Wednesday, 2 September 2020

हेमराज वाडी - भाग १०

दातेमास्तर!! लहानखोर शारीरिक चण, स्थूलाकडे झुकणारा बांधा, जाड चष्मा एकूणच संथ चाल, काहीसे घारे डोळे असे एकुणात वर्णन करता येईल. दातेमास्तर माझ्या घराच्या समोरील इमारतीत रहात होते आणि मला शाळेत ड्रॉईंग विषयाचे शिक्षक होते. ड्रॉईंग हा माझा कधीच आवडता विषय नव्हता. कागदावर साधे वर्तुळ काढायचे कधी जमले नाही. पौर्णिमेच्या झगझगीत चंद्राचे वाटोळेपण माझ्या या विषयाच्या पेपरला, परीक्षेतील गुणांबाबत साजेसे सिद्ध होत असे!! शाळेत दातेमास्तर चांगल्यापैकी मिस्कील बोलायचे, क्वचित चेष्टामस्करी करायचे. चालण्याची ढब अतिशय संथ असायची. आम्हाला चित्रकलेच्या तासाला एखादा विषय द्यायचे परंतु मला तरी त्यावेळच्या व्हायला अनुसरून बोलायचे झाल्यास, त्यांच्या नकला फार आवडायच्या. वर्गात कंटाळा आला असे दिसले की मास्तर निरनिराळ्या व्यक्तींच्या नकला सादर करायचे आणि वर्गात तजेला आणायचे. विशेषतः वेगवेगळ्या ढंगांच्या स्त्रिया, हा त्यांचा आवडीचा विषय असायचा. मग त्या स्त्रियांचे बोलणे, चालणे, एखादी विशीष्ट ढब इत्यादी प्रकाराने त्या स्त्रीचे व्यक्तिमत्व आमच्यासमोर उभे करायचे. मग तुच्या बोलण्याच्या शैलीचे वैशिष्ट्य सांगायचे. माझ्या त्या व्हायला हे सगळे अद्भुत वाटायचे आणि तो तास नेहमीच चटकन संपला असेच वाटायचे. त्यांनी काढायला सांगितलेले चित्र, मी कधी पूर्ण केल्याचे फारसे आठवत नाही. खरे म्हणजे मास्तर आमच्या घराच्या समोर राहायचे म्हणजे एका दृष्टीने शेजारीच होते परंतु निदान शाळेत तरी अशी ओळख दाखवल्याचे स्मरत नाही. चित्रकलेचा तास संपला की मास्तर नेहमी एकांतात वावरायचे. वास्तविक त्यांचा वर्ग हा शाळेतील सर्वात वरच्या म्हणजे चौथ्या मजल्यावर भरत असे परंतु तास संपल्यावर, आमच्याबरोबरीने जिन्यातून खालच्या मजल्यावर उतरायचे पण जिना उतरताना क्वचित कधी ओळखीचे स्मित केल्याचे आठवत आहे अन्यथा वर्गातील एक साधा विद्यार्थी अशीच ओळख डोळ्यांतून दिसत असे. पायऱ्या चढताना किंवा उतरताना, त्यांनी कधीही घाई केल्याचे आठवत नाही. नेहमीच शांतपणे पायऱ्या उतरणार आणि पहिल्या मजल्यावरील शिक्षकांच्या खोलीत जाऊन बसणार. या शिक्षकांच्या खोलीत, कामाशिवाय जायला आम्हा विद्यार्थ्यांना परवानगी नसल्याने, तिथे मास्तर इतरांशी कसे वागत, बोलत हे समजलेच नाही. परंतु त्यांचा वर्गात दिसणारा उत्साह, काहीसा बडबड्या स्वभाव इतरत्र फारसा दिसला नाही. मी त्यांच्या वर्गात बरीच वर्षे होतो म्हणजे सातवीपर्यंत तरी आम्हाला चित्रकलेचा तास असायचा आणि मी त्या तासाला जात असे. पुढे चित्रकला विषय वाट्याला आला नाही आणि मसरांशी संपर्क तसा कमी होत गेला. मास्तर जिथे रहात होते, त्यांच्या खोलीच्या शेजारी आमचा मित्र मंदार आणि त्याचे आई, वडील आणि बहिणी रहात होत्या. मी त्याच्याकडे अधून मधून जात असे तर त्यांच्या वरच्या मजल्यावर आमचे खरे मित्रमंडळ रहात होते. माझा त्यामुळे चौथ्या मजल्यावर वावर बराच असायचा. मी, राजू आणि मोहन खरे म्हणजे करेल वाडीत आमचे घर होते (अर्थात लौकिकार्थाने) परंतु बालपण सगळे हेमराज वाडीत आणि ते देखील प्रामुख्याने इ ब्लॉक मधील चौथ्या मजल्यावरच गेले. दाते मास्तर खालच्या मजल्यावर रहातात याचा पहिले काही दिवस पत्ता नव्हता परंतु एकेदिवशी अचानक शोध लागला. एकूणच आमचा ग्रुप हा अति वांड, मस्तीखोर, आणि सतत काहीना काहीतरी उचापत्या करणारा होता. एकमेकांच्या टोप्या उडवणे तर नित्याचे होते. त्यातून कुणाच्यातरी डोक्यात कल्पना आली - रविवार दुपारी दातेमास्तरांच्या दरवाजाची कडी वाजवायची आणि "काय दाते मास्तर उठला का?" अशी आरोळी मारून पळून जायचे!! सुरवातीला मास्तरांना काहीच कल्पना यायची नाही कारण ते उठून दरवाजा उघडीपर्यंत आम्ही सगळे वरच्या मजल्यावर उद्या मारीत जात असू. वरून खाली मास्तर उठले का? याची टेहळणी करीत असू आणि त्यातून फाजील आनंद लुटत असू. असा आमचा खेळ पहिले काही आठवडे यशस्वीपणे चालू होता आणि मास्टर संत्रस्त होत असत. मास्तरांची झोपमोड होते, याचाच आम्हाला आनंद व्हायचा!! वास्तविक रविवार दुपार म्हणजे जेवण घेऊन वामकुक्षी घेण्याची वेळ आणि अशा वेळी दारावर आवाज करून झोपमोड होणे, हा खरंतर त्रासदायक प्रकार पण आम्हाला कुणालाच याची क्षिती नसायची. एकदा मात्र अनावस्था प्रसंग ओढवला. त्यावेळी आम्ही भाऊ ठराविक रंगाच्या चड्ड्या घालीत असू. त्या रविवारी, मोहनने, माझ्याच रंगाची - लाल रंगाची चड्डी घातली होती. त्या रविवारी दुपारी, मी त्यांच्या दरवाज्याची काडी वाजवली आणि पळायला सुरवात केली. मास्तर बहुदा दबा धरून बसले असावेत कारण त्यांनी लांबून लाल रंगाची चड्डी बघितली!! मास्तर तरातरा जिना चढून वर आले. आम्ही तिथे