Monday 20 July 2015

आश्वासक जयजयवंती

मुळात भारतीय संगीत हे नेहमी(च) शांतीचा प्रसार करणारे, भक्तिमार्गाकडे नेणारे तसेच मनाचे उन्नयन करणारे आहे. या संगीतात, उथळ वृत्ती, भ्रमर वृत्ती याचा समावेश जवळपास नाही आणि याचा परिणाम असा झाला, भारतीय संगीत हे नेहमीच, लोकानुनयाचा मार्ग न स्वीकारता, काहीसे खडतर पण चिरस्थायी परिणाम देणारे संगीत झाले. खरतर, पहिल्याप्रथम दर्शनी रागदारी संगीत आवडेल, असे काही या संगीतात लगेच आढळत नाही. त्यासाठी, सतत ऐकण्याची सवय ठेवावी लागते. अर्थात, एकदा का या संगीताची गोडी लागली (सुरांची "आस" लागली) की मग, खऱ्याअर्थाने भारतीय संगीताचा  येतो.
 आपण सगळेच दिवसभर सतत, अविश्रांतपणे कामात अडकलेले असतो. सतत धावपळ, डोक्यावर "टेंशन" आणि कसेही करून आयुष्य पुढे रेटायचे किंवा अधिक सुखकर बनवायचे, ह्याच ध्यासाने पछाडलेले असतो. अगदी जेवणासारखी प्राथमिक बाब देखील, आपण "उरकून" टाकतो!! मनाला विश्रांती म्हणून द्यायला तयार नसतो आणि अशा वेळेस, रात्रीची जेवणे आटोपून, मनाला किंचित विसावा मिळावा म्हणून घराच्या एका कोपऱ्यात निवांत बसण्याचा प्रयत्न करीत असतो. अशाच वेळी, कानावर "जयजयवंती" रागाचे सूर यावेत आणि मन हलके होऊन, पिसाप्रमाणे तरंगायला लागते. सुरांची ही जादू खरच विलक्षण म्हणायला हवी. 
दोन्ही गंधार(कोमल आणि शुद्ध) तसेच दोन्ही निषाद, यांच्या सहाय्याने सगळ्या सुरांना सामावून घेणारा हा "संपूर्ण/संपूर्ण" जातीचा राग फार विलक्षण गारुड मनावर टाकतो. या रागातील हे जे दोन "कोमल" स्वर आहेत, तेच आपल्या पाठीवर आश्वासकतेचा हात फिरवतात. हा सगळा राग अतिशय मृदू, कोमल स्वरांनीच वेढून टाकलेला आहे. तसे बघितल्यास, या रागात, रागाचे म्हणून जे सगळे "अलंकार" आहेत, त्याचा संपूर्ण आढळ होतो पण, एकूणच प्रकृती ही आश्वासकतेकडे झुकणारी, एखादा मित्राने पाठीवर हात टाकून, विश्रब्ध मैत्रीचा विश्वास दर्शविणारी!!  
मनाला विसावा देण्याच्या मनस्थितीची ओळख आपण आता पंडित हरिप्रसाद चौरसिया, यांच्या बासरी वादनातून अनुभवूया. 


मृदुतेचा परिपूर्ण अनुभव देणारे हे वादन. सुरवातीपासून, नेहमीच्या धाटणीने "ठाय" लयीत सुरु झाले आहे. सुरांच्या पहिल्याच आवर्तनात, आपल्याला "कोमल" गंधाराची ओळख पटवून देते. रिषभ सुरावरून दोन्ही गंधारावर जशी लय झुकते, तिथे आपल्या जयजयवंती रागाची खूण पटते. इथे आपल्याला प्रत्येक सूर आणि त्या सुराच्या चलनाचा आनंद घेता येतो. प्रत्येक सूर कसा "अवतरतो" आणि आपले अवतरणे सिद्ध करताना, आपल्या बरोबर इतर सुरांना कसा सोबतीने घेऊन येतो, हेच ऐकण्यासारखे आहे. 
ही रचना आपल्या ऐकताना, आपल्याला सहज समजून घेता येईल. मी मुद्दामून अतिशय संथ लयीत चालणारी रचना घेतली आहे जेणेकरून, आपल्याला रागातील स्वरांचे स्थान, त्यांचे विहरणे आणि परत पुन्हा घरट्यात परतणे, आपल्याला किती समृद्ध करून जाते, हे सहज समजून घेत येईल. सगळी रचना आलापी आणि शेवटाला द्रुत लयीत गेलेली आहे परंतु जर का आलापी बारकाईने (बारकाईने ऐकणे, ही तर भारतीय संगीताची मुलभूत "अट" आहे!!) ऐकली तर पुढील द्रुत लयीतील रचना ऐकणे आणि त्याचा मन:पूत आनंद घेणे, हा विश्रब्ध आनंदाचा भाग ठरेल. आणखी एक मजा या रचनेत आहे, रचना जरी द्रुत लयीत शिरली असली तरी, केवळ द्रुत लयीत आहे म्हणून तानांचा पाउस नाही तर आलापीमध्ये स्वरांचा जो विस्तार केलेला आहे, तोच "तोंडवळा" कायम ठेऊन, फक्त त्रितालात रचना बांधलेली आहे, त्यामुळे आधीच केलेली आलापी अधिक भरीव आणि परिपूर्ण होते. 

आता आपण, गुलाम अली साहेबांची "दोस्त बन कर भी नही साथ निभानेवाला" ही या रागाची ओळख वेगळ्या पद्धतीने करून देणारी गझल ऐकू. गझल गायकीत, ठुमरी रंगाचा अत्यंत यशस्वी वापर करून तशी गायकी रुजवणारा हा गायक. 


गायकाचा गळा जर तयार असेल तर तो रागाची ओळख किती चटकन आणि समर्थपणे करून देतो, हे इथे ऐकण्यासारखे आहे. जयजयवंती रागातील कोमल गंधार स्वराचे महत्व आपण वर बघितले आहे, त्याचाच अत्यंत सुंदर आविष्कार इथे ऐकायला मिळतो. सुरवातीच्या "आकारा"नंतर लगेच "नि सा रे" या स्वरावलीनंतर ग(कोमल)" किती अप्रतिम लावला आहे. रिषभ स्वरावरून गंधार स्वरावर येताना, स्वरांत जी "उतरंड" घेतली आहे आहे आणि त्या स्वराचा नाजूक स्वभाव दर्शवला आहे, तेच खरे ऐकण्यासारखे आहे. खरे तर त्यांनी संपूर्ण सप्तक घेतले आहे आणि त्यातून रागाचा आवाका दाखवला आहे आणि हे देखील किती सहज, कसलेही आडंबर न घेता दाखवले आहे. तसे बघितले तर गुलाम अलीची गायकी "अवघड" म्हणावी अशी असते. कुठलीही तान, सरळ रेषेत न घेता, वक्रोक्तीने घ्यायची असा अगदी अट्टाहास वाटावा, इतका आग्रह दिसतो परंतु इथे मात्र रागाची प्रकृती ओळखून, रचना मृदू स्वभावात गायली आहे.

मन्नाडे हा गायकाने अशीच अफलातून चीज "देख कबीरा रोया" या चित्रपटात गायली आहे. मदन मोहन यांची रचना, जयजयवंती राग आणि मन्नाडे यांचे गायन, तेंव्हा गाणे श्रवणीय झाले नसल्यास काय नवल!! 


ध्वनीशास्त्राच्या तंत्रानुसार मन्नाडे इतका अप्रतिम आवाज, हिंदी चित्रपट संगीतात झाला नाही, असे विधान सहज करता येईल. सगळ्या सप्तकात अत्यंत मोकळेपणी फिरणारा गळा, तानेला कुठेही अटकाव नाही आणि कुठल्याही प्रकारच्या गाण्याला योग्य तो आवाज पुरवण्याची असामान्य क्षमता, या गायकाच्या गळ्यात होती. दुदैवाने, शास्त्रीय गीते(च) गाऊ शकणारा गायक, असे "लेबल" नावावर चिकटले आणि तीच ओळख अखेरपर्यंत राहिली!! 
अर्थात प्रस्तुत गाणे, सरळ सरळ जयजयवंती रागावर आधारलेले आहे तरीही चित्रपटातील गाणे आहे, याचे भान राखून रचना बांधलेली आहे. संथ, ठाय लायोत झालेली गाण्याचे सुरवात, पुढे सहजपणे द्रुत लयीत शिरते पण तरीही गाण्याची "बंदिश" होऊ न देण्याची काळजी, गायक आणि संगीतकाराने घेतलेली आहे. अगदी पहिलीच ओळ, "बैरन हो गयी रैन" गातानाच आपल्या समोर हा राग स्पष्ट उभा राहतो. पुढे गाण्यात, द्रुत लयीतील ताना आहेत, सरगम आहे पण तरीही गाणे चित्रपटातील आहे. या तानांची "जातकुळी" बघितल्यावर, या गायकाच्या श्रेष्ठत्वाची साक्ष पटू शकते. 

श्रीनिवास खळे आणि आशा भोसले यांनी तशी तुलनेने कमी गाणी गायली आहेत परंतु त्यातील प्रत्येक गाणे म्हणजे भावगीतातील वेचक दृष्टी आहे. इथे आता आपण, असेच एक सुंदर भजन ऐकुया. "अजि मी ब्रह्म पाहिले". हेच ते गाणे. 

एकतर खळेसाहेबांच्या रचना या नेहमीच अवघड असतात - ऐकायला श्रवणीय वाटतात परंतु गायला घेतल्यावर त्यातील "अवघड" जागा दिसायला लागतात. रचना गायकी ढंग दाखवणारी आहे आणि अशी रचना गायला मिळाल्यावर, आशा भोसले यांचा गळा काय अप्रतिम खुलून येतो. इथे आपण एक गंमत करुया. या गाण्याची सुरवात जरा बारकाईने ऐकुया आणि वरती, मी दिलेली पंडित हरिप्रसाद चौरासिया यांची रचना ऐकुया. पंडितजींच्या सुरवातीच्या आलापित, या गाण्याच्या चालीचे "मूळ" सापडेल. अर्थ एकच, एकाच रागातील रचना असल्यावर त्यात कशाप्रकारे साद्धर्म्य सापडते. 
गायकी ढंगाची चाल मिळाल्यावर, ही गायिका गळ्यात किती वेगवेगळी "वळणे घेते बघा. सुरवातीची ओळ - "अजि मी ब्रह्म पाहिले" किती वेगवेगळ्या अंगाने गायली आहे आणि प्रत्येक वेळेस समेवर येताना, स्वरिक वाक्यांश किती विलोभनीय पद्धतीने आला आहे. गाण्यात पारंपारिक भजनी ठेका आहे परंतु खरी गंमत चालीच्या बांधणीत आहे. अचूक शब्दोच्चार, शब्दांना जोडून येणाऱ्या हरकती, क्वचित ताना, आणि त्यामुळे त्याच शब्दांना मिळणारा वेगळा अर्थ, या सगळ्या अलंकारांनी हे गाणे अधिक श्रवणीय झाले आहे. 

आता मी इथे काही गाण्याच्या लिंक्स देत आहे, ज्या योगे हा राग आपल्या अधिक चांगल्याप्रकारे समजून घेता येईल. 

मन मोहना बडे झुटे 

ये दिल कि लगी कम क्या होगी 

Attachments 

No comments:

Post a Comment