Saturday 22 January 2022

संस्कार!!

आपण सगळेजण रोज काही ना काहीतरी वाचत असतो, मग ते रोज शिळे होणारे वर्तमानपत्र देखील असो. आपल्याला, निदान मध्यमवर्गीय मराठी समाजाला वाचनाची आवड ही अगदी शाळकरी वयापासून लागलेली असते. त्यावेळी अर्थातच आपल्या वाचनावर घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा प्रभाव असतो. पुढे आपण जसे वयाने वाढत जातो आणि अनुभवाने परिपक्व (आयुष्यात ज्याला *परिपक्व* म्हणता येईल अशी स्थिती प्राप्त होते का हा एक गहन प्रश्नच आहे.पण ते असो.) होत जातो आणि आपली आवड, आपल्या नकळत बदलत जाते. बदल घडत जाणे, हे प्रगतीचे विविक्षित लक्षण आहे. पूर्वी रोजचे वर्तमानपत्र, वाचनाचे साधन असायचे, पुढे कथा,कादंबऱ्या आणि अगदीच सूक्ष्म आवड झाली तर कविता वाचन सुरु होते. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असणे सुसंगत असते आणि तिथे टीका करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्हाला घरात काय प्रकारचे वातावरण अनुभवायला मिळते, त्यावरून बव्हंशी आपली आवड ठरत जाते. असे सहज विधान करता येईल, आपल्या सगळ्याची आवड ही *प्रेमकथा* किंवा *साहसकथा* अशा विषयांवर निर्माण होते आणि त्यात फारसे वावगे नाही. आता आपण सगळेच मराठी आणि सगळ्यांच्या घरातील मराठमोळे वातावरण म्हटल्यावर मराठी भाषेतील साहित्य वाचणे क्रमप्राप्तच होते. रोजच्या वर्तमानपत्र वाचनावरून आपण सहजपणे ज्याला *साहित्य* म्हणता येईल, अशा लेखनाकडे वळतो. बरेचवेळा आपली आवड इथेच थबकतो कारण ही वाचनाची दिशा जेंव्हा नक्की होते तेंव्हा आपल्या रोजच्या आयुष्याचा मार्गक्रम बदललेला असतो आणि आपल्या गरजा वेगळ्या झालेल्या असतात. *वाचन ही गरज होणे, गरजेचे असते!* पण असे सहसा, आपल्या तरुण वयात तरी होत नाही. कथा, कादंबऱ्या देखील फुरसत मिळाली तर वाचायच्या, असा प्राधान्यक्रम होतो. अर्थात हे देखील चुकीचे म्हणता येणार नाही. मजेचा भाग असा असतो, आपण जे वाचतो, त्यातील काही भाग आपल्या नकळत आपण मनात झिरपत असतो. आपल्याला तेंव्हा काहीच कल्पना नसते परंतु भविष्यात अकल्पितपणे ते आपल्याला आठवते आणि आपण सगळेच चकित होतो. असे अचानक आठवणे, हे कसे घडले याची तर्कसंगती लागत नाही आणि इथे *दैव* किंवा *नशीब* हे अवतरते! मुळात आपण खोलात शिरून विचार करायचे टाळतो कारण कशाला विचार करायचा? कशाला डोक्याला शीण द्यायला लावायचा? रोजच्या आयुष्याच्या कटकटी काय कमी आहेत म्हणून या विचारांची भुणभुण मागे लावून घ्यायची? असे अनेक विचार मनात आणून,आपण दुसऱ्या विचारांकडे (तरीही ते विचारच असतात!!) वळतो. यात मजेचा भाग असा असतो, आपल्यावर जे *संस्कार* झालेले असतात, त्याबाबत सजगपणे आपण विचारच करत नाही, त्याची आपल्याला गरजच वाटत नाही.लहानपणी पाठ केलेली स्तोत्रे, पुढे कधीही म्हणत नाही परंतु वेळ आली की तीच स्तोत्रे आपल्या तोंडून येतात आणि आपण त्याला *चमत्कार* असे अत्यंत भोंगळ नाव देऊन, सुटका करून घेतो. खरे तर ही आपली, आपल्यापासून दूर जाण्याची एक पळवाट असते परंतु चंगळवादाच्या आत्यंतिक आहारी गेल्यामुळे असल्या विचारांना तिथे स्थान नसते. किंबहुना एक बावळटपणा, म्हणून आपण संभावना करतो. तसे करणे आपल्याला रोजच्या आयुष्यासाठी सोयीस्कर असते. इथेच मघाशी मी *झिरपणे* हा शब्द वापरला, त्याचा अनुभव येतो, जो *संस्कार* म्हणून मानला जातो. कविता ही अशीच आपल्या मनात झिरपत असते, त्यासाठी खास प्रयास करण्याची अजिबात गरज नसते. गरज असते ती, ती आवड मनापासून करण्याची. मला काही तरी वाचले पाहिजे, मी काहीतरी संगीत ऐकले पाहिजे, याची मनाला आच लागायला हवी. ऑफिसमधील एखादी अडचण समोर आली की आपण सहजपणे धुडकावून टाकतो का? नाही टाकत कारण तिथे आयुष्य कारणी लागलेले असते, आर्थिक प्रश्न असतात. त्याक्षणाची ती गरज असते परंतु त्याचबरोबर आपण हे देखील ध्यानात घेत नाही, ऑफिसमधील कटकटी आपण शक्यतो घरी आणत नाही कारण *गरज सरो, वैद्य मारो* ही उक्ती आचरणात आणतो. संस्काराचे असे होत नाही. संस्कार आपल्या मनाच्या तळाशी जाऊन बसतात. म्हणूनच घरातील कुणी निर्वतले की बाकीच्यांनी सांगायच्या आधी आपल्या डोळ्यात *दहिवर* साठते. ती प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया असते जी आपल्या मनाच्या तळाशी कुठेतरी लपलेली असते आणि अशा प्रसंगी उन्मळून बाहेर येते. आठवणींचे असेच असते. मनाच्या कप्प्यात कुठेतरी त्याचे अस्तित्व असते पण आपल्याला त्याची साधी जाणीव देखील नसते. *संस्काराने व्यक्ती जखडलेली असते, ती अशी*

No comments:

Post a Comment