Tuesday 25 January 2022

थंडी

गेले काही दिवस मुंबईवर थंडीचा गारठा पसरला आहे एकदम मुंबईकरांची भाषा बदलली!! मुळात मुंबईत काकडणारी थंडी हा नेहमीच औत्सुक्याचा विषय असतो.वास्तविक मुंबईत थंडी म्हणजे अंगावर चादर घ्यायला लागणे इतपतच!! अशा परिस्थितीत सध्या दुपारचे ११/१२ वाजले तरी पंखा लावावा, असे वाटू नये, हे नवलच म्हणायला हवे. परंतु ही थंडी तशी अनपेक्षित आली हे नक्की. तशा हवामान खात्याने पूर्वसूचना दिल्या होत्या परंतु भर दुपारी पंख लावायची गरज भासू नये, इतपत थंडी पसरेल असे फारसे कुणाला वाटले नव्हते. नेहमीप्रमाणे टीव्हीवर उत्तर भारतातील थंडीचा कहर, ठिकठिकाणी बर्फवृष्टी अशा बातम्या झळकायला लागल्या. पण त्यात फारसे नवल नव्हते कारण अशी चित्रे दर वर्षी बघायला मिळतात. मुंबईकरांना ती चित्रे बघूनच थंडी भरते!! परंतु या वर्षी जरा परिस्थिती बदलली. आदित्य पुण्याला असतो, त्याच्याकडून रोजच पुण्याच्या तपमानाच्या बातम्या वाचायला मिळत होत्या. अर्थात *पुणे तिथे काय उणे* या उक्तीप्रमाणे पुण्याची थंडी जगावेगळी (हे फक्त पुणेकरांचेच मत!!) मुंबईची थंडी म्हणजे तपमान २२/२३ च्या आसपास. पारा जरा आणखी खाली उताराला म्हणजे ठेवणीतले स्वेटर्स, शाली बाहेर पडतात आणि *काय ही हाडे गारठवणारी थंडी* अशी ठेवणीतली वाक्ये ऐकायला मिळतात. मला मात्र अशी थंडी उपभोगायला फार आवडते. एकतर अशी थंडी या शहरात फारशी पडत नाही आणि दुसरे म्हणजे जरा गारवा आला तर चांगलेच आहे. लगेच *अंग कुडकुडायला लागले* सारखी वाक्ये बोलायची म्हणजे अशा थंडीचा अपमान होय!! थंडीचा देखील *उपभोग* घेणे हा अप्रतिम आनंदाचा सोहळा असतो. मला आठवत आहे, जेंव्हा मी साऊथ आफ्रिकेत रहात होतो तेंव्हाचे दिवस. एकतर हा देश म्हणजे दक्षिण गोलार्धातील शेवटचे टोक. केप टाऊनला गेल्यावर याची प्रचिती येते. या देशाचे वातावरण शहरागणिक बदलते असते. १९९४ साली मी जून महिन्यात या देशात प्रथम आलो. इथे भारताच्या नेमके उलटे ऋतुमान असते. इथला हिंवाळा हा एप्रिल ते ऑगस्ट असा असतो आणि पावसाळा बाराही महिन्यात कधीही!! तरी देखील डिसेंबर/जानेवारी हे महिने खास करून पावसाचे. परिणामी इथली हवा फार कोरडी. मी प्रथम *पीटरमेरित्झबर्ग* या शहरात आलो. हे शहर म्हणजे काही टेकड्यांवर वसलेली गावे!! अर्थात डोंगराळ भाग म्हणजे जून मध्ये भरपूर थंडी. माझ्यासारखा भारतातून आलेल्या माणसाला तर *कडाका* चांगलाच जाणवणार आणि तसेच सुरवातीचे काही दिवस झाले परंतु मी बोक्यासारखा!!! कसेही पडलो तरी पायावर उभे राहणार!! या शहरात जून/जुलै मध्ये ५६ इतके तपमान उतरते. मुळात इथे तशी वस्ती विरळ आणि रस्त्यावर तर वर्दळ नावाची नामोनिशाणी नसते. अशा परिस्थितीत इथली थंडी मला बाधली नाही, हे नवल. पण इथे मी थंडी उपभोगायला शिकलो. अगदी दुपारी ३ वाजता मिट्ट काळोख पसरत असताना, तिथल्या जवळपास निर्मनुष्य रस्त्यावरून एकट्यानेच हिंडणे, हा अनिर्वचनीय अनुभव होता. डर्बन हे हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर वसलेले त्यामुळे तिथे थंडी इतकी जाणवत नाही. साधारणपणे १३/१४ पर्यंत तपमान उतरणे आणि ते देखील काही दिवस, इतकीच थंडी!! अर्थात समुद्रकिनारी वसलेले, हे कारण तितकेसे बरोबर नाही कारण केप टाऊन देखील अटलांटिक महासागराच्याच किनाऱ्यावर