Saturday 29 August 2020

सुनील गावस्कर - भाग २

१९८३/८४ मधील रणजी करंडकासाठीचा दिल्ली आणि मुंबईमधील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम मध्ये होता. त्यावेळी दिल्ली आणि मुंबई संघ हे जवळपास तुल्यबळ होते, अर्थात मुंबई संघाची फलंदाजी अधिक खोल आणि भरवशाची होती. मी आणि माझ्या तेंव्हाच्या ऑफिसमधील काही सहकाऱ्यांनी ५ दिवसांची सलग सुटी घेतली होती. आजही तो सामना माझ्या डोळ्यासमोर आहे. सकाळी नाणेफेक झाली आणि दिल्लीचा कॅप्टन, मोहिंदर अमरनाथने क्षेत्ररक्षण स्वीकारले. लंचपर्यंतच्या खेळाने, दिल्लीच्या समोर काय वाढून ठेवले आहे याची कल्पना आली. खेळपट्टी संपूर्णपणे फलंदाजी धार्जिणी होती आणि मोहिंदरने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून पायावर धोंडा पडून घेतला होता. दिलीप त्या वर्षी सर्वोत्तम फॉर्मात होता आणि त्याने ज्याप्रकारे शतक झळकावले त्यावरून कल्पना आली. त्या खेळीत क्रिकेटमधील सगळ्या फटक्यांचे नयनरम्य प्रदर्शन मांडले होते. दुसऱ्या बाजूने सुनील शांतपणे दिलीपची खेळी बघत होता आणि दिलीप असेपर्यंत त्याने दुय्यम भूमिका स्वीकारली होती. जसा दिलीप बाद झाला तशी सुनीलने सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली. दिलीप असे पर्यंत एकेरी, दुहेरी धावांवर समाधान मानणारा सुनील, हळूहळू आपल्या भात्यातून शस्त्रे काढायला लागला. आधीच दिलीपने दिल्लीच्या गोलंदाजांना हलवून सोडले होते आणि आता सुनीलने त्याच्यावर जखमा करायला सुरवात केली. दिवसअखेर सुनील नाबाद राहिला होता. सुनीलने अक्षरश: दिल्लीच्या गोलंदाजांची पिसे लढली होती. खऱ्याअर्थी घाम गळायला लावला होता. गोलंदाजांना घाम गाळायला लावणे, त्यांच्या संयमाची परीक्षा बघणे, क्षेत्ररक्षकांना जराही संधी न देणे - ही सगळी सुनीलच्या फलंदाजीची खास वैशिष्ट्ये. सुनीलचा स्वतःवर अतुलनीय संयम होता. त्या जोरावर त्याने भल्याभल्या गोलंदाजांना, त्याच्यासमोर गुडघे टेकायला लावले होते आणि तरी सुनीलचे समाधान होत नसे. या सामन्यात त्याने द्विशतक काढले आणि तिथेच सामन्याचा निकाल स्पष्ट करून टाकला होता. सुनीलची एकाग्रता काय प्रतीची होती याचा पुरावा त्याने त्या दिवसाच्या शेवटच्या षटकाच्यावेळी दिला. दिवसभर सुनीलला बॉलिंग करून दिल्ली थकली होती आणि शेवटच्या ओव्हरमध्ये, गोलंदाजाने सुनीलच्या लेग स्टम्पवर, थोडा पुढे चेंडू टाकला ( तो हाफव्हॉली नव्हता) आणि सुनीलने (दिवसभर खेळून!!) तो चेंडू, सणसणीतपणे मिडविकेटमधून सीमापार धाडला!! एकाग्रता कशी असावी, याचा हा सुंदर धडा होता. दिवसभर त्याने गोलंदाजांना रगडून काढले. सुनिलबाबत एक खासियत होती. सुनिलबाबत एक शक्यता असायची (जी शक्यता सगळ्या फलंदाजांबाबत असते) जेंव्हा सुनीलची नजर स्थिरावत नसते किंवा डावाच्या सुरवातीलाच, जेंव्हा सुनील खेळपट्टीचा अंदाज घेत असायचा तेंव्हा गोलंदाजांना त्याला बाद करायची संधी असायची. एकदा का त्याने २०,२२ धावा केल्या की मात्र जेंव्हा सुनील संधी देईल तेंव्हाच तो बाद होणार. जगातील कुठलाही फलंदाज हा सुरवातीला थोडा चाचपडत असतो मग त्याचे तंत्र कितीही अचूक असू दे. अशीच एक इनिंग मला आठवत आहे. पूर्वी मुंबईत "कांगा लीग" स्पर्धा असायची. त्यावेळी मुंबई फलंदाज अतिशय "खडूस" म्हणून प्रसिद्ध असायचे आणि त्या खडूसपणात या कांगा लीग स्पर्धेचा फार मोठा वाटा असायचा. ही स्पर्धा नेहमी पावसाळ्यात खेळवली जायची. मी या स्पर्धेतील बहुतांशी सामने हे शिवाजी पार्क इथे बघितले आहेत आणि सगळे सामने हे फक्त रविवारी(च) खेळले जायचे. रविवारी पाऊस नसला की सामना सुरु!! खेळपट्टी ओलसर आहे, आजूबाजूला गुडघ्याएवढे गावात वाढले आहे, असल्या तक्रारींनी जरा देखील वाव नसायचा. आजच्या T20 स्पर्धेची ही "जननी" म्हणता येईल. केवळ दिवसभराचा प्रश्न असायचा. हवा बहुतेकवेळा कुंद (टिपिकल इंग्लिश वातावरण) असायची परंतु तशा हवेतच हे सामने खेळवले जायचे. एके रविवारी "दादर युनियन" आणि "शिवाजी पार्क" या सांध्यात सामना होता. दादर युनियनमधून सुनील, दिलीप होते तर शिवाजी पार्क मधून संदीप,शिवलकर असे दिग्गज खेळाडू होते. सामन्यात १५० धावा झाल्या हणजे संघाच्या विजयाची शक्यता भरपूर कारण एकत्र खेळपट्टी ओलसर त्यातून Outfield म्हणजे प्रचंड वाढलेले गवत. त्यामुळे तुम्ही कितीही जोरदार फटका मारा, चौकार मिळणे दुरापास्त. अगदीच उंचावरून फटका मारला तरच चौकार मिळण्याची शक्यता. खेळपट्टी ओलसर असल्याने क्लब गोलंदाज देखील रॉबर्ट्स, होल्डिंग वाटायचा!! त्या सामन्यात सुनीलने पन्नाशी गाठली आणि दिलीपने त्याला चाळीस धाव काढून मौल्यवान साथ दिली आणि गंमत म्हणजे इतके असूनही संघाची धावसंख्या फक्त १२९!! संपूर्ण डावात फक्त दिलीपचा एक चौकार सामील होता आणि तो देखील दिलीपने हवेत उंच फटकावला होता म्हणून!! परंतु त्या खेळीत पुन्हा सुनीलने आपल्या तंत्राचे अप्रतिम प्रदर्शन केले. वास्तविक त्यावेळी सुनील,दिलीप,संदीप सगळे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे झाले होते तरीही ते हे सामने खेळायला आले होते. सुनीलने पन्नाशी गाठताना, आपल्या संयमाचे दर्शन घडवले होते. अशा खेळपट्टीवर खेळताना, शक्यतो चेंडूला ड्राइव्ह करणे धोक्याचे असते आणि चेंडू दोन फिल्डर्सच्या मधून काढण्याच्या कौशल्याला महत्व असते आणि तेच सुनीलने शांतपणे दाखवून दिले. संपूर्ण खेळी त्याने बॅकफूटवर सजवली. इथे मनाची खरी कसोटी लागते. अशा वेळी तुम्ही जागतिक कीर्तीचे खेळाडू आहेत याला काही किंमत नसते. अशीच एक असामान्य खेळी मला आठवत आहे. १९८३ सालच्या वेस्ट इंडिज-भारत मालिकेतील शेवटचा सामना चेन्नई इथे होता. दिल्ली आणि अहमदाबाद इथे सुनीलने धुवांधार खेळी करून सगळ्यांना दिपून टाकले होते परंतु पुढील दोन सामन्यात सुनील अगदी लवकर बाद झाला आणि भारताचा पराभव झाला होता. परिणामी सुनीलवर, त्याच्या बदलत्या शैलीवरून टीका झाली. सुनील लवकर बाद झाला याला प्रमुख कारण अँडी रॉबर्ट्स होता. रॉबर्ट्स नुसताच वेगवान गोलंदाज नव्हता तर त्याच्याकडे फलंदाजाचे कच्चे दुवे शोधण्याचे असामान्य कसब होते. किंबहुना मी आता असे सहज म्हणू शकतो वेस्ट इंडिजची जी जगप्रसिद्ध वेगवान चौकडी झाली होती (रॉबर्ट्स,होल्डिंग,गार्नर,मार्शल आणि क्रॉफ्ट) त्यामागे फक्त रॉबर्ट्सचा खरा हात होता. त्याने या सगळ्यांना अक्षरश: घडवले होते. उगीच नाही सुनील आजही रॉबर्ट्सला श्रेष्ठ वेगवान गोलंदाज म्हणून मान्यता देतो. असो, शेवटच्या सामन्यापूर्वी सुनीलवर टीका झाली म्हणून सुनीलने आयुष्यात प्रथमच चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचे ठरवले परंतु दुर्दैवाने परिस्थिती अशी आली, पहिल्याच ओव्हरमध्ये मार्शलने भारताचे २ फलंदाज बाद केले आणि सुनीलला लगेच खेळायला येणे भाग पडले. ही खेळी म्हणजे सुनीलला जगात फलंदाज म्हणून का मान्यता मिळाली याचा अप्रतिम नमुना होता. अक्षरश: त्याने सगळ्या वेगवान गोलंदाजांना रगडून काढले इतके की सुनीलच्या १५० धावा झाल्या आणि तरीही त्याची भूक भागत नाही असे दिसल्यावर लॉइड आणि विव्ह पॅव्हेलियनमध्ये आराम करायला गेले!! या खेळीत सुनीलच्या खेळाचे सगळे सौंदर्य आढळले आणि मुख्य म्हणजे पूर्वीचा सुनील झगझगीतपणे समोर आला. रॉबर्ट्स, होल्डिंग, गार्नर आणि मार्शल, सगळे गोलंदाज थकले पण सुनीलची भूक मंदावली नव्हती. तब्बल २३६ धावा काढून सुनील परतला!! निव्वळ अजोड कौशल्याची प्रचिती देणारी खेळी होती. या खेळीच्या वेळेससुनीलला लोकांच्या टीकेला तर उत्तर द्यायचेच होते परंतु त्याशिवाय, अजूनही तोच पूर्वीचा सुनील कायम असल्याचे सिद्ध करायचे होते आणि ते देखील जगातील प्रलयंकारी वेगवान गोलंदाजांच्या समोर. त्या खेळीत अगदी ठरवून सुनीलने एकही चूक केली नाही. चूक केली आणि तो बाद झाला!! मनाचा निग्रह ही काय चीज असते याचे सगळ्या जगाला दर्शन घडवले.सुनील अशा प्रकारे ठरवून गोलंदाजांचा अंत बघत असे. गोलंदाज थकून जात पण सुनील तसाच खेळपट्टीवर नांगर टाकून उभा राहात असे. अशा दीर्घ केल्ली करायच्या म्हणजे तुमच्याकडे अचाट स्टॅमिना लागतो तसेच सर्वकाळ डोळ्यात तेल घालून खेळावयास लागते. एखादा चेंडू आपल्याला फसवून जातो परंतु त्यामुळे मनात नैराश्य न आणता, पुन्हा नव्याने डावाची उभारणी करायच्या कामाला जुंपून घ्यायचे!! ही बाब सहज जमणारी नव्हती आणि सुनीलने ती कमालीच्या सहजतेने वर्षानुवर्षे करून दाखवली. आजही लॉइड,विव्ह, इयान चॅपेल, रिची बेनॉ सारखे असामान्य खेळाडू सुनीलला कुर्निसात करतात तो केवळ चार लोकांसमोर दर्शविण्याचा देखावा नसतो तर त्यामागे सुनील बद्दलची कृतज्ञता असते. वास्तविक या माणसाकडे कपिल, संदीप सारखी कसलीच "देणगी" नव्हती पण त्याची भरपाई सुनीलने अथकपणे नेट प्रॅक्टिस करून भरून काढली. कितीही आंतर राष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली, बहुमान प्राप्त झाले तरी सुनीलने नेट प्रॅक्टिस कधीही टाळली नाही आणि तिथे त्याने आपल्यातील कमतरता शोधून, त्यावर उपाय शोधण्याचा अथक प्रयत्न केला. ही जी निष्ठा होती, त्या निष्ठेची ही खरी किंमत आहे. त्याला नेमके माहीत होते, आज आपल्याला जगात किंमत आहे ती आपल्या फलंदाजीमुळे. तिथे मेहनत घेण्यात त्याने कधीही कुचराई दाखवली नाही आणि आपली बॅट नेहमीच तालेवार ठेवली. जगात त्याला सर्वतोपरी मानायला मिळत असताना अचानक त्याला जाणवले, आता आपल्याला थकायला होत आहे आणि ही जाणीव झाली आणि त्याने निवृत्ती स्वीकारून जगाला आश्चर्याचा धक्का दिला. असे खेळाडूं इतिहासात फार क्वचित जन्माला येतात आणि आमच्या पिढीचे भाग्य असे की असा खेळाडू आम्हाला डोळे भरून बघता आला.

No comments:

Post a Comment