Friday, 10 April 2020

जा मैं तोसे नाही बोलू

संध्याकाळची सुगंधी रम्य वेळ. कोठीवर लाल जर्द जाजमे पसरलेली. सारंगीवाला आणि तबलजी आपली वाद्ये सुरांत लावून तयार तसेच नेहमीच्या मैफिलीतील रसिक मंडळी हजर. कोठीवर चंदनी धूप  पसरलेला. दिव्यांची लखलखती आरास मांडलेली अर्थात जमलेले सगळेच रसिक कसे असतील? आजूबाजूला आंबटशौकिनांची गर्दी देखील झालेली आणि प्रमुख नृत्यांगना मैफिलीत सामील होते. अंधाऱ्या रात्रीत अचानक वीज चमकावी तशी ती नृत्यांगना ठुमकत आपले सारे अस्तित्व त्या कोठील व्यापून घेते. अर्थात त्या नृत्यांगनेची ही काही पहिली वेळ नसल्याने जमलेल्या सगळ्यांच्या वखवखलेल्या नजरा झेलायची सवय होतीच. ती आली आणि कोठीवर दौलतजादा अदा झाला. 
"धूप उसासत होता कोनीं रजताच्या पात्री 
विचित्र रेशीमचित्रे होतीं रसावली गात्री 
तुझा पियानो यक्षजळातील होता निजलेला 
मनांत गुंफित स्पर्शसुखाच्या स्वप्नांचा झेला"
कविवर्य बा.भ.बोरकरांच्या अविस्मरणीय ओळींचे क्षणोक्षणी स्मरण व्हावे असे ते वातावरण होते. वातावरणात लगोलग सारंगीतून अडाणा रागाचे सूर येतात आणि झरकन लताबाईंचा अप्रतिम आवाज "जा मैं तोसे नाही बोलू" उमटतात. गाण्याची सुरवात अशा काही खटकेदार सुरांनी होते की ऐकणारा तिथेच थबकतो. लखनवी ठुमरीची याद यावी अशा नखऱ्यात त्या कोठीवर सूर उधळतात. गाण्याची बैठक त्या पहिल्या ओळीतच पक्की होते. गाण्याची पहिली ओळ मुद्दामून तीन,चार वेळा घेतली आहे पण तशी घेताना लय तशीच कायम ठेऊन वेगळे वळण घेतले आहे.तसेच आणखी एक वैशिष्ट्य असे आहे ते फारसे कुणाच्या लक्षात येत नाही ."जा" शब्द उच्चारताना त्या शब्दाला "अस्पर्शित" असा "हा" इतका हलक्या पद्धतीने मिसळला आहे की प्रथमक्षणी जाणवतच नाही.  ही करामत संगीतकार अनिल बिस्वास यांची. हीच ओळ परत घेताना "बोलू" शब्द तोडला आहे पण तो तोडताना त्यातील खटका लताबाईंनी निव्वळ अप्रतिम घेतलेला आहे. कोठीवरील गाणे आहे तेंव्हा गायनात नखरेलपणा आवश्यक तसेच रसिकांना आवाहन आणि संयत शृंगार उचित ठरतो. हे सगळे गुण अनिल बिस्वास यांनी पहिल्याच ओळीतून समर्पकपणे दर्शवले आहे. 
पुढील ओळ - "लाख जतन करले सजन, घुंघटा नहीं खोलू" ही ओळ देखील त्याच ठसक्यात आहे. कोठीवरील गाणे म्हटल्यावर सुरांत ठसका यायलाच हवा. गायकी ढंग मुखड्याच्या सुरावटीतून स्पष्ट होतो. चाल पहिल्यापासून द्रुत लयीत असल्याने ऐकणारा गाण्याशी सतत जुळवून घेतो. मुखड्याची पहिली ओळ अडाणा रागावर तर दुसरी ओळ बहार रागावर आहे.लय तशीच ठेऊन दुसऱ्या रागात प्रवेश केलेला आहे पण कुठेही संदर्भ तुटत नाही. इथेही पहिल्या ओळीप्रमाणे "खोलू" शब्द तोडला आहे पण लय अशी ठेवली की ते बिकट वळण फारच मोहक झाले आहे. 
अंतरा सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ अजिबात नाही कारण त्याची फारशी गरजच भासत नाही. "अखियों में रैन गयी,गिन गिन तारे, हो तुम जाये बसे सौतन द्वारे" काव्याचे शब्द ब्रज भाषेला धरून लिहिले आहेत. एक गंमत, जर का आपण आपल्या रागदारी संगीतातील बंदीशींची भाषा वाचली  तर त्या याच ब्रज भाषेवर आधारित असल्याचे आढळेल. प्रसिद्ध कवी शैलेंद्र यांची शब्दकळा आहे. शैलेंद्र हे प्रामुख्याने "लोककवी" म्हणून ख्यातकीर्त आहेत आणि गाण्याचा एकूण बाज लक्षात घेता त्यांची शब्दरचना गाण्याला वेगळेच सौंदर्य प्राप्त करून देते. 
गाण्याची खरी गंमत आहे ती ज्या काही ५,६ ओळी आहेत त्या सुरावटीत कशा प्रकारे घोळवल्या आहेत, ते अवलोकण्याचे. इथे "गायकी" अंग स्पष्ट दिसते. प्रत्येक अंतरा मुखड्याच्या ओळी पुनरावृत्त करीत गायल्या जातात पण पुनरावृत्ती नाही. प्रत्येकवेळी एखादी छोटीशी हरकत घेतली जाते आणि चालीतील वेगळेपण दर्शवणारे आणि लालित्य खुलवणारे आहे. गाण्यात अधून मधून हार्मोनियमचे सूर ऐकायला मिळतात पण ते सूर देखील सुंदरसा नखरा व्यक्त करीत आपल्या समोर येतात. जेव्हा हार्मोनियम वाजत असते तेंव्हा पार्श्वभूमीवर सारंगीचे सूर तरळत आहेतच. अशा वाद्यांच्या बांधणीने स्वररचना अतिशय समृद्ध आणि श्रीमंत होते. 
"छेडो ना मोहे सैंय्या दूंगी मैं गाली, आये कहीं के बडे छईला बिहारी". हा दुसरा आणि शेवटचा अंतरा आहे. "आये कहीं के बडे"" ही ओळ दुसऱ्यांदा संपवताना लताबाईंनी एक "नक्कि" स्वरात खटका घेतला आहे. लयीचे बंधन पाळून स्वनिर्मिती कशी करता येते याचे सुरेख उदाहरण आहे. कोठीवरील गाणे आहे तेंव्हा गायनात नखरा तर आवश्यकच पण तो दर्शविताना कुठेही पातळी घसरू न देता, संयत आव्हानात्मक सृजनाचा हा अप्रतिम आविष्कार आहे. खरे तर हे गाणे फार बौद्धिक आहे आणि ते अशासाठी, द्रुत लयीत गाताना देखील स्वरिक सौंदर्याचे कितीतरी "विभ्रम" ऐकायला मिळतात आणि ही बाब सहज साधता येण्यासारखी नाही. 
संगीतकार अनिल बिस्वास यांचे हेच खरे कौशल्य आहे की त्यांनी रचना बांधताना लखनवी ढंग अंगिकारला आणि तसे स्वीकृत करताना त्यातील नेमके वैशिष्ट्य उचलून गाण्याला बहाल केले आहे. गाणे ऐकताना आपल्याला जरादेखील उसंत मिळत नाही पण चटाचट उरकून टाकलेले नाही तसेच स्वरचना काळजीपूर्वक ऐकली तर बंदिश होऊ शकली असती पण त्यांनी आपला "गीतधर्म" योग्यप्रकारे पाळला. त्यांच्यासमोर भारतीय संगीताचा अतिशय विस्तीर्ण आणि व्यापक असा पट होता. अशा परिस्थिती गाणे नसतेच श्रवणीय न होता बुद्धीगामी होते आणि चित्रपट सांगितलं फार श्रीमंत करून जाते. 


Sunday, 5 April 2020

समीक्षा - एक ओझरता दृष्टिक्षेप

हा विषय चर्चेसाठी घेण्याआधी एक बाब स्पष्ट करतो. इथे समीक्षा ही केवळ साहित्य हाच विषय घेऊन करणार आहे. वास्तविक साहित्य हा विषय कलेच्या प्रांगणात मोडतो तरीही इतर कलांसाठी स्वतंत्र लिहिणे मला अभिप्रेत आहे. आपण बहुतेकजण साहित्य वाचतो त्याचा प्राथमिक हेतू स्वानंद हाच असतो .अर्थात आनंद कशाप्रकारे घ्यावा किंवा मुळात स्वानंद म्हणजे काय? हा प्रश्न सुद्धा इथे येऊ शकतो. अर्थात त्यासाठी आपल्याला "सौंदर्य" या शब्दाकडे वळावे लागेल. याचे महत्वाचे कारण असे संभवते "आनंद" ही भावना मनात निर्माण होण्यासाठी त्या घटिताचे "सौंदर्य" आपल्याला भावलेले असणे जरुरीचे असते. साहित्य समीक्षेला सौंदर्यशास्त्राचा व्यापक पायावर उभे करणे आणि सौंदर्यशास्त्रातील माध्यमाच्या विचारात सुसंगती आणून माध्यमाच्या कल्पनेपासून साधनांच्या कल्पनेची फारकत करणे फार आवश्यक ठरते. सर्वसाधारपणे ललित साहित्याचे सौंदर्य हे भावनात्मक आशयाच्या लयबद्ध संघटनावर अवलंबून असते आणि ही बाब बरेचजण मान्य करताना दिसते. आता हे सौंदर्यनिष्ठ संघटन म्हणजे काय? हा प्रश्न इथे पडू शकतो. वास्तविक कुठल्याही साहित्यात साहचर्यनिष्ठ आणि तर्कनिष्ठ या बाबी अंतर्भूत असतातच. परंतु सौंदर्यनिष्ठ हे कोणत्या अर्थी भिन्न आहे? आणि साहित्याच्या सौंदर्याचे मूल्यमापन करताना फक्त तेच तेव्हडे महत्वाचे ठरते का? वास्तविक पहाता कलाकृतीत अपेक्षित असलेल्या या सौंदर्यनिष्ठ संगतीविषयी आणि त्या संगतीच्या साहचर्यनिष्ठ तसेच तर्कनिष्ठ संगतीशी असलेल्या संबंधाविषयी बरीच मतांतरे आढळतात. यामुळेच बहुदा विशेषतः कवितेची समीक्षा करताना, बरेचवेळा साहचर्यनिष्ठ संबंध लावला जातो पण तो सौंदर्यनिष्ठ दृष्टीने अर्थहीन ठरतो. मुळात सौंदर्यभावना म्हणजे काय? परिस्थितीकडून येणाऱ्या संदेशाविषयी ३ प्रकारच्या संगती लावता येतात. १) मानसशास्त्रीय, २) तर्कशास्त्रीय, ३) सौंदर्यत्मक. यातील मानसशास्त्रीयाची संगती ही साहचर्यनिष्ठ तर तर्कशास्त्रीय संगती ही कार्यकारणनिष्ठ आणि अनुमानप्रधान असते. परंतु सौंदर्यनिष्ठ ही बरेचवेळा साक्षात्कारासारखी कालनिरपेक्ष असते. साहित्याच्या सौंदर्यनिष्ठ संगतीचा प्रत्यय म्हणजेच संवाद,विरोध,समतोल याचा प्रत्यय होय. ललित साहित्याचे कलामूल्य हे नेहमीच सौंदर्यनिष्ठ संगतीनेच सिद्ध होत असले तरी याच ललित साहित्यात साहचर्य आणि तर्क असतोच. विशेषतः कवितेसारख्या कलाकृतीत या तिन्हींचा समन्वय दिसू शकतो. सारांश मांडायचा झाल्यास, सौंदर्यनिष्ठ संघटनांची कल्पना आशयभीरू किंवा नकारात्मक नाही. अमुक एक मांडणी तर्कनिष्ठ किंवा साहचर्यनिष्ठ नाही म्हणून ते सौंदर्यनिष्ठ अशी उथळ समीकरणे मांडण्यास कसलाही आधार नाही. अर्थात विज्ञानात जसे प्रत्येक मुद्दा पूर्णपणे तपासून त्याची वैशिष्ट्ये नोंदवली जातात त्याप्रमाणे कलाकृतीबाबत करता येत नाही आणि हीच खरी अडचण आहे. इथे आपल्याला २ बाबी लक्षात ठेवाव्या लागतील. कलास्वरूप शास्त्राचे स्वरूप नाही. जर तसे आहे हे गृहीत धरले तर सुंदर म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर त्या आधारे सुंदर वस्तूंचा वर्ग करून आपण सिद्ध करू पण तरीही सुंदर म्हणजे काय? याचे उत्तर रसिकांकडून पडताळता येईल. पण मग पुढला प्रश्न, रसिक कोण? रसिक तो ज्याला कलाकृती,कलाकृती म्हणून जाणवतात इथे बराच गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे "रसिक" गृहीत धरल्याशिवाय रसिक पदाची व्याख्या करता येत नाही. त्यामुळे सुंदर या शब्दाभोवतीच कलाकृतीची व्याख्या बघावी लागते आणि असे हे चक्र आहे. या चक्राची सोडवणूक "आस्वाद" या शब्दाने थोडीफार करता येईल. इथे "थोडीफार" हा शब्द वापरला कारण आस्वाद म्हणजे काय हे मांडण्याआधी रसिक आणि कलाकृती हे मुद्दे निश्चित करायला लागतात आणि हे सगळे परस्पराश्रयी आहेत. याची २ कारणे संभवतात. १) ऐतिहासिक, २) मानसिक. ऐतिहासिक या दृष्टीने म्हणता येईल, मानवजातीच्या प्रारंभकाळी मानवी व्यवहाराचे स्पष्ट असे भेद पडले नव्हते. पारलौकिक गरजा पूर्ण करणारे साहित्य, सत्यसंशोधन करणारे साहित्य आणि ललित साहित्य असे प्रकार पूर्वी नव्हते. कोणे एके काळी, धर्म,विज्ञान,नीती,कला ही क्षेत्रे परस्परसंमिश्र होती.त्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या अपेक्षा देखील संमिश्र होत्या. या कालखंडाती काही आकृती आज कलाकृती म्हणून मान्य झाल्या आहेत. उदाहरणार्थ महाभारत. मराठीतील शाहिरी साहित्य देखील एक सुंदर उदाहरण म्हणून घेता येईल.याचा परिणाम असा होतो या वर्गाची अचूक व्याख्या निरातिशय अवघड होऊन बसते. आता दुसरी बाब मानसिक. लहानपणापासून आपण सगळेच एका ठराविक क्रमाने बाहेरच्या जगाचा अर्थ समजून घेत वाढतो. या क्रियेत सत्य आणि असत्या या विधेयकांची जाणीव वास्तविक आणि काल्पनिक या पातळ्यांच जाणीव बऱ्याच उशिराने निर्माण होते. याच पातळीवर कुठेतरी कलाकृतींचा कलात्मक आस्वाद घेण्याच्या पातळीपर्यंत माणसाचा विकास होत जातो. हा विकास परंपरेने एकत्र आलेल्या साहित्याच्या आधारे होतो. हा प्रवाह ध्यानात घेतल्याशिवाय कलात्मक व्यवहारांचे कुठलेही स्पष्टीकरण अशक्य होते. याच क्रमाने व्यक्तींचा विकास होताना त्याच्या आवडी-निवडी अनेक कारणांनी मर्यादित होऊन बसतात. अनेकांना काही आकृती आवडतात पण त्यामागे बरेचवेळा wishful thinking हे सुद्धा असते. परंतु हे सगळे गृहीत धरले तरीही सौंदर्य हे स्वतंत्र तत्व असण्यास प्रत्यवाय का असावा? एकत्र सौंदर्य नावाचे कुठले तरी अमूर्त तत्व असून ते सर्व सुंदर वस्तूंच्या ठिकाणी प्रकट होते असे मानायला काही आधार सापडत नाही. आणि दुसरे म्हणजे Normative विधान आज्ञार्थी स्वरूपात मांडता येते गरजेचे होऊन बसते. उदाहरणार्थ "चोरी करणे पाप आहे". या विधानातच "अरे तू चोरी करू नकोस" हे विधान अंतर्भूत आहे. त्याचप्रमाणे "क्ष" सुंदर आहे. या विधानात "अरे तू क्ष चा आस्वाद घेऊन सुखी होणे आपले कर्तव्य मानले पाहिजे" असे विधान अभिप्रेत असणार नाही. कारण ज्या दिवशी अशी कर्तव्याची भाषा कलाकृतीच्या संदर्भात आपण मांडू त्या दिवशी रसिकाची स्वायत्तता संपून जाईल. ज्याप्रमाणे नीतितत्त्वे कायद्यात मिसळली आहेत, उदाहरणार्थ "चोरी करणे हा गुन्हा आहे", तशी मांडणी सौंदर्याच्या संदर्भात