जिन्यावरच बसलो होतो तिथे येऊन आमच्यावर ओरडायला सुरवात केली. आमची खऱ्याअर्थी पाचावर धारण बसली होती. मास्तरांच्या मोठ्या आवाजाने, जिन्याशेजारी रहाणारे टिल्लू अप्पा बाहेर आले!! तितक्यात मास्तरांना मोहनची लाल चड्डी दिसली आणि त्यांनी मोहनला मारायला हात उगारला!! तत्क्षणी टिल्लू अप्पा मध्ये पडले आणि त्यांनी "अरे दाते काय करत आहेस, थांब" असे ओरडून मास्तरांचा हात वरच्यावर धरला. एव्हाना आमची खऱ्या अर्थी तंतरली होती. कुणाच्या तोंडून शब्द फुटत नव्हता परंतु टिल्लू अप्पांच्या, बहुदा सगळं प्रकार ध्यानात आला असणार आणि त्यांनी तो प्रसंग हाताळला. मास्तर तणतणत खाली गेले आणि टिल्लू अप्पा किंचित स्मित करून त्यांच्या घरात गेले. पुढील बराच वेळ आम्ही सगळे मित्र मुक्तपणे गप्प बसलो होतो. वास्तविक आमची कृती ही विकृती होती. एका वयस्कर वयाच्या माणसाची रविवारी झोपमोड करणे, याला कुणीही सभ्य कृती म्हणणार नाही पण आम्ही तरी कुठे सभ्यपणाचा दावा करीत होतो म्हणा!! शाळा सुटली किंवा आमही सगळे आठवीत गेलो आमचा मास्तरांशी येणारा संबंध कमी होत गेला.मास्तरांनी लग्न केले नव्हते आणि तसे ते एकांड्या वृत्तीचे होते. एकाच खोलीत ते राहायचे, तिथेच जेवण करून घ्यायचे, तिथेच झोपायचे. शाळा सोडल्यास त्यांचे भावविश्व फार मर्यादित होते. घरी असताना, चट्टेरी पटेरी अर्धी चड्डी आणि अंगात बिन बाह्यांचा गंजी घालून वावरत असत. कधीकधी ते घराच्या बाहेर येऊन, एखाद्या वहीवर स्केचेस काढत आणि ते आम्हा वरून बघताना कळत असे. मास्तरांनी लग्न केले नसले तरी स्त्री विषय त्यांना वर्ज्य नव्हता. त्यासारख्या इमारतीच्या पाठीमागे तेंव्हा विस्तृत असा धोबीघाट होता आणि तिथे अनेक तरुण स्त्रिया कपडे धुवायला येत असत. कपडे धुण्याच्या त्या तारूंच्या लकबी कागदावर चित्रांच्या साहाय्याने रेखाटन करणे, हा मास्तरांचा छंद होता. त्यावरून आम्ही मित्र एकमेकांच्यात मनसोक्त चेष्टा करीत असायचो. अर्थात रविवारी दुपारी त्रास देण्याचे मात्र थांबवले!! आमचे त्यांच्याशी कधीही वैय्यक्तिक संबंध जुळले नाहीत आणि याला कारण मास्तर स्वतःच होते. आयुष्यभर एकटे राहिल्याने स्वभावात हेकटपणा, चिडचिडा आला होता. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या तांबे कुटुंबाशी त्याचा सतत वाद, क्वचित भांडणे व्हायची आणि ते सगळे प्रसंग आम्ही मित्र चवीचवीने एन्जॉय करीत होतो. जवळपास संपूर्ण आयुष्य त्यांनी इ ब्लॉकमध्ये काढले पण कुणाशीही जवळकीचे संबंध ठेवले नाहीत. मला वाटते, त्यांना सारखे वाटायचे - मला आयुष्याने काही दिले नाही मग मी इतरांना काय आणि कशाला काही देऊ? त्यांना तशी व्यसने काही असल्याचे आढळले नाही. एकूणच टिपिकल कोकणस्थी एकांडा संसार चालला होता. त्यांचा एक दूरच नातेवाईक कधीतरी त्यांच्याकडे रहायला यायचा पण त्या नातेवाईकाचा सुद्धा इतरांशी संपर्क शून्य. त्यामुळे मास्तर उत्तरोत्तर घुमे आणि काहीसे विकृत होत गेले. एक प्रसंग ठळकपणे मला आठवत आहे. तेंव्हा हेमराज वाडीत रेडियोवरील गायक आर.एन.पराडकर रहात होते. त्यांची विशेषतः दत्ताची भजने खूप प्रसिद्ध झाली होती. परंतु बहुदा वार्धक्याने त्यांचा गळा काम करीनासा झाला आणि तो गायक घरीच रहायला लागला. अर्थात चाळीत अशा बातम्या लगोलग पसरतात तशी सगळ्या वाडीला ही बातमी समजली. एका सकाळी. मास्तर गॅलरीत फेऱ्या मारीत असताना, त्यांना बहुदा समोरच्या चाळीत कुणातरी ओळखीचे दिसले असावे. लगेच संपूर्ण जगाला ऐकायला जाईल अशा मोठ्या आवाजात मास्तर बोलले - "अरे काय झाले त्या पराडकरला? आयुष्यभर दत्त दत्त करून शेवटी त्याच दत्ताने आवाज काढून घेतला ना!!" आणि स्वतःच मोठ्याने हसायला लागले. वास्तविक ही भयानक विकृत कुचेष्ठां होती. मी आणि माझ्या आईने हे सगळे बघितले आणि ऐकले. आई तर सर्दच झाली होती आणि मला देखील, त्या वयात देखील फार वाईट वाटले. आईने तर मला, मास्तर किती कृतघ्न आणि विकृत आहेत, हेच पटवून सांगितले. पुढे आम्ही सगळेच कॉलेजमध्ये जायला लागलो आणि मास्तर आमच्या आयुष्यातून दुरावले पण हे तर विधिलिखितच होते. मी माझ्या मित्रांना भेटायला जात असे पण यात मास्तर कुठेच नसायचे. पुढे मी परदेशी गेल्यावर तर मास्तर कायमचे विस्मृतीत गेले. एकदा असाच सुटीवर आलो असताना, त्या वर्षात मास्तर गेल्याची बातमी समजली. अगदी मनापासून कबूल करायचे झाल्यास, ऐकलेल्या बातमीने मला काहीसुद्धा वाटले नाही कारण एकच - मास्तरांचा एकलकोंडेपणा आणि घुम्या स्वभाव. अखेर मास्तर देखील माणूसच होते. घुम्या स्वभावाने आतल्या आत कुढत असणार, कुठेतरी पश्चात्तापाची प्रसंग आठवत असणार पण ही बातमी ऐकून माझ्या मनात काहीही विचार आले नाहीत. जे विचार आले ते आता हे सगळे लिहिताना आले इतकेच.

हरवले ते गवसले का

आपल्याकडे संगीत आणि गाणी याचे प्रमाण अतिशय असते असे म्हटले जाते. अर्थात हे फार ढोबळ विधान झाले. भारतीय संदर्भात कशालाही गीत म्हणण्यासाठी चार वळणे पुरी करावी लागतात. लयबद्ध गद्य, पठण, पद या साच्याची गठण आणि कलासंगीतातील रचनातत्वांचा लघुत्तम वापर करून सिद्ध होणारी कृती, हे ते चार मार्ग व्यवस्थितपणे वेगळे करावे लागतात. ज्याला "गीत" म्हणायचे त्यापासून हे ४ मार्ग व्यवस्थितपणे निराळे करावे लागतात. गीताची साधी व्याख्या करून व संगीताला एकविध आविष्कार समजून सुटका करून घेण्याचा मोह इथे होऊ शकतो. पण हा सैलपणा इथे उपयोगी नाही. आणि त्यामुळे संगीत म्हणजे काय, हे नीटसपणे समजणार देखील नाही. म्हणूनच संगीत म्हणजे काय ते समजणे म्हणजे विविध अनेक संदर्भात संगीत कसे वागते त्याचे भान येणे होय. अनेक घटना वा प्रसंग वा क्रिया, कला आणि ज्ञानक्षेत्रे संगीताशी संदर्भ पुरवतात आणि हाच मुद्दा मराठी भावसंगीताच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. मराठी भावसंगीत हे जनसंगीताच्या कोटींत तसे उशिराने प्रवेश करते झाले परंतु लगेच या आविष्काराने आपल्या कार्यक्षेत्राची व्याप्ती प्रचंड वाढवली आणि जनमानसात कायमचे स्थान प्राप्त केले. आजचे आपले गाणे - हरवले ते गवसले का, हे असेच भावसंगीत किती प्रभावी आणि सुंदर झाले आहे, याचे निदर्शक आहे. याची शब्दरचना प्रसिद्ध कवी पी. सावळाराम यांची आहे. कविता म्हणून वाचायला गेल्यास, कवितेत फार काही खोल आशय आढळत नाही. काहीशा सपक प्रतिमा आणि बऱ्याच ठिकाणी "शब्द जोडणी" वाचायला मिळते. कवी म्हणून पी. सावळाराम कधीही प्रतिभावंत म्हणून गणले गेले नाहीत परंतु ललित संगीताला बरेचवेळा "भावकविता" जरुरीची वाटत नाही तर चटपटीत, थोडक्यात आपले म्हणणे मांडणारी आणि रसिकांना लगेच आकलन होणारी आणि आकर्षून घेणारी शब्दरचना भावते. (मला मात्र "भावकविता" अधिक भावते!!) तेंव्हा या रीतीला धरून अशीच शब्दकळा आहे. "मीलनाचा परिमल" किंवा "पाकळ्यांच्या उघडझापी" तसेच "जलाशयाची सृष्टी - मृगजळे का व्यापिली" सारखे शब्द ललित संगीतात असंख्य वेळा वाचायला मिळतात. परिणामी आशयाची व्याप्ती संकुचित होते. या गाण्याचे खरे सौंदर्य हे गाण्याच्या स्वररचनेत आहे. प्रसिद्ध संगीतकार वसंत प्रभूंनी चालीची निर्मिती केली आहे. शास्त्रीय बाजू बघायला गेल्यास, "राग "पुरिया कल्याण" वापरला आहे. आता या रागाचे प्राथमिक स्वरूप बघायला गेल्यास, पूर्वांगात पुरिया तर उत्तरांगात कल्याण (यमन राग) राग ऐकायला मिळतो. षड्ज स्वरापासून मध्यम स्वरपर्यंतचे सूर हे पुरिया रागाशी जवळीक साधतात आणि पंचम स्वरापासून यमन राग दिसायला लागतो परिणामी रागाचे सादरीकरण काहीसे अवघड बनते. एकतर (कोमल) रे आणि (तीव्र) म सोडल्यास सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागतात. त्यातून रागाचा "थाट - मारवा"!! त्यामुळे स्वरार्थाने ऐकायला गेल्यास व्याकुळ भाव निर्मिती होते आणि संध्याकाळचा समय ध्यानात घेता रागाचा फार मोठा प्रभाव रसिकांवर पडतो. आता गाण्याच्या स्वररचनेबाबत बोलायचे झाल्यास, गाण्याच्या सुरवातीच्या व्हायोलिनच्या सुरांनी आपण या रागाच्या अंगणात येऊन पोहोचतो. शब्दरचना पारंपरिक धाटणीची म्हणजे अस्ताई-अंतरा पद्धतीची आहे आणि त्यामुळे चाल देखील तशाच अंगाने विस्तारत जाते सगळे अंतरे एकाच धाटणीने बांधले आहेत. जसे शब्द आहेत तशीच सोपी, साधी चाल आहे पण खरी गंमत आहे ती,या चालीच्या गोडव्यात!! अतिशय गोड चाल बांधली आहे. मुळात ललित संगीताचा जीव तसा लहानखुरा असतो त्यामुळे इथे तसे वारंवार स्वरिक प्रयोग आढळत नाहीत. एकूणच वसंत प्रभूंच्या सांगीतिक कारकिर्दीचे मूल्यमापन करायचे झाल्यास, बहुतेक स्वररचना या "मेलडी प्रधान" आहेत. रागांचा सढळ हस्ते वापर केलेला आढळतो आणि त्या रागाची वैशिष्ट्ये जपत असताना चालीला "सुगम" रूप देण्याकडे ओढा दिसतो. इथे देखील पुरिया कल्याण स्पष्ट दिसतो परंतु गाण्याला "गीतस्वरूप" देण्यात संगीतकार यशस्वी झाले आहेत. एकूणच आवड ही शक्यतो पूर्णस्वरूप मेलडीकडे जाण्याची आहे. अर्थात ललित संगीतात संपूर्ण निखळ मेलडी दिसणे अवघडच असते परंतु मेलडीचा प्रभाव जाणवून देणे शक्य असते. वाद्यमेळांत फार काही नावीन्य दिसत नाही. भारतीय संस्कृतीमधील वाद्येच वापरली आहेत आणि एकूणच वाद्यांकडे अधिक ओढा दिसत नाही. त्यापेक्षा आपण बांधलेली स्वररचना अधिक वेधक कशी दिसेल, श्रोत्यांना कशी आवडू शकेल - हाच विचार प्रबळ आहे. त्यातूनच रचनेत अर्धतान तसेच बारीक हरकती यांचाच अंतर्भाव दिसतो. अगदी प्रणयी थाटाचे, द्रुत लयीत गाणे बांधले तरी त्यात मेलडीचा अंतर्भाव होणे अगत्याचे वाटते. माग कधीकधी दीर्घ आलापी ऐकायला मिळते. शब्दांना नेहमीच प्राधान्य दिले आहे, परिणामी "यतिभंग" फारसे ऐकायला मिळत नाहीत. कवींच्या शब्दांप्रती निष्ठा दिसून येते. थोडा वेगळा विचार - एक प्रयत्न असा असू शकतो, गीत ऐकताना रचनाकाराच्या गीतरचनेवर जरा अधिक लक्ष द्यायचे ते अशासाठी की एकंदर रचनाप्रकारात व्यक्तीच्या आपल्या, म्हणजे व्यक्तिगत आवाजाला, सुखदुःखाला खरी वाचा फोडणारा, त्यांना भावनिक आकार देणारा रचनाप्रकार हा "गीत" हाच असू शकतो. काहीसे विरोधाबभासात्मक विधान करायचे झाल्यास, सर्व गीते रचना असतात पण याचा अर्थ सर्व रचना गीते असतात, हा व्यत्यास खरा नसतो. या गाण्याच्या बाबतीत हा विचार केल्यास काही वेगळा दृष्टिकोन आपल्याला मिळू शकतो. तसेच हे गीत म्हणजे गीतधर्मी प्रतिभेचं मर्मग्राही उदाहरण म्हणता येईल. पुरिया कल्याण रागाच्या स्वरक्षेत्रात रुंजी घालत राहण्याच्या ब्रीदास हा संगीतकार जगतो पण त्याशिवाय व्हायोलिन सारख्या वाद्याचा स्वनरंगांचा वावर चांगलाच जाणवतो. याशिवाय आणखी एक महत्वाचा मुद्दा - लताबाई गायन करीत असताना त्याच्या मागे पार्श्वसंगीत मुळीच रुंजी घालत नाही. कवितेच्या चरणांचा असा वेगळा अवतार गायिकेस आव्हानदायक वाटला असणार. पण त्यामुळे काव्याचा अर्थच नव्हे तर असहाय देखील ऐकणाऱ्याच्या मनात सावकाश दाट होत जातो. जसे, रात्र नकळत अंधारत जावी त्याप्रमाणे. हा एकुणात फार मोठा फायदा होतो. गायन हा घटक या गाण्यात अतिशय महत्वाचा ठरला आहे. गाण्याचा मुखडा प्रश्नार्थक आहे आणि तोच प्रश्नार्थक भाव लताबाईंनी गायनातून दर्शवला आहे. एक गायिका म्हणून ही नजर विशेष म्हणायला हवी. वास्तविक अंतऱ्याची सामान बांधणी आहे परंतु पहिला अंतरा "उचलताना", दुसरी ओळ वरच्या स्वरांत घेतली आहे. "पाकळ्यांच्या उघडझापी" शब्द अशा प्रकारे गायल्याने, झालेल्या दु:खाची प्रत अधिक विखारी होते. आत्ममग्न गीतांतून देखील अशी वेगळी जाण दाखवता येते. याच शब्दांपाठोपाठ "हास्य उमले वेगळे का?" हे प्रश्नार्थक विधान ज्याप्रकारे गायले गेले आहे, "शब्दप्रधान गायकी" म्हणजे काय? या प्रश्नाचे नेमके उत्तर होय. गाण्याची रचना करताना प्रत्येक अंतऱ्याची दुसरी ओळ, मूळ मुखड्याच्या चालीपेक्षा वेगळी घेतली आहे. पण जरा बारकाईने ऐकले तर लय तशीच आहे आणि सूर फक्त वरच्या टप्प्यात घेतले आहेत पण स्वरांची जातकुळी जवळपास तशीच आहे. इथे जसा संगीतकार दिसतो तसेच गायिका देखील दिसते. एक अतिशय मधुर चालीचे, सुगम्य शब्दांचे आणि ऐकायला गोड वाटणारे गाणे लोकप्रिय झाले नसते तरच नवल होते. हरवले ते गवसले का? गवसले ते हरवले का? मीलनाचा परिमल तोचि, फुल तेचि या स्वरूपी पाकळ्यांच्या उघडझापी, हास्य उमले वेगळे का? पावसाळी ग्रीष्म सरिता, सागराला फिरुनी मिळता जलाशयाची सृष्टी आता, मृगजळे ही व्यापिली का? दूर असता जवळी आले, जवळी येता दूर गेले जो न माझे दु:ख हसले, तोचि सुख ही दुखावले का? https://www.youtube.com/watch?v=s1rUmIG8qQw

Saturday, 29 August 2020

सुनील गावस्कर - भाग २

१९८३/८४ मधील रणजी करंडकासाठीचा दिल्ली आणि मुंबईमधील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम मध्ये होता. त्यावेळी दिल्ली आणि मुंबई संघ हे जवळपास तुल्यबळ होते, अर्थात मुंबई संघाची फलंदाजी अधिक खोल आणि भरवशाची होती. मी आणि माझ्या तेंव्हाच्या ऑफिसमधील काही सहकाऱ्यांनी ५ दिवसांची सलग सुटी घेतली होती. आजही तो सामना माझ्या डोळ्यासमोर आहे. सकाळी नाणेफेक झाली आणि दिल्लीचा कॅप्टन, मोहिंदर अमरनाथने क्षेत्ररक्षण स्वीकारले. लंचपर्यंतच्या खेळाने, दिल्लीच्या समोर काय वाढून ठेवले आहे याची कल्पना आली. खेळपट्टी संपूर्णपणे फलंदाजी धार्जिणी होती आणि मोहिंदरने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून पायावर धोंडा पडून घेतला होता. दिलीप त्या वर्षी सर्वोत्तम फॉर्मात होता आणि त्याने ज्याप्रकारे शतक झळकावले त्यावरून कल्पना आली. त्या खेळीत क्रिकेटमधील सगळ्या फटक्यांचे नयनरम्य प्रदर्शन मांडले होते. दुसऱ्या बाजूने सुनील शांतपणे दिलीपची खेळी बघत होता आणि दिलीप असेपर्यंत त्याने दुय्यम भूमिका स्वीकारली होती. जसा दिलीप बाद झाला तशी सुनीलने सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली. दिलीप असे पर्यंत एकेरी, दुहेरी धावांवर समाधान मानणारा सुनील, हळूहळू आपल्या भात्यातून शस्त्रे काढायला लागला. आधीच दिलीपने दिल्लीच्या गोलंदाजांना हलवून सोडले होते आणि आता सुनीलने त्याच्यावर जखमा करायला सुरवात केली. दिवसअखेर सुनील नाबाद राहिला होता. सुनीलने अक्षरश: दिल्लीच्या गोलंदाजांची पिसे लढली होती. खऱ्याअर्थी घाम गळायला लावला होता. गोलंदाजांना घाम गाळायला लावणे, त्यांच्या संयमाची परीक्षा बघणे, क्षेत्ररक्षकांना जराही संधी न देणे - ही सगळी सुनीलच्या फलंदाजीची खास वैशिष्ट्ये. सुनीलचा स्वतःवर अतुलनीय संयम होता. त्या जोरावर त्याने भल्याभल्या गोलंदाजांना, त्याच्यासमोर गुडघे टेकायला लावले होते आणि तरी सुनीलचे समाधान होत नसे. या सामन्यात त्याने द्विशतक काढले आणि तिथेच सामन्याचा निकाल स्पष्ट करून टाकला होता. सुनीलची एकाग्रता काय प्रतीची होती याचा पुरावा त्याने त्या दिवसाच्या शेवटच्या षटकाच्यावेळी दिला. दिवसभर सुनीलला बॉलिंग करून दिल्ली थकली होती आणि शेवटच्या ओव्हरमध्ये, गोलंदाजाने सुनीलच्या लेग स्टम्पवर, थोडा पुढे चेंडू टाकला ( तो हाफव्हॉली नव्हता) आणि सुनीलने (दिवसभर खेळून!!) तो चेंडू, सणसणीतपणे मिडविकेटमधून सीमापार धाडला!! एकाग्रता कशी असावी, याचा हा सुंदर धडा होता. दिवसभर त्याने गोलंदाजांना रगडून काढले. सुनिलबाबत एक खासियत होती. सुनिलबाबत एक शक्यता असायची (जी शक्यता सगळ्या फलंदाजांबाबत असते) जेंव्हा सुनीलची नजर स्थिरावत नसते किंवा डावाच्या सुरवातीलाच, जेंव्हा सुनील खेळपट्टीचा अंदाज घेत असायचा तेंव्हा गोलंदाजांना त्याला बाद करायची संधी असायची. एकदा का त्याने २०,२२ धावा केल्या की मात्र जेंव्हा सुनील संधी देईल तेंव्हाच तो बाद होणार. जगातील कुठलाही फलंदाज हा सुरवातीला थोडा चाचपडत असतो मग त्याचे तंत्र कितीही अचूक असू दे. अशीच एक इनिंग मला आठवत आहे. पूर्वी मुंबईत "कांगा लीग" स्पर्धा असायची. त्यावेळी मुंबई फलंदाज अतिशय "खडूस" म्हणून प्रसिद्ध असायचे आणि त्या खडूसपणात या कांगा लीग स्पर्धेचा फार मोठा वाटा असायचा. ही स्पर्धा नेहमी पावसाळ्यात खेळवली जायची. मी या स्पर्धेतील बहुतांशी सामने हे शिवाजी पार्क इथे बघितले आहेत आणि सगळे सामने हे फक्त रविवारी(च) खेळले जायचे. रविवारी पाऊस नसला की सामना सुरु!! खेळपट्टी ओलसर आहे, आजूबाजूला गुडघ्याएवढे गावात वाढले आहे, असल्या तक्रारींनी जरा देखील वाव नसायचा. आजच्या T20 स्पर्धेची ही "जननी" म्हणता येईल. केवळ दिवसभराचा प्रश्न असायचा. हवा बहुतेकवेळा कुंद (टिपिकल इंग्लिश वातावरण) असायची परंतु तशा हवेतच हे सामने खेळवले जायचे. एके रविवारी "दादर युनियन" आणि "शिवाजी पार्क" या सांध्यात सामना होता. दादर युनियनमधून सुनील, दिलीप होते तर शिवाजी पार्क मधून संदीप,शिवलकर असे दिग्गज खेळाडू होते. सामन्यात १५० धावा झाल्या हणजे संघाच्या विजयाची शक्यता भरपूर कारण एकत्र खेळपट्टी ओलसर त्यातून Outfield म्हणजे प्रचंड वाढलेले गवत. त्यामुळे तुम्ही कितीही जोरदार फटका मारा, चौकार मिळणे दुरापास्त. अगदीच उंचावरून फटका मारला तरच चौकार मिळण्याची शक्यता. खेळपट्टी ओलसर असल्याने क्लब गोलंदाज देखील रॉबर्ट्स, होल्डिंग वाटायचा!! त्या सामन्यात सुनीलने पन्नाशी गाठली आणि दिलीपने त्याला चाळीस धाव काढून मौल्यवान साथ दिली आणि गंमत म्हणजे इतके असूनही संघाची धावसंख्या फक्त १२९!! संपूर्ण डावात फक्त दिलीपचा एक चौकार सामील होता आणि तो देखील दिलीपने हवेत उंच फटकावला होता म्हणून!! परंतु त्या खेळीत पुन्हा सुनीलने आपल्या तंत्राचे अप्रतिम प्रदर्शन केले. वास्तविक त्यावेळी सुनील,दिलीप,संदीप सगळे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे झाले होते तरीही ते हे सामने खेळायला आले होते. सुनीलने पन्नाशी गाठताना, आपल्या संयमाचे दर्शन घडवले होते. अशा खेळपट्टीवर खेळताना, शक्यतो चेंडूला ड्राइव्ह करणे धोक्याचे असते आणि चेंडू दोन फिल्डर्सच्या मधून काढण्याच्या कौशल्याला महत्व असते आणि तेच सुनीलने शांतपणे दाखवून दिले. संपूर्ण खेळी त्याने बॅकफूटवर सजवली. इथे मनाची खरी कसोटी लागते. अशा वेळी तुम्ही जागतिक कीर्तीचे खेळाडू आहेत याला काही किंमत नसते. अशीच एक असामान्य खेळी मला आठवत आहे. १९८३ सालच्या वेस्ट इंडिज-भारत मालिकेतील शेवटचा सामना चेन्नई इथे होता. दिल्ली आणि अहमदाबाद इथे सुनीलने धुवांधार खेळी करून सगळ्यांना दिपून टाकले होते परंतु पुढील दोन सामन्यात सुनील अगदी लवकर बाद झाला आणि भारताचा पराभव झाला होता. परिणामी सुनीलवर, त्याच्या बदलत्या शैलीवरून टीका झाली. सुनील लवकर बाद झाला याला प्रमुख कारण अँडी रॉबर्ट्स होता. रॉबर्ट्स नुसताच वेगवान गोलंदाज नव्हता तर त्याच्याकडे फलंदाजाचे कच्चे दुवे शोधण्याचे असामान्य कसब होते. किंबहुना मी आता असे सहज म्हणू शकतो वेस्ट इंडिजची जी जगप्रसिद्ध वेगवान चौकडी झाली होती (रॉबर्ट्स,होल्डिंग,गार्नर,मार्शल आणि क्रॉफ्ट) त्यामागे फक्त रॉबर्ट्सचा खरा हात होता. त्याने या सगळ्यांना अक्षरश: घडवले होते. उगीच नाही सुनील आजही रॉबर्ट्सला श्रेष्ठ वेगवान गोलंदाज म्हणून मान्यता देतो. असो, शेवटच्या सामन्यापूर्वी सुनीलवर टीका झाली म्हणून सुनीलने आयुष्यात प्रथमच चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचे ठरवले परंतु दुर्दैवाने परिस्थिती अशी आली, पहिल्याच ओव्हरमध्ये मार्शलने भारताचे २ फलंदाज बाद केले आणि सुनीलला लगेच खेळायला येणे भाग पडले. ही खेळी म्हणजे सुनीलला जगात फलंदाज म्हणून का मान्यता मिळाली याचा अप्रतिम नमुना होता. अक्षरश: त्याने सगळ्या वेगवान गोलंदाजांना रगडून काढले इतके की सुनीलच्या १५० धावा झाल्या आणि तरीही त्याची भूक भागत नाही असे दिसल्यावर लॉइड आणि विव्ह पॅव्हेलियनमध्ये आराम करायला गेले!! या खेळीत सुनीलच्या खेळाचे सगळे सौंदर्य आढळले आणि मुख्य म्हणजे पूर्वीचा सुनील झगझगीतपणे समोर आला. रॉबर्ट्स, होल्डिंग, गार्नर आणि मार्शल, सगळे गोलंदाज थकले पण सुनीलची भूक मंदावली नव्हती. तब्बल २३६ धावा काढून सुनील परतला!! निव्वळ अजोड कौशल्याची प्रचिती देणारी खेळी होती. या खेळीच्या वेळेससुनीलला लोकांच्या टीकेला तर उत्तर द्यायचेच होते परंतु त्याशिवाय, अजूनही तोच पूर्वीचा सुनील कायम असल्याचे सिद्ध करायचे होते आणि ते देखील जगातील प्रलयंकारी वेगवान गोलंदाजांच्या समोर. त्या खेळीत अगदी ठरवून सुनीलने एकही चूक केली नाही. चूक केली आणि तो बाद झाला!! मनाचा निग्रह ही काय चीज असते याचे सगळ्या जगाला दर्शन घडवले.सुनील अशा प्रकारे ठरवून गोलंदाजांचा अंत बघत असे. गोलंदाज थकून जात पण सुनील तसाच खेळपट्टीवर नांगर टाकून उभा राहात असे. अशा दीर्घ केल्ली करायच्या म्हणजे तुमच्याकडे अचाट स्टॅमिना लागतो तसेच सर्वकाळ डोळ्यात तेल घालून खेळावयास लागते. एखादा चेंडू आपल्याला फसवून जातो परंतु त्यामुळे मनात नैराश्य न आणता, पुन्हा नव्याने डावाची उभारणी करायच्या कामाला जुंपून घ्यायचे!! ही बाब सहज जमणारी नव्हती आणि सुनीलने ती कमालीच्या सहजतेने वर्षानुवर्षे करून दाखवली. आजही लॉइड,विव्ह, इयान चॅपेल, रिची बेनॉ सारखे असामान्य खेळाडू सुनीलला कुर्निसात करतात तो केवळ चार लोकांसमोर दर्शविण्याचा देखावा नसतो तर त्यामागे सुनील बद्दलची कृतज्ञता असते. वास्तविक या माणसाकडे कपिल, संदीप सारखी कसलीच "देणगी" नव्हती पण त्याची भरपाई सुनीलने अथकपणे नेट प्रॅक्टिस करून भरून काढली. कितीही आंतर राष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली, बहुमान प्राप्त झाले तरी सुनीलने नेट प्रॅक्टिस कधीही टाळली नाही आणि तिथे त्याने आपल्यातील कमतरता शोधून, त्यावर उपाय शोधण्याचा अथक प्रयत्न केला. ही जी निष्ठा होती, त्या निष्ठेची ही खरी किंमत आहे. त्याला नेमके माहीत होते, आज आपल्याला जगात किंमत आहे ती आपल्या फलंदाजीमुळे. तिथे मेहनत घेण्यात त्याने कधीही कुचराई दाखवली नाही आणि आपली बॅट नेहमीच तालेवार ठेवली. जगात त्याला सर्वतोपरी मानायला मिळत असताना अचानक त्याला जाणवले, आता आपल्याला थकायला होत आहे आणि ही जाणीव झाली आणि त्याने निवृत्ती स्वीकारून जगाला आश्चर्याचा धक्का दिला. असे खेळाडूं इतिहासात फार क्वचित जन्माला येतात आणि आमच्या पिढीचे भाग्य असे की असा खेळाडू आम्हाला डोळे भरून बघता आला.

