Friday 22 April 2022

साहित्यिक वास्तवता - एक मूल्य - भाग ४

आता आपण थोडे वेगळे मांडून बघू. अगदी भिन्न प्रकारचे अनुभव आणि भिन्न प्रकारची लेखकांची व्यक्तिमत्वे कलाकृतीतून व्यक्त होत असतात. आणि आपण त्या सगळ्या कलाकृतीचा सारख्याच अनुभूतीने रसास्वाद घेऊ शकतो. त्यामागे नेमकी काय कारणे असू शकतात? याचे उत्तर शोधणे महत्वाचे ठरू शकेल. असे म्हणतात कलावंत जरी एखाद्या विशिष्ट घटनेचे चित्रण करत असेल तरी ती घटना प्रातिनिधिक स्वरूपाची असते; जीवनात नेहमी घडणारी असते. त्यामुळे चित्रण करताना तो वास्तव जीवनाविषयी सर्वसामान्य असे काहीतरी सांगतच असतो. अर्थात काही कलावंत अपवादात्मक असे विषय निवडीत असतात. या भूमिकेबाबत २ प्रकारच्या अडचणी उद्भवू शकतात. एक अशी की, सर्वानुमते श्रेष्ठ ठरलेल्या कलाकृतीचे विषय अपवादात्मक असू शकतात. उदाहरणार्थ *किंग लियर* हे नाटक किंवा *क्राईम अँड पनिशमेन्ट* ही कादंबरी तत्कालीन जीवनाचे प्रातिनिधिक चित्रण करणारी आहे, असे विधान करणे अवघड आहे आणि तरीही या दोन्ही कलाकृती श्रेष्ठ दर्जाच्या आहेत, असे मानले जाते. अशा रीतीने सर्वसंमत असे जे काही कलाकृतीच्या संदर्भात निर्णय आहेत त्या निर्णयाशी ही भूमिका सुसंगत नाही. शिवाय तर्कदृष्ट्या प्रतिनिधित्वाची कल्पना सदोष आहे. कुठलीही गोष्ट घेतली तरी ती इतर कुठल्याही गोष्टींचे पूर्णांशाने प्रतिनिधित्व करू शकत नाही. त्याचप्रमाणे अमुक एका वर्गाच्या चौकटीतल्या काही गोष्टी तिच्या एका सीमेजवळ असतात तर काही त्या चौकटीच्या मध्यभागी असतात. त्यामुळे अमका एक कामगार इतर सर्व कामगारांचा प्रतिनिधी आहे, असे फार मर्यादित अर्थाने म्हणता येईल. त्यामुळे साहित्यात जीवनाचे प्रातिनिधिक चित्रण असावे असे म्हटले तर अनेक अडचणी उपस्थित होतील. या शिवाय आणखी एक मुद्दा समोर येतो आणि तो म्हणजे, एखाद्या कथेतील व्यक्ती ज्या प्रमाणात सचेतन असते, त्या प्रमाणात ती कथा, कलाकृती ठरते. परंतु प्रातिनिधिक ही एक कल्पना (Concept) असते आणि म्हणूनच ती अचेतन असते. त्यामुळे ज्या प्रमाणात हे प्रतिनिधित्व एखाद्या कथेतील व्यक्तीच्या अंगी असेलत्या प्रमाणात ती ठोकळेबाज ठरणार. साहित्याचे व्यापक स्वरूपात प्रसरण सुरु झाले म्हणजे असा धोका उद्भवतो.

No comments:

Post a Comment