करावी लागेल. काहीजण नीतिशास्त्राधिष्ठित समीक्षा,मानसशास्त्राधिष्ठित समीक्षासौंदर्यशास्त्राधिष्ठित समीक्षा अशी समीक्षेची वर्गवारी करतात. खरे म्हणजे अशी वार्डवरी कितपत ग्राह्य धरायची? असे तर नव्हे ही सगळी समीक्षेला आधारभूत असणाऱ्या ज्ञानाची वर्गवारी आहे. परंतु या आधारभूत ज्ञानात नीतिशास्त्र,समाजशास्त्र,मानसशास्त्र इत्यादी शास्त्रे असू शकतात पण त्यात सौंदर्यशास्त्र बसत नाही. कलाकृतीत असणाऱ्या सौंदर्याची अशी कोणती नवीन व्याख्या सौंदर्यशास्त्र इतरत्र शोधू शकत नाही. तेंव्हा अखेर असे म्हणता येईल, कलाकृती ही कलाकृती म्हणून ठरवण्यासाठी ज्याची गरज आहे त्यालाच सौंदर्य म्हणावे. सर्वसाधारणपणे समीक्षकांच्या दृष्टीने साहित्याचे मूल्यमापन हा एक महत्वाचा प्रश्न असतो आणि त्या दृष्टीने बघायला गेल्यास, मूल्यमापनाचा प्रश्न हा काही अंशी अंतिम मूल्यांच्या प्रश्नांशी निगडित असतो. आपल्याकडे "सत्य","शिव" आणि "सौंदर्य" यांना सर्वसाधारपणे "अंतिम' मूल्ये म्हणून गृहीत धरतो. गंमत म्हणजे यातील कुठलेही एक मूल्य हे दुसऱ्याशी कार्यकारणभावाने निगडित नसते. तसेच कुठल्याही एका मूल्याशी संबंध जोडता आला तर त्याचे साफल्य आपण मान्य करतो आणि इथेच आपण भावानुभवांतील ळ्यतत्वांना आद्य स्थान देऊन सौंदर्य हे मूल्य साहित्याच्या स्वरूपात प्रविष्ट केले जाते. हाच मुद्दा पुढे वाढवायचा झाल्यास, साहित्याच्या महात्मतेत लक्ष्य असलेला कैवल्यपूर्ण (Absolute) मूल्यभाव म्हणजेच त्या लयबद्धतेतून व्यक्त होणारे सौंदर्य. ललित साहित्याची अंगभूत श्रेष्ठता ठरवताना "आधुनिकता" हा मुद्दा थोडासा अप्रस्तुत असला तरी "नाविन्याचा" विचार अप्रस्तुत ठरत नाही. याबाबतीत एक मुद्दा मांडायचा झाल्यास, कोबी प्रतिभेचा धर्म असा असतो की, तो एका घटनेने येणाऱ्या प्रत्यक्ष अनुभूतीचा संबंध दुसऱ्या एका अध्याहृत घटनेवर आधारलेल्या अनुभूतींशी जोडीत असतो. हा संबंध भावनात्मक असतो म्हणजेच वेगळ्या शब्दात भावनानिष्ठ असतो. अर्थात यामध्ये आणखी एक मुद्दा उद्भवतो. भावनानिष्ठ समतानतेचा प्रत्यय मुख्यतः नव्या प्रतिमांतून येत असतो. इथे गोधळ उडण्याची शक्यता जास्त. "भाषेच्या सफाईदार आणि" आपण आपलीच फसगत तर करून घेत नाही ना आणि इथेच समीक्षक आणि त्याचे जागरूक असणे महत्वाचे ठरते. प्रतिमांचे आद्य कार्य आशयाला जिवंतपणा, इंद्रियगोचरत्व आणि विविक्षीतता देणे हेच असते. तरीही "नावीन्य" ही कल्पना कवीच्या विकासातील टप्पे दाखवताना उपकारक ठरते समीक्षेचा पुढील विचार हा फलश्रुतीशिवाय कधीच पूर्ण होणार नाही. ललित साहित्याची सांस्कृतिक फलश्रुती समजून घेण्यासाठी प्रथम "ललित साहित्य" आणि "सांस्कृतिक फलश्रुती" या शब्दांचा अर्थ निश्चित करावा लागेल. ललित साहित्याविषयी असे म्हणता येईल "भाषेच्या साधनेने केलेली कल्पनाप्राप्त जीवनप्रक्रियेची बंदिश!" बंदिश या शब्दाने "स्वयंपूर्ण घाट" ही कल्पना व्यक्त होत असल्याने वेगळ्याने "सौंदर्यनिष्ठ" हा शब्द वापरायची गरज नाही.याचे कारण सौंदर्य हे ललित साहित्याचे एकमेव वैशिष्ट्य नव्हे. कल्पनाप्राप्त जीवनक्रिया हेच ललित साहित्याचे खरे वैशिष्ट्य आहे.त्या दृष्टीने पुढील विचार करता, तत्वज्ञानात्मक चिंतन आणि नितळ कल्पनाप्राप्त जीवनाभूतीची बंदिश या दोन्ही गोष्टी एकत्र आणणे योग्य ठरणार नाही. आता आपण ललित साहित्याच्या सांस्कृतिक फलश्रुतीचा अर्थ निश्चित करण्याचा प्रयत्न करू. सत्य, शिव आणि ससौंदर्य ही आदिमूल्ये आत्मसात करण्यासाठी मानवाने परस्पर सहकार्यातून निर्मिलेल्या वस्तूंचा, संस्थांचा आणि कल्पनांचा एकात्म संभार म्हणजे संस्कृती असे साधारणपणे मांडता येईल. इथे मी "कल्पना" हा शब्द थोडा वेगळ्या अर्थाने वापरला आहे.त्यामध्ये विचार,संकेत,विधी,कलाकृती इत्यादी सर्व मानसिक सृजनाचा अंतर्भाव केला आहे. जर का ही व्याख्या मान्य असेल तर मग संस्कृती ही स्वभावतःच सामाजिक असली तरी तिची फलश्रुती मात्र व्यक्तीचे जीवन अनिवार्यपणे संस्कारित करणे हीच असते. समर्थ,जिवंत आणि सर्वस्पर्शी संस्कृतीचे लक्षण असे की त्या संस्कृतीच्या क्षेत्रात अंतर्भूत झालेल्या माणसाचे व्यक्तित्व हे त्याच्या नकळत कमीजास्तपणे संस्कारित झालेले असते. याच दृष्टीने "सांस्कृतिक वारसा" या शब्दाला असा अर्थ असतो. आणि त्यातूनच सुशिक्षित माणसे असंस्कृत आणि अशिक्षित माणसे सुसंस्कृत आढळणे शक्य असते. ललित साहित्याच्या सांस्कृतिक फलश्रुतील स्थळकाळाच्या मर्यादा नसतात. फार मोठ्या व्याप्तीने बोलायचे झाल्यास, १) सूक्ष्म संवेदनशक्ती,२) व्यापक कल्पनाशक्ती, ३) औचित्यविचाराच्या सापेक्षतेची समज,४) सर्वसाक्षी सहानुभूती आणि ५) अपरिहार्य अस्वस्थता यातूनच बहुदा सुसंस्कृत शब्दाची व्याप्ती समजून घेता येईल. जीवनदर्शी ललित साहित्य हे अशाच स्वरूपाचा मूलभूत संस्कार करीत असतात. अर्थात अशा स्वरूपाचा संस्कार आपण करावा हा हेतू त्यामागे असतोच असे ठामपणे सांगणे अवघड आहे. इथे चमत्कारिक विरोधाभास दडलेला आहे. जो संस्कार करण्याचा प्रयत्न करतो तो संस्कार करण्यात क्वचित यशस्वी होतो. हे काम जिद्दीने होणार नसून प्रतिभेच्या स्वभावसिद्ध अधिकारानेच सिद्ध होते. जीवनदर्शी साहित्याने आपली संवेदनशक्ती अधिक सूक्ष्म होते हे नक्की. परस्परविरोधी व्यक्तींचे अनुभव आत्मसात करण्याइतकी आपली कल्पनाशक्ती व्यापक करतात. या सर्वांचा अटळ परिणाम सर्वसाक्षी सहानुभूती हाच असतो. यात मोडणारे ललित साहित्य हे नेहमी सत्य ,शिव आणि सुंदर या मूल्यांचा अधिकाधिक साक्षेपी शोध घेण्याचा ध्यास निर्माण करतात आणि दुसरीकडे आपण या कल्पनांसाठी निर्माण केलेलं तकलुपी साचे व व्याख्या पुन्हापुन्हा मोडून टाकतात आणि त्याची पुनर्रचना करायला भाग पाडतात. जीवनाचे व्यापक दर्शन घडत असताना आपल्याला त्याच्यातील विसंगतीचा आणि अपूर्णतेची साक्षात्कार घडवत असतात. कल्पनेच्या पातळीवर जीवनाच्या अनेक संभाव्य स्वरुपांचा अनुभव घेणे म्हणजेच आपल्या वैय्यक्तिक जीवनाच्या मर्यादा ओलांडून मानव या नात्याने आपल्या विशाल जीवनाला प्रारंभ करणे होय. अनेक आत्म्यांत प्रविष्ट होऊन जाणिवेच्या अनेक पातळ्या अनुभवण्यासाठी आपण जी विश्वप्रदक्षिणा करतो त्याचेच नाव ललित साहित्याचे वाचन होय. ललित साहित्याच्या मूळ स्वरूपातून निष्पन्न होणारी सांस्कृतिक फलश्रुती ही इतकीच असते

