Tuesday 4 June 2019

सतीश हर्डीकर

सतीशची आणि माझी ओळख आहे यापेक्षा अधिक, तो माझ्या आई-वडिलांच्या संपर्कात जास्त होता. विशेषतः माझे वडील ट्रेकिंग वगैरे कार्यक्रमाला जात असत आणि त्यानिमित्ताने सतीश आणि इतर मित्रांनी स्थापन केलेला "यंग झिंगारो" या ट्रेकिंग क्लब मध्ये माझ्या वडिलांची ये-जा असायची. म्हणूनच सतीश मला नेहमी म्हणतो - अनिल तू अशा आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलास हे तुझे भाग्यच आहे. अर्थात असेच मत सुनीलचे पण आहे. फार मागे, एकेठिकाणी माझ्या आईबद्दल एकेठिकाणी बरेच काही छापून आले होते आणि सुनीलने ते कात्रण मला साऊथ आफ्रिकेत मेल केले होते आणि त्या कात्रणाखाली खाली,  सतीश जे म्हणतो, तसेच लिहिले होते. सतीश तेंव्हापासून माझ्या घरी येत असे. एका स्पष्ट आठवण - एकदा असाच रात्री गप्पा मारायला आला असताना, त्याने एका मांजरीच्या मृत्यूबाबतची कविता सादर केली होती. कवितेचे शब्द आठवत नाहीत पण मांजरीचा मृत्यू होणे, हा कवितेचा विषय होऊ शकतो, हे त्याने दाखवून दिले होते. 
तसा सतीश मृदुभाषी आहे, फार उंच स्वरांत बोलत आहे, घसा तारवटला आहे, डोळे गरागरा फिरवत आहे, असले दृश्य सतीशबाबत स्वप्नात देखील येत नाही. माझ्याशी बोलताना, "अरे अनिल...." अशी सुरवात करणार आणि अशा सुरांत की ऐकताना २ अन्वयार्थ निघू शकतात - १) "अरे अनिल बाळा, या संसाराचा भवसागर तू कसा बरे तरुन जाणार!!" (इथे अनिल "बाळा" हेच योग्य!!) २) त्याचा मूळ स्वभावच अशा सुरांत बोलण्याचा आहे, हे गृहीत धरून ऐकायचे. मी माझ्या फायद्याची बाजू घेतो!! एक नक्की, सतीशला अनेक मराठी कविता मुखोद्गत आहेत. आपल्या पहिल्या पिकनिकला, मी त्याला एका बाजूला घेतले आणि त्याच्याकडून पु.शि. रेग्यांच्या काही कविता म्हणवून घेतल्या. पु.शि. रेगे, जी.ए.कुलकर्णी, आरतीप्रभू हे लेखक आम्हा दोघांच्या अति आवडीचे. त्याने मला एकदा, जी.ए. वर बोलायला सुचवले होते पण बोलण्याची जागा चुकीची होती म्हणून मी ब्र देखील काढला नाही. 
या गृपमध्ये गंभीर विषयावर बोलायला अघोषित बंदी आहे. याचे मुख्य कारण हा गृप एकत्र भेटणार, जेंव्हा पिकनिक असते तेंव्हा किंवा कुठे कधीतरी Get-Together असेल तेंव्हाच. निव्वळ साहित्यिक गप्पा किंवा सांगीतिक गप्पा देखील मारायच्या असतात, हे या ठिकाणी मुद्दामून सांगायला हवे. सतीशचे मराठी साहित्याचे वाचन आणि त्याचे परिशीलन भरपूर आहे. वाचलेल्या पुस्तकाचा अचूक अन्वयार्थ काढण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. मला नाही पण इतर मित्रांना लिहिलेल्या पत्रातून त्याने आपली ही आवड मांडलेली आहे, असे मला त्या मित्रांकडून समजलेले आहे. त्याचा मित्रसंग्रह अफाट आहे आणि त्याला मित्र, खास करून मैत्रिणी जोडण्याचे व्यसनच आहे. एखादा देखणा चेहरा दिसला की लगेच सतीशचा "नाथा कामत" होतो !! ( हे मत विजयचे आहे आणि बहुदा याच सवयीमुळे विजयने त्याचे "झग्या" असे नामकरण केले आहे !!) अर्थात नवनवीन मैत्रिणी शोधणे, हा सतीशचा आवडता छंद आहे!! त्यातून सतीश चर्चगेट इथल्या K.C.college मध्ये होता, जे मुळातले सिंध्यांचे कॉलेज म्हणजे भरपूर सिंधी मुली!! एक गोष्ट मान्यच करायला हवी, मुलींशी बोलण्यात सतीश विलक्षण रमतो. आम्ही मित्र जे विषय काढायला सर्वसाधारणपणे कचरतो, ते विषय देखील मनोज्ञपणे मुलींसमोर मांडतो. एखाद्या मुलीशी सतीश बोलत आहे, हे दृश्य कुठल्याही कॅमेऱ्यात बंद करून ठेवण्यासारखे सुरेख असते. अर्थात तिथे देखील बोलताना, समजावून सांगण्याचा आव असतो. सतीश खरे तर शिक्षकच व्हायचा, चुकून बँकेत नोकरीला लागला !! दुसऱ्याला समजावणे, लोकांसमोर बोलणे, हे त्याला फार आवडते. माझ्या कानावर त्याचे दुसरे "निक नेम" - "पिळ्या" असे देखील आले आहे. 
