Wednesday 2 September 2020

हरवले ते गवसले का

आपल्याकडे संगीत आणि गाणी याचे प्रमाण अतिशय असते असे म्हटले जाते. अर्थात हे फार ढोबळ विधान झाले. भारतीय संदर्भात कशालाही गीत म्हणण्यासाठी चार वळणे पुरी करावी लागतात. लयबद्ध गद्य, पठण, पद या साच्याची गठण आणि कलासंगीतातील रचनातत्वांचा लघुत्तम वापर करून सिद्ध होणारी कृती, हे ते चार मार्ग व्यवस्थितपणे वेगळे करावे लागतात. ज्याला "गीत" म्हणायचे त्यापासून हे ४ मार्ग व्यवस्थितपणे निराळे करावे लागतात. गीताची साधी व्याख्या करून व संगीताला एकविध आविष्कार समजून सुटका करून घेण्याचा मोह इथे होऊ शकतो. पण हा सैलपणा इथे उपयोगी नाही. आणि त्यामुळे संगीत म्हणजे काय, हे नीटसपणे समजणार देखील नाही. म्हणूनच संगीत म्हणजे काय ते समजणे म्हणजे विविध अनेक संदर्भात संगीत कसे वागते त्याचे भान येणे होय. अनेक घटना वा प्रसंग वा क्रिया, कला आणि ज्ञानक्षेत्रे संगीताशी संदर्भ पुरवतात आणि हाच मुद्दा मराठी भावसंगीताच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. मराठी भावसंगीत हे जनसंगीताच्या कोटींत तसे उशिराने प्रवेश करते झाले परंतु लगेच या आविष्काराने आपल्या कार्यक्षेत्राची व्याप्ती प्रचंड वाढवली आणि जनमानसात कायमचे स्थान प्राप्त केले. आजचे आपले गाणे - हरवले ते गवसले का, हे असेच भावसंगीत किती प्रभावी आणि सुंदर झाले आहे, याचे निदर्शक आहे. याची शब्दरचना प्रसिद्ध कवी पी. सावळाराम यांची आहे. कविता म्हणून वाचायला गेल्यास, कवितेत फार काही खोल आशय आढळत नाही. काहीशा सपक प्रतिमा आणि बऱ्याच ठिकाणी "शब्द जोडणी" वाचायला मिळते. कवी म्हणून पी. सावळाराम कधीही प्रतिभावंत म्हणून गणले गेले नाहीत परंतु ललित संगीताला बरेचवेळा "भावकविता" जरुरीची वाटत नाही तर चटपटीत, थोडक्यात आपले म्हणणे मांडणारी आणि रसिकांना लगेच आकलन होणारी आणि आकर्षून घेणारी शब्दरचना भावते. (मला मात्र "भावकविता" अधिक भावते!!) तेंव्हा या रीतीला धरून अशीच शब्दकळा आहे. "मीलनाचा परिमल" किंवा "पाकळ्यांच्या उघडझापी" तसेच "जलाशयाची सृष्टी - मृगजळे का व्यापिली" सारखे शब्द ललित संगीतात असंख्य वेळा वाचायला मिळतात. परिणामी आशयाची व्याप्ती संकुचित होते. या गाण्याचे खरे सौंदर्य हे गाण्याच्या स्वररचनेत आहे. प्रसिद्ध संगीतकार वसंत प्रभूंनी चालीची निर्मिती केली आहे. शास्त्रीय बाजू बघायला गेल्यास, "राग "पुरिया कल्याण" वापरला आहे. आता या रागाचे प्राथमिक स्वरूप बघायला गेल्यास, पूर्वांगात पुरिया तर उत्तरांगात कल्याण (यमन राग) राग ऐकायला मिळतो. षड्ज स्वरापासून मध्यम स्वरपर्यंतचे सूर हे पुरिया रागाशी जवळीक साधतात आणि पंचम स्वरापासून यमन राग दिसायला लागतो परिणामी रागाचे सादरीकरण काहीसे अवघड बनते. एकतर (कोमल) रे आणि (तीव्र) म सोडल्यास सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागतात. त्यातून रागाचा "थाट - मारवा"!! त्यामुळे स्वरार्थाने ऐकायला गेल्यास व्याकुळ भाव निर्मिती होते आणि संध्याकाळचा समय ध्यानात घेता रागाचा फार मोठा प्रभाव रसिकांवर पडतो. आता गाण्याच्या स्वररचनेबाबत बोलायचे झाल्यास, गाण्याच्या सुरवातीच्या व्हायोलिनच्या सुरांनी आपण या रागाच्या अंगणात येऊन पोहोचतो. शब्दरचना पारंपरिक धाटणीची म्हणजे अस्ताई-अंतरा पद्धतीची आहे आणि त्यामुळे चाल देखील तशाच अंगाने विस्तारत जाते सगळे अंतरे एकाच धाटणीने बांधले आहेत. जसे शब्द आहेत तशीच सोपी, साधी चाल आहे पण खरी गंमत आहे ती,या चालीच्या गोडव्यात!! अतिशय गोड चाल बांधली आहे. मुळात ललित संगीताचा जीव तसा लहानखुरा असतो त्यामुळे इथे तसे वारंवार स्वरिक प्रयोग आढळत नाहीत. एकूणच वसंत प्रभूंच्या सांगीतिक कारकिर्दीचे मूल्यमापन करायचे झाल्यास, बहुतेक स्वररचना या "मेलडी प्रधान" आहेत. रागांचा सढळ हस्ते वापर केलेला आढळतो आणि त्या रागाची