Sunday 2 June 2019

सुनील जोशी

मी जेंव्हा इथल्या मित्रांवर लेखमाला लिहायचे ठरवले तेंव्हा अग्रभागी नाव सुनीलचेच होते. एकतर आमची अर्ध्या चड्डीत असल्यापासूनची ओळख असल्याने, कुठल्या आठवणी निवडायच्या हाच प्रश्न होता आणि दुसरा भाग म्हणजे मलाच असे वाटले, पहिल्याच लेखात सगळी एनर्जी संपली तर पुढील लेखांत उसनेपण उघड होणार त्यापेक्षा इतरांवर लिहायला सुरवात करावी, कसे वाटत आहे हे बघावे आणि सुनीलवर लिहायला घ्यावे. सुनील आणि माझा प्रवास अगदी समांतर रेषेत सुरु झाला, तसे बघितले तर वयाने मी त्याच्यापेक्षा आठवडाभर मोठा आहे!! एकाच शाळेत असल्याने रोजच्या रोज भेटणे व्हायचे, घरोब्याचे संबंध असल्याने एकमेकांच्या घरी वारंवार जाणे असायचे. सुनील "मेहेंदळे बिल्डिंग" मध्ये राहायचा - त्या बिल्डिंगला मोठी गच्ची होती (आता टॉवर झाला आहे) आणि त्या गच्चीत मी कितीतरी वेळा झोपायला गेल्याचे स्पष्टपणे आठवत आहे अर्थात सुनील देखील माझ्या घरी झोपायला आल्याचे आठवत आहे. सुनीलचा "मेहेंदळे बिल्डिंग" - "कुलूपवाडी (बोरिवली पूर्व)" आणि आता बोरिवली स्टेशन जवळील आलिशान फ्लॅट हा सगळा प्रवास मी व्यवस्थितपणे पाहिलेला आहे. आज सुनील अतिशय हुशार म्हणून गणला जातो आणि तसा तो आहेच, पण केवळ हुशार म्हणणे अर्धवट आहे. अथक प्रयत्न, असामान्य जिद्द आणि never say die वृत्ती याचा परिपाक म्हणजे सुनीलचे academic यश आहे आणि या प्रवासाचा मी एक डोळस मित्र आहे. सतत अभ्यास करणे, आणि त्यासाठी अथक मेहनत घेणे, हे त्याच्या यशाचे खरे गमक आहे. मला त्याच्या सतत अभ्यास करण्याचे वृत्तीचे नेहमीच कौतुक वाटत आले आहे. 
सुनीलने जेंव्हा चार्टर्ड अकाउंटन्सी करायचे ठरवले तेंव्हा माझ्या मावशीच्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये आर्टिकल्स करायला सुरवात केली. तिथे माझा तसा संबंध नसताना देखील, ६ जणांचा गृप झाला जो आजतागायत एकत्र आहे. आज या गृपला ४० वर्षे होऊन गेली, तसे आम्ही काही सतत एकमेकांना भेटत नाही, फोन देखील सटीसामासी होत नाही तरीही एकमेकांना धरून आहोत. 
अर्थात इतका दीर्घ संबंध असल्यावर आठवणींना अजिबात तोटा नाही तरी काही ठराविक टप्पे इथे लिहिणार आहे. सुनीलचा एक दोष म्हणजे तो घडाघडा बोलत नाही, त्याच्या हसण्याला अजिबात आवाज नाही किंवा चेष्टा करायची झाली एका मर्यादित स्तरावर करणार. सतत वरिष्ठ स्तरावर काम करीत असल्याने त्याच्याकडे अनेक किस्से आहेत. लग्न व्हायच्या आधी आमचा गृप सातत्याने भेटत असे आणि तेंव्हा सुनीलकडून अनेक अफलातून किस्से ऐकायला मिळायचे पण सांगायची पद्धत अल्पाक्षरी आणि अत्यंत थंड वृत्तीने सांगायची जणू काही त्यात त्याचा काही सहभाग नाही!! 
सुनील जरी थोडा अबोल असला तरी माझा अनुभव असा आहे जिथे गरज आहे तिथे सुनील हमखास उभा राहणार. २००१ मध्ये मी बराच आजारी पडलो होतो, हॉस्पिटलमध्ये काही महिने काढावे लागले होते. जेंव्हा माझ्यावर ट्रीटमेंट सुरु व्हायची होती तेंव्हा अचानक सुनील, एका रविवारी सकाळी बोरिवलीवरून गिरगावात फक्त मला भेटायला आला होता आणि आम्ही दोघे आमच्या टेरेसमध्ये झोपाळ्यावर बसून तास भर बोलत होतो. गमतीचा आणि महत्वाचा भाग म्हणजे त्या संभाषणात माझ्या आजारपणाचा साधा उल्लेख देखील नव्हता. इतर अनेक विषय काढून त्याने मला गुंगवले होते आणि हे मला, तो त्याच्या घरी परतल्यावर ध्यानात आले. वास्तविक मी फार विमनस्क परिस्थितीत होतो आणि सुनीलने माझी मनस्थिती ओळखली होती. पुढे मला ऑपरेशन करायची गरज पडली. ऑपरेशन करायच्या आदल्या संध्याकाळी सुनील मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आला होता. वास्तविक हॉस्पिटल कितीही सुसज्ज असले तरी ती काही मनमोकळ्या गप्पा मारायची जागा नसते. त्यातून माझ्यावरील शस्त्रक्रिया जवळपास ८ तास चालणार होती. हे लक्षात  ठेऊन,सुनील माझ्या जवळ बसला होता, काहीच बोलत नव्हता पण धीर देत होता. मला वाटतं, त्याला देखील धक्का बसलेला असणार. आम्ही या भेटीचा उल्लेख कधीही केला नाही, त्याची गरजच पडली नाही. आज हा लेख लिहिताना या आठवणी वर आल्या, इतकेच. सुनील काहीसा अबोल आहे पण तरीही वेगळा आहे, तो असा. 
आमची लग्ने जवळपास एकाच वेळी झाली. कल्पनाला मी आता चांगला ओळखतो अर्थात मला देखील कल्पना आहे, तिने माझे "पाणी" जोखले असणार. मी परदेशी असताना सुनीलला पूर्वी बरीच पत्रे लिहिली (त्याने ती वाचली, हा त्याच्या सहनशीलतेचा नमुना) पण त्याने कधीही एक ओळ लिहिल्याचे आठवत नाही. इथे मला सगळे "पंडितजी" म्हणतात - खरे तर हा मला टोमणा आहे पण सुनील खरा "पंडित" आहे. हे मी पूर्ण विचारांती लिहीत आहे. आज सुनील आयुष्यात चांगला स्थिरस्थावर झालेला आहे. त्याचा मुलगा - निखिल तर बाप से बेटा सवाई आहे. निखिल जेंव्हा चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा पहिल्या फटक्यात पास झाला तेंव्हा सुनीलचा मला फोन आला. आवाजात मुलाचा अभिमान डोकावत होता आणि का डोकावु नये. ही परीक्षा म्हणजे  China Wall आहे. 
 असो,आणखी किती लिहायचे - म्हणजे लिहायचे झाल्यास दीर्घ निबंध होईल आणि त्याला आत्मचरित्राचा वास येईल आणि मी तसे कधीच करणार नाही. त्यापेक्षा अबोलपणे मिळणारी साथ मला अधिक महत्वाची आणि उबदार वाटते. 

No comments:

Post a Comment