Sunday 16 August 2020

जिवलगा राहिले दूर घर माझे

मराठी भावसंगीतातील प्रांगणाचा एकूण विचार केल्यास, "जिवलगा" हे गाणे आजही अतिशय लोकप्रिय आणि नवनवीन गायिकांना आवाहन करणारे ठरले आहे असे निश्चित म्हणता येईल. इथे आपण फक्त "गायकी" या अंगाचाच विचार करणार आहोत. आता गायकी हाच विचार का घेतला? असा प्रश्न पुढे आला तर असे म्हणावे लागेल, ललित संगीताच्या आविष्कारात, रसिकांच्या कानावर सर्वात प्रथम येतात ते गाण्याचे सूर. सूर हे नेहमीच प्रभावी असतात. त्यानंतर मग गाण्याचा संगीतकार, पुढे जिज्ञासा वाढली तर गाण्याचा कवी इत्यादी प्रश्न उद्भवतात. अर्थात सूर हे माध्यमच असे आहे ज्याचे गारुड मनावर कायमचे पडते. आता या गाण्याची सुरावट जरा बारकाईने ऐकली तर आणि थोडे खणायला सुरवात केली तर हे गाणे सरळ,सरळ "श्री गौरी" रागातील "हूं जो गयी" या मारवाडी चीजेवर आधारीत आहे. तेंव्हा चालीचा आकृतिबंध हा रागदारी चीजेवर आधारित आहे. त्यामुळेच बहुदा असे असावे, गाण्यात फारसा वाद्यमेळ नाही - स्वरमंडळ आणि तंबोरा आणि अर्थातच तालवाद्य म्हणून तबला आहे. गाण्याच्या सुरवातीला आपल्याला तंबोऱ्याचे सूर ऐकायला मिळतात आणि त्याच्या मागे स्वरमंडळाचे सूर रुणझुणत असतात. क्षणभरच हे सूर ऐकायला मिळतात आणि एकदम "तार" स्वरांत "जिवलगा" अशी व्याकुळ पुकार कानावर येते. आशाबाईंनी हा जो सूर (षड्ज) लावला आहे तिथेच ही गायकी एकदम मनात शिरते. ललित संगीताचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हातात असलेल्या शब्दांचा नेमका "भाव" ओळखून त्याचे गळ्याद्वारे प्रत्यंतर द्यायचे. गाण्यातील शब्द आणि आशय उघडपणे विरही भावना दर्शवतात आणि एकूणच सगळी स्वररचना ही याच भावनेच्या सावलीत चालते. आता आपण मुखड्याचे शब्द बघूया म्हणजे आशाबाईंनी जे गायले आहे त्याचे वाचून प्रत्यंतर घेता येईल. "जिवलगा, राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरती, जड झाले ओझे." आता शब्दांप्रमाणे गायन ऐकायला गेल्यास, "जिवलगा" या शब्दानंतर स्वल्पविराम आहे. याचा वेगळा शाब्दिक अर्थ असा काढता येईल, "जिवलगा" असा आर्त पुकारा झाल्यानंतर, गळ्यात किंचित आवंढा आला आणि गळा दाटल्यावर सूर कसे उमटणार? तेंव्हा तिथे किंचित विराम घेणे क्रमप्राप्त ठरते आणि हाच "किंचित" विराम आशाबाईंनी स्तब्धतेने दाखवला. हा "शांत" क्षण सुरवातीच्या "इकारांत" सूरानंतर अतिशय बोलका ठरतो. पुढे मग सलग ओळ गायली आहे - "राहिले रे दूर घर माझे". ही ओळ देखील गाताना "रे" अक्षरावरील अर्थपूर्ण वजन लक्षणीय आहे. ललित संगीतातील सौंदर्य हे अशाच अतिशय छोट्या परंतु भावगर्भ क्षणांनी सजलेले असते. शेवटी "माझे" शब्द गाताना संपूर्ण चाल कशी आहे हे अधोरेखित करून संपवली आहे. "माझे" हा शब्द ज्या सुरात गायला