Tuesday 27 December 2022

परदेशी वास्तव्य - एक अनुभव

वास्तविक पहाता, मी एव्हाना साऊथ आफ्रिकेतील वास्तव्याबद्दल बरेच काही लिहिलेले आहे. अर्थात फार थोड्या अनुभवांना लेख स्वरूप मिळाले. काही अनुभव चुटकुल्याच्या स्वरूपाचे असल्याने, किती *वाढवून* लिहायचे? हा प्रश्न होता आणि त्यामुळे तात्कालिक अनुभव तसेच मनात राहिले. जे अनुभव निरंतर मनात रेंगाळत राहिले त्यांना लेखात परावर्तित केले. असे असून देखील आजही असेच वाटते, जितके लिहायला हवे होते, तितके लिहून झाले नाही. खरंतर परदेशी एकट्याने राहताना, प्रत्येक दिवस हा अनुभव असतो. संपूर्ण भिन्न संस्कृती,संपूर्ण वेगळ्या विचारांची माणसे आणि त्यांच्या सहवासात सतत राहायचे. हे कितीही नाकारले तरी अवघड तर असतेच. आपण कुणाशी काय बोलायचे? कसे बोलायचे? लोकं आपले बोलणे कसे स्वीकारतील? आपली भाषा त्यांना समजणे अशक्य तेंव्हा त्यांच्या बाजूने विचार करून वागायचे!! ही खरी तारेवरची कसरत असते. पहिल्यापासून आयुष्याला सुरवात करायची असते. पहिला प्रश्न असतो, जरी इंग्रजी भाषा असली तरी उच्चारात प्रचंड फरक पडतो आणि ते उच्चार जिभेवर बसवण्यात कित्येक दिवस, महिने निघून जातात. सुरवातीला माझी बोबडी वळलीच होती. मी इंग्रजीत बोललेले समोरच्या व्यक्तीच्या कळत नाही आणि समोरचा बोललेलं, अवाक्षर समजत नाही. सुरवातीला त्रेधातिरपीट व्हायची. आता ऑफिसमध्ये काम करायचे म्हटल्यावर इतरांशी जुळवून घेणे भागच असते. बरे असेही सांगता येत नाही, मला काही समजले नाही!! सगळेच अंधारात हात पाय मारण्यासारखे होते. अशाच वेळी शांत, स्थिर चित्त आवश्यक असते कारण भाषा समाजात नाही, हे परदेशात कबूल करणे,ही नामुष्कीच असते. विशेषतः गोऱ्या लोकांचे बोलणे (खरंतर पुटपुटणे) समजून घेणे, हे महा कर्मकठीण! इथेच तुमची पहिली कसोटी असते आणि मला ती वारंवार द्यायला लागली. जवळपास, ३,४ महिन्यांनी भाषेचा थोडाफार अंदाज यायला लागला आणि आत्मविश्वास वाढला. पुढची पायरी, ही कामाचे स्वरूप समजावून घेणे, भारतातील कामाची पद्धत आणि साऊथ आफ्रिकेतील कामाची पद्धत यात महदअंतर आहे. सकाळी ८ वाजता ऑफिस सुरु आणि संध्याकाळी ४.३० किंवा ५ पर्यंत संपणार. ऑफिसची वेळ झाली की तडक बाहेर पडायचे. भारतात, ऑफिसची वेळ ठराविक नाही म्हणजे ऑफिस सुरु वेळेवर होणार पण घरी जायची वेळ, कामाच्या स्वरूपावर अवलंबून. त्यामुळे कामाचा बोजा आपल्यालाच उचलायला लागतो. त्यातून आमच्यासारखे परदेशातून इथे नोकरीला आलेले म्हणजे इथल्या लोकल लोकांच्या मनात अढी बसलेली. त्यांच्यामते, आम्ही इथल्या लोकांच्या पोटावर पाय आणणारे. अर्थात,हे सत्कृतदृष्ट्या चुकीचे नसले तरी आता इथे नोकरी करायला आलो आहोत तेंव्हा हा विचार मनातून काढून टाकून, आपली उपयुक्तता सिद्ध करणे, हे पहिले आव्हान. त्यासाठी कामात मेहनत घेणे अत्यावश्यक. मी तेच केले आणि जवळपास २ महिन्यात कामाचा अंदाज पक्का केला. हे करताना, शनिवार, प्रसंगी रविवारी देखील कामाला यायला लागले. मी शनिवारी कामाला येतो, ही बाब लोकल लोकांच्या पचनी पडणे अशक्य. मग आडून टोमणे मारणे, चेष्टा (अगदी तोंडावर नसली तरी त्यांच्या ग्रुपमध्ये) करणे, इत्यादी प्रकार चालायचे. मला ते सगळे नजरेआड करणे भाग होते. जसजसा हळूहळू स्थिरावयाला लागलो तशी लोकल लोकं मित्रत्वाच्या नात्याने बोलायला लागले. इथे एक दरी कायम असते, त्यांच्या मनातील अढी काढणे जवळपास दुरापास्त असते तरी कंपनीच्या मॅनेजमेंटची मला साथ असल्याने, लोकल लोकं गुमान बसलेले असत. अशावेळी आपणच पुढाकार घेऊन, गप्पा मारणे आणि त्यांचा विश्वास संपादन करणे, आवश्यक असते. ऑफिस कामाबद्दल तर संवाद व्हायचाच परंतु दुपारच्या जेवणाच्या सुटीत काहीतरी विषय काढून मित्र संबंध प्रस्थापित करणे, हा उद्योग सुरु करायला लागला. तोपर्यंत माझ्यासारखे जे भारतातून आलेले होते, त्यांच्याशी जवळीक साधलेली असायची आणि आम्ही सगळे एकत्र वावरत असायचो. मी मॅनेजमेंटचा माणूस, हा समज तर कायम लोकल लोकांच्या मनात असायचा. ही तारेवरची कसरत करत, लोकल लोकांशी मित्रत्वाचे संबंध जुळवले,इतके की पुढे मी त्यांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलो. अर्थात ही लोकल माणसे म्हणजे मुलाचे भारतीय पण आताची त्यांची इथलीच ५ वी किंवा ६ वी पिढी! अशा लोकांची ओळख वाढवणे, त्यामानाने सोपे होते आणि मी तेच केले. कुठूनतरी भारतातच विषय काढायचा आणित्यांची मते जाणून घ्यायची किंवा त्यांच्या बोलण्यात काही कार्यक्रमांचे सूतोवाच व्हायचे आणि मग शनिवार/रविवारी त्यांच्यात जाऊन मिसळायचे. अनिल वाटतो तितका *अबोल* नाही याची खात्री पटवून द्यायची. घेणे, हा कार्यक्रम सामायिक आवडीचा आणि तिथे माझी नाळ जुळली. ड्रिंक्स साठी जमल्यावर मग जीभा मोकळ्या सुटायच्या आणि मग त्यांच्याशी जवळीक साधणे फार सोपे झाले. तोपर्यंत भाषिक उच्चारांची सवय झाली असल्याने, मग गप्पा, अगदी चव्हाट्यावरील गप्पा देखील खुलायला लागल्या. पुढे, पुढे तर लोकल भारतीय माझ्यासाठी घरून काही खायचे जिन्नस घेऊन यायला लागले आणि संध्याकाळी घरी जायची वेळ झाली की माझ्या ताब्यात तो डबा द्यायचे, बहुतांशी केक, मिल्क टार्ट सारखे तत्सम सुके पदार्थ असत आणि संध्याकाळी भूक लागली की ते खायला बरे वाटत असते. पुढे, शुक्रवार किंवा शनिवार रात्री त्यांच्या घरी जमल्यावर मग जेवणाचा बेत व्हायचा आणि जरी भारतीय चवीचे चिकन किंवा मटण नसले तरी त्याची वेगळी अशी चव होती आणि ती निश्चितच चविष्ट होती. मी भारतातला असून सहजपणे खात आहे, हे त्यांच्या घरातल्यांना खूप आवडायला लागले. पुढे मग त्यांच्यासोबत *नाईट क्लब* गाठला आणि बऱ्याच रात्री तिथे काढल्या!! जसे घरात मिसळायला लागलो तशी त्यांच्या घरातील कार्यक्रमांना माझी उपस्थिती अनिवार्य वाटावी, इतका आग्रह व्हायला लागला. काही लग्न समारंभांना जायला मिळाले तर साऊथ आफ्रिकेत मुलाला २१ वय पूर्ण झाले की फार मोठी पार्टी केली जाते. रात्रभर खाणे, पिणे आणि नृत्याचा दंगा चाललेला असतो. बहुतेक घरांच्या पुढे किंवा पाठीमागे प्रशस्त हिरवळ असते आणि त्या हिरवळीवर *पेंडॉल* टाकून, त्यात सगळी मौज, मजा चालते. इथेच मला पाश्चात्य संगीतावर *पाय* कसे टाकायचे, याचे प्राथमिक शिक्षण मिळाले आणि मुख्य म्हणजे इथला लोकल समाज कसा आहे,याचे फार जवळून दर्शन झाले. काहीवेळा तर घरातली भांडणे देखील माझ्यासमोर झाली. अर्थात मी मात्र प्रत्येक वेळी काहीसे *अंतर* ठेऊन वागत होतो. किती झाले तरी मी इथे *नोकरी* करायला आलो आहे, ही भावना कायम माझ्या मनात असायची. त्यामुळे लोकल भारतीयांना पुढे माझ्याशी कितीही जवळीक साधायचा प्रयत्न केला तरी मी मात्र अंतर ठेऊन असायचो. माझी तिथल्या ३ कुटुंबाशी खूपच जवळीक होती (हे पीटरमेरित्झबर्ग इथे होते). पुढे मी हे शहर सोडले तशी हळूहळू संपर्क कमी