Monday 20 July 2015

"त्रिधा राधा" निमित्ताने

शृंगार आणि स्त्री म्हटली की मराठी मन, कितीही पुढारलेले असले तरी कुठेतरी बुजते. आपण आपल्या मनाला तशी शिकवण घालून घेतलेली आहे.  केवळ मनातल्या मनात करायचे आणि कितीही "उबळ" आली तरी अत्यंत त्रोटक भाषेत त्याचा उल्लेख करायचा!! आधुनिक काळात, विशेषत: कवितेच्या माध्यमातून, स्त्री आणि स्त्री मन, याचा शृंगाराच्या दिशेने अतिशय मोकळा, आविष्कार पु.शि. रेग्यांनी केला. त्यांच्याइतकी "अम्लान" कविता मराठीत फारच तुरळक आढळते. स्त्री या व्यक्तीची "स्त्री" म्हणून ओळख करून देताना, सौंदर्यवादी दृष्टीकोन आत्मसात करून, मराठी माणसाला अधिक "मोकळे" केले आहे. "दुसरा पक्षी", "पुष्कळा", "दोला" किंवा "गांधारेखा" या सगळ्याच कविता संग्रहातून, प्रामुख्याने दर्शन घडते, ते "स्त्री" चे आणि जे दर्शन घडते, ते अत्यंत रसपूर्ण, सकस असे घडते. 
मुळात कविता ही नेहमी काही संकल्पनेतून घडत असते आणि व्यक्त होते, ती शब्द माध्यम हाताशी घेऊन. आशयाची  व्याप्ती,सखोलता, तरलता हे सगळे आवश्यकच असते पण, ते सगळे गृहीत धरावे लागते आणि त्याचीही जाणीव व्हायची, ती  अखेर शब्दांच्याच द्वारे!! आशय गृहीत धरल्यावर पुढे काय घडले, हे महत्वाचे आणि तिथे भाषेला सामोरे जावे लागते. जोपर्यंत आशय हा पूर्णपणे भाषेतून वेढला  आहे, प्रत्येक शब्द,हा "शब्द" होऊन आला आहे, अभिव्यक्तीचे हेच रूप अपरिहार्य आहे आणि आशयाला वेढून घेताना माध्यमाच्या सगळ्या शक्ती पणास लागल्या आहेत, असे जोपर्यंत जाणवत नाही, तोपर्यंत "कविता" पूर्णपणे सिद्ध होत नाही!!
"रेषा…. 
मिळत्या, उलगडत्या,
अधिकाधिक उमजवित्या, 
उमजत्या,
अबाखल सांखळत्या, मोकळ्या 
हलके हिंदोळत्या,
लवचिक गिरकींत 
घन संयत खेळवित्या,
भरलेपण भरहर्षे 
भोगवित्या…"
वरील विवेचनाला आधार म्हणून, मला ही कविता आठवली. कविता वाचताना, शब्दाचे रूप, आकार, आणि त्यातून प्रत्ययास येणारी भाषा, याचे हेच स्वरूप अपरिहार्य आहे का? यापेक्षा वेगळा आविष्कार शक्य नाही का? वापरलेल्या शब्दांपैकी तिथे दुसरा शब्द चालू शकला असता का? या सगळ्या प्रश्नांना ज्या कवितेत पूर्णविराम मिळतो, तिथे कवितेचे सकसपण सिद्ध होते, असे मला वाटते. 
ही कविता, सर्वस्वाने रेग्यांची आहे, तिचा तोंडावळा निराळा आहे, अंगकाठी निराळी आहे पण तरीही ते सगळे त्या कवितेचे आणि पर्यायाने रेग्यांचे आहे. रेग्यांची कविता वाचताना, नेहमी असेच वाटत राहते, या " पिंड" ओळखला आहे. या कवितेचा स्थायीभाव हा रतिक्रीडा आहे आणि त्या रतीक्रीडेचे लक्ष्य केवळ स्त्री शरीर आहे. सगळी कविता साकल्याने वाचताना, त्याच्यात सतत दिसणाऱ्या आशयात जाणवत राहते ते, स्त्रीरूपाबद्दलच्या विलक्षण अशा संमोहनाचे. 
"तापल्या सोन्यासारखी 
रसरशीत ती कांती 
तिथे कशी ग फुलली 
फिकी पिवळी शेवंती?" 
या रतीक्रीडेला प्रकृतीच्या दुसर्या आविष्काराशी काहीही देणेघेणे नाही. 
सामान्यत: कवीला कुठलाही अनुभव हा प्रथम बहुदा अस्पष्ट, अमूर्त, धुसर असा जाणवतो आणि त्याला रूप देण्याच्या, शब्दांकित करण्याच्या प्रयत्नातून तो अधिकाधिक स्पष्ट, आरेखित, मूर्त होत जातो. योग्य आणि नेमके शब्द सापडत जातात आणि ती मूर्ती भरीव होत जाते!! पण, हा झाला सर्वसामान्य अनुभव!! रेग्यांची कविता वाचताना, नेमका उलट अनुभव येतो. शब्दातून रतीक्रीडेचे कुठले तरी "अंग" जाणवत असताना, एखादा शब्द आणि त्यातून येणारा अनुभव, त्या रसरशीत अनुभवाचा आशय असे सगळे आकारीत होत आहे, असे जाणवते!!
अर्थात, इथे मी हे सगळे लिहित आहे, ते ही कविता वाचताना, माझ्या मनावर झालेल्या संस्काराच्या तसेच अनुभवाच्या आधारे. कुठलीही निर्मितीक्रिया ही नेहमीच अर्धुक, धुसर अशीच असते. आपण फक्त तर्काच्या आधारे त्याची व्याप्ती जाणू शकतो. ही कविता शृंगारिक असली तरी चाळवणारी, उथळ वाटत नाही. It is a peculiarly non-erotic eroticism!! जो अनुभव, खजुराहो, कोणार्क इथल्या लेण्यांतून मिळतो, त्याचीच कविता होते!! 
ही कविता वाचताना, मनावर नेहमी परिणाम होतो, तो अत्यंत अनुरूप अशा शब्दांचा, शब्दांच्या योजनेचा, अभिव्यक्तीच्या घडणीचा, बांधणीचा. इथे कविता शब्दांच्याच आधारे अस्तित्वात येते, वाढते आणि शेवटचा ठसा उमटतो, तो देखील शब्दांचाच!! चांगल्या अभिव्यक्तीचा एक विशेष असतो आणि तो म्हणजे, तिचे स्वतंत्र अस्तित्वच भासू नये.  आशयात विलीनत्व, हेच अंतिम सत्य!! 
"त्रिधा राधा" या त्यांच्या अतिशय अप्रतिम कवितेच्या आधारे, आपण, पुढला विचार करूया. 
"आकाश निळे तो हरी,
अन एक चांदणी राधा ---
बावरी 
युगानुयुगींची मन-बाधा,

विस्तीर्ण भुई गोविंद 
अन क्षेत्र साळीचे राधा ---
संसिद्ध 
युगानुयुगींची प्रियंवदा,

जलवाहिनी निश्चल कृष्ण, 
घन झुकले कांठी राधा ---
विप्रश्न 
युगानुयुगींची चीर-तंद्रा. 

इथे बघा, आशयाची घनता दर्शवताना, क्रियापदांच्या वापरातून ज्या अंधुक गतिशिलतेचे सूचन आशयाला मिळाले असते, परंतु इथे क्रियापद अजिबात नाही!! राधाकृष्णाच्या ३ भावबंधाची रूपे. पहिल्या कडव्यात नाते जाणवते, दुसऱ्यात अत्यंत निकट अशा समिपतेचे तर तिसऱ्यात जवळ येऊनही किंचित दूर होऊन न्याहाळणारे!! हे सगळे देखील आपल्याला जाणवते, ते एखाद दुसऱ्या प्रतिमेतून.  सगळी कविता ही जवळपास स्थिरचित्रण वाटावे अशा स्वरूपाची आहे तरीही अंतर्गत मनोरुपांचे मनोहारी चित्रण!! "आकाश निळे", "चांदणी राधा". पुढील कडव्यात, राधेची भावस्थिती दर्शविताना मिळणारे "क्षेत्र  साळीचे". इथे हाच शब्द योग्य आहे. एक गंमत आठवली, उर्दू भाषेत स्त्री केसांना "गेसू" म्हणतात आणि तिथे येणारी "महेक" ही "गेसू" याच शब्दाने परिणामकारक होते. या शब्दांभोवती जो अनुभव, संस्कार याची सांगड घातलेली असते, तिथे त्याच शब्दाने अभिव्यक्तीची पूर्तता होते. तिथे दुसरा कुठलाच शब्द संभवत नाही, किंबहुना संपूर्ण उपरा ठरतो. या साळीच्या क्षेत्राने, शब्दांच्या नादात झुकण्याची, लवण्याची, डोलण्याची सूचना, कुठल्याच दुसऱ्या शब्दाने आली नसती. 
या कवितेत, प्रत्येक कडव्यातील दुसऱ्या ओळीनंतर येणाऱ्या थोड्या थांबण्याचा क्रियेतून, ही विशेषणे अधिक अर्थवाही होतात. मराठीत, पुराणकाळातील व्यक्तींना दोनच कवींनी कायमचे चिरस्थान प्राप्त करून दिले आहे. १] त्रिधा राधा आणि २] कुब्जा (इंदिरा संत) या कवितेतून जे भावदर्शन घडते, ते केवळ अपूर्व असे आहे. 
रेग्यांच्या कवितेत "प्रतिमा" ही अशाच सर्वस्वी अंत:केंद्रित होऊन येतात. कधी,कधी एखादे कडवे, एखादी ओळ तर कधी दोन शब्दांमधील अंतर, इतक्या पूर्णपणे अनुभवाच्या रूप,रंग,नाद इत्यादी घटकांशी एकरूप होते  त्यातूनच प्रतिमेची गुणवत्ता सिद्ध होते. 
"पहुडली जरा ही स्वस्थ 
चोरुनी अंग सत्वस्थ,
    बिलगेलहि लगबग…. जळी 
    उसळते जशी मासळी."
आता यामध्ये दोन ओळींतील शेवटच्या शब्दांचे ("स्वस्थ", :सत्वस्थ") ध्वनी ओढलेले आणि "लगबग" नंतर एक विराम येतो आणि यातून मासळीच्या उसळीतील अनपेक्षितता प्रत्ययास येते. 
कवितेत प्रतिमेचे घटक अनेक असतात आणि ते एकमेकांशी आणि केंद्राशी घट्टपणे बांधलेले असतात. 
"पक्षी जे झाडावर गाणे गातो 
    आहे झाडच दुसरे पुन्हा त्या गाण्यात 
    पक्षी जे झाडावर गातो. 

झाडावर जे गाणे पक्षी गातो 
    आहे पक्षी दुसरा गाण्यांतच त्या पुन्हा 
    झाडावर जे पक्षी गातो."

वैदिक ऋचांच्या मंत्रध्वनीत ओढलेले स्वर, उच्चारात विशिष्ट ठिकाणी दिलेला आघात आणि काही स्वरांवरून घसरणे या सर्वांना रेग्यांच्या कवितेत अंगभूत महत्व असते. 
"तुझ्या उभार वक्षाची 
नेहमीची ती थोरवी 
नाहीं पटतच होतां 
    शेजेवर तू आडवी"

वर वर  पहात,अत्यंत शृंगार सूचक अशी ही कविता पण इथे असं लक्षात येतें की या अनपेक्षित आणि चावत खेळाचे दोन भाग आहेत. मनाची "थोरवी" वगैरे ठीक आहे पण उभार वक्षाची "थोरवी" हा परिचित शब्द एकदम इतक्या अनपेक्षित संदर्भात येतो की  कल्पनाच आडव्या होतात!! 
"लिलीची फुलें 
  तिने एकदां 
चुंबिता, डोळां
   पाणी मी पाहिलें. 

लिलीची फुलें 
   आतां कधिही 
     पाहतां, डोळां 
        पाणी हें सांकळे."

शब्दांच्या अशा उपयोगांत "Less is More" हे पटते. मोजकेच शब्द पण तरीही अत्यंत वेगळा आशय, शब्दांशी खेळणे, शब्द नव्या नजरेतून न्याहाळणे इत्यादी खास वैशिष्ट्ये या कवितेची सांगता येतील. 
भावनाशयाचा स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे प्रवास सुरु झाला आहे. कवितेतील भाववृत्तीची जाणीव अगदी निराळ्या पातळीवरची आहे, इतकी की कवितेसंबंधी लिहिताना भाववृत्तीचे वर्णन  आले  जाणवण्यासारखे नाही. प्रतिमेच्या जाणीवेतून अनुभव, तो अनुभव हीच भाववृत्ती. इथे संवेदना कल्पनास्वरूपात नसून, संवेदना हाच अनुभव आहे. रेग्यांची भावकविता ही अशा प्रकारे मनाला आकळत जाते.    

No comments:

Post a Comment