Monday 20 July 2015

चुनरी संभाल गोरी



हिंदी चित्रपट गीतांत, भारतीय लोकसंगीताचा वापर आणि प्रयोजन, याला तशी  परंपरा आहे. चित्रपटात गाण्यांचा अंतर्भाव व्हायला लागला आणि चित्रपट गीताने लोकसंगीताची कास धरल्याचे समजून घेता येते. अर्थात, लोकसंगीत आणि त्याचा जन्म, याचा नेमका ठावाठिकाणा जाणून घेणे केवळ अशक्य. बऱ्याचवेळा असे वाचनात येते, रागदारी संगीत अस्तित्वात नव्हते, त्या काळापासून लोकसंगीत प्रचलित आहे. याचा अर्थ, लोकसंगीताला काही शतकांची परंपरा आहे, हे नक्की. तसे बघायला गेल्यास, लोकसंगीताचा,सुगम संगीतात किंवा जनसंगीतात वापर करणे, यात तशी "उचलेगिरी" म्हणता येणार नाही, कारण नेमके श्रेय कुणाला द्यायचे? हा प्रश्न उद्भवतो(च). 
लोकसंगीत म्हणजे सुगम संगीताचा "ग्राम्य" अवतार, अशी मांडणी काहीवेळा केली जाते परंतु या शेऱ्यात कुठेतरी "कुत्सितपणा"चा वास येतो.  लोकसंगीताची स्वत:ची अशी खास वैशिष्ट्ये आहेत, ठराविक लय आहे, वेगवेगळे ताल आहेत, संगीताच्या रचनांचा स्वतंत्र असा ढाचा आहे. सर्वात मुख्य म्हणजे ती आपल्या मातीतले आहे आणि आपल्या सांगीतिक संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. 
आता, इथे आणखी एक प्रश्न उद्भवतो. लोकसंगीत हे परंपरेने चालत आले आहे आणि संगीतकाराच्या व्यासंगानुसार, मगदुरीनुसार, त्याचा उपयोग करून घेतला जातो. प्रश्न असा आहे, हातात असलेले लोकसंगीत, जसेच्या तसे वापरावे की त्यावर थोडी वेगळी प्रक्रिया करून, त्या रचनेला वेगळे स्वरूप द्यावे? हुशार संगीतकार, तसेच्या तसे लोकसंगीत स्वीकारत नाहीत!! (अर्थात ज्यांनी स्वीकारले, त्याच्या बुद्धीमत्तेबद्दल शंका घेण्याचे कसलेही कारण नाही) हाच विचार रागदारी संगीताबाबत मांडता येतो, म्हणजे हातात रागाचे बंदिश आहे, तेंव्हा त्या बंदिशीवर आधारित गाणे रचायचे, असा प्रकार देखील वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. 
काही रचनाकारांच्या मते, चाल तशीच्या तशी उचलण्यात कसले कौशल्य? एका बाजूने यांचे म्हणणे पटू शकते. अर्थात, अशा प्रकारे हातात असलेल्या चालीवर, स्वत:च्या मगदुराप्रमाणे प्रक्रिया करणे, याला देखील प्रचंड व्यासंग लागतो, हे नक्की. लोकसंगीताचा ढाचा स्वीकारायचा परंतु  स्वीकारताना,त्यात स्वत:ची अशी वेगळी "भर" टाकायची, ही काही साधे, सोपे  काम नव्हे. 
"चुनरी संभाल गोरी" हे गाणे याचा विचाराने तयार केलेले आहे. मुळात राहुल देव बर्मन, हा अतिशय प्रयोगशील संगीतकार होता. अशा प्रकारची लोकसंगीतातील चाल हाताशी आल्यावर, त्याने चालीचा "आराखडा"  तसाच ठेवला परंतु गाण्याचा  विस्तार,वाद्यमेळ आणि गायनात, खूपच प्रयोगशीलता ठेवली. सरळ आता गाण्याकडे वळतो. गाण्याची सुरवात, ढोलक वादनाने होते पण, जरा बारकाईने ऐकले तर सहज कळेल, तळाच्या प्रत्येकी चार मात्रानंतर त्याने चक्क "थाळी"च्या आवाजाची मात्रा घेतली आहे आणि गाण्यातील वैविध्याला सुरवात केली आहे. राहुल देव बर्मन, हा माझ्या मते, केवळ हिंदी चित्रपट संगीत नव्हे तर भारतीय चित्रपट संगीतातील असा अलौकिक संगीतकार होता, ज्याने गाण्यातील तालाच्या बाबतीत असंख्य प्रयोग केले. त्याने कधीही कुठलाच ताल पारंपारिक पद्धतीने वापरला नाही. तालाच्या मात्रा तशाच ठेवल्या पण, त्यात निरनिराळी वाद्ये (ज्यात, ज्याला "तालवाद्ये" म्हणता येणार नाहीत - रूढार्थाने, अशी वाद्ये वापरून, रसिकांसमोर तालाचे वेगळेच स्वरूप पेश केले) इथे देखील त्याने, ढोलकवर सुरवातीच्या मात्रा तशाच घेतल्या आहेत पण, लगेच थाळीच्या आवाजाचा वापर, एका(च) मात्रेपुरता आणून, तालाच्या सादरीकरणात "मजा" आणली आहे. 
तालाचे वर्तुळ पूर्ण होताक्षणीच, मन्ना डेच्या आवाजात  होतात. वास्तविक मन्नाडेच्या गायकीवर, अकारण केवळ शास्त्रीय पद्धतीची(च) गाणे म्हणणारा, असे "लेबल" चिकटवले गेले. खऱ्या अर्थाने गायकी ढंगाचा आवाज आणि वेळप्रसंगी आवाजात अप्रतिम लवचिकता आणून, गाण्याची खुमारी अफाट वाढवणारा, असा गायक होता. लोकसंगीत  गाताना, आवाजात "जोरकस" पणा असणे किंवा आणणे अप्रक्षित असते. मन्नाडे यांचा पहिलाच सूर या दृष्टीने ऐकावा. "चुनरी संभाल गोरी, उडी चाली जाये रे" इथे "जाये" शब्दावर किंचित वजनदार हरकत आहे आणि अशा प्रकारचीच गायकी, लोकसंगीतावरील गाण्यात अपेक्षित असते. या ओळीनंतर परत वाद्ये आणि ताल, याचा सुंदर "वाक्यांश" आहे, ज्या योगे, गायलेली पहिली ओळ, मनात ठसते. जिथे ताल संपतो, तिथे मन्नाडे ने किंचित "एकार" घेतला आहे, जो लोकसंगीताशी नाते सांगतो आणि गाण्याच्या चालीत "वजन" आणतो. लगेच गाणे वेगवान पद्धतीने पुढे सुरु होते. हीच पहिली ओळ, नेहमीच्या ढाच्यात संपते परंतु लगेच हीच ओळ स्वरांच्या वेगळ्या पट्टीत "पट्टीत" म्हणजे वरच्या सुरांत सुरु होते. याचा परिणाम असा  होतो, द्रुत लयीतील चाल पण, लगेच त्याच लयीत वेगळी "पट्टी" लागल्याने, ऐकणारा देखील चकित होतो. हेच तर लोकसंगीताचे खरे वैशिष्ट्य. एका लयीत गुंगवून ठेऊन, अचानक वेगळ्या वेगळ्या स्वरावलीत, रसिकाला चकित करायचे. 
"चुनरी संभाल गोरी, उडी चाली जाये रे, मार ना दे डंख कहीं नजर कोई हाय" 
आता इथे एक गंमत आहे. या ओळीत शेवटचा शब्द आहे "हाय". हा शब्दातून, मन्नाडे किती सुंदर विभ्रम निर्माण केले आहेत. तीन मिनिटांच्या गाण्यात हेच खरे सौंदर्य असते आणि हेच आपण जाणून घेण्यात बरेचवेळा कमी पडतो. त्यानंतर मन्नाडे "अरारारारा" असली लोकसंगीतात प्रचलित असलेली "बोलतान" घेतात. वास्तविक नेहमीच्या चालीत, अशा "ताना" येत नाहीत पण, चाल लोकसंगीतावर  आधारलेली आहे,याची जाण ठेऊन, इथे असली स्वरावली घेतली आहे. ही तान, संपते ना तोच, लताच्या आवाजात "उचकी" सदृश स्वर येतात. लयीत हे सगळे किती अप्रतिमरीत्या गुंफलेले आहे. ताल वेगवान आहे, लय द्रुत आहे आणि त्याच अंगाने गायन करताना, असे "ध्वनी"  वापरल्याने, लोकसंगीताची खुमारी अपेक्षेपेक्षा अधिक वाढते. 
किंबहुना, पुढील  रचनेत,हेच ध्वनी वारंवार ऐकायला येतात आणि त्याचा परिणाम मनावर ठाम होतो. पहिल्या अंतरा सुरु होतो, तिथला वाद्यमेळ ऐकण्यासारखा आहे, वास्तविक, संगीतकाराच्या बुद्धिमत्तेची कुशाग्रता दाखवण्याचे हे एक प्रमुख ठिकाण. ताशा वापरताना, त्याचा आवाज थोडा "बसका" ठेवला आहे पण, लगेच "ल ल ला" अशा आलापींनी गाण्याचे "कुळशील" तसेच ठेऊन, चालीत वेगळेपण आणले आहे. या आलापीनंतर मन्नाडे उंच स्वरांत (उंच स्वरांत गाणे, ही लोकसंगीताचे प्रथमिल गरज वाटावी, इथे या स्वरांचे ठळक अस्तित्व असते) आलापी घेतो. ही आलापी नेहमीच्या ढंगाची नसून, संपूर्ण लोकसंगीत देखील नाही तर ज्याला आधुनिक "योडलिंग" (किशोर कुमार गातो, ती पद्धत) स्वरावली आहे, त्याचा सुंदर उपयोग केला आहे. 
"फिसले नही चल के, कही दुख की डगर पे; 
ठोकर लगे हंस दे, हम बसने वाले, दिल की नगर के; 
अरे, हर कदम बहक के संभल जाये रे!!" 
आता या कवितेच्या ओळी  बघा,पहिल्या पेक्षा दुसऱ्या ओळीत शब्दसंख्या अधिक आहे. कवितेतील गेयतेच्या दृष्टीने अवघड रचना. संगीतकार अशाचवेळी आपली कुशाग्रता दाखवतो. चालीला वेगळे वळण दिले म्हणजे काय? याचे उत्तर इथे मिळते. शब्द तसेच ठेवले पण, चालीत किंचित फेरफार केला पण तसा करताना शब्दांना कुठेही "धक्का" दिलेला नाही आणि लय तशीच कायम ठेऊन, गाण्याची मजा कुठेही कमी पडू दिली नाही. लताची गायकी देखील काय अप्रतिम आहे. "ठोकर लगे हंस दे, हम बसने वाले, दिल की नगर के" ही ओळ संपताना, आवाजात किंचित कंप घेऊन, "हा हा" असे स्वर घेतले आहेत, जे परत लोकसंगीताशी जवळीक साधणारे आहेत. 
लता सगळ्या प्रकारची गाणी गाऊ शकत नाही, असा तिच्या गायकीवर बरेचवेळा आक्षेप घेतला जातो (आशा भोसलेच्या संदर्भात तर नेहमीच) परंतु या गाण्यातील तिची गायकी ऐकावी. आपोआप आपले पाय, ताल धरत असताना, वेगवेगळ्या स्वरांच्या "नक्षी" निर्माण करण्यात लता खरच अतुलनीय आहे. इतके गाणे वेगवान लयीत आहे, पण, लता, एकच ओळ दोनदा म्हणताना, त्यात देखील वैविध्य आणते!! हे काम खरच फार अवघड आहे. लयीची अत्यंत सूक्ष्म नजर असलेल्या कलाकारांनाच असल्या चमत्कृती जमू शकतात. या गाण्यातील तिची "उचकी" तर केवळ लाजवाब आहे. गाण्याला कसला अप्रतिम उठाव मिळतो. 
दुसरा अंतरा घेताना, बांसरीचे पारंपारिक स्वर ऐकायला येतात. त्याचबरोबर "कोरस" ऐकायला येतो (लोकसंगीतात कोरस अत्यावश्यक) ते स्वर देखील म्हटले तर पारंपारिक आहेत पण तरीही त्यात किंचित बदल आहे. संगीतकार म्हणून राहुल देव बर्मन किती "विचारी" संगीतकार होता, याचे हे उत्तम उदाहरण. ह्या इथे वाद्यमेळ्यातील ताल, किंचित "हलका" आहे पण क्षणात लताची गायकी सुरु होते आणि परत ताल पूर्वपदावर सुरु होतो. ऐकताना किंचित विश्रांती घ्यायची, आणि अचानक, परत द्रुत लय सुरु करून रसिकांना चकित करायचे!! खरे तर ही पारंपारिक पद्धत तरीदेखील इथे वेगळे स्वरूप प्रकट करून येते.
पुढील कडवे याच अंदाजाने बांधले आहे. 
"कितने नही अपनी, तो है बाहो की माला; 
दीपक नहीं जी में, उन गलियो है हमसे उजाला; 
भूल ही से चांदनी खिल जाये रे". 
हे कडवे संपूर्ण लताने गायले आहे आणि लता कधीही, केवळ संगीतकाराने जो "आराखडा" मांडला आहे, त्याबर गात नाही, गाताना, एखादा शब्द, एखादी हरकत ही खास, तिची "नजर" दर्शवून जाते. कधी कधी केवळ शब्दोच्चारावर लता कमाल करून जाते. इथे देखील, "तो है बाहो की माला" इथे "बाहो" आणि "माला" इथे घेतलेली हरकत, शब्दोच्चाराबरोबर घेतली आहे. अतिशय अवघड काम. लता अगदी सहज गाउन जाते, कुठेही, कसलेही प्रयास नाहीत!! 
तिसरा अंतरा घेताना, लताने "ल ल ला" अशी स्वरावली घेताना, काय जीवघेणी हरकत घेतली आहे. वास्तविक, श्रुतीशास्त्र याचे योग्य विश्लेषण करू शकेल पण, हे चित्रपट संगीत आहे, शास्त्र नव्हे, याचे जाणीव ठेवलेली बरी. 
"पल छिन पिया पल छिन, अंखीयो का अंधेरा;
रैना नहीं अपनी, पर अपना होगा कल का सवेरा; 
रैना कौन सी जो ढल ना जाये." 
इथे देखील परत लताची गायकी पुन्हा त्याचा अंगाने आपल्या समोर येते आणि आपण केवळ कृतज्ञता व्यक्त करण्याशिवाय काहीही करू शकत नाही. खरतर राहुल देव बर्मनने असे गाणे तयार करून, लोकसंगीतावर आधारित गाणे कसे "सजवता" येते याचा अफलातून मानदंड घालून दिला आहे, हे नक्की.   


No comments:

Post a Comment