Friday 28 January 2022

मैत्री!!

मनुष्यप्राणी ही नेहमी *कळप* करून राहणारी जमात आहे. काहीजण नेहमी बोलतात - मला एकांतवास प्रिय आहे आणि कळप करून राहणे माझ्या प्रकृतीत बसत नाही. इथे कळप म्हणजे लोंढा नव्हे तर नातेसंबंध देखील अनुस्यूत आहेत. मुळात नातेसंबंध ही मनुष्याची भावनिक गरज असते आणि म्हटले तर ती लादलेली गरज नसून मानसिक गरज असते मग पुढे या नातेसंबंधामध्ये अनेक दिशा निर्माण झाल्या, अनेक कंगोरे तयार झाले आणि एकूणच गुंतागुंत अधिक वाढत गेली. मुळात बघायला गेल्यास, २ व्यक्ती एकत्र भेटतात, त्यांच्या विचारांची देवाण घेवाण होते आणि नातेसंबंध तयार होतात. इथे नातेसंबंध २ टोकाचे असू शकतात - एकतर स्नेहबंध अन्यथा टोकाचे शत्रुत्व!! परंतु असे घडणे ही माणसाची भावनिक गरज असते. इथे २ व्यक्ती म्हणजे २ दोन पुरुष, २ स्त्रिया, स्त्री/पुरुष इत्यादी. यामध्ये नव्याने तयार झालेले *गे* किंवा *लेस्बियन* संबंध देखील गृहीत धरलेले आहेत. अर्थात या शब्दांनी बावचळून जायचे कारण नाही कार या संबंधाने आता कायद्याचे संरक्षण मिळाले आहे आणि मुळात ही देखील मानसिक आणि शारीरिक गरज आहे, हे महत्वाचे. या दृष्टीने मला इंग्रजी भाषा भाग्यवान वाटते. या भाषेत *Friend* हा एकच शब्द रूढ आहे मग त्यात कुठलेही संबंध असू देत. खरंतर *मैत्री* हे नाते किती सुंदर असू शकते आणि ट्याटू अनेक जीवाभावाच्या गोष्टी घडत असतात पण तरीही या नात्याला काही मर्यादा या असतातच असे माझ्यासारख्याला नेहमी वाटते. म्हणजे एका बाजूने मैत्री हवी पण दुसऱ्या बाजूने माझ्या एकांतावर त्या नात्याचे आक्रमण होणार नाही, याची तजवीज करायची असते. असे हे दुहेरी पदराचे नाते असते. मुळात आपली संस्कृती आजही *सोवळी* आहे. एखाद्या मुलीशी मैत्री आहे, हे आजही चोरटेपणाने वागवले जाते!! तरीही आपण खाजगीत, अमुक एक मुलगी माझी मैत्रीण आहे, अशी क्वचित बढाई मारण्याचा वावदूक प्रयत्न करतो. स्त्री/पुरुष यांत *सेक्स* हाच सर्वात मोठा अडसर असतो आणि त्यामुळे गप्पा मारायला बरीच बंधने पडतात. आपल्या संस्कृतीत *सेक्स* हा शब्द अति जपून वापरला जातो, जरी ती आपली *शारीरिक गरज* असली तरी. अर्थात पाश्चात्य लोकांमध्ये त्याबाबतीत फार *मोकळेपणा* (काही वेळा अति मोकळी वृत्ती देखील!!) असतो. अर्थात, त्याचे संपूर्ण समर्थन करणे अशक्य परंतु त्यांच्यात चोरटेपणा कमी असल्याने, गप्पांच्या विषयाला तोटा आणि बंधने नसतात. आपल्याकडे अजूनही आपल्या जवळच्या मैत्रिणीला *तू आज खूप सुंदर दिसतेस* हे म्हणायला, आपली जीभ धजावत नाही, कानकोंडेपणा जाणवतो. इतकी बंधने स्वीकारल्यावर मग विषयांचा तुटवडा जाणवणे क्रमप्राप्तच ठरते. पाश्चात्य मुलीची आई - *माझी मुलगी संतती नियमनाच्या गोळ्या खाते* हे बिनदिक्कतपणे कबूल करतात. पुन्हा एकदा, हे त्यांच्या संस्कृतीचे समर्थन नव्हे!! त्यांची समाजघडी अशा प्रकारची आहे, इतकेच. मी साऊथ आफ्रिकेत असताना, *Wendy Farrell* नावाची मुलगी (आता अर्थात वयाने प्रौढा झाली आहे) माझी मैत्रीण झाली होती (*होती* म्हणजे अजूनही आम्ही संपर्कात आहोत पण प्रत्यक्ष भेट दुरापास्त!!) आणि तिच्याकडून मला - स्त्री/पुरुष मैत्री कशी असावी, याचे *धडे* मिळाले आणि एकूणच *गोरा समाज* कसा असतो, याची अंतर्मुख करणारी माहिती देखील!! तिच्यावर मी एक दीर्घ लेख लिहिला असल्याने, त्याची पुनरावृत्ती इथे टाळतो. मुद्दा असा आहे, पाश्चात्य संस्कृतीचे कितीही *गोडवे* गायले तरी त्या समाजात डागाळलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि तिथे आपण दुर्लक्ष करतो. मैत्रीत एल तत्व अवश्य पाळायला हवे - जखमेवरील खपली काढून पुन्हा रक्त भळभळत ठेवण्याचे कृत्य करू नये कारण ती *कृती* ही पुढे *विकृती* मध्ये सामावली जाते आणि ती आपली *संस्कृती* नव्हे. मैत्री जिवलग असावी, प्रश्नच नाही परंतु तिच्या मर्यादा देखील मान्य करून, नाते राखावे!! एखादा प्रसंग दुसऱ्याला सांगणे, प्रसंगी त्याचा सल्ला घेणे, हे *सुसंस्कृत* वृत्तीचे *लक्षण* आहे, त्याचे *अवलक्षण* करून आपण त्या नात्याचा अपमान करतो. अगदी स्त्री/पुरुष मैत्री घेतली तरी त्याला *लक्ष्मणरेषा* ही असतेच, असावीच अन्यथा नात्याला विकृत वृत्तीचे स्वरूप येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो आणि एक सुंदर नाते छिन्नविच्छिन्न होते. आपले *वैय्यक्तिक* स्तरावरील प्रश्न विचारावे, हितगुज करावे, सल्ला घ्यावा. मला तर बरेचवेळा असेच वाटते, नवरा/बायको हे नाते कितीही *जवळचे* असले तरी मित्रांच्या सहवासात आपण अधिक रममाण होऊ शकतो.

No comments:

Post a Comment