१९८३/८४ मधील रणजी करंडकासाठीचा दिल्ली आणि मुंबईमधील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम मध्ये होता. त्यावेळी दिल्ली आणि मुंबई संघ हे जवळपास तुल्यबळ होते, अर्थात मुंबई संघाची फलंदाजी अधिक खोल आणि भरवशाची होती. मी आणि माझ्या तेंव्हाच्या ऑफिसमधील काही सहकाऱ्यांनी ५ दिवसांची सलग सुटी घेतली होती. आजही तो सामना माझ्या डोळ्यासमोर आहे. सकाळी नाणेफेक झाली आणि दिल्लीचा कॅप्टन, मोहिंदर अमरनाथने क्षेत्ररक्षण स्वीकारले. लंचपर्यंतच्या खेळाने, दिल्लीच्या समोर काय वाढून ठेवले आहे याची कल्पना आली. खेळपट्टी संपूर्णपणे फलंदाजी धार्जिणी होती आणि मोहिंदरने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून पायावर धोंडा पडून घेतला होता. दिलीप त्या वर्षी सर्वोत्तम फॉर्मात होता आणि त्याने ज्याप्रकारे शतक झळकावले त्यावरून कल्पना आली. त्या खेळीत क्रिकेटमधील सगळ्या फटक्यांचे नयनरम्य प्रदर्शन मांडले होते. दुसऱ्या बाजूने सुनील शांतपणे दिलीपची खेळी बघत होता आणि दिलीप असेपर्यंत त्याने दुय्यम भूमिका स्वीकारली होती. जसा दिलीप बाद झाला तशी सुनीलने सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली. दिलीप असे पर्यंत एकेरी, दुहेरी धावांवर समाधान मानणारा सुनील, हळूहळू आपल्या भात्यातून शस्त्रे काढायला लागला. आधीच दिलीपने दिल्लीच्या गोलंदाजांना हलवून सोडले होते आणि आता सुनीलने त्याच्यावर जखमा करायला सुरवात केली. दिवसअखेर सुनील नाबाद राहिला होता. सुनीलने अक्षरश: दिल्लीच्या गोलंदाजांची पिसे लढली होती. खऱ्याअर्थी घाम गळायला लावला होता. गोलंदाजांना घाम गाळायला लावणे, त्यांच्या संयमाची परीक्षा बघणे, क्षेत्ररक्षकांना जराही संधी न देणे - ही सगळी सुनीलच्या फलंदाजीची खास वैशिष्ट्ये. सुनीलचा स्वतःवर अतुलनीय संयम होता. त्या जोरावर त्याने भल्याभल्या गोलंदाजांना, त्याच्यासमोर गुडघे टेकायला लावले होते आणि तरी सुनीलचे समाधान होत नसे. या सामन्यात त्याने द्विशतक काढले आणि तिथेच सामन्याचा निकाल स्पष्ट करून टाकला होता. सुनीलची एकाग्रता काय प्रतीची होती याचा पुरावा त्याने त्या दिवसाच्या शेवटच्या षटकाच्यावेळी दिला. दिवसभर सुनीलला बॉलिंग करून दिल्ली थकली होती आणि शेवटच्या ओव्हरमध्ये, गोलंदाजाने सुनीलच्या लेग स्टम्पवर, थोडा पुढे चेंडू टाकला ( तो हाफव्हॉली नव्हता) आणि सुनीलने (दिवसभर खेळून!!) तो चेंडू, सणसणीतपणे मिडविकेटमधून सीमापार धाडला!! एकाग्रता कशी असावी, याचा हा सुंदर धडा होता. दिवसभर त्याने गोलंदाजांना रगडून काढले. सुनिलबाबत एक खासियत होती. सुनिलबाबत एक शक्यता असायची (जी शक्यता सगळ्या फलंदाजांबाबत असते) जेंव्हा सुनीलची नजर स्थिरावत नसते किंवा डावाच्या सुरवातीलाच, जेंव्हा सुनील खेळपट्टीचा अंदाज घेत असायचा तेंव्हा गोलंदाजांना त्याला बाद करायची संधी असायची. एकदा का त्याने २०,२२ धावा केल्या की मात्र जेंव्हा सुनील संधी देईल तेंव्हाच तो बाद होणार. जगातील कुठलाही फलंदाज हा सुरवातीला थोडा चाचपडत असतो मग त्याचे तंत्र कितीही अचूक असू दे. अशीच एक इनिंग मला आठवत आहे. पूर्वी मुंबईत "कांगा लीग" स्पर्धा असायची. त्यावेळी मुंबई फलंदाज अतिशय "खडूस" म्हणून प्रसिद्ध असायचे आणि त्या खडूसपणात या कांगा लीग स्पर्धेचा फार मोठा वाटा असायचा. ही स्पर्धा नेहमी पावसाळ्यात खेळवली जायची. मी या स्पर्धेतील बहुतांशी सामने हे शिवाजी पार्क इथे बघितले आहेत आणि सगळे सामने हे फक्त रविवारी(च) खेळले जायचे. रविवारी पाऊस नसला की सामना सुरु!! खेळपट्टी ओलसर आहे, आजूबाजूला गुडघ्याएवढे गावात वाढले आहे, असल्या तक्रारींनी जरा देखील वाव नसायचा. आजच्या T20 स्पर्धेची ही "जननी" म्हणता येईल. केवळ दिवसभराचा प्रश्न असायचा. हवा बहुतेकवेळा कुंद (टिपिकल इंग्लिश वातावरण) असायची परंतु तशा हवेतच हे सामने खेळवले जायचे. एके रविवारी "दादर युनियन" आणि "शिवाजी पार्क" या सांध्यात सामना होता. दादर युनियनमधून सुनील, दिलीप होते तर शिवाजी पार्क मधून संदीप,शिवलकर असे दिग्गज खेळाडू होते. सामन्यात १५० धावा झाल्या हणजे संघाच्या विजयाची शक्यता भरपूर कारण एकत्र खेळपट्टी ओलसर त्यातून Outfield म्हणजे प्रचंड वाढलेले गवत. त्यामुळे तुम्ही कितीही जोरदार फटका मारा, चौकार मिळणे दुरापास्त. अगदीच उंचावरून फटका मारला तरच चौकार मिळण्याची शक्यता. खेळपट्टी ओलसर असल्याने क्लब गोलंदाज देखील रॉबर्ट्स, होल्डिंग वाटायचा!! त्या सामन्यात सुनीलने पन्नाशी गाठली आणि दिलीपने त्याला चाळीस धाव काढून मौल्यवान साथ दिली आणि गंमत म्हणजे इतके असूनही संघाची धावसंख्या फक्त १२९!! संपूर्ण डावात फक्त दिलीपचा एक चौकार सामील होता आणि तो देखील दिलीपने हवेत उंच फटकावला होता म्हणून!! परंतु