Tuesday 29 September 2020

या चिमण्यांनो - अतुलनीय स्वररचना

ललित संगीताच्या इतिहासावर जरा बारकाईने नजर फिरवली तर अखिल भारतीय स्तरावर ज्या काही मोजक्याच गाण्याची गणती करता येतील, त्या यादीत "या चिमण्यांनो परत फिरा" या गाण्याचा समावेश अनेक समीक्षक करतात आणि तास समावेश होणे हे सार्थच आहे, हे संगीतकाराची स्वररचना सिद्ध करते. संगीतकार श्रीनिवास खळे यांनी त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत असंख्य अजरामर गाणी दिली तरीही ज्याला अढळ स्थान म्हणता येईल अशी ही चिरंजीव रचना आहे. काही गाणी शब्द, चाल किंवा राग या घटकांच्या पलीकडे जाऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करतात आणि तिथे खरंतर "विश्लेषण" या शब्दाचे थिटेपण संपूर्णपणे जाणवते, अशा काही मोजक्या गाण्यांत हे गाणे सहजपणे विराजमान होते. वास्तविक हे चित्रपटातील गाणे परंतु चाल आणि गायन, याचा जरा अभ्यास केल्यावर, हे गाणे म्हणजे नितांत व्याकुळ करणारे भावगीत वाटते. वास्तविक भावगीत आणि चित्रपटगीत यात मूलभूत फरक काही नाही, फक्त माध्यमे बदलतात. आपण इथे, या चालीत असे काय दडलेले आहे ज्यामुळे हे गाणे पंडित आणि सामान्य रसिक, यांनी एकाच वेळी मोहून टाकते, याचा अदमास घेणार आहोत. मुळात खळ्यांच्या चाली या बव्हंशी संथ लयीत असतात, तिथे शेकडो वादक, भरगच्च कोरस असले काहीही आढळत नाही. बहुतेक गाणी ही, ज्याला "गायकी अंग" म्हणतात अशा तऱ्हेची असतात आणि सर्वात मुख्य म्हणजे खळेकाका चाल बांधताना, कवितेतील प्रत्येक शब्दच नव्हे तर अक्षर देखील निरखून बघतात आणि त्यातील दडलेला आशय आणि त्या आशयातील सांगीतिक कल्पना, याचा विचार करतात आणि म्हणून खळेकाकांची गाणी अवघड होतात. इथे लय ही शब्दातील अचूक भाव ओळखून बांधली जाते. आता गाण्याचा मुखडा बघूया. "या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे आपुल्या जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या." आता संगीताच्या परिभाषेत विचार केला तर मुखड्यातील पहिली ओळ स्पष्टपणे "पुरिया धनाश्री" रागावर ते दुसरी ओळ "मारवा" रागावर आधारलेली आहे पण जरा बारकाईने ऐकले तर असे आढळेल, पहिल्या ओळीतील "परत फिरा रे" मधील "रे" अक्षर "कोमल निषाद" स्वरावर गायले गेले आहे. संगीतातील पंडित लगेच आपल्या भुवया उंचावतील कारण पुरिया धनाश्री राग आणि नंतरचा मारवा राग, या दोन्ही रागात या स्वराला स्थान नाही पण खळेकाकांनी तो स्वर तिथे बसवला!! आणखी वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, "फिरा" शब्दानंतर किंचित क्षणभर विराम आहे आणि मग "रे" अक्षर गायले गेले आहे. कवितेच्या अंगाने बघितल्यास, संध्याकाळची वेळ, आई आपल्या मुलांची व्याकुळतेने वाट बघत आहे आणि त्यातून उमटलेले "परत फिरा" हे शब्द छोट्या आलापीतून येतात परंतु पुढील "रे" या अक्षराने ती व्याकुळता अधिक खोल व्यक्त झाली आणि ती खोली जाणवून देण्यासाठी खळेकाकांनी "कोमल निषाद" आणला आणि लगेच त्या व्याकुळतेची व्याप्ती अधिक दुखरी झाली. संगीतकार, कवितेला अशा प्रकारे "जिवंत" करतो. खरतर गाण्याच्या सुरवातीला व्हायोलिनवरील सुरावट अशी बांधली आहे की ऐकणारा एकदम स्तब्ध होतो. ही सुरांची जादू अलौकिक आहे आणि त्या सुरांवरच आपल्याला लताबाईंच्या गळ्यातून "या चिमण्यांनो परत फिरा रे" ही ओळ ऐकायला येते. सुरांचे गारुड इथेच मनावर पडते आणि आपण सगळे संध्याकाळच्या हुरहूर लावणाऱ्या अधिऱ्या वातावरणात जातो. ही अधीरता, खळेकाकांनी आपल्या चालीतून अचूकपणे दर्शवली आहे. गाणे अतिशय संथ आलापी घेऊन चालते. कवितेतून माडगूळकरांनी जे शब्दचित्र उभे केले आहे त्या शब्दांची आंतरिक गरजच अशी आहे की इथे कुठलाच कोलाहल किंवा वाद्यांचा भरमार जरुरीची नाही. अतिशय मोजकी वाद्ये आणि त्यातून साधलेला अविस्मरणीय सांगीतिक ओघ, हेच खळेकाकांनी मांडलेले आहे. गाण्यात व्हायोलिन वाद्य फार प्रभावी आहे आणि खालच्या स्वरांतील तबला. बाकी कशाचीच गरज नाही. "दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर अशा अवेळी असू नका रे आईपासून दूर चुकचुक करिते पाल उगाचच चिंता मज लागल्या" आता हा पहिला अंतरा बघा. दहा दिशांनी पसरत चाललेला अंधार आणि त्या वेळेचे नेमके वर्णन "अवेळी" या एकाच शब्दातून यथार्थपणे माडगूळकरांनी केले आहे. या एकाच शब्दात सगळे वातावरण आपल्याला आकळते. खळेकाकांनी हा अंतरा वरच्या सुरांत सुरु केला आहे आणि "अंधाराला पूर" या शब्दांची जाणीव अधोरेखित केली आहे. चाल सुरवातीपासून तार स्वरांत जात असते पण लगेच पुढील ओळीतील "आईपासून दूर" इथे चाल येते तोपर्यंतचा प्रवास अजोड आहे. "आईपासून दूर राहू नका" हे आर्जव स्वरांतून दाखवताना चाल पुन्हा मुखड्याकडे वळायला लागते. खळेकाका आपल्या चालीत असेच प्रयोग करतात. पहिली ओळ वरच्या स्वरात घेताना आर्तता कळते पण पुढील ओळीतील शब्द बघता, तिथे वरचे सूर आवश्यक नाहीत म्हणून लगेच चाल मूळ चालीकडे वळायला सुरवात करते आणि शेवटच्या ओळीत ते सांगीतिक वर्तुळ पूर्ण होते. हे जे "वळणे" आहे तेच अलौकिक आहे. "अवतीभवती असल्यावाचून कोलाहल तुमचा उरक न होतो आम्हा आमुचा कधीही कामाचा या बाळांनो या रे लवकर वाटा अंधारल्या" आता दुसरा अंतरा बघूया. संध्याकाळची वेळ, अवेळ का वाटते कारण आईच्या भोवती मुलांची लगबग नाही, आवाज नाही. त्यामुळे वातावरणातील "सुनेपण" किंवा "रितेपण" आईला अधिक जाणवते आणि लगेच ओळ येते - या कोलाहलामुळे आमची कामे होतात ती आज होत नाहीत!! सवयी कशा आयुष्याला जखडून टाकतात ते बघण्यासारखे आहे. या पहिल्या ओळीतील "कोलाहल" शब्द गाताना लताबाईंनी स्वर कसा वजनदार पद्धतीने घेतला आहे. "कोलाहल" शब्दानंतरची अनामिक शांतता आईला वेढून टाकते. जे पहिल्या अंतऱ्यात आपण बघितले तसेच या दुसऱ्या आणि शेवटच्या अंतऱ्यात ऐकायला मिळते. घरातील कामे होत नाहीत कारण मुले अवतीभवती नाहीत आणि मुले आजूबाजूला नसल्याने त्यांचा आवाज नाही. ही सगळी खंत झाले काकांनी स्वरांकित केली आहे. आणि मग त्यातूनच शेवटची ओळ उमटते - बाळांनो आता लवकर या कारण सगळ्या वाटा अंधारात मिसळायला लागल्या आहेत. मनातील अंधाराची भीती आणि म्हणून मनाची कालवाकालव आणि त्यातून मनाला झालेली अधिरेपणाची जाणीव, इतके व्यापक भावविश्व कवितेतून आणि अर्थात खळेकाकांच्या सुरावटीतून आपल्या समोर येते "या बाळांनो या रे लवकर" मध्ये आर्त विनंती आहे आणि ती विनंती तशाच सुरांतून अधोरेखित केली जाते "वाटा अंधारल्या" गाताना लताबाईंनी जी दुखरी नस पकडली आहे त्याला तोड नाही. सगळे गाणे त्या काळवंडून टाकणाऱ्या अंधारात विलीन होते. म्हणूनच म्हणावेसे वाटते, हे गाणे म्हणजे दुखऱ्या वेदनेचे उपनिषद आहे. https://www.youtube.com/watch?v=0qqy48B8-aI

No comments:

Post a Comment