Saturday 1 June 2019

संजीव तांबे

संजीवची आणि माझी भेट होण्याआधी, त्याचे वडील माझ्या घरी आले होते. त्याचे वडील राम तांबे आणि माझी आई, एकाच कॉलेजमध्ये - सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकायला होते. त्यांची ओळख ही इतकी जुनी. त्यातून राम तांब्याचे भाऊ आमच्या घराला लागून असलेल्या हेमराज वाडीत राहायचे. कधीतरी भावाकडे तेंव्हा आले असणार आणि मग आलोच आहोत इथे तर मग आमच्याकडे जाऊया, या उद्देशाने आले. तसे पाहिले तर संजीव आणि मी, शाळेत पहिलीपासून एकत्र होतो. शाळेत आमची तशी बऱ्यापैकी ओळख होती. तेंव्हा संजीव झावबा वाडीत राहायचा पण लवकरच नाना चौकातील शास्त्री हॉल इथे सगळे कुटुंब गेले. अर्थात संपर्क तसा कमी झाला. पुढे माझा धाकटा भाऊ राजू आणि संजीवचा धाकटा भाऊ सुनील यांची बरेच वर्षे घनिष्ट मैत्री झाली होती आणि सुनील मात्र आमच्या घरी वारंवार येत असे. संजीव तेंव्हा अरुण चितळे आणि बावडेकर यांच्या सोबत बराच काळ एकत्रित होता. तसा संजीव, हेमराजवाडीत त्याच्या चुलत भावाकडे - मंदारकडे यायचा. तेंव्हा आम्ही सगळेच एकत्र खेळत असू आणि आमच्यात संजीव खेळायला यायचा.
शाळेतील एक अंधूक आठवण. शाळेच्या शेवटच्या मजल्यावरील गच्चीत, नार्वेकर बाईंनी दिग्दर्शन केलेल्या एकांकिकेच्या रिहर्सल आठवत आहेत. एकांकिका बहुदा ऐतिहासिक असावी कारण त्यात गीता महाराणी आणि संजीव राजसेवक भूमिकेत होते. 
अशीच एका एकांकिकेची धुसर आठवण आली. पाडगांवकर बाईंनी दिग्दर्शन केलेल्या एकांकिकेत रविंद्र गायतोंडे आणि डायमा (हा पुढे कुठे गेला?) यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.गमतीचा भाग म्हणजे, दोघांच्या भूमिका त्यांच्या पिंडाच्या पूर्ण विरूद्ध होत्या!! 
काळाच्या भरधाव वेगात देखील काही क्षण स्मृतीत राहिले ज्यांना अक्षय चिरंजीवित्व लाभले अन्यथा जिथे दिवसांची फोलपटे होतात तिथे क्षणांचा काय पाड लागणार?
पुढे मला वाटतं , राम तांबे नगर पालिकेच्या निवडणुकीला आमच्या भागातून उभे राहिले होते. तेंव्हा माझा खऱ्याअर्थी तांबे कुटुंबाच्या समाजवादी विचारसरणीशी थोडाफार परिचय झाला. खरतर सगळे तांबे कुटुंबीय हे समाजवादी पक्षाशी बांधलेले आहेत. त्याचे इतर चुलत भाऊ म्हणजे विजय, राजीव इत्यादी याच विचारसरशी बांधील आहेत. त्यावेळेस, मी थोड्या प्रमाणात शिवसेनेशी जवळीक राखून होतो कारण आमचा शेजारी विलास अवचट. पुढे मात्र राजकारणाबाबत माझा बराच भ्रमनिरास झाला आणि मी राजकारण या विषयाला कायमची तिलांजली दिली. संजीव शास्त्री हॉल इथे राहायला गेल्यावर मात्र संबंध विरळ झाले. त्यानंतर एक घनिष्ट आठवण अशी आठवते, संजीवचे लग्न झाले तेंव्हा सुनीलच्या आग्रहाने आम्ही सगळे त्याच्या लग्नाला गेल्याचे आठवत आहे. पण लग्नातली भेट ही काही  स्मरणात राहणारी नव्हे. पुढे आमचा संबंध जवळपास तुटल्यासारखाच झाला. 
एकतर हे कुटुंब कट्टर समाजवादी आणि मी राजकारणापासून चार हात दूर. अर्थात जरी राजकीय मते न पटणारी असली तरी मित्र म्हणून संजीव नक्कीच जीवाभावाचा आहे. त्याला कवितेची सुंदर जाण आहे. संगीताचा शौक आहे. सर्वात मुख्य म्हणजे समंजस आहे. एक, दोन प्रसंग आहेत जेंव्हा त्याची चेष्टा करण्याच्या भरात मी मैत्रीची पातळी ओलांडली!! फार जास्त नाही पण जीभ घसरायला नको होती. बहुदा संजीवच्या देखील लक्षात आले असावे. मला तर लगेच लक्षात आले. अशाचवेळी संजीवने पूर्ण दुर्लक्ष केले. किंबहुना पुढे अनेकवेळा फोनवर बोलताना किंचीत देखील उल्लेख केला नाही. मला याचे फार अप्रूप वाटते. नात्याची वीण उसवत असताना पुन्हा घट्ट बसविणे, हीच मैत्रीची एक कसोटी असू शकते. 
अनेक मतभेदांच्या पलिकडे गेलेली ही मैत्री, याचेच मला खरे कौतूक वाटते.

No comments:

Post a Comment