Friday, 28 August 2020

सुनील गावस्कर

उंची साधारण सव्वा पाच ते साडे पाच फूट, कुरळे केस, शरीरयष्टी काहीशी स्थूलत्वाकडे झुकणारी, नजर मात्र अति तीक्ष्ण पण पहिल्या दर्शनात या व्यक्तीकडे काही असामान्य गुण असतील, याची काहीशी शंका यावी असे व्यक्तिमत्व!! परंतु एकदा हातात बॅट आली की हा एका अलौकिक तेजाने तळपायला लागायचा. सामना कुठला ही असू दे, हा नेहमीच शांतपणे तंबूतून बाहेर पडणार, स्टम्पजवळ येणार आणि अम्पायरकडे "मिडल गार्ड" मागणार. जगभर बहुतांशी फलंदाज "लेग गार्ड" घेतात परंतु हा वेगळाच!! "मिडल गार्ड" घेण्यात कायम एक धोका असतो, चेंडू खेळताना फलंदाज ऑफ स्टम्पकडे थोडासा "शफल" होत असतो आणि इथे सर्वात मोठा धोका उद्भवतो - मिडल स्टम्पवरून ऑफ स्टम्पवर शफल होताना आपला लेग स्टम्प उघडा राहू शकतो आणि जर का चेंडूचा अंदाज चुकला ते त्रिफळाचीत होण्याचा सर्वात जास्त धोका असू शकतो. परंतु इथे "अंदाज चुकला" हे शब्द या फलंदाजाबाबत येऊच शकत नसत इतका दुर्दम्य आत्मविश्वास होता. सुनीलला आयुष्यभर याच अदम्य आत्मविश्वासाने नेहमी साथ दिली. फॉर्म येतो, जातो, पुन्हा येतो. हे तर नेहमीचे नैसर्गिक चक्र असते परंतु आपला आत्मविश्वास कधीही डळमळीत होऊ द्यायचा नाही, हे सुनीलच्या आयुष्याचे ब्रीदवाक्य!! सुनीलचे तंत्र, त्याचे पदलालित्य, त्याचा अंदाज या विषयी असंख्य वेळा असंख्या लेख लिहिले गेले आहेत. प्रसंगी खोलवर विश्लेषण देखील केले आहे परंतु आत्मविश्वास ही चीज कुठेही उचलून दाखवता येणारी नसते, तिचा इतरांना प्रत्यय येत असतो. एक अविस्मरणीय क्षण आठवला. १९८२ साली भारतीय संघ पाकिस्तानमध्ये गेला होता आणि तेंव्हा इम्रानने आपल्या असामान्य इन्स्वीन्ग गोलंदाजीने धुमाकूळ घातला होता. भारत ही मालिका हरला होता. याच मालिकेत सुनील तेजाळून उठला होता. तिसरा कसोटी सामना चालू होता. इम्रानने दुसरा सामना एकहाती पाकिस्तानला जिंकून दिला होता आणि तिसरा सामना याच वाटेवर चालला होता फक्त मध्ये अडसर सुनीलचा होता. सुनीलने पन्नाशी गाठली होती आणि त्याच आत्मविश्वासाने त्याची फलंदाजी सुरु होती. इम्रानने (तेंव्हा इम्रान ताशी १५० कि.मी. वेगाने गोलंदाजी करीत होता) एक चेंडू त्वेषाने मिडल स्टम्पवर, काहीसा आखूड टप्प्याचा टाकला. सुनीलने क्षणभर चेंडूच्या बाउंसचा अंदाज घेतला आणि मिडल स्टम्पवरील चेंडू सोडून दिला!! सुनीलचा तो अंदाज बघून इम्रान थक्क झाला!! त्याला चेहऱ्यावरील आश्चर्य लपवता आले नाही!! जगातील सगळ्या फलंदाजांनी तो चेंडू निश्चितपणे खेळला असता - काहीही घडू शकले असते पण हा चेंडू स्टम्पवरून जाणार आहे तेंव्हा बॅट लावायची कशाला? आणि सुनीलने तो चेंडू विकेटकीपरकडे जाऊ दिला!! क्षण हा शब्द देखील मोठा आहे इतक्या निमिषार्धात घेतलेला अंदाज आणि निर्णय. इथे तंत्र तर आवश्यक होतेच परंतु चेंडूच्या बाउंसचा अचूक अंदाज घेणे, या कौशल्याला दाद द्यावी, अशी परिस्थिती होती. सुनीलचा स्टान्स अगदी सरळ, साधा होता. बॅट आणि पॅडमध्ये हवेला देखील जायची संधी मिळणार नाही इतक्या लगटून उभा राहायचा. एरव्ही काहीसा मिस्कील दिसणारा सुनील एकदा फलंदाजीला उतरला की संपूर्ण जगाला विसरून जायचा. जगाला विसरून पूर्णपणे एकाग्र होणे, ही बाब भल्याभल्यांना जमत नाही. एकाग्रता हा त्याचा अभेद्य भाता होता. त्या जोरावर सुनील खेळपट्टीवर संपूर्ण दिवस उभा राहायचा. गोलंदाज शिणून जायचे पण याच्या एकाग्रतेवर किंचितही परिणाम व्हायचा नाही. आमची पिढी खरोखर नशीबवान, सुनीलला आम्ही यथेच्छ बघितला, नसता बघितला नसून, त्यांच्या फलंदाजीतील सौंदर्याचा पुरेपूर उपभोग घेतला. त्याच्या काळात वेस्टइंडिजमध्ये ग्रीनिज, विव्ह, लॉइड सारखे "हातोडे" तर पुढे खुद्द भारतीय संघात, संदीप, कपिल, प्रसंगी दिलीप सारखे घणाघाती फलंदाज होते पण सुनीलने पहिली १२ वर्षे आपली शैली बदलायचा चुकूनही प्रयत्न केला नाही. समोर कितीही वादळे येवोत, सुनीलने आपला approach कधीही बदलला नाही. गरजच पडली नाही. याला म्हणतात आत्मविश्वास. फलंदाजीचे त्याचे तंत्र तर आजही निवृत्त होऊन, ३३ वर्षे झाली तरी वाखाणणलें जाते, किंबहुना "आदर्श" मानले जाते. ३३ वर्षे झाली म्हणजे फलंदाजीच्या ३ पिढ्या आल्या आणि गेल्या. फलंदाजीच्या तंत्रात आता आमूलाग्र बदल झाले. इतकेच कशाला बॅटीचे वजन, दर्जा इत्यादी फार पुढे गेले पण तरीही आजही फलंदाजीचे तंत्र म्हटल्यावर सुनील(च) डोळ्यासमोर येतो!! त्याने आपली शैली प्रथमच बदलली ती १९८३ मध्ये भारतात आलेल्या लॉईडच्या संघासमोर खेळताना. वेस्ट इंडिजचा संघ डिवचलं गेला होता आणि विश्वचषकातील, भारताकडून झालेल्या पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्याचा बदल घेण्याच्या उद्दीष्टानेच वेस्ट इंडिजचा संघ भारतात आला होता आणि कानपूरच्या पहिल्याच कसोटी सामन्यात याची चुणूक दिसली होती. आयुष्यात प्रथमच मार्शलच्या प्रलयंकारी वेगाने, सुनीलच्या हातातील बॅटीवरील पकड निसटली आणि सुनील बाद झाला. अशाप्रकारे बाद होणे ही नामुष्की तर होतीच पण सुनीलचा आत्मविश्वास खचवणारी घटना होती. याच पार्श्वभूमीवर दिल्लीला दुसरा कसोटी सामना सुरु झाला आणि सुनीलने आपले रौद्ररूप दाखवायला सुरवात केली. गेली १२ वर्षे म्यानात घालून ठेवलेला "हूक" चा फटका बाहेर काढला आणि मैदानावर आगीचा लोळ पसरायला लागला. मार्शल, होल्डिंग आणि डेव्हिस सारखे आग्यावेताळी गोलंदाज, पहिल्या कसोटीची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने गोलंदाजी करीत होते आणि सुनीलने त्यांना "हूक","पूल" तसेच चेंडू जरा ऑफ स्टम्पवर पडत आहे, लक्षात आल्यावर गुडघ्यात किंचित वाकून त्यांनी कव्हर ड्राइव्ह मारायला सुरवात केली. सगळा स्टेडियम तर अवाक झालाच होता पण आमच्यासारखे टीव्हीवर बघणारे, आपले डोळे विस्फारून हे "युद्ध" बघत होते. त्या दिवशी सुनीलने अगदी ठरवून मार्शलच्या गोलंदाजीवर प्रतिहल्ला चढवला होता. वेस्ट इंडिज संघ हतबल झाला होता. सुनीलकडून अतर्क्य अशी खेळी होत होती. मार्शलने आखूड टप्प्याचे चेंडू टाकले की सुनील किंचित बॅकफूटवर जात असे आणि खांद्यातून हूक मारीत असे. असे थोडा वेळ चालल्यावर लॉइडने स्क्वेयर लेग आणि लॉन्गलेग इथे क्षेत्ररक्षक ठेवले पण त्या दिवशी सुनीलने त्यांच्या मधून पूल आणि हूकचे फटाके मारून चौकार वसूल केले. हा अलौकिक प्रतिहल्ला होता. आपले तंत्र किती अचूक आहे याची प्रचिती त्याने आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात दिली. बंगलोरची खेळपट्टी म्हणजे फलंदाजीचे स्मशानघर होते आणि मंदगती गोलंदाजांना नंदनवन होते. पाकिस्तानच्या दोन्ही इंनिंग्स मध्ये एकानेही पन्नाशी गाठली नाही तर भारताच्या पहिल्या इनिंगमध्ये फक्त दिलीपने ५० धावा केल्या होत्या पण याच पार्श्वभूमीवर भारताला शेवटच्या दिवशी २२५ धावा करायच्या होत्या. या डावात इम्रानने एकही षटक टाकले नाही!! सुरवातच अक्रमने केली आणि दुसऱ्या बाजूने इकबाल कासीम आणि तौसिफ़ अहमद यांची दुतर्फा मंदगती गोलंदाजी सुरु केली. मंदगती गिलंदाजी जरी असली तरी आखूड टप्प्याचा चेंडू फलंदाजाच्या खांद्यापर्यंत, क्वचित त्याच्याही वर उसळत होता आणि चेंडू अक्षरश: १८० अंशाच्या कोनात फिरत होता. धावा करणे तर बाजूलाच राहो पण तिथे नुसते उभे राहणे अशक्य होते आणि इथे सुनीलने आपला खरा दर्जा दाखवला. गोलंदाज धार्जिण्या खेळपट्टीवर कसे खेळायचे याचा असामान्य धडा घालून दिला. त्याने ९७ धावा केल्या पण एका अकल्पित असलेल्या चेंडूने त्याचा बळी घेतला. सुनीलला सामनावीर म्हणून गौरवले पण भारत फक्त १६ धावांनी सामना हरला. आजही सुनीलची ती बॅटिंग आदर्श म्हणून गौरवले जाते. मी ती इनिंग पहिल्या चेंडूपासून बघितली (टीव्हीवर!!) आणि खरोखर सुनीलला मनापासून लोटांगण घातले. अचानक उसळलेला चेंडू असला तरी सुनीलची बॅट चेंडूच्या रेषेत यायची आणि बॅटीवरील उजवा हात किंचित हलका करायचा आणि निव्वळ डाव्या हाताने बॅट ढालीसारखी पुढे आणायची आणि डिफेन्सिव्ह फटका खेळायचा पण तो कसा? तर बॅटीने चेंडू अडवताना चेंडू आपल्या पायाशीच पडणार आणि कुठेही इतरत्र जाणार नाही याची खात्री करून देणार!! किती अलौकिक तंत्र आहे हे!! सुनीलने भारताला अनेक गोष्टी शिकवल्या. मुख्य म्हणजे सलामीच्या फलंदाजीचा प्रश्न कायमचा निकालात काढला. सलामीला येऊन वेगवान गोलंदाजी कशी खेळायची, याचे तंत्र शिकवले, भारतीय संघाला आत्मविश्वास दिला. सुनीलने अपवाद प्रसंग वगळता मैदानावर फलंदाजी करताना कधीही आक्रस्ताळेपणा केला नाही, जरुरी भासलीच नाही. आजूबाजूला कितीही "स्लेजिंग" झाले तरी सुनील बर्फाप्रमाणे थंड असायचा. फलंदाजीचे असामान्य तंत्र शिकवले. क्रिकेट पुस्तकातील प्रत्येक फटका त्याच्या भात्यात होता आणि त्याचा त्याने सढळ हाताने उपयोग केला. सुनील, कव्हर ड्राइव्ह मारणार म्हणजे तो copy book style असणार याची ग्वाही दिली. फलंदाजीचे तंत्र त्याला शरण गेले होते. या बुटुक बैंगण फलंदाजाने भारताला क्रिकेटचे वेड लावले आणि Original Little Master ही उपाधी कायम सार्थ करून दाखवली. सुनील कधीही मैदानावर विजेप्रमाणे लखलखून गेला नाही तर देवघरातील नंदादीपाप्रमाणे शांतपणे तेवत राहिला. सुनील निवृत्त झाला आणि हा नंदादीप विझला!!

Wednesday, 26 August 2020

जिंदगी देनेवाले सुन

Avinash, Mahendra गुणवत्ता आणि परिणामकारकता यांचे स्थान अढळ रहावे याकरिता भाषिक श्रव्याच्या शक्ती गद्य,पद्य,पाठ आणि गीत या मार्गांचा अवलंब केला जातो. माहिती, विचार, कल्पना,भावना संज्ञापनासाठी निवेदन,भाषण,कथन आणि गायनशैली वापरल्या जातात. तसे पाहता त्यांना शैली न म्हणता कोटी म्हटले पाहिजे. कारण अनुभूतीच्या भाषिक संघटनांचे आणि आविष्कारांचे हेच खरे मूलभूत साचे आहेत. गीत आविष्काराचे हे एक मूलभूत तत्व मानता येऊ शकते. याचाच पुढील विचार म्हणजे सुरावट,लयबंध भाषेबरोबर हातमिळवणी किंवा हालचालींसह यांचे निर्देश संगीताशय म्हणून केले पाहिजेत. हिंदी चित्रपट संगीताकडे गांभीर्याने बघणे अभ्यासकांना जमले नाही किंवा त्यांनी उत्साह दाखवला नाही याचे आणखी एक कारण बघणे योग्य ठरेल. इथे आणखी एक मुद्दा विचारार्थ घ्यावा लागेल. हिंदी चित्रपट संगीताच्या स्वरूपातील काही अंगभूत गुणधर्मामुळे त्यास बाजूला ठेवले जात आहे का? विविधता, लोकप्रियता इत्यादी कारणांखेरीज हिंदी चित्रपट संगीताचा विचार इतक्या कसोशीने करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे सांगीत कल्पनांच्या अभिसरणातील त्यांची भूमिका. इथे दोन विचार गृहीत धरावे लागतील. या संगीतामुळे पसंत वा मान्य ध्वनी, आवाज, सादरीकरणाच्या लयी तसेच संगीताची योजना करण्याचे प्रसंग यांविषयी सार्वत्रिक प्रथा रूढ होऊ लागल्या आहेत. अर्थात हा भाग दोषी नाही पण याला दुसरी बाजू अशी आहे, अत्यंत बहुविध आणि पुष्कळ बाबतींत विचक्षण नसलेल्या श्रोते-प्रेक्षकांमुळे हिंदी चित्रपट संगीताचे स्वरूप ठरत असल्याने काही समान सांगीत बाबींचे व त्याच्या प्रभावांचे सर्वत्र वितरण होणे हा खरे निकृष्टाचा प्रसार अभावितपणे होतो. हा मुद्दा देखील विचारात घेणे जरुरीचे आहे. आणि याच विचारांतून आपण आजच्या " जिंदगी देनेवाले सुन" या गाण्याचा आस्वाद घेणार आहोत. शायर शकील बदायुनी याचे, उर्दू शायरीत फार मानाने नाव घेतले जाते. त्याच्या काही रचना चित्रपटाव्यतिरिक्त अतिशय लोकप्रिय झाल्या आहेत.अर्थात चित्रपट गीतांमुळे त्यांचे नाव लोकप्रिय झाले कारण गैरफिल्मी गाणी म्हटली की लगेच आविष्काराचे स्वरूपच बदलते आणि अधिक करून शब्दाधिष्ठित स्वररचना (याचाच दुसरा अर्थ वाद्यमेळाची चैन न परवडणे) हेच अंग मान्य होते अर्थात त्यामागे अर्थकारण हा मुद्दा महत्वाचा ठरतो. प्रस्तुत गाण्याची शब्दरचना ही पारंपरिक गीतलेखनाप्रमाणे आहे. प्रत्येक अंतरा लिहिताना साधारणपणे ४ ओळींचा असावा जेणेकरून संगीतकाराला चाल बांधण्यासाठी बराच वाव मिळावा. गझल वृत्तात एकूणच शब्दसंख्या मर्यादित आणि हाताशी फक्त २ ओळी असतात आणि त्यात पुन्हा वृत्ताचे स्वतःचे असे वेगळे निकष असतात, हा भाग वेगळा. गीत म्हटले के एकाच कल्पना अनेक प्रकारे फुलवता येते, प्रसंगी निरनिराळ्या प्रतिमा संयोजन करायला वाव मिळतो. आता इथे नायकाची, ईश्वराकडे व्यक्त केलेली व्याकुळ मन:स्थिती आहे तेंव्हा त्याच भावनेचे प्रकटीकरण, हीच साध्य आहे. तेंव्हा याच भावनेला केंद्रित करून मग "रात कटती नहीं" , "जख्म ऐसा दिया", "आंख वीरान हैं" या आणि अशा अनेक ओळींतून मुखड्यातील मध्यवर्ती कल्पना अधिक खोलवर आणि स्पष्टपणे मांडण्यात आली आहे. जरा बारकाईने वाचले तर अंतऱ्यांमधील अक्षरसंख्या समान नाही परंतु चाल बांधताना आणि त्याचे गायन करताना कुठेही विक्षेप येत नाही. संगीतकार गुलाम मोहम्मद यांची स्वररचना आहे. या संगीतकाराची बहुतेक कारकीर्द ही नौशाद या संगीतकाराचा सहाय्यक या भूमिकेत गेली (१९७० च्या दशकातील "पाकिझा" चित्रपट येईपर्यंत गुलाम मोहम्मद यांना फारशी लोकप्रियता लाभली नाही!!) असे असून देखील जेंव्हा केंव्हा त्यांना स्वतंत्रपणे संगीत द्यायची संधी लाभली तेंव्हा त्यांनी आपला दर्जा दाखवून दिला. चाल "भूपाली" (भूप) रागावर आधारित आहे. या रागात मराठीमध्ये भरपूर भूपाळी रचना झाल्यामुळे हा राग सकाळचा आहे असे बऱ्याचजणांना वाटते परंतु शास्त्रानुसार या रागाचा समय सायंकालीन आहे!! "मध्यम" आणि "निषाद" स्वरांना वर्जित ठेवणारा जरी "औडव/ औडव" असला तरी या रागातील प्रत्येक स्वराला, स्वरविस्तार करायला प्रचंड वाव आहे आणि बहुदा म्हणूनच हा राग ललित संगीतात मानाचे स्थान पटकावून आहे. मुखड्याची ओळ "जिंदगी देनेवाले सून" ऐकताना मध्येच किंचित "निषाद" ऐकायला मिळतो परंतु या ओळीवर "धैवत" आणि "रिषभ" या स्वरांचेच प्राबल्य आहे. ललित संगीतात रागाचे Blending केले जाते ते असे. अर्थात आपण हा तांत्रिक भाग इथेच सोडून देऊया. यामध्ये महत्वाचा मुद्दा असा येतो, आपण या रागचौकटी कटाक्षाने व शास्त्रोक्त राग म्हणून वापरतो असा अट्टाहास त्यांच्या चालीत जाणवत नाही. गीत बांधताना कुठेही शब्दांची ओढाताण झाली किंवा चाल मागे-पुढे झाली असे अजिबात भासत नाही. गीतकाराच्या नजरेतून बघायचे झाल्यास, हा स्वप्नसाध्य योग्य म्हणायचा!! या गीताचा आरंभ होतो, तो पाश्चात्य तंतुवाद्यावर स्वरावली (कॉर्ड्स) छेदून आणि गीत सुरु होईपर्यंत याचे चलन भूप रागाचे आहे याचा अंदाज लागत नाही. तरीही संगीतकाराने गीताचे चलन असे ठेवले आहे , की एकाच वेळी आपण रागात असतो पण आणि नसतो देखील!! या रंगाचे शास्त्रोक्त ज्ञान नसलेल्या श्रोत्यासही गीताचे बदलते भावरंग जाणवतात कारण हा राग भारतीय सांगीत संस्कृतीत फार खोलवर रुजलेला आहे. एकूणच कारकिर्दीकडे बारकाईने बघितल्यास, नबाबी मुस्लिम समाज हा भारतीय संस्कृतीचा एक थर अभिजात, नांगर पण दुबळा आणि ऱ्हासाकडे झेपावणारा,त्याचबरोबर संपन्नतेने जगण्याचा आणि आत्मघात करणारा. याच संस्कृतीला गुलाम मोहम्मद यांनी तुला आणि बोलका प्रतिसाद दिला आणि ही कामगिरी निश्चितच महत्वाची ठरते. हे गीत गाईपर्यन्त गायक तलत मेहमूद याचा कंपायमान आवाज रसिकमान्य झाला होता. गीतातील संथपणा आणि शांतवृत्ती अधिक स्पष्ट आणि भावपूर्ण करण्यासाठी हाच कंपायमान सूर आवश्यक होता. आवाज भावनाकुल आहे पण भावविवश अजिबात नाही, ही या गायकाची खासियत होती. मुळात लखनवी संस्कार अंगी बाणल्यामुळे असेल पण गाताना, आपल्या हातातील काव्य हे किमान दर्जाचे असावे, हीच अभिलाषा या गायकाने कायम राखली. "जख्म ऐसा दिया के दिल भरता नहीं" या ओळीतील पहिलेच जोडाक्षर या दृष्टीने ऐकण्यासारखे आहे. विव्हळता आहे पण विसविशीतपणा नाही. शब्दातील आशय अचूक प्रकट केला आहे. किंवा शेवटच्या अंतऱ्यामधील "जिंदा रख्खा मगर जिंदगी छीन ली" या ओळीतील "रख्खा" सारखा अवघड आणि वजनदार शब्द किती मृदूपणे गायला गेला आहे. उर्दू भाषेत एकूणच शब्दोच्चार करताना शक्यतो व्यंजने सुद्धा "स्वरांकित" करताना हळुवार करतात. आता थोडे मूल्यमापन करायचे झाल्यास, तत्कालीन पुरुष गायकांपेक्षा त्यांची लोकप्रियता कमी होती का? तर निश्चितच होती असे म्हणावे लागेल. अर्थात प्रत्यक्ष गायकाचे म्हणणे असे आहे, "जरी एकूण गायलेली गीते संख्येने कमी असली तरी टी बहुतेक सगळी उच्च दर्जाची म्हणून लोकांच्या स्मरणात आहेत. हेच प्रमाण इतर गायकांनी गायलेल्या गीतांबाबत जेमतेम २५% पडेल!! अर्थात या विधानावर पुरेसा अभ्यास व्हायला हवा. परंतु बदललेल्या अभिनयशैलीशी त्यांचे गायन आणि आवाज जुळण्यासारखे नव्हते. आपण जी कोणती गीते गायची त्यांच्या संहितेबद्दल ते फार चोखंदळ होते आणि ही बाब मी वर उल्लेख केलेल्या लखनौचा वारसा म्हटल्यावर गृहीत धरावेच लागेल. याचा परिणाम त्यांच्या लोकप्रियतेवर घडणे क्रमप्राप्तच ठरते. जिंदगी देनेवाले सुन 'तेरी दुनिया से दिल भर गया मैं यहा जीते जी मर गया रात कटती नहीं दिन गुजरता नहीं जख्म ऐसा दिया के दिल भरता नहीं आंख वीरान हैं, दिल परेशान हैं गम का सामान हैं जैसे जादू कोई कर गया बेखता तुने मुझसे ख़ुशी छीन ली जिंदा रख्खा मगर जिंदगी छीन ली कर दिया दिल का खून, चूप कहां तकी रहूं साफ क्यूँ ना कहूं तू ख़ुशी से मेरी डर गया https://www.youtube.com/watch?v=W41jIwH4k9g

