Friday 28 August 2020

सुनील गावस्कर

उंची साधारण सव्वा पाच ते साडे पाच फूट, कुरळे केस, शरीरयष्टी काहीशी स्थूलत्वाकडे झुकणारी, नजर मात्र अति तीक्ष्ण पण पहिल्या दर्शनात या व्यक्तीकडे काही असामान्य गुण असतील, याची काहीशी शंका यावी असे व्यक्तिमत्व!! परंतु एकदा हातात बॅट आली की हा एका अलौकिक तेजाने तळपायला लागायचा. सामना कुठला ही असू दे, हा नेहमीच शांतपणे तंबूतून बाहेर पडणार, स्टम्पजवळ येणार आणि अम्पायरकडे "मिडल गार्ड" मागणार. जगभर बहुतांशी फलंदाज "लेग गार्ड" घेतात परंतु हा वेगळाच!! "मिडल गार्ड" घेण्यात कायम एक धोका असतो, चेंडू खेळताना फलंदाज ऑफ स्टम्पकडे थोडासा "शफल" होत असतो आणि इथे सर्वात मोठा धोका उद्भवतो - मिडल स्टम्पवरून ऑफ स्टम्पवर शफल होताना आपला लेग स्टम्प उघडा राहू शकतो आणि जर का चेंडूचा अंदाज चुकला ते त्रिफळाचीत होण्याचा सर्वात जास्त धोका असू शकतो. परंतु इथे "अंदाज चुकला" हे शब्द या फलंदाजाबाबत येऊच शकत नसत इतका दुर्दम्य आत्मविश्वास होता. सुनीलला आयुष्यभर याच अदम्य आत्मविश्वासाने नेहमी साथ दिली. फॉर्म येतो, जातो, पुन्हा येतो. हे तर नेहमीचे नैसर्गिक चक्र असते परंतु आपला आत्मविश्वास कधीही डळमळीत होऊ द्यायचा नाही, हे सुनीलच्या आयुष्याचे ब्रीदवाक्य!! सुनीलचे तंत्र, त्याचे पदलालित्य, त्याचा अंदाज या विषयी असंख्य वेळा असंख्या लेख लिहिले गेले आहेत. प्रसंगी खोलवर विश्लेषण देखील केले आहे परंतु आत्मविश्वास ही चीज कुठेही उचलून दाखवता येणारी नसते, तिचा इतरांना प्रत्यय येत असतो. एक अविस्मरणीय क्षण आठवला. १९८२ साली भारतीय संघ पाकिस्तानमध्ये गेला होता आणि तेंव्हा इम्रानने आपल्या असामान्य इन्स्वीन्ग गोलंदाजीने धुमाकूळ घातला होता. भारत ही मालिका हरला होता. याच मालिकेत सुनील तेजाळून उठला होता. तिसरा कसोटी सामना चालू होता. इम्रानने दुसरा सामना एकहाती पाकिस्तानला जिंकून दिला होता आणि तिसरा सामना याच वाटेवर चालला होता फक्त मध्ये अडसर सुनीलचा होता. सुनीलने पन्नाशी गाठली होती आणि त्याच आत्मविश्वासाने त्याची फलंदाजी सुरु होती. इम्रानने (तेंव्हा इम्रान ताशी १५० कि.मी. वेगाने गोलंदाजी करीत होता) एक चेंडू त्वेषाने मिडल स्टम्पवर, काहीसा आखूड टप्प्याचा टाकला. सुनीलने क्षणभर चेंडूच्या बाउंसचा अंदाज घेतला आणि मिडल स्टम्पवरील चेंडू सोडून दिला!! सुनीलचा तो अंदाज बघून इम्रान थक्क झाला!! त्याला चेहऱ्यावरील आश्चर्य लपवता आले नाही!! जगातील सगळ्या फलंदाजांनी तो चेंडू निश्चितपणे खेळला असता - काहीही घडू शकले असते पण हा चेंडू स्टम्पवरून जाणार आहे तेंव्हा बॅट लावायची कशाला? आणि सुनीलने तो चेंडू विकेटकीपरकडे जाऊ दिला!! क्षण हा शब्द देखील मोठा आहे इतक्या निमिषार्धात घेतलेला अंदाज आणि निर्णय. इथे तंत्र तर आवश्यक होतेच परंतु चेंडूच्या बाउंसचा अचूक अंदाज घेणे, या कौशल्याला दाद द्यावी, अशी परिस्थिती होती. सुनीलचा स्टान्स अगदी सरळ, साधा होता. बॅट आणि पॅडमध्ये हवेला देखील जायची संधी मिळणार नाही इतक्या लगटून उभा राहायचा. एरव्ही काहीसा मिस्कील दिसणारा सुनील एकदा फलंदाजीला उतरला की संपूर्ण जगाला विसरून जायचा. जगाला विसरून पूर्णपणे एकाग्र होणे, ही बाब भल्याभल्यांना जमत नाही. एकाग्रता हा त्याचा अभेद्य भाता होता. त्या जोरावर सुनील खेळपट्टीवर संपूर्ण दिवस उभा राहायचा. गोलंदाज शिणून जायचे पण याच्या एकाग्रतेवर किंचितही परिणाम व्हायचा नाही. आमची पिढी खरोखर नशीबवान, सुनीलला आम्ही यथेच्छ बघितला, नसता बघितला नसून, त्यांच्या फलंदाजीतील सौंदर्याचा पुरेपूर उपभोग घेतला. त्याच्या काळात वेस्टइंडिजमध्ये ग्रीनिज, विव्ह, लॉइड सारखे "हातोडे" तर पुढे खुद्द भारतीय संघात, संदीप, कपिल, प्रसंगी दिलीप सारखे घणाघाती फलंदाज होते पण सुनीलने पहिली १२ वर्षे आपली शैली बदलायचा चुकूनही प्रयत्न केला नाही. समोर कितीही वादळे येवोत, सुनीलने आपला approach कधीही बदलला नाही. गरजच पडली नाही. याला म्हणतात आत्मविश्वास. फलंदाजीचे त्याचे तंत्र तर आजही निवृत्त होऊन, ३३ वर्षे झाली तरी वाखाणणलें जाते, किंबहुना "आदर्श" मानले जाते. ३३ वर्षे झाली म्हणजे फलंदाजीच्या ३ पिढ्या आल्या आणि गेल्या. फलंदाजीच्या तंत्रात आता आमूलाग्र बदल झाले. इतकेच कशाला बॅटीचे वजन, दर्जा इत्यादी फार पुढे गेले पण तरीही आजही फलंदाजीचे तंत्र म्हटल्यावर सुनील(च) डोळ्यासमोर येतो!! त्याने आपली शैली प्रथमच बदलली ती १९८३ मध्ये भारतात आलेल्या लॉईडच्या संघासमोर खेळताना. वेस्ट इंडिजचा संघ डिवचलं गेला होता आणि विश्वचषकातील, भारताकडून झालेल्या पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्याचा बदल घेण्याच्या उद्दीष्टानेच वेस्ट इंडिजचा संघ भारतात आला होता आणि कानपूरच्या पहिल्याच कसोटी सामन्यात याची चुणूक दिसली होती. आयुष्यात प्रथमच मार्शलच्या प्रलयंकारी वेगाने, सुनीलच्या हातातील बॅटीवरील पकड निसटली आणि सुनील बाद झाला. अशाप्रकारे बाद होणे ही नामुष्की तर होतीच पण सुनीलचा आत्मविश्वास खचवणारी घटना होती. याच पार्श्वभूमीवर दिल्लीला दुसरा कसोटी सामना सुरु झाला आणि सुनीलने आपले रौद्ररूप दाखवायला सुरवात केली. गेली १२ वर्षे म्यानात घालून ठेवलेला "हूक" चा फटका बाहेर काढला आणि मैदानावर आगीचा लोळ पसरायला लागला. मार्शल, होल्डिंग आणि डेव्हिस सारखे आग्यावेताळी गोलंदाज, पहिल्या कसोटीची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने गोलंदाजी करीत होते आणि सुनीलने त्यांना "हूक","पूल" तसेच चेंडू जरा ऑफ स्टम्पवर पडत आहे, लक्षात आल्यावर गुडघ्यात किंचित वाकून त्यांनी कव्हर ड्राइव्ह मारायला सुरवात केली. सगळा स्टेडियम तर अवाक झालाच होता पण आमच्यासारखे टीव्हीवर बघणारे, आपले डोळे विस्फारून हे "युद्ध" बघत होते. त्या दिवशी सुनीलने अगदी ठरवून मार्शलच्या गोलंदाजीवर प्रतिहल्ला चढवला होता. वेस्ट इंडिज संघ हतबल झाला होता. सुनीलकडून अतर्क्य अशी खेळी होत होती. मार्शलने आखूड टप्प्याचे चेंडू टाकले की सुनील किंचित बॅकफूटवर जात असे आणि खांद्यातून हूक मारीत असे. असे थोडा वेळ चालल्यावर लॉइडने स्क्वेयर