Wednesday 23 September 2020

रस्मे उल्फत को निभाये

चित्रपटगीत एक प्रकारची प्रतीकात्मक व्यवस्था लावण्याचा यत्न करीत असते आणि संगीत हे भारतात प्रभावी शक्ती आहे हे ठासून सांगण्याकडे त्याची प्रवृत्ती असते. कुशलतेने विणलेल्या कथावस्तूंत अनुस्यूत असलेली एकरेषात्म कार्यकारण साखळी तोडण्याचे काम गीत करीत असते. उदाहरणार्थ, समोर दाखवल्या जाणाऱ्या प्रसंगाच्या तपशीलाबद्दल एक सहेतुक संदिग्धता पार्श्वसंगीतामुळे निर्माण होईल. एरवी याच तपशिलावर श्रोते-प्रेक्षकांचे लक्ष केंद्रित होण्याची शक्यता असते. यामुळे तर्कानुसारी साखळीमुळे उद्भवणारी भावात्मकता कमताकद होईल. श्रोता-प्रेक्षकाने परिस्थितीचा खोलवर अर्थ शोधावा म्हणून चांगल्या चित्रपटगीताने त्याला उत्तेजन द्यावे अशी अपेक्षा असते. रूढ प्रघातानुसार श्रोता-प्रेक्षक चित्रपट एकाच पद्धतीने पाहत असतो - त्याला जरा आजूबाजूला वळून बघायला चित्रपटगीत भाग पाडते. शायर नक्श ल्यालपुरी हे नाव चित्रपट क्षेत्रात तसे अभावानेच ऐकायला/वाचायला मिळते आणि याचे कारण, त्यांनी आपले कार्यक्षेत्र केवळ चित्रपटापुरते मर्यादित ठेवले नव्हते. किंबहुना चित्रपटबाह्य आविष्कार माध्यमांत हे नाव मोठ्या तालेवार पद्धतीने वावरत असते. प्रस्तुत गाणे हे गझल वृत्तात लिहिलेली अप्रतिम कविता आहे. सर्वसाधारणपणे चित्रपटीय माध्यमात गझल वृत्तात गाणे लिहिणे अवघड असते कारण चित्रपट हेच माध्यम होय. पडद्यावरील पात्राची पार्श्वभूमी अधिक स्पष्ट करणे हेच गीताचे प्रमुख काम असल्याने तिथे गझल वृत्तातील निरनिराळ्या कविता, पडद्यावरील एकल भाव व्यक्त करण्यास अडचणीची ठरू शकते. उर्दू मिश्रित हिंदी भाषेतील कविता आहे. गझल वृत्तात नेहमीच एक नैसर्गिक लय असते जी संगीतकाराला स्वररचना करायला नेहमी प्रवृत्त करते. संगीतकार मदन मोहन यांनी स्वररचना बांधताना "मधुवंती" रागाचे स्वर हाताशी घेतले आहेत. हा राग तसा फार प्रचलित राग मानला जात नाही तरीही अतिशय सुंदर आहे. "औडव-संपूर्ण" जातीच्या या रागात, आरोही स्वरांमध्ये, "रिषभ" आणि "धैवत" वर्ज्य असून, "कोमल गंधार" आणि "तीव्र मध्यम" स्वरांनी सगळा अवकाश भारून टाकण्याची असामान्य ताकद दिसते. प्राचीन ग्रंथांतून रागाचा समय, दिवसाचा चौथा प्रहर असा दिला आहे. वास्तविक, या रागाचा विस्तार तसा फार प्रचंड नाही पण, तरीही मन भरून टाकण्याची असामान्य ताकद या स्वरांमध्ये आहे. फार वक्र गतीच्या ताना नाहीत पण, हरकती, मुरकतींच्या वळणांनी रागाला प्रसन्न व्यक्तिमत्व दिले आहे.अर्थात ही झाली रागाची तांत्रिक माहिती परंतु स्वररचना बांधताना संगीतकाराने, आपला "पिंड" ओळखून त्यानुसार गीताची बांधणी केली आहे. आता हा "पिंड"कसा आहे? मदन मोहन यांची गीते "गीतधर्मी" असतात. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, गीत बांधताना, त्याला इतकेच स्वातंत्र्य द्यायचे ज्यामुळे गीताचे आपलेपण कुठेही वेगळे होत नाही. आता बघा, इथे संगीतकाराने प्रत्येक अंतरा वेगळा बांधला आहे पण तरीही आपण वेगळेच गाणे ऐकत आहोत, असे अजिबात प्रतीत होत नाही. मुखडा बांधताना मधुवंती रागाचा महत्वाचा स्वर "कोमल गंधार" मध्यवर्ती ठेऊन रचना बांधली आहे. "सा (को)ग ध प म प (को)ग" याच रागाच्या मुख्य स्वरांवर मुखडा तयार केला आहे. आणखी वेगळे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, अर्थाव्यतिरिक्त पण त्याच्या आधारे आशयाचे तरंग निर्माण करण्याची ज्यामध्ये अंगभूत ताकद असते अशा काव्याला प्रतिसाद म्हणून रचनाकार जेंव्हा एखादी भावपूर्ण सुरावट उभी करतो तेंव्हा तिथे गीत संभवते. मात्र आपल्या बांधणीमुळे सांगीत विस्तार अपरिहार्य वाटणार वा ठरणार नाही याची गीतरचनाकारास काळजी घ्यावी लागते. मदन मोहन ठुमरीकडे न वळता गझलकडे का वळले हे यावरून स्पष्ट होऊ शकते. मदन मोहन यांच्या रचनांचे काही मुख्य सांगीत विशेष गझलच्या घटकांशी वा बांधणीशी थेट संवादी असावेत हे नवल नाही. उदाहरणार्थ (अ) त्यांच्या रचनांचे मुखडे गुणगुणत राहावे असे असतात.(ब) मुखड्यानंतर येणारी कडवी अशी असतात की ज्यांचा उद्भव साखळीतील दुव्यांप्रमाणे कार्यरत असलेल्या वाद्यवृंदाच्या आगमनाशिवाय सहज, नैसर्गिकपणे शक्य असतो. अर्थात असे असले तरी वाद्यवृंदातील "सतार" या वाद्याचा प्रभाव लक्षणीयरीत्या जाणवतो, विशेषतः अंतरे सुरु होण्याआधी सतारीवरील "कामगत" खास ऐकण्यासारखी आहे. मदन मोहन यांना वेदनेचे जे आकर्षण होते, त्याचीच प्रतीती सतारीवरील स्वरांतून ऐकायला मिळते. ज्या गीतातून "सांगीत विस्तार" शक्य असतो, अशी रचना गायला मिळाल्यावर लताबाईंची गायकी विशेषत्वाने खुलून येते. उर्दू शब्दांचे उच्चारण, हा तर खास विशेष ऐकायला मिळतोच परंतु शब्दांनंतर येणारी "हलकी" हरकत, त्या वाक्याचे वेगळेच रूप दर्शवते. प्रत्येक अंतरा संपवताना, गायकी कशी "उतरी" स्वरांतून खुलून येते हा श्रवणानंदाचा भाग आहे. चाल अवघड आहे परंतु ऐकताना त्याचे अवघडलेपण बाजूला सारून रसिकांना गीताचा आनंद द्यायचा कसा, यासाठी हे गीत उत्कृष्ट उदाहरण ठरावे. गायन ऐकताना लताबाईंची नेहमीची वैशिष्ट्ये तर ऐकायला मिळतातच परंतु "साझ-ए-दिल" गाताना "दिल" शब्दावरील जी Belated लय आहे ती अतिशय कठीण आहे. इथे "क्षण" किंवा "निमिष" हे काळाचे मापक देखील मोठे वाटेल इतक्या कमी अवकाशात ती सांभाळली आहे आणि इथे लताबाईंची गायकी अलौकिक ठरते. दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास, पहिला अंतरा घेताना "दिल की राहों में उठाते है जो दुनियावाले" ही ओळ गाताना एकतर "उठावण" भिन्न असूनही "उठाते" शब्द गाताना "ठा" अक्षराचे वजन कायम ठेऊन, जी लयकारी घेतली आहे ती निव्वळ थक्क करणारी आहे. आणखी असंख्य सौंदयस्थळे या गाण्यात सापडतात आणि या गाण्याचे विश्लेषण अधिक बारकाईने करायला भाग पाडतात. इतके अलौकिक चालीचे गाणे लोकप्रिय व्हावे यात वेगळे नवल वाटायची काहीच गरज नाही. रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे हर तरफ आग हैं दामन को बचाये कैसे दिल की राहों में उठाते है जो दुनियावाले कोई कहे दे वो दिवार गिराये कैसे दर्द में डुबे हुए नगमें हजारो हैं मगर साझ-ए-दिल टुट गया हो तो सुनाये कैसे बोझ होता तो गमो का तो उठा भी लेते जिंदगी बोझ बनी हो तो उठाये कैसे https://www.youtube.com/watch?v=PTXd3PWYKOA

No comments:

Post a Comment