Wednesday 18 June 2014

घरंदाज गायकी




नावावरूनच ध्यानात यावे की हा शास्त्रीय संगीतावरील ग्रंथ आहे. लेखक वामनराव देशपांडे यांच्या विचक्षण नजरेचा प्रत्यय प्रत्येक पानावर दिसून येतो. ग्रंथात, प्रथमपासून रागदारी संगीत, त्यात असलेली घराणी, प्रत्येक घराण्याचे वैशिष्ट्य आणि शेवटी, “हार्मनी” व “मेलडी” यातील फरक इत:पर विषय विचारार्थ घेतले आहेत. वास्तविक, यातील विषयावर स्वतंत्र पुस्तक व्हावे, अशा योग्यतेचे विषय आहेत. इथे शास्त्र आणि त्याला अनुषंगून रसिकता, याचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. शास्त्र म्हटले की साधारणपणे, सामान्य माणूस आणि रसिक देखील जरा बुजून जातात. शास्त्राची क्लिष्ट आणि किचकट भाषा, लगेच ध्यानात न येणाऱ्या संज्ञा, त्यातील गणिती भाग, आणि संस्कृतप्रचुर विवेचन, यामुळे कुणीही सहसा शास्त्राच्या वाट्याला जात नाही. पण, एक बाब ध्यानात ठेवावीच लागेल, कुठल्याही कलेला, शास्त्राशिवाय अधिष्ठान आणि पर्याय नाही. शास्त्रामुळे, ती कला अधिक बांधीव, अधिक समर्पक आणि या कलेला नेमकेपणा येतो. संज्ञा आणि त्याला जोडून येणाऱ्या भाषेचा अन्वयार्थ लावणे अवघड खरेच परंतु एकदा का त्याची गोडी लागली किंवा त्या भाषेत रस निर्माण झाला की मग त्या विषयाचा आवाका, संपूर्ण विषय समजणे, यामुळे मिळणारा आनंद खोलवर,अंतर्मुख असतो, हे मात्र मान्यच करावे लागेल.
आपले शास्त्रीय संगीत मुलत: संस्कृत भाषेतून अवतरले आहे आणि सध्यातर या भाषेची अवनती झाल्याने, कुणालाच संस्कृत भाषेचा नेमका अर्थ लावणे दुरापास्त झाले आहे. हीच बाब, याचे शास्त्र अवगत करण्याच्या दृष्टीने आडकाठी करते. परंतु त्याला दुसरा पर्याय नाही. वास्तविक, आपण चिकित्सेला घाबरतो, पर्यायाने टीकेला सामोरे जात नाही. पण, जर चिकित्साच टाळायची म्हटले तर मग दर्जा कसा ठरवायचा, हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे कलेच्या बाबतीत फार गोंधळ निर्माण केला जातो आणि नेमका दर्जा न समजून घेतल्याने, कलेल्या नेमक्या अंगाला महत्व न मिळता, लोकानुनयानुसार आवड निर्माण केली जाते. चिकित्सा म्हटली की बुद्धीप्रामाण्य येतेच आणि त्यामागोमाग वैचारिक व तौलनिक विचार येतात, इथेच बहुतेकजण आळस करतात. तरतमभाव मनात ठेऊन,मुलभूत निकष प्रस्थापित करून,त्यानुसार प्रतवारी लावणे आणि शास्त्र अधिक विकसित करणे,हे सगळे “चिकित्सा” या शब्दामागे येते आणि इथेच तुमच्या आवडीचा खरा कस लागतो. प्रस्तुत ग्रंथात, याच दृष्टीचा अंतर्भाव केलेला आहे.इथे सौंदर्यशास्त्र आहे, तर्कशास्त्र आहे परंतु हे सगळे स्वर व लय, या दोन संज्ञेभोवती मांडलेले आहे.
लेखकाने सुरवातीलाच, उत्तर भारतीय संगीताची वैशिष्ट्ये विशद करताना, १]स्वर, २]लय, याच घटकांना समोर ठेऊन, ग्रंथ लिखाण सुरु केले आहे. आपली स्वरनिर्मिती ही नैसर्गिक ध्वनीतून झालेली आहे आणि त्यानुरुपच स्वरांचे सप्तक आणि पुढे श्रुती व्यवस्था तयार झाली.स्वरांच्या हालचालीतून लय निर्माण झाली पण ती स्वराला इतकी एकरूप आहे, की तिचे स्वतंत्र अस्तित्व दाखविणे दुरापास्त होते. याच दोन घटकांना अनुसरून भारतीय संगीतात वेगवेगळी घराणी निर्माण झाली.मुळात बघितले तर असे दिसून येईल की ज्याला आपण “घराणे” असे म्हणतो, ते,दुसरे तिसरे काहीही नसून, गायनाचा वेगळा विचार हेच आहे. अर्थात, वेगळा विचार, यात प्रचंड संगीत भांडार साठलेले आहे. ज्या गायकांनी (पुढे वादकांच्या बाबतीत असेच झाले आणि त्यांची स्वतंत्र घराणी तयार झाली!!) मागील विचारांपासून प्रवृत्त होऊन, स्वत:चा नवा विचार मांडला, तिथे नवीन घराण्याचा उदय झाला, असे अत्यंत थोडक्यात म्हणता येईल.
या दृष्टीने बघायला गेल्यास, संगीत हे आजपावेतो, गुरु/शिष्य परंपरेने चालत आलेले आहे.त्यामुळे त्याला “वंशसातत्य”  प्राप्त झाले आहे. संगीताचे साधन म्हणजे “आवाज”!! आणि त्याचे माध्यम म्हणजे “स्वर”. स्वर हा मानवी आवाजातला अगदी आतला अंतर्मुख करणारा आवाज!! आता, गुरु/शिष्य परंपरेत,गुरुकडून जे ज्ञान मिळते,त्याचे संगोपन करणे, प्रसंगी त्याचे संवर्धन करणे,यातून घराण्याची निर्मिती होते. मानवी आवाज,सुसंस्कारित करणे, त्यासाठी अशी “तालीम”घेणे आणि त्यानुसार स्वत:चा आवाज “घडविणे,या सगळ्या प्रक्रियेतून घराणे निर्माण होऊ शकते. आवाजी बनविण्यासाठी, मेहनत, रियाझ, यातून,गायकाचा विचार वाढत जातो. आवाजावर मेहनत करण्याच्या प्रक्रियेने एक गोष्ट घडते.ती म्हणजे,आवाजात “घनता” आणि “वजन” येते. त्याचा उपयोग रागदारी संगीतासाठी बराच होतो. एकूण, आवाज हमखास सुरात लावता येणे,तो अगदी त्याच जागेवर स्थिर ठेवणे, त्यातील वरचे आणि खालचे स्वर हुकमी लावता येणे,आणि आवाजात घनता प्राप्त करून घेत येणे, हे सगळे मेहनतीनेच शक्य असते.
इथवर आपण, आवाज कमावणे, हे बघितले आणि याचाच उपयोग घराणे प्रस्थापित करण्याकडे मुलत: होतो. तेंव्हा “घराणे” प्रस्थपित करण्यासाठी, काही बाबी लक्षात घ्याव्या लागतात. अ] घराण्याला “घराणे” पद प्राप्त होण्यासाठी वंशसातत्य आवश्यक असते.ब] घराण्याची म्हणून एखादी “रीत” किंवा “शिस्त” असते, ती नेमकी साधावी लागते.क] प्रत्येक घराणे हे एखाद्या प्रभावशाली गुरूच्या आवाजधर्मावर आधारित असते. अर्थात, तिसरा मुद्दा हा थोडा पहिल्या मुद्द्याला संलग्न आहे. त्यानिमित्ताने, लेखकाने हयात असलेल्या घराण्याची उदाहरणे दिली आहेत. उदाहरणार्थ भास्करबुवा बखल्यांची स्वतंत्र प्रणाली, वझेबुवांची गायकी, तसेच अब्दुल करीम खानसाहेबांची गायकी इत्यादी. इथे प्रत्येक गायक आणि त्याची गायकी, त्याचा स्वतंत्र विचार व त्या विचारला अनुरूप निर्माण झालेली शैली, हेच “घराणे” या शब्दामागील खरे तत्व आहे. आता, आवाज लावण्याची वेगळी पद्धत आली, म्हणजे घराणे अस्तित्वात आले, असे ढोबळमानाने म्हणता येते. यानुसार, पुढे, वेगवेगळ्या घराण्यांची माहिती, तिचे स्वभाव, वैशिष्ट्य,त्यातील मोठेपणा आणि कमतरता याचे सुंदर विवरण केले आहे.
घराणी आणि त्यांची आवाज लावण्याची पद्धत,यानुसार फरक पडत जातो. “किराणा” “आग्रा” आणि “जयपुर” या गायनशैलींचा उहापोह केलेला आहे. किराणा घराण्यात स्वर लावताना, नाजूक तरीही तीक्ष्ण असा लावला जातो, “आग्रा” घराण्यात आवाज लावताना,घोटून,अनुनासिक पद्धतीने आणि ज्याला “गाज” असे म्हणता येईल,अशा प्रकारे गायन केले जाते. याउलट “जयपुर” घराण्यात, एखादी कोरीव मूर्ती आकारास यावी,तशी रेखीव,आकारबद्ध गायकी असते.अर्थात, प्रत्येक घराण्यात स्वराच्या शुद्धतेला नेहमीच झुकते माप दिलेले आढळेल. आणखी वेगळा फरक असा सांगता येईल की किराणा घराणे प्रामुख्याने “स्वर” तर आग्रा घराणे “लय” याला आधारभूत मानतात तर जयपूर घराणे बव्हंशी दोन्हीच समन्वय साधतात. याबाबत, या ग्रंथात अतिशय सुरेख विवरण केले आहे आणि ते मुळातून वाचणे खुमासदार आहे.
पुढील प्रकरणात “बंदिश” आणि त्याचे “कायदे, यावर विचार केला आहे. सुरवातीला म्हटल्याप्रमाणे, प्रत्येक घराण्याचे स्वत:चे असे “कायदे” असतात आणि त्यानुरूप गायन चालू असते. विलंबित लयीतील “अस्ताई” तिथे कुठले स्वर घ्यायचे, कुठले वर्ज्य करायचे,तसेच त्यातील आवर्तमय खंड,खंडाचे स्वरविराम आणि त्यातून झालेली एकजिनसी भव्याकृती असे गायनाचे स्थूलमानाने स्वरूप सांगता येईल. रागाचा विस्तार चालू असताना, तबलियाची तालक्रिया चालू असते.तिच्या १०,१२ अथवा १६ मात्रांच्या आवर्तमालाही चालू असतात.या प्रत्येक आवर्तमालेत,गायकाने आपली स्वरमाला “चुस्त”बसवायची असते.अशा बनावटीत ठेक्याच्या प्रत्येक आवर्तनात एक अथवा अधिक सौंदर्यबिंदू कल्पून त्याची मांडणी करावी लागते. गायक जसा रागाचा अधिक  विस्तार करीत जातो,तशी त्यात आलापी,लयीच्या अंगाने बोल फिरवणे,उपजअंगाने रागाची उकल करणे,आणि प्रत्येक आवर्तनाच्या शेवटी, डौलदार रीतीने समेवर येणे.कधी आधीच्या बिंदूवर थांबून रसिकांची उत्कंठा वाढविणे व त्याची पूर्तता करून विसर्जित होणे, या सगळ्या प्रक्रियेला सांगीतिक भाषेत “बंदिश” महणतात. चीजेच्या रचनेत हीच “बंदिश” असावी लागते. मग, त्यात “गमक”,”बोलतान”,”फिरत” किंवा “तानक्रिया” हे सगळे अलंकार अंतर्भूत असतात. यात दोन प्रकारचे स्वरबंध असतात.१] धृवपद किंवा चिजेचे “तोंड”, २] स्वराबंधनानी सतत बदलत जाणारा, ज्याला “उपजअंग” म्हणतात.एकूण उत्कंठन आणि विसर्जन ज्यामुळे होतो, तो “बदल”किंवा “पुनरुद्भव” हाच “कायदा” सर्व संगीताचे मुळ तत्व आहे, असे म्हणता येईल.त्यामुळे गायनाला “बंदिश” प्राप्त होते व त्याची आकृती सिध्द होते.प्रत्येक घराण्याची शिस्त आणि सिद्धता ही याच अंगाने पुढे येते. बंदिश या विषयावर इथे अतिशय सखोल विचार केलेला आहे.