लेग आणि लॉन्गलेग इथे क्षेत्ररक्षक ठेवले पण त्या दिवशी सुनीलने त्यांच्या मधून पूल आणि हूकचे फटाके मारून चौकार वसूल केले. हा अलौकिक प्रतिहल्ला होता. आपले तंत्र किती अचूक आहे याची प्रचिती त्याने आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात दिली. बंगलोरची खेळपट्टी म्हणजे फलंदाजीचे स्मशानघर होते आणि मंदगती गोलंदाजांना नंदनवन होते. पाकिस्तानच्या दोन्ही इंनिंग्स मध्ये एकानेही पन्नाशी गाठली नाही तर भारताच्या पहिल्या इनिंगमध्ये फक्त दिलीपने ५० धावा केल्या होत्या पण याच पार्श्वभूमीवर भारताला शेवटच्या दिवशी २२५ धावा करायच्या होत्या. या डावात इम्रानने एकही षटक टाकले नाही!! सुरवातच अक्रमने केली आणि दुसऱ्या बाजूने इकबाल कासीम आणि तौसिफ़ अहमद यांची दुतर्फा मंदगती गोलंदाजी सुरु केली. मंदगती गिलंदाजी जरी असली तरी आखूड टप्प्याचा चेंडू फलंदाजाच्या खांद्यापर्यंत, क्वचित त्याच्याही वर उसळत होता आणि चेंडू अक्षरश: १८० अंशाच्या कोनात फिरत होता. धावा करणे तर बाजूलाच राहो पण तिथे नुसते उभे राहणे अशक्य होते आणि इथे सुनीलने आपला खरा दर्जा दाखवला. गोलंदाज धार्जिण्या खेळपट्टीवर कसे खेळायचे याचा असामान्य धडा घालून दिला. त्याने ९७ धावा केल्या पण एका अकल्पित असलेल्या चेंडूने त्याचा बळी घेतला. सुनीलला सामनावीर म्हणून गौरवले पण भारत फक्त १६ धावांनी सामना हरला. आजही सुनीलची ती बॅटिंग आदर्श म्हणून गौरवले जाते. मी ती इनिंग पहिल्या चेंडूपासून बघितली (टीव्हीवर!!) आणि खरोखर सुनीलला मनापासून लोटांगण घातले. अचानक उसळलेला चेंडू असला तरी सुनीलची बॅट चेंडूच्या रेषेत यायची आणि बॅटीवरील उजवा हात किंचित हलका करायचा आणि निव्वळ डाव्या हाताने बॅट ढालीसारखी पुढे आणायची आणि डिफेन्सिव्ह फटका खेळायचा पण तो कसा? तर बॅटीने चेंडू अडवताना चेंडू आपल्या पायाशीच पडणार आणि कुठेही इतरत्र जाणार नाही याची खात्री करून देणार!! किती अलौकिक तंत्र आहे हे!! सुनीलने भारताला अनेक गोष्टी शिकवल्या. मुख्य म्हणजे सलामीच्या फलंदाजीचा प्रश्न कायमचा निकालात काढला. सलामीला येऊन वेगवान गोलंदाजी कशी खेळायची, याचे तंत्र शिकवले, भारतीय संघाला आत्मविश्वास दिला. सुनीलने अपवाद प्रसंग वगळता मैदानावर फलंदाजी करताना कधीही आक्रस्ताळेपणा केला नाही, जरुरी भासलीच नाही. आजूबाजूला कितीही "स्लेजिंग" झाले तरी सुनील बर्फाप्रमाणे थंड असायचा. फलंदाजीचे असामान्य तंत्र शिकवले. क्रिकेट पुस्तकातील प्रत्येक फटका त्याच्या भात्यात होता आणि त्याचा त्याने सढळ हाताने उपयोग केला. सुनील, कव्हर ड्राइव्ह मारणार म्हणजे तो copy book style असणार याची ग्वाही दिली. फलंदाजीचे तंत्र त्याला शरण गेले होते. या बुटुक बैंगण फलंदाजाने भारताला क्रिकेटचे वेड लावले आणि Original Little Master ही उपाधी कायम सार्थ करून दाखवली. सुनील कधीही मैदानावर विजेप्रमाणे लखलखून गेला नाही तर देवघरातील नंदादीपाप्रमाणे शांतपणे तेवत राहिला. सुनील निवृत्त झाला आणि हा नंदादीप विझला!!

No comments:

Post a Comment