Wednesday 14 April 2021

पीटरमेरिट्झबर्ग - स्मरण

वास्तविक या शहराबद्दल मी आधीच लेख लिहिले आहेत तरी आत्ता *आतून* काहीतरी सुचले. साऊथ आफ्रिकेतील १५ वर्षांच्या वास्तव्यात पहिली ३ वर्षे मी या शहरात घालवली. म्हणून असेल पण आजही माझ्या मनात या शहराबद्दल, मनात कुठेतरी ममत्व आहे. याच शहराने मला, या देशात कसे राहायचे, कसे वागायचे, याचे प्राथमिक धडे दिले. तसेच इथे आम्हा मित्रांचा जसा गृप जमला तसा मला इतर शहरांत वावरताना जमवता  नाही. एखाद्या गावाबद्दल तुमच्या मनात का ममत्व वाटते, याचे संयुक्तिक कारण सांगणे काही वेळा तर्कशास्त्राच्या पलीकडचे असते, हेच खरे. तसे गाव टुमदार आहे, जवळपास ७,८ टेकड्यांवर वसलेले आहे, गावात भारतीय वंशाची बरीच मोठी वस्ती आहे आणि तिथे हिंडताना, मला, माझ्या मुंबईचे कधीही विस्मरण झाले नाही. दुसरे असे या गावाने मला त्यांच्या ज्या सहजतेने सामावून घेतले तसे इतर शहरांच्या बाबतीत विरळा घडले. या देशातील माझा पहिलाच अनुभव असेल पण हे शहर मला आजही आपल्या पुण्यासारखे वाटते. इथे Raisethorpe नावाचे उपनगर आहे. तेंव्हा मी तिथल्या Mountain Rise या उपनगरात राहात होतो आणि Raisethorpe हा भाग अगदी जवळपास चिकटून होता आणि इथेच भारतीय वंशाचे लोक भरपूर राहतात. या भागात मी सुरवातीला कितीतरी वीकेंड्स मनमुरादपणे घालवले. इथेच मी नाईट क्लब म्हणजे काय, याचा अनुभव घेतला. या गावाने मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या, मुळ्या या देशातील चालीरीतींचा रोकडा अनुभव दिला जो पुढे मला भरपूर उपयोगी पडला. जून,जुलै मधील हाडे गारठवणारी थंडी दाखवली आणि तितकीच डिसेंबर, जानेवारीमधील उहाची काहिली सहन करायला लावली. वास्तविक मी राहात होतो, तो भाग प्रामुख्याने गोऱ्या वस्तीचा होता आणि अर्थातच *गोरी* संस्कृती नव्याने शिकता आली. १९९४ मध्ये कायदा व्यवस्था तितकी मोडकळीस आली नव्हती आणि म्हणून मी बरेचवेळा एकटाच पायी हिंडत असे. पायी हिंडले की मग हळूहळू गावाचा स्वभाव तुम्हाला कळायला लागतो, त्या स्वभावाशी जुळवून घेता येते. अशा  कितीतरी रविवार संध्याकाळ मी, माझ्याशीच हितगुज करत, त्या गावाचे रस्ते पायी हिंडून, पिंजून काढले. रविवार संध्याकाळ कधीकधी अंगावर यायची आणि *एकटेपणा* भोवंडायला लागायचा. अशाच वेळी, एकट्याने बाहेर हिंडायला सुरवात केली म्हणजे मग मनावर साचलेले मळभ दूर व्हायला मदत व्हायची. त्यातून हवेत गारवा असेल तर बघायलाच नको. अंगात साधे जॅकेट घालायचे आणि नि:संकोच हिंडायला बाहेर पडायचे, असाच माझा रिवाज होता. वास्तविक या देशात *पायी हिंडणे* फारसे प्रचलित नाही पण तरीही आपण बिनदिक्कतपणे हिंडण्यात वेगळीच मौज असते. कुठ्लाही हेतू न बाळगता हिंडले म्हणजे फार मजा यायची, हे खरे. रस्त्यावर फारशी वर्दळ नाही, ओळखीचे भेटण्याची शक्यता कमीच अशा वेळी, स्वतःचा स्वतःशी मूक संवाद स्वतःला स्वतःची वेगळीच ओळख करून द्यायची. याच हिंडण्यात, माझे पाय *जमिनीवर* ठेऊन वागण्याची सवय जडली आणि ती आजतागायत टिकलेली आहे. सुरवातीच्या वेळी मी walkman कानाला लावून हिंडत असे पण नंतर लक्षात आले, आपला संवाद या हिंडण्यात होत नसून, गाणी ऐकण्यातच वेळ जात आहे!! मग Walkman घरात ठेऊन हिंडणे सुरु झाले. मी कोण आहे? मी इथे कशाला आलो आहे? हे प्रश्न तर नित्याचेच सोबतीला असायचे पण अशाच वेळी मनातली दडून बसलेली मुंबई बाहेर यायची आणि मुंबईत आता काय वातावरण असेल? मग पर्यायाने