Saturday, 29 August 2020
सुनील गावस्कर - भाग २
१९८३/८४ मधील रणजी करंडकासाठीचा दिल्ली आणि मुंबईमधील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम मध्ये होता. त्यावेळी दिल्ली आणि मुंबई संघ हे जवळपास तुल्यबळ होते, अर्थात मुंबई संघाची फलंदाजी अधिक खोल आणि भरवशाची होती. मी आणि माझ्या तेंव्हाच्या ऑफिसमधील काही सहकाऱ्यांनी ५ दिवसांची सलग सुटी घेतली होती. आजही तो सामना माझ्या डोळ्यासमोर आहे. सकाळी नाणेफेक झाली आणि दिल्लीचा कॅप्टन, मोहिंदर अमरनाथने क्षेत्ररक्षण स्वीकारले. लंचपर्यंतच्या खेळाने, दिल्लीच्या समोर काय वाढून ठेवले आहे याची कल्पना आली. खेळपट्टी संपूर्णपणे फलंदाजी धार्जिणी होती आणि मोहिंदरने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून पायावर धोंडा पडून घेतला होता. दिलीप त्या वर्षी सर्वोत्तम फॉर्मात होता आणि त्याने ज्याप्रकारे शतक झळकावले त्यावरून कल्पना आली. त्या खेळीत क्रिकेटमधील सगळ्या फटक्यांचे नयनरम्य प्रदर्शन मांडले होते. दुसऱ्या बाजूने सुनील शांतपणे दिलीपची खेळी बघत होता आणि दिलीप असेपर्यंत त्याने दुय्यम भूमिका स्वीकारली होती. जसा दिलीप बाद झाला तशी सुनीलने सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली. दिलीप असे पर्यंत एकेरी, दुहेरी धावांवर समाधान मानणारा सुनील, हळूहळू आपल्या भात्यातून शस्त्रे काढायला लागला. आधीच दिलीपने दिल्लीच्या गोलंदाजांना हलवून सोडले होते आणि आता सुनीलने त्याच्यावर जखमा करायला सुरवात केली.
दिवसअखेर सुनील नाबाद राहिला होता. सुनीलने अक्षरश: दिल्लीच्या गोलंदाजांची पिसे लढली होती. खऱ्याअर्थी घाम गळायला लावला होता. गोलंदाजांना घाम गाळायला लावणे, त्यांच्या संयमाची परीक्षा बघणे, क्षेत्ररक्षकांना जराही संधी न देणे - ही सगळी सुनीलच्या फलंदाजीची खास वैशिष्ट्ये. सुनीलचा स्वतःवर अतुलनीय संयम होता. त्या जोरावर त्याने भल्याभल्या गोलंदाजांना, त्याच्यासमोर गुडघे टेकायला लावले होते आणि तरी सुनीलचे समाधान होत नसे. या सामन्यात त्याने द्विशतक काढले आणि तिथेच सामन्याचा निकाल स्पष्ट करून टाकला होता. सुनीलची एकाग्रता काय प्रतीची होती याचा पुरावा त्याने त्या दिवसाच्या शेवटच्या षटकाच्यावेळी दिला. दिवसभर सुनीलला बॉलिंग करून दिल्ली थकली होती आणि शेवटच्या ओव्हरमध्ये, गोलंदाजाने सुनीलच्या लेग स्टम्पवर, थोडा पुढे चेंडू टाकला ( तो हाफव्हॉली नव्हता) आणि सुनीलने (दिवसभर खेळून!!) तो चेंडू, सणसणीतपणे मिडविकेटमधून सीमापार धाडला!! एकाग्रता कशी असावी, याचा हा सुंदर धडा होता. दिवसभर त्याने गोलंदाजांना रगडून काढले.
सुनिलबाबत एक खासियत होती. सुनिलबाबत एक शक्यता असायची (जी शक्यता सगळ्या फलंदाजांबाबत असते) जेंव्हा सुनीलची नजर स्थिरावत नसते किंवा डावाच्या सुरवातीलाच, जेंव्हा सुनील खेळपट्टीचा अंदाज घेत असायचा तेंव्हा गोलंदाजांना त्याला बाद करायची संधी असायची. एकदा का त्याने २०,२२ धावा केल्या की मात्र जेंव्हा सुनील संधी देईल तेंव्हाच तो बाद होणार. जगातील कुठलाही फलंदाज हा सुरवातीला थोडा चाचपडत असतो मग त्याचे तंत्र कितीही अचूक असू दे. अशीच एक इनिंग मला आठवत आहे. पूर्वी मुंबईत "कांगा लीग" स्पर्धा असायची. त्यावेळी मुंबई फलंदाज अतिशय "खडूस" म्हणून प्रसिद्ध असायचे आणि त्या खडूसपणात या कांगा लीग स्पर्धेचा फार मोठा वाटा असायचा. ही स्पर्धा नेहमी पावसाळ्यात खेळवली जायची. मी या स्पर्धेतील बहुतांशी सामने हे शिवाजी पार्क इथे बघितले आहेत आणि सगळे सामने हे फक्त रविवारी(च) खेळले जायचे. रविवारी पाऊस नसला की सामना सुरु!! खेळपट्टी ओलसर आहे, आजूबाजूला गुडघ्याएवढे गावात वाढले आहे, असल्या तक्रारींनी जरा देखील वाव नसायचा. आजच्या T20 स्पर्धेची ही "जननी" म्हणता येईल. केवळ दिवसभराचा प्रश्न असायचा. हवा बहुतेकवेळा कुंद (टिपिकल इंग्लिश वातावरण) असायची परंतु तशा हवेतच हे सामने खेळवले जायचे. एके रविवारी "दादर युनियन" आणि "शिवाजी पार्क" या सांध्यात सामना होता. दादर युनियनमधून सुनील, दिलीप होते तर शिवाजी पार्क मधून संदीप,शिवलकर असे दिग्गज खेळाडू होते. सामन्यात १५० धावा झाल्या हणजे संघाच्या विजयाची शक्यता भरपूर कारण एकत्र खेळपट्टी ओलसर त्यातून Outfield म्हणजे प्रचंड वाढलेले गवत. त्यामुळे तुम्ही कितीही जोरदार फटका मारा, चौकार मिळणे दुरापास्त. अगदीच उंचावरून फटका मारला तरच चौकार मिळण्याची शक्यता. खेळपट्टी ओलसर असल्याने क्लब गोलंदाज देखील रॉबर्ट्स, होल्डिंग वाटायचा!! त्या सामन्यात सुनीलने पन्नाशी गाठली आणि दिलीपने त्याला चाळीस धाव काढून मौल्यवान साथ दिली आणि गंमत म्हणजे इतके असूनही संघाची धावसंख्या फक्त १२९!! संपूर्ण डावात फक्त दिलीपचा एक चौकार सामील होता आणि तो देखील दिलीपने हवेत उंच फटकावला होता म्हणून!! परंतु त्या खेळीत पुन्हा सुनीलने आपल्या तंत्राचे अप्रतिम प्रदर्शन केले. वास्तविक त्यावेळी सुनील,दिलीप,संदीप सगळे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे झाले होते तरीही ते हे सामने खेळायला आले होते. सुनीलने पन्नाशी गाठताना, आपल्या संयमाचे दर्शन घडवले होते. अशा खेळपट्टीवर खेळताना, शक्यतो चेंडूला ड्राइव्ह करणे धोक्याचे असते आणि चेंडू दोन फिल्डर्सच्या मधून काढण्याच्या कौशल्याला महत्व असते आणि तेच सुनीलने शांतपणे दाखवून दिले. संपूर्ण खेळी त्याने बॅकफूटवर सजवली. इथे मनाची खरी कसोटी लागते. अशा वेळी तुम्ही जागतिक कीर्तीचे खेळाडू आहेत याला काही किंमत नसते.
