Saturday 12 January 2013

साउथ आफ्रिका - भाग ५.

कालपर्यंत, मी व्हाईट लोकांच्या एका विशिष्ट राहणीबद्दल लिहिले. वास्तविक सगळे गोरे काही श्रीमंत नसतात. मी तर किती तरी गोरे लोक, रस्त्यावर भीक मांगताना पहिले आहेत. एक गोष्ट मात्र विशेषत्वाने लिहायची व ती म्हणजे, त्यांच्या रक्तातच गुण आहे की त्यांचे वेगळे रसायन आहे, ते कळणे अवघड आहे, पण एकूणच बहुतेक सर्व गोरे फार अभिमानी आणि गर्व राखणारे असतात. त्यांना, त्यांच्या गोऱ्या कातडीचा कमालीचा अभिमान असतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, जगात आपल्या गोऱ्या कातडीला किंमत आहे आणि त्याची त्यांना प्रखर जाणीव असते, अगदी रस्त्यावरील भिकारी जरी घेतला तरी तो भीक मागताना जरा गुर्मीतच भीक मागत असतो.
मी, जेंव्हा, पाच वर्षापूर्वी UB group join केला होता, तेंव्हा माझी काही गोऱ्या कुटुंबांशी चांगली ओळख झाली. अर्थात, रस्टनबर्ग येथील कंपनीत, तीन,चार गोऱ्या मुली सडल्या तर, बाकी बहुतेक काळे अथवा भारतीय वंशाचेच लोक कामाला होते. माझी नोकरी, Standerton नावाच्या एका आडगावी होती, कारण बृवरी तिथली. अर्थात. आडगाव जरी झाले तरी, बहुतेक नागरी सुविधेत कसलीही कमतरता आढळत नाही. फक्त, प्रचंड मॉल्स, कॅसिनोस वगैरे चैनीच्या गोष्टींची वानवा असते. बाकी, खाण्या पिण्याचे किंवा राहण्याचे कसलेही हाल होत नाहीत. पब्स, हॉटेल्स क्लब्स वगैरे गोष्टी गावागावात असतात. असो, तशी बृवरी लहानच होती(आता ती बंदच झाली- धंदा नाही!!) पण, त्या ऑफिसमध्ये मात्र बरेच गोरे लोक कामाला असल्याने, मी त्याच्या जवळ जाऊ शकलो. माझा Brewery Vice President गोरा होता तर माझ्या फायनान्स विभागात तर, माझा Accountant आणि इतर स्नेही बरेचसे गोरेच होते. मार्केटिंगमध्ये तोच प्रकार होता. अर्थात, एकत्र काम करत असल्याने आणि एकूणच गाव तसे फारच आडनिड्या जागी आणि लहान असल्याने, ओळख भराभर वाढत गेली. अजूनही, दोन  लोकांशी संबंध आहेत. तिथे खऱ्याअर्थाने  मी गोरा माणूस अनुभवला. तसे गाव लहान असले तरी, गावात चर्च होते. त्यानिमित्ताने, मी चर्च आतून, बाहेरून व्यवस्थित न्याहाळले. एकदा, तर माझ्या Accountant च्या लग्नाच्या निमित्ताने, सगळा सोहळा देखील अनुभवला. त्याचे ते तिसरे लग्न होते आणि नुकतेच त्याने चौथे लग्न केल्याचे समजले!! मागे मी म्हटले तसे, गोरे लोक, सर्वसाधारणपणे कामात सचोटी दाखवतात, हा जो आपला समज आहे, त्याला संपूर्ण छेद देणाऱ्या घटना, माझ्या काळात घडलेल्या आहेत. चक्क, पैसे खाण्याच्या आरोपावरून, मला दोघांना कामावरून काढावे लागले. अर्थात, भ्रष्टाचारात फक्त काळे किंवा भारतीयच आघाडीवर असतात, असे म्हणायची अजिबात गरज नाही. संधी मिळाली तर, गोरे देखील पैसे खाण्याच्या बाबतीत मागे राहत नाहीत!! पण, तसे प्रमाण मला तरी कमीच आढळले. काळ्याच्या पैसे खाण्याला मात्र तोड नाही. गोरे मात्र बोलण्यात सडेतोड असतात व याचे मुख्य कारण म्हणजे, निदान इथे तरी, आजही, गोरी कातडी असेल तर त्याला आपणहून मान दिला जातो, मग ते गुर्मीत वागणार नाही तर काय!! मला याचा सुरवातीला थोडा त्रास झाला पण लवकरच मी त्यांचे पाणी जोखले आणि स्थिरावलो. नंतर मात्र, मला फारसा त्रास झाला नाही.
एकूणच गोरी माणसे हीं आपल्याच विश्वात वावरणारी असतात. तुम्ही कितीही ओळख दाखवा, जर का तुमच्या हाताखाली गोरा काम असेल तर तो तुमच्याशी योग्य त्या मानाने वागेल पण, कामाची वेळ झाली की, पूर्ण वेगळा असतो. तुम्ही त्यांच्या समाजात संपूर्णपणे स्वीकारले जात नाही, हीं वस्तुस्थिती आहे. ऑफिसमध्ये, तुमच्याशी अति सलगीने गोऱ्या वागतील पण त्यांचा so called professional approach असतो. त्यांच्या घरात जरी तुम्ही गेलात तरी एका विशिष्ठ मर्यादेपर्यंतच ते तुमच्याशी मोकळेपणाने वागतील. तुमच्याबरोबर अगदी डान्स देखील करतील, ड्रिंक्स घेतील, गप्पा गोष्टी विनोद करतील पण, त्या सगळ्यांना एक मर्यादा आखून घेतलेली असते. इथे शक्यतो, गोरे आणि भारतीय, यांच्यात फारसे लग्न संबंध आढळत नाहीत. फार क्वचित असे संबंध जुळून येतात. तसेच, काळे आणि गोरे देखील फारसे एकत्र येत नाहीत. अर्थात, लैंगिक संबंध म्हणशील तर, तिथे कसलाच विधिनिषेध नसतो!! तुमच्याबरोबर हॉटेलमध्ये गोरे लोक अगदी जेवायला देखील येतील(पैसे मात्र contribution च्या स्वरुपात आग्रहाने देतील!!) अगदीच जवळीक झाली तर, चक्क क्लबमध्येदेखील येतील पण, कायमचे संबंध म्हटले की शक्यतो गोराच साथीदार निवडतील. मला वाटते, हा दोन संस्कृतीतील फरक आहे. गोरे लोक हे अतिशय वास्तववादी असतात. उगाच भावनांना वाजवीपेक्षा जास्त महत्व देत नाहीत. जिथे पैसा आहे आणि आयुष्य स्थिर होण्याची शक्यता दिसते, तिथे त्यांना संबंध जुळवण्यात फारशी आडकाठी येत नाही. तसेच, एकूणच, लग्न संबंध त्या समाजात फारच लवचिक स्वरुपात आढळतात, अर्थात, तो रोग आता भारतीय समाजातदेखील फार झपाट्याने पसरलेला आहे. मी बघितलेले  जे गोरे लोक आहेत, त्यांच्यातील फारच थोडे वगळता, बहुतेक सगळे जण, विवाहबाह्य संबंध ठेवणारे आहेत. यात, मुली, बायका देखील आल्या. त्यात, त्यांना कसलीच क्षिती वाटत नाही. मी काही वेळा काही गोऱ्या लोकांच्या घरी, ख्रिसमस निमित्ताने किवा गुड फ्रायडे निमित्ताने गेलो आहे. पण, एकूणच मला आजही असे म्हणवत नाही की, माझ्या माहितीतले गोरे लोक, माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. शेवटी, वागण्या बोलण्यात थोडासा तरी तीढेपणा येतोच येतो. त्यातून, बरेच गोरे लोक फार formal असतात. त्यांना, त्यांच्या ऑफिस कामाच्या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी, कुणी भेटलेले किंवा संबंध ठेवलेले फारसे पचनी पडत नाही. अगदी, ऑफिसची ख्रिसमसची पार्टी जरी असली तरी, ना ना तऱ्हेची बयाणे उभी करतील आणि त्या कार्यक्रमातून सुटका करून घेतील. त्यांचा खाजगी वेळ मात्र, त्याचाच राहील, याची ते सर्वतोपरी दक्षता घेतील. एकूणच, स्वत:भोवती कुंपण घालून घेतल्याप्रमाणे राहतील. ते तुमच्या आयुष्यात कधीही डोकावणार नाहीत, अगदी तुम्ही परवानगी देलीत तरी!! आपण बरे आणि आपले आयुष्य बरे, असा थोडा एकलकोंडा स्वभाव आढळतो. त्यामुळे, जरी तुमच्या शेजारी एखादे गोरे कुटुंब राहत असले तरी, तुमच्याशी त्यांचा फक्त, Hi, Hello, Good Morning, Good Night, इत्यादी शब्दांनीच शक्यतो बोळवण होते.
