Monday 24 August 2020

हेमराज वाडी - भाग ९

मुळावकर नाना आणि माझे नाना यांची आमच्या गृपवरील सगळ्या मित्रांवर थोडी जरबच होती. दोघांचे करडे डोळे असल्याने पहिल्यांदा काहीशी भीतीच वाटायची. मुळावकर नानाचे डोळे तसे गोल, गटगटीत आणि घारे असल्याने, आम्ही कधी मुळावकरांच्या घरी गेलो तर काकुंशीच अधिक बोलायचो. काकू मात्र अतिशय शांत, सोज्वळ आणि सतत हसतमुख असायच्या. घरी गेलो आणि काकूंनी हसून स्वागत केले नाही असे कधीच घडले नाही. याउलट आम्ही शाळेत असताना नानांशी संपर्क टाळण्याकडे आमचा सर्वांचा कल असायचा. हा माणूस कधी बोलला तर दरडावलेल्या सुरांतच बोलेल असे सुरवातीला वाटायचे. अर्थात पुढे माझी त्यांची चांगली ओळख झाली आणि नाना जसे आधी वाटले तसे नसून छान गप्पा मारायचे. विशेषतः त्यांच्या माझ्यात संगीत हा विषय सामायिक असायचा. एकदा धोबीतलाव जवळील बिर्ला मातोश्री सभागृहात उस्ताद विलायत खान यांच्या सतारीच्या कार्यक्रम होता आणि आम्ही काहीही न ठरवता थेट सभागृहापाशीच भेटलो. मीही शास्त्रीय संगीताच्या मैफिली ऐकतो याचे त्यांना थोडे कौतुक होते. आमची तिकिटे वेगवेगळी असल्याने कार्यक्रमाच्या वेळी काही बोलता आले नाही परंतु कार्यक्रम संपल्यावर आम्ही दोघे चालत,चालत घरी परतलो आणि घरी येताना माझी भूमिका श्रोत्यांची होती. जवळपास तासभर एकत्र होतो आणि तो सगळा तास, नाना माझ्याशी, त्यांनी ऐकलेले कलाकार, या विषयावर बोलत होते. नाना तसे जुन्या गोष्टींबद्दल अभिमानी, विशेषतः व्ही.शांताराम बद्दल त्यांना प्रचंड अभिमान होता. मुळावकर काकू मात्र संपूर्ण वेगळ्या स्वभावाच्या. आम्हा मुलांच्यात येऊन बसत आणि आमच्यात सहज मिसळून जात. एका वर्षी आम्ही मित्रांनी ठरवले, मुळावकरांच्या घरात जो गणपती येतो, तो आपण सगळ्यांनी एकत्रितपणे साजरा करायचा. परवानगी घेण्यासाठी अर्थात काकू मदतीला आल्या आणि लगोलग काकूंनी होकार दिला. मुळावकरांच्या घरातील गणपती पण आता आम्ही सगळ्यांनी पुढाकार घ्यायचे ठरवले. मग लगेच डेकोरेशन, मूर्ती वगैरे बाबी पूर्ततेसाठी सगळ्यांचा एकत्रित सहभाग होता. त्यानिमित्ताने आम्ही खरेतर आमचीच हौस भागवीत होतो. आमचा गोविलकरांचा गणपती त्यावेळी नायगाव इथे माझे काका रहात होते, त्यांच्या घरी यायचा. परिणामी गणेश चतुर्थीच्या आदल्या रात्री (रात्रभर जागायचे आकर्षण अधिक असायचे) आम्हाला काकांच्या घरी जायलाच लागायचे. त्यामुळे बाकीच्यांचा थोडा हिरमोड व्हायचा. परंतु पहिल्या दिवशीच आम्हा गोविलकरांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा झाल्यावर आम्ही लगोलग मुळावकरांकडे जात असू. आता गौरी गणपती म्हटल्यावर, चार दिवस धुंदीत जायचे. राजू त्यावेळीही हौशी नकलाकार म्हणून पुढे येत होता आणि मग गणपतीच्या रात्री मनोरंजाचे कार्यक्रम म्हणून राजुच पुढे असायचा. एके वर्षी, कुमार गोखलेंच्या धाकट्या भावासोबत राजुने गाणे म्हटल्याचे ठळक आठवत आहे, कुमारचा भाऊ तेंव्हा तबला शिकत होता. मला वाटते, सलग ३,४ वर्षे आमचा उत्साह टिकला होता. पुढे वयोमानानुसार सगळे आपापल्या दिशांनी गेले आणि आता फक्त स्मृती उरल्या. तशीच एक आठवण कायम मनात राहिली आहे. E ब्लॉकमधील तिसऱ्या मजल्यावर लपालीकर कुटुंब रहात होते - त्यांच्याकडे एकत्र कुटुंब पद्धत असल्याने नंदू आणि राजेश (वयाने हे दोघे आमच्यापेक्षा बरेच लहान आहेत) यांचे आई/वडील आणि त्यांच्यासह अनिल,अरुण,शरद लपालीकर एकत्र रहात होते. त्यांच्याकडे ११ दिवसांचा गणपती यायचा. त्यांचे तसे मोठे कुटुंब होते त्यामुळे गणपतीच्या दिवसात त्यांच्या घरात बरीच वर्दळ असायची. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मात्र आम्ही सगळे त्यांच्या कडे महाआरतीला जमत असू. माझ्या आठवणीत, सुरवातीला तरी त्यांच्या गणपती विसर्जनाला आम्ही सगळे जात होतो (पुढे त्यांनी हेमराज वाडीच्या सार्वजनिक गणपतीसह न्यायला सुरवात केली न ते फार तर २ एक वर्षेच टिकले आणि पुन्हा त्यांनी स्वतंत्रपणे विसर्जनाला सुरवात केली) आम्ही सगळे विसर्जनाला येत आहोत म्हणून नंदूचे वडील ( त्यांचे आवडते नाव "पपूशेट!!) आम्हाला गिरगाव चौपाटीवर भेळ वगैरे खायला घालत असत. त्यावेळी आम्हाला हे प्रचंड आकर्षण होते. त्यावेळी एकूणच बाहेर खाणे म्हणजे सोहळा असायचा. (याच सुमारास आमच्यातील सतीश अवचटला नगद १००/- मिळाले आणि त्याने ती नोट प्रदीपकडे दिली!! पण त्याचे वर्णन वेगळ्या लेखात) आम्हाला या दिवसाचे खरे आकर्षण म्हणजे हेमराज वाडीच्या गणपती विसर्जनाला वाजणारा बँड ( त्यालाच "कच्ची बाजा" म्हणतात) पुढे अनेक वर्षे आम्ही वाडीच्या विसर्जनाला जात होतो. आमच्यातील उदय पोवळे म्हणजे आमचा "गोपीकृष्ण"!! वाडीतच तो नाचायला सुरवात करायचा आणि सगळी वाडी त्याच्याकडे थक्क होऊन बघत असे. आम्ही त्यामानाने पांढरपेशे!! मूर्ती रस्त्यावर आली आणि घरापासून थोडी दूर गेली की आमचे पाय थिरकायला लागायचे. रात्रभर हा दंगा चालायचा. खरतर त्यावेळचा सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे एका प्रबंध लेखनाचा विषय आहे.

No comments:

Post a Comment