Sunday, 12 May 2024
विश्वनाथ - मेलबर्न - १९८१
काही फलंदाज हे केवळ *स्वयंप्रकाशी* नसून चैतन्याचा नवनवीन आविष्कार घडवीत असतात. ते जेंव्हा मैदानावर असतात, तेंव्हा सगळ्या प्रेक्षकांचे आकर्षण बिंदू असतात, जणूकाही मैदानावर फक्त त्यांचेच अस्तित्व भासावे. त्यांच्या खेळातील लयकारी ही फक्त त्यांचीच असते. विश्वनाथ तसा बुटक्या चणीचा पण एकदा का लय सापडली की तिथे फक्त त्याचेच स्वामित्व असायचे. विश्वनाथच्या कारकिर्दीचे अत्यंत महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, जेंव्हा केंव्हा त्याने शतकी खेळी साकारली (त्याची शतकी खेळी बघणे, हा नयनरम्य सोहळाच असायचा) त्या प्रत्येक वेळी, एकतर भारत सामना जिंकला होता किंवा अतिशय सन्मानाने अनिर्णित ठेवला होता. एका दृष्टीने, विश्वनाथ हा ख-या अर्थाने match winner होता! असे खेळाडू फार दुर्मिळ असतात आणि अशाच खेळाडूने, १९८१ च्या Australia मालिकेत, वर दर्शविलेली असामान्य खेळी साकारली आणि पुढे कपीलला गोलंदाजीसाठी मैदान मोकळे ठेवले. मेलबर्नची खेळपट्टी ही पहिल्याच दिवसापासून *आखाडा* झाली होती. प्रतिस्पर्धी संघात त्यावेळी *लिली, पास्को आणि Hogg* सारखे प्रलयंकारी गोलंदाज होते. लिली जरी १९७१ वेळेचा वेगवान गोलंदाज नसला तरी त्याच्या भात्यात, अनुभवाच्या जोरावर बरीच आयुधे होती जेणेकरून समोरील फलंदाज, त्याला निमुटपणे शरण जात असत. बाकी दोघे तर तरूण आणि प्रचंड वेगवान गोलंदाज होते. सिडनीच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात, संदीप पाटीलने, पास्कोचा वेग अनुभवला होता. खेळायला लागणारा चेंडू किती आणि कसा उसळेल, याची खुद्द गोलंदाजाला देखील पूर्ण कल्पना नव्हती. भारताची सुरवात अत्यंत डळमळीत झाली. सुनील, चौहान, दिलीप फक्त *हजेरी* लावून परतले होते. एकतर, सिडनेचा सामना, भारत हरला होता आणि त्या पराभवाची पुनरावृत्ती होते की काय, अशी पाल चुकचुकायला लागली होती. मालिकेचा *हिरो* संदीप आणि विशी, एकत्र आले. When things go tough, player gets more tougher, याची चुणूक दिसायला लागली. विशीने आपली कलाकारी पेश करायला सुरुवात केली. लिलीने किंचीत आखूड टप्प्याचा आऊट स्विंगर टाकला आणि विशी च्या मनगटाने, *स्क्वेअर ड्राइव्ह* मारून, ताटात पुढे काय वाढून ठेवले जाणार आहे, याची झलक दाखवली. वास्तविक पहाता, विशीने काय केले, चेंडू उसळत असतानाच, आपली बॅट उजव्या खांद्यावर अनंत, उजवा पाय ऑफ स्टम्पजवळ आणून, उसळणाऱ्या चेंडूला *स्क्वेअर पॉईंट* दिशेने भिरकावून दिला. लिलीसारख्या गोलंदाजाला अशी वागणूक मिळणे, हे सहन होण्याच्या पलीकडचे, विशेषतः एखाद्या भारतीय संघातील खेळाडूकडून!! त्यावेळी विश्वनाथ आपल्या खेळीला *आकार* देण्यात मग्न होता. पदलालित्य दिसायला नुकतीच सुरवात झाली होती आणि एक अजरामर खेळी सुरु व्हायला लागली होती. जरा वेळाने, पास्कोला याच मनगटाची चुणूक दिसणार होती. *लेट कट* हा फटका (वास्तविक हा रूढार्थाने फटका नव्हे तर चेंडूला दिलेली दिशा होय) अतिशय धोकादायक म्हणता येईल. चेंडूचा अंदाज जरा देखील चुकला तर स्लिपमध्ये झेल जाण्याची शक्यता अधिक. पास्कोने आखूड टप्प्याचा चेंडू टाकला पण म्हणावा तितका उसळला नाही. विश्वनाथला याचा अंदाज आला (असा अंदाज येणे, इथेच खरा अनुभव कामाला येतो) आणि उजवा पाय ऑफ स्टम्पकडे आणला आणि चेंडूला स्लिपमधील गॅपमधून दिशा दिली!! निव्वळ मनगटी कौशल्य आणि वेळेचा ताळमेळ राखलेला. अर्थात क्रिकेट हा खेळ कायम वेळेशी गणित मांडून खेळला जातो. चेंडूला किंचित स्पर्श केले आटो आणि तितकीच गरज असते, ताशी १४०+ वेगाने येणाऱ्या चेंडूला, दंडातील ताकदीची गरज नसते.क्रिकेटमधील काही नयनरम्य स्ट्रोक्स पैकी हा स्ट्रोक. गोलंदाज आणि स्लिपमधील क्षेत्ररक्षकांचा अंदाज चुकणार, हा *भुलभुलैय्या* आहे. असाच एक फटका, त्याने पुन्हा लिलीला दाखवला. चेंडू किंचीत लेग स्टंपच्या दिशेने टाकलेला होता आणि क्षणार्धात पुन्हा उजवा पाय मागे सरकवून, पॅडवर येणाऱ्या चेंडूला *फाईन लेग* दिशेने दिशा दाखवली. चेंडू वाऱ्याच्या वेगाने सीमापार!! तरुणीच्या चेहऱ्याचे जे *आरस्पानी* सौंदर्य असे वर्णन केले जाते, तसेच सौंदर्य या फटक्यात दिसते. विशीचा खेळ आक्रमक होता, प्रसंगी धोकादायक वाटावा, असा होता पण तीच त्याची शैली होती. त्यामुळे त्याची हुकलेली शतके, अगदी नव्वदीत प्रवेश केल्यानंतरची शतके देखील बरीच सापडतात. अर्थात शतक हुकले, याची त्याला कधीच खंत नसायची. सुनीलला *टेक्निशियन* आजही मानले जाते. *फॉरवर्ड डिफेन्स* बघावा तर सुनीलचा. असे असून देखील विषयी त्या कलेत कुठेही कमी नव्हता. आपण शतकी खेळीचे वर्णन करताना, आपल्याला *सोडून दिलेले चेंडू* किंवा *नुसतेच बचावात्मक* खेळलेले चेंडू, गृहीत धरतच नाही, किंबहुना विस्मृतीत ढकलतो पण त्यामुळेच शतकी खेळीला जास्त मोल येत असते. या शतकी खेळीत, त्याने आपले *तंत्र* किती समृद्ध आहे, याची जाणीव करून दिली. *आखाडा* खेळपट्टीवर खेळताना, तंत्राची गरज अतिशय असते. लिली तसेच पास्कोचे कितीतरी चेंडू, विकेटकीपरकडे शेवटच्या क्षणी सोडून देण्यात, त्याचा अंदाज तितकाच अवर्णनीय होता. शेवटपर्यंत चेंडूवर नजर कायम ठेवायची आणि अखेरच्या क्षणी बॅट काढून घ्यायची आणि गोलंदाजाला हतबल करायची, ही कला देखील तितकीच मनोहारी म्हणायला लागेल. संपूर्ण सामन्यात हेच एकमेव शतक लागलेले. ऑस्ट्रेलिया संघात त्यावेळी, ग्रेग चॅपेल, डग वॉल्टर्स, बॉर्डर सारखे जगद्विख्यात फलंदाज होते पण खेळपट्टीवर,दोन्ही इनिंगमध्ये टिकता आले नाही.अर्थात दुसरी इनिंग तर ८३ धावात आटोपल्याने, शतकी खेळीचा प्रश्नच उभा राहिला नाही. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या खेळीत, कपिलने ६ बळी घेऊन, सामन्यावर आपला ठसा उमटवला, हे खरेच आहे पण कपिलला, तसे मोकळे मैदान, विशीच्याच शतकी खेळीने निर्माण करून दिले, हे देखील लक्षात ठेवायला हवे. याच सामन्यात सुनीलच्या कारकिर्दीतील अत्यंत अप्रिय प्रसंग घडला. पण तो वेगळ्या लेखाचा विषय आहे. विशीने शतक लावले आणि भारताने, सामना सन्मानजनक जिंकला आणि मालिका बरोबरीत सोडवली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment