Monday 20 July 2015

जीवनात ही घडी अशीच राहू दे!!

आपल्याकडे एक समज काहीसा दृढ झालेला आहे. चित्रपटातील गाणी आणि खाजगी गाणी, यात फरक करताना, शब्दकळा, वाद्यमेळ आणि गायकीत फरक केला जातो. थोडक्यात, दर्जा म्हणून बघताना खाजगी गीतात, शब्दकळा समृद्ध तसेच मोजका(च) वाद्यमेळ आणि गरज नसताना गायकीतला फरक दाखवला जातो. जणू काही चित्रपट गीतांत याची कसलीच गरज नसते. यादृष्टीने पुढे जाउन, अशी देखील वर्गवारी केली जाते - खाजगी गाणे म्हणजे शास्त्र आणि चित्रपट गाणे म्हणजे कलात्मकता असला (खरतर खुळचट ) फरक केला जातो!! वास्तविक, चित्रपटात अशी कितीतरी उदाहरणे दाखवता येतील, जिथे या समजाला छेद देता येतील. विशेषत: मराठी चित्रपटातील बरीच गाणी, दर्जा म्हणून फार "उजवी" आहेत. मोजका वाद्यमेळ, सशक्त कविता आणि तितकाच विलोभनीय गायकी आविष्कार. 
"जीवनात ही घडी अशीच राहू दे" हे गाणे असेच अप्रतिम गोड आहे. सहजसुंदर काव्यरचना, लोभस चाल आणि त्या चालीचे अत्यंत सुश्राव्य सादरीकरण. या गाण्याची एक गंमत आहे. या गाण्याचा कवी आणि संगीतकार एकच आहे - यशवंत देव. तसे बघितले रूढार्थाने यशवंत देव हे काही कवी नाहीत पण, शब्दांची जाण त्यांची निश्चित वाखाणण्यासारखी आहे. " स्वर आले जुळुनी" सारख्या  अजरामर रचनेची शब्दकळा देवांचीच. 
कुठल्याही गाण्यात, गाण्याचे शब्द हे त्याचे बलस्थान असते तरीदेखील, कवितेत किती प्रतिमा घ्याव्यात किंवा कुठल्या छंदात शब्दरचना करावी याबाबत काही संकेत आहेत. मुळात सगळा सुरांचा आविष्कार असल्याने, रचनेत सुरांचे प्राबल्य अवश्यमेव. याचाच वेगळा अर्थ असा होतो, गाण्यातील शब्द हे अति गूढ, दुर्बोध असू नयेत. अर्थात, असा काही नियम मांडणे कठीण आहे. गाण्यातील शब्द अर्थवाही असणे तसेच ओळीच्या सुरवातीला आणि शेवटाला जे शब्द किंवा अक्षरे असतील, ते सुरांशी जवळीक साधणारे असतील तर, तेच गाणे गायला सहज सुंदर जाते.यशवंत देवांनी एके ठिकाणी सुंदर विधान केले होते - "गाण्याची चाल कवितेतच दडलेली असते, आम्ही फक्त ती शोधून काढतो"!! सूत्रबद्ध विचार. इथे तर खुद्द संगीतकारच कवी असल्याने, शब्दातून काय मांडले आहे, याबाबत दुजाभाव संभवतच नाही!! 
सुरवातीलाच सतारीची सुंदर गत आहे. त्या सुरावटीत, गाण्याची चाल दडलेली आहे. यमन रागावर चाल आहे, हे सहज उमजून घेता येते. संगीतकाराला चाल बांधताना, शब्दातील आशय नेमका ओळखून, ओळीतील कुठल्या शब्दाला अधूक महत्व द्यायचे, हे नेहमी ठरवावे लागते, ज्यायोगे कवितेतील आशय अधिक खोलवर ध्यानात येऊ शकतो. इथे बघूया, 
"जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलांवरी वसंत नाचू दे" चाल ऐकताना, लगेच जाणवेल, "जीवनात" हा शब्द स्वरांत मांडताना, "जी" शब्दावर हलकासा जोर दिलेला आहे आणि त्यातून नेमका अर्थ ध्वनित केलेला आहे. संगीतकाराचा कवितेविषयीचा अभ्यास हा अशा प्रकारे समजून घेता येतो. तसेच गाणे एका उत्फुल्ल मनोवृत्तीचे असल्याने, ह्याच ओळी परत घेताना, लय दुगणित घेऊन, चाल थोडी जलद घेतली असल्याने, गाण्याची स्वरावली नेमकी मनात ठसते. चाल थोडी जलद घेतल्याने, गाण्यातील भावविभोर वृत्ती खुलून आली. 
पहिला अंतरा देखील याच अंदाजाने बांधलेला आहे. ध्रुवपद जलद लयीत संपविल्यावर तीच लय कायम ठेऊन, वाद्यमेळ, रचना केली आहे. सतारीच्या जोडीने बासरी आणि व्हायोलीनचे सूर घेतले आहेत. या इथे व्हायोलीनवर जे सूर घेतले आहेत, त्याची "घडण" थोडी यमन कल्याण रागाची आठवण करून देणारी आहे. हे व्हायोलीनचे सूर जरा ध्यानात ठेवणे जरुरीचे आहे कारण पुढील विवेचनात याच सुरांचे थोडे वेगळे संदर्भ आपल्याला बघता येतील. 
इथे जे व्हायोलिनचे सूर आहेत, ते जरा बारकाईने ऐकले तर, अशीच सुरावट "या चिमण्यांनो परत फिरा" आणि "जीवन डोर तुम्ही संग बांधी" या गाण्यातील दुसऱ्या अंतऱ्यात घेतलेली आहे. भारतीय संगीताची ही खास गंमत आहे. वास्तविक, हे गाणे यमन रागावर आधारित आहे पण तरीही यमन कल्याण रागाचा संदर्भ इथे चपखल लागू पडतो. आता, ही तिन्ही गाणी संपूर्ण वेगळ्या धाटणीची आहेत. एकाचा दुसऱ्याशी काहीही संदर्भ नाही पण, स्वरांची भाषाच अशी आहे, तिथे अशी जवळीक साधली जाते. या दोन रागांत प्रमुख फरक एकाच सुराचा आहे, एकात "शुध्द मध्यम" आहे तर दुसऱ्यात "तीव्र मध्यम" आहे. व्यासंग असा दिसतो की या स्वरांची जोड कशी संपूर्ण गाण्यात कशी सामावून घेतली जाते.  
अंतऱ्यातील जलद लय, पहिले कडवे सुरु होताना, परत मुखड्याच्या सुराशी येउन थांबते आणि कडवे सुरु होते. 
"रंगविले मी मनात चित्र देखणे, आवडले वेडीला ते स्वप्न खेळणे;
स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे"
या ओळीतील "चांदवा"   वास्तविक,उर्दूतील "चांद" शब्दाचे वेगळे स्वरूप आहे पण,  रचनेचा "मीटर" लक्षात घेता, तिथे ३ अक्षरांचाच शब्द आवश्यक होता आणि तिथे मराठीतील "चंद्र" शब्द बसवला असता तर गाण्याची लय थोडी बिघडली असती. मघाशी मी, गाण्यातील शब्दांविषयी जे लिहिले, ते याच संदर्भात तपासून घेणे योग्य आहे. 
लताबाईंची गायकी किती "श्रीमंत" आहे, ते बघण्यासारखे आहे. पहिल्या ओळीतील "देखणे" हा शब्द किंवा पुढील ओळीतील अंत्याक्षर "दे" या शब्दावरील हलकी पण वजनदार फिरत ऐकण्यासारखी आहे. ही फिरत, सहज वाढवता येऊ शकेल पण, त्याने शब्दांच्या अर्थाचा "बेरंग" झाला असता आणि याच उद्देशाने, ती हरकत, इतकी थोडक्यात आटोपली आहे की, ऐकताना, जीव कासावीस व्हावा!! सुगम संगीतातील "अलंकार" हे असेच असतात. 
"हळूच तुला बघण्याचा छंद आगळा, लज्जेचा त्यावीण का अर्थ वेगळा;
स्पर्शातून अंग अंग धुंद होऊ दे, जीवनात ही घडी …."
या ओळीची सुरवात "हळूच" या शब्दाने होते. नायकाकडे बघायचे आहे पण त्याला न जाणवून देता, असा मुग्ध शृंगार इथे अभिप्रेत आहे म्हणून याच अर्थाने, "हळूच" शब्द लताबाईंनी उच्चारला आहे. अशा खास अलंकारांनीच गाणे खुलत जाते आणि रसिकांच्या मनात उतरत जाते. "लज्जेचा त्यावीण का अर्थ वेगळा" या ओळीचा पूर्वार्ध, आधीच्या ओळीत असल्याने, शब्दांचा आशय आणि त्याला दिलेली सुरांची जोड, इतकी सुंदर आणि गोड आहे, की परत, परत या स्वर वाक्यांशाचा आस्वाद घ्यावा!! 
"पाहू दे असेच तुला नित्य हासता, जाऊ दे असाच काळ शब्द झेलता;
मिलनात प्रेमगीत धुंद होऊ दे, जीवनात ही घडी……"
हे अखेरचे कडवे म्हणजे एका धुंद क्षणाचा अविस्मरणीय समारोप आहे. वास्तविक, चाल तशीच आहे, त्यात काही वेगळ्या सुरांचा उपयोग नाही पण जर का मुळात चालच अति श्रवणीय असेल तर त्यात काही प्रयोग करण्याची फारशी गरज पडत नाही. त्याचा परिणाम असा होतो, गाण्याचा सुरवातीचा परिणाम, आपल्या मनात अधिक ठाम होत जातो. 
आज इतकी वर्षे मी हे गाणे ऐकत आहे आणि प्रत्येक वेळेस हे गाणे अगदी नव्याने ऐकल्याप्रमाणे मनात झिरपत जाते!!  

https://www.youtube.com/watch?v=V5xeOa8Ufv4

No comments:

Post a Comment