Tuesday 21 January 2020

Wendi Farrell

मी साधारणपणे २००६ मध्ये प्रिटोरिया इथल्या महिंद्र साऊथ आफ्रिका या कंपनीत लागलो. १९९८ ते २००१ मी डर्बन सारख्या मोठ्या शहरात राहिलो होतो. त्यानंतर या शहरात राहायला आलो. एकूणच फिरायला जायचे तर शेजारील जोहान्सबर्ग शहर गाठायचे आणि परतायचे, असा परिपाठ असायचा पण आता या शहरात नोकरी मिळाली आणि सर्वात प्रथम घर शोधणे, या विषयाला महत्व देणे आवश्यक होते. त्याआधी मी Standerton इथे रहात होतो आणि तिथून निघताना, माझ्या जोहान्सबर्ग इथे राहणाऱ्या मित्राकडे घरातले सगळे सामान ठेऊन, भारतात सुटी घालवायला आलो. अर्थात काही दिवस घरी (मुंबईमधील) घालवल्यावर सरळ प्रिटोरिया गाठले. सुदैवाने लगेच मला ऑफिसजवळील Eco Park या कॉम्प्लेक्समध्ये घर मिळाले आणि लगेच मित्राकडून सगळे सामान आणून स्थिरस्थावर व्हायला लागलो. ऑफिसमध्ये, तेंव्हा विजय देसाई, महेंद्र भामरे, हेतल शाह आणि विजय नाक्रा ही कंपनीच्याच हेड ऑफिसमधून इथे ट्रान्स्फर झाली होती आणि त्यांच्याशी लगेच ओळख होणे साहजिकच होते. याच ऑफिसमध्ये मला वेन्डी भेटली, आमचा C.E.O. विजय नाक्राची वैय्यक्तिक सहाय्यक म्हणून कामाला होती - आता ती दुसऱ्या कंपनीत काम करते. काहीसा उंच शेलाटी बांधा, सडपातळ देहयष्टी, निळसर डोळे, सोनेरी केस, उजव्या गालाच्या खाली छोटासा तीळ आणि सर्वात महत्वाचे सहजपणे फुलणारे हास्य. पहिल्याच दिवशी माझ्या टेबलाशी येऊन, माझी ओळख करून घेतली. अर्थात तो पर्यंत पूर्वीच्या कंपनीतून गोऱ्या व्यक्तीशी संपर्क होणे, ओळख वाढणे इत्यादी बाबी अंगवळणी पडल्या होत्या. या ऑफिसमध्ये वरील ४ व्यक्ती आणि अस्मादिक सोडल्यास सगळे काम करणारे गौर वर्णीय होते. इतक्या घाऊक स्वरूपावर गोऱ्या व्यक्तींशी काम यापूर्वी कधीही केले नव्हते.
मी राहात होतो तो प्रसिद्ध "सेंच्युरियन" उपनगरीय भाग - जिथे क्रिकेटचे जगप्रसिद्ध स्टेडियम आहे, माझा कॉम्प्लेक्स देखील अतिशय देखणा, अवाढव्य असा होता. एकूण सगळेच मनासारखे घडले होते. ऑफिसमध्ये बहुसंख्य गोरे असल्याने त्यांचीच संस्कृती ऑफिसमध्ये होती - स्पष्ट बोलायचे झाल्यास, कामाच्या वेळात शक्यतो गप्पा टाळणे, काम करताना संपूर्णपणे मन लावून काम करणे इत्यादी. वास्तविक कामाच्या दृष्टीने माझा आणि वेन्डीचा फारसा संबंध नव्हता पण तरीही तिने मला पहिल्याच भेटीत घर शोधायला मदत केली आणि पेपरमधील जाहिरात दाखवून तिथल्या बाईचा फोन नंबर देऊन, संपर्क साधायला सांगितले आणि हे सगळे अतिशय साधेपणाने. कुठेही मी अनिलचे काम करून देत आहे, असला फालतू आविर्भाव नव्हता. कुठेही औषधापुरता देखील औपचारिकपणा नव्हता.