नंतर, बडे गुलाम खानसाहेबांचे “पतियाळा” आणि अमीर खानसाहेबांचे “इदोर” घराणे, या दोन अतिशय प्रथितयश घराण्यांबद्दल विस्ताराने लिहिले आहे. अर्थात, इथे एक स्पष्ट करायला हवे, कुठलेही घराणे घेतले तरी ते स्वर आणि लय,या दोनच घटकांना केंद्रीभूत मानून गायकी साकार करतात. पतियाळा घराण्याची वैशिष्ट्ये सांगताना,  गायकीत “शब्द” या माध्यमाचा कसा अप्रतिम उपयोग केला गेला हे सांगितलेले आहे पण त्याचबरोबर “शब्द” हाताशी धरल्याने, गायनात कुठे न्यूनत्व येते, याचेही निर्देशन केले आहे. इथे परत एक बाब निर्देशनास आणायला हवी,अभिजात संगीतात शब्द हा घटक नेहमीच परका!! त्यामुळेच बहुदा,”तराणा” गायन म्हणजे अर्थशून्य शब्दांची उतरंड!! अब्दुल करीम खान यांच्या गायकीनंतर स्वरांचे “सच्चे” दर्शन जर कुठे मिळाले असेल तर ते, उस्ताद अमीर खानसाहेब आणि उस्ताद बडे गुलाम अली खानसाहेब!! लेखकाचे हे म्हणणे कुणाही सुज्ञास सहज पटणारे आहे. यानुसार लेखकाने या दोन गायकांची खास वैशिष्ट्ये विस्ताराने मांडली आहेत. लेखकाने पुढे जाऊन लिहिले आहे की उस्ताद अमीर खानसाहेबांची संथ लयीची गायकी किती अवघड आहे….
पुढील प्रकरणात, घराण्यांच्या मर्यादा यावर लिहिलेले आहे.एक तर गोष्ट समजण्यासारखी आहे, गायनाचे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात आले तरी, हल्लीच्या काळात, रेडियो,टेप्स, टीव्हीच्या प्रादुर्भावाने सगळे संगीत सहजासहजी उपलब्ध व्हायला लागल्याने, पूर्वीप्रमाणे “गायन ऐकणे” अप्राप्य राहिले नाही. दुसरे असे की कुठल्याही घराण्याचा विचार एक असला तरी त्यापलीकडे संगीत हे नेहमीच पोहोचलेले असते. आता संगीताचे शास्त्र इतके विकसित झाले आहे की पूर्वीच्या सगयांच्या ळ्या मर्यादेच्या भिंती कोसळायला लागल्या आहेत. एकमेकांच्या गायनात आदान-प्रदान व्हायला लागले. त्यामुळे, एकच एक विचारसरणी ठाम राहणे, शक्यच नाही. त्यातूनच, जसे भीमसेन जोशी जरी किराणा घराण्याचे तरी, त्यांच्या गायकीत “इंदोर”थाट दिसतो तर कधी “जयपुर” छाप!! यातून, गायकीला वेगळे परिमाण मिळत गेले. रागविस्ताराचा परीघ वाढत गेला आणि तो तसा वाढतच जाणार!! अर्थात, या सरमिसळ गायकीतून, मूळ गायकी कितपत तरुण राहील? हा प्रश्न उद्भवतो. तसेच त्याचबरोबर मूळ घराणी राहणे जरुरीचे आहे का? हा प्रश्न देखील समोर येतो. ख्याल गायकीच्या आधी आपल्या संगीतात धृपद गायकी होती, त्यातील आता किती कलाकार अस्तित्वात आहेत? हा जसा प्रश्न आहे त्याच धर्तीवर पूर्वीची घराणी  ”शुद्ध” स्वरुपात राहतील, हादेखील प्रश्नच आहे. “आग्रा” घराणे असेच लयाला जात आहे. अर्थात यातून नवीन घराण्यांचा संभाव आढळू शकतो.
पुढील भागात काही परिशिष्टे आहेत, उदाहरणार्थ “शब्द आणि संगीत”. रागदारी संगीतात शब्द नेहमीच खुंटीवर टांगल्यासारखे असतात. त्यामुळे, चिजेचे शब्द याला प्रमाणाच्या बाहेर महत्व नसते.त्यामुळे, शब्दातील आशय, हा विषय रद्दबातल ठरतो. जिथे शब्द आणि आशय डोकावतात, तिथे सुरांना जागा कमी मिळते.याचे मुख्य कारण, ही दोन्ही माध्यमे संपूर्ण वेगळी आहेत. सूर सामान्यत: कैवल्यात्मक रूप धारण करतात तर शब्द हे नेहमी बाहेरून अर्थ लादतात!! ठुमरी, गजल,भावगीत,लावणी इथे शब्दांना किंमत आहे पण सूर हे त्या शब्दांचे “दास्य” पत्करतात. दुसऱ्या शब्दात, शब्दात निश्चितता तर स्वरांत स्थुलार्थ, किंवा, शब्दात नेमकेपणा तर सुरांत सुचकत्व अधिक. त्यामुळे, दोघांची सांगड रागदारी संगीतात जमणे अवघड!! अर्थात, हा विषय इतक्या मोठ्या व्याप्तीचा आहे की इथे संपूर्ण विवरणासहित मांडणे शक्य नाही.तरीही, हल्ली, पंडित जसराज किंवा किशोरी आमोणकर यांच्या गायनात शब्दाचे भान थोड्या प्रमाणात जाणवते.अर्थात, हा संगीतातील नवीन विचार!!
शेवटचे प्रकरण – “हार्मनी आणि मेलडी”. वास्तविक, दोन्ही गोष्टी या संगीताच्या विरुद्ध बाजू आहेत.एका नाण्याच्या दोन बाजू, असे म्हणता येईल. त्यातून गमतीचा भाग असा आहे की मेलडी या विषयावर पाश्चात्य लोकांनी अतिशय सखोल अभ्यास केला आहे आणि त्या उलट, आपण अजूनही हार्मनी बाबत अनभिज्ञ आहोत!! यात असे आणखी म्हटले गेले आहे, हार्मनीचा आपल्या संगीतात वापर विघातक आहे आणि हे बहुतेक सर्व पाश्चात्य अभ्यासकारांनी मान्य केलेले आहे. आता मेलडीच्या संदर्भात, एकच स्वर वापरला जातो, पण त्यावर वेगवेगळे “संस्कार” केलेले असतात, म्हणजेच त्या स्वराला वर-खाली असे अश्रूत “कण” लागलेले असतात, त्यामुळे त्या स्वराला गोडी येते. दुसरे म्हणजे, “मींड” भूप रागाची “रे-सा” अशी संगती घेतली तर, “रे” केंव्हा संपला नि “सा” कधी सुरु झाला,हे जाणवत नाही, इतका या दोन स्वरांतला सांधा जुळलेला असतो. तान हे आपल्या संगीताचे भूषण आहे,तिच्यातील स्वरांची वळणे हार्मनीत   नाहीत.हार्मनीमध्ये प्रत्येक स्वर “सुटा” घेतला जातो.आपल्याकडे जसा दोन स्वरांत “नातेसंबंध” असतो, तसा हार्मनीमध्ये दुरान्वये देखील नसतो. असते ती फक्त निसर्गदत्त जवळीक!! अर्थात यावरून कुणीही हार्मनीला नाकारू नये.स्वरांचा सूक्ष्मपणा नसला तरी एकाच वेळी अनेक स्वर घेतल्याने त्यात जो भरदारपणा येतो, तो फार विलक्षण असतो. पाश्चात्य संगीतात, चर्च वगळता गायन पद्धती जवळपास अजिबात नसल्याने, एकाच वेळी अनेक वाद्ये वापरून, एकाच वेळी एकापेक्षा अनेक स्वर वाजविण्याची पद्धत अनुसरली गेली. अर्थात हा विषय मी इथे जागेअभावी थोडक्यात मांडला आहे. ग्रंथात मात्र, अतिशय रसाळपणे मांडलेला आहे.
ज्या कुणाला भारतीय संगीताची ओळख, अभ्यास करायचा असेल तर जे काही उपलब्ध ग्रंथ आहेत, त्यात हा ग्रंथ खरच अप्रतिम आहे.

No comments:

Post a Comment