झाला पण कधी हा या शहरात येत असे तेंव्हा या कुटुंबाची भेट घेत असे. अशाच एका भेटीत, एका कुटुंबात घटस्फोट झाल्याचे समजले म्हणून त्या बाईला भेटायला गेलो. तिनेच आपल्या नवऱ्याला घराबाहेर काढले होते. तिच्याशी यावेळी मात्र खूप गप्पा मारल्या आणि तिने देखील हाताचे काहीही राखून न ठेवता माझ्याकडे मन मोकळे केले. ते करताना, पूर्वीच्या नवऱ्याने, वेगळे झाल्यावर आठवड्याभरात दुसऱ्या मुलीशी संबंध जोडल्याचे सांगितले. सांगताना तिच्या डोळ्यांत अश्रू होते. माझी तिच्याशी जवळपास ४,५ वर्षांची ओळख होती, अगदी सुंदर नाते जुळले होते पण अशा प्रसंगी मीच अवघडल्या सारखा झालो. काय समजूत काढणार? आज या प्रसंगाला २० वर्षांहून अधिक वर्षे झाली तरीही आजही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आहे. साऊथ आफ्रिकेची कौटुंबिक अवस्था ही अशीच आहे आणि हे मला पुढे फार ठळकपणे दिसून आले. नवरा/बायको हे नाते कितीही जवळचे असले तरी ते आपण भारतीय जसे जपतो, तसा प्रकार तिथे अजिबात नसतो. एक घाव, दोन तुकडे, असा प्रकार वारंवार बघायला मिळाला आणि लग्नसंस्थेला काहीही अर्थ उरलेला नसल्याचे, मत ठाम झाले. पुढे गोऱ्या समाजात मला ख्रिसमस एन्जॉय करण्याची संधी मिळाली. गोरा समाज, तुम्हाला नेहमी एका मर्यादेपर्यंत ठेवतो, त्याच्या घरात प्रवेश मिळवणे जवळपास अशक्य. Standerton इथल्या नोकरीत मला ती संधी मिळाली आणि गोऱ्या समाजाचे *अंतरंग* अनुभवायला मिळाले. अर्थात ख्रिसमस सणाबद्दल मी एका ब्लॉग मध्ये लिहिले असल्याने, त्याची पुनरावृत्ती इथे करत नाही. इथल्या गोऱ्या लोकांच्या संस्कृतीचा, इथे भारतीय तसेच काळ्या समाजावर फार दाट पडलेला आहे. मानवी संबंध हे पूर्णपणे Materialistic ठेवायचे, पैसे आहे तोपर्यंत संबंध, पैसे संपल्यावर, अंगावरील कपडे काढून टाकावेत आणि नागवे व्हावे, तसे नातेसंबंध संपवून टाकायचे. ना खेद, ना खंत. पुन्हा नव्या उत्साहाने आयुष्य सुरु करायचे, ही इथली नेहमीची पद्धत. सुरवातीला मला खूप आश्चर्य वाटायचे पण ही इथली संस्कृती आहे म्हटल्यावर, ना मी कुणाला समजावयाला गेलो ना कुणाशी बोलायला गेलो. कुणाशी बोलून कसलाच फरक पडणार नाही, याची खात्री असायची. परदेशी राहायला लागल्यावर माझ्यात खूप फरक पडला. ते साहजिकच आहे, साऊथ आफ्रिकेत उणीपुरी १६ वर्षे काढल्यावर फरक तर पडणारच. मुख्य म्हणजे मी बराच स्वावलंबी झालो. स्वतःच्या हाताने जेवण करायला शिकलो, शिकावेच लागले अन्यथा उपाशी जगण्याची वेळ येणार. जो अनिल मुंबईत असताना, साधे मिरच्या,कोथिंबीर आणत नसे, तोच अनिल तेंव्हा आठवड्याच्या आठवड्याचा घरातील भाज्यांचा हिशेब ठेवायला लागला आणि जेवण करायला लागला. पुढे पुढे तर मांसाहारी डिशेस देखील शिकला आणि मित्रांसाठी बनवायला लागला. भारतात असताना, केवळ मित्रांशीच संबंध राखणारा अनिल, पुढे अनोळखी व्यक्तींशी संबंध साधायला लागला. तितका आत्मविश्वास निश्चितपणे वाढला. मी तिथे एकटा रहात होतो तेंव्हा तब्येतीची काळजी घेणे, माझे मलाच बघायला लागायचे आणि ते देखील करायला शिकलो. दुसरा तरुणोपाय नव्हतो. एकूणच आयुष्यावर बराच परिणाम झाला. काही प्रत्यक्ष तर काही अनावधानाने लक्षात येतात. माझे तर आता ठाम मत आहे, व्यक्तित्व प्रगल्भ करायचे झाल्यास, माणसाने परदेशात निदानपक्षी ३,४ वर्षे सलग काढावीत. आपली आपल्यालाच वेगळी ओळख मिळते.

No comments:

Post a Comment