माझ्याच वडिलांनी मला सांगितलेली  बाब, ट्रेकिंगला गेल्यावर, त्या रात्री शेकोटीचा कार्यक्रम आवश्यक असतो आणि तिथे बोलगाणी गायनात सतीश सगळ्यांच्या पुढे. त्याला असंख्य बोलगाणी पाठ आहेत. माझ्या  मते,आतापर्यंत महाराष्ट्रातील सगळे गड, किल्ले सर करून झाले  असून,हिमालयातील देखील काही टोके गाठली आहेत. या बाबतीत देखील त्याला बँकेची नोकरी दणक्यात लाभली.  
सुदैवाने त्याला बँकेच्या नोकरीत अपरिमित यश मिळाले आणि त्यानिमित्ताने तो बरेचवर्षे परदेशी देखील राहून आला आहे. परदेशी राहण्यावरून, मला एक सुचले. माणसाने जर का व्यामिश्र अनुभव घ्यायचे ठरवले आणि आत्मविकास करायचे ठरवले तर परदेशी काही काळ वास्तव्य करणे अत्यावश्यक आहे. 
सतीश रूढार्थाने बोलघेवडा नाही आणि याचा आम्ही मित्र पुरेपूर फायदा उठवतो. पहिल्या पिकनिकला रात्री, मी आणि विजयने अगदी ठरवून सतीशला "गिऱ्हाईक" करायचे ठरवले आणि सगळी रात्र तरंगत ठेवली होती. रात्रभर त्याच्या नावाने आहे/नाही ते किस्से रंगवले होते आणि कुणालाही झोपायला दिले नव्हते.  आत्ता लिहिताना एक किस्सा आठवला. पहिली किंवा दुसरी पिकनिक असावी ( हा तपशील महत्वाचा नाही)  बसमध्ये एकमेकांच्या टोप्या उडवणे चालू होते. नेत्रा आमच्यात येऊन बसली होती. कशावरून तरी मुलींबद्दल गप्पा सुरु झाल्या. एकदम नेत्रा सतीशला एका मुलीबद्दल तिरकस बोलली (तिरकस बोलणे हा नेत्राचा स्वभावच आहे!!) आणि महाशय लगेच नेत्राकडे बघून अतिशय संथपणे आणि थंडपणे उद्गारले - "नेत्रा तुला काय माहिती, आम्ही  मुले,तुम्हा मुलींच्यात काय बघतो ते !!" नेत्रा थक्क तर झालीच पण बस हास्यकल्लोळात बुडाली. सर्वसाधारणपणे असे कुणी बोलले असते का? पण सतीश बोलला!! 
सतीशच्या मोठेपणा असा, त्याने सगळी चेष्टा चेष्टेवारीच घेतली. आजही तो गृपच्या कुठल्याही कार्यक्रमात भेटला की विजय सुटतो!! सतीशला बायको पण अशीच मितभाषी मिळाली आहे. उमा आता माझ्या चांगली ओळखीची झाली आहे. उमा माझ्या अनेक नातेवाईकांना प्रत्यक्ष ओळखते. मध्यंतरी मी सतीशच्या गोरेगाव इथल्या घरी गेलो होतो, सतीश घरी नव्हता पण उमा आणि मी जवळपास तासभर गप्पा मारत होतो. अनेक जुन्या आठवणी निघाल्या. मला अजूनही असे ठामपणे वाटते, सतीशने आपल्या परदेशातील आठवणी संगतवार लिहाव्यात. मी त्याला तसे एक, दोनदा सुचवले होते पण अनिलला गंभीरपणे घ्यायचेच नसते,हा इथे बऱ्याच जणांचा समज असल्याने, सतीशने ते मनावर घेतलेले नाही. वास्तविक युरपमध्ये ४,५ वर्षे सलग काढणे, हाच अनिर्वचनीय अनुभव आहे आणि तो सलग अनुभव त्याच्या गाठीशी आहे. तसेच इतक्या मराठी कविता मुखोद्गत असताना, त्या कवितांबद्दल थोडे वैचारिक, विश्लेषणात्मक लिहावे. निदान प्रयत्न करायला काय हरकत आहे. फार तर लोकं म्हणतील - काय फडतूस लिहिले आहे ( ही शक्यता फारच कमी आहे तरी देखील....) वगैरे. खरतर लिहिताना लोकांचा कधी फारसा विचार करू नये हे माझे आवडते मत अन्यथा आजवर मी जे काही लिहिले आहे, त्याच्या १०% देखील लिहून झाले नसते. आणि जर का अनिल लिहू शकतो तर सतीशला लिहिणे म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे, हे मला प्रांजळपणे वाटते. 
असो, सतीशसारखा सुसंकृत मित्र माझ्या यादीत आहे, याचा मला म्हणूनच अभिमान वाटतो. 

No comments:

Post a Comment