Friday 13 March 2020

पहा टाकले पुसुनी डोळे

काही गाणीच अशी असतात, ऐकता क्षणीच प्रेमात पडावे. चाल  तशी साधी, लोभस असते. स्वररचना कवितेच्या आशयाशी सुसंगत असते आणि स्वरांतून कवितेतील आशय अधिक खोलवर 
मांडलेला असतो. अशी स्वररचना अभावानेच ऐकायला मिळते. आपला एक ठाम ग्रह असतो, स्वररचना गुंतागुंतीची झाली म्हणजे ती चाल बुद्धीवादी असते आणि चोखंदळ रसिक अशाच स्वररचनेच्या शोधात असतात आणि तशी सापडली की भुलतात.
वास्तविक स्वररचना संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांची आहे परंतु चालीचे वळण नेहमीच्या शैलीनुसार नसून कवितेतील भावाशयास वेगळे परिमाण देणारा आहे. कविता म्हणून विचार करताना काही ठळक बाबी लगेच लक्षात येतात. आर्त अशी भावकविता आहे. कुठल्याही कवितेतील कुठलाही शब्द हा इतका अचूक आणि नेमका असावा की त्यातील अक्षर/शब्द वगळले किंवा दुसऱ्या शब्दाने मांडायचा प्रयत्न केला तर त्या कवितेचा सगळा डोल, डौल, घाट आणि रचनाच विसविशीत होऊन जाईल. केवळ यमक, प्रासादिक रचना असणे आवश्यक असते, हे मत खरे तर थोडे अपुरे आहे. कवितेतील प्रत्येक शब्दाची "जागा" अशी असावी की तिथे आणखी वेगळी अभिव्यक्ती संभवत नाही. कवितेच्या ध्रुवपदाच्या ओळींतून जे "सांगणे" असते त्याचाच विस्तार तितक्याच सक्षमपणे पुढील कडव्यांतून होणे अपेक्षित असते. आता इथे बघा, बाईचा नवरा रणांगणावर निघाला आहे म्हणजे मानसिक कातर अवस्था. तरीही आपली मानसिक दोलायमान स्थिती लपवत ही स्त्री आपल्या पतीला लढाईवर जाण्यासाठी उद्युक्त करीत आहे.
खरंतर हा प्रसंग इतिहासातील अनेक प्रसंगातून आपल्याला वाचायला मिळतो. शांताबाईंनी कवितेत " दुंदुभी", "चौघडा" असे नेमके शब्द वापरून सुरेख वातावरण निर्मिती केली आहे. पुढे "शकुनगाठ" हा शब्द तर निव्वळ मराठी संस्कृतीमधील. या शब्दाची जोड "पदरास" याच्याशी जोडून शांताबाईंनी कवितेचा "घाट" अधिक "घाटदार" केला आहे. कविता अधिक संपृक्त झाली. 
अशी समृद्ध कविता आपल्याला हृदयनाथ मंगेशकरांच्या बहुतांशी गाण्यात आढळते. किंबहुना गाणे करताना, ती आधी आशयबद्ध कविता असणे जरुरीचे आहे, असा अलिखित दंडक असावा, असा आग्रह दिसतो. मराठीतील अनेक मान्यवर कवीच्या कविता त्यांनी आपल्या कारकिर्दीत स्वरबद्ध केल्या आहेत. ही स्वररचना तशी सरळ आहे. अर्थात कवितेचे शब्द बघता अशी सोपी, अनलंकृत चाल आवश्यकच वाटते. नेमका स्पष्ट राग सांगणे अवघड आहे पण वाचस्पती रागाशी थोड्याफार प्रमाणात नाते जुळवता येते. वाद्यमेळात बासरी प्रामुख्याने वाजते खरंतर बासरी वाद्य हे चालीत मुरलेले आहे कारण जवळपास हेच वाद्य संबंध रचना व्यापून टाकते. मुद्दामून एक बाब सांगण्यासारखी - चाल ऐकताना कुठेही प्रचलित मंगेशकरी शैली दिसत नाही!! 
मुखड्याचीच चाल अंतरे बांधण्यासाठी योजली आहे. कवितेतील व्याकुळ भाव पण तरीही निग्रहता चालीत उतरली आहे. त्यामुळे एका सुंदर भावकवितेचे विषण्ण स्वरचित्र मनासमोर उभे राहते. साधारणपणे मंगेशकरांच्या चालींमध्ये नेहमीच अवाक करणाऱ्या हरकती असतात, दीर्घ ताना असतात पण इथे तसे काहीही ऐकायला मिळत नाही. कापसाच्या पेळूतून सूत निघावे तसे सहजपणे गाण्याची चाल आपली चाल चालत आहे. तबल्याच्या मात्रा देखील बासरीच्या लयीनुसार वाजत आहेत. जरा बारकाईने ऐकले तर "गिळला मी हुंदका" इथे मारुबिहाग रागाशी साम्य दिसते परंतु तितकेच. पुन्हा चाल रागापासून दूर जाते. ललित संगीतात प्रयोग करायचे ते या प्रकारे. इथे शब्दानुसार चाल बदलणे आवश्यक ठरते. अशाप्रकारच्या स्वररचनेत वाद्यमेळ नाममात्र असणे जरुरीचे असते आणि संगीतकाराने तोच दृष्टिकोन ठेवलेला आहे. त्यामुळे गाण्याची चाल सलगपणे ऐकणाऱ्याच्या मनात उतरते. 
लताबाईंचे गायन हा खरतर स्वतंत्र विषय आहे. कवितेच्या पहिल्या ओळीपासून जो व्याकुळ सूर लावला आहे तो शेवटपर्यंत. अर्थात व्याकुळता दर्शविताना कुठेही असहायता किंवा विसविशीतपणा जरा देखील डोकावत नाही. मी एक वीरपत्नी आहे याचा सार्थ अभिमान तर दिसतोच तसेच भावविवशता नाही. "हुंदका" शब्दातील कातरता तसेच "परतुनी पाहू नका" म्हणतानाच निग्रह ज्याप्रकारे सुरांतून दर्शवला आहे ते अभ्यासपूर्ण तर आहेच पण त्याचबरोबर गायिकेची "नजर" दाखवणारे आहे. लताबाईंची गायकी ऐकताना बहुतांशीवेळा ताना या "ठाशीव" नसतात तर कवितेतील आशयवृध्दी करणाऱ्या असतात. प्रसंगी "अर्धतान" घ्यायची किंवा "हरकत"देखील काहीशा हलक्या सुरांत घ्यायची. पहिल्या अंतऱ्यातील पहिल्या २ ओळी जरा चढ्या सुरांत आहेत परंतु "एकदाच जन्मात लाभते ही असली घटिका!!" ही संपूर्ण ओळ वेगळ्या सुरांत घेतली आहे. परिणामी कविता सहजपणे मनात घर करते. 

पहा टाकले पुसुनी डोळे  गिळला मी हुंदका 
रणांगणी जा सुखी राजसा परतुनी पाहू नका 

झडे दुंदुभी झडे चौघडा 
रणांगणाचा हर्ष हा केवढा!!
एकदाच जन्मात लाभते ही असली घटिका!!

शकुनगाठ पदरास बांधूनी 
निरोप देते तुम्हा हासुनी 
आणि लाविते भाळी तुमच्या विजयाच्या तिलका!!

या देशाची पवित्र माती 
इथे वीरवर जन्मा येती 
तोच वारसा तुम्ही पोचवा येणाऱ्या शतका!!





1 comment: