Wednesday 9 November 2022

आपली आवड

आपण एखादे गाणे ऐकतो किंवा एखादा रंगभूमीवर सादर होणारा कार्यक्रम बघतो तेंव्हा आपल्या मनावर त्याचा बरावाईट परिणाम नेहमीच होत असतो. कुठलीही जाहीररीत्या सादर होणारी कलाकृती ही मानवी मनावर परिणाम ही घडवितच असते , मग तो परिणाम कशाही प्रकारचा असू शकतो. आपल्याला त्याचा प्रभाव लगोलग जाणवतो, असे नसते. काही परिणाम दीर्घ काळाने आपले अस्तित्व दाखवतात तर काही तात्काळ दाखवतात. त्यानुरूप आपण आपली आवड नक्की करीत असतो. बहुतेकवेळा आपली आवड ही साधकबाधक विचार करून ठरतेच असे नाही कारण "माझी आवड" हाच विचार आपली ठरवायला प्रभाव टाकणारा असतो. परंतु "आपली आवड" हा निकष म्हणून योग्य आहे का? यातून अहंकार प्रकट होत नाही का? बरेचवेळा इतपत विचार करण्याचे तारतम्य दाखवले जात नाही. याचे मुख्य कारण, पुन्हा "माझी आवड" इथेच गाडी येऊन थांबते. आपण आपल्यामध्ये इतके गुंतलेले असतो की त्यापलीकडील जग न्याहाळायची गरज वाटत नाही. त्यामुळे मग "दर्जा"ठरवणे, या कृतीला काहीच अर्थ उरत नाही. हाच मुद्दा पुढे आणायचा झाल्यास, जेंव्हा आपण इतरांच्या कलाकृती बघतो/ऐकतो, तेंव्हा डोळ्यावरील पट्टी काढून आस्वाद घेणे, हे घडतच नाही. आपल्याला याची साधी जाणीव देखील होत नाही. जेंव्हा एखादा कलाकार दुस-याची कलाकृती सादर करतो तेंव्हा त्याच्याकडे २ पर्याय असतात. १)मूळ कलाकृती जशी आहे, तशीच्या तशी सादर करणे किंवा २) त्या कलाकृतीत स्वत:ची भर टाकून, त्या कलाकृतीची सौंदर्यवृद्धी करणे. आता हे दोन्ही मुद्दे तौलनिकदृष्ट्या बघितले तर सादर करायला अती अवघड असतात. स्वत:ची स्वतंत्र भर टाकायची म्हणजे मूळ कलाकृतीचे संपूर्ण आकलन होणे गरजेचे असते. त्या कलाकृतीतील अचूक सौंदर्याचे भान असायला हवे आणि मुख्य म्हणजे आपण जी भर टाकत आहोत, त्याची वाजवी जाणीव असणे गरजेचे असते. मुळ कलाकृती तशीच्या तशी सादर करायची झाल्यास, पुन्हा तोच मुद्दा मांडायचा झाल्यास, मूळ कलाकृती पचवता आली पाहिजे. एकूण काय, सादर करायच्या कलेचे समग्र भान अत्यावश्यक. बहुतेक वेळा, इथेच फसगत होते. आकलन होण्याआधीच सादर करायची घाई होते आणि सगळेच विसविशीत होऊन बसते. मजेदार भाग म्हणजे सादरीकरण घिसडघाईने केले आहे, याचे भान देखील होत नसते. तरीही लोकांच्या समोर यायची प्रचंड इच्छा असते आणि बरेचवेळा आपलेच हसू करून घ्यायचे असते. कुठलेही सादरीकरण हे नेहमीच गंभीरपणे सादर करायचे असते आणि हीच जाणीव नसते.

No comments:

Post a Comment