मला घर मिळाले आणि मी तिथे राहायला गेलो. वेन्डीला तसे सांगितले आणि तिने काहीही कारण नसताना, माझ्याशी हात मिळवून अभिनंदन केले. मला देखील जरा बरे वाटले. एकतर गोऱ्या व्यक्ती आपणहून स्वतः:हुन दुसऱ्याशी बोलायला, संबंध वाढवायला तयार नसतात. आज मी साऊथ आफ्रिका सोडून ९ वर्षे झाली पण आजही आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. ऑफिसवेळेत गप्पा मारण्याचा प्रश्नच नव्हता पण तरीही Good Morning Anil किंवा ऑफिस सोडून जाताना, Good Evening Anil, असे व्हायचेच. आमची मैत्री खरी व्हायला लागली ती शुक्रवार दुपारच्या काळात. शुक्रवार दुपार आली म्हणजे हळूहळू ऑफिसमधील ताणतणावाचे क्षण कमी व्हायला लागतात, वीक एन्ड कुठं नि कसा साजरा करायचा, या बद्दल बोलणी व्हायला लागतात. मी एकटाच रहात असल्याने, माझी चेष्टा होणे क्रमप्राप्तच होते, विशेषतः: आता कुठल्या मुलीबरोबर "डेटिंग" आहे? असला प्रश्न देखील ती विचारायची. पुढे ओळख वाढल्यावर आम्ही आमच्या कुटुंबाची माहिती एकमेकांना दिली, फोटो दिले. बरेचवेळा ती माझ्या टेबलाशी यायची आणि काहीतरी विषय काढून बोलायची. मी एकटा रहात आहे, याचे तिला थोडे कौतुकच होते, विशेषतः: जेवण बनवणे घर सांभाळणे सगळे एकट्याने करतो याचे तिला नवलच वाटायचे. ती नेहमी मला, आज जेवणात काय आहे? असला प्रश्न विचारायची आणि विचारताना स्वराला स्निग्धता असायची. वास्तविक आपले मसाले त्यांच्या पचनी पडायचे नाही त्यामुळे खाणे एकमेकांना देण्याचा प्रश्नच नव्हता. बरेचवेळा आमच्या ऑफिसमध्ये दर महिन्याला, शेवटच्या शुक्रवारी बियर पार्टी असायची, तेंव्हा वेन्डी माझ्याशी बरेच खुलून बोलायची. पार्टी म्हणजे सगळाच मोकळेपणा असायचा, विषयाचे कसलेही बंधन नसायचे तरीही स्वाभाविक मर्यादा या पाळल्याच जायच्या. मी बियर घ्यायचो तर वेन्डी वाईन किंवा तत्सम ड्रिंक घ्यायची. पार्टी तशी उशिरापर्यंत चालायची तरीही शेवटपर्यंत वेन्डी तिथे हजर असायची.
तिथे कामाला असताना, मला ५० वर्षे पूर्ण झाली. वास्तविक मला काही फार मोठा समारंभ असा करायचा नव्हता. ऑफिसमधील आम्ही ४ भारतीय माझ्या घरी येणार होते, त्यानिमित्ताने घरी थोडे ड्रिंक्स, मी चिकन बिर्याणी बनवली होती, ती एन्जॉय करायची असेच पार्टीचे स्वरूप होते पण वेन्डीने माझा वाढदिवस कंपनीच्या मेलवर टाकला आणि सगळीकडून अभिनंदन सुरु झाले. थोड्या वेळाने वेन्डीच माझ्या टेबलाशी आली आणि अभिनंदन म्हणून मिठी मारली. त्यात कुठेही वखवखणे नव्हते की आणखी कुठलीही वासना नव्हती. आपला एक भारतीय मित्र, आज पन्नाशी गाठत आहे, याचा निखळ आनंद व्यक्त होत होता. वेन्डी कामात मात्र वाघ होती तसेच कामात अचूक होती. तिने केलेल्या कामात, निदान मी तरी कधीही चूक झालेली बघितली नाही.
कामाच्या संदर्भात देखील आमचे बोलणे व्हायचे, वास्तविक तिचे काम आणि माझे काम हे संपूर्णपणे वेगळे होते.
त्याच काळात एकदा मी भारतात सुटीवर आलो होतो. ऑफिसमधील दोन मैत्रिणींनी मला भारतातून येताना, "गुरु शर्ट" आणायला सांगितले होते. आता मुद्दामून सांगितले आहे म्हणून मी जरा चांगल्यातले शर्ट्स घेतले आणि परतल्यावर त्यांना दिले, त्यांनी लगोलग मला पैसे दिले. हा गोऱ्या लोकांचा व्यवहार असतो. वास्तविक मला काही फार खर्चिक असे नव्हते पण आपण दुसऱ्याकडून का म्हणून फुकट घ्यायचे? ही वृत्ती. आता वेन्डीने काही मला सांगितले नव्हते म्हणून मी काही तिच्यासाठी आणले नव्हते पण त्यावरून वेन्डीने माझी भरपूर चेष्टा केली. मी तुझी मैत्रीण तेंव्हा मी सांगायला कशाला पाहिजे? तूच स्वतः:हुन आणायला हवे होते!! असे तिचे म्हणणे आणि तसे बघितले तर त्यात काही फार चूक नव्हते. एका क्षणी तर मलाच माझी चूक कळली आणि मी ते मान्य केले. अर्थात त्यावरही वेन्डीने बराच खवचटपणा केला.
२००८ मध्ये आमच्या कंपनीने देशातील सगळ्या एजंट्सची वार्षिक मीटिंग ठरवली होती. अर्थात मॅनेजिंग सेक्रेटरी म्हणून वेन्डीला भरपूर काम होते आणि तसे तिने नेमकेपणाने केले. दोन दिवसांची मीटिंग होती आणि आदल्या दिवशी संध्याकाळी, दिवसभराचे सोपस्कार संपल्यावर डिनर पार्टी होती. त्यावेळेस मात्र मी आणि वेन्डी एका कोपऱ्यात ड्रिंक्स घेऊन शांतपणे बसून गप्पा मारीत होतो. पार्टी निमित्ताने तिने लाल जर्द रंगाचा गाऊन घातला होता. पांढऱ्या वर्णावर लाल गाऊन फारच खुलून दिसत होता आणि मला तिची चेष्टा करायची संधी मिळाली आणि मी ती भरपूर साधली.एकूणच आमच्यात कसलेही गैरसमज होतील असले काहीही नव्हते पण तरीही मैत्रीच्या मर्यादा आम्ही दोघेही पूर्णपणे सांभाळीत होतो. मनापासून मैत्री करावी पण मैत्री या नात्यांच्या सगळ्या मर्यादा ओळखाव्यात, हे मला वेन्डीकडून शिकता आले. निव्वळ निखळ मैत्री, त्यात कुठेही वखवख नव्हती आणि आता तर आम्ही दोन टोकाला रहात असताना केवळ अशक्य!! कंपनीचा व्यवहार त्यावेळी घसरत चालला होता, विजय देसाईला परत भारतात पाठवले गेले, महेंद्रची देखील वर्णी लागली होती. आम्हा सगळ्यांनाच आमचे भवितव्य दिसायला लागले होते. वास्तविक या कंपनीत मी रमलो होतो पण असे घडायचे नव्हते. मी कंपनी सोडायचा निर्णय घेतला आणि वेन्डीला सांगितला. तिला तितकासा आवडला नव्हता पण त्याला इलाज नव्हता - पुढे काही महिन्याने तिने देखील कंपनी सोडली.
आम्ही नंतर वेगवेगळ्या कंपनीत कामाला लागलो तरीही एकमेकांशी संपर्क राखून होतो. अर्थात बरेचवेळा फोनवरून बोलत असायचो. कंपनी सोडायचा एक दिवस आधी ती माझ्या टेबलाशी आली. मी टेबल आवरत होतो. तिला बहुदा कुठेतरी खट्टू वाटत असावे कारण तिची नजर तरी तेच सांगत होती. काहीशा रुद्ध स्वरांत तिनी माझा हात हातात घेतला, किंचित दाबला आणि आम्ही बहुदा शेवटचे असे, मिठीत शिरलो. किंचित क्षण असतील पण त्या मार्दवतेने मला देखील काहीसे भारावल्यासारखे झाले. कुठला अनिल आणि कुठली वेन्डी!! आता परत कधी भेटणार, याची सुतराम शक्यता नव्हती तरीही काहीसा लळा लागला होता. आता रोजच्या रोज भेटणे अशक्य.
पुढे मी कायमचा भारतात परतायचा निर्णय घेतला आणि तिला तसे फोनवरून कळवले. खरतर तिला खूपच आनंद झाला होता कारण आता मी माझ्या कुटुंबात जाणार होतो. मैत्रीच्या मर्यादा न सांगता आखून घेऊन तरीही सजग मैत्री कशी करावी, याचे सुंदर उदाहरण तिने मला घालून दिले. आजही आम्ही फेसबुकवरून संपर्कात आहोत आणि एकमेकांच्या  वाढदिवसाला आवर्जूनपणे फोन करून शुभेच्छा देतो. मैत्री नात्यात यापेक्षा आणखी काय वेगळे साधायचे असते?

No comments:

Post a Comment