Sunday 30 January 2022

महामृत्युंजय जप!!

काल परवाचीच बातमी. बहुदा *वाराणसी - काशी* स्थळ असावे, नक्की आठवत नाही परंतु आवाहन असे होते, *लताबाई अत्यवस्थ आहेत म्हणून "महामृत्युंजय" जप करावा जेणेकरून बाईंना पुन्हा नव्याने आयुष्य लाभेल!!* हे वाचल्यावर हसावे की रडावे, हेच कळेना. बाईंचे वय आता ९२ आहे. निसर्गक्रमाने शरीर आता थकायला आले आहे तेंव्हा आजची जी अवस्था आहे, ती आज नाही तर उद्या येणारच आहे. त्यात जगावेगळे काहीही नाही. तिटकाड्या पुजाऱ्यांनी आवाहन न करता, स्वतःपुरते केले तर समजण्यासारखे आहे. वैय्यक्तिक भावना आहे आणि त्याची कदर करणे योग्य. परंतु वैय्यक्तिक विश्वासाचे जाहीर स्वरूप कशासाठी? जर का या मंत्रांनी मृत्यू टळत असेल तर मग MBBS, MD, FRCS या पदव्या म्हणजे कागदाचे कपटे झाले!! माणसाला *अमरत्व* कधीच प्राप्त होणार नाही आणि हे वैश्विक शास्त्र आहे तरीही आपल्याकडे असे प्रकार चालतात. इतके होते तर मग गेल्या काही वर्षात, *किशोरी आमोणकर*, *रविशंकर* ,*बिस्मिल्ला खान* किंवा आपले *भीमसेन* आणि *जसराज* निजधामाला गेले तेंव्हा का नाही असा जप केला? असे तर नव्हे, हे कलाकार लताबाईंपेक्षा खालच्या पातळीवरील होते!! बरे असे हि नव्हे, हे कलाकार अचानक गेले. ते मृत्युशय्येवर आहेत, याची जाणीव सगळ्या जगाला होती. लताबाईंची लोकप्रियता अफाट आहे, याबद्दल दुमत नाही आणि त्यांच्या आवाजाचे गारुड सर्वसामान्य लोकांवर आहे. हे देखील मान्य. मग, बिस्मिल्ला खान याची सनई देखील घराघरात पोहचली होती. खांसाहेब कुठला राग वाजवत आहेत? याचे उत्तर शोधायच्या भानगडीत फारसे कुणीही पडत नसायचे आणि त्यांच्या सुरांचे आकंठ रसपान होत असे. किशोरी आमोणकर आणि जसराज वगळता, बाकीचे तिघे भारतातील सर्वोच्च मानाचे - *भारतरत्न* पुरस्काराचे मानकरी होते. जरा डोळसपणे विचार केला तर आपणच आपल्याला किती खुळचट करून टाकले आहे, याचा हा पुरावा आहे. काही वर्षांपूर्वी मी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यावेळी महालक्ष्मी मंदिराने, त्याच्या प्रांगणात डायलिसिस मशिन्स ठेवली आहेत आणि भक्तांना त्याचा वापर करता यावा म्हणून subsidised दर ठेवले आहेत. अत्यंत रास्त आणि स्तुत्य उपक्रम. प्रश्नच नाही. परंतु जर का उलट्या बाजूने विचार केल्यास, असे करताना, आपण खुद्द गणपती, या देवावर अविश्वास दाखवत नाही का? हे देऊळ अत्यंत जागृत आणि नेहमी भक्तांच्या इच्छा पूर्ण करते, अशी जाहिरात केली जाते. मग या जाहिरातीचे काय महत्व? अर्थात मला फेसबुकवर प्रचंड शिव्या मिळाल्या, ज्या मी धरूनच चाललो होतो!! परंतु कुणालाही माझा मुद्दा संपूर्णपणे खोदून काढता आला नाही, हे देखील तितकेच सत्य होय. जपजाप्य करावे, ज्यांचा विश्वास आहे, त्यांनी करावे पण मग त्याची जाहिरात करू नये. जाहिरात केली की मग त्याची समीक्षा ही केलीच जाणार त्या सामोरे जायला लागणार. त्याला या भक्तांची तयारी नसते. *तुम्ही तुमच्या घरात काहीही करा, तुमचे घर आणि तिथे तुमचे स्वामित्व आहे* पण *आज मी घरात सत्यनारायणाची पूजा केली आणि प्रसादासाठी बरीच माणसे आली होती* असे जाहीर तरी करू नका. पण आपल्याकडे याचे भान राखले जात नाही. मग जरा जरी टीका झाली की लगेच टीका करणाऱ्याला *वाळीत* टाकले जाते किंवा त्याला शिव्याशाप झेलावे लागतात. माझे मुद्दे याच संदर्भात असतात. मी *नास्तिक* आहे पण मी त्याची जाहिरात करत हिंडत नाही. ज्यांना माझे नास्तिकत्व माहीत आहे, ते मला कधीच पूजा कर, जप म्हण, असले उपदेश करत नाहीत. उलट्या बाजूने, दुसऱ्याच्या घरात कुणी करत असेल तर मी देखील वावदूकपणे तोंड उघडणे,चूकच आहे आणि मी ते देखील अजिबात करत नाही. माझे काही जवळचे मित्र *स्वामी मठात* जातात, एकेकाळी मी देखील जात होतो पण पुढे माझा भ्रमनिरास झाला आणि माझी मते नास्तिकत्वाकडे झुकली. मी त्याची कारणे देखील कुणाला सांगत नाही कारण मला त्याची गरजच वाटत नाही. असो, या विषयावर लिहू तितके थोडे आहे. भारतात *भक्तीचा सोहळा* करणे, ही सामाजिक गरज आहे आणि ती शेकडो वर्षे चालू आहे. खरंतर जितके आपण शास्त्राच्या जवळ जात आहोत, तितके आपण अधिक *आस्तिक* बनत चाललो आहोत, हा खरा विरोधाभास आहे.

No comments:

Post a Comment