Monday, 24 August 2020

हेमराज वाडी - भाग ९

मुळावकर नाना आणि माझे नाना यांची आमच्या गृपवरील सगळ्या मित्रांवर थोडी जरबच होती. दोघांचे करडे डोळे असल्याने पहिल्यांदा काहीशी भीतीच वाटायची. मुळावकर नानाचे डोळे तसे गोल, गटगटीत आणि घारे असल्याने, आम्ही कधी मुळावकरांच्या घरी गेलो तर काकुंशीच अधिक बोलायचो. काकू मात्र अतिशय शांत, सोज्वळ आणि सतत हसतमुख असायच्या. घरी गेलो आणि काकूंनी हसून स्वागत केले नाही असे कधीच घडले नाही. याउलट आम्ही शाळेत असताना नानांशी संपर्क टाळण्याकडे आमचा सर्वांचा कल असायचा. हा माणूस कधी बोलला तर दरडावलेल्या सुरांतच बोलेल असे सुरवातीला वाटायचे. अर्थात पुढे माझी त्यांची चांगली ओळख झाली आणि नाना जसे आधी वाटले तसे नसून छान गप्पा मारायचे. विशेषतः त्यांच्या माझ्यात संगीत हा विषय सामायिक असायचा. एकदा धोबीतलाव जवळील बिर्ला मातोश्री सभागृहात उस्ताद विलायत खान यांच्या सतारीच्या कार्यक्रम होता आणि आम्ही काहीही न ठरवता थेट सभागृहापाशीच भेटलो. मीही शास्त्रीय संगीताच्या मैफिली ऐकतो याचे त्यांना थोडे कौतुक होते. आमची तिकिटे वेगवेगळी असल्याने कार्यक्रमाच्या वेळी काही बोलता आले नाही परंतु कार्यक्रम संपल्यावर आम्ही दोघे चालत,चालत घरी परतलो आणि घरी येताना माझी भूमिका श्रोत्यांची होती. जवळपास तासभर एकत्र होतो आणि तो सगळा तास, नाना माझ्याशी, त्यांनी ऐकलेले कलाकार, या विषयावर बोलत होते. नाना तसे जुन्या गोष्टींबद्दल अभिमानी, विशेषतः व्ही.शांताराम बद्दल त्यांना प्रचंड अभिमान होता. मुळावकर काकू मात्र संपूर्ण वेगळ्या स्वभावाच्या. आम्हा मुलांच्यात येऊन बसत आणि आमच्यात सहज मिसळून जात. एका वर्षी आम्ही मित्रांनी ठरवले, मुळावकरांच्या घरात जो गणपती येतो, तो आपण सगळ्यांनी एकत्रितपणे साजरा करायचा. परवानगी घेण्यासाठी अर्थात काकू मदतीला आल्या आणि लगोलग काकूंनी होकार दिला. मुळावकरांच्या घरातील गणपती पण आता आम्ही सगळ्यांनी पुढाकार घ्यायचे ठरवले. मग लगेच डेकोरेशन, मूर्ती वगैरे बाबी पूर्ततेसाठी सगळ्यांचा एकत्रित सहभाग होता. त्यानिमित्ताने आम्ही खरेतर आमचीच हौस भागवीत होतो. आमचा गोविलकरांचा गणपती त्यावेळी नायगाव इथे माझे काका रहात होते, त्यांच्या घरी यायचा. परिणामी गणेश चतुर्थीच्या आदल्या रात्री (रात्रभर जागायचे आकर्षण अधिक असायचे) आम्हाला काकांच्या घरी जायलाच लागायचे. त्यामुळे बाकीच्यांचा थोडा हिरमोड व्हायचा. परंतु पहिल्या दिवशीच आम्हा गोविलकरांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा झाल्यावर आम्ही लगोलग मुळावकरांकडे जात असू. आता गौरी गणपती म्हटल्यावर, चार दिवस धुंदीत जायचे. राजू त्यावेळीही हौशी नकलाकार म्हणून पुढे येत होता आणि मग गणपतीच्या रात्री मनोरंजाचे कार्यक्रम म्हणून राजुच पुढे असायचा. एके वर्षी, कुमार गोखलेंच्या धाकट्या भावासोबत राजुने गाणे म्हटल्याचे ठळक आठवत आहे, कुमारचा भाऊ तेंव्हा तबला शिकत होता. मला वाटते, सलग ३,४ वर्षे आमचा उत्साह टिकला होता. पुढे वयोमानानुसार सगळे आपापल्या दिशांनी गेले आणि आता फक्त स्मृती उरल्या. तशीच एक आठवण कायम मनात राहिली आहे. E ब्लॉकमधील तिसऱ्या मजल्यावर लपालीकर कुटुंब रहात होते - त्यांच्याकडे एकत्र कुटुंब पद्धत असल्याने नंदू आणि राजेश (वयाने हे दोघे आमच्यापेक्षा बरेच लहान आहेत) यांचे आई/वडील आणि त्यांच्यासह अनिल,अरुण,शरद लपालीकर एकत्र रहात होते. त्यांच्याकडे ११ दिवसांचा गणपती यायचा. त्यांचे तसे मोठे कुटुंब होते त्यामुळे गणपतीच्या दिवसात त्यांच्या घरात बरीच वर्दळ असायची. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मात्र आम्ही सगळे त्यांच्या कडे महाआरतीला जमत असू. माझ्या आठवणीत, सुरवातीला तरी त्यांच्या गणपती विसर्जनाला आम्ही सगळे जात होतो (पुढे त्यांनी हेमराज वाडीच्या सार्वजनिक गणपतीसह न्यायला सुरवात केली न ते फार तर २ एक वर्षेच टिकले आणि पुन्हा त्यांनी स्वतंत्रपणे विसर्जनाला सुरवात केली) आम्ही सगळे विसर्जनाला येत आहोत म्हणून नंदूचे वडील ( त्यांचे आवडते नाव "पपूशेट!!) आम्हाला गिरगाव चौपाटीवर भेळ वगैरे खायला घालत असत. त्यावेळी आम्हाला हे प्रचंड आकर्षण होते. त्यावेळी एकूणच बाहेर खाणे म्हणजे सोहळा असायचा. (याच सुमारास आमच्यातील सतीश अवचटला नगद १००/- मिळाले आणि त्याने ती नोट प्रदीपकडे दिली!! पण त्याचे वर्णन वेगळ्या लेखात) आम्हाला या दिवसाचे खरे आकर्षण म्हणजे हेमराज वाडीच्या गणपती विसर्जनाला वाजणारा बँड ( त्यालाच "कच्ची बाजा" म्हणतात) पुढे अनेक वर्षे आम्ही वाडीच्या विसर्जनाला जात होतो. आमच्यातील उदय पोवळे म्हणजे आमचा "गोपीकृष्ण"!! वाडीतच तो नाचायला सुरवात करायचा आणि सगळी वाडी त्याच्याकडे थक्क होऊन बघत असे. आम्ही त्यामानाने पांढरपेशे!! मूर्ती रस्त्यावर आली आणि घरापासून थोडी दूर गेली की आमचे पाय थिरकायला लागायचे. रात्रभर हा दंगा चालायचा. खरतर त्यावेळचा सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे एका प्रबंध लेखनाचा विषय आहे.