घराची आठवण यायची. सुरवातीला फार अवघड मनस्थिती व्हायची, कातर अवस्था व्हायची आणि एक, दोनदाच असे झाले असेल, परत मुंबईला यावे अशी प्रबळ इच्छा मनात आली होती. इथे माझे कोण आहे? जे सोबतीला आहेत, ते किती काळ माझ्या सोबत राहणार आहेत? असे विचार मनात घर करायला लागायचे. याचाच परिपाक असा व्हायचा, मन घट्ट व्हायचे आणि इथे जे काही करायचे ते स्वतःच्याच जीवावर करायचे, हाच विचार मनात ठाण मांडून बसायला लागला. कधीकधी वाटायचे आपण अधिक *कोषात* गुरफटत आहोत का? या विचाराने मात्र मनाचा तोल सावरायला मदत व्हायची. कधीकधी मात्र असल्या मनोव्यापाराने हतबुद्ध व्हायचे पण एक वाटायचे, हे जे विचार मनात येत आहेत, हे जरुरीचे आहेत कारण यातूनच आपल्या पुढील वाटचाल करायची आहे आणि तशी माझी झाली देखील. अशा काहीशा *एकांतिक* विचाराने, मी कुठेही गुरफटून घेतले नाही. कितीही मैत्री झाली तरी मनात हेच असायचे, ही जमलेली नाती सगळी तात्कालिक आहेत आणि या नात्यांचा याच दृष्टीने उपभोग घ्यायचा. आता मी परत येऊन आता १० वर्षे झाली आणि आता मनात साऊथ आफ्रिका फारशी राहिलेली नाही. तिथले संबंध काही अपवाद वगळता कुठलेच उरलेले नाहीत हे जरी सत्य असले तरी त्या परखड सत्यामागे जमलेल्या नात्यांनी विणलेला कोष त्यावेळी मला सांभाळून घेत होता हे नक्की. कधीकधी अशाच रिकाम्या संध्याकाळी, अचानक काळोखी दाटून यायची आणि मग बऱ्याच इंग्रजी चित्रपटातील कधी इंग्लंड तर कधी इतर कुठला देश, असे वातावरण आजूबाजूला तयार व्हायचे. एक आठवण तर आजही मनात लख्ख आहे. असाच संध्याकाळी बाहेर पडलो आणि अचानक काळोख अंगावर आला पण तेंव्हा असा अचानक होणारा वातावरण बदल काहीसा अंगवळणी पडला होता. आता असा अचानक काळोख दाटला आणि  मनात *शेरलॉक होम्स* आले. त्यांची आठवण आली आणि थोडे हसायलाच आले कारण त्या आधीच्या क्षणापुर्वी याची आठवण यावी, असे काही वाचले देखील नव्हते की प्रसंग घडला नव्हता. वातावरणात थोडे धुके देखील पसरले होते आणि त्याचा परिणाम बहुदा झाला असणार आणि मग ती संध्याकाळ शेरलॉक होम्सच्या स्मरणात चिरंतन झाली. या शहराने मला खूप काही दिले. काहीही न मागता दिले. टेकड्यांवर गाव वसलेले असल्याने रस्ता कधीच सपाटीवर नसायचा. त्यामुळे चालताना बरेच वेळा दमछाक व्हायची. मग कुठंतरी एखादा पेट्रोल पंप लागायचा आणि मग अनिल निमूटपणे तिथें एक कोक किंवा फॅन्टाचा टिन विकत घ्यायचा. त्या मनोहर गारव्यात हळूहळू कोकचे घुटके घेत रस्त्यावरून चालणे, हा अनिर्वचनीय अनुभव होता. नि:शब्द राहण्यात देखील मुट शाब्दिक सुसंवाद व्हायचा. आता नक्की काय संवाद चालायचा ते तितकेसे आठवत नाही.कधीकधी मनात  *मर्ढेकर* वस्तीला यायचे आणि *शिशिर ऋतूच्या पुनरागमें* सारखी ओळ ती संध्याकाळ सुगंधित करून टाकायची. कधीकधी तर - आता मन *निर्विचारी* ठेऊन हिंडायचे मनात यायचे आणि आपलेच तोकडेपण आपल्या समोर उभे राहायचे आणि हसायला यायचे. अशा वेळी मात्र मी *एकटा* हिंडत आहे, हेच बरे वाटायचे. आपण आपल्याला ओळखावे, यासाठी या संध्याकाळ मला अतिशय उपयोगी पडल्या आणि आपले पाय कायम जमिनीवर ठेवायला मदत झाली. खरंतर काही संध्याकाळी अवचित पडलेल्या वळवाच्या पावसाप्रमाणे चकित करून टाकायच्या आणि आपण कोण आहोत? हा प्रश्न अधिक अगम्य आणि गूढ करून टाकत. कधीकधी मनात येते, अशा प्रत्येक *संध्याकाळ* वर विस्ताराने लिहायला हवे पण आळशीपणा नांदतो आणि अनिल तिथेच हतबुद्ध होतो. 

No comments:

Post a Comment