अशीच एक असामान्य खेळी मला आठवत आहे. १९८३ सालच्या वेस्ट इंडिज-भारत मालिकेतील शेवटचा सामना चेन्नई इथे होता. दिल्ली आणि अहमदाबाद इथे सुनीलने धुवांधार खेळी करून सगळ्यांना दिपून टाकले होते परंतु पुढील दोन सामन्यात सुनील अगदी लवकर बाद झाला आणि भारताचा पराभव झाला होता. परिणामी सुनीलवर, त्याच्या बदलत्या शैलीवरून टीका झाली. सुनील लवकर बाद झाला याला प्रमुख कारण अँडी रॉबर्ट्स होता. रॉबर्ट्स नुसताच वेगवान गोलंदाज नव्हता तर त्याच्याकडे फलंदाजाचे कच्चे दुवे शोधण्याचे असामान्य कसब होते. किंबहुना मी आता असे सहज म्हणू शकतो वेस्ट इंडिजची जी जगप्रसिद्ध वेगवान चौकडी झाली होती (रॉबर्ट्स,होल्डिंग,गार्नर,मार्शल आणि क्रॉफ्ट) त्यामागे फक्त रॉबर्ट्सचा खरा हात होता. त्याने या सगळ्यांना अक्षरश: घडवले होते. उगीच नाही सुनील आजही रॉबर्ट्सला श्रेष्ठ वेगवान गोलंदाज म्हणून मान्यता देतो. असो, शेवटच्या सामन्यापूर्वी सुनीलवर टीका झाली म्हणून सुनीलने आयुष्यात प्रथमच चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचे ठरवले परंतु दुर्दैवाने परिस्थिती अशी आली, पहिल्याच ओव्हरमध्ये मार्शलने भारताचे २ फलंदाज बाद केले आणि सुनीलला लगेच खेळायला येणे भाग पडले. ही खेळी म्हणजे सुनीलला जगात फलंदाज म्हणून का मान्यता मिळाली याचा अप्रतिम नमुना होता. अक्षरश: त्याने सगळ्या वेगवान गोलंदाजांना रगडून काढले इतके की सुनीलच्या १५० धावा झाल्या आणि तरीही त्याची भूक भागत नाही असे दिसल्यावर लॉइड आणि विव्ह पॅव्हेलियनमध्ये आराम करायला गेले!! या खेळीत सुनीलच्या खेळाचे सगळे सौंदर्य आढळले आणि मुख्य म्हणजे पूर्वीचा सुनील झगझगीतपणे समोर आला. रॉबर्ट्स, होल्डिंग, गार्नर आणि मार्शल, सगळे गोलंदाज थकले पण सुनीलची भूक मंदावली नव्हती. तब्बल २३६ धावा काढून सुनील परतला!! निव्वळ अजोड कौशल्याची प्रचिती देणारी खेळी होती. या खेळीच्या वेळेससुनीलला लोकांच्या टीकेला तर उत्तर द्यायचेच होते परंतु त्याशिवाय, अजूनही तोच पूर्वीचा सुनील कायम असल्याचे सिद्ध करायचे होते आणि ते देखील जगातील प्रलयंकारी वेगवान गोलंदाजांच्या समोर. त्या खेळीत अगदी ठरवून सुनीलने एकही चूक केली नाही. चूक केली आणि तो बाद झाला!! मनाचा निग्रह ही काय चीज असते याचे सगळ्या जगाला दर्शन घडवले.सुनील अशा प्रकारे ठरवून गोलंदाजांचा अंत बघत असे. गोलंदाज थकून जात पण सुनील तसाच खेळपट्टीवर नांगर टाकून उभा राहात असे. अशा दीर्घ केल्ली करायच्या म्हणजे तुमच्याकडे अचाट स्टॅमिना लागतो तसेच सर्वकाळ डोळ्यात तेल घालून खेळावयास लागते. एखादा चेंडू आपल्याला फसवून जातो परंतु त्यामुळे मनात नैराश्य न आणता, पुन्हा नव्याने डावाची उभारणी करायच्या कामाला जुंपून घ्यायचे!! ही बाब सहज जमणारी नव्हती आणि सुनीलने ती कमालीच्या सहजतेने वर्षानुवर्षे करून दाखवली.
आजही लॉइड,विव्ह, इयान चॅपेल, रिची बेनॉ सारखे असामान्य खेळाडू सुनीलला कुर्निसात करतात तो केवळ चार लोकांसमोर दर्शविण्याचा देखावा नसतो तर त्यामागे सुनील बद्दलची कृतज्ञता असते. वास्तविक या माणसाकडे कपिल, संदीप सारखी कसलीच "देणगी" नव्हती पण त्याची भरपाई सुनीलने अथकपणे नेट प्रॅक्टिस करून भरून काढली. कितीही आंतर राष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली, बहुमान प्राप्त झाले तरी सुनीलने नेट प्रॅक्टिस कधीही टाळली नाही आणि तिथे त्याने आपल्यातील कमतरता शोधून, त्यावर उपाय शोधण्याचा अथक प्रयत्न केला. ही जी निष्ठा होती, त्या निष्ठेची ही खरी किंमत आहे. त्याला नेमके माहीत होते, आज आपल्याला जगात किंमत आहे ती आपल्या फलंदाजीमुळे. तिथे मेहनत घेण्यात त्याने कधीही कुचराई दाखवली नाही आणि आपली बॅट नेहमीच तालेवार ठेवली. जगात त्याला सर्वतोपरी मानायला मिळत असताना अचानक त्याला जाणवले, आता आपल्याला थकायला होत आहे आणि ही जाणीव झाली आणि त्याने निवृत्ती स्वीकारून जगाला आश्चर्याचा धक्का दिला. असे खेळाडूं इतिहासात फार क्वचित जन्माला येतात आणि आमच्या पिढीचे भाग्य असे की असा खेळाडू आम्हाला डोळे भरून बघता आला.
Friday, 28 August 2020
सुनील गावस्कर
उंची साधारण सव्वा पाच ते साडे पाच फूट, कुरळे केस, शरीरयष्टी काहीशी स्थूलत्वाकडे झुकणारी, नजर मात्र अति तीक्ष्ण पण पहिल्या दर्शनात या व्यक्तीकडे काही असामान्य गुण असतील, याची काहीशी शंका यावी असे व्यक्तिमत्व!! परंतु एकदा हातात बॅट आली की हा एका अलौकिक तेजाने तळपायला लागायचा. सामना कुठला ही असू दे, हा नेहमीच शांतपणे तंबूतून बाहेर पडणार, स्टम्पजवळ येणार आणि अम्पायरकडे "मिडल गार्ड" मागणार. जगभर बहुतांशी फलंदाज "लेग गार्ड" घेतात परंतु हा वेगळाच!! "मिडल गार्ड" घेण्यात कायम एक धोका असतो, चेंडू खेळताना फलंदाज ऑफ स्टम्पकडे थोडासा "शफल" होत असतो आणि इथे सर्वात मोठा धोका उद्भवतो - मिडल स्टम्पवरून ऑफ स्टम्पवर शफल होताना आपला लेग स्टम्प उघडा राहू शकतो आणि जर का चेंडूचा अंदाज चुकला ते त्रिफळाचीत होण्याचा सर्वात जास्त धोका असू शकतो. परंतु इथे "अंदाज चुकला" हे शब्द या फलंदाजाबाबत येऊच शकत नसत इतका दुर्दम्य आत्मविश्वास होता. सुनीलला आयुष्यभर याच अदम्य आत्मविश्वासाने नेहमी साथ दिली. फॉर्म येतो, जातो, पुन्हा येतो. हे तर नेहमीचे नैसर्गिक चक्र असते परंतु आपला आत्मविश्वास कधीही डळमळीत होऊ द्यायचा नाही, हे सुनीलच्या आयुष्याचे ब्रीदवाक्य!! सुनीलचे तंत्र, त्याचे पदलालित्य, त्याचा अंदाज या विषयी असंख्य वेळा असंख्या लेख लिहिले गेले आहेत. प्रसंगी खोलवर विश्लेषण देखील केले आहे परंतु आत्मविश्वास ही चीज कुठेही उचलून दाखवता येणारी नसते, तिचा इतरांना प्रत्यय येत असतो.
एक अविस्मरणीय क्षण आठवला. १९८२ साली भारतीय संघ पाकिस्तानमध्ये गेला होता आणि तेंव्हा इम्रानने आपल्या असामान्य इन्स्वीन्ग गोलंदाजीने धुमाकूळ घातला होता. भारत ही मालिका हरला होता. याच मालिकेत सुनील तेजाळून उठला होता. तिसरा कसोटी सामना चालू होता. इम्रानने दुसरा सामना एकहाती पाकिस्तानला जिंकून दिला होता आणि तिसरा सामना याच वाटेवर चालला होता फक्त मध्ये अडसर सुनीलचा होता. सुनीलने पन्नाशी गाठली होती आणि त्याच आत्मविश्वासाने त्याची फलंदाजी सुरु होती. इम्रानने (तेंव्हा इम्रान ताशी १५० कि.मी. वेगाने गोलंदाजी करीत होता) एक चेंडू त्वेषाने मिडल स्टम्पवर, काहीसा आखूड टप्प्याचा टाकला. सुनीलने क्षणभर चेंडूच्या बाउंसचा अंदाज घेतला आणि मिडल स्टम्पवरील चेंडू सोडून दिला!! सुनीलचा तो अंदाज बघून इम्रान थक्क झाला!! त्याला चेहऱ्यावरील आश्चर्य लपवता आले नाही!! जगातील सगळ्या फलंदाजांनी तो चेंडू निश्चितपणे खेळला असता - काहीही घडू शकले असते पण हा चेंडू स्टम्पवरून जाणार आहे तेंव्हा बॅट लावायची कशाला? आणि सुनीलने तो चेंडू विकेटकीपरकडे जाऊ दिला!! क्षण हा शब्द देखील मोठा आहे इतक्या निमिषार्धात घेतलेला अंदाज आणि निर्णय. इथे तंत्र तर आवश्यक होतेच परंतु चेंडूच्या बाउंसचा अचूक अंदाज घेणे, या कौशल्याला दाद द्यावी, अशी परिस्थिती होती.