अर्थात, पार्टी रंगवावी तर त्यांनीच!! मी अशा कितीतरी पार्ट्या आतापर्यंत अटेंड केल्या आहेत. सतत, काहीना ना काही तरी विनोद करणार, मग तो अति अश्लील देखील असतो आणि तो देखील सगळ्या मुली/ बायकांच्या समोर!! खर तर, अश्लील(आपल्या मते- त्यांच्या मते, अगदी गमतीशीर बोलणे!!) बोलण्यात, त्यांचा हात कुणी धरणार नाही. अगदी, मुली देखील काही कमी नसतात. एकतर वागायला(पार्टीच्या वेळेस!!) अति मोकळ्या-ढाकळ्या, कपडे देखील तसेच आणि अंगावर अप्रतिम सेंट फवारलेला. त्यामुळे, एकूणच वातावरण अति रम्य होते, यात शंकाच नाही. मग, त्या तुमच्या बरोबर डान्स काय करतील, स्मोकिंग तर सतत चालूच असते आणि त्याच बरोबरीने ड्रिंक्स!! अरे, मुलींची पिण्याची कुवत थक्क करणारी असते, अगदी, पाच, सहा पेग्ज(Double pegs!!) झाले तरी जरा पाय इकडचा तिकडे होणार नाही!! रात्रभर पार्टीचा  दंगा चाललेला असतो.
अर्थात, एकदा का पार्टी संपली की मात्र, तुम्ही वेगळे की आम्ही वेगळे. अर्थात, जर का तुमचे तसेच जवळकीचे संबंध असले तर मात्र ताटातूट नाही!! असा हा गमतीशीर गोरा समाज आहे.  कामाच्या बाबतीत मात्र, मी आजही गोराच माणूस पसंद करतो कारण, निदानपक्षी तो दिलोएले काम त्याच्या पूर्ण वकुबाने करील. भारतीय माणूस म्हणजे एक डोकेदुखीचा असते. अपवाद वगळता, मला भेटलेले सगळे भारतीय, एकतर कामचुकार तरी आहेत किंवा अति शहाणे तरी आहेत!! भारतीयांना असेच वाटते की, मी काम करतो म्हणून कंपनी चालते!! प्रत्येक कामात शेकडो चुका आणि त्याच तपासणे, हीं आपली डोकेदुखी ठरते. काळा माणूस तर बिनडोक असतो,, त्यामुळे त्याला काम द्यायचे तेंव्हा निदान आपली मानसिक तयारी असते की, आपल्या तेच काम परत तपासायला लागणार आहे. माझ्या इतक्या वर्षांच्या काळात, मला आजमितीस, फक्त तीनच काळे असे भेटले की, त्यांच्या कडून मी काहीतरी चांगले शिकलो. अगदी, Earnst Young, Price Waterhouse, Delloit यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या जरी घेतल्या तरी, कल्याणच्या बाबतीत असाच अनुभव येतो आणि अर्थात, भारतीय वंशाचे लोकदेखील फारसे अपवाद नव्हेत.

साउथ आफ्रिका - भाग २

साधारणपणे महिन्या दोन महिन्यात मी बराचसा रुळलो, असे म्हणायला हरकत नाही. पीटरमेरीत्झबर्ग गाव हे तसे एकदम टुमदार असे गाव आहे. जवळपास, सात, आठ टेकड्यांवर वसलेले आहे आणि समुद्र सपाटीपासून बरेच उंच असल्याने, हवा थंडगार असते, अर्थात, डिसेंबर, जानेवारी हे महिने वगळता. मी, मुंबईचा आल्हाददायक उन्हाळा अनुभवून या शहरात आलो असल्याने, इथला उन्हाळा देखील मला चांगलाच भावला. शहरात तशी औद्योगिक वसाहत अशी फार मोठी नाही(आज देखील तेच प्रमाण आहे- फारसे नवे प्रचंड  उद्योग-धंदे फारसे या शहरात नाहीत!!) अर्थात, खाद्य तेलाच्या प्रचंड रीफायनरिज इथे खूप आहेत आणि मी सुद्धा त्यातील एका कंपनीत होतो. इथे, सगळ्या प्रकारच्या वस्त्या आहेत, भारतीय, काळे, गोरे तसेच कलर्ड!! अर्थात, प्रत्येक समाज हा बहुतांशी स्वत:च्या वेगळ्या वस्तीत राहतो. हा वंशभेदाचा अनिवार्य परिणाम. पूर्वी, व्हाईट लोकांनी, प्रत्येक समाजाला एक ठराविक एरिया वाटून दिला होता आणि त्याप्रमाणे, तो समाज तिथे स्थिरावला. व्हाईट लोकांची वस्ती अर्थात, अधिक देखणी, सुरक्षित, हवेशीर आणि प्रशस्त!! असा प्रकार, अजूनही, साउथ आफ्रिकेतील प्रत्येक शहरात दिसून येतो. एकूणच हवा हीं थंड असल्याने, गोल्फ क्लब, पब्स, देखणी हॉटेल्स, या गोष्टीनी हे शहर वेढलेले आहे. आता, भारतीय वंशाचे लोक या शहरात आणि डर्बन येथे प्रचंड प्रमाणात राहतात आणि त्यामुळे, माझा या लोकांशी अधिक संबंध आला आणि हा समाज मला अधिक जवळून अनुभवता आला. मागे मी जे म्हणालो की, इथला भारतीय वंशाचा समाज हा अजूनही बराचसा मानसिकदृष्ट्या दुभंगलेला आहे, याचे तंतोतंत प्रत्यंतर मला हर घडी आणि हर क्षणी घेता आले.
मी ज्या कंपनीत होतो, त्या कंपनीत, हिंदू( इथे एक विचित्र प्रथा आहे. इथला हिंदू समाज दो गोष्टीत विभागाला गेला आहे.१- हिंदू आणि २- तमिळ!!) पुरुष/ मुली होत्या तसेच, मुसलमान, व्हाईट, कलर्ड असे एकूण वेगवेगळ्या समाजातील एक संमेलनच होते. आणि त्यावेळची  माझी झालेली मते, आजही तितकीच ठाम आहेत. विशेषत: तरुणांबद्दलची मते!! इथाल्स भारतीय समाज हा एक बाजूने पाश्चात्य संस्कृतीने आकर्षित झालेला आहे तर दुसऱ्या बाजूने प्रचंड प्रमाणात बुवाबाजीत अडकलेला आहे. सत्य साईबाबा हे इथले परम आदराचे स्थान!! एकूणच भारतातील स्वामी, गुरु याबद्दल इथे आजही प्रचंड आकर्षण आहे. इथे, हिंदूंचे सण वेगळे आणि तमिळ लोकांचे सण वेगळे, देवळे वेगळी, रिती रिवाज देखील वेगळे. पण, एकूण मानसिक घडण बघितली तर काही फारसा फरक आढळत नाही. तसेच व्हाईट लोकांचे अंधानुकरण(वाईट अर्थाने!!) आणि भारतातील बुरसटलेल्या चालींचे उदात्तीकरण, असा थोडक्यात सारांश सांगता येईल. एक उदाहरण देतो. GOOD Friday हा मुळातला ख्रिश्चन लोकांचा उत्सव आहे पण इथे भारतीय समाज अत्यंत भाविकतेने हा सण साजरा करतात. त्या दिवशी, काही लोकांच्या "अंगात" येते, दिवसभर असे अंगात आलेले लोक, एका धुंद अवस्थेत वावरत असतात. संध्याकाळी, मग हे लोक, जिभेत तारेचा आकडा अडकवतात, पाठीवर तार खोचून त्यात मग फळे, फुले गुंफतात, अगदी डोळ्याच्या पापण्यात देखील तार खुपसून त्यात फळे अडकवतात आणि अशा पुरुष/स्त्रिया यांची संध्याकाळी मिरवणूक निघते ती जवळपास, संपूर्ण भारतीय लोकांच्या वस्तीभर!! वाटेत, काही भाविक(काही नव्हे- बरेच भाविक!!) या माणसांच्या पाया पडतात!! इथल्या भाविक लोकांच्या मते, असे अंगात आलेले लोक, हीं देवाचीच मानवी रूपे आहेत!! त्यांच्या पाया पडल्यावर, मग हीं देवाची रूपे, त्या भाविकांच्या कपाळावर, उदी/भस्म लावतात आणि त्याने कृपा प्रसादाने, भाविक लोक गहिवरून जातात. नंतर, मिरवणूक संपली की, हिंदू मंदिरात खरा पुढचा समारंभ असतो.
मिरवणूक देवळात येईपर्यंत देवळाच्या प्रसादात, कोळसे/ लाकडे पेटवलेली असतात. ती पुरेशी पेटली(अगदी ज्वलंत निखारे!!) की मग हीं देवाची रूपे आणि इतर काही भाविक लोक त्यावरून अनवाणी पायाने हळूहळू किंवा भराभर(ज्याच्या-त्याच्या कुवतीप्रमाणे!!) चालतात. मला, पाहिल्यावर एक वयस्कर गृहस्थाने,' आम्ही(म्हणजे भारतीय लोक!!) किती आस्थेवाइकपणे  भारतीय परंपरांचे पालन करीत आहोत" असे ऐकवले!! त्यावेळी, मी न राहवून त्याला विरोध दर्शविला पण माझे बोलणे त्याला अजिबात आवडले नसल्याचे, मला जाणवले. नंतर, हा विषय मी माझ्या ऑफिस मधील भारतीय लोकांशी काढला, तेंव्हा तरं त्यांनी मला वेड्यातच काढले!! इथले भारतीय लोक कमालीचे भारतीय परंपरांचे अंधानुकरण करण्यात पुढे आहेत, त्यात काही वैचारिक भाग नाही की साधे तत्व देखील आढळत नाही. त्यांची या सर्व कर्म कान्डावर कमालीची श्रद्धा आहे. आज भारतात देखील कितपत, अशा मागासलेल्या परंपरांचे जतन केले जाते, मला शंका आहे, इथे मी शहरी भागाबद्दल बोलत आहे. जगन्नाथाचा रथ प्रसंगी, भारतातील गावात असे प्रकार चालतात, याची कल्पना आहे पण तो समाजच गतानुगतिकतेच्या गाळात रुतलेला आहे. इथला भारतीय समाज, स्वत:ला उच्च शिक्षित(म्हणजे काय!! हा एक वेगळा प्रश्नच आहे!१ पण, त्याचे उल्लेख पुढे होईलच!!) समजतो, आधुनिक जगाच्या बरोबरीने वावरतो, असे मानतात आणि अशा ठिकाणी, अशा अंध श्रद्धा कमालीच्या भाविकतेने पाळल्या जातात!!
भारतातील स्वामीबद्दल तरं, काही बोलायचीच सोय नाही!! त्याच्या चरणी, आपली अक्कल किती गहाण टाकायची, याची जणू स्पर्धाच लागलेली असते!! इथे आपल्यासारखी उपासाची पद्धत आहे, म्हणजे आपण जसे, उपासाचे खास वेगळे पदार्थ करतो, तसा काही प्रकार नसून, या महिन्यात( साधारणपणे दिवाळीपूर्वी महिनाभर हा महिना येतो) या दिवसात फक्त नॉन-वेज पदार्थ करायचे नाहीत की खायचे नाहीत. ड्रिंक्स मात्र चालतात!! ड्रिंक्स पिण्यात मात्र हे भारतीय, कमालीचे तरबेज आहेत. अगदी, स्पर्धाच लागल्यासारखी, ड्रिंक्स ढोसत असतात आणि त्याचा अभिमान बाळगत असतात!! मग, काकुळतपणे आडवे होणे, नशेत बरळत राहणे इत्यादी अश्लाघ्य प्रकार होतच राहतात.  जयंत, हे एक प्रातिनिधिक दृश्य म्हणून मानायला हरकत नाही.

साउथ आफ्रिका!!

मी जेंव्हा १९९४ साली या देशात प्रथम आलो, तेंव्हा, सम्पूर्ण देशात मी धरून, फक्त ३ कुटुंबीय(माझे कुटुंब!!) राहत होते. त्यातील, एक माझा ओळखीचा, मकरंद फडके, जो जोहानसबर्गला राहत होता(अजूनही तिथेच आहे) आणि डॉ. नेर्लेकर(जे नंतर ऑस्ट्रेलिया इथे गेले!!) हे डर्बन इथे राहत होते. मी डर्बन जवळील पीटरमेरीत्झबर्ग या शहरात राहत होतो. २००० सालानंतर, इथे बऱ्याच भारतीय कंपन्यांनी आपली ऑफिसेस इथे थाटली आणि बरीच मराठी माणसे इथे यायला लागली. आजमितीस, जोहानसबर्ग इथे जवळपास दोनशे तरी कुटुंबे राहत आहेत, त्याशिवाय, डर्बन, केप टाऊन, प्रिटोरिया येथील मराठी कुटुंबे वागली!!इथे आमचे मराठी मंडळ आहे पण ते आपले नावाला!! अरे, कोण कधी कुठल्या गोष्टीला पुढाकार घेतील तर शपथ!! साधे, कुठे पिकनिकला जायचे म्हटले तरी शेकडो कारणे पुढे करतील आणि कार्यक्रम रद्द होईल(नुकताच असा एक कार्यक्रम रद्द झाला!!) प्रत्येकजण, आपण या देशात आलो म्हणजे फार मोठे शौर्य गाजवल्याच्या थाटात वावरत असतो!! त्यामुळे, एकूणच मराठी मंडळ हे नोंदलेले आहे पण काही कामाचे नाही!! अरे, कुठे सहज गप्पा मारायला भेटायचे म्हटले तरी प्रश्न असतो. बर, येणारा प्रत्येकजण स्वत:ला प्रचंड हुशार वगैरे, गुर्मीत वावरत असतो. त्यामुळे, मैत्री अशी फारशी काही जमत नाही. असो, कोळसा किती उगाळायाचा!!
इथे, फिरायला जाण्यासाठी बरीच ठिकाणे आहेत. उदाहरणार्थ डर्बन आणि केप टाऊन इथले बीचेस!! अप्रतिम, असेच वर्णन करावे लागेल. विशेषत: भारतातील बीचेस नजरेसमोर आणता, हा फरक अजूनही जाणवतो. केप टाऊन तर, टूरिस्त सेंटर म्हणून जगात प्रसिद्धच आहे म्हणा. फोनवर बोललो त्याप्रमाणे, इथे उत्तरेला क्रुगर पार्क म्हणून आफ्रिकन सफारी जगप्रसिद्ध आहे. जवळपास  ८०० स्क्वे. किलोमीटर इतका विस्तीर्ण प्रदेश आहे. तिथले जंगल नित पाहायचे झाल्यास, कमीतकमी ५ ते ६ दिवस हाताशी हवेत. मी तिथे आतापर्यंत दोनदा जाऊन आलो आहे. केप टाऊन मात्र खरोखरच निसर्गरमणीय शहर आहे. केवळ बीचेस नव्हेत पण इतर अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत( अगदी, मुली देखील!!) Table Mountain, Cape of Good Hope, इत्यादी बरीच नावे घेता येतील. अरे, इथे एक Unofficial NUDE beach देखील आहे!! म्हणजे बघ!!
सर्वात मजेचा भाग म्हणजे इथले हवामान!! सध्या इथे उन्हाळा आहे पण, इथे उन्हाळा आणि पावसाळा हे सतत एका मागोमाग फिरत असतात. त्यामुळे, उन्हाचा कडक असा फार जाणवत नाही. अर्थात, डर्बन इथे जरा जाणवतो. डर्बन तसे आपल्या मुंबईसारखेच आहे. अगदी, जून/जुलै च्या कडाक्याच्या थंडीत देखील तुम्ही डर्बन इथे आरामात राहू शकता. जोहानसबर्ग आणि केप टाऊन मात्र थंडीचे आगर!! तापमान, ० किंवा -१ इतके खाली उतरते. ब्लुमफोन्तेन तर, -६ ते -८ पर्यंत खाली जाते!! अर्थात, आता मार्च पासून हवा बदलायला सुरु होईल. मे/जून-जुलै-ओगस्ट हे खरे थंडीचे महिने. इथे गंमत म्हणजे, सध्या जर का सलग ३,४ दिवस गरम उकाडा झाला की लगेच पावसाची सर(अगदी तुरळक देखील!!) येते आणि वातावरण थंड करून जाते, इतकी की रात्री अंगावर गरम पांघरूण घ्यावेच लागते. तसा इथे पावसाळा भारताच्या मानाने कमीच असतो. इतकी वर्षे इथे राहून, मी अजून छत्री घेतलेली नाही!! मुंबईसारखा धोधो पाऊस एकूण कमीच. त्यामुळे, पाणी तुंबले, गाड्या अडकल्या(गाड्या म्हणजे कार्स!!) इथे, एक मोठा प्रश्न आहे व तो म्हणजे, जर का तुझ्याकडे मोटार नसेल तर तू मेलास!! मुंबईसारखी रिक्षा, Taxi वगैरे सोयी फारशा नाहीत. सरकारी बसेस आहेत पण त्या केवळ मोठ्या शहरापुरत्या आणि त्या देखील ठराविक ठिकाणीच जातात. खासगी taxis आहेत, पण सुरक्षेचा प्रश्न भयाण आहे. रेल्वे जवळपास नगण्यच म्हणायला लागेल. मी अजूनही रेल्वेने प्रवास केकेका नाही. धीरच होत नाही!! साधारणपणे, काळे लोक, रेल्वेने प्रवास करतात, मग कोण रेल्वेने जाईल!!Inter City Buses आहेत, म्हणजे Greyhound वगैरे. पण त्यादेखील, एका ठराविक थांब्यापर्यंत!! त्यामुळे, माझ्याइथून केप टाऊन जरी १६०० किलोमीटर लांब असले तरी, मी प्रत्येकवेळेस माझी नाहीतर मित्राची गाडी काढूनच प्रवास केला आहे. रस्ते मात्र खरोखर अप्रतिम!! कितीही लांबचा प्रवास असो, शीण  म्हणून जाणवतच नाही!! मी, दोनदा, इथून केप टाऊनला जाण्यासाठी, रात्री एकला सुरवात केली आणि संध्याकाळी सहापर्यंत तिथे पोहोचलो आहे. त्यात, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण नंतर थोड्यावेळाने, चहा/कॉफी!! आणि, इतका प्रवास होऊन देखील रात्री परत गाडी काढून फिरायला गेलो आहे. मी केवळ Free Way बद्दल लिहित नसून, अगदी आडरस्ते देखील तितकेच अप्रतिम आहेत(अपवाद म्हणून काही रस्ते, भारताची याद आणून देतात!!) 
असो, तसे लिहिण्यासारखे बरेच आहे.

श्रीनिवास खळे-चिरंजीव संगीतकार!!

तसे पहिले गेल्यास, संगीतकार बरेच झाले आणि पुढे होताच राहतील. पण, आयुष्यभर आपल्या तत्वांशी जराही तडजोड न करता, आपल्याशीच प्रामाणिक राहणारे आणि आपल्या मतांशी घट्ट चिकटून राहणारे संगीतकार फारच थोडे आढळतात. प्रत्येक संगीतकाराची स्वत:ची अशी एक शैली असते अयाष्याची सुरवात करताना, ती शैली दृग्गोचर होते पण पुढील वाटचालीत त्याच्या शैलीत, रचनेत बदल होत जातो - कधी चांगला तर कधी रूढ लोकप्रिय रस्त्याच्या वाटेने जाणारा. त्यामुळे, बरेच वेळा, जेंव्हा त्या संगीतकाराची रचना बघायला गेलो तर, बरेच वेळा निराशाच पदरी पडते. वास्तविक पाहता, तीन मिनिटांच्या गाण्यात, प्रयोगशीलता तशी फार अवघड बाब असते. चालीचा आकृतीबंध आणि त्या अनुरोधाने केलेली वाद्यामेलाची रचन,इथेच संगीतकाराची खरी चमक दिसून येते. तीन मिनिटांच्या गाण्यात, प्रत्येक सेकंद हा फार मौल्यवान असतो आणि तो त्या रचनेशी सतत गुंतलेला असतो.
अशा सगळ्या वैशिष्ठ्यांचा समन्वय श्रीनिवास खळे यांच्या रचनेत वारंवार आढळून येतो. अगदी, १९४० सालापासून सुरवात केली, जी.एन. जोश्यांपासून, मराठीत भावगीत हा सुगम संगीताचा प्रवास सुरु झाला आणि तेंव्हाच्या रचना बघितल्यातर आपल्या लगेच लक्षात येईल की, तेंव्हा पासूनच्या रचनावर, मास्तर कृष्णराव यांचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो तसेच मराठी नाट्यसंगीताचा प्रभाव देखील. आणि हा प्रभाव, जवळपास वीस वर्षे तरी सतत दृश्यपणे किंवा अदृश्यपणे आढळत होता.
या प्रभावापासून दूर पण स्वत:ची स्वतंत्र शैली तयार करण्यात ज्या संगीतकारांना यश मिळाले, त्यात श्रीनिवास खळे यांचा फार वरचा नंबर लागेल. या माणसाने, आयुष्यात स्वत:च्या शैलीशी तर कधीच तडजोड केली नाही पण, नेहमीच स्वत:च्या मर्जीनुसार चाली बांधल्या. खळ्यांच्या चाली या अतिशय गोड असतात, असे म्हणणे फार अर्धवट ठरेल. "शुक्रतारा तर" हे गाणे नि"संशय गोड आहे पण जर का आपण हे गाणे जरा बारकाईने ऐकले तर असे सहजपणे लक्षात येईल की, या गाण्यात गायला गेलेला प्रत्येक शब्द हा त्या आशयाशी अतिशय तलमपणे सुसंवाद राखत आहे. याच गाण्यातील, "लाजऱ्या माझ्या फुला रे" हीं ओळ ऐकावी. किती संथपणे आणि लयीशी एकरूप झालेली दिसेल. प्रणयाचे अत्यंत मुग्ध चित्र या कवितेत आहे आणि तोच भाव अतिशय संयतपणे संगीतकाराने साकारलेला आहे.  अर्थात, "शुक्रतारा" हीं केवळ एक रचना झाली, अशा कितीतरी रचना वानगीदाखल दाखवता येतील की ज्या माझ्या वरील विधानाला पुरावा म्हणून दाखवता येतील.