त्या खेळीत पुन्हा सुनीलने आपल्या तंत्राचे अप्रतिम प्रदर्शन केले. वास्तविक त्यावेळी सुनील,दिलीप,संदीप सगळे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे झाले होते तरीही ते हे सामने खेळायला आले होते. सुनीलने पन्नाशी गाठताना, आपल्या संयमाचे दर्शन घडवले होते. अशा खेळपट्टीवर खेळताना, शक्यतो चेंडूला ड्राइव्ह करणे धोक्याचे असते आणि चेंडू दोन फिल्डर्सच्या मधून काढण्याच्या कौशल्याला महत्व असते आणि तेच सुनीलने शांतपणे दाखवून दिले. संपूर्ण खेळी त्याने बॅकफूटवर सजवली. इथे मनाची खरी कसोटी लागते. अशा वेळी तुम्ही जागतिक कीर्तीचे खेळाडू आहेत याला काही किंमत नसते. अशीच एक असामान्य खेळी मला आठवत आहे. १९८३ सालच्या वेस्ट इंडिज-भारत मालिकेतील शेवटचा सामना चेन्नई इथे होता. दिल्ली आणि अहमदाबाद इथे सुनीलने धुवांधार खेळी करून सगळ्यांना दिपून टाकले होते परंतु पुढील दोन सामन्यात सुनील अगदी लवकर बाद झाला आणि भारताचा पराभव झाला होता. परिणामी सुनीलवर, त्याच्या बदलत्या शैलीवरून टीका झाली. सुनील लवकर बाद झाला याला प्रमुख कारण अँडी रॉबर्ट्स होता. रॉबर्ट्स नुसताच वेगवान गोलंदाज नव्हता तर त्याच्याकडे फलंदाजाचे कच्चे दुवे शोधण्याचे असामान्य कसब होते. किंबहुना मी आता असे सहज म्हणू शकतो वेस्ट इंडिजची जी जगप्रसिद्ध वेगवान चौकडी झाली होती (रॉबर्ट्स,होल्डिंग,गार्नर,मार्शल आणि क्रॉफ्ट) त्यामागे फक्त रॉबर्ट्सचा खरा हात होता. त्याने या सगळ्यांना अक्षरश: घडवले होते. उगीच नाही सुनील आजही रॉबर्ट्सला श्रेष्ठ वेगवान गोलंदाज म्हणून मान्यता देतो. असो, शेवटच्या सामन्यापूर्वी सुनीलवर टीका झाली म्हणून सुनीलने आयुष्यात प्रथमच चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचे ठरवले परंतु दुर्दैवाने परिस्थिती अशी आली, पहिल्याच ओव्हरमध्ये मार्शलने भारताचे २ फलंदाज बाद केले आणि सुनीलला लगेच खेळायला येणे भाग पडले. ही खेळी म्हणजे सुनीलला जगात फलंदाज म्हणून का मान्यता मिळाली याचा अप्रतिम नमुना होता. अक्षरश: त्याने सगळ्या वेगवान गोलंदाजांना रगडून काढले इतके की सुनीलच्या १५० धावा झाल्या आणि तरीही त्याची भूक भागत नाही असे दिसल्यावर लॉइड आणि विव्ह पॅव्हेलियनमध्ये आराम करायला गेले!! या खेळीत सुनीलच्या खेळाचे सगळे सौंदर्य आढळले आणि मुख्य म्हणजे पूर्वीचा सुनील झगझगीतपणे समोर आला. रॉबर्ट्स, होल्डिंग, गार्नर आणि मार्शल, सगळे गोलंदाज थकले पण सुनीलची भूक मंदावली नव्हती. तब्बल २३६ धावा काढून सुनील परतला!! निव्वळ अजोड कौशल्याची प्रचिती देणारी खेळी होती. या खेळीच्या वेळेससुनीलला लोकांच्या टीकेला तर उत्तर द्यायचेच होते परंतु त्याशिवाय, अजूनही तोच पूर्वीचा सुनील कायम असल्याचे सिद्ध करायचे होते आणि ते देखील जगातील प्रलयंकारी वेगवान गोलंदाजांच्या समोर. त्या खेळीत अगदी ठरवून सुनीलने एकही चूक केली नाही. चूक केली आणि तो बाद झाला!! मनाचा निग्रह ही काय चीज असते याचे सगळ्या जगाला दर्शन घडवले.सुनील अशा प्रकारे ठरवून गोलंदाजांचा अंत बघत असे. गोलंदाज थकून जात पण सुनील तसाच खेळपट्टीवर नांगर टाकून उभा राहात असे. अशा दीर्घ केल्ली करायच्या म्हणजे तुमच्याकडे अचाट स्टॅमिना लागतो तसेच सर्वकाळ डोळ्यात तेल घालून खेळावयास लागते. एखादा चेंडू आपल्याला फसवून जातो परंतु त्यामुळे मनात नैराश्य न आणता, पुन्हा नव्याने डावाची उभारणी करायच्या कामाला जुंपून घ्यायचे!! ही बाब सहज जमणारी नव्हती आणि सुनीलने ती कमालीच्या सहजतेने वर्षानुवर्षे करून दाखवली. आजही लॉइड,विव्ह, इयान चॅपेल, रिची बेनॉ सारखे असामान्य खेळाडू सुनीलला कुर्निसात करतात तो केवळ चार लोकांसमोर दर्शविण्याचा देखावा नसतो तर त्यामागे सुनील बद्दलची कृतज्ञता असते. वास्तविक या माणसाकडे कपिल, संदीप सारखी कसलीच "देणगी" नव्हती पण त्याची भरपाई सुनीलने अथकपणे नेट प्रॅक्टिस करून भरून काढली. कितीही आंतर राष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली, बहुमान प्राप्त झाले तरी सुनीलने नेट प्रॅक्टिस कधीही टाळली नाही आणि तिथे त्याने आपल्यातील कमतरता शोधून, त्यावर उपाय शोधण्याचा अथक प्रयत्न केला. ही जी निष्ठा होती, त्या निष्ठेची ही खरी किंमत आहे. त्याला नेमके माहीत होते, आज आपल्याला जगात किंमत आहे ती आपल्या फलंदाजीमुळे. तिथे मेहनत घेण्यात त्याने कधीही कुचराई दाखवली नाही आणि आपली बॅट नेहमीच तालेवार ठेवली. जगात त्याला सर्वतोपरी मानायला मिळत असताना अचानक त्याला जाणवले, आता आपल्याला थकायला होत आहे आणि ही जाणीव झाली आणि त्याने निवृत्ती स्वीकारून जगाला आश्चर्याचा धक्का दिला. असे खेळाडूं इतिहासात फार क्वचित जन्माला येतात आणि आमच्या पिढीचे भाग्य असे की असा खेळाडू आम्हाला डोळे भरून बघता आला.

Friday, 28 August 2020

सुनील गावस्कर

उंची साधारण सव्वा पाच ते साडे पाच फूट, कुरळे केस, शरीरयष्टी काहीशी स्थूलत्वाकडे झुकणारी, नजर मात्र अति तीक्ष्ण पण पहिल्या दर्शनात या व्यक्तीकडे काही असामान्य गुण असतील, याची काहीशी शंका यावी असे व्यक्तिमत्व!! परंतु एकदा हातात बॅट आली की हा एका अलौकिक तेजाने तळपायला लागायचा. सामना कुठला ही असू दे, हा नेहमीच शांतपणे तंबूतून बाहेर पडणार, स्टम्पजवळ येणार आणि अम्पायरकडे "मिडल गार्ड" मागणार. जगभर बहुतांशी फलंदाज "लेग गार्ड" घेतात परंतु हा वेगळाच!! "मिडल गार्ड" घेण्यात कायम एक धोका असतो, चेंडू खेळताना फलंदाज ऑफ स्टम्पकडे थोडासा "शफल" होत असतो आणि इथे सर्वात मोठा धोका उद्भवतो - मिडल स्टम्पवरून ऑफ स्टम्पवर शफल होताना आपला लेग स्टम्प उघडा राहू शकतो आणि जर का चेंडूचा अंदाज चुकला ते त्रिफळाचीत होण्याचा सर्वात जास्त धोका असू शकतो. परंतु इथे "अंदाज चुकला" हे शब्द या फलंदाजाबाबत येऊच शकत नसत इतका दुर्दम्य आत्मविश्वास होता. सुनीलला आयुष्यभर याच अदम्य आत्मविश्वासाने नेहमी साथ दिली. फॉर्म येतो, जातो, पुन्हा येतो. हे तर नेहमीचे नैसर्गिक चक्र असते परंतु आपला आत्मविश्वास कधीही डळमळीत होऊ द्यायचा नाही, हे सुनीलच्या आयुष्याचे ब्रीदवाक्य!! सुनीलचे तंत्र, त्याचे पदलालित्य, त्याचा अंदाज या विषयी असंख्य वेळा असंख्या लेख लिहिले गेले आहेत. प्रसंगी खोलवर विश्लेषण देखील केले आहे परंतु आत्मविश्वास ही चीज कुठेही उचलून दाखवता येणारी नसते, तिचा इतरांना प्रत्यय येत असतो. एक अविस्मरणीय क्षण आठवला. १९८२ साली भारतीय संघ पाकिस्तानमध्ये गेला होता आणि तेंव्हा इम्रानने आपल्या असामान्य इन्स्वीन्ग गोलंदाजीने धुमाकूळ घातला होता. भारत ही मालिका हरला होता. याच मालिकेत सुनील तेजाळून उठला होता. तिसरा कसोटी सामना चालू होता. इम्रानने दुसरा सामना एकहाती पाकिस्तानला जिंकून दिला होता आणि तिसरा सामना याच वाटेवर चालला होता फक्त मध्ये अडसर सुनीलचा होता. सुनीलने पन्नाशी गाठली होती आणि त्याच आत्मविश्वासाने त्याची फलंदाजी सुरु होती. इम्रानने (तेंव्हा इम्रान ताशी १५० कि.मी. वेगाने गोलंदाजी करीत होता) एक चेंडू त्वेषाने मिडल स्टम्पवर, काहीसा आखूड टप्प्याचा टाकला. सुनीलने क्षणभर चेंडूच्या बाउंसचा अंदाज घेतला आणि मिडल स्टम्पवरील चेंडू सोडून दिला!! सुनीलचा तो अंदाज बघून इम्रान थक्क झाला!! त्याला चेहऱ्यावरील आश्चर्य लपवता आले नाही!! जगातील सगळ्या फलंदाजांनी तो चेंडू निश्चितपणे खेळला असता - काहीही घडू शकले असते पण हा चेंडू स्टम्पवरून जाणार आहे तेंव्हा बॅट लावायची कशाला? आणि सुनीलने तो चेंडू विकेटकीपरकडे जाऊ दिला!! क्षण हा शब्द देखील मोठा आहे इतक्या निमिषार्धात घेतलेला अंदाज आणि निर्णय. इथे तंत्र तर आवश्यक होतेच परंतु चेंडूच्या बाउंसचा अचूक अंदाज घेणे, या कौशल्याला दाद द्यावी, अशी परिस्थिती होती. सुनीलचा स्टान्स अगदी सरळ, साधा होता. बॅट आणि पॅडमध्ये हवेला देखील जायची संधी मिळणार नाही इतक्या लगटून उभा राहायचा. एरव्ही काहीसा मिस्कील दिसणारा सुनील एकदा फलंदाजीला उतरला की संपूर्ण जगाला विसरून जायचा. जगाला विसरून पूर्णपणे एकाग्र होणे, ही बाब भल्याभल्यांना जमत नाही. एकाग्रता हा त्याचा अभेद्य भाता होता. त्या जोरावर सुनील खेळपट्टीवर संपूर्ण दिवस उभा राहायचा. गोलंदाज शिणून जायचे पण याच्या एकाग्रतेवर किंचितही परिणाम व्हायचा नाही. आमची पिढी खरोखर नशीबवान, सुनीलला आम्ही यथेच्छ बघितला, नसता बघितला नसून, त्यांच्या फलंदाजीतील सौंदर्याचा पुरेपूर उपभोग घेतला. त्याच्या काळात वेस्टइंडिजमध्ये ग्रीनिज, विव्ह, लॉइड सारखे "हातोडे" तर पुढे खुद्द भारतीय संघात, संदीप, कपिल, प्रसंगी दिलीप सारखे घणाघाती फलंदाज होते पण सुनीलने पहिली १२ वर्षे आपली शैली बदलायचा चुकूनही प्रयत्न केला नाही. समोर कितीही वादळे येवोत, सुनीलने आपला approach कधीही बदलला नाही. गरजच पडली नाही. याला म्हणतात आत्मविश्वास. फलंदाजीचे त्याचे तंत्र तर आजही निवृत्त होऊन, ३३ वर्षे झाली तरी वाखाणणलें जाते, किंबहुना "आदर्श" मानले जाते. ३३ वर्षे झाली म्हणजे फलंदाजीच्या ३ पिढ्या आल्या आणि गेल्या. फलंदाजीच्या तंत्रात आता आमूलाग्र बदल झाले. इतकेच कशाला बॅटीचे वजन, दर्जा इत्यादी फार पुढे गेले पण तरीही आजही फलंदाजीचे तंत्र म्हटल्यावर सुनील(च) डोळ्यासमोर येतो!! त्याने आपली शैली प्रथमच बदलली ती १९८३ मध्ये भारतात आलेल्या लॉईडच्या संघासमोर खेळताना. वेस्ट इंडिजचा संघ डिवचलं गेला होता आणि विश्वचषकातील, भारताकडून झालेल्या पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्याचा बदल घेण्याच्या उद्दीष्टानेच वेस्ट इंडिजचा संघ भारतात आला होता आणि कानपूरच्या पहिल्याच कसोटी सामन्यात याची चुणूक दिसली होती. आयुष्यात प्रथमच मार्शलच्या प्रलयंकारी वेगाने, सुनीलच्या हातातील बॅटीवरील पकड निसटली आणि सुनील बाद झाला. अशाप्रकारे बाद होणे ही नामुष्की तर होतीच पण सुनीलचा आत्मविश्वास खचवणारी घटना होती. याच पार्श्वभूमीवर दिल्लीला दुसरा कसोटी सामना सुरु झाला आणि सुनीलने आपले रौद्ररूप दाखवायला सुरवात केली. गेली १२ वर्षे म्यानात घालून ठेवलेला "हूक" चा फटका बाहेर काढला आणि मैदानावर आगीचा लोळ पसरायला लागला. मार्शल, होल्डिंग आणि डेव्हिस सारखे आग्यावेताळी गोलंदाज, पहिल्या कसोटीची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने गोलंदाजी करीत होते आणि सुनीलने त्यांना "हूक","पूल" तसेच चेंडू जरा ऑफ स्टम्पवर पडत आहे, लक्षात आल्यावर गुडघ्यात किंचित वाकून त्यांनी कव्हर ड्राइव्ह मारायला सुरवात केली. सगळा स्टेडियम तर अवाक झालाच होता पण आमच्यासारखे टीव्हीवर बघणारे, आपले डोळे विस्फारून हे "युद्ध" बघत होते. त्या दिवशी सुनीलने अगदी ठरवून मार्शलच्या गोलंदाजीवर प्रतिहल्ला चढवला होता. वेस्ट इंडिज संघ हतबल झाला होता. सुनीलकडून अतर्क्य अशी खेळी होत होती. मार्शलने आखूड टप्प्याचे चेंडू टाकले की सुनील किंचित बॅकफूटवर जात असे आणि खांद्यातून हूक मारीत असे. असे थोडा वेळ चालल्यावर लॉइडने स्क्वेयर लेग आणि लॉन्गलेग इथे क्षेत्ररक्षक ठेवले पण त्या दिवशी सुनीलने त्यांच्या मधून पूल आणि हूकचे फटाके मारून चौकार वसूल केले. हा अलौकिक प्रतिहल्ला होता. आपले तंत्र किती अचूक आहे याची प्रचिती त्याने आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात दिली. बंगलोरची खेळपट्टी म्हणजे फलंदाजीचे स्मशानघर होते आणि मंदगती गोलंदाजांना नंदनवन होते. पाकिस्तानच्या दोन्ही इंनिंग्स मध्ये एकानेही पन्नाशी गाठली नाही तर भारताच्या पहिल्या इनिंगमध्ये फक्त दिलीपने ५० धावा केल्या होत्या पण याच पार्श्वभूमीवर भारताला शेवटच्या दिवशी २२५ धावा करायच्या होत्या. या डावात इम्रानने एकही षटक टाकले नाही!! सुरवातच अक्रमने केली आणि दुसऱ्या बाजूने इकबाल कासीम आणि तौसिफ़ अहमद यांची दुतर्फा मंदगती गोलंदाजी सुरु केली. मंदगती गिलंदाजी जरी असली तरी आखूड टप्प्याचा चेंडू फलंदाजाच्या खांद्यापर्यंत, क्वचित त्याच्याही वर उसळत होता आणि चेंडू अक्षरश: १८० अंशाच्या कोनात फिरत होता. धावा करणे तर बाजूलाच राहो पण तिथे नुसते उभे राहणे अशक्य होते आणि इथे सुनीलने आपला खरा दर्जा दाखवला. गोलंदाज धार्जिण्या खेळपट्टीवर कसे खेळायचे याचा असामान्य धडा घालून दिला. त्याने ९७ धावा केल्या पण एका अकल्पित असलेल्या चेंडूने त्याचा बळी घेतला. सुनीलला सामनावीर म्हणून गौरवले पण भारत फक्त १६ धावांनी सामना हरला. आजही सुनीलची ती बॅटिंग आदर्श म्हणून गौरवले जाते. मी ती इनिंग पहिल्या चेंडूपासून बघितली (टीव्हीवर!!) आणि खरोखर सुनीलला मनापासून लोटांगण घातले. अचानक उसळलेला चेंडू असला तरी सुनीलची बॅट चेंडूच्या रेषेत यायची आणि बॅटीवरील उजवा हात किंचित हलका करायचा आणि निव्वळ डाव्या हाताने बॅट ढालीसारखी पुढे आणायची आणि डिफेन्सिव्ह फटका खेळायचा पण तो कसा? तर बॅटीने चेंडू अडवताना चेंडू आपल्या पायाशीच पडणार आणि कुठेही इतरत्र जाणार नाही याची खात्री करून देणार!! किती अलौकिक तंत्र आहे हे!! सुनीलने भारताला अनेक गोष्टी शिकवल्या. मुख्य म्हणजे सलामीच्या फलंदाजीचा प्रश्न कायमचा निकालात काढला. सलामीला येऊन वेगवान गोलंदाजी कशी खेळायची, याचे तंत्र शिकवले, भारतीय संघाला आत्मविश्वास दिला. सुनीलने अपवाद प्रसंग वगळता मैदानावर फलंदाजी करताना कधीही आक्रस्ताळेपणा केला नाही, जरुरी भासलीच नाही. आजूबाजूला कितीही "स्लेजिंग" झाले तरी सुनील बर्फाप्रमाणे थंड असायचा. फलंदाजीचे असामान्य तंत्र शिकवले. क्रिकेट पुस्तकातील प्रत्येक फटका त्याच्या भात्यात होता आणि त्याचा त्याने सढळ हाताने उपयोग केला. सुनील, कव्हर ड्राइव्ह मारणार म्हणजे तो copy book style असणार याची ग्वाही दिली. फलंदाजीचे तंत्र त्याला शरण गेले होते. या बुटुक बैंगण फलंदाजाने भारताला क्रिकेटचे वेड लावले आणि Original Little Master ही उपाधी कायम सार्थ करून दाखवली. सुनील कधीही मैदानावर विजेप्रमाणे लखलखून गेला नाही तर देवघरातील नंदादीपाप्रमाणे शांतपणे तेवत राहिला. सुनील निवृत्त झाला आणि हा नंदादीप विझला!!

Tuesday, 27 August 2019

एक असामान्य खेळी

क्रिकेट खेळाची खरी गंमत कधी येते? फलंदाज, दणादण गोलंदाजी फोडून काढत आहे तेंव्हा की, गोलंदाज, आपल्या गोलंदाजीने, फलंदाजांना सळो की पळो करीत आहेत, हे बघताना? वास्तविक, दोन्ही गोष्टी, प्रेक्षकांच्या दृष्टीने नयनरम्य पण तरीही, एक खेळ म्हणून विचार केला तर, हे सगळे एकांगी असते आणि इथे खेळाडूच्या कौशल्याची परीक्षा घेतली जात नाही.उदाहरण दिले तर हा मुद्दा अधिक चांगल्या प्रकारे पटू शकेल. ऑस्ट्रेलियातील पर्थची खेळपट्टी बहुतेकवेळा वेगवान गोलंदाजाना सहाय्य करणारी असते आणि त्यामुळे तिथे वेगवान गोलंदाज, गोलंदाजी करायला नेहमीच उत्सुक असतात. यात एक बाब प्रकर्षाने पुढे येते. खेळपट्टी अति वेगवान असल्याने, साधारण कुवतीचा वेगवान गोलंदाज देखील, आपला प्रभाव पाडू शकतो.हाच प्रकार, "पाटा" खेळपट्टीवर देखील उलट्या प्रकारे घडतो. तिथे गोलंदाजांना खेळपट्टीकडून कसलेच सहाय्य मिळत नाही आणि आपली गोलंदाजी फोडून काढली जात आहे, हे असहाय्य नजरेने बघत बसावे लागते. अर्थात, स्पिनर्स बाबत हाच प्रकार घडतो. स्पिनर्स, प्रमाणाच्या बाहेर चेंडू वळवू शकतात आणि फलंदाज हताश होतात. ज्यांना "खऱ्या" क्रिकेटमध्ये रस आहे, त्यांच्या दृष्टीने, हे सगळे दयनीय!!
ज्या खेळपट्टीवर, दोघांनाही समसमान संधी असते, ती "आदर्श" खेळपट्टी. गोलंदाजाने टाकलेला चेंडू सुंदर स्विंग होत आहे, छातीपर्यंत "बाउन्स" घेत आहे आणि फलंदाजाला देखील, आपला सगळा अनुभव पणास लावून खेळण्याची गरज भासत आहे. इथे हा खेळ खऱ्याअर्थी रंगतो आणि हे खरे "द्वंद्व"!! मला सुदैवाने, अशा प्रकारचे द्वंद्व एका सामन्यात, प्रत्यक्षात बघायला मिळाले होते.
२०१०/११ साली भारतीय संघ, साउथ आफ्रिकेत आला होता, त्यावेळी भारतीय संघ बराच नावाजलेला होता आणि त्याचे प्रत्यंतर टेस्ट सामन्यांच्या मालिकेत आले. मी ज्याला "द्वंद्व" म्हणतो, तशा प्रकारचा सामना, मला तिसऱ्या कसोटीत, केप टाऊन इथल्या सामन्यात बघायला मिळाले. वास्तविक केप टाऊन इथली खेळपट्टी, डर्बनप्रमाणे गोलंदाजी धार्जिणी नसते परंतु या सामन्याच्या वेळेस, खेळपट्टीवर थोडे गवताचे पुंजके दिसत होते आणि हे चिन्ह म्हणजे वेगवान गोलंदाजीला आमंत्रण!!
साऊथ आफ्रिकेने, सामन्याची सुरवात केली आणि पहिल्या डावात, ३६२ धावा केल्या. भारताची सुरवात अडखळत झाली. अर्थात, याला कारण डेल स्टेन. त्या दिवशीची स्टेनची गोलंदाजी बघताना, मला पूर्वीचे म्हणजे १९८० च्या दशकातले वेस्ट इंडियन गोलंदाज आठवले, विशेषत: मायकेल होल्डिंग!! पहिल्या ओवर पासून, स्टेनला लय सापडली होती आणि तो अक्षरश: खेळपट्टीवर "आग" ओतत होता. खेळपट्टी तशी गोलंदाजाला साथ देणारी नव्हती . म्हणजे स्टेन जरी १५० च्या गतीने गोलंदाजी करीत होता तरी, भयानक तुफान, असे नव्हते, विखार होता. पहिल्या षटकापासून, स्टेनला लय सापडली आणि त्याने चेंडू दिवसभर ऑफ स्टंप,त्याच्या बाहेर किंवा मिडल स्टंप, याचा रेषेत ठेवला होता. चेंडूला चांगलीच "उशी" मिळत होती. याचा परिणाम, फलंदाजाला सतत सतर्क राहणे आवश्यक!!
काहीवेळा सचिन खेळायला आला. तो आला, तशी स्टेनने वेग वाढवला आणि पहिलाच चेंडू, त्याने, ऑफ स्टंपवर टाकला आणि बाहेर काढला, आउट स्विंग - चेंडू छातीच्या उंचीवर होता आणि ऑफ स्टंपवर टप्पा पडून बाहेर निघाला!! अगदी सचिन असला तरी तो "माणूस" असल्याचा तो "क्षण होता, खरतर, सचिनचा अंदाज चुकला आणि चेंडू विकेटकीपरकडे गेला. प्रेक्षकातील, भारतीयांचा श्वास अडकेला, मोकळा झाला (यात अस्मादिक देखील!!) पुढील, ३ चेंडू म्हणजे खरे "द्वंद्व" होते. सचिनच्या आजूबाजूला क्षेत्ररक्षकांची साखळी होती आणि स्टेनने, आखूड टप्प्याचे चेंडू टाकले. सचिनकडे एकच पर्याय, चेंडू नुसता ढकलणे!! त्याने तेच केले. शेवटचा चेंडू मात्र, आजही माझ्या आठवणीत आहे. हा चेंडू, ऑफ स्टंपच्या किंचित बाहेर पडला होता आणि आतल्या बाजूला वळला - इन स्विंग - थोडा आखूड टप्पा होता आणि सचिनने आपली "गदा"फिरवली आणी ती इतकी अप्रतिम होती की, चेंडूचा टप्पा पडला आणि पुढल्या क्षणी चेंडू, Point दिशेने सीमापार!! मैदानावर क्षेत्ररक्षण करणारे, सगळे खेळाडू अवाक!!
चेंडूचा वेग १४८ कि.मी. होता (तिथल्या स्क्रीन बोर्डवर तो वेग दाखवला होता!!), चेंडू "बाउन्स" घेण्याच्या स्थितीत आला होता परंतु तो "बाउन्स" पूर्ण होण्याआधी सचिनने कमाल दाखवली होती. गोलंदाजावर "मानसिक" आघात करणारा क्षण होता, पण असे काही मानून घेणारा, स्टेन नव्हता, हे पुढील षटकावरून ध्यानात आले., या फटक्याने, जणू स्टेन चवताळला होता!! पुढील षटक, पूर्णपणे, सचिनने खेळून काढले. पहिले दोन चेंडू, सचिन चुकला पण, गंमत अशी होती, तिसरा चेंडू त्याने "कव्हर्स" मधून सीमापार धाडला!!
त्यापुढील जवळपास चार तास, हे दोन कोब्रांमधील द्वंद्व होते आणि सगळा स्टेडीयम, भान हरपून, ही लढाई बघत होता. स्टेनने त्या डावात, ३१ षटकात ५ बळी घेतले होते. खरेतर तो अधिक बळी सहज घेऊ शकला असता पण, त्याची गोलंदाजी बहुतांशी सचिनने खेळून काढल्याने, त्याचे यश मर्यादित राहिले. त्या डावात स्टेनने एकही चेंडू, ज्याला "हाफव्हॉली" म्हणतात तशा प्रकारचा टाकला नाही. म्हणजे पाय टाकून, चेंडू फटकावणे, जवळपास अवघड. असे असून देखील त्या डावात सचिनने दोन चौकार असे मारले होते, त्याला तोड नाही. दोन्ही फटके एकाच दिशेने मारले होते.
तेंव्हा सचिन पन्नाशी ओलांडून पंचाहत्तरीकडे शिरत होता. स्टेनने, पहिला चेंडू, असाच आखूड टप्प्याचा टाकला होता पण सचिनने, आपला डावा पाय पुढे आणला आणि "On the Up" प्रकारे त्याने "कव्हर्स" मधून सीमापार हाणला. हा फटका, अति अवघड म्हणावा लागेल कारण चेंडूचा टप्पा उशी घेत असताना(च) असा फटका खेळण्याचे धैर्य दाखवणे!! फटका चुकला तर झेल १००%!! त्या डावात सचिनने, १४६ धावा केल्या पण मला तरी असेच वाटते, या सारखी खेळी त्याने आयुष्यात फार कमी वेळा, अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल, इतक्या इनिंग्जमध्ये केली आहे - इथे मी फक्त टेस्ट सामन्यांचा(च) विचार करीत आहे. अशी खेळी खेळणे, हे कुठल्याही खेळाडूला संपूर्ण समाधान देणारे असते. मी, या खेळीचा साक्षीदार होतो, याचा आनंद काही वेगळाच.

अवाक करणारी गोलंदाजी

खेळपट्टीवर बऱ्यापैकी गवत, बाकीचे मैदान लुसलुशीत हिरवळीने भरलेले. वातावरण चांगल्यापैकी थंडगार आणि आभाळ काळ्या ढगांनी भरलेले!! असे वातावरण वेगवान गोलंदाजाच्या दृष्टीने पर्वणी असते. हातातील नवीन, चकचकीत लाल चेंडूची करमत दाखवायला यापेक्षा वेगळ्या वातावरणाची अजिबात गरज नसते. फलंदाजाची खरी कसोटी अशा वेळी लागते. गोलंदाज ताजेतवाने असतात. मला तर अशा वेळी गोलंदाजी करणारे गोलंदाज, हे भक्षाच्या शोधात निघालेल्या चित्त्यासारखे वाटतात. दुसऱ्या बाजूने विचार केला तर अशाच वेळी गोलंदाजाला आपल्या भावनांवर काबू ठेऊन, आलेल्या फलंदाजाच्या वैगुण्याची ओळख ठेऊन, आडाखे बांधणे आवश्यक वाटते. एकतर सलामीला फलंदाजी करणे, हेच मोठे आव्हान असते. खेळपट्टीचा केवळ "अंदाज" असतो आणि तो देखील त्या खेळाडूच्या अनुभवाच्या जोरावर बांधलेला!! इथे तर खेळपट्टीवर चांगल्यापैकी गवत आहे म्हणजे चेंडू अंगावर येणार,तो भयानक वेगाने आणि त्याचा "स्विंग" कसा आणि किती होणार, याचा देखील अंदाज केलेला!! क्रिकेट हा खेळ फसवा असतो, तो इथे. खेळपट्टीवरून चेंडू किती वेगाने आपल्याकडे येईल, किती "बाउन्स" घेईल. कशा प्रकारे "स्विंग" होईल, याबाबत कसलेच ठाम ठोकताळे मांडता येणे केवळ अशक्य!!
खरेतर चेंडू "स्विंग" होतो म्हणजे काय होतो? हवेतील आर्द्रता आणि चेंडूचा वेग, याचे गणित मांडून, चेंडू हवेतल्या हवेत किंचीत "दिशा" बदलून, फलंदाजाकडे येतो!! इथे एक बाब ध्यानात घ्यावीच लागेल, वेगवान गोलंदाज, म्हणजे कमीत कमी १४० कि. मी. वेगाने फेकलेला चेंडू. अर्थात, हवेत स्विंग होणारा चेंडू, खेळपट्टीवर टप्पा पडल्यावर देखील आणखी थोडा "आत" किंवा "बाहेर" जाऊ शकतो आणि इथे भलेभले फलंदाज गडबडून जातात आणि यातून कुठलाही फलंदाज आजतागायत कायम स्वरूपी वर्चस्व गाजवू शकलेला नाही!!
अर्थात, चेंडू कसा स्विंग करायचा याचे देखील शास्त्र आहे. चेंडूची शिवण दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटांमध्ये ठेऊन, चेंडू टाकताना आपला हात, स्लीपच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने न्यायचा. अर्थात, हा झाला पुस्तकी नियम आणि या नियमानुसार, याला "आउट स्विंग" म्हटले जाते. "इन स्विंग" अर्थात नावानुसार वेगळ्या पद्धतीने टाकला जातो. चेंडूची शिवण आडव्या प्रकारे तळहातात पकडून, हात "लेग स्लीप"च्या दिशेने न्यायचा आणि सोडायचा. "आउट स्विंग" हा खेळायला अतिशय कठीण, असे मानले जाते आणि याचे प्रमुख कारण म्हणजे, अशा प्रकारचा चेंडू खेळताना, Bat ची कड घेऊन, चेंडू, झेलाच्या स्वरुपात क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावू शकतो किंवा विकेट कीपरच्या ग्लोव्हजमध्ये!!
बाबतीत वेस्ट इंडीजचा, मायकेल होल्डिंग हा आदर्श गोलंदाज ठरावा. १९७५ साली आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलेला हा गोलंदाज, अल्पावधीत फलंदाजाचा कर्दनकाळ ठरला. त्यावेळी, त्याचा वेग केवळ अविश्वसनीय होता. विशेषत: इंग्लंडच्या थंडगार वातावरणात तर त्याच्या गोलंदाजीला तेज धार यायची. हुकमी स्विंग करण्यात, हातखंडा!! ताशी १५० कि.मी. वेगाने चेंडू टाकताना, केवळ मनगटाच्या हालचालीत किंचित बदल करून, चेंडूला अप्रतिम दिशा द्यायचा. एक उदाहरण देतो. इंग्लंडचा बॉयकॉट हा, तंत्राच्या बाबतीत अतिशय काटेकोर असा सलामीचा फलंदाज होता. १९७७ च्या वेस्टइंडीज दौऱ्यात, त्यावेळी, रॉबर्ट्स, होल्डिंग, क्रोफ्ट आणि गार्नर ही चौकडी भलतीच फॉर्मात होती आणि त्यांनी त्यावेळेस इंग्लंडला "त्राहीभगवान" करून सोडले होते. अशाच एका सामन्यात, होल्डिंगनेबॉयकॉटला त्रिफळाचीत केले, तो चेंडू कायमचा स्मरणात राहील असा होता. हवेत गारवा होता आणि होल्डिंग नव्या गोलंदाजी करायला आला. विकेट गेली, तो चेंडू नीट बघता, त्यातील "थरार" अनुभवता येईल.
होल्डिंगने तसा नेहमीच्या शैलीत चेंडू टाकला आणि त्याचा टप्पा, किंचित पुढे टाकला. बॉयकॉटने चेंडूची दिशा ओळखून, किंचित पाय पुढे टाकला आणि चेंडू थोपवण्याचा प्रयत्न केला. त्याला वाटले, चेंडू बहुदा "इन स्विंग" होईल आणि त्यानुसार त्याने हातातली bat किंचित तिरपी करून, चेंडूच्या रेषेत आणायचा प्रयत्न केला परंतु. एकाच शैलीत दोन्ही स्विंग टाकण्याच्या कलेत वाकबगार असलेल्या होल्डिंगने, तो चेंडू, "आउट स्विंग" केला आणि Bat व pad मध्ये किंचित "फट" राहिली आणि चेंडू त्यातून आत गेला आणि यष्ट्या उध्वस्त झाल्या!! प्रथम कुणालाच काही समजले नाही आणि जेंव्हा समजले तेंव्हा, केवळ बॉयकॉटच नव्हे तर वेस्टइंडीज मधील सगळे खेळाडू केवळ चकित झाले. आजही, ही delivery क्रिकेट इतिहासातील 'अजरामर" delivery मानली जाते.
आता यात नेमके काय घडले? चेंडूचा वेग तर अवाक करणारा नक्कीच होता परंतु जेंव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळता तेंव्हा चेंडूचा वेग, ही बाब जरी लक्षणीय असली तरी फार काळ कुतूहलाची बाब ठरत नाही. खरी गंमत होती, चेंडूचा असामान्य स्विंग!! चक्क, चेंडू "स्पिन" व्हावा, त्या अंशात आत वळला आणि फलंदाजाचा अंदाज, पूर्णपणे फसला!! क्रिकेट खेळात, वेगवान गोलंदाजीचा सामना करणे, किती अवघड असते आणि जो फलंदाज त्यात यशस्वी होतो, त्यालाच खरी मान्यता मिळते. याचा अर्थ स्पिनर्सना काहीच किंमत नाही, असे नव्हे पण त्याबद्दल पुढे कधीतरी.