सुनीलचा स्टान्स अगदी सरळ, साधा होता. बॅट आणि पॅडमध्ये हवेला देखील जायची संधी मिळणार नाही इतक्या लगटून उभा राहायचा. एरव्ही काहीसा मिस्कील दिसणारा सुनील एकदा फलंदाजीला उतरला की संपूर्ण जगाला विसरून जायचा. जगाला विसरून पूर्णपणे एकाग्र होणे, ही बाब भल्याभल्यांना जमत नाही. एकाग्रता हा त्याचा अभेद्य भाता होता. त्या जोरावर सुनील खेळपट्टीवर संपूर्ण दिवस उभा राहायचा. गोलंदाज शिणून जायचे पण याच्या एकाग्रतेवर किंचितही परिणाम व्हायचा नाही. आमची पिढी खरोखर नशीबवान, सुनीलला आम्ही यथेच्छ बघितला, नसता बघितला नसून, त्यांच्या फलंदाजीतील सौंदर्याचा पुरेपूर उपभोग घेतला. त्याच्या काळात वेस्टइंडिजमध्ये ग्रीनिज, विव्ह, लॉइड सारखे "हातोडे" तर पुढे खुद्द भारतीय संघात, संदीप, कपिल, प्रसंगी दिलीप सारखे घणाघाती फलंदाज होते पण सुनीलने पहिली १२ वर्षे आपली शैली बदलायचा चुकूनही प्रयत्न केला नाही. समोर कितीही वादळे येवोत, सुनीलने आपला approach कधीही बदलला नाही. गरजच पडली नाही. याला म्हणतात आत्मविश्वास. फलंदाजीचे त्याचे तंत्र तर आजही निवृत्त होऊन, ३३ वर्षे झाली तरी वाखाणणलें जाते, किंबहुना "आदर्श" मानले जाते. ३३ वर्षे झाली म्हणजे फलंदाजीच्या ३ पिढ्या आल्या आणि गेल्या. फलंदाजीच्या तंत्रात आता आमूलाग्र बदल झाले. इतकेच कशाला बॅटीचे वजन, दर्जा इत्यादी फार पुढे गेले पण तरीही आजही फलंदाजीचे तंत्र म्हटल्यावर सुनील(च) डोळ्यासमोर येतो!!
त्याने आपली शैली प्रथमच बदलली ती १९८३ मध्ये भारतात आलेल्या लॉईडच्या संघासमोर खेळताना. वेस्ट इंडिजचा संघ डिवचलं गेला होता आणि विश्वचषकातील, भारताकडून झालेल्या पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्याचा बदल घेण्याच्या उद्दीष्टानेच वेस्ट इंडिजचा संघ भारतात आला होता आणि कानपूरच्या पहिल्याच कसोटी सामन्यात याची चुणूक दिसली होती. आयुष्यात प्रथमच मार्शलच्या प्रलयंकारी वेगाने, सुनीलच्या हातातील बॅटीवरील पकड निसटली आणि सुनील बाद झाला. अशाप्रकारे बाद होणे ही नामुष्की तर होतीच पण सुनीलचा आत्मविश्वास खचवणारी घटना होती. याच पार्श्वभूमीवर दिल्लीला दुसरा कसोटी सामना सुरु झाला आणि सुनीलने आपले रौद्ररूप दाखवायला सुरवात केली. गेली १२ वर्षे म्यानात घालून ठेवलेला "हूक" चा फटका बाहेर काढला आणि मैदानावर आगीचा लोळ पसरायला लागला. मार्शल, होल्डिंग आणि डेव्हिस सारखे आग्यावेताळी गोलंदाज, पहिल्या कसोटीची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने गोलंदाजी करीत होते आणि सुनीलने त्यांना "हूक","पूल" तसेच चेंडू जरा ऑफ स्टम्पवर पडत आहे, लक्षात आल्यावर गुडघ्यात किंचित वाकून त्यांनी कव्हर ड्राइव्ह मारायला सुरवात केली. सगळा स्टेडियम तर अवाक झालाच होता पण आमच्यासारखे टीव्हीवर बघणारे, आपले डोळे विस्फारून हे "युद्ध" बघत होते. त्या दिवशी सुनीलने अगदी ठरवून मार्शलच्या गोलंदाजीवर प्रतिहल्ला चढवला होता. वेस्ट इंडिज संघ हतबल झाला होता. सुनीलकडून अतर्क्य अशी खेळी होत होती. मार्शलने आखूड टप्प्याचे चेंडू टाकले की सुनील किंचित बॅकफूटवर जात असे आणि खांद्यातून हूक मारीत असे. असे थोडा वेळ चालल्यावर लॉइडने स्क्वेयर लेग आणि लॉन्गलेग इथे क्षेत्ररक्षक ठेवले पण त्या दिवशी सुनीलने त्यांच्या मधून पूल आणि हूकचे फटाके मारून चौकार वसूल केले. हा अलौकिक प्रतिहल्ला होता.
आपले तंत्र किती अचूक आहे याची प्रचिती त्याने आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात दिली. बंगलोरची खेळपट्टी म्हणजे फलंदाजीचे स्मशानघर होते आणि मंदगती गोलंदाजांना नंदनवन होते. पाकिस्तानच्या दोन्ही इंनिंग्स मध्ये एकानेही पन्नाशी गाठली नाही तर भारताच्या पहिल्या इनिंगमध्ये फक्त दिलीपने ५० धावा केल्या होत्या पण याच पार्श्वभूमीवर भारताला शेवटच्या दिवशी २२५ धावा करायच्या होत्या. या डावात इम्रानने एकही षटक टाकले नाही!! सुरवातच अक्रमने केली आणि दुसऱ्या बाजूने इकबाल कासीम आणि तौसिफ़ अहमद यांची दुतर्फा मंदगती गोलंदाजी सुरु केली. मंदगती गिलंदाजी जरी असली तरी आखूड टप्प्याचा चेंडू फलंदाजाच्या खांद्यापर्यंत, क्वचित त्याच्याही वर उसळत होता आणि चेंडू अक्षरश: १८० अंशाच्या कोनात फिरत होता. धावा करणे तर बाजूलाच राहो पण तिथे नुसते उभे राहणे अशक्य होते आणि इथे सुनीलने आपला खरा दर्जा दाखवला. गोलंदाज धार्जिण्या खेळपट्टीवर कसे खेळायचे याचा असामान्य धडा घालून दिला. त्याने ९७ धावा केल्या पण एका अकल्पित असलेल्या चेंडूने त्याचा बळी घेतला. सुनीलला सामनावीर म्हणून गौरवले पण भारत फक्त १६ धावांनी सामना हरला. आजही सुनीलची ती बॅटिंग आदर्श म्हणून गौरवले जाते. मी ती इनिंग पहिल्या चेंडूपासून बघितली (टीव्हीवर!!) आणि खरोखर सुनीलला मनापासून लोटांगण घातले. अचानक उसळलेला चेंडू असला तरी सुनीलची बॅट चेंडूच्या रेषेत यायची आणि बॅटीवरील उजवा हात किंचित हलका करायचा आणि निव्वळ डाव्या हाताने बॅट ढालीसारखी पुढे आणायची आणि डिफेन्सिव्ह फटका खेळायचा पण तो कसा? तर बॅटीने चेंडू अडवताना चेंडू आपल्या पायाशीच पडणार आणि कुठेही इतरत्र जाणार नाही याची खात्री करून देणार!! किती अलौकिक तंत्र आहे हे!!
सुनीलने भारताला अनेक गोष्टी शिकवल्या. मुख्य म्हणजे सलामीच्या फलंदाजीचा प्रश्न कायमचा निकालात काढला. सलामीला येऊन वेगवान गोलंदाजी कशी खेळायची, याचे तंत्र शिकवले, भारतीय संघाला आत्मविश्वास दिला. सुनीलने अपवाद प्रसंग वगळता मैदानावर फलंदाजी करताना कधीही आक्रस्ताळेपणा केला नाही, जरुरी भासलीच नाही. आजूबाजूला कितीही "स्लेजिंग" झाले तरी सुनील बर्फाप्रमाणे थंड असायचा. फलंदाजीचे असामान्य तंत्र शिकवले. क्रिकेट पुस्तकातील प्रत्येक फटका त्याच्या भात्यात होता आणि त्याचा त्याने सढळ हाताने उपयोग केला. सुनील, कव्हर ड्राइव्ह मारणार म्हणजे तो copy book style असणार याची ग्वाही दिली. फलंदाजीचे तंत्र त्याला शरण गेले होते. या बुटुक बैंगण फलंदाजाने भारताला क्रिकेटचे वेड लावले आणि Original Little Master ही उपाधी कायम सार्थ करून दाखवली. सुनील कधीही मैदानावर विजेप्रमाणे लखलखून गेला नाही तर देवघरातील नंदादीपाप्रमाणे शांतपणे तेवत राहिला. सुनील निवृत्त झाला आणि हा नंदादीप विझला!!
Wednesday, 26 August 2020
जिंदगी देनेवाले सुन
Avinash, Mahendra
गुणवत्ता आणि परिणामकारकता यांचे स्थान अढळ रहावे याकरिता भाषिक श्रव्याच्या शक्ती गद्य,पद्य,पाठ आणि गीत या मार्गांचा अवलंब केला जातो. माहिती, विचार, कल्पना,भावना संज्ञापनासाठी निवेदन,भाषण,कथन आणि गायनशैली वापरल्या जातात. तसे पाहता त्यांना शैली न म्हणता कोटी म्हटले पाहिजे. कारण अनुभूतीच्या भाषिक संघटनांचे आणि आविष्कारांचे हेच खरे मूलभूत साचे आहेत. गीत आविष्काराचे हे एक मूलभूत तत्व मानता येऊ शकते. याचाच पुढील विचार म्हणजे सुरावट,लयबंध भाषेबरोबर हातमिळवणी किंवा हालचालींसह यांचे निर्देश संगीताशय म्हणून केले पाहिजेत. हिंदी चित्रपट संगीताकडे गांभीर्याने बघणे अभ्यासकांना जमले नाही किंवा त्यांनी उत्साह दाखवला नाही याचे आणखी एक कारण बघणे योग्य ठरेल. इथे आणखी एक मुद्दा विचारार्थ घ्यावा लागेल. हिंदी चित्रपट संगीताच्या स्वरूपातील काही अंगभूत गुणधर्मामुळे त्यास बाजूला ठेवले जात आहे का? विविधता, लोकप्रियता इत्यादी कारणांखेरीज हिंदी चित्रपट संगीताचा विचार इतक्या कसोशीने करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे सांगीत कल्पनांच्या अभिसरणातील त्यांची भूमिका. इथे दोन विचार गृहीत धरावे लागतील. या संगीतामुळे पसंत वा मान्य ध्वनी, आवाज, सादरीकरणाच्या लयी तसेच संगीताची योजना करण्याचे प्रसंग यांविषयी सार्वत्रिक प्रथा रूढ होऊ लागल्या आहेत. अर्थात हा भाग दोषी नाही पण याला दुसरी बाजू अशी आहे, अत्यंत बहुविध आणि पुष्कळ बाबतींत विचक्षण नसलेल्या श्रोते-प्रेक्षकांमुळे हिंदी चित्रपट संगीताचे स्वरूप ठरत असल्याने काही समान सांगीत बाबींचे व त्याच्या प्रभावांचे सर्वत्र वितरण होणे हा खरे निकृष्टाचा प्रसार अभावितपणे होतो. हा मुद्दा देखील विचारात घेणे जरुरीचे आहे. आणि याच विचारांतून आपण आजच्या " जिंदगी देनेवाले सुन" या गाण्याचा आस्वाद घेणार आहोत.
शायर शकील बदायुनी याचे, उर्दू शायरीत फार मानाने नाव घेतले जाते. त्याच्या काही रचना चित्रपटाव्यतिरिक्त अतिशय लोकप्रिय झाल्या आहेत.अर्थात चित्रपट गीतांमुळे त्यांचे नाव लोकप्रिय झाले कारण गैरफिल्मी गाणी म्हटली की लगेच आविष्काराचे स्वरूपच बदलते आणि अधिक करून शब्दाधिष्ठित स्वररचना (याचाच दुसरा अर्थ वाद्यमेळाची चैन न परवडणे) हेच अंग मान्य होते अर्थात त्यामागे अर्थकारण हा मुद्दा महत्वाचा ठरतो. प्रस्तुत गाण्याची शब्दरचना ही पारंपरिक गीतलेखनाप्रमाणे आहे. प्रत्येक अंतरा लिहिताना साधारणपणे ४ ओळींचा असावा जेणेकरून संगीतकाराला चाल बांधण्यासाठी बराच वाव मिळावा. गझल वृत्तात एकूणच शब्दसंख्या मर्यादित आणि हाताशी फक्त २ ओळी असतात आणि त्यात पुन्हा वृत्ताचे स्वतःचे असे वेगळे निकष असतात, हा भाग वेगळा. गीत म्हटले के एकाच कल्पना अनेक प्रकारे फुलवता येते, प्रसंगी निरनिराळ्या प्रतिमा संयोजन करायला वाव मिळतो. आता इथे नायकाची, ईश्वराकडे व्यक्त केलेली व्याकुळ मन:स्थिती आहे तेंव्हा त्याच भावनेचे प्रकटीकरण, हीच साध्य आहे. तेंव्हा याच भावनेला केंद्रित करून मग "रात कटती नहीं" , "जख्म ऐसा दिया", "आंख वीरान हैं" या आणि अशा अनेक ओळींतून मुखड्यातील मध्यवर्ती कल्पना अधिक खोलवर आणि स्पष्टपणे मांडण्यात आली आहे. जरा बारकाईने वाचले तर अंतऱ्यांमधील अक्षरसंख्या समान नाही परंतु चाल बांधताना आणि त्याचे गायन करताना कुठेही विक्षेप येत नाही.
संगीतकार गुलाम मोहम्मद यांची स्वररचना आहे. या संगीतकाराची बहुतेक कारकीर्द ही नौशाद या संगीतकाराचा सहाय्यक या भूमिकेत गेली (१९७० च्या दशकातील "पाकिझा" चित्रपट येईपर्यंत गुलाम मोहम्मद यांना फारशी लोकप्रियता लाभली नाही!!) असे असून देखील जेंव्हा केंव्हा त्यांना स्वतंत्रपणे संगीत द्यायची संधी लाभली तेंव्हा त्यांनी आपला दर्जा दाखवून दिला. चाल "भूपाली" (भूप) रागावर आधारित आहे. या रागात मराठीमध्ये भरपूर भूपाळी रचना झाल्यामुळे हा राग सकाळचा आहे असे बऱ्याचजणांना वाटते परंतु शास्त्रानुसार या रागाचा समय सायंकालीन आहे!! "मध्यम" आणि "निषाद" स्वरांना वर्जित ठेवणारा जरी "औडव/ औडव" असला तरी या रागातील प्रत्येक स्वराला, स्वरविस्तार करायला प्रचंड वाव आहे आणि बहुदा म्हणूनच हा राग ललित संगीतात मानाचे स्थान पटकावून आहे. मुखड्याची ओळ "जिंदगी देनेवाले सून" ऐकताना मध्येच किंचित "निषाद" ऐकायला मिळतो परंतु या ओळीवर "धैवत" आणि "रिषभ" या स्वरांचेच प्राबल्य आहे. ललित संगीतात रागाचे Blending केले जाते ते असे. अर्थात आपण हा तांत्रिक भाग इथेच सोडून देऊया. यामध्ये महत्वाचा मुद्दा असा येतो, आपण या रागचौकटी कटाक्षाने व शास्त्रोक्त राग म्हणून वापरतो असा अट्टाहास त्यांच्या चालीत जाणवत नाही. गीत बांधताना कुठेही शब्दांची ओढाताण झाली किंवा चाल मागे-पुढे झाली असे अजिबात भासत नाही. गीतकाराच्या नजरेतून बघायचे झाल्यास, हा स्वप्नसाध्य योग्य म्हणायचा!! या गीताचा आरंभ होतो, तो पाश्चात्य तंतुवाद्यावर स्वरावली (कॉर्ड्स) छेदून आणि गीत सुरु होईपर्यंत याचे चलन भूप रागाचे आहे याचा अंदाज लागत नाही. तरीही संगीतकाराने गीताचे चलन असे ठेवले आहे , की एकाच वेळी आपण रागात असतो पण आणि नसतो देखील!! या रंगाचे शास्त्रोक्त ज्ञान नसलेल्या श्रोत्यासही गीताचे बदलते भावरंग जाणवतात कारण हा राग भारतीय सांगीत संस्कृतीत फार खोलवर रुजलेला आहे. एकूणच कारकिर्दीकडे बारकाईने बघितल्यास, नबाबी मुस्लिम समाज हा भारतीय संस्कृतीचा एक थर अभिजात, नांगर पण दुबळा आणि ऱ्हासाकडे झेपावणारा,त्याचबरोबर संपन्नतेने जगण्याचा आणि आत्मघात करणारा. याच संस्कृतीला गुलाम मोहम्मद यांनी तुला आणि बोलका प्रतिसाद दिला आणि ही कामगिरी निश्चितच महत्वाची ठरते.
हे गीत गाईपर्यन्त गायक तलत मेहमूद याचा कंपायमान आवाज रसिकमान्य झाला होता. गीतातील संथपणा आणि शांतवृत्ती अधिक स्पष्ट आणि भावपूर्ण करण्यासाठी हाच कंपायमान सूर आवश्यक होता. आवाज भावनाकुल आहे पण भावविवश अजिबात नाही, ही या गायकाची खासियत होती. मुळात लखनवी संस्कार अंगी बाणल्यामुळे असेल पण गाताना, आपल्या हातातील काव्य हे किमान दर्जाचे असावे, हीच अभिलाषा या गायकाने कायम राखली. "जख्म ऐसा दिया के दिल भरता नहीं" या ओळीतील पहिलेच जोडाक्षर या दृष्टीने ऐकण्यासारखे आहे. विव्हळता आहे पण विसविशीतपणा नाही. शब्दातील आशय अचूक प्रकट केला आहे. किंवा शेवटच्या अंतऱ्यामधील "जिंदा रख्खा मगर जिंदगी छीन ली" या ओळीतील "रख्खा" सारखा अवघड आणि वजनदार शब्द किती मृदूपणे गायला गेला आहे. उर्दू भाषेत एकूणच शब्दोच्चार करताना शक्यतो व्यंजने सुद्धा "स्वरांकित" करताना हळुवार करतात. आता थोडे मूल्यमापन करायचे झाल्यास, तत्कालीन पुरुष गायकांपेक्षा त्यांची लोकप्रियता कमी होती का? तर निश्चितच होती असे म्हणावे लागेल. अर्थात प्रत्यक्ष गायकाचे म्हणणे असे आहे, "जरी एकूण गायलेली गीते संख्येने कमी असली तरी टी बहुतेक सगळी उच्च दर्जाची म्हणून लोकांच्या स्मरणात आहेत. हेच प्रमाण इतर गायकांनी गायलेल्या गीतांबाबत जेमतेम २५% पडेल!! अर्थात या विधानावर पुरेसा अभ्यास व्हायला हवा. परंतु बदललेल्या अभिनयशैलीशी त्यांचे गायन आणि आवाज जुळण्यासारखे नव्हते. आपण जी कोणती गीते गायची त्यांच्या संहितेबद्दल ते फार चोखंदळ होते आणि ही बाब मी वर उल्लेख केलेल्या लखनौचा वारसा म्हटल्यावर गृहीत धरावेच लागेल. याचा परिणाम त्यांच्या लोकप्रियतेवर घडणे क्रमप्राप्तच ठरते.
जिंदगी देनेवाले सुन
'तेरी दुनिया से दिल भर गया
मैं यहा जीते जी मर गया
रात कटती नहीं दिन गुजरता नहीं
जख्म ऐसा दिया के दिल भरता नहीं
आंख वीरान हैं, दिल परेशान हैं
गम का सामान हैं
जैसे जादू कोई कर गया
बेखता तुने मुझसे ख़ुशी छीन ली
जिंदा रख्खा मगर जिंदगी छीन ली
कर दिया दिल का खून, चूप कहां तकी रहूं
साफ क्यूँ ना कहूं
तू ख़ुशी से मेरी डर गया
https://www.youtube.com/watch?v=W41jIwH4k9g
Monday, 24 August 2020
हेमराज वाडी - भाग ९
मुळावकर नाना आणि माझे नाना यांची आमच्या गृपवरील सगळ्या मित्रांवर थोडी जरबच होती. दोघांचे करडे डोळे असल्याने पहिल्यांदा काहीशी भीतीच वाटायची. मुळावकर नानाचे डोळे तसे गोल, गटगटीत आणि घारे असल्याने, आम्ही कधी मुळावकरांच्या घरी गेलो तर काकुंशीच अधिक बोलायचो. काकू मात्र अतिशय शांत, सोज्वळ आणि सतत हसतमुख असायच्या. घरी गेलो आणि काकूंनी हसून स्वागत केले नाही असे कधीच घडले नाही. याउलट आम्ही शाळेत असताना नानांशी संपर्क टाळण्याकडे आमचा सर्वांचा कल असायचा. हा माणूस कधी बोलला तर दरडावलेल्या सुरांतच बोलेल असे सुरवातीला वाटायचे. अर्थात पुढे माझी त्यांची चांगली ओळख झाली आणि नाना जसे आधी वाटले तसे नसून छान गप्पा मारायचे. विशेषतः त्यांच्या माझ्यात संगीत हा विषय सामायिक असायचा. एकदा धोबीतलाव जवळील बिर्ला मातोश्री सभागृहात उस्ताद विलायत खान यांच्या सतारीच्या कार्यक्रम होता आणि आम्ही काहीही न ठरवता थेट सभागृहापाशीच भेटलो. मीही शास्त्रीय संगीताच्या मैफिली ऐकतो याचे त्यांना थोडे कौतुक होते. आमची तिकिटे वेगवेगळी असल्याने कार्यक्रमाच्या वेळी काही बोलता आले नाही परंतु कार्यक्रम संपल्यावर आम्ही दोघे चालत,चालत घरी परतलो आणि घरी येताना माझी भूमिका श्रोत्यांची होती. जवळपास तासभर एकत्र होतो आणि तो सगळा तास, नाना माझ्याशी, त्यांनी ऐकलेले कलाकार, या विषयावर बोलत होते. नाना तसे जुन्या गोष्टींबद्दल अभिमानी, विशेषतः व्ही.शांताराम बद्दल त्यांना प्रचंड अभिमान होता.
मुळावकर काकू मात्र संपूर्ण वेगळ्या स्वभावाच्या. आम्हा मुलांच्यात येऊन बसत आणि आमच्यात सहज मिसळून जात. एका वर्षी आम्ही मित्रांनी ठरवले, मुळावकरांच्या घरात जो गणपती येतो, तो आपण सगळ्यांनी एकत्रितपणे साजरा करायचा. परवानगी घेण्यासाठी अर्थात काकू मदतीला आल्या आणि लगोलग काकूंनी होकार दिला. मुळावकरांच्या घरातील गणपती पण आता आम्ही सगळ्यांनी पुढाकार घ्यायचे ठरवले. मग लगेच डेकोरेशन, मूर्ती वगैरे बाबी पूर्ततेसाठी सगळ्यांचा एकत्रित सहभाग होता. त्यानिमित्ताने आम्ही खरेतर आमचीच हौस भागवीत होतो. आमचा गोविलकरांचा गणपती त्यावेळी नायगाव इथे माझे काका रहात होते, त्यांच्या घरी यायचा. परिणामी गणेश चतुर्थीच्या आदल्या रात्री (रात्रभर जागायचे आकर्षण अधिक असायचे) आम्हाला काकांच्या घरी जायलाच लागायचे. त्यामुळे बाकीच्यांचा थोडा हिरमोड व्हायचा. परंतु पहिल्या दिवशीच आम्हा गोविलकरांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा झाल्यावर आम्ही लगोलग मुळावकरांकडे जात असू. आता गौरी गणपती म्हटल्यावर, चार दिवस धुंदीत जायचे. राजू त्यावेळीही हौशी नकलाकार म्हणून पुढे येत होता आणि मग गणपतीच्या रात्री मनोरंजाचे कार्यक्रम म्हणून राजुच पुढे असायचा. एके वर्षी, कुमार गोखलेंच्या धाकट्या भावासोबत राजुने गाणे म्हटल्याचे ठळक आठवत आहे, कुमारचा भाऊ तेंव्हा तबला शिकत होता. मला वाटते, सलग ३,४ वर्षे आमचा उत्साह टिकला होता. पुढे वयोमानानुसार सगळे आपापल्या दिशांनी गेले आणि आता फक्त स्मृती उरल्या.
तशीच एक आठवण कायम मनात राहिली आहे. E ब्लॉकमधील तिसऱ्या मजल्यावर लपालीकर कुटुंब रहात होते - त्यांच्याकडे एकत्र कुटुंब पद्धत असल्याने नंदू आणि राजेश (वयाने हे दोघे आमच्यापेक्षा बरेच लहान आहेत) यांचे आई/वडील आणि त्यांच्यासह अनिल,अरुण,शरद लपालीकर एकत्र रहात होते. त्यांच्याकडे ११ दिवसांचा गणपती यायचा. त्यांचे तसे मोठे कुटुंब होते त्यामुळे गणपतीच्या दिवसात त्यांच्या घरात बरीच वर्दळ असायची. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मात्र आम्ही सगळे त्यांच्या कडे महाआरतीला जमत असू. माझ्या आठवणीत, सुरवातीला तरी त्यांच्या गणपती विसर्जनाला आम्ही सगळे जात होतो (पुढे त्यांनी हेमराज वाडीच्या सार्वजनिक गणपतीसह न्यायला सुरवात केली न ते फार तर २ एक वर्षेच टिकले आणि पुन्हा त्यांनी स्वतंत्रपणे विसर्जनाला सुरवात केली) आम्ही सगळे विसर्जनाला येत आहोत म्हणून नंदूचे वडील ( त्यांचे आवडते नाव "पपूशेट!!) आम्हाला गिरगाव चौपाटीवर भेळ वगैरे खायला घालत असत. त्यावेळी आम्हाला हे प्रचंड आकर्षण होते. त्यावेळी एकूणच बाहेर खाणे म्हणजे सोहळा असायचा. (याच सुमारास आमच्यातील सतीश अवचटला नगद १००/- मिळाले आणि त्याने ती नोट प्रदीपकडे दिली!! पण त्याचे वर्णन वेगळ्या लेखात) आम्हाला या दिवसाचे खरे आकर्षण म्हणजे हेमराज वाडीच्या गणपती विसर्जनाला वाजणारा बँड ( त्यालाच "कच्ची बाजा" म्हणतात) पुढे अनेक वर्षे आम्ही वाडीच्या विसर्जनाला जात होतो. आमच्यातील उदय पोवळे म्हणजे आमचा "गोपीकृष्ण"!! वाडीतच तो नाचायला सुरवात करायचा आणि सगळी वाडी त्याच्याकडे थक्क होऊन बघत असे. आम्ही त्यामानाने पांढरपेशे!! मूर्ती रस्त्यावर आली आणि घरापासून थोडी दूर गेली की आमचे पाय थिरकायला लागायचे. रात्रभर हा दंगा चालायचा.