वसलेले महानगर परंतु तिथे जून/जुलै मध्ये ०/-२ इतके तपमान खाली उतरते!! दुसरे कारण संभवते, केप टाऊन शहराच्या पलीकडे जगाची भूमी संपते!! त्यामुळे थंड वाऱ्यांना फारसा अटकाव होत नाही. मला जर खऱ्या अर्थाने थंडी जाणवली ती, जेंव्हा मी Standerton या गावात नोकरीनिमित्ताने रहायला आलो. सावूठ आफ्रिकेतील अति थंड हवामानाचे गाव (शहर नव्हे) आणि एकूणच लोकवस्ती जास्तीतजास्त १५/१६ हजार इतपतच आणि बहुतेक सगळे गोऱ्या वर्णाचे. पुढे इथली भौगोलिक परिस्थिती समजली आणि हाडे गोठवणाऱ्या थंडीचे इंगित कळले/ मला आठवत आहे, इथे नोकरी करताना, मे महिन्यात मी सुटीवर यायचे ठरवले. तेंव्हा या गावाचे तपमान हे -२/-३ इतके उतरले आणि मी त्या थंडीत मुंबईत उतरलो आणि पश्चात्तापाने पोळून निघालो!!मुबई +३० तपमानात जळत होती!! _३ वरून काही तासात +३० या तपमानाला शरीर सरावणे निव्वळ अशक्य!! मला या दिवसात इथे यायची दुर्बुद्धी झाली होती. अर्थात पुन्हा जून महिन्यात तिथे परतल्यावर पुन्हा काही तासांनी मी -४/-५ तपमानात शिरलो!! हा बदल शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अतोनात थकवणारा ठरला आणि पुन्हा चुकूनही मे महिन्यात रजा घ्यायची नाही हे ठरवूनच टाकले. या गावात राहताना, *थंडीचा काकडा* म्हणजे काय याचा पूर्णांशाने अनुभव घेतला. प्रथमच असे वाटायचे, सकाळी *आंघोळ* करायलाच हवी का? अर्थात आपला भारतीय स्वभाव, मग आधी गरम पाण्याचा शॉवर सुरु करायचा आणि जरा वाफ पसरली की अंघोळ करायला आत शिरायचे, अशी मी माझ्यापुरती पद्धत ठरवली.खरी धमाल पुढे होती. बाहेर आलो तर नाकाचा शेंडा तुटतो कि काय असेच वाटायला लागले आणि बघाईतले गाडीच्या काचेवर Frost साचलेले!! अर्थात थंड पाणी घेऊनच ती काच साफ करणे अत्यावश्यक. थंड पाणी का? गरम पाणी वापरले तर काच तडकायची. या सगळ्या सूचना मला आधीच इतरांकडून मिळाल्या होत्या. गाडीत हीटर सुरु करायचा, थोडा वेळ गाडीचा अंतर्भाग गरम करायचा आणि मग गाडीत बसायचे!! प्रथम मला यातले काही माहित नव्हते तेंव्हा निव्वळ फजिती, हाच शब्द योग्य होता. पुढे गाडीच्या स्टियरिंगवर हात ठेवला आणि बोटांना भाजल्याचा चटका बसला!! बाहेरील हवेच्या थंडीने स्टियरिंग, फ्रिझर पेक्षा अधिक थंडगार झाले होते. त्यादिवशी मी ऑफिसमध्ये न जाता, प्रथम हातमोजे घेतले!! तेंव्हा सुदैवाने मला असे वेगवेगळे थंडीचे अतर्क्य अनुभव मिळत गेले आणि आयुष्य अधिक रंगतदार होत गेले आणि या पार्श्वभूमीवर आताची ही मुंबईची थंडी, मला अजूनही *काकडा* असे वाटतच नाही. अर्थात मी साऊथ आफ्रिका सोडून आता जवळपास ११ वर्षे होतील आणि आता माझे शरीर मुंबईच्या हवामानाला सरावले आहे. अर्थात या १६ वर्षांच्या आठवणी कायमच्या मनात स्थिरावल्या आहेत आणि अवचित कधीतरी बाहेर पडतात. मला आजही असेच वाटते, साऊथ आफ्रिकेत मला इतकी वर्षे काढता अली, नुसतीच काढली नाही तर नोकरींनिमित्ताने अनेक शहरात वास्तव्य करायची संधी मिळाली, हे माझ्या धडपड्या स्वभावाचे यश पण थोडा नशिबाचा भाग देखील आहे. सगळ्यांना अशा संधी प्राप्त होत नाहीत. इथे स्मिताने सध्या चादरीत गुरगटून घेतले आहे आणि ते स्वाभाविक आहे पण मी मात्र निव्वळ अंगावर चादर ओढून घेतो आणि शांतपणे या थंडीचा गोडवा उपभोगत असतो.

No comments:

Post a Comment