Tuesday, 14 May 2019

एकनाथ सोलकर

१९७१ ची इंग्लंडमधील भारत/इंग्लंड मधील ओव्हल मैदानावरील सामना. चंद्रशेखरचा "जादुई" हात करामत दाखवत होता आणि इंग्लंडचे  जवळपास हतबल झाले होते. खेळपट्टीवर इंग्लंडचा विकेटकीपर अॅलन नॉट आला होता - इंग्लंडचे शेवटचे आशास्थान, विशेषतः अॅलन नॉटची unorthodox फलंदाजी नेहमीच प्रतिस्पर्धी संघाला डोकेदुखी असायची, सामना एकहाती फिरवण्याची किमया साधून जाणारी अलौकिक कला अॅलन नॉटकडे होती. चंद्रशेखरने आपली गोलंदाजी सुरु केली, एक चेंडू अचानक उसळला आणि गरकन फिरला (हे तर चंद्रशेखरचे खास वैशिष्ट्य - चेंडूचा वेग आणि अचानक फिरणारी फिरकी)!! अॅलन नॉट किंचित भांबावला आणि त्याच्या ग्लोव्हजला चेंडूचा किंचित स्पर्श झाला आणि चेंडू लेग साईडला थोडासा उडाला आणि मैदानावर आश्चर्य घडले. जो झेल केवळ स्वप्नावस्थेत देखील अशक्य वाटत होता, तो झेल फॉरवर्ड शॉर्ट लेगवरील सोलकरने जमिनीसमांतर शरीर झोकून झेल पकडला!! प्रेक्षक तर अवाक झालेच परंतु भारतीय संघातील इतर खेळाडू आणि खुद्द अॅलन नॉटचे डोळे विस्फारले. निव्वळ अचाट क्षेत्ररक्षणाचा अलौकिक आविष्कार होता. मुळात हा झेल नव्हताच परंतु एकनाथने त्याचे झेलात रूपांतर केले. नसलेले झेल पकडणे, त्याचे रूपांतर करणे, यामुळे आजही एकनाथ सोलकर हा फॉरवर्ड शॉर्ट लेगचा "बादशहा" समजला जातो. एखाद्या फलंदाजांची किंवा गोलंदाजांची दहशत वाटणे, क्रिकेटमध्ये नेहमीच आढळते परंतु फॉरवर्ड शॉर्ट लेगला सोलकर उभा आहे, ही वास्तवता फलंदाजाच्या काळजात धडकी भरवणारी होती. 
सडपातळ बांधा, शेलाटी उंची, अत्यंत लवचिक शरीर आणि प्रचंड आत्मविश्वास घेऊनच एकनाथ सोलकर जन्माला आला होता. मंदगती तसेच मध्यमगती गोलंदाजी, कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची मानसिक तयारी आणि खरे सांगायचे तर "फॉरवर्ड शॉर्ट लेग" ही क्षेत्ररक्षणाची जागा त्यानेच जगद्विख्यात केली. अगदी नेमके सांगायचे झाल्यास, क्रिकेट पुस्तकाच्या दृष्टीने सोलकर फॉरवर्ड शॉर्ट लेगच्या जागेपेक्षा थोडा १,२ इंच पुढेच उभा राहायचा!! जे प्रत्यक्ष क्रिकेट खेळले आहेत, त्यांना या विधानातील दाहकता समजून घेता येईल. सर्वसाधारणपणे, कुठलाही फलंदाज हा लेगकडे फटाके खेळण्यात वाकबगार असतो आणि तिथेच ही जागा अधिक धोकादायक असते पण सोलकरने याची कधीच पर्वा केली नाही आणि बेडरपणे तिथे उभा राहून, निव्वळ अशक्यप्राय वाटणारे झेल घेऊन, संघाला नेहमीच प्रचंड मोठे योगदान दिले. 
एकनाथच्या शरीरात हाडे आहेत का? असला कौतुकमिश्रित प्रश्न आम्ही मित्र एकमेकांना  विचारत असू. वास्तविक त्याची मध्यमगती गोलंदाजी ही कामचलाऊ अशीच होती पण तरीही त्याने इंग्लंडच्या बॉयकॉटला गोंधळात टाकले. बहुदा इंग्लंडमधील हवामान एकनाथच्या मदतीला येत असणार परंतु सोलकर अप्रतिम मंदगती गोलंदाजी टाकायचा. त्यावेळी भारतीय संघात जगप्रसिद्ध त्रिकुट असल्याने त्याला फार वेळा संधी मिळाली नाही परंतु टाइम्स शिल्ड किंवा रणजी सामन्यातून सोलकर आपल्या मंदगती गोलंदाजीचा दर्जा दाखवून द्यायचा. त्यावेळी टाइम्स शिल्ड मध्ये मफतलाल आणि स्टेट बँक हे संघ अतिशय नावाजलेले संघ होते. मफतलाल मधून सोलकर तर स्टेट बँकेतून वाडेकर खेळायचे आणि त्यांचे द्वंद्व बघणे, आमच्या सारख्या तरुण मुलांना पर्वणी असायची. त्यावेळी, मॅच सुरु होण्याआधी मैदानावर थोडा वेळ नेट प्रॅक्टिस चालायची आणि मी अगदी जवळून ती प्रॅक्टिस बघत असे. एकदा, मफतलाल आणि स्टेट बँक असा सामना सुरु होता. सकाळची नेट प्रॅक्टिस सुरु होती. एकनाथने स्पिन गोलंदाजी सुरु केली. मी नेटच्या पाठीच उभा होतो. फलंदाज कोण होता, ते आता आठवत नाही पण सोलकरने एक चेंडू  टाकताना,मनगट शर्टाच्या मागे लपवून उलटे फिरवले (कसे केले हे आजही मला अगम्यच आहे) आणि चेंडू  डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाच्या दृष्टीने ऑफ स्पिन केला होता, मनगटाची हालचाल तशीच होती पण अखेरच्या क्षणी, त्याने फ्लिपर टाकला ( तो फ्लिपर होता हे नंतर कळले) आणि फलंदाज गोंधळला!! तो कधी बाद झाला, ते त्यालाच कळले नाही. दिसले ते फक्त एकीच्या (त्याला सगळेजण "एकी" या नावानेच हाक मारायचे) चेहऱ्यावरील निर्मळ हास्य. पुढे सामना सुरु झाल्यावर वाडेकर फलंदाजीसाठी आला आणि त्याला एकीने तसाच चेंडू टाकला आणि वाडेकर फसला. स्लिपमध्ये झेल दिला आणि बाद झाला. वास्तविक स्पिन गोलंदाजी खेळण्यात वाडेकर दादा माणूस होता पण सोलकरने त्याला चुटकीसरशी उडवला!! सामना एकहाती मफतलाल संघाला जिंकवून दिला. 
एकी मुंबई संघाचा खऱ्याअर्थी आधारस्तंभ होता. हा खेळाडू कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करायला तयार असायचा. कसोटी सामन्यात एकदा तर सलामीला उतरलेला होता. आत्मविश्वास अंगात ठासून भरलेला होता म्हणूनच हेल्मेट नसलेल्या काळात देखील फॉरवर्ड शॉर्ट लेग सारख्या जागेवर बिनधास्त वावरायचा. चंद्रशेखरच्या अकल्पित गोलंदाजीवर झेल पकडणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. म्हणूनच आजही सोलकर, वाडेकर आणि वेंकट हे स्लिप आणि फॉरवर्ड शॉर्ट लेग मधील असामान्य क्षेत्ररक्षक मानले जातात. (यात विकेटकीपर म्हणून किरमाणीचे नाव घ्यायलाच लागेल) त्यावेळी मुंबई संघात, Caught Solkar Bowled Shivalkar हे वाक्य मुंबईत चलनी  नाण्यासारखे प्रसिद्ध होते. 
एकनाथ सोलकर हा मी पाहिलेला पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्याला अथ पासून इथी पर्यंत बघितलेला आहे. त्याकाळी मी, एका क्लबमधून खेळत असे. आठवड्यातील ५ दिवस मी कॉलेज करीत होतो आणि शनिवार/रविवार मी आणि इतरजण, आमच्या घराच्या पाठीमागील ५ मैदानांवर (ग्रॅण्ट, विल्सन, हिंदू, इस्लाम आणि पारसी असे लोकप्रिय जिमखाने आजही आहेत) प्रॅक्टिस करीत असू. बरेचवेळा हिंदू जिमखान्याच्या खेळपट्टीलगत खेळत असू. विशेषतः रविवारी सकाळी सोलकर हिंदू जिमखान्यावर यायचा आणि आमचा खेळ बघत असे. क्वचित कधी एखाद, दुसरा शब्द बोलत असे. वास्तविक आम्ही खेळत असू, तेंव्हा सोलकर निवृत्त झालेला होता पण तरीही इतका मोठा खेळाडू, आमचा खेळ बघत आहे, याचेच अप्रूप आम्हा सगळ्यांना वाटत असे. मी शाळेत  असताना,त्यावेळी क्रिकेट खेळाडूंच्या फोटोंची चिकट वही केली होती.  सोलकरच्या अलौकिक झेलांच्या फोटोंनी ती वही भरलेली होती. त्यावेळी देखील मला फार नवल वाटायचे, हा माणूस असे अशक्यप्राय झेल कसे काय पकडू शकतो? सुनील गावस्करने एकेठिकाणी स्पष्ट लिहिले आहे,  बेदी,प्रसन्ना, चंद्रा आणि वेंकट यांनी मिळवलेल्या बळींमध्ये सोलकरचा वाटा तितकाच महत्वाचा आहे. नसलेले झेल  पकडून, सोलकरने प्रतिस्पर्धी संघाच्या मनात निव्वळ दहशत बसवली होती. एका क्षेत्ररक्षकाने अशी जरब बसवणारे खेळाडू तसे फार विरळाच असतात, पुढे जॉन्टी ऱ्होड्सने ती परंपरा पुढे चालवली होती. 
सोलकर तसा धडाकेबाज फलंदाज होता परंतु वाडेकर प्रमाणे बहुदा त्याला देखील शतक झळकवायचे म्हणजे दडपण यायचे. नव्वदीपर्यंत हे फलंदाज दादागिरी करायचे पण शतक जवळ आले की "फोबिया"!! मला वाटते, १९७५ च्या मुंबईतील सामन्यात सोलकरने वेस्ट इंडिजविरुद्ध एकमेव शतक झळकावले होते. तो सामना मला आजही आठवत आहे (लॉइडने भारतीय गोलंदाजीचा पालापाचोळा केला होता) शतक येईपर्यंत सोलकर दिमाखात खेळत होता पण नव्वदीत पोहोचल्यावर स्वारी गडबडायला लागली. अक्षरश: कुंथत त्याने शतक पूर्ण केले. असे असले तरी सोलकर हा सोलकर होता. आजही कुणी अप्रतिम झेल पकडला तर सोलकरची आठवण येते. 
एक प्रसंग आठवत आहे. भारतात वेस्टइंडीज विरुद्ध सामना चालू होता. सोलकर त्यावेळी राखीव खेळाडू म्हणून संघात होता. क्षेत्ररक्षण करताना. काही कारणपरत्वे सोलकर मैदानावर अवतरला आणि त्याला त्याच्या नेहमीच्या जागी - फॉरवर्ड शॉर्ट लेगला उभे केले. परंतु त्यावेळी फलंदाजी करणाऱ्या लॉइडने त्याला हरकत घेतली (अशी हरकत घेता येते, याचाच पत्ता नव्हता, आता नियम बदलला आहे) आणि सोलकरला स्क्वेयर लेगला उभे केले. गमतीचा भाग म्हणजे तिथे देखील सोलकरने जमिनीसमांतर झेप टाकून लॉइडचाच झेल पकडला - लॉइड थक्क. पुढे लॉइडने प्रांजळपणे कबूल केले, सोलकर इथे देखील तितकाच असामान्य क्षेत्ररक्षक असेल याची कल्पना केली नव्हती आणि सोलकरचे मनापासून कौतुक केले. केव्हढा हा मोठा सन्मान म्हणायला हवा. सोलकरने अशी दहशत पसरवली होती . 
आजही फॉरवर्ड शॉर्ट लेग या जागेवरील अनभिषिक्त सम्राट म्हणून एकनाथ सोलकर ओळखला जातो. 
image.png

image.png

Thursday, 2 May 2019

डेनिस लिली - निव्वळ आक्रमक्रता आणि मेहनत!!

१९७१/७२ चा ऑस्ट्रेलियन सीझन. एव्हाना लिली जगातील आक्रमक गोलंदाज म्हणून प्रसिद्ध झाला होता परंतु याच काळात, त्याला पाठीचा गंभीर म्हणावा असा त्रास सुरु झालाआणि त्याला बाहेर राहावे लागले. ३,४ महिने व्यवस्थित ट्रेनिंग घेतले आणि फिटनेस साठी तयार झाला. त्याच्यासाठी मेनबर्नला खास नेट लावले होते आणि त्याला फक्त एकच षटक टाकायची परवानगी दिली होती. लिलीला देखील याची कल्पना होती आणि म्हणून त्याने प्रत्येक चेंडू अक्षरश: जीव तोडून टाकला होता (हा प्रसंग लिलीने आपल्या आत्मचरित्रात लिहिला आहे) तरीही अखेर लिली अपेक्षापूर्ती करू शकला नाही. सगळा चेहरा काळवंडला होता, आपली करियर संपली की काय? या संभ्रमात होता पण इथेच खऱ्या खेळाडूचा कस लागतो. निर्णय मान्य केला आणि तो पुन्हा आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये व्यायाम करायला गेला. 
लिली हा सर्वश्रेष्ठ वेगवान गोलंदाज आजही मान्यताप्राप्त आहे आणि त्यामागे त्याची विजिगिषु वृत्तीचा भाग फार महत्वाचा आहे. क्रिकेट मध्ये मेहनत तर सगळेच करत असतात, अपरंपार कष्ट घेतात परंतु अखेर तुम्ही मानसिकदृष्ट्या किती कणखर आहात, याला फार महत्व असते. १९६९/७० साली प्रकाशात आलेला लिली, तेंव्हा निव्वळ प्रचंड वेगाने आपली दहशत पसरवत होता. लक्षात घ्या, १९७१ मध्ये इंग्लंडने साऊथ आफ्रिकेची मालिका रद्द केली (बेसिल डी"ऑलिव्हेरा प्रकरण) आणि मग ब्रॅडमन यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेष विश्व अशी ऑस्ट्रेलियातच मालिका घ्यायचे ठरवले होते. याच मालिकेत, पर्थच्या खेळपट्टीवर पहिल्या इनिंगमध्ये लिलीने ८/२९ अशी जबरदस्त गोलंदाजी करून शेष विश्व संघाला नामशेष करून टाकले आणि जगभर आपल्या नावाची द्वाही फिरवली. खुद्द सोबर्सने त्याच्या गोलंदाजांची वाखाणणी केली होती आणि आता लिलीससमोर आपल्या कारकिर्दीचे महाद्वार उघडले होते आणि याच सुमारास पाठीचा त्रास उद्भला आणि लिलीला संघात स्थान मिळाले नाही. 
आयुष्यात लिलीला पुढे देखील तब्येतीचा त्रास सहन करावा लागला आणि त्या काळापुरते त्याचे क्रिकेट बंद ठेवावे लागले होते पण त्याची जिद्द इतकी कामाखार होती, सगळ्या व्याधींवर त्याने मात केली. आधुनिक औषधयोजना, ट्रेनिंग वगैरे सोबतीला होतेच पण मुळात मानसिकदृष्ट्या लिली विजिगिषु वृत्तीचाच होता. जेंव्हा पहिल्यांदा पाठीचा त्रास सहन करावा लागला तेंव्हा त्याने मनोमन कबूल  केले,यापुढे केवळ वेग, हे आपले हत्यार असणार नाही आणि त्याने आपल्या भात्यात कितीतरी नवनवीन अस्त्रे आणली आणि क्रिकेट जगतात, आपले नाव चिरस्मरणीय केले.आधुनिक क्रिकेटमध्ये शारीरिक दुखण्यातून बाहेर येणे मुळातच अवघड असते पण इथे तर लिली नुसताच सावरला नाही तर आपल्या नावाची दहशत पुढील १३,१४ वर्षे कायम राखली. हे अति अवघड काम. वेगवान गोलंदाजाला दुखापती होणे हे नित्याचेच असते कारण शारीरिक श्रमाची प्रचंड मागणी परंतु वेगवान गोलंदाजी करताना, बुद्धीचा योग्य वापर करून आपली कारकीर्द कशी जगन्मान्य करता येते, याचा लिलीने एक आदिनमुना लोकांसमोर ठेवला. 
आता आणखी थोडे विश्लेषण करायचे झाल्यास, सर्वात प्रथम त्याची चेंडू टाकायची शैली अभ्यासनीय होती. सहज, सोपी धाव होती. सरळ रेषेत धावत यायचा आणि शक्यतो क्रीझच्या जवळून चेंडू टाकायचा. याचा एक फायदा असा झाला, लिली चेंडू इनस्वीन्ग टाकत आणि की आउटस्विंग टाकत आहे, याचा प्रथमदर्शनी पत्ता लागायचा नाही. लिलीकडे दोन्ही स्विंग अप्रतिम होते आणि त्यातून त्याने अचूकतेवर मिळवलेले प्रभुत्व. चेंडू ऑफ स्टम्पच्या जरासा बाहेर किंवा ऑफ स्टंपवर टाकायचा. सर्वसाधारपणे वेगवान गोलंदाजी खेळताना, फलंदाज किंचित ऑफ स्टंपकडे shuffle होतो पण अशावेळेस चेंडूच्या दिशेत झालेला किंचित बदल, फलंदाजाला बावचळून टाकतो आणि तिथेच " caught Marsh bowled Lillee" ही क्रिकेटमधील अजरामर म्हण ख्यातकीर्त झाली. लिलीला त्यांचा विकेटकीपर मार्शची, तितकीच तुल्यबळ साथ मिळाली. अर्थात त्यावेळी स्लिपमध्ये चॅपल बंधू, रेडपाथ, स्टॅकपॉल सारखे असामान्य क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी देखील आपला वाटा उचलला होता. 
लिलीच्या बाबतीत, कारकिर्दीच्या सुरवातीलाच आयन चॅपल सारखा दुर्दम्य कर्णधार मिळाला. आयनचा आपल्या खेळाडूंवर पूर्ण विश्वास होता. एक प्रसंग आठवत आहे. ऑस्ट्रेलियातील मालिका, इंग्लंडबरोबरचा सामना. ऑस्ट्रेलियाने क्षेत्ररक्षण स्वीकारले होते. लिलीकडे चेंडू सोपवला होता. त्यासाठी आयन चॅपेलने ४ स्लिप, ३ गली, विकेटकीपर, १ लेग गली आणि १ फॉरवर्ड शॉर्ट लेग अशी क्षेत्ररचना ठेवली!! म्हणजे बघा, साऱ्या मैदानावर बाहेर कुणीही क्षेत्ररक्षकच नाही. गोलंदाजाला हे केव्हढे प्रचंड आव्हान होते. चेंडू ओव्हरपीच टाकायचाच नाही तसेच चेंडूची दिशा फक्त ऑफ स्टंप किंवा किंचित बाहेर अशीच ठेवायची. षटक संपले की अख्खी टीम दुसरीकडे क्षेत्ररक्षणासाठी जायची. अशी क्षेत्ररचना ना यापूर्वी आणि त्या नंतर कुणीही वापरली नाही. धाडसच झाले नाही. YouTube वर याचा व्हिडियो आहे.  
लिली प्रचंड आक्रमक गोलंदाज होता, धाडस अंगावर ओढवून घेणे त्याला मनापासून आवडायचे. कुण्या फलंदाजाने त्याला फोर किंवा सिक्सर मारली की तो मनापासून चवताळायचा, नजरेतून भयानक खुन्नस द्यायचा आणि फलंदाजाने आपल्या बॉलिंगवर आघात केला म्हणून त्याच आवेशात पुढील चेंडू टाकायचा. त्याने वेगवान गोलंदाजीची नवी परिभाषा तयार केली. सुदैवाने त्याला  त्यावेळेस,थॉमसन, गिलमोर आणि वोकर या ३ तितक्याच समर्थ वेगवान गोलंदाजांची साथ मिळाली. या चौकडीने जगात धुमाकूळ घातला होता. पुढे लॉइडने वेस्टइंडीजची जगप्रसिद्ध चौकडी तयार केली ( रॉबर्ट्स,होल्डिंग, गार्नर आणि क्रॉफ्ट) त्यामागे या चौकडीची पार्श्वभूमी होती. विशेषतः: इंग्लंडविरुद्ध तर ही चौकडी कायम दहशतवादीच ठरली. १९७५ ची ऑस्ट्रेलिया/ वेस्टइंडीज ही मालिका सुरु होण्याआधी, त्याची "विश्वविजेते" म्हणून भरपूर जाहिरात झाली होती. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर पर्थवरील सामना वेस्टइंडीजने डावाच्या फरकाने जिकून वचपा घेतला पण पुढील  सलग ४ सामने ऑस्ट्रेलियाने सहजपणे जिंकले आणि वेस्टइंडीज संघाची पूर्ण वाताहात केली आणि त्या कत्तलीमागे फार मोठा हात लिली/थॉमसन या जोडगोळीचा होता. काही प्रमाणात लॉइड आणि शेवटच्या २ सामन्यात विव रिचर्ड्सचा अपवाद  वगळता,सगळी फलंदाजी नामशेष झाली होती. लिली खरा खुलायचा,जेंव्हा त्याला आव्हान मिळायचे तेंव्हा आणि त्यासारख्या पारंपरिक शत्रूसमोर - इंग्लंडसमोर.  त्यावेळेस त्याच्या गोलंदाजीतील खरा विखार बाहेर यायचा. प्रसंगी मैदानावर दोन हात करायची त्याची तयारी असायची - आठवा मियांदाद आणि लिलीचा प्रसंग. परंतु समजा एखाद्या खेळाडूने त्याची गोलंदाजी फोडून काढली तर लगोलग दाद देण्याची खिलाडूवृत्ती देखील तशीच दिसायची. जे काही शत्रुत्व असेल ते मैदानावर पण एकदा का मैदान सोडले की हाच लिली त्या खेळाडूंबरोबर बियर प्यायला सहज बसत असे. 
त्यामुळे लिलीबरोबर त्यांचे संबंध कायम सौहार्दाचे राहिले आणि याचाच परिणाम म्हणून तामिळनाडूत साकारलेली MRF Pace Foundation ही संस्था. भारताला, श्रीनाथ पासून आजच्या बुमराह पर्यंत अव्याहतपणे मिळणारे वेगवान गोलंदाज. 
लिलीला आयुष्यात अनेक वेळा दुखापतींना सामोरे जायला लागले पण तरीही त्याने हार मानली नाही. सुरवातीला वेगावर नियंत्रण  ठेवले,पुढे, पुढे तर स्विंग कलेत असामान्य प्रभुत्व संपादन केले. याचा परिणाम असा झाला, लिली गोलंदाजी करीत आहे, हे बघितल्यावर समोरील फलंदाज देखील आपले संपूर्ण लक्ष्य स्थिरचित्ताने त्याच्या गोलंदाजीकडेच ठेवायचा. आजही क्रिकेटमधील असामान्य वेगवान गोलंदाजांची यादी लिलीच्या नावाशिवाय अपूर्णच राहते. लिलीच्या जवळपास १४ वर्षांच्या कारकिर्दीत त्याच्या जवळपास जाणारा एकच गोलंदाज निपजला - अँडी रॉबर्ट्स. आज जगातील सगळे तत्कालीन फलंदाज एकमुखाने  म्हणतात,या दोघांना तुलना नाही आणि पहिल्या नंबरवर हेच दोन गलंदाज विराजमान होऊ शकतात. इथे केवळ भयानक वेग हे कारण  नसून,बुद्धीवादी गोलंदाजी  हे आहे.  लिलीची गोलंदाजी कुणीच फोडून काढली नाही असे अजिबात म्हणता येणार नाही परंतु लिलीच्या गोलंदाजीवर कायम वर्चस्व गाजवले, असे कधीही घडले नाही एकाच शैलीत धावत येऊन slower one चेंडू  टाकणे,या कलेवर प्रभुत्व मिळवले जे आज मर्यादित षटकांच्या सामन्याचा प्रमुख अस्त्र ठरत आहे. 
१९७४/७५ च्या ऍशेस मालिकेत तर इंग्लंडच्या फॅलँडांनी लिली/थॉमसन जोडीची प्रचंड दहशत घेतली होती. त्यावेळी एक घोषवाक्यच ऑस्ट्रेलियात प्रसिद्ध होते - "Ashes to ashes, dust to dust, if Thomson don't get ya, Lillee must!!" मेलबर्नवरील जवळपास ८०,००० ते १,००,००० प्रेक्षक एकाच वेळी, एकाच सुरांत "लिली, लिली" असे ओरडायचे, त्या आरोळ्यांनीच बहुदा बरेचवेळा लिलीला विकेट्स मिळाल्या असाव्यात पण इतके प्रेम लाभणे, ही भाग्याची गोष्ट नाही का!! १९८४ साली, त्याला पुन्हा दुखापतींना सामोरे जायला लागले आणि त्याचवेळेस ग्रेग चॅपल देखील निवृत्ती स्वीकारायच्या मनस्थितीत होता. सिडनेच्या सामन्यानंतर ग्रेग चॅपल, रॉड मार्श आणि लिलीने एकत्रित निवृत्तीची घोषणा केली. 
लिलीच्या निवृत्तीने खऱ्या अर्थी जागतिक क्रिकेटमधील वेगवान गोलंदाजीची एक महान पर्व संपुष्टात आले.