खर तर, खळ्यांच्या चाली या गायकी ढंगाच्या असतात, जिथे गायकाच्या गळ्याची खऱ्या अर्थाने सत्वपरीक्षा असते. त्यांचे गाणे ऐकताना फार सुंदर आणि सहज वाटते पण जर का प्रत्यक्षात गायला घेतले की त्यातील खाचखळगे दिसायला लागतात. मुळात, या संगीतकाराने कधीही, वाचली कविता-लावली चाल, असा सरधोपट रस्ता कधीही अंगिकारला नाही. प्रत्येक कविता हीं काव्य म्हणून दर्जेदार साने, हीं आवश्यक अट मानली. त्यामुळे, त्यांची गाणी ऐकताना, ती एक कविता म्हणूनदेखील वेगळ्या पद्धतीने आकलन करता येते. अर्थात, याचे श्रेय, तुकाराम, मंगेश पाडगावकर इत्यादी कवींकडे जाते पण या कवींनी लिहिलेली प्रतिभासंपन्न रचना तितक्याच आर्तपणे सादर करण्याची ताकद खळे यांची!!
खळ्यांच्या चाली फार संथ असतात हे खरेच आहे पण त्या लयीला अतिशय अवघड असतात. गायकाची खरी परीक्षा पाहणाऱ्या असतात. काही काही ठिकाणी तर, लय इतकी अवघड असते की ती साध्यासुध्या गळ्याला अजिबात पेलणारी नसते. "भेटीलागी जीवा" हा अभंग तर, पहिल्या स्वरापासून अवघड लयीत सुरु होतो त्यामुळे ऐकतानाच आपल्याला कळून चुकते की, हे गाणे आपल्या गळ्याच्या कुवतीच्या बाहेरचे आहे. पण, "नीज माझ्या नंदलाला" हे गाणे, सुरवातीला अति ठाय लयीत सुरु होते आणि मध्येच पहिल्या अंत-यानंतर लय फार वरच्या पट्टीत जाते आणि गायला अवघड होऊन जाते.
खळे हे कधीही भरमसाट वाद्यांचा वापर करीत नाहीत, बहुतेकवेळा व्हायोलीन सारख्या वाद्यावरच रचना पेलली जाते. कधी बासरीचा अवघड तुकडा आणि अति संथ अशी तबल्याची साथ, यातूनच गाणे सुरु होते. त्यांनी कधी वाद्यातून नवीन प्रयोग करण्याचा हव्यास धरला नाही तर, वेगवेगळे लयीचे बंध शोधून, त्यानुरूप रचना तयार केल्या. कवितेला नेहमीच अग्रक्रम देण्याचा त्यांचा आग्रह असतो व त्याचे महत्वाचे कारण म्हणजे, काव्यावर असलेली अव्यभिचारी निष्ठा!! त्यामुळेच त्यांची गाणी, कविता म्हणूनदेखील फार अर्थपूर्ण असतात.
मागे एकदा, संगीतकार यशवंत देव यांनी, गाण्याचे त्यांचे स्वत"चे असे एक मर्म सांगितले होते. ते म्हणतात, "गाण्याची चाल हीं कवितेतच दडलेली असते. आम्ही, फक्त ती शोधून काढतो!!" पण, यावरूनच काव्य हा गाण्याचा किती महत्वाचा घटक असतो, हेच अधोरेखित होते. खळे यांच्या चाळीत हाच अर्थ अमूर्तपणे आढळत असतो.
खळ्यांनी फक्त भावगीते दिली हीं अर्धवट माहिती झाली. "जय जय महाराष्ट्र माझा" सारखे वीरश्रीयुक्त गाणे खळ्यांनी दिले आहे, हे मुद्दामून सांगावे लागते तर, "कळीदार कर्पुरी पान" सारखी खानदानी बैठकीची लावणी सादर केली आहे. बैठकीची लावणीवरून एक किस्सा लिहितो. साधारपणे, बावीस वर्षांपूर्वी, एन.सी.पी.ए. मध्ये, आपले पु.ल.देशपांडे आणि अशोक रानडे यांनी "बैठकीची लावणी" म्हणून एक दृष्ट लागण्यासारखा कार्यक्रम सादर केला होता. एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करावे, याचा अत्यंत आदर्श वस्तुपाठ होता. रंजकतेच्या दृष्टीकोनातून, पु,लं,चे संचालन आणि अभ्यासक दृष्टीकोनातून अशोक रानड्यांचे संचालन, हा सगळा, दोन तंबोरे जुळून यावेत, त्याप्रमाणे जुळून आले होते. तेंव्हा, अशोक रानड्यांनी एक सूत्रबद्ध विवेचन केले होते. ते म्हणाले," बैठकीची लावणी, हीं उत्तर भारताच्या ठुमरीला महाराष्ट्राने दिलेले उत्तर आहे". सुरवातीला, मला याचा फारसा अदमास आला नाही पान नंतर जेंव्हा या वाक्याचा मी स्वतंत्रपणे विचार करू लागलो तेंव्हा त्या वाक्यातील अर्थ ध्यानात यायला लागला. "कळीदार कर्पुरी पान" हीं लावणी ऐकताना याचे नेमके प्रत्यंतर येते. ठुमरीतील लाडिक आणि आव्हानात्मक शृंगार आणि त्याचबरोबर जाणवणारा आर्तपणा याचे नेमके फार विलोभनीय दर्शन, या लावणीतून दिसून येते.
खळे नेहमी म्हणतात, "माझी गाणी, कमीत कमी पन्नास वर्षे तरी टिकली पाहिजेत" आणि याच जिद्दीने ते गाणी तयार करतात. आज, १९६५ साली, त्यांचे "शुक्रतारा मंदवारा" हे गाणे सादर झाले आणि आता या गाण्याला पंचेचाळीस वर्षे होत आली आणि आजही हे गाणे रसिकांच्या स्मरणात आहे. खळ्यांनी या संदर्भात, कधीही आपल्या मतांशी तडजोड केली नाही. त्यामुळेच त्यांना लायकीपेक्षा फार कमी चित्रपट मिळाले. त्यांच्या बाबतीत एक मत नेहमी ऐकायला मिळते व ते म्हणजे,"खळ्यांच्या चाली या कवितेसारख्या असतात"!! आता हे दूषण आहे का कौतुक आहे, याची मला कल्पना नाही, मुळात हे वाक्यच अति खुळचट आहे. चाली कवितेसारख्या असतात म्हणजे काय?  वास्तविक प्रत्येक गाणे हे शब्दांवरच आधारलेले असते आणि हीं वस्तुस्थिती असताना, कविता हीं काही अशी गोष्ट आहे का की जी गाण्यापेक्षा फार वेगळी असते!! कविता हीं कविताच असते. काही कविता गाण्यायोग्य असतात, त्याच्यात अंगभूत लय दडलेली असते. उदाहरणार्थ, भा रा, तांबे, बा.भा. बोरकर, मंगेश पाडगावकर किंवा सुरेश भट, यांच्या कविता या बहुश: अत्यंत लयबद्ध असतात की ज्या संगीतकाराला चाल बांधण्यास उद्युक्त करतात तर काही कविता या सुरांपासून फार वेगळ्या असतात. अर्थात, त्या कवितेत्देखील एक आंतरिक लय हीं असतेच, उदाहरणार्थ, पु.शि.रेगे, इंदिरा संत, विं.दा.करंदीकर किंवा मर्ढेकर इत्यादी. यांच्या कवितेत वाचताना, एक लय जाणवत असते की जी त्या कवितेच्या आशयाशी सुसंवाद साधणारी असते. फक्त त्यांना सुरांचा भार सहन  होण्यासारखा नसतो, इतकेच. तेंव्हा, चाल कवितेसारखी असते, या वाक्याला तसा काही अर्थ नाही.