अबीर गुलाल उधळीत रंग

भारतीय संगीत हे प्रामुख्याने भक्तिपर संगीत आहे, हा विचार वारंवार मांडला जातो. परंतु जर का भारतीय संगीताची समग्र परंपरा विचारात घेतली तर हे विधान कितपत संय्युक्तिक आहे? हा प्रश्न पडू शकतो. याचे एक कारण असे संभवते ,भक्ती संगीत ही देखील संगीताची स्वतंत्र कोटी म्हणून अस्तित्वात आहे. दुसरे कारण असे देता येईल, सादर होत असलेल्या एकंदर संगीतांपैकी बरेचसे संगीत खरोखरच भक्तिपर आहे का? विशिष्ट संगीताविष्कार होत असताना कलाकाराची मनोवस्था भक्तिपर आहे किंवा होती म्हणून संगीत भक्तिपर ठरत नाही. साधारणपणे चौथ्या शतकात भक्तिमार्ग अस्तित्वात आला असे मानण्यात येते. आजची भक्तिरचना लक्षात घेता ही परंपरा ध्यानात ठेवणे योग्य ठरते. महाराष्ट्रात लोकसंगीताशी साद्ध्यर्म्य राखून वारकरी संगीताची वाढ झाली आणि त्यातूनच ओवी, विराणी, अभंग इत्यादी छंद अवतरत गेले. लोकधर्मी शाखा सुद्धा शास्त्रधर्मी शाखेप्रमाणेच ठराविक विषय,विधीपुर्वकतेचा शिडकावा,ऋतूसाहचर्य यांनी युक्त असते. अर्थात यात मानवी दैनंदिन जीवनाशी नाते राखण्याचे कार्य सुविहितपणे चालू राहिले. 
संत नामदेवांच्या प्रभावातून जे संत कवी पुढे आले त्यात संत चोखामेळा यांचे नाव फार वर घेता येते. अर्थात त्यावेळच्या समाजधारणेनुसार चोखामेळा बहिकृत झाले आणि त्याचेच रूप त्यांच्या अभंगात दिसून येते. तरीही संत नामदेवांच्या अभंगातून जितक्या निरलसपणे भक्तिमार्ग प्रकट त्यामानाने संत चोखामेळ्यांच्या रचनांतून होत नाही तरीही "या हृदयीचे त्या हृदयी" नेमकेपणी पोहोचते. काव्य म्हणून विचार केल्यास वरीलप्रमाणे अनुभव सातत्याने येतो. जातीबाहेर ढकलल्याने झालेला अपमान, खंत इत्यादी भावना या शब्दकळेतून निर्देशित होतात. संतकाव्यात एक विचार सतत बघायला मिळतो आणि तो म्हणजे समर्पणाची भावना. विठ्ठलाच्या पायी "स्व" ला समर्पित करणे, हा स्थायीभाव दिसतो. तो भाव वगळला तर काव्य म्हणून फार वरच्या दर्जाचे ठरत नाही. अभंग छंदात नेहमीच एक शाब्दिक लय अंतर्भूत असते. त्यामुळे प्रसंगी एखादा शब्द जरी आकळला नाही तरी आस्वादाच्या प्रक्रियेत फारसा अडथळा येत नाही. 
संगीतकार जितेंद्र अभिषेकी हे मुळातले रागदारी संगीताचे गायक आणि अभ्यासक. सुरवातीपासून "आग्रा" घराण्याची तालीम, पुढे "जयपुर" घराण्याची वैशिष्ट्ये आत्मसात केल्याने एकूणच गायकीचा परिसर विस्ताराला. असे असूनदेखील अभिषेकीबुवा प्रसिद्ध झाले ते संगीतकार म्हणून. मराठी रंगभूमीवरील संगीताचा अत्यंत डोळस अभ्यास करून त्यात आमूलाग्र मन्वंतर घडवणारे म्हणून त्यांचे नाव झाले. असे करताना त्यांनी कुठलाच संगीत प्रकार नाकारला नाही,अगदी पाश्चात्य संगीताशी देखील नाते जोडले. मुळात अभ्यासू वृत्ती असल्याने संगीतरचना करताना, कवीच्या आशयाला प्राधान्य देऊन त्यांनी नेहमी आपल्या स्वररचना आकारल्या. आजच्या या अभंग रचनेत देखील  याच दृष्टीचा प्रत्यय येतो. चाल भूप रागाच्या सावलीत सुरु होते पण पुढे शुद्ध कल्याण रागाचे स्वर देखील ऐकायला मिळतात. ताल नेहमीचाच भजनी ठेका आहे. मुळात गाण्याचा मुखदच इतका गोड आणि सहज लक्षात राहणार असल्याने पुढील रचना देखील मनाचा ठाव घेते. पहिल्या दोन्ही अंतऱ्याची चाल जवळपास तशीच ठेवली आहे परंतु शेवटचा अंतर घेताना चाल किंचित वरच्या सुरांत जाते. अभंग रचनेच्या बाबतीत एक निरीक्षण असे - भजनी ठेका रसिकांच्या लक्षात लगेच येतो आणि त्यानुरूप सहज लोकप्रिय होतो. त्यात फारसे प्रयोग आढळत नाहीत. याचा परिणाम असा होतो, अगदी सामान्य रसिक देखील आपले नाते रचनेशी सहज जोडून घेऊ शकतो. 
अभिषेकीबुवा मुळातले"" गायक होते. संगीतरचना करणे हा नंतरचा भाग झाला. शास्त्रोक्त गायक हे गाताना शब्दांचे महत्व ओळखून गाणारे फारच विरळा असतात. अभिषेकीबुवा गायन करताना शक्यतो शब्दांची मोडतोड तर करत नाहीच परंतु शब्द ज्या वजनाने काव्यात आलेला आहे, ते वजन गायनातून मांडतात. हा गुण तर फारसा शास्त्रोक्त गायकांच्या दिसत नाही आणि याचे कारण त्या गायकीच्या मूलतत्वात दडलेले आहे. अत्यंत स्पष्ट उच्चार तरीही आशयाशी शक्यतो तादात्म्य राखणे ही खास अभिषेकीबुवांची, गायक म्हणून वैशिष्ट्ये सांगता येतील. पहिल्याच अंतऱ्यात "उंबरठ्याशी" असा जोडाक्षरयुक्त शब्द आहे पण त्यातील काठिण्य सुरांतून नेमकेपणाने व्यक्त केले आहे. तसेच पुढे दुसरा अंतरा संपताना "नि:संग" हा शब्द याच दृष्टीने ऐकावा. "नि:संग" शब्दाला एक विशिष्ट अर्थ आहे आणि तो अर्थ अभिषेकीबुवांनी कुठेही डागाळू दिलेला नाही. शब्दप्रधान गायकीचे प्रमुख वैशिष्ट्य त्यांनी अचूक आत्मसात केल्याचे लक्षण म्हणता येईल. शेवटचा अंतरा गाताना चाल थोडी बदलते परंतु शब्दोच्चार तसेच ठळकपणे अवतरतात. 
आज इतकी वर्षे झाली तरीही हा अभंग रसिकांच्या ध्यानात राहिला आहे, ही अभिषेकीबुवांच्या व्यासंगाची असामान्य फलश्रुती म्हणता येईल. 


