Monday 20 July 2015

निसर्गरम्य पहाडी!!

डोंगर उतरणीवरून खाली येताना, मागून चंद्र उगवावा आणि पायाखालची वाट उजळून जावी. आजूबाजूला हिरवी झाडी आणि प्रचंड वृक्षांची साथ असावी आणि बाजूनेच एखादा पाण्याची ओहोळ आपल्या निरव आवाजाने साथ देत असावा. आसमंतात अन्य कुठलाच आवाज नसावा. अशा वातावरणात बहुदा "पहाडी" रागाचा जन्म झाला असावा. अर्थात, निसर्ग आणि प्रदेश याचे ओतप्रोत दर्शन या रागातून सतत झुळझुळत असते. किंबहुना लोकसंगीताशी इतके जवळचे नाते राखणारे जे थोडे फार राग आहेत, त्यात पहाडी राग, फार वरच्या क्रमांकावर आहे. हिरव्या जर्द झाडीतून स्त्रवणाऱ्या आणि त्याला मिळणाऱ्या खळखळणाऱ्या पाण्याच्या नादाशी नाते जुळवणाऱ्या सुरांशी या रागाचे फार जवळचे साहचर्य आहे. मुळात निसर्ग  काहीतरी सुचवित असतो आणि अशावेळी जर का आपण निसर्गाशी जवळीक निर्माण करण्याची इच्छा दाखवली तर निसर्गच जणू, आपल्याला पहाडी रागाचे सूर पुरवित असतो. इतके या रागाचे निसर्गाशी अतूट नाते आहे. 
थोडे तांत्रिक भाषेत लिहायचे झाल्यास, "भूप" रागातील "मध्यम" स्वराला "षडज" मानून पुढे सगळी स्वरावली निर्माण होते. या रागात सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागत असले तरी बरेचवेळा "कोमल धैवत" वापरून, या रागात गंमत आणि वैविध्य निर्माण केले जाते. या रागाचे चलन पाहिल्यावर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते. हा राग मंद्र सप्तकात किंवा शुद्ध स्वरी सप्तकात अधिक खुलतो. अर्थात, लोकसंगीतात बरेचवेळा स्वरांच्या आकृतीबंधाबाबत जसे स्वातंत्र्य घेतले आज्ते तसाच प्रकार या रागाबाबत घडतो. याचा परिणाम असा झाला, चित्रपट गाणी किंवा एकूणच सुगम संगीतात, या रागावर आधारित गाणी भरपूर आढळतात. काही नकलाकार यात "कोमल गंधार" आणि "कोमल निषाद"  वापर करतात आणी या रागाचे सौंदर्य अधिक खुलवून मांडतात. 
इथे आणखी एक मत मांडावेसे वाटते. तसा पहाडी राग "अटकर" बांध्याचा आहे. यमन, मालकंस प्रमाणे याचा विस्तार अफाट पसरलेला नसल्याने, बरेचवेळा हा राग "धून" स्वरूपात ऐकायला मिळतो. याच मुद्द्याला धरून आपण इथे पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी सादर केलेली पहाडी ठुमरी ऐकुया. 


भारतीय संगीतातील जी प्राचीन वाद्ये आहेत, त्यात बासरीचा समावेश होतो. मुळातले हे सुषिर वाद्य, भारतीय रागदारी संगीतात स्थिरावले, ते पंडित पन्नालाल घोष यांनी पण त्याचा जागतिक विस्तार केला तो मात्र पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी. पंडितजींची वाद्यावरील पकड इतकी असामान्य आहे की, ऐकताना माणसाला चक्क गुंगी येते!! इथे त्यांनी जी ठुमरी सादर केली आहे, त्यात, ठुमरीचा नखरा तर आहेच पण त्याचबरोबर सूरांतील हळवेपण देखील लगेच दृग्गोचर होते.सुरवातीची जी आलापी आहे, ती बारकाईने ऐकले तर ध्यानात यावे. पुढे जेंव्हा गत सुरु होते तेंव्हा मात्र एका असामान्य गायकाच्या ठुमरीची आठवण येते. अर्थात, त्या ठुमरीच्या अंगाने जरी वादन झाले असले तरी देखील, त्यात स्वत:चा असा खास विचार दिसतो. सुरवातीच्या समेवरील आलापीनंतर, एकदम "कोमल गंधार" जो लागतो, तो विलक्षण आहे. 

आता, मघाशी मी ज्या असामान्य गायकाची आठवण करून दिली, त्या उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांच्या "तोरे तिरछी नजरिया के पार" या ठुमरीचा आस्वाद घेऊया. 


पतियाळा घराण्याचे अध्वर्यू म्हणून या गायकाचे वर्णन करता येईल. आवाजात थोडासा खर्ज पण तरी वरच्या सप्तकात सहज विहार करणारा गळा!! ठुमरी या गायनाला मैफिलीचा दर्जा देण्यात या गायकाचा महत्वाचा वाटा. खरे तर तीनही सप्तकात या गायकाला लीलया गाता येत असे आणि याचा परिणाम, परिणामकारक ठुमरी गायन. जरा बारकाईने ऐकले तर या गायकाने, ग्वाल्हेर, जयपुर गायकी देखील आत्मसात केल्याचे समजून घेता येईल. 
प्रस्तुत ठुमरी गायनात देखील याच वैशिष्ट्यांचा आढळ सापडेल. गळ्याची लवचिकता, हे खास वैशिष्ट्य सांगता येईल. याचा फायदा असा झाला, गायकीत "अनपेक्षितता" नेहमीच कायम राहिली आणि त्यामुळे गाणे अतिशय रंगतदार झाले. आणखी वेगळेपण सांगायचे झाल्यास, आपल्या शास्त्रात "प्रसादगुण" हे खास वैशिष्ट्य मानले आहे आणि उस्तादांच्या गायकीत याचे ओतप्रोत दर्शन घडते तसेच सरगम, बहुतेक गायकांच्या बाबतीत, तानेचा तांत्रिक आविष्कार अशा स्वरुपाची असते परंतु या ठुमरीत सरगम हही इतकी ओघवती आहे की कुठे ताण संपते आणि परत सुरु होते, याचा सत्कृत्त्दर्शनी पत्ता लागत नाही

हिंदी चित्रपट गीतांत, खैय्यामने जितका या रागाचा उपयोग करून घेतला आहे, तितका इतर कुणी केल्याचे आठवत नाही. पहाडी रागात ज्या कुठल्या भावनांचा आढळ होईल, त्या सगळ्या भावनांचा, त्याने आपल्या गाण्याच्या "तर्ज" बांधण्यासाठी उपयोग केला आहे. प्रणय, विरह, व्याकुळता, आनंदविभोर अवस्था, या सगळ्या छटा त्यांनी आपल्या चालीत गुंफलेल्या आढळतील."जाने क्या धुंढती रहती है ये आंखे  मुझ मे" ही गाणे आपण इथे ऐकू. खरतर हे गाणे म्हणजे अनन्यसाधारण कुवतीची कविता म्हणून देखील आस्वाद घेता येईल. कैफ़े आझमी काय प्रतिभेचा कवी होता, याचे ही कविता, उत्तम निर्देश करता येईल. पहाडी रागात विरहाची अशी भावना देखील दाखवता येते, हे खैय्यामने फार सुंदररीत्या दाखवून दिले आहे.  


गाण्याचे सुरवातीचे शब्दच बघा किती प्रत्ययकारी आहेत. 
"जाने क्या धुंढती रहती है ये आंखे मुझ मे, राख के ढेर मे शोला है ना चिंगारी है"
खरतर सगळी कविता हाच वाचिक अनुभव आहे आणि अशा कवितेला खैय्यामने जो स्वरसाज चढवला आहे, त्याने या कवितेचा आशय अधिक अंतर्मुख होतो. रफीच्या गायकीचा अनोखा आविष्कार आपल्याला ऐकायला मिळतो. गाण्यात कुठेही तालवाद्य नसून, गाण्यात गिटार आणि इतर "धून" वाद्यांनी ताल पुरवलेला आहे त्यामुळे, झाले असे, कवितेवर कुठेही स्वरांचे आक्रमण झाल्याचे दिसत नाही पण तरीही स्वरांनी आपली "जादू" दाखवून दिली आहे. अर्थात, ही किमया सगळी संगीतकार म्हणून खैय्याम यांचीच यांचीच.  

असेच एक गाणे, कविता म्हणून फार अर्थपूर्ण आहे. जावेद अख्तरची ही कविता आहे. खरतर हे गाणे वाचताना, चित्रपटासाठी हे गाणे लिहिले आहे, हे वाटतच नाही. साधारणपणे, गाण्यातली शब्दरचना, ठराविक "मीटर" मध्ये लिहिलेली असतात, ज्यायोगे संगीतकारांना चाल बांधण्यास अवघड होऊ नये. 


सिलसिला चित्रपटातील हे गाणे अतिशय श्रवणीय आहे. "नीला आसमान सो गया" संगीतकार शिव-हरी या जोडगोळीने फारसे चित्रपट केले नाही पण, तरीही ह्या गाण्यासारखे चिरस्मरणीय गाणे मात्र दखल घेणारे निर्माण केले. 

याच रागात अशीच एक चिरस्मरणीय रचना ऐकायला मिळते. मुळात मेहदी हसन यांचे गायन, हाच श्रवणानंद असतो. उर्दू शायरी जरी गेयातापूर्ण असली तरी प्रत्येक शायरीबद्दल हेच म्हणता येणार नाही पण, या गायकाचे खास विशिष्ट्या असे, गाताना, समजा कवितेत असा शब्द आला, तर तिथे गायकी " मुडपून"घेण्याची तयारी दाखवत आणि शब्दांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेत असत. 


मेहदी हसन साहेबांची खासियत अशी आहे, ऐकताना सहज, सोपे वाटणारी गायकी, कधी अवघड वळणाकडे जाते, त्याचा लगेच पत्ता लागत नाही. "बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसे" हीच ती रचना आहे. पहाडी रागात आहे पण, रागातील अवघड हरकतींना पूर्ण फाटा  देऊन,अर्ध्या ताना घेणे, किंवा एखादी हरकत इतकी जीवघेणी घेतात की, ऐकताना आपण स्तिमित होऊन जातो. अत्यंत मुलायम आवाज, साधारणपणे मंद्र सप्तक किंवा शुद्ध स्वारी सप्तकात गायकी ठेवायची आणि लिहिलेल्या शायरीला पूर्ण न्याय द्यायचा, हीच त्यांची नेहमी भूमिका राहिली. पहाडी रागाचे इतके विलोभनीय रूप इतर गाण्यांत फार तुरळक आढळेल. 
आता मी इथे, आणखी काही गाण्यांच्या लिनक्स देत आहे, ज्यायोगे या रागाच्या आणखी छटा आपल्याला समजून घेता येतील. 

१] परबतो के पेडो पार शाम का बसेरा है 

२] जो वाद किया वो निभाना पडेगा 

३] सहज सख्या एकटाच येई सांजवेळी 

४] फुलले रे क्षण माझे फुलले रे 

No comments:

Post a Comment