वैशिष्ट्ये जपत असताना चालीला "सुगम" रूप देण्याकडे ओढा दिसतो. इथे देखील पुरिया कल्याण स्पष्ट दिसतो परंतु गाण्याला "गीतस्वरूप" देण्यात संगीतकार यशस्वी झाले आहेत. एकूणच आवड ही शक्यतो पूर्णस्वरूप मेलडीकडे जाण्याची आहे. अर्थात ललित संगीतात संपूर्ण निखळ मेलडी दिसणे अवघडच असते परंतु मेलडीचा प्रभाव जाणवून देणे शक्य असते. वाद्यमेळांत फार काही नावीन्य दिसत नाही. भारतीय संस्कृतीमधील वाद्येच वापरली आहेत आणि एकूणच वाद्यांकडे अधिक ओढा दिसत नाही. त्यापेक्षा आपण बांधलेली स्वररचना अधिक वेधक कशी दिसेल, श्रोत्यांना कशी आवडू शकेल - हाच विचार प्रबळ आहे. त्यातूनच रचनेत अर्धतान तसेच बारीक हरकती यांचाच अंतर्भाव दिसतो. अगदी प्रणयी थाटाचे, द्रुत लयीत गाणे बांधले तरी त्यात मेलडीचा अंतर्भाव होणे अगत्याचे वाटते. माग कधीकधी दीर्घ आलापी ऐकायला मिळते. शब्दांना नेहमीच प्राधान्य दिले आहे, परिणामी "यतिभंग" फारसे ऐकायला मिळत नाहीत. कवींच्या शब्दांप्रती निष्ठा दिसून येते. थोडा वेगळा विचार - एक प्रयत्न असा असू शकतो, गीत ऐकताना रचनाकाराच्या गीतरचनेवर जरा अधिक लक्ष द्यायचे ते अशासाठी की एकंदर रचनाप्रकारात व्यक्तीच्या आपल्या, म्हणजे व्यक्तिगत आवाजाला, सुखदुःखाला खरी वाचा फोडणारा, त्यांना भावनिक आकार देणारा रचनाप्रकार हा "गीत" हाच असू शकतो. काहीसे विरोधाबभासात्मक विधान करायचे झाल्यास, सर्व गीते रचना असतात पण याचा अर्थ सर्व रचना गीते असतात, हा व्यत्यास खरा नसतो. या गाण्याच्या बाबतीत हा विचार केल्यास काही वेगळा दृष्टिकोन आपल्याला मिळू शकतो. तसेच हे गीत म्हणजे गीतधर्मी प्रतिभेचं मर्मग्राही उदाहरण म्हणता येईल. पुरिया कल्याण रागाच्या स्वरक्षेत्रात रुंजी घालत राहण्याच्या ब्रीदास हा संगीतकार जगतो पण त्याशिवाय व्हायोलिन सारख्या वाद्याचा स्वनरंगांचा वावर चांगलाच जाणवतो. याशिवाय आणखी एक महत्वाचा मुद्दा - लताबाई गायन करीत असताना त्याच्या मागे पार्श्वसंगीत मुळीच रुंजी घालत नाही. कवितेच्या चरणांचा असा वेगळा अवतार गायिकेस आव्हानदायक वाटला असणार. पण त्यामुळे काव्याचा अर्थच नव्हे तर असहाय देखील ऐकणाऱ्याच्या मनात सावकाश दाट होत जातो. जसे, रात्र नकळत अंधारत जावी त्याप्रमाणे. हा एकुणात फार मोठा फायदा होतो. गायन हा घटक या गाण्यात अतिशय महत्वाचा ठरला आहे. गाण्याचा मुखडा प्रश्नार्थक आहे आणि तोच प्रश्नार्थक भाव लताबाईंनी गायनातून दर्शवला आहे. एक गायिका म्हणून ही नजर विशेष म्हणायला हवी. वास्तविक अंतऱ्याची सामान बांधणी आहे परंतु पहिला अंतरा "उचलताना", दुसरी ओळ वरच्या स्वरांत घेतली आहे. "पाकळ्यांच्या उघडझापी" शब्द अशा प्रकारे गायल्याने, झालेल्या दु:खाची प्रत अधिक विखारी होते. आत्ममग्न गीतांतून देखील अशी वेगळी जाण दाखवता येते. याच शब्दांपाठोपाठ "हास्य उमले वेगळे का?" हे प्रश्नार्थक विधान ज्याप्रकारे गायले गेले आहे, "शब्दप्रधान गायकी" म्हणजे काय? या प्रश्नाचे नेमके उत्तर होय. गाण्याची रचना करताना प्रत्येक अंतऱ्याची दुसरी ओळ, मूळ मुखड्याच्या चालीपेक्षा वेगळी घेतली आहे. पण जरा बारकाईने ऐकले तर लय तशीच आहे आणि सूर फक्त वरच्या टप्प्यात घेतले आहेत पण स्वरांची जातकुळी जवळपास तशीच आहे. इथे जसा संगीतकार दिसतो तसेच गायिका देखील दिसते. एक अतिशय मधुर चालीचे, सुगम्य शब्दांचे आणि ऐकायला गोड वाटणारे गाणे लोकप्रिय झाले नसते तरच नवल होते. हरवले ते गवसले का? गवसले ते हरवले का? मीलनाचा परिमल तोचि, फुल तेचि या स्वरूपी पाकळ्यांच्या उघडझापी, हास्य उमले वेगळे का? पावसाळी ग्रीष्म सरिता, सागराला फिरुनी मिळता जलाशयाची सृष्टी आता, मृगजळे ही व्यापिली का? दूर असता जवळी आले, जवळी येता दूर गेले जो न माझे दु:ख हसले, तोचि सुख ही दुखावले का? https://www.youtube.com/watch?v=s1rUmIG8qQw

No comments:

Post a Comment