खरतर त्यावेळचा सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे एका प्रबंध लेखनाचा विषय आहे.
हेमराज वाडी - भाग ८
१९७३ च्या अखेरीस म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात कधीतरी आमच्या घरी Televista कंपनीचा टीव्ही आला. आजच्या भाषेत बोलायचे झाल्यास, It's BREAKING NEWS. त्यावेळी घरात स्वतंत्र फोन असणे किंवा फ्रीज तसेच नव्याने आलेला टीव्ही असणे, या सगळ्या चैनीच्या गोष्टी होत्या. त्यावेळी टीव्हीवर फक्त दूरदर्शनची २,३ चॅनेल्स होती. चॅनेल बदलून बघणे हा आश्चर्याचा भाग होता आणि त्यासाठी आपल्या हातात रिमोट ठेवणे म्हणजे जडजवाहीर बाळगण्यासारखे होते. अर्थात आमच्या घरी टीव्ही आला म्हणजे आमच्या ग्रुपचे आमच्या घरात वावरणे वाढायला लागले. त्याकाळी मनोरंजनाची साधने बरीच मर्यादित असत त्यामुळे टीव्हीवरील कार्यक्रम बघणे हा आनंदाचा भाग होता, विशेषतः संध्याकाळी ७ नंतर दूरदर्शन झाले म्हणजे आमही सगळे टीव्हीला चिकटून बसत असू. तशात नुकताच "छायागीत" हा हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम सुरु झाला - मला आठवते त्याप्रमाणे "छायागीत" कार्यक्रम दर गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास लागायचा. आमचा गृप सगळी जेवणे आटोपून आमच्या घरी, अगदी भक्तिभावाने येत असत. आज कुठल्या चित्रपटाची गाणी लावणार, याचे प्रचंड औत्सुक्य असायचे. तशात १९७४ च्या मार्च किंवा एप्रिलमध्ये टीव्हीवर भारत/इंग्लंड क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण दाखवायची घोषणा झाली.
टीव्हीवर क्रिकेट सामन्याचे चित्रीकरण होणार आणि आपल्याला सामन्यातील प्रत्येक बॉल बघायला मिळणार - It was mega event. त्याकाळी माझ्या घरी टीव्ही आहे, हीच बातमी आमच्या शाळेत तसेच गिरगावात नवलाची होती. टीव्हीवर सामन्याचे चित्रीकरण होणार म्हणून शाळेने नेहमीची वेळ बदलून घेतली आणि पुन्हा पहाटेचे वर्ग ठेवले. सकाळी ९ च्या सुमारास शाळा सुटली की आम्ही सगळे तडक घराच्या वाटेवर!! पहिला दिवस तसा ठीक ठाक गेला म्हणजे घरात आमचे मित्र आणि काही नातेवाईक वगळता फारसे कुणी आले नव्हते परंतु दुसऱ्या दिवशीपासून गिरगावातील अनेकजण - "मी अनिलचा मित्र आहे","मी राजुच्या वर्गातील मित्र" असे सांगून घरात प्रवेश करायला लागला. एक वेळ अशी आली, महालाच आमच्याच घरात बसायला जागा नव्हती!! मग मात्र माझे वडील - नाना जरा ताणात आले आणि घराच्या दरवाजातच बसायला लागले. कुणी आमची ओळख दाखवायला लागला की नाना मला किंवा राजू किंवा मोहनला हाक मारीत आणि तिथेच ओळख पटवून घेत अन्यथा त्याला पुन्हा बाहेरचा रस्ता दाखवीत. सलग ५ दिवस घरात सामन्याचा ज्वर पसरला होता. आमच्या गृपमधील त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील येत असत. अर्थात त्यांना माझे आई-नाना ओळखत असल्याने काही प्रश्नच नव्हता. मला आठवत आहे, त्यावेळी प्रथमच सुरेशची ताई आमच्या घरी मॅच पाहायला आली होतो तसेच मुळावकर नाना आले होते.
आमचे सगळ्यांचे एकमेकांच्या घरात कायमच येणे-जाणे असायचे आणि इथे काहीच वाटत नसे. मी दिवस कधीही मोघे किंवा मुळावकर, यांच्या घरात जात असे आणि त्यांना देखील माझे येणे ही सवयीची बाब झाली होती. हा आमचा गृप तर बरेचवेळा आमच्या घरी येत असे. एक आठवण. त्यावेळी मला आईने टेबल टेनिसच्या दोन रॅकेट्स आणून दिल्या होत्या, अगदी त्याकाळच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा सॅन्डविच रबराच्या. अर्थात टेबल टेनिसचे बॉल येणे क्रमप्राप्तच असायचे. त्यावेळी टेबल म्हणून आम्ही घरातील जेवणाचे टेबल वापरात असू. त्यावेळी नेट म्हणून टेबलाच्या मध्यभागाच्या टोकाशी २ वाट्या ठेवायच्या आणि त्याच्यावर कपडे वाळत घालायची काठी ठेवायची म्हणजे आमचे नेट तयार झाले. असे टेबल टेनिस मी आणि विशेषतः सुरेश, आमच्या घरी तासंतास खेळत असायचो. माझी आई तेंव्हा पोलीस खात्यात नोकरी करायची आणि नाना दिवसभर त्यांच्या कामात गर्क असायचे तेंव्हा घरात फक्त आमचेच राज्य असायचे.
अर्थात हेमराज वाडीतील E ब्लॉकची गच्ची म्हणजे आमचे साम्राज्य होते. आज कळते, या गच्चीच्या आमचे भावविश्व संपूर्णपणे व्यापून टाकले होते. अक्षरशः दिवसभर आम्ही या गच्चीत निव्वळ हुंदडत असायचो. पावसाळा आला की क्रिकेटवर थोडी बंधने यायची आणि मग पावसाळी खेळ सुरु व्हायचे - त्यातलाच एक खेळ म्हणजे "कित्ती कित्ती"!! अगदी साधा खेळ होता. ग्रुपचे २ संघ बनवायचे आणि टॉस करायचा. जो संघ टॉस हरायचा, त्या संघातील सदस्य कमरेत वाकून एकमेकांना धरून गच्चीच्या भिंतीच्या सहाय्याने ओणवे होत असेआणि दुसरा संघ थोडा धावत येऊन त्यांच्या पाठीवर उद्या घेत असे. जे ओणवे असत त्यांच्या पाठी सणसणीत सडकून निघत. त्यातून राजू आणि मोहन पहिल्यापासून जरा "वजनदार" प्रकृतीचे असल्याने त्यांची उडी म्हणजे मनातून एकदम आय - माय निघायची!! अशा प्रकारे खालच्यांच्या अंगावर मांड ठोकली की मग वरील सदस्यांतील कप्तानाने, हाताची बोटे कधी दोन,दोन किंवा कधीकहदी तीन,तीन बोटे उभारायची आणि विचारायचे "कित्ती कित्ती". खालच्यांनी ओळखले तर मग परत विरद्ध संघावर असेच ओणवे राहायला लागायचे. आता यात एक गंमत अशी होती, ओणवे राहिलेल्यांनी बरोबर ओळखले की नाही याचा पडताळा कसा घ्यायचा म्हणून एकाला "पंच" म्हणून नियुक्त करायचे!! यात आणखी एक मखलाशी असायची. आमच्यातील बहुतेकांची शरीरयष्टी हे तशी यथातथाच असायची त्यामुळे अंगावरील वजन पेलणे, ही खरी परीक्षा असायची आणि तिथे कधी कधी मनाचा तोल डळमळीत व्हायचा आणि ओणवे झालेले खाली पडायचे - परिणामी त्यांनी पुन्हा ओणवे राहायचे. अशा वेळी जे अंगावर उद्या मारतील ते, ओणवे झालेल्यांमधील काहीसे हडकुळे शरीर ध्यानात ठेऊन, त्याच्या पाठीवर राजू किंवा मोहनला उडी मारायला सांगायची!! त्यांची उडी अंगावर पडली की झेलणारा अक्षरश: शिवराळ भाषा वापरायचा (शिवराळ भाषा वापरणे यात काही गैर आहे असे गिरगावातील कुणाही व्यक्तीला वाटायचे नाही. ती आमची मौखिक "संस्कृती" होती/आहे) काही काही वेळेस पाठ अशी शेकून निघायची की आपले सगळे पितर आठवायचे. त्यातून पाऊस असला म्हणजे अंगावरील कपडे ओले असायचे आणि त्या ओल्या कपड्यांवर असली "ओझी" सांभाळायची म्हणजे एक दिव्य असायचे.
हेमराज वाडी - भाग ७
आज पुन्हा माझ्या बालपणीच्या आठवणी लिहायला सुरवात करीत आहे. पूर्वी मी परदेशात असताना आठवणी लिहायला सुरवात केली होती. पुढे अनेक विषय आणि व्याप मागे लागले आणि या आठवणींवर लिहायचे मागे पडत गेले. आता पुन्हा लिहायला सुरवात केली कारण आमचा मित्र उदय पोवळे!! सध्या गेली काही आठवडे उदय, दर रविवारी हेमराज वाडीवर लेख लिहीत आहे आणि ते वाचून माझ्या मनात पुन्हा उर्मी संचारली. आता लिहायचे ठरवले आणि पुन्हा मनात आठवणींचे मोहोळ जागे झाले. त्यातली एक महत्वाची आठवण. आम्ही सगळे शाळेतच होतो आणि तेंव्हा ड्रिंक्स वगैरे गोष्टी कोसो दूर होत्या. अर्थात ड्रिंक्स घ्यावे अशी इच्छा मात्र मनात वारंवार यायची. एकदा प्रदीपच्या मनात आले की आपण सगळे टिटवाळ्याला (गणपती मंदिराला भेट) जायचे आणि तसे घरी सांगितले. आता गणपती मंदिराला भेट द्यायची तेंव्हा घरून परवानगी मिळायला काहीच हरकत नव्हती. निघायच्या ३,४ दिवस आधी "बियर" घेऊन जायचे ठरवले.
आता ठरवले खरे पण बियर कुठली विकत घ्यायची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घरात कुठे लपवून ठेवायची? आता टिटवाळा इथे जायचे म्हणजे पहाटे घर सोडणे क्रमप्राप्तच होते म्हणजे त्या दिवशी बियर विकत घेणे अशक्य!! याचाच वेगळा अर्थ, आदल्या दिवशी बियर विकत घ्यायची. प्रदीपने, बियर त्याच्या घरी लपवायची जागा शोधून काढली. असल्या उचापती करण्यासाठी प्रदीपसारखा मित्र नाही. टिटवाळ्याचा आम्ही एकूण ८ जण होतो आणि या ८ जणांत एक बियरची बाटली!! त्यापूर्वी कधीही बियर घेण्याचा अनुभव नव्हता त्यामुळे बियर कशी लागते? कशी प्यायची? असले फडतूस प्रश्न आमच्या कुणाच्याच डोक्यात आले नव्हते. टिटवाळ्याच्या मंदिराच्या बाहेरील विस्तीर्ण बागेत बियर घ्यायची - म्हणजे बियर पिण्याचे स्थळ नक्की झाले होते. आज आठवत नाही, कुठली बियर विकत घेतली!! बहुदा त्यावेळची स्वस्तातली बॉंबे बियर घेतली असणार. आम्ही सगळेच शाळेत जाणारे म्हणजे पैशाचा प्रश्न हा कायम पडलेला असायचा. पैसे कसे उभे केले हे देखील आता आठवत नाही परंतु प्रदीपने बियर विकत घेतली आणि त्याच्या घरात कुठेतरी लपवली. माझी तर झोपच उडाली होती. बियर प्यायची, याचेच प्रचंड औत्सुक्य मनात होते. घरातून प्रत्येकाने प्लास्टिकचे ग्लासेस घेतले होते आणि मी कुठूनतरी मोठे प्लास्टिकचे टमरेल पैदा केले होते. पहाटे मी, राजू, मोहन, नंदू, अरविंद, सुरेश, प्रशांत आणि प्रदीप निघालो आणि थेट बसने बोरीबंदर रेल्वे स्टेशन गाठले. आता नवल वाटते पण रात्रभर लपवलेली बाटली पहाटे थंडगार वाटत होती (अर्थात हा आमच्या मनाचा खेळ सुद्धा असू शकतो अन्यथा रात्रभर फ्रिजबाहेर ठेवलेली बियरचे बाटली थंडगार कशी राहणार म्हणा) बसमध्येच बाटलीतील बियर टमरेलमध्ये भरली आणि स्टेशनजवळ एका गटारात रिकामी बाटली टाकून दिली (हुश्श....) टमरेल एका फडक्यात गुंडाळून ठेवले होते. संपूर्ण प्रवासात सगळे उत्तेजित झाले होते. वास्तविक सगळे, ज्याला "टपोरी"म्हणतात तसेच होते त्यामुळे एकमेकांची यथेच्छ टिंगल करायची, हाच सोहळा चालू होता आणि टिटवाळा स्टेशन आले.
सर्वात आधी देवळात गेलो आणि गणपतीचे व्यवस्थित दर्शन घेतले. लगोलग मंदिराची बाग गाठली आणि एक कोनडा शोधला जिथे फारशी वर्दळ नव्हती. लगेच प्लास्टिकचे ग्लासेस काढले आणि हळूहळू टमरेलमधील बियर सगळ्याच्या ग्लासात थोडी, थोडी ओतली. बियर चढली तर काय घ्या? आणि मुख्य म्हणजे घरी "व्यवस्थित"परतायचे होते!! मजेचा भाग असा, आम्ही ८ जण असूनही टमरेलमध्ये थोडी बियर शिल्लक!! ग्लासमधील बियर हळूहळू घ्यायची हे तत्व पाळायचे ठरवले होते आणि तशी घोटाघोटाने बियर पित होतो. वास्तविक बियरची चव अतिशय कडवट पण तसे कुणीही बोलत नव्हते. मुळात, मनात एक धाकधूक होती, बियर चढू नये. मला वाटते मोहनचा ग्लास सर्वात आधी संपला आणि त्याने पुन्हा मागितली!! आमही सगळे अवाक. आमच्या सगळ्यात मोहन प्रशांत आणि अरविंद, हे वयाने सर्वात छोटे तरीही मोहनने पुन्हा मागितली आणि झटक्यात संपवली. कधीतरी मग अखेर टमरेल रिते झाले आणि जेवायला (घरून जेवणाचे डबे नेले होते) सुरवात केली. सगळे एकदम आनंदात होते. अखेर हो, नाही म्हणता आम्ही बियर घेतली होती. बियर घेतली म्हणजे आम्ही एखादा दिग्विजय मिळवला, याच धुंदीत होतो.
पुढे आयुष्यात मी असंख्य प्रकारच्या बियर घेतल्या परंतु हा पहिला अनुभव आजही मनात ताजा राहिला.
Sunday, 23 August 2020
चंदा रे जा रे
शास्त्रोक्त संगीत म्हणून ज्या गीतांची भलावण केली जाते ते नमुने शास्त्रोक्त संगीताच्या कोटीत विकसित झालेल्या निकषांवर जोखले जाणारच. परिणामतः आपल्याला अनेकवेळा करावे लागणारे विधान असे असेल - अमके अमके गीत शास्त्रोक्त रचना म्हणून कमी दर्जाचे असून शास्त्रोक्त संगीताचा चित्रपटीय आभास निर्माण करण्यात मात्र संबंधित रचना यशस्वी झाली आहे. याचे प्रमुख कारण असे, एखादे चित्रगीत यशस्वी झाले की त्या गीतावर अनेक अटी लादल्या जातात!! शास्त्रोक्त रागाच्या चौकटीस स्पर्श करून, तालाच्या वर्तुळास यांत्रिकपणे गिरवून, ठराविक वाद्यांचा खुणा म्हणून वापर करून, तानांची भेंडोळी वगैरे फेकताना किंवा ३,३ वेळा सांगीत वाक्यांश इत्यादी फजेऊं तथाकथित क्लासिकल होता येते, अशा भ्रमांना वाव देऊन संगीत पुरवणे म्हणजे शास्त्रोक्त संगीत मांडणे नव्हे.
हिंदी चित्रपट संगीताचा एकूण पडताळा घेतल्यास वर मांडलेल्या विचारांना आधारभूत मानून अनेक स्वररचना केलेल्या आढळतात. वास्तविकआपल्या चित्रपटीय संगीतातील कार्याचे महत्व आपल्या संगीताच्या शास्त्रोक्तपणावर अवलंबून नाही. चित्रपट गीतांच्या आरंभकाळात, स्वररचनेवर तत्कालीन रंगभूमीवरील संगीताचा प्रभाव पडणे सहज शक्य होते आणि तसे घडले देखील. परंतु हळूहळू भारतातील इतर प्रांतातून अनेक रचनाकार या क्षेत्रात आले आणि त्यांनी या विचाराविरुद्ध स्वररचना करायला सुरवात केली. या आरंभकाळातील संगीतकारांमध्ये आजच्या गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश यांचे नाव अवश्यमेव घ्यावेच लागेल.
