Monday 17 January 2022

एक गमतीशीर विचार

जरी विचार गंमत म्हणून लिहीत असलो तरी काही प्रमाणात गंभीरपणे विचार नक्कीच केला आहे. एकूणच सगळीकडे एक प्रघात असतो - आजची पिढी आमच्यापेक्षा वेगळी आहे आणि वस्तुस्थिती तशीच आहे. परंतु १९९२ नंतर आपल्याकडे जे मन्वंतर झाले आणि समाजात झपाट्याने बदल होत गेले, त्याचा वेग केवळ स्तिमित करणारा होता. अशा प्रकारे बदल, आपल्या पूर्वीच्या पिढीने अनुभवाला नव्हता, अगदी दुसरे महायुद्ध जमेस धरून. दुसऱ्या महायुद्धाने सगळ्याच मूल्यव्यवस्थांना हादरा दिला तरी ती पिढी बरीचशी भावनाप्रधान, स्वप्नावस्थेतील होती, ज्याचे संस्कार आपल्या पिढीवर झाले. परंतु आधुनिकीकरणाच्या रेट्यात, तोच मध्यम वर्ग आमूलाग्र बदलला!! हाच मुद्दा पुढे आणायचा झाल्यास, हल्ली असे सर्रास बोलले जाते, आजच्या पिढीला *मराठी* भाषेबद्दल फारशी आस्था नाही, त्यांचे मराठी वाचन जवळपास थांबले आहे, इत्यादी. आता आपण, आपल्याबद्दल विचार करू. आपण जेंव्हा तरुण होतो तेंव्हाचे वातावरण आणि मराठी लेखन आणि संस्कृती, या सगळ्याशी आपले मानसिक नाते जोडलेले होते. घरोघरी आपले आई/वडील खास मराठी सण साजरे करीत होते आणि आपल्या पिढीने, जमेल तसे टिकवून ठेवले. घरात मराठी वाचन, हा *वाचन धर्म* होता. आता उदाहरण घेतो. पु.लं. चे *बटाट्याची चाळ* आपल्या अवतीभवती होती. त्यामुळे त्यातील व्यक्तिरेखा आणि वातावरण, आपल्याला कधीही परके वाटले नाही. अगदी वैय्यक्तिक बोलायचे झाल्यास, याच लेखकाची पुस्तके वाचून, मी माझ्यावर थोडेफार संस्कार करवून घेतले. अर्थात पुढे आपले वय वाढले आणि अपाय अभिरुचीत बदल होत गेला. बदल हळूहळू होत होता पण घडत होता हे नक्की. पुढे माझे वाचन खूपच बदलत गेले तरीही पु.लं. बद्दल मनात कृतज्ञता कायम राहिली, हे देखील खरे. आज जेंव्हा मी या लेखकाची पुस्तके पुन्हा वाचायला घेतो तेंव्हा मला तितके आपलेसे वाटत नाही कारण आता आजूबाजूला *हरितात्या* किंवा *बबडू* सारख्या व्यक्तिरेखा आढळतच नाहीत. पूर्वस्मृती रम्य होत्याच परंतु आजचे माझे मन, त्या विनोदांना तितकी दाद द्यायला तयार नव्हते! आता या पार्श्वभूमीवर, आजच्या पिढीकडे वळायचे झाल्यास, माझ्या मुलाला या व्यक्तिरेखेत काय गम्य सापडणार? एकतर मराठी वाचन कमी झाले (याला आपली पिढीच जबाबदार आहे) त्यातून आजूबाजूला टिपिकल मराठमोळी संस्कृती प्रसादापुरती शिल्लक राहिलेली नाही. मग आजच्या पिढीतील मुले, या वाचनातून कसा काय आनंद घेणार? बरे, अशा गोष्टी समजावून सांगण्यात काहीही अर्थ नसतो कारण त्यांना उदाहरण म्हणून आपण काय दाखवणार? इथे मी पु.ल. देशपांडे हे एक उदाहरण म्हणून घेतले पण इतर मराठी लेखकांबद्दल देखील हेच म्हणावेसे वाटते. आजही जागतिकीकरणाचा रेटा प्रचंड असूनही आपले मराठी साहित्य मात्र *जातीव्यवस्था* किंवा *सामाजिक भान* (म्हणजे काय? हा मोठा प्रश्नच आहे!!) यांच्या पलीकडे जात नाही आणि बहुतेक लिखाण हे समाजाला सुधारायचे, असल्या बालिश उद्देशाने लिहिलेले आढळते. त्या पलीकडे फार मोठे जग विस्तारलेले आहे आणि ते विस्तारलेले जग, आजच्या पिढीला इंग्रजी साहित्यातून समजून घ्यायला मदत करते!! ही बाब आपली पिढी फारशी लक्षात घेत नाही. फार मागे वि.का.राजवाड्यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे "जेंव्हा पाश्चात्य संस्कृतीत देकार्त आणि बेकन सारखे विचारवंत होते तेंव्हा भारतात फक्त संतांचाच प्रभाव होता!!" आपल्याकडे "पतंजली, चार्वाक,चाणक्य,चरक किंवा सुश्रुत ही दैदिप्यमान परंपरा होती पण कुणीही ती परंपरा पुढे खंडित का झाली?" हा प्रश्न विचारत नाही. इथे इंग्रज फार नंतर, काही शतकांच्या अवधीने अवतरले, हे लक्षात ठेवायला हवे. दुसरे असे आपल्याला युरोप मधील औद्योगिक क्रांतीचे आकलनच पुरतेपणी झाले नाही. आपण सारखे, "आमच्या संतांनी आयुष्याचा अर्थ सांगितला आहे" या भ्रमात वावरत होतो आणि आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. फार मागे जयंत नारळीकरांनी म्हटले होते -" त्याकाळी राजगायक तसेच राजज्योतिषी पदरी बाळगण्यात स्पर्धा असायची पण कुणीही राजगणिती किंवा राजवैज्ञानिक पदरी ठेवत नव्हते"!! याचा सगळा परिणाम आपल्या साहित्य निर्मितीवर होणारच होता. तेंव्हा अशा *कूपमंडूक* डबक्यातून आजच्या पिढीला बाहेर येण्यासाठी पाश्चात्य साहित्य जवळ करावेसे वाटले तर त्यात काय चूक आहे? मी वरती म्हटल्याप्रमाणे प्रत्येक पिढीचा आपल्या पुढील पिढीबरोबर संघर्ष हा चालूच असतो परंतु वास्तवाचा प्रदीर्घ विचार केल्यास, आपली पुढची पिढी मराठी वाचत नाही आणि याला कारण फक्त आपण आहोत. हे मान्य करण्यावाचून तरणोपाय दिसत नाही.

No comments:

Post a Comment