अबीर गुलाल उधळीत रंग 
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग 

उंबरठ्याशी कैसे शिवू? आम्ही जाती हीन 
रूप तुझे कैसे पाहू? त्यात आम्ही दीन 
पायरीशी होऊ दंग गाउनी अभंग 

वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू 
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ 
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनि नि:संग 

आषाढी-कार्तिकी भक्तजन येती 
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती 
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग 


Thursday, 26 March 2020

तुझे गीत गाण्यासाठी

मंगेश पाडगावकरांना बरेचवेळा "गीतकार"असे लेबल लावले जाते आणि खरतर त्यांच्यातील कवीला खालच्या पायरीवर ठेवले जाते. जरा बारकाईने विचार केला तर असा पंक्तिप्रपंच मांडून आपण आपल्यालाच अति हास्यास्पद केले आहे,हे समजून घेता येते. इथे केवळ मंगेश पाडगावकर नव्हे तर असे बरेच कवी उदाहरण म्हणून दाखवता येतील ज्यांना आपण "गीतकार" म्हणून खालची इयत्ता दिली आहे. थोडा विचार केल्यास, केवळ शब्दांना सुरांची जोड लाभली आणि कवितेचे गाण्यात रूपांतर झाले आणि  अशी असंख्य उदाहरणे आपल्याला बघायला मिळतील. एखादे गीत लिहायचे झाल्यास गीतकाराला तितकीच प्रतिभा लागते जितके परिश्रम निव्वळ कविता लेखन करायचे झाल्यास घ्यावे लागतात. किंबहुना ज्या मुक्तछंदाचा नेहमी उहापोह केला जातो अशा मुक्तछंदातील काही शब्दरचनांना काही संगीतकारांनी चाल लावून दाखवली आहे. 
आजचे आपले गाणे, कविता म्हणून बघायला गेल्यास अप्रतिम निसर्गकाव्य आहे. मंगेश पाडगावकर हे मूलतः छंदोबद्ध रचना करणारे भावकवी आहेत. "शुभ्र तुरे माळून आलेल्या निळ्या वाटा" किंवा "पहाटे दारात झुलणारे केशरी मोर" सारखी ललितरम्य प्रतीकं वाचताना डोळ्यासमोर निसर्गाचेच अवीट रूप मांडले जाते. फक्त एक बाब खटकते अर्थात ही बाब संगीतकाराच्या अखत्यारीत येते. कविता वाचताना ही कविता प्रेयसीचे भावरूप दाखवते असे सारखे वाटत राहते परंतु गायन मात्र पुरुषी आवाजात आहे. "पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे" ही ओळ एखादी प्रेयसी(च) बोलू शकते. 
संगीतकार यशवंत देवांनी गाण्याची चाल भीमपलास रागावर आधारित अशी बांधली आहे. कवितेची मागणी प्रसन्नता आहे आणि तोच भाव ओळखून देवांनी चाल बांधली आहे.  सतारीच्या सुरवातीच्या सुरांनी गाण्याची ओळख स्पष्ट केली आहे. गाण्याच्या वाद्यमेळात सतारीचा वापर अतिशय समर्पक केला आहे. मधल्या अंतऱ्यासाठी व्हायोलिन,बासरी सुद्धा योजले आहे. तालासाठी संगीतकार बंगाली तालवाद्य "खोल" हे लोकसंगीतात वापरले जाणारे वाद्य वापरले आहे. अर्थात त्यामुळे चालीची खुलावट खुलून येते. खरंतर बंगालमध्ये हे वाद्य शक्यतो कीर्तन,भजन इत्यादी संगीतप्रकारांसाठी योजले जाते परंतु यशवंत देवांनी प्रणय गीतासाठी वापरून गाण्याची खुमारी वाढवली आहे. संगीतकार म्हणून विचार करताना, देवांच्या चाली या नेहमीच शब्दानुकूल असतात. कवितेतील आशय नेमका आकळून घेऊन चालीची निर्मिती केली जाते. चाल बांधताना देखील, शक्यतो कवितेतील शब्द अर्धवट किंवा अर्थहीन पद्धतीने तोडला जाणार नाही यासाठी प्रयत्न असतो.  अर्थात यशवंत देवांनी "आधी चाल मग शब्द" अशा मार्गाने काही स्वररचना केल्या आहेत पण त्यावेळी देखील शब्दांबाबत वाजवी काळजी घेतल्याचे दिसून येते.  आणखी एक वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास,ज्या गायकाला/गायिकेला चाल द्यायची आहे त्या कलाकाराच्या गळ्याचा "धर्म" ओळखून ते चालीची निर्मिती करतात. त्यामुळे गायन अतिशय परिणामकारक होते. खरंतर हा व्यासंगाचा भाग झाला पण यशवंत देव यांचा अभ्यास निश्चितच कौतुकास्पद आहे. याबाबत आणखी एक विधान करता येईल जेणेकरून यशवंत देवांच्या चालींवर ठोस प्रकाश पडावा. त्यांच्या स्वररचनेतील स्वरांचा ओघ शब्दांच्या, शब्दातील अक्षरांच्या वळणाप्रमाणे जातो, जो आत्यंतिक अर्थानुसारी राखण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे एक घडते, चालींमध्ये स्वरविस्ताराला जागा जवळपास नसते आणि याचे कारण संगीतकाराचा दृष्टिकोन होय. 
आपण वरती बघितले त्याप्रमाणे प्रस्तुत गीत वास्तविक पाहता स्त्री गीत आहे परंतु गायन सुधीर फडक्यांकडून झाले आहे. सुधीर फडके हे सुद्धा नेहमी कवितेतील शब्दांबाबत सजगता दाखवणारे गायक. कवितेतील प्रत्येक शब्दाचा आशयानुरूप उच्चार करण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. हा विशेष ललित संगीतात फार कमी गायकांकडे आढळतो. या गाण्यात तिसरा अंतर संपताना "चांदण्यात आनंदाच्या" हे शब्द गायल्यावर लगेच एक अवघड हरकत घेतली आहे पण ती हरकत घेताना "आनंदाच्या" शब्दातील आशय अधिक खुलवून टाकलेला आहे. गायक म्हणून सुधीर  फडके कसा विचार करीत असत, याचे हे सुरेख उदाहरण आहे. या गाण्यात अशीच एक उद्मेखून ऐकण्यासारखी जागा आहे. शेवटचा अंतरा गाताना दुसरी ओळ "आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना" या ओळीतील "जागताना" शब्द गाताना किंचित स्वरिक वजन दिले आहे पण तरीही स्वराचे "ओझे" होत नाही. ललित संगीत हे अशाच प्रकारे खुलत असते. अशीच दृष्टी, अस्ताईतील दुसऱ्या ओळीत दिसून येते. "तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे" हि ओळ गाताना "तुझे" शब्द असाच थोड्या ठाशीव प्रकारे गायला आहे. अर्थात याचे श्रेय संगीतकार म्हणून यशवंत देवांना देखील द्यायला लागेल कारण चाल बांधतानाच कुठल्या शब्दाला किती वजनाने उच्चारायचे, हा अधिकार संगीतकाराचा असतो. 
अशी सगळ्याच दृष्टीने बांधीव रचना तयार होते तेंव्हा ती चाल कमालीची लोकप्रिय होणे क्रमप्राप्तच ठरते. 


तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे 
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे 

शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा 
रानफुले लेवून सजल्या त्या हिरव्या वाटा 
त्या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे 

मोर केशराचे झुलती पहाटेस दारी 
झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी 
सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे 

शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे 
तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे 
चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे 

एक एक नक्षत्राचा दिवा लागताना 
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना 
पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे 



Friday, 13 March 2020

पहा टाकले पुसुनी डोळे

काही गाणीच अशी असतात, ऐकता क्षणीच प्रेमात पडावे. चाल  तशी साधी, लोभस असते. स्वररचना कवितेच्या आशयाशी सुसंगत असते आणि स्वरांतून कवितेतील आशय अधिक खोलवर 
मांडलेला असतो. अशी स्वररचना अभावानेच ऐकायला मिळते. आपला एक ठाम ग्रह असतो, स्वररचना गुंतागुंतीची झाली म्हणजे ती चाल बुद्धीवादी असते आणि चोखंदळ रसिक अशाच स्वररचनेच्या शोधात असतात आणि तशी सापडली की भुलतात.
वास्तविक स्वररचना संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांची आहे परंतु चालीचे वळण नेहमीच्या शैलीनुसार नसून कवितेतील भावाशयास वेगळे परिमाण देणारा आहे. कविता म्हणून विचार करताना काही ठळक बाबी लगेच लक्षात येतात. आर्त अशी भावकविता आहे. कुठल्याही कवितेतील कुठलाही शब्द हा इतका अचूक आणि नेमका असावा की त्यातील अक्षर/शब्द वगळले किंवा दुसऱ्या शब्दाने मांडायचा प्रयत्न केला तर त्या कवितेचा सगळा डोल, डौल, घाट आणि रचनाच विसविशीत होऊन जाईल. केवळ यमक, प्रासादिक रचना असणे आवश्यक असते, हे मत खरे तर थोडे अपुरे आहे. कवितेतील प्रत्येक शब्दाची "जागा" अशी असावी की तिथे आणखी वेगळी अभिव्यक्ती संभवत नाही. कवितेच्या ध्रुवपदाच्या ओळींतून जे "सांगणे" असते त्याचाच विस्तार तितक्याच सक्षमपणे पुढील कडव्यांतून होणे अपेक्षित असते. आता इथे बघा, बाईचा नवरा रणांगणावर निघाला आहे म्हणजे मानसिक कातर अवस्था. तरीही आपली मानसिक दोलायमान स्थिती लपवत ही स्त्री आपल्या पतीला लढाईवर जाण्यासाठी उद्युक्त करीत आहे.
खरंतर हा प्रसंग इतिहासातील अनेक प्रसंगातून आपल्याला वाचायला मिळतो. शांताबाईंनी कवितेत " दुंदुभी", "चौघडा" असे नेमके शब्द वापरून सुरेख वातावरण निर्मिती केली आहे. पुढे "शकुनगाठ" हा शब्द तर निव्वळ मराठी संस्कृतीमधील. या शब्दाची जोड "पदरास" याच्याशी जोडून शांताबाईंनी कवितेचा "घाट" अधिक "घाटदार" केला आहे. कविता अधिक संपृक्त झाली. 
अशी समृद्ध कविता आपल्याला हृदयनाथ मंगेशकरांच्या बहुतांशी गाण्यात आढळते. किंबहुना गाणे करताना, ती आधी आशयबद्ध कविता असणे जरुरीचे आहे, असा अलिखित दंडक असावा, असा आग्रह दिसतो. मराठीतील अनेक मान्यवर कवीच्या कविता त्यांनी आपल्या कारकिर्दीत स्वरबद्ध केल्या आहेत. ही स्वररचना तशी सरळ आहे. अर्थात कवितेचे शब्द बघता अशी सोपी, अनलंकृत चाल आवश्यकच वाटते. नेमका स्पष्ट राग सांगणे अवघड आहे पण वाचस्पती रागाशी थोड्याफार प्रमाणात नाते जुळवता येते. वाद्यमेळात बासरी प्रामुख्याने वाजते खरंतर बासरी वाद्य हे चालीत मुरलेले आहे कारण जवळपास हेच वाद्य संबंध रचना व्यापून टाकते. मुद्दामून एक बाब सांगण्यासारखी - चाल ऐकताना कुठेही प्रचलित मंगेशकरी शैली दिसत नाही!! 
मुखड्याचीच चाल अंतरे बांधण्यासाठी योजली आहे. कवितेतील व्याकुळ भाव पण तरीही निग्रहता चालीत उतरली आहे. त्यामुळे एका सुंदर भावकवितेचे विषण्ण स्वरचित्र मनासमोर उभे राहते. साधारणपणे मंगेशकरांच्या चालींमध्ये नेहमीच अवाक करणाऱ्या हरकती असतात, दीर्घ ताना असतात पण इथे तसे काहीही ऐकायला मिळत नाही. कापसाच्या पेळूतून सूत निघावे तसे सहजपणे गाण्याची चाल आपली चाल चालत आहे. तबल्याच्या मात्रा देखील बासरीच्या लयीनुसार वाजत आहेत. जरा बारकाईने ऐकले तर "गिळला मी हुंदका" इथे मारुबिहाग रागाशी साम्य दिसते परंतु तितकेच. पुन्हा चाल रागापासून दूर जाते. ललित संगीतात प्रयोग करायचे ते या प्रकारे. इथे शब्दानुसार चाल बदलणे आवश्यक ठरते. अशाप्रकारच्या स्वररचनेत वाद्यमेळ नाममात्र असणे जरुरीचे असते आणि संगीतकाराने तोच दृष्टिकोन ठेवलेला आहे. त्यामुळे गाण्याची चाल सलगपणे ऐकणाऱ्याच्या मनात उतरते. 
लताबाईंचे गायन हा खरतर स्वतंत्र विषय आहे. कवितेच्या पहिल्या ओळीपासून जो व्याकुळ सूर लावला आहे तो शेवटपर्यंत. अर्थात व्याकुळता दर्शविताना कुठेही असहायता किंवा विसविशीतपणा जरा देखील डोकावत नाही. मी एक वीरपत्नी आहे याचा सार्थ अभिमान तर दिसतोच तसेच भावविवशता नाही. "हुंदका" शब्दातील कातरता तसेच "परतुनी पाहू नका" म्हणतानाच निग्रह ज्याप्रकारे सुरांतून दर्शवला आहे ते अभ्यासपूर्ण तर आहेच पण त्याचबरोबर गायिकेची "नजर" दाखवणारे आहे. लताबाईंची गायकी ऐकताना बहुतांशीवेळा ताना या "ठाशीव" नसतात तर कवितेतील आशयवृध्दी करणाऱ्या असतात. प्रसंगी "अर्धतान" घ्यायची किंवा "हरकत"देखील काहीशा हलक्या सुरांत घ्यायची. पहिल्या अंतऱ्यातील पहिल्या २ ओळी जरा चढ्या सुरांत आहेत परंतु "एकदाच जन्मात लाभते ही असली घटिका!!" ही संपूर्ण ओळ वेगळ्या सुरांत घेतली आहे. परिणामी कविता सहजपणे मनात घर करते. 

पहा टाकले पुसुनी डोळे  गिळला मी हुंदका 
रणांगणी जा सुखी राजसा परतुनी पाहू नका 

झडे दुंदुभी झडे चौघडा 
रणांगणाचा हर्ष हा केवढा!!
एकदाच जन्मात लाभते ही असली घटिका!!

शकुनगाठ पदरास बांधूनी 
निरोप देते तुम्हा हासुनी 
आणि लाविते भाळी तुमच्या विजयाच्या तिलका!!

या देशाची पवित्र माती 
इथे वीरवर जन्मा येती 
तोच वारसा तुम्ही पोचवा येणाऱ्या शतका!!





Saturday, 29 February 2020

अनंत बोरकर

अनंता शाळेत असल्यापासून सडपातळ असाच आहे. वयानुसार वजन थोडेफार वाढले असेल पण सत्कृतदर्शनी तरी आजही तो इयत्ता सातवी, आठवी मधील वर्गात खपून जाईल. काही व्यक्ती आपल्या आयुष्यात अशा येतात ज्या आपले अस्तित्व फारशा दाखवीत नाहीत, फारसे बोलत नाहीत आणि बोलले तरी हलक्या आवाजात बोलणार. कुठल्या विषयावर मत विचारले तर शक्यतो टाळणार परंतु जरा खोदून विचारले तर मोघम उत्तर देणार. त्यातून तुम्हाला काय अर्थ घ्यायचा हे तुम्ही ठरवायचे. अनंता काही जास्त बोलणार नाही. शरीराचा सडपातळपणा कसा एकाबाजूने काहीच ध्वनित करीत नाही पण तरीही शरीर म्हणून अस्तित्व दर्शवित असतात. शाळेत देखील त्याचे केस सरळ,सपाट होते.आता वयानुसार केसांनी रुपेरी रंग दाखवायला सुरवात केली आहे. शाळेत त्याने कधी संगामस्ती केली असेल का? असा प्रश्न पडावा इतके अस्तित्व होते. कधी आवाजी बोलणे नाही,  हसासणे देखील मुमूरकेशी!! अगदी मोठा विनोद असला तरच हसण्याचा आवाज येणार परंतु एकूणच शांत प्रवृत्ती. आपल्या गृपला अशाच व्यक्तीची "ऍडमिन" म्हणून गरज होती. एकत्र आपल्या गृपतर अनेकरंगी माणसे. कोण कधी तणतणेल याचा खुद्द ब्रह्मदेवाला देखील पत्ता लागणार नाही तरीही अशी मोट बांधून ठेवायला थंड डोक्याचाच माणूस हवा आणि तिथे अनंता एकदम योग्य. 
आपल्या गृपवर तशी शांतता असते पण कुणीतरी मध्येच फणा उभारते आणि तणातणी सुरु होते. प्रसंग तसे कमीच असतात कारण आपल्या गृपवर "व्यक्त" होणे हा कपिलाषष्ठीचा योग्य असतो. आता वयाची साठी झाली तरी वैय्यक्तिक हेवेदावे भरपूर आढळतात की जे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण मानता येईल. अनंताला कशीही मत विचारले तर आधी शक्यतो विषय टाळायचा त्याचा प्रयत्न असतो. त्यातून जरा आग्रह झाला तर "नरो वा कुंजरो" वृत्तीने अत्यंत थोडक्यात तसेच नेमका अर्थ ध्वनित होईलच याची खात्री नसलेले उत्तर ऐकायला मिळणार. त्यातून पुन्हा विचारले तर उत्तर नाहीच मिळण्याची शक्यता!! असे असून देखील अनंता सगळ्यांच्यात असतो. गप्पा मारणे वगैरे त्याच्या स्वभावातच नाही. शांतपणे प्रत्येकाला निरखित बसायचे हा त्याचा आवडता छंद. त्याच्या इतक्या वर्षांच्या सडपातळ शरीरयष्टीचे आपल्या गृपवरील महानविभूती श्री. सतीश हर्डीकरांनी चपखल वर्णन केले आहे - "बारक्या". आता हेच त्याचे टोपण नाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे आणि त्याने देखील समंजसपणे स्वीकारले आहे. अर्थात इथे टोपण नावाचा "अस्वीकार" संभवतच नाही म्हणा. 
या तणातणीवरून आठवण झाली, अधूनमधून वाद होतात (मला तर असे प्रसंग सणासारखे साजरे करावेसे वाटतात!! ते असो....) मग मला अनंताचा फोन येतो, "अरे अनिल बघ काय चालले आहे. काय बोलायचे?" मी देखील असे वादप्रसंग चवीने चघळत असतो. त्यावेळी माझे मत मी देतो. बरेचवेळा ते तथाकथित मत स्वीकारले जाते. खरेतर मतभेद व्यक्त झाले, वाद झाले तर काय बिघडले? अर्थात हे माझे मत पण आपल्या गृपवर हळव्या वृत्तीच्या व्यक्ती भरपूर आहेत आणि याची नेमकी जाण अनंताला आहे. शक्यतो कुणी गृप सोडून जाऊ नये म्हणून सतत प्रयत्नशील राहण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यातील अनंता हे नाव अग्रभागाने येते. खरंतर इतका मितभाषी असून देखील सगळ्यांना सांभाळून घेतो याचे मला आश्चर्यच वाटते.हल्ली बऱ्याच महिन्यांत गृपची पिकनिक निघाली पण त्याबाबत अधूनमधून आठवण करून देणारा अनंताच. अर्थात पिकनिकची आठवण काढली की गृपवर "हालचाल" थोडीफार सुरु होते पण मराठी माणसाचे एक बाणा आहे - मोडेन पण वाकणार नाही त्याला काय करणार!! प्रत्येकाच्या काहींना काहीतरी अडचणी असतात आणि त्यामुळे मागील पिकनिक होऊन आता वर्ष उलटून गेले तरी काही ठरत नाही. खरतर आता एक मान्य केले पाहिजे, पहिल्या पिकनिकच्या वेळची उत्सुकता आता राहिली नाही. 
मग कधीतरी निदानपक्षी डिनरला भेटायचे ठरते. अर्थात असे प्रसंग सुद्धा विरळाच होत आहेत म्हणा. असे कार्यक्रम ठरवायला मात्र अनंता पुढे असतो. प्रत्यक्ष कार्यक्रमात त्याची बडबड कमीच असते. काहीवेळेस आम्ही काही मित्र एकत्र ड्रिंक्स कार्यक्रमासाठी जमलो असताना, (घसा "ओला" झाला म्हणून असेल!!) अनंता बऱ्यापैकी बोलतो पण स्वभाव मितभाषीच हे खरे. काहीसा हिंदुत्ववादी विचारांचा (इथे मला थोडे हसायला आले!!) असला तरी आपले विचार अति ताणायचे नाहीत जेणेकरून मैत्री नात्यांवर परिणाम होईल, इतपत बोलणे. कधीकधी तर तो इतकी सावधगिरी बाळगतो की मला आश्चर्य(च) वाटते. "अरे मित्रच जमले आहेत ना मग कशाला इतकी सावधगिरी बाळगायची?" पण माझी खात्री आहे, असे मी बोललो तरी अनंता तसाच वागणार. गृपवर कसे व्यक्त व्हावे आणि भाषा कशी वापरावी याचे त्याचे स्वतःचे आडाखे आहेत. त्याचाच परिणाम अनंता कधीही स्वतःची मते मांडत नाही (अपवाद पिकनिक किंवा डिनर कार्यक्रम हा विषय असला तर आणि तेंव्हा देखील "मला जमेल" किंवा "मला जमणार नाही"!! यापलीकडे एकही शब्द अधिक किंवा उणा नाही!! 
एका बाबतीत अनंताला मानले पाहिजे, रोजच्या रोज दर पहाटे गृपवर उर्दू मिश्रित हिंदी शायरी टाकतो. तो इतर अनेक गृपवर आहे (हे त्यानेच सांगितले आहे) आणि तिथून तो ही शायरी आपल्या गृपवर टाकतो, अगदी इमानेइतबारे टाकतो. आपले गृपवरील सगळे इतके नफ्फड आहेत की कधी कुणी त्यातील एखाद्या शायरीवर व्यक्त होत नाहीत!! जणू काही आपला संबंधच नाही असेच वागतात. मला शंका आहे कितीजण वाचत असतील. पण तरीही अनंता जराही नाउमेद होत नाही!! आता चिकाटी वृत्ती म्हणायची की निगरगट्टपणा!! प्रश्नच आहे. हीच चिकाटी मला लोभावते. माझ्यात हा गुण चुकूनही आढळणार नाही आणि म्हणूनच मला या मित्राचा मनापासून हेवा वाटतो. सर्वसाधारणपणे मी प्रत्येकाला त्याच्या स्वभावानुसार काहीतरी लेबल लावतो पण इथे मात्र सपशेल शरणागती!! 

Wednesday, 26 February 2020

(खवट) सुनील ओक

शाळेपासूनच अंगाने भरलेला, काहीसा स्थूल, सरळ केस (पण वागणे तिरके पण ते असो....) शरीरयष्टी थोडी बुटकबैंगण, घारे आणि निळसर डोळे (जात कुठली ते सांगायलाच नको म्हणा) आवाज थोडा घोगरा (म्हणूनच गायनाचे अंग नाही पण हे आमचे सगळ्यांचे सुदैव म्हणायला हवे) आणि शाळेपासूनच नैसर्गिकरीत्या जपलेली तिरकस जीभ!! सुनील सरळ बोलला तर आजच्या काळातील Breaking News ठरेल. शाळेपासून वाकड्यात बोलण्याची सवय आणि त्यातून बुद्धीचे वरदान असल्याने बोलताना सुनील जरी सरळ वाक्य बोलला तरी आम्ही मित्र त्याचा तिरका(च) अर्थ घेतो आणि ही सवय त्यानेच आम्हा सगळ्यांना लावली आहे. 
त्याचे हसणे देखील प्रथमदर्शनी छद्मी वाटावे असे असते. सुनील मनापासून हसला आहे, हे दर्शन देवदुर्लभ असते. किंबहुना कुठे तिरकस विनोद झाला (बरेचवेळा त्यानेच केलेला असतो) की ओक्याला मनापासून आनंद होतो आणो आनंद त्याच्या सुप्रसिद्ध हास्यातुन जगाला समजतो. एकूणच ही व्यक्ती पहिल्यापासून काहीशी हूड अशी आहे आणि त्याला जोडून जहरी बोलणे आहे. त्यामुळे त्याच्या नाडी फारसे कुणी लागत नाही आणि बरोबरच आहे म्हणा, कोण उगीचच खवट टोमणा सहन करून घेईल. त्याच्या जिभेला खरी धार आली ती आपला हा गृप झाल्यापासून. तशी ही स्वारी शाळेच्या जवळच राहणारी - काही वर्षांपूर्वी त्याने खारघर इथे फ्लॅट घेतला आहे ( हे सुनीलच जगाला सांगत असतो. अर्थात खारघर सारख्या लांब जागा घेण्यात दुहेरी फायदा. कुणाला आमंत्रण दिले तरी येण्याची शक्यता कमीच. अर्थात सुनीलचे आमंत्रण म्हणजे भल्या पहाटे अचानक उंबराचे फुल दिसण्यासारखे आहे!!) त्यामुळे बरेचवेळा ही स्वारी जगप्रसिद्ध (हे सुनीलच जगाला ओरडून सांगतो) नावलकर बिल्डींग - खरेतर चाळ- या इमारतीच्या गॅलरीत (सुनीलच्या भाषेत "सौंध"!! सुनीलचे सगळेच जगावेगळे असते.) बसलेला दिसायचा. दुसऱ्या मजल्यावर त्याचे घर होते. अस्मादिकांना ३ वर्षांपूर्वी सुनीलच्या घरी जाण्याचे भाग्य लाभले होते. गणेशोत्सव होता आणि त्यानिमित्ताने त्याने घरी बोलावले होते. मी पण लगेच पडत्या फळाची आज्ञा स्विकारुन लगोलग घरी गेलो होतो. घरी स्वागत चांगले केले. चाळीत गणपती उत्सव असल्याने आनंदी वातावरण होते. मला त्याने चाळीतील गणपती दाखवला आणि त्या चाळीत किती प्रथितयश (हा शब्द सुनीलने मला त्यावेळी ऐकवला होता) व्यक्ती आल्या होत्या, त्यांचे फोटो वगैरे दाखवले आणि सुंदर प्रसाद दिला. अर्थात आमचा गणपती नवसाला पावतो आणि हो, जगप्रसिद्ध आहे वगैरे वाक्ये ऐकवली (मला या वाक्यांची सवय असल्याने लगोलग कानाबाहेर टाकली!!) 
सुनील खरा खुलतो तो आपल्या WhatsApp गृपवर. इथे त्याची तलवारबाजी चालते आणि विशेषतः मी काही लिहिले की लगेच सुनीलचे उत्तर आलेच आणि ते त्याच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे (म्हणजे खवचट) असते. मला मानसिक दु:ख देण्यात त्याला तथाकथित आसुरी आनंद होतो पण मला आता त्याची सवय झाल्याने त्याचे टोमणे वाचतो आणि त्यालाही शालजोडीतले देण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक त्याचा आणि माझ्या मतांत भरपूर विरोधाभास आहे. सुनी देवादिकांवर सढळहस्ते विश्वास ठेवणारा तर मी तिकडे शक्यतो दुर्लक्ष करणारा. आता इथे कुणीही म्हणेल असे असूनही मी त्याच्या चाळीच्या गणेशोत्सवाला का गेलो? प्रश्न नक्कीच वाजवी आहे पण दस्तुरखुद्द सुनील महाराजांचे (मनापासूनचे असावे!!) आमंत्रण मिळण्याचे भाग्य नाकारणार कसे. या आपल्या गृपवर असे भाग्य किती जणांचे असेल? या प्रश्नावर एका हाताची बोटे जास्त होतील म्हणजे बघा. सुनील पक्का हिंदुत्ववादी आणि मी तसा निरालंब. शक्यतो या विषयांवर बोलणे टाळणारा. मला संगीतात भरपूर रुची आणि सुनील अगदी औरंगझेब नसला तरी गाण्यांवर गप्पा मारण्यातला नव्हे. माझी संगीतातील रुची हा सुनीलला मी कायमस्वरूपी चेष्टा करायला दिलेला मसाला आहे आणि सुनील तो मसाला व्यवस्थित वापरतो, अगदी माझे डोळे झोंबेपर्यंत!! 
असे सगळे दैवीदत्त गुण असूनही त्याचा स्वभाव लोभस आहे. खवट बोलेल पण सगळे तात्कालिक असणार. गेल्या काही वर्षांपासून त्याला गुडघेदुखी झालेली आहे आणि सुनील त्या दुखण्याने त्रस्त  झालेला आहे पण तरीही त्याच्या बोलण्यात कधी रडगाणे नसते. आम्ही गृपमधील काहीजण पूर्वी रविवारी सकाळी Morning Walk साठी चौपाटीवर जमत असू. अर्थात सुनील गिरगावात असल्याने त्याला आमंत्रण जायचे. त्यावेळी तर त्याचे दुखणे जरा वाढले होते. आमही सगळे आरामात नरिमन पॉईंट पर्यंत चालत जात असू पण हे महाशय फारतर हिंदू जिमखान्यापर्यंत आमच्या बरोबर असायचे आणि नंतर तिथेच बसून राहायचे. सुनील सरळ बोलला असेल तो याच वेळी!! एकदा तर मलाच शंका आली होती, खरेच याचा गुढगा दुखत आहे की हा नाटके करीत आहे? परंतु लगोलग त्याच्या गुढग्यावर ऑपरेशन झाले आणि मनातील किल्मिष नष्ट झाले. प्रश्न असा आहे,मनात किल्मिष आलेच कसे? याला उत्तर सुनीलचे वागणे!! 
तसा ड्रिंक्स पार्टीला मात्र सुनील अफलातून कंपनी आहे. सतत बडबडत असे नाही नाही पण मध्येच एखादी फुसकुली सोडेल कि जी वर्मावर नेमके बोट ठेवणारी असेल. माझ्या घरी २,३ वेळा सुनील इतर २,३ मित्रांबरोबर आलेला आहे. पार्टीच्या वेळेस मात्र स्वान्तसुखाय पद्धतीने ड्रिंक्स घेणार, एखाद्या नावडता विषय मुद्दामून काढून काड्या टाकायचे काम इमानेइतबारे करणार आणि वाद वाढायला लागला कि लगेच नामानिराळे राहणार. हे त्याचे नामानिराळे राहण्याचे जे कौशल्य आहे, ते मात्र अद्वितीय आहे आणि याची आम्हा सगळ्यांना कल्पना असून देखील सुनील अचूकपणे टायमिंग साधतो. अथर त्याचे बोलणे हे सहसा निर्विष असते, कुणावरही शक्यतो वैय्यक्तिक शेरेबाजी करीत नाही त्यामुळे केलेले विनोद कुणालाही आनंदाने स्विकारता येतात. तशी फार मोठ्या आवाजात बोलायची सवय नाही. सुनील काय करतो, गप्पांचा वेग जरा कुठे थंडावला असे व्हायला लागले की स्वारी आग लावते. 
अशाच अप्रतिम गप्पांत काही तास निघून जातात. अर्थात असा मित्र सहजपणे प्राप्त होत नाही आणि सुदैवाने मला त्याची मैत्री प्राप्त झाली आहे. तसे आम्ही दोघे रोज काही फोनवर बोलत नाही पण कधी एकमेकांना फोन झाला की आमच्या जिभा तिरकस होतात. काही मिनिटे निश्चिन्तपणे  घालवली जातात, एकमेकांची टर मनसोक्तपणे उडवली जाते, आमचा बोलण्याचा कंडू शमवला  जातो आणि आम्ही फोन खाली ठेवतो. एक नक्की, उद्या मला जर काही मदत लागली तर माझे इथे हक्काचे असे काही थोडेफार मित्र आहेत जे रात्रीबेरात्री देखील मदतीला धावून येतील त्यात सुनीलचे नाव नक्की आहे कारण तितका विश्वास खुद्द त्यानेच मला दिलेला आहे.