प्रसिद्ध कवी प्रेम धवन यांचे गीतलेखन आहे. कवितेची शब्दरचना बघितली तर रागदारी बंदिशीचा भास होऊ शकतो आणि याचे मुख्य कारण कवितेतील ब्रज भाषा आणि चित्रपट गीताचा मोडलेला साचा. आपल्या कलासंगीतातील बहुतेक बंदिशी या एकतर संस्कृतोत्भव आहेत किंवा बव्हंशी ब्रज भाषेत आहेत. ब्रज भाषा ही बोली भाषा आणि हिंदी भाषेच्या संस्करणातून निर्माण झालेली. तासेच प्रत्येक ओळीतील शब्दसंख्या वेगवेगळी आहे जी चित्रपटीय गीतांच्या बाबतीत फारशी संभवत नाही. "संदेसा","मोरा",""मोहे", "हमरे" इत्यादी शब्द ब्रज भाषेचीच ओळख करून देतात. थोडे इतिहासात डोकावले तर महाभारतात "ब्रज भूमी"असा उल्लेख आढळतो परंतु तरीही "अवधी" भाषेशी जवळीक साधणारी भाषा आहे. असो, एकुणात असा विचार केल्यास, ब्रज भाषेत एक अंगभूत लय आढळते जी संगीतकारांना स्वररचना करायला सह्ज प्रवृत्त करते. प्रियकराची वाट बघणे आणि त्यातून मनात काहींना काहीतरी शंका/कुशंका उद्भवणे,हे तर आधुनिक काळात देखील चालूच असते. कवितेत हाच भाव पसरलेला आहे. अर्थात हिंदी चित्रपटातील चावून चावून चोथा झालेला प्रसंग तरीही काहीवेळा चमकदार शब्दरचना वाचायला मिळतात. कवितेत भाषेची थोडीफार खुमारी वगळता नावीन्य काही आढळत नाही. अर्थात वाचताना शाब्दिक गेयता आणि लय प्रत्ययाला येते.
संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी या गाण्यासाठी "छायानट" रागाची निवड केली आहे. मुळात हा राग म्हणजे "छाया"आणि "नट" या दोन रागांच्या मिश्रणातून तयार झाला आहे. या रागात सगळे सूर लागतात तरीही "तीव्र मध्यम"स्वर मात्र दरवळतो तसेच आरोही सप्तकात कधी कधी "शुद्ध निषाद"स्वराऐवजी तार सप्तकातील "षड्ज" स्वरावर ठेहराव घेतला जातो. गाण्याच्या सुरवातीलाच गायकी अंगाने काढलेल्या सतारीच्या सुरांत या रागाची लक्षणे आढळतात आणि पुढे गायन सुरु झाल्यावर रागाची ओळख पक्की होते. चाल स्पष्टपणे गायकी अंगाची आहे पण तरीही अति लांबवलेली नाही. शांत सुरांत गाण्याची सुरवात होते आणि हळूहळू लय दुगणीत जाते. या गाण्यात, बहुतेक हिंदी गाण्यात सहजपणे वावरणारा केरवा ताल आहे. प्रेमाची कबुली देणारे गाणे आहे पण, तेंव्हाच्या संस्कृती नुसार गाण्याची हाताळणी अतिशय संयत रीतीने झाली आहे. आता, गाण्यात कुठे छायानट बाजूला पडतो? हे बघायला गेल्यास, गाण्याचा पहिल्या अंतरा सुरु होताना, स्वरांची जी "उठावण" आहे, ती बारकाईने ऐकायला हवी. तिथे, रचनेने, हलक्या हाताने, रागाला बाजूला सारले आहे. अर्थात, ही कारागिरी, संगीतकार म्हणून नि:संशय, खेमचंद प्रकाश यांची.
एकूण कारकीर्द ध्यानात घेत, या संगीतकाराला, "पियानो","सेक्साफोन" ,"क्लेरीनेट " इत्यादी पाश्चात्य वाद्यांची आवड लक्षात येते. एक तांत्रिक विशेष इथे मांडणे जरुरीचे ठरते. तसे बघितले तर ही तिन्ही वाद्ये एका वेधक सीमारेषेवर उभी आहेत. एक तर अखंड व सलग ध्वनी पुरवायचा किंवा सुटेसुटे, तुटक पण ठोस ध्वनी पुरवायचे, या दोन टोकांच्या दरम्यानची जागा या वाद्यांनी व्यापली आहे. "सतार","जलतरंग" इत्यादी वाद्ये वापरली नाहीत, असे नाही (हेच गाणे या संदर्भात ऐकावे) पण त्यांची वाद्ययोजना आधी उल्लेखलेल्या अभारतीय वाद्यांनी निर्माण केलेल्या ध्वनीप्रतिमांशी अंतरंग नाते जोडून आहे. आणखी एक बाब बघता येते. खेमचंद प्रकाश, यांना नाट्यात्म क्षण उभा करण्यासाठी ताल व ठेका आणि वाद्ये न वापरण्याचे तंत्र मनपसंत आहे, असे ठामपणे म्हणावे लागते. अशा वेळेस, गाता आवाज जेंव्हा सुरावट रेखायला लागतो, तेंव्हा ही वाद्ये, त्या सुरावटीला पाठींबा देतात, पण ध्यानात येईल इतक्या नरमाईने. गाणारा आवाज तार स्वरांत जाईल किंवा खालच्या पट्टीवर पोहोचेल पण, त्याचे परिणामकारक कार्य अतिशय नियंत्रित गतीने होत राहील. याच गाण्याचा आधार घ्यायचा झाल्यास, सुरवातीचे शब्द किंवा "मुखडा" कानावर पडेपर्यंत सुरावट खालच्या स्वरांवर रुंजी घालत असते आणि जेंव्हा ठाशीव किंवा वरच्या स्वरावर झेप घेणारा मुखडा येतो, तेंव्हा गीताचा रोख(च) बदलतो. आणि हे सगळे करताना, गाण्याची लय देखील, मंद्र सप्तकात वावरत असते.
लताबाईंनी स्वररचनेचा नेमका रोख ओळखून गायन केले आहे. सुरवातीच्या संथ लयीतील "चंदा रे जा रे जा रे" या साध्या अक्षरांच्या उठावणीतून सगळ्या गाण्याची ओळख करून दिली आहे. पुढे द्रुत गतीत गाताना देखील कवितेतील आशय जरा देखील गढूळ केलेला नाही. कवितेत ब्रज भाषा वापरल्यामुळे त्यातील कुठल्या अक्षरावर वजन द्यायचे आणि कुठला शब्द - प्रसंगी कुठले अक्षर हलक्या स्वरांत उच्चारायचे याबाबत लताबाईंचा आडाखा फारच सुरेख दिसून येतो आणि एकूणच गाण्याच्या सौंदर्यात कमालीची भर टाकतो. खरतर लताबाईंच्या गायनाचा अभ्यास करताना हा मुद्दा विशेषत्वाने लक्षात ठेवण्यासारखा आहे. सुरवातीताच "चंदा"शब्द गाताना स्वर किंचित रेंगाळत ठेवला आहे परिणामी चंद्राला केलेली आळवणी प्रत्ययकारी झाली. तसेच पुढे "पिया का संदेसा" गाताना "पि"अक्षरावर वजन दिल्याने एकूणच "पिया" शब्द वेगळाच उठून दिसतो. अशी अनेक सौंदर्यस्थळे या गाण्यात दडलेली आहेत. किंबहुना या गाण्यातील नावीन्य टिकवण्यात याचा फार मोठा हातभार लागलेला आहे. तसे बघितले तर चाल अतिशय सरळ आहे पण तरीही लोभसवाणी आहे आणि या गाण्याचे खरे श्रेय यातच कुठेतरी दडलेले आहे.
चंदा रे जा रे जा रे
पिया का संदेसा मोरा कहियो जा
मोरा तुम बिन जिया ना लागे रे पिया
मोहे एक पल चैन ना आये
चंदा रे जा रे जा रे
किस के मन में जाये बसे हो
हमरे मन में अगन लगाये
हुमने तोरी याद में बालम
दीप जलाये दीप बुझाये
फिर भी तेरा मन ना पिघला
हमने कितने नीर बहाये
चंदा रे जा रे जा रे
घडिया गिन गिन दिन बीतत हैं
अखियों में कट जाये रैना
तोरी आस लिये बैठे हैं
हस्ते नैना रोते नैना
हमने तोरी राह में प्रीतम
पग पग पे हैं नैन बिछाये
चंदा रे जा रे जा रे
https://www.youtube.com/watch?v=p-7NJ1lWZAE
Subscribe to:
Posts (Atom)