Monday 20 July 2015

दयार्द्र पिलू

आदल्या रात्रीच्या जागरणाने डोळ्यांवर गुंगी यावी पण झोप दूर असावी, आसमंत निरव शांत असावा, आकाश निरभ्र असावे आणि कानावर "पिलू" रागाचे स्वर यावेत!! आपोआप डोळे मिटण्याची क्रिया सुरु होते. पिलू रागच असा आहे,, स्वर ऐकताना मनावर गुंगीचे साम्राज्य पसरते. "रिषभ" वर्जित स्वर (आरोही सप्तकात) परंतु "गंधार","मध्यम" आणि "निषाद" दोन्ही प्रकारे लागतात. "धैवत" स्वराचा किंचित वापर. शास्त्रात हा राग "औडव-संपूर्ण" असा दर्शविला आहे आणि तो केवळ, या "धैवत" स्वराच्या स्पर्शाने!! "गंधार" आणि "निषाद" हे वादी-संवादी स्वर. अर्थात हा झाला रागाचा  तांत्रिक भाग. रागाचे स्वर आणि लिपी कितीही अर्थवाही असली तरी त्याला एक ठराविक मर्यादा असते. म्हणजे ज्यांना स्वरज्ञान आहे, त्यांनाच ही भाषा समजून घेता येते अन्यथा इतरांना ही भाषा अगम्य असते. खरतर पिलू रागाचे "टेक्श्चर" बघायला गेले तर इथे प्रणय, करुणा, भक्ती समर्पण इत्यादी सगळ्या भावनांचा कल्लोळ ऐकायला मिळतो. 
गमतीचा भाग असा आहे, हा राग फारसा मैफिलीत गायला जात नाही म्हणजे जसे यमन, भूप हे राग सलग तासभर आळवले जातात, तशा प्रकारचे सादरीकरण या रागाचे होत नाही, बहुतांशी, ठुमरी, दादरा, होरी अशा उपशास्त्रीय संगीत प्रकारातून हा राग मांडला जातो. अर्थात, चित्रपट गीत आणि भावगीत, यांत मात्र अपरिमित पसरलेला आहे. 


बेगम परवीन सुलताना यांची एक रचना इथे ऐकता येईल. बेगम साहिबांचा आवाज म्हणजे तानेला कुठेही अटकाव म्हणून नाही. तरीही तार सप्तकात अधिक आनंद घेणारी गायकी. ज्या सहजतेने, ताना आणि त्याच्या जोडीने हरकती येतात, ते खास ऐकण्यासारखे आहे. एकतर तार स्वरात जाणे, हीच गळ्याची एक कसोटी मानली जाते पण इथे तर, तार स्वरात जाताना आणि तिथे ठेहराव घेताना, त्यालाच जोडून एखादी हरकत घेण्याची असामान्य करामत करण्याची क्षमता थक्क करते. या रागात आणखी एक मजा आढळून येते. मैफिलीत हा राग, फारसा गायला जात नाही, वादक मात्र वाजवताना आढळतात. 


इथे आपण उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांची या रागातील एक रचना ऐकुया. उस्तादांचा लडिवाळ स्वर तसेच सगळ्या सप्तकात सहज फिरणारा गळा, त्यामुळे ही रचना केवळ संस्मरणीय झाली आहे. क्षणात मंद्र सप्तकात तर पुढल्या क्षणी तार सप्तकात जाउन, परत समेवर ठेहराव घेण्याची पद्धत तर लाजवाब!! "सैय्या बोलो" ही रचना म्हणजे पिलू रागाची ओळख, इतकी प्रसिद्ध रचना झाली आहे, ती काही उगीच नव्हे. उस्तादांच्या गायकीची सगळी वैशिष्ट्ये या सादरीकरणात ऐकायला मिळतात. या रचनेतील, हरकती तर इतक्या विलोभनीय आहेत की प्रत्येक वेळेस, फार बारकाईने ऐकाव्या लागतात. तेंव्हाच स्वरांचा "डौल" समजून घेता येतो. "पतियाळा" घराण्याची सगळी सगळी "खासियत" या गायनातून स्पष्टपणे ऐकायला मिळते. 


आत्ता मी जे गाणे इथे टाकले  आहे,ते एकूणच "पिलू" रागाच्या स्वभावात बसणारे नाही. खरतर हेच खासियत, सुगम संगीताची आहे. रागातील एखादी हरकत,  एखादा स्वर, संगीतकाराला नेमका भावून जातो आणि गाण्याची "तर्ज" निर्माण होते. त्यामुळेच गाण्याची चाल आणि त्याचे "मूळ" शोधणे, बरेचवेळा आवाक्याबाहेरचा शोध होतो. मुळात, मन्ना डे यांचा अत्यंत सुरेल स्वर आणि त्याला मिळालेली कव्वालीबाजाची चाल. त्यामुळे हे गाणे फारच सुरेख जमून गेलेले आहे. गाण्याच्या पहिल्या हुंकारापासून हे गाणे सुंदरपणे "चढत" जाते. प्रत्येक स्वर खणखणीत, सुरेल आणि योग्य त्या शब्दावर अचूक वजन, त्यामुळे कव्वाली असली तरी अतिशय खेळकर रचना होऊन जाते. 


लगान चित्रपटातील गाणे आहे. गाण्याचा बाज, लोकसंगीतावर आधारित आहे. तसे थोडे बारकाईने बघितले तर, पिलू रागात, चैती, ठुमरी, होरी किंवा पुरबी सारख्या असंख्य रचना ऐकायला मिळतात. एका दृष्टीने बघितल्यास, चैती, पुरबी किंवा होरी, ह्या सगळ्या उत्तर भारतातील लोकसंगीतातून पुढे शास्त्रीय स्वरूपात, स्थानापन्न झालेल्या आहेत. त्यामुळे, पिलू रागात, या रचनांचा "मूलस्त्रोत" सापडणे साहजिक आहे. अर्थात, गाण्याची चाल रेहमानची आहे आणी अर्थात, त्याच्या प्रकृतीनुसार गाण्याची  बांधणी केली आहे. सुरवातच लोकसंगीताच्या आधारावर झाली आहे. गाण्यात, रेहमान, अलका याज्ञिक, उदित नारायण, सुखविंदर सिंग, शंकर महादेवन असे दिग्गज आवाज आहेत. गाण्याच्या पहिल्या अंतऱ्यानंतर पिलू रागाची सावली ऐकायला मिळते. 
गाणे केरवा तालात आहे पण तालाचे वादन अगदी अनोखे आहे. वास्तविक आपण, भारतीय ताल म्हणजे पारंपारिक तबला नजरेसमोर ठेऊन अदमास घेत असतो परंतु संगीतकार , जर व्यासंगी, अभ्यासू असेल तर, गाण्यात वेगवेगळे प्रयोग करत असतो आणि या गाण्यात रेहमानचे हेच वैशिष्ट्य ऐकायला मिळते. साधारणपणे समूह गीत म्हटले की वैय्यक्तिक गायकीला अवसर कमीच मिळतो पण इथे संगीतकाराने त्याची योग्य ती काळजी घेतली असल्याने गाणे श्रवणीय होते. 


पिलू रागातील हे आणखी असेच आनंददायी गाणे. चित्रपटातील प्रसंग ध्यानात घेऊन, त्यानुरूप गाण्याची रचना  करण्यात, जे फार थोडे संगीतकार आहेत, त्या यादीत एस. डी. बर्मन यांचा  क्रमांक लावावा लागेल. विशेषत: हाती असलेली चाल, फुलवायची कशी याचे असामान्य भान या संगीतकाराकडे होते त्या दृष्टीने, हा  संगीतकार,हाडाचा चित्रपट गीतांचा संगीतकार होता, असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये. आता हेच गाणे बघूया. सुरवातीला किती लडिवाळ आलाप आहे आणि त्यातूनच पिलू रागाचे सूचन होते. पुढे चाल वेगळी सरते आणि स्वतंत्र जन्म घेते, हा भाग वेगळा. गाण्यातील सतारीची गत देखील फार वेधक आहे. गाणे तसे मध्य लयीत सुरु होते पण, पुढे चाल विस्तारित होताना, लय देखील जलद होते आणि पार्श्वभागी असणारा वाद्यमेळ देखील. अर्थात असे कितीही वेगवेगळे बदल झाले तरी समेवर येताना, जो सूर पकडून गाणे परतते, तो भाग विलक्षण सुंदर आहे. 

आता पर्यंत आपण या रागाची अनेक रूपे बघितली, काही रागाच्या स्वरावलीशी थोडे फटकून तरीही श्रवणीय रचना ऐकल्या. या लेखाच्या सुरवातीला, मी म्हटले होते, या रागाचे स्थूल स्वरूप हे शांत, रमणीय असे आहे. प्रणयी भावना या रागात फार खुलून येते. अशीच अतिशय शांत आणि केवळ अजोड रचना म्हणावी, असे एक गाणे ऐकणार आहोत. ही गाणे म्हणजे हिंदी चित्रपट संगीतातील अंगाईगीतातील "मानदंड" आहे आणि आज इतकी वर्षे झाली तरीही या गाण्याची खुमारी रतिभर देखील ओसरत नाही. गाण्यातील, लय, गोडवा इतका अश्रूत आहे की, आपणही या गाण्यात कधी गुंगून जातो, याचा पत्ताच लागत नाही. 


"धीरे से  आजा री अखियन मी निंदिया" हेच ते अजरामर गाणे. या गाण्याचा ठेका - दादरा आहे पण, तालाचे बोल आणि वापर किती वैशिष्ट्यपूर्ण आहे बघा. अंगाईगीत आहे तेंव्हा गाण्याचा ताल देखील डोक्यावर हळुवार थोपटल्यासारखा आहे, जेणे करून झोपी जाणारी व्यक्ती विनासायास झोपेच्या आधीन होईल. गाण्याचे शब्द देखील सहज, सुंदर, कुणालाही कळण्यासारखे आहेत. "निंदिया" आणि "निन्दियन" या शब्दातील श्लेष बघण्यासारखा आहे. पिलू राग किती अप्रतिम आहे, याचे हे गाणे म्हणजे अप्रतिम उदाहरण ठरेल. तसे पाहिले तर, पिलू रागाचे स्वर, चलन हे, या गाण्यापासून फारकत घेणारे आहे पण तरीही नाते जोडणारे आहे. चाल, गायन, वाद्यमेळ या सगळ्याच दृष्टीने हे गाणे अभ्यासनीय आहे. 
लेखाच्या सुरवातीला, मी झोपेच्याच अंगाने चार शब्द लिहिले आणि आता, अशाच असामान्य अंगाईगीताने, या लेखाचा समारोप करणे योग्य ठरेल. 
पिलू रागात आणखी काही सुंदर गाणे आहेत. त्याच्या लिंक्स खाली देत आहे. 

१] अब के बरस भेज 

२] चंदन का पलना 

३] मैने शायद तुम्हे पहले भी कभी 

No comments:

Post a Comment