खळ्यांच्या चाली गायला अवघड असतात, हे मान्य व्हायला काहीच हरकत नाही. प्रत्येक संगीतकाराचा स्वत:चा असा एक पिंड असतो व त्यानुरुपच त्याची कला सादर होत असते. वसंत प्रभू, वसंत देसाई, सुधीर फडके किंवा वसंत पवार याच्या चाली, अपवाद वगळता, सहज गुणगुणता येतात तर, श्रीनिवास खळे, जयदेव, हृदयनाथ मंगेशकर यांच्या चाली लयीला अवघड असतात. गाण्यात अशी प्रतवारी करणे खरे तर फार चुकीचेच ठरेल.
संध्याकाळ होत असते, घरात दिवा लागलेला असतो आणि बाहेर अंधाराचे साम्राज्य पसरत असते. घरातली वयस्कर मंडळी विक्लान्तपणे परतलेली असता. फक्त, घरातील चिमण्या मुलांचा पत्ता नसतो आणि, मग लताच्या दिव्य आवाजात, "या चिमण्यांनो परत फिरा" या गाण्याचे सूर कानावर येतात आणि तीच संध्याकाळ फार विषण्ण वाटायला लागते.

जयदेव-एक अपयशी संगीतकार!!

खरतर, जयदेवला "अपयशी" संगीतकार म्हणण तस योग्य नव्हे, कारण, त्याने असे स्वत: कधीच म्हटल्याचे मी तरी वाचलेले/ऐकलेले नाही. आयुष्याचा बराच काळ सचिन देव बर्मन यांचा सहाय्यक म्हणून भूमिका बजावली. त्यामुळे, सतत त्यांच्या सावलीतच त्यांचे जीवन व्यतीत झाले असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. अर्थात, जेंव्हा, केंव्हा स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून संधी मिळाली, तेंव्हा मात्र, त्यांनी स्वत:चा दर्जा दाखवून दिला.
मला वाटत, त्यांच्या आयुष्याची सुरवातच मुळी "सहाय्यक" म्हणून झाली आणि त्यातच बरीचशी कारकीर्द झाकोळली गेली. अगदी, सुरवातीला, उस्ताद अली अकबर खान यांच्या समवेत, देव आनंदच्या "आन्धीया" या चित्रपटाला संगीत देताना, सहाय्यकाची भूमिका स्वीकारली आणि नंतर, एस.डी.बर्मन यांच्या समवेत ऐन भरातला काळ!! जयदेव यांचे खरे नाव झाले ते, "हम दोनो" या चित्रपटाने!! पण, दुर्दैवाने, या संगीताच्या लोकप्रियतेचा फायदा त्यांना अजुबत झाला नाही. एकदा, देव आनंद म्हणाला होता कि," जयदेव, सोपी चाल अवघड करायचा!!" अजब तर्कशास्त्र!! एक खरे कि, जयदेव यांच्या चाली अवघड असायच्या पण तो त्यांचा शैलीचा भाग होता, त्याला कोण काय करणार. पण, मग, मदन मोहन तरी काय फारसे वेगळे करायचा!! अर्थात, मदन मोहन देखील अपयशी संगीतकार म्हणूनच आयुष्यभर  वावरला!! एखाद्या संगीतकाराची शैली जर का रूढ मार्गाने न जाता, वेगळ्या वाटेने जात असली तर, तो काय दोष मानायचा का? त्या अर्थाने मराठीतील, श्रीनिवास खळे आणि हृदयनाथ मंगेशकर, हे देखील त्याच मार्गाचे वाटसरू म्हणायला हवेत!!
जयदेवला, "हम दोनो" व्यतिरिक्त कधीही, कुठल्याही चित्रपटाने लौकिकार्थाने यश दाखवले नाही. अगदी, "अंजली" पासून ते शेवटचा, "हीर रांझा" पर्यंतचा इतिहास, हेच उत्तर दर्शवतो. हा नशिबाचा खेळ म्हणायचा कि आपल्या तत्वांना आयुष्यभर चिकटून राहण्याची किमत मोजली, असे म्हणायचे!! संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि पाया पक्का असूनदेखील, केवळ स्वत:ची वेगळी ओळख ठेवण्याच्या नादापायी, जयदेवने आपल्या सांगीतिक आयुष्याची फार मोठी किमत मोजली. जयदेवने, इतर संगीतकारांच्या मानाने फारच तुरळक चित्रपट केले पण, त्यातील बहुतांशी चित्रपट केवळ अविस्मरणीय असेच होते, अगदी, बुद्धिनिष्ठ विचारप्रणालीच्या सहाय्याने सांगोपांग चिकित्सा केली तरीदेखील!! जयदेवची स्वत:ची अशी शैली होती.आयुष्यभर बहुश: त्यांनी भारतीय वाद्ये आणि ती देखील अत्यंत आवश्यक असतील तितकीच, त्यांनी आपल्या रचनेत वापरली. उगाच ५० ते १०० वादन्काचा ताफा पदरी बाळगण्याचा अविचारी हव्यास कधीही ठेवला नाही. एखादी बासरीची लकेर, संतूरचा नाजूक तुकडा, यातूनच त्यांच्या रचनेचे स्वरूप स्पष्ट होई. त्यांचा हाच विचार असायचा कि, जर का ४,५ व्हायोलीन वादक पुरेसे असतील तर, उगाचच ५० वादकांचा ताफा वापरण्याची  काहीच गरज नाही आणि त्यामार्गे, फुटकळ लोकप्रियता मिळविण्याची गरज नाही. असला, अव्यवहारी विचारांचा संगीतकार होता.
आधी शब्द कि आधी चाल, हा भावगीत/चित्रपट गीतातील एक कधीही न संपणारा वाद आहे. अर्थात, आपल्या सारख्या रसिकांच्या दृष्टीने बघायचे झाल्यास, आपल्यापुढे जे गाणे सादर होते, ते महत्त्वाचे मग कुणी कुठली का पद्धत स्वीकारावी!! हा प्रत्येकाच्या पिंडाचा भाग आहे. जेंव्हा आपल्यासमोर एखादे गाणे येते तेंव्हा, ते गाणे, १] कविता, २] संगीत रचना आणि ३] गायन, या तीनच घटकातून ऐकायचे, इतकाच भाग आपण स्वीकारू शकतो. अर्थात, हे तिन्हीही घटक, वाटतात तितके सहज व सोपे नाहीत. इथे, मी केवळ "अर्थपूर्ण" गाण्यांचाच विचार करीत आहे. कारण आजही, आपल्या समजत असाच विचार प्रचलित आहे कि, तीन मिनिटांचे गाणे, हे "संगीत" नव्हेच!! अर्थात, हा देखील एक खुळचट विचार आहे म्हणा. प्रत्येक, गाण्यान, वरील तिन्हीही घटक आवर्जूनपणे आवश्यकच असतात. यातील एक जरी घटक "दुबळा" राहिला तर, सगळी रचनाच "फोफशी" होते. जयदेवच्या गाण्यांत हीं जाणीव प्रखरपणे जाणवते. जयदेवचे कुठलेही गाणे घ्या, शब्द हा घटक त्यात आवर्जूनपणे ठळकरित्या जाणवतो. अर्थात, जयदेवने बहुतेकवेळा साहिरची साथ घेतली होती आणि साहीर तर मुळातला सक्षम कवी, नंतर गीतकार!! खरतर, हा देखील एक अत्यंत निष्फळ वाद आहे, कि गीतकार हा कवी असतो कि नाही? जेंव्हा आपण, साहीर, शकील यांच्यासारखे, किंवा मराठीतील, ग.दी. माडगुळकर घेतले तर, हेच आपल्या लक्ष्यात येईल कि, हे "गीतकार" मुळात प्रतिभावंत कवी आहेत कि ज्यांच्या कविता मुलत: अतिशय गेयबद्ध आहेत. शब्दच जर गेयतापूर्ण असतील तर संगीतकाराला एक वेगळाच हुरूप  येतो, हे एक निखालस सत्य आहे. जयदेव यांच्या रचनेत, या विचाराचे नेहमीच भान असल्याचे दिसून येते. अर्थात, या संदर्भात, खूप काही लिहिता येईल पण खर तर हा एका वेगळ्या निबंधाचा विषय आहे.
"हम दोनो" मधील गाणी आपण, वानगीदाखल बघूया. "अल्ला तेरो नाम" पासून ते " कभी खुद पे" सारख्या गझल सदृश गाण्यांवर जरा नजर टाकली तर, माझा मुद्दा ध्यानात येईल. इथे, मला आणखी एक गमतीचा मुद्दा सुचला. "अल्ला तेरो नाम" हे गाणे तर अप्रतिम आहेच, यात वादच नाही, पण, मोठ्या झाडाच्या संपर्कात आजूबाजूच्या झाडांची वाढ जशी खुटते तसा प्रकार दुसऱ्या गाण्याबाबत झाला आहे. "अल्ला तेरो नाम" ची लोकप्रियता प्रचंडच आहे आणि आता तर ते लताचे एक classic गाणे म्हणूनच ओळखले जाते पण, याच चित्रपटातील, "प्रभू तेरो नाम" हे भजनदेखील तितकेच सुश्राव्य आहे, हे फारसे कुणी ध्यानातच घेत नाही आणि एक प्रकारे, या गाण्यावर थोडासा अन्यायच झाला आहे!! असाच प्रकार, सी. रामचंद्रांच्या "अनारकली" बाबत झाला आहे,. "ये जिंदगी उसीकी हैं" हे गाणे अजरामर झाले पण, त्याच चित्रपटातील, "मुहोब्बत ऐसी धडकन हैं" हे गाणे पार मागे पडले. खर तर, रचनेच्या दृष्टीकोनातून पहिले तर, "मुहोब्बत ऐसी धडकन" हे गाणे नितांत रमणीय आणि गोड गाणे आहे. थोडा वेगळा विचार केला तर, असे दिसेल कि, "ये जिंदगी उसीकी हैं" या गाण्यावर, "शारदा" नाटकातील, "मूर्तिमंत भीती उभी" या गाण्याची थोडी पडछाया आहे आणि हे खुद्द सी. रामचंद्रांनी देखील कबूल केलेले आहे तरी देखील लोकप्रियता कशी चंचल असते, हे बघण्यासारखे आहे. असो,
जयदेवने फक्त लताकडूनच अफलातून रचना गावून घेतल्या आहेत असे नव्हे तर, हरिहरन, सुरेश वाडकर, येशुदास आणि रुना लैला यांच्या गळ्यातून तितक्याच अप्रतिम रचना सासदार केलेल्या आहेत. रुना लैलाचे "बोलो बोलो कान्हा" हे गाणे कधी ऐकले आहे का? आवर्जूनपणे ऐकण्यासारखे आहे. सुरेश वाडकर तर, "सीनेमे जलन" या गाण्यातूनच लोकांच्या पुढे आला. जयदेवची खासियत अशी आहे कि, त्याची गाणी ऐकताना गोड वाटतात पण, प्रत्यक्ष्य ऐकताना त्यातील "अवघड" लयीचा अनुभव येतो. वानगीदाखल, लताचेच प्रसिद्ध, "ये दिल और उनकी" हे पहाडी रागातले गाणे ऐकावे आणि माझ्या वाक्याची प्रतीती घ्यावी. इतके लयबद्ध गाणे पण तितकेच गायला अवघड!! तसाच प्रकार, " तू चंदा मीन चांदनी" आणि "मै आज पवन बन जाऊ" या गाण्यांच्या बाबतीत येतो. "मै आज पवन" हे गाणे तर खास जयदेवच्या सगळ्या रचनाचा अर्कच आहे. त्यात वापरलेला राजस्थानी मांड राग तर, खास जयदेवची मुद्रा घेऊनच प्रकट होतो. "रात भी हैं कूच भिगी" सारखी रचना आणि त्यात वापरलेला कोरस, सगळेच इतके विलोभनीय आहे कि, अशी गाणी ऐकताना, आपणच आपल्या मनाशी आपल्या लेखणीचा पराभव स्वीकारावा!!
गाणी, आणखी अनेक सांगता येतील कि त्या योगे जयदेवची प्रतिभा निखरून मांडता येईल. पण, खर तर, गाण्यातील वाद्यमेळ, त्याचा कवितेशी जोडलेला बंध आणि गायकीतून सादर केलेली रचना, हा केवळ ऐकण्याचाच भाग आहे आणि तो फक्त, आपण एकटेच बसून शांतपणे अनुभवण्याचा भाग आहे. खर तर, कुठलेही संगीत हे फक्त आपण आणि ती रचना, इतकाच संवादाचा संदर्भ असतो. तिथे, दुसरे कुणीही उपरेच असतात. प्रत्येक गाणे हे, फक्त तुमच्याशीच संवाद साधत असते आणि त्यातूनच तुम्ही त्या गाण्याला प्रतिसाद देत असता. निदान, माझी तरी, गाणे ऐकण्याची अशीच प्रक्रिया आहे.
रात्र बरीच झालेली असते, आजूबाजूला, कसलाच आवाज नसतो. आपणही, विक्लान्तपणे आपल्या खोलीत बसलेलो असतो. अशाच वेळी, दूरवरून, लताचे, "किस किसको दीपक प्यार करे" हे अत्यंत अवघडल्या रचेनेचे सूर ऐकायला येतात आणि आपण, स्वत:च कधी अंतर्मुख व्हायला लागतो हेच कळत नाही.

पुरिया धनाश्री-संधिप्रकाश!!

भारतीय संगीतात, "रागसंगीत' हि एक अपूर्व चीज आहे कि ज्या स्वररचनेला जागतिक संगीतात तोड नाही. पाश्चात्य शास्त्रीय संगीतात, आपल्यासारखेच ७ स्वर असतात. पण, "सिम्फोनी" हीं अत्यंत बांधीव स्वर रचना असते, त्यात, वैय्यक्तिक विचारला फारसे स्थान नसते. "बीथोवन, मोझार्ट" यांच्या रचना असामान्य खर्याच आणि सादर करणे, हे अति कौशल्याचे काम आहे. पण, आपल्या रागदारीत जसा, वैय्यक्तिक विचार, याला, जास्त प्राधान्य साते आणि ती "मिंड", "गमक" या अलंकारांनी अवगुंठीत असते. त्यामुळेच, आपले रागसंगीत, संपूर्णपणे, स्वरलेखनाच्या परिभाषेत ठामपणे लिहिता येत नाही. प्रत्येक कलाकाराची  प्रतिभा, त्या रागाचे तेच स्वर, अत्यंत वेगळ्या मांडणीतून सादर करीत असतो आणि आपण, ऐकणारे स्तिमित होत असतो. याचे संपूर्ण श्रेय, आपल्या पूर्वीच्या ऋषी-मुनींकडे जाते. इ.स.च्या हजारो वर्षे मागे जाताना, आज उपलब्ध असलेल्या ग्रंथांचा मागोवा घेतला असता, भरत मुनिना या शोधाच्या अग्रपूजेचा मान  जातो, कि ज्या वेळेस ग्रीक संगीत जन्माला देखील आले नव्हते!! भारत मुनींनी, जे स्वर संशोधन आणि स्वरांतील श्रुती मांडणी केली आहे, तिला आज देखील तोड नाही. आज, आपल्याकडे शास्त्रीय उपकरणांद्वारे या स्वरांच्या रचनेचाप्रत्यय घेता येतो, तोच प्रत्यय, त्य काळी, हीं उपकरणे उपलब्ध  नसताना देखील केवळ कानाद्वारे स्वर संशोधन, केले याचा आपल्याला निश्चितच अभिमान वाटला पाहिजे. श्रुती व्यवस्था समजून घेणे फार अवघड आणि किचकट काम आहे आणि त्यातून संस्कृत भाषेचा तितकाच व्यासंग असायला हवा. आज, पहिले गेल्यास, त्यानंतर, शेकडो ग्रंथ या विषयावर लिहिले गेले, अगदी, एकोणिसाव्या शतकात, भातखंडे, आचरेकर आणि, अशोक रानडे, यांच्यापर्यंत, लिखाण अतिशय विस्तृतपणे झाले असले तरी, श्रुतीव्यवस्था हा विषय पूर्णपणे, आत्मसात झाला आहे, असे म्हणवत नाही. असो, हा विषय ४,५ वाक्यात संपणारा नसून, त्याचा आवाका फार प्रदीर्घ आहे.
तेंव्हा, आता आपला, "पुरिया धनश्री"!! वास्तविक पाहता, भारतीय संगीतातील संकेताप्रमाणे हा राग संध्याकाळचा मानला जातो. वास्तविक, या रागाचे वर्णन "रागिणी" असे करावे लागेल. आपल्याकडे, असे बरेच संकेत प्रचलित आहेत आणि त्यानुरूप राग सादर केले जातात. दिवसभराच्या उन्हाच्या झळा शांताविल्यानंतरच्या  काळात, हीं रागिणी फार प्रभावी वाटते. तसे पहिले गेल्यास, संध्यासमयी, अनेक राग-रागिण्या प्रचलित आहेत. उदाहरणार्थ "यमन कल्याण, श्री, मारवा, पुरिया" इत्यादी. शास्त्रानुसार, यमन कल्याण, श्री, मारवा आणि पुरिया धनाश्री हे राग एकाच कुटुंबातले आहेत.पसन, ज्सरी एकाच कुटुंबातले असले तरी, प्रत्येकाचा स्वभाव फार वेगळा आहे. यमन कल्याणात, ईश्वर समर्पण वृत्ती जास्त आढळते तर, श्री, मारवा ह्या रागात, आर्त विरही वृत्ती आढळते. गंमत म्हणजे, या तिन्ही रागांतील, हाही अंश, पुरिया धनाश्रीत आढळतात. मला तर, नेहमीच मारवा ऐकताना, एखादी जिवंत ठसठसलेली जखम वाहत असल्याचा भास होतो. इतका, वेदनेचा उग्र अनुभव पुरिया धनाश्रीत येत नसला तरी, संध्यासमयीची आर्त हुरहूर आणि त्याचबरोबर, प्रणयोत्सुक विरहिणीची व्यथा नेमकेपणाने व्यक्त केली जाते. संध्याकाळी, एखादी नवथर तरुणी, आपल्या प्रियकराला संकेतस्थळी भेटण्यास आतुर होत असताना, आपल्याला, तसाच प्रतिसाद मिळेल न, या विवंचनेतून आकाराला आलेली भावना, या रागिणीत फार समर्थपणे दिसून येते. पुरिया राग हा तसा या रागीनीच्या जवळ जात असला तरी, पुरिया हा जास्त करून भैरवी जवळ फार जातो, कि त्यात, "आता सारे संपत येत आहे," अशी एकतर साफल्याची किंवा हताशतेची  भावना अधिक दृग्गोचर होते. पुरिया धनाश्रीत, इतकी विवशता आढळत नाही. 
सूर्यास्त होत असताना, गाभाऱ्यावर वस्त्र पडत जावे त्याप्रमाणे, अवकाशात तिमिराचे राज्य हळूहळू सुरु होत असताना, दूर क्षितिजावर, रंगांची उधळण होत असते. फक्त गुलाबी रंगात, निळ्या रंगाचा गडदपणा मिसळत असतो. अशा वेळेस, जाणवणारी, कालिदासाच्या भाषेत सांगायचे झाल्यास, "पर्युत्सुक" अवस्थेत, एखादी नवथर तरुणी, आपल्या प्रियकराची आतुरतेने वात पाहत असताना, होणारी धडधड, पुरिया धनाश्रीमध्ये फार अप्रतिमरीत्या उमटते. थोड्या, काव्यात्मक भाषेत बोलायचे झाल्यास, बालकवींच्या, "औदुंबर" कवितेतील, येणारा, "गोड काळिमा" या रागीणीशी फार जवळचे नाते दर्शवून जातो.
ज्ञानेश्वरांनी निर्मिलेला  "दु;ख कालिंदी" या जाणिवेशी अधिक तरलतेने, हीं रागिणी आपले नाते सांगते. आणि इतके लिहूनही, पाडगावकरांच्या ओळीत म्हटल्याप्रमाणे, "शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले" हीं तर भावना  मुळाशी सतत वास करताच असते. खर तर, कुठलाही राग/रागिणी हीं नेहमीच आपल्याला कैवल्यात्मक दर्शनातून, शब्दांच्या पलीकडल्या भावनेशी आपले नाते जोडीत असते, आणि हीं गोष्ट अधिक चांगल्याप्रकारे, पुरिया धनाश्रीमध्ये दृग्गोचर होते.
वास्तविक पहिले तर, यमन रागाशी, या रागीनीचे फार जवलेचे नाते सांगता येते पण, यमन रागाचा विस्तार हा, आपल्या हातांच्या कवेत न मावता येणाऱ्या अवाढव्य झाडाच्या बुन्ध्याप्रमाणे आहे. त्यामाणे, या रागिणीचा विस्तार अतिशय अटकर अंड सुडौल आहे. इथे, या रागिणीचे स्वरलेखन करून, पांडित्याचा आव आणण्याची काहीच गरज नाही तरी देखील, "कोमल निषाद" हा, या रागिणीचा एक अलौकिक नजराणा आहे. खरतर, कुठलीही स्वरलिपी, हीं त्या कलाकृतीचा एक आराखडाच असतो. कलाकार, त्यात अंतर्भूत असलेला अनाहत नादाचे आपल्याला दर्शन घडवीत असतो. कुठलाही राग, हा मला नेहमीच अलापिमध्ये अधिक भावतो. काय होते कि, एकदा लय हीं मध्य अनिल द्रुत लयीत शिरली कि मग त्याचे तळाशी गणित जुळते आणि, मग लयीचे वेगवेगळे बंध ऐकणे, इतकेच आपल्या हाती राहते. द्रुत लयीत तर, प्रत्येक स्वर, अनुभवायला वेळच मिळत नाही. सतत, तळाशी जुळलेल्या लय बंधाकडेच आपले लक्ष्य वेढलेले असते. अलापिमध्ये, असे काही घडत नाही. मागील तंबोरा आणि त्यातून उमटणार्या शुद्ध षडज आणि पंचमाच्या शर्करावगुंठीत स्वरातून, जेंव्हा स्वयंभू "सा" आपल्या समोर सदर होतो. तिथे रागाची खरी खूण आपल्याला जाणवते. गाणे खरेतर, त्या क्षणी सिद्ध होते. संथ लयीत, तुम्ही प्रत्येक सुराचा आपल्या कुवतीप्रमाणे आनंद उपभोगू शकता. एखादा हिरा, जसा प्रत्येक कोनातून वेगवेगळी किरणे फाकीत असतो, तसा रागात प्रत्येक सूर हा वेगवेगळ्या अंदाजाने आपले अस्तित्व दर्शवित असतो.
आणि, अशा शांत समयी, अशाच हुरहुरत्या क्षणी, आसमंतात, "जिवलगा" अशी आर्त हक माझ्या कानावर येते आणि मग माझ्या पापण्यांच्या हालचालीला वाचा फुटू लागते!!