हेमराज वाडी - भाग ८

१९७३ च्या अखेरीस म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात कधीतरी आमच्या घरी Televista कंपनीचा टीव्ही आला. आजच्या भाषेत बोलायचे झाल्यास, It's BREAKING NEWS. त्यावेळी घरात स्वतंत्र फोन असणे किंवा फ्रीज तसेच नव्याने आलेला टीव्ही असणे, या सगळ्या चैनीच्या गोष्टी होत्या. त्यावेळी टीव्हीवर फक्त दूरदर्शनची २,३ चॅनेल्स होती. चॅनेल बदलून बघणे हा आश्चर्याचा भाग होता आणि त्यासाठी आपल्या हातात रिमोट ठेवणे म्हणजे जडजवाहीर बाळगण्यासारखे होते. अर्थात आमच्या घरी टीव्ही आला म्हणजे आमच्या ग्रुपचे आमच्या घरात वावरणे वाढायला लागले. त्याकाळी मनोरंजनाची साधने बरीच मर्यादित असत त्यामुळे टीव्हीवरील कार्यक्रम बघणे हा आनंदाचा भाग होता, विशेषतः संध्याकाळी ७ नंतर दूरदर्शन झाले म्हणजे आमही सगळे टीव्हीला चिकटून बसत असू. तशात नुकताच "छायागीत" हा हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम सुरु झाला - मला आठवते त्याप्रमाणे "छायागीत" कार्यक्रम दर गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास लागायचा. आमचा गृप सगळी जेवणे आटोपून आमच्या घरी, अगदी भक्तिभावाने येत असत. आज कुठल्या चित्रपटाची गाणी लावणार, याचे प्रचंड औत्सुक्य असायचे. तशात १९७४ च्या मार्च किंवा एप्रिलमध्ये टीव्हीवर भारत/इंग्लंड क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण दाखवायची घोषणा झाली. टीव्हीवर क्रिकेट सामन्याचे चित्रीकरण होणार आणि आपल्याला सामन्यातील प्रत्येक बॉल बघायला मिळणार - It was mega event. त्याकाळी माझ्या घरी टीव्ही आहे, हीच बातमी आमच्या शाळेत तसेच गिरगावात नवलाची होती. टीव्हीवर सामन्याचे चित्रीकरण होणार म्हणून शाळेने नेहमीची वेळ बदलून घेतली आणि पुन्हा पहाटेचे वर्ग ठेवले. सकाळी ९ च्या सुमारास शाळा सुटली की आम्ही सगळे तडक घराच्या वाटेवर!! पहिला दिवस तसा ठीक ठाक गेला म्हणजे घरात आमचे मित्र आणि काही नातेवाईक वगळता फारसे कुणी आले नव्हते परंतु दुसऱ्या दिवशीपासून गिरगावातील अनेकजण - "मी अनिलचा मित्र आहे","मी राजुच्या वर्गातील मित्र" असे सांगून घरात प्रवेश करायला लागला. एक वेळ अशी आली, महालाच आमच्याच घरात बसायला जागा नव्हती!! मग मात्र माझे वडील - नाना जरा ताणात आले आणि घराच्या दरवाजातच बसायला लागले. कुणी आमची ओळख दाखवायला लागला की नाना मला किंवा राजू किंवा मोहनला हाक मारीत आणि तिथेच ओळख पटवून घेत अन्यथा त्याला पुन्हा बाहेरचा रस्ता दाखवीत. सलग ५ दिवस घरात सामन्याचा ज्वर पसरला होता. आमच्या गृपमधील त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील येत असत. अर्थात त्यांना माझे आई-नाना ओळखत असल्याने काही प्रश्नच नव्हता. मला आठवत आहे, त्यावेळी प्रथमच सुरेशची ताई आमच्या घरी मॅच पाहायला आली होतो तसेच मुळावकर नाना आले होते. आमचे सगळ्यांचे एकमेकांच्या घरात कायमच येणे-जाणे असायचे आणि इथे काहीच वाटत नसे. मी दिवस कधीही मोघे किंवा मुळावकर, यांच्या घरात जात असे आणि त्यांना देखील माझे येणे ही सवयीची बाब झाली होती. हा आमचा गृप तर बरेचवेळा आमच्या घरी येत असे. एक आठवण. त्यावेळी मला आईने टेबल टेनिसच्या दोन रॅकेट्स आणून दिल्या होत्या, अगदी त्याकाळच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा सॅन्डविच रबराच्या. अर्थात टेबल टेनिसचे बॉल येणे क्रमप्राप्तच असायचे. त्यावेळी टेबल म्हणून आम्ही घरातील जेवणाचे टेबल वापरात असू. त्यावेळी नेट म्हणून टेबलाच्या मध्यभागाच्या टोकाशी २ वाट्या ठेवायच्या आणि त्याच्यावर कपडे वाळत घालायची काठी ठेवायची म्हणजे आमचे नेट तयार झाले. असे टेबल टेनिस मी आणि विशेषतः सुरेश, आमच्या घरी तासंतास खेळत असायचो. माझी आई तेंव्हा पोलीस खात्यात नोकरी करायची आणि नाना दिवसभर त्यांच्या कामात गर्क असायचे तेंव्हा घरात फक्त आमचेच राज्य असायचे. अर्थात हेमराज वाडीतील E ब्लॉकची गच्ची म्हणजे आमचे साम्राज्य होते. आज कळते, या गच्चीच्या आमचे भावविश्व संपूर्णपणे व्यापून टाकले होते. अक्षरशः दिवसभर आम्ही या गच्चीत निव्वळ हुंदडत असायचो. पावसाळा आला की क्रिकेटवर थोडी बंधने यायची आणि मग पावसाळी खेळ सुरु व्हायचे - त्यातलाच एक खेळ म्हणजे "कित्ती कित्ती"!! अगदी साधा खेळ होता. ग्रुपचे २ संघ बनवायचे आणि टॉस करायचा. जो संघ टॉस हरायचा, त्या संघातील सदस्य कमरेत वाकून एकमेकांना धरून गच्चीच्या भिंतीच्या सहाय्याने ओणवे होत असेआणि दुसरा संघ थोडा धावत येऊन त्यांच्या पाठीवर उद्या घेत असे. जे ओणवे असत त्यांच्या पाठी सणसणीत सडकून निघत. त्यातून राजू आणि मोहन पहिल्यापासून जरा "वजनदार" प्रकृतीचे असल्याने त्यांची उडी म्हणजे मनातून एकदम आय - माय निघायची!! अशा प्रकारे खालच्यांच्या अंगावर मांड ठोकली की मग वरील सदस्यांतील कप्तानाने, हाताची बोटे कधी दोन,दोन किंवा कधीकहदी तीन,तीन बोटे उभारायची आणि विचारायचे "कित्ती कित्ती". खालच्यांनी ओळखले तर मग परत विरद्ध संघावर असेच ओणवे राहायला लागायचे. आता यात एक गंमत अशी होती, ओणवे राहिलेल्यांनी बरोबर ओळखले की नाही याचा पडताळा कसा घ्यायचा म्हणून एकाला "पंच" म्हणून नियुक्त करायचे!! यात आणखी एक मखलाशी असायची. आमच्यातील बहुतेकांची शरीरयष्टी हे तशी यथातथाच असायची त्यामुळे अंगावरील वजन पेलणे, ही खरी परीक्षा असायची आणि तिथे कधी कधी मनाचा तोल डळमळीत व्हायचा आणि ओणवे झालेले खाली पडायचे - परिणामी त्यांनी पुन्हा ओणवे राहायचे. अशा वेळी जे अंगावर उद्या मारतील ते, ओणवे झालेल्यांमधील काहीसे हडकुळे शरीर ध्यानात ठेऊन, त्याच्या पाठीवर राजू किंवा मोहनला उडी मारायला सांगायची!! त्यांची उडी अंगावर पडली की झेलणारा अक्षरश: शिवराळ भाषा वापरायचा (शिवराळ भाषा वापरणे यात काही गैर आहे असे गिरगावातील कुणाही व्यक्तीला वाटायचे नाही. ती आमची मौखिक "संस्कृती" होती/आहे) काही काही वेळेस पाठ अशी शेकून निघायची की आपले सगळे पितर आठवायचे. त्यातून पाऊस असला म्हणजे अंगावरील कपडे ओले असायचे आणि त्या ओल्या कपड्यांवर असली "ओझी" सांभाळायची म्हणजे एक दिव्य असायचे.