Friday 28 January 2022

कविता वाचन : सहज की दुर्बोध?

मला कविता लिहायला जमत नाही आणि हे निर्विवाद सत्य, मला फार पूर्वीच आकळले होते. त्यामुळे कविता, या प्रकारापासून मी कायम लांब राहिलो परंतु इतरांच्या कवितेच्या जवळ जाण्याचा नेहमीच प्रयत्न केला. एकदा का मनाची घडी घट्ट बसली की मग ती काही ढिम्म सुटत नाही आणि हेच माझ्या कवितांच्या लेखनाबद्दल घडले. काही वेळा लोकं कळवतात, माझे काही लेख कविता सदृश असतात. पण यातील *सदृश* शब्द महत्वाचा कारण कविता म्हणजे कविता!! तिथे दुसरा कुठलाच लेखन प्रकार जवळ करण्यासारखा नसतो. आणि माझे काही लेख कविता सदृश असता, यात त्यांचा माझ्याबद्द्लचा ममत्वाचा भाग अधिक असतो आणि समीक्षा कमी असते. अर्थात मी कधी प्रयत्न देखील केला नाही हे देखील तितकेच सत्य परंतु सुदैवाने मला इतक्या मोठ्या कवींच्या/कवीयत्रींच्या विविध प्रकारच्या कविता वाचायला मिळाल्या आणि त्या वाचनाने, मनाशी बसलेली गाठ अधिक घट्ट होत गेली. कविता करणे इतके अवघड असते का? तसे नसावे कारण पूर्वीपासून आपली मराठी भाषा इतकी सुदैवी आहे की असंख्य कवींनी हे माध्यम अनेकाविध प्रकारे हाताळलेले आहे आणि आपल्या जाणीवा विलक्षण समृद्ध केल्या आहेत. माझा संस्कृत भाषेचं अजिबात अभ्यास नाही त्यामुळे उगीच *कालिदास*,*भवभूती* किंवा *बाण* अशी जडजंबाल नावे घेऊन, त्यांची उदाहरणे प्रस्तुत करणार नाही परंतु फार पूर्वीपासून मराठीत *कविता* सारखे अत्यंत लवचिक तरीही अत्यंत अर्थवाही माध्यम फार तलमरीतीने हाताळलेले आढळते. मुळातली *अल्पाक्षरी* रचना, अनेक अंगाने फुलवलेली वाचायला मिळते आणि आपण चकित होऊन जातो. दुसरे असे, माझी शैली अशा अल्पाक्षरी शैलीला साजेशी नाही. माझ्या लेखनात बरेचवेळा *पसरटपणा* डोकावतो परंतु *गद्य* लेखनात हा दोष लपला जातो. कविता लेखनात, अचूक नेमकेपणा, शब्दांवर हुकुमत तसेच शब्दांशी खेळायचे कौशल्य आवश्यक असते. *रचना*,*घाट* आणि *आशय* वगैरे अलंकार नंतर अवतरतात. बरेचवेळा कविता करताना *कारागिरी* केलेली आढळते पण सततच्या वाचनाने ती कारागिरी ध्यानात येऊ शकते. मुळात *सकस अभिव्यक्ती* महत्वाची. एकदा तिची मांडणी झाली की मग कारागिरी समोर येते. कुणीही कितीही प्रतिभावान कवी उदाहरण म्हणून घेतला तरी त्याच्या रचनेत कुठेना कुठेतरी कारागिरीची अंतर्भाव नक्की असतो. फक्त त्याचे प्रमाण किती आणि ते प्रमाण आशयाच्या संदर्भात किती खुबीने लपविले आहे, हा भाग महत्वाचा ठरतो. जसे कुठल्याही गाण्याच्या बाबतीत *मुखडा बांधणी* हे सर्जनशीलतेचे महत्वाचे लक्षण मानले जाते तसेच कवितेच्या बाबतीत, छंदोबद्ध रचना असेल तर *ध्रुवपद* अन्यथा मुक्तछंदातील कवितेच्या सुरवातीच्या ओळी या वाचकाचे मन धरून ठेवणाऱ्या असाव्याच लागतात. पुढे मग त्या कवीचे अनुभवविश्व कामाला येते. हा अनुभव किती *सुदृढ* आणि *सक्षम* आहे, यावरच कवितेचे बरेचसे यश अवलंबून असते. ध्रुवपदाचे विस्तारीकरण करणे, हे कडव्यांचे कार्य असते (गझल वृत्त या नियमाला अपवाद ठरू शकते). फक्त त्यात *उपमा*,*उत्प्रेक्षा, कल्पनांचा वेगळेपणा येऊ शकतो. एखाद्या कवितेचा संकलित असा परिणाम होणे ही गोष्ट खरे म्हणजे अत्यंत महत्वाची असते. हा संकलित परिणाम कवितेतल्या अनेक घटकांच्या कलात्मक संघटनेने होत असतो. अर्थात यात एक बाब महत्वाची असते. ध्रुवपदाच्या अनुरोधाने इतर कडवी फरफटत नेल्यामुळे अनुभव सांगण्याची भूमिका कवी घेऊ लागतो (नवोदित कवींच्या बाबतीत हा धोका कायम संभवतो) त्यामुळे *अनुभूतू* आणि *प्रतिमासृष्टी* यांचे एकात्मस्वरूप राहत नाही आणि सगळीच रचना विस्कळीत होते. अल्पाक्षरी माध्यमात तर हे फारच अघटित म्हणावे लागेल. एका अनुभवाचे अनेक अनुभवांशी असलेले भावनात्मक संबंध जाणवू शकतात. एंद्रिय संवेदनांच्या बाबतीत देखील असाच प्रकार जाणवू शकतो. आणि इथे *मुक्तछंद* रचना उद्भवू शकते. छंदांच्या काचेतून मुक्तता, असे जरी बाह्य स्वरूप असले तरी देखील त्यात *शाब्दिक लय* ही कायम अंतर्भूत असते, असावी लागते अन्यथा गद्य लेखन आणि पद्य लेखन याची नेमकी सीमारेषा आखणे अशक्य!! कवितेला प्राप्त होणार *आकार* अनुभवाच्या स्वरूपावर, प्रकृतीवर अवलंबून असतो आणि इथेच वाचक त्या अनुभवाशी किती तादात्म्य होऊ शकतो, त्यावर त्या कवितेचा *दुर्बोध* असणे अवलंबून असते. आपण कविता वाचतो म्हणजे प्राथमिक पातळीवर शब्दांचा अर्थ जोडत जातो आणि त्या तर्कानुसारी अर्थातून आशय समजावून घेत असतो. याचाच वेगळा अर्थ, शब्द आणि शब्दांची जोडणी, आपण आकलनात घेत असतो. इथे जर का शब्दाच्या associations बद्दल मनात संदेह निर्माण झाला की आपण सामान्य वाचक बावचळून जातो. आपल्या मनात बहुतांशी शब्दांचे साचेबद्ध अर्थ आणि त्या अर्थांची साखळी तयार असते आणि काहीवेळा त्या साखळीला धक्का बसतो, क्वचित प्रसंगी भांबावतो देखील आणि मग ती कविता बाजूला टाकून देतो. आपल्या मेंदूला *ताण* देण्याची आपली सवयच मोडलेली असते. कवी, आपल्या कवितेतून नेमके काय सांगायचं प्रयत्न करीत आहे? या प्रश्नाचा अदमास न घेता, आपण आस्वाद घ्यायला सुरवात करत्तो आणि आपल्या मनाला ठेचा लागतात. मनाला ठेच लागली की लगेच मन संभ्रमित होते. अशा परिस्थतीत आपण काय आणि कसला आस्वाद घेणार? एकतर कविता ही काही ओळीचाच आविष्कार असतो पण आपला धीर तितका निघत नाही!! *दुर्बोध कविता* वाटण्याची ही पहिली पायरी होय. पुढे मग सगळेच धुकाळ वातावरणात आपला मार्ग आक्रमण्याचे प्राक्तन नशिबात येते आणि आपण अधिकाधिक गोंधळत जातो. कविता अल्पाक्षरी म्हटल्यावर तिथे प्रत्येक शब्दच नव्हे तर त्यातील विरामचिन्हे, प्रसंगी एकाक्षर देखील तितकेच महत्वाचे असते. आपण *एकाग्र* होत नाही आणि सहजपणे कवीला दोष देऊन, आपली सुटका करून घेतो. आपण जेंव्हा रागदारी संगीताची मैफिल ऐकायला जातो तेंव्हा आपण आपल्या मनाची स्थिती तशी करून ठेवतो कारण रागदारी संगीत हे अत्यंत विस्तारपूर्वक मांडलेले सांगीतिक विचार असतात आणि तिथे आपण प्रत्येक सुराचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु कविताबाबत आपल्याला तसा धीर धरवत नाही कारण विं.दा.करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे *कविता भोगणे* या प्रक्रियेलाच आपण नाकारतो. कुठली कला ही *भोगवती* असते आणि तशी केली तरच त्या कलेचा खरा आनंद आपल्याला मिळू शकतो. प्रश्न आहे, आपल्या मनाचा पीळ किती मजबूत आहे?

No comments:

Post a Comment