आहे तोच सूर पकडून मुखड्याची दुसरी ओळ सुरु केली आहे- "पाऊल थकले माथ्यावरती, जड झाले ओझे". ही ओळ घेताना, "थकले" शब्दाचा उच्चार ऐका. पाऊल उचलणे अवघड झाल्याने, मनात आता विक्लान्त भाव पसरला आहे आणि त्यामुळे पुढे चालणे अशक्य झाले आहे आणि हाच भावाशय अतिशय समर्थपणे आपल्या गायकीतून दाखवला आहे. पुढे त्याच ओळीतील "जड" आणि "ओझे" हे शब्द उच्चारताना वरील विधानाप्रमाणे गायन झाले आहे. गमतीचा भाग असा आहे, जसे मुखड्याच्या पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द "माझे" आणि दुसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द "ओझे" गाताना लय तीच ठेवली आहे (खरतर सगळे गाणे अतिशय ठाय लयीत बांधले आहे) आणि ओळीची समाप्ती करताना तसेच शाब्दिक वजन कायम केले आहे. पहिला सूर लागतो आणि गायन अथकपणे शेवटपर्यंत चालत आहे. "किर्र बोलते घनवनराई, सांज सभोती दाटून येई सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे." ललित संगीतात अचूक शब्दोच्चार असणे हा मुद्दा अतिशय महत्वाचा असतो. कवीने लिहिलेले शब्द आणि त्या शब्दांमागील दडलेला आशय व्यक्त करायला हाताशी फक्त सूर असतात आणि त्या सुरांच्या साहाय्याने कवीने मांडलेला आशय अधिक खोलपणे दर्शवणे, हे गायक/गायिकेचे महत्वाचे काम. ध्रुवपदातील संकल्पना या कडव्यात विस्ताराने मांडली आहे. या अंतऱ्यातील दुसऱ्या ओळीत "सभोती" शब्द आहे. खरेतर "सभोवती" हा प्रचलित शब्द परंतु कवियत्री शांताबाईंनी स्वररचनेतील लयीचे भान ठेऊन "सभोती" शब्द लिहिला आणि याचे मुख्य कारण म्हणजे ललित संगीतात एखादे अक्षर जरी वाढले किंवा कमी झाले तरी संगीतकाराची तारांबळ उडू शकते. याच कडव्यांच्या सुरवातीला "किर्र" सारखा जोडाक्षरी परंतु सरळ उच्चारायला देखील अवघड शब्द आहे परंतु आशाबाईंनी हाच शब्द अशा प्रकारे गायला आहे की ऐकता क्षणी आपल्यासमोर "काजळी अंधार" उभा राहतो!! केव्हढी अप्रतिम गायकी, नुसत्या एका शब्दाने वातावरण निर्माण करायची ताकद सहज जमणारी नाही. "गाव मागचा मागे पडला पायतळी पथ तिमिरी बुडला ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे". गाणे अगदी सलग आहे, जवळपास ६,७ मिनिटांचे आहे आणि गाताना जराही उसंत मिळत नाही. दुसरा भाग, भारतीय संगीताच्या हिशेबात लिहायचे झाल्यास, पारंपरिक अस्थायी-अंतरा आणि वाद्यमेळ, ही पद्धत इथे बाजूला सारलेली आहे. गायनाची सुरवातीची पद्धत या अंतऱ्यासाठी अनुसरलेली आहे. याचा अर्थ इतकाच आहे, अंतरा मूळ मुखड्याच्या चालीशी मिळताजुळता आहे. अशावेळेस गायनाचे महत्व अधिक असते कारण सुरांची "जात" सारखी असल्याने गायन पुनरुक्त होऊ शकते परंतु अभ्यासू गायिका त्यातील लपलेली सौंदर्यस्थळे शोधून रसिकांच्या समोर ठेवते. "गाव मागचा मागे पडला" ही ओळ गाताना स्वर किंचित वर ठेवला आहे परिणामी चालीचा ढंग वेगळा वाटतो आणि "गाव मागे पडला" या वाक्यातील व्याकुळता अधिक स्पष्ट होते. सूर वरचा ठेवला म्हणजे लगेच "तार"स्वर ही जात नसून मध्य लयीतील आर्त स्वर असे होय. शेवटची ओळ मुद्दामून ऐकावी - "ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे". आपली सराई (विश्रांतीस्थान) सुटली आणि परतीचे दरवाजे मिटले - ही विषण्ण जाणीव आशाबाईंनी ज्याप्रकारे स्वरांतून दर्शवली आहे, त्याला तोड नाही. "दरवाजे" शब्द उच्चारताना थोडासा स्वर लांबवला आहे जेणेकरून परतीचे दोर तुटले हा भाव ठळक होईल. गाण्याच्या स्वररचनेतील लपलेली सौंदर्यस्थळे ही अशाप्रकारे शोधली जातात आणि गाणे समृद्ध होते. "निराधार मी, मी वनवासी घेशील केंव्हा मज हृदयाशी तूच एकला नाथ अनाथा, महिमा तव गाजे." हा अंतरा सुरु होण्याआधी छोटीशी सरगम आहे जी अर्थातच "श्री गौरी" रागाची आहे. काही जणांनी या सरगम घेण्यावर टीका केली आहे पण खरंच टीका करण्याइतकी वाईट किंवा गैरलागू आहे का? जरा बारकाईने ऐकल्यास ज्या प्रकारे ज्या लयीत गायन चालले आहे ते बघता, त्यात काही वेगळे वाटत नाही. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे सरगम ही नेहमीच गायनातील "स्वरस्थाने" दर्शवण्यासाठी केली जाते. मुद्दा असा येतो, सुगम संगीतासारख्या ३,४ मिनिटांच्या सांगीतिक प्रकारात सरगम सारखे अलंकार घ्यायला कितपत वाव असतो? जर का संगीतकार आणि गायक/गायिका सक्षम असतील तर विरोध होऊ नये. आता इथली सरगम ऐकताना कुठेही रसभंग होत नाही तसेच सरगम संपवतानाचा शेवटचा स्वर अतिशय अचूकपणे "निराधार" शब्दातील "नि" या अक्षराशी बेमालूमपणे जुळवून घेतला आहे आणि याचे श्रेय संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि अर्थातच आशाबाईंचेच आहे. इथे देखील शेवटची ओळ गाताना - "तूच एकला नाथ अनाथा, महिमा तव गाजे" ही ओळ पुन्हा, पुन्हा बारकाईने ऐकावी अशीच गायली गेली आहे. "अनाथ" असल्याची जाणीव आणि त्या अनाक्रोशी आकांताशी भावगर्भ पद्धतीने उचलली आहे पण गाताना कुठेही विसविशीतपणा नसून अत्यंत बांधीव आणि सुदृढ सांगीतिक रचना सादर करीत आहोत याचे नेमके भान आहे. आता शेवटचे काही शब्द - हे गीत सहजपणे "श्री गौरी" रागातील "बंदिश" होऊ शकली असती परंतु आपण ३ मिनिटांचे गाणे सादर करीत आहोत आणि त्यामुळे रागदारी संगीताच्या बंदिशीचा जरी आधार असला तरी त्यातील "गीततत्व" शोधून गायन केले आहे आणि वर मी म्हटल्याप्रमाणे, पारंपरिक गाण्याचा ढाचा बाजूला सारून गाण्याची लांबी जरी ५,६ मिनिटांची झाली तरी गाणे कुठेही क्षणभर रेंगाळत नाही, किंबहुना गाण्याच्या पहिल्या सुरापासून आपल्या मनाच्या तळाशी जाऊन पोहोचते. यापेक्षा ललित संगीताची वेगळी फलश्रुती ती कुठली?

1 comment: