Monday 7 November 2022

कविता आणि समीक्षा

कविता आणि वाचक यांच्यामध्ये दुर्बोधता हाच एकमेव अडथळा असतो, हे तितकेसे नेमके विधान म्हणता येणार नाही. परंतु यामुळेच निर्माण होणारे अंतर जमेल तितके कमी करणे, समीक्षकाच्या हाती असू शकते. विशेषतः कवितेच्या वेगवेगळ्या सर्जनशीलतेच्या शक्यता निर्माण होत असताना आणि त्यायोगे वाचकाच्या अभिरुचीच्या बदलाचा वेध घेत असताना,जेंव्हा तफावत जाणवते, तिथे समीक्षक मदतीला येऊ शकतो. असे म्हणता येईल, कवितेच्या सर्जनाच्या प्रगतीत प्रतिभेला अनन्यसाधारण महत्व मिळते तर अभिरुची घडताना, वाचकाच्या दृष्टीने सामाजिक संस्कृती आपले महत्व दाखवून देत असते. अर्थात ही संस्कृती घडण्यात, कलेबाहेरील असंख्य घटक कारणीभूत असतात. बरेचवेळा हेच घटक संस्कृती घडणे किंवा संस्कृतीवर परिणाम घडवणे, या कृतीला कारणीभूत ठरतात. वेगळ्या अर्थाने ही विधाने बघायची झाल्यास, या सगळ्या घटकांचा घडणारा आणि वाढणारा परिणाम बघता, कवितेच्या सर्जनशीलतेवरील परिणाम अनिवार्य होऊ शकतो. आणखी वेगळा मूड बघायचा झाल्यास, साहित्यातील सर्जनशीलता आणि त्याचा विकास आणि जोडीने अभिरुची, यातील अंतर कमी होणे, हे शक्य आहे का? कवितेतील सर्जनता ही वाचकाच्या अभिरुचीशी ताडून बघता, नेहमीच गतिशील आणि म्हणून अतर्क्य राहणार. त्यामुळे दोन्ही बाबतीत काही अंतर जरी अनिवार्य असले तरी संवाद अशक्य होईल, अशी परिस्थिती उद्भवू नये, ही काळजी समीक्षकांनी घ्यायला पाहिजे. याचाच पुढील भाग म्हणजे कवितेतील अतर्क्यता किंवा दुर्बोधता, समीक्षकाने वाचकांना समजावून सांगण्याची जबाबदारी घ्यायला जाऊ नये. तो एकप्रकाराने आत्मघात ठरू शकतो. काव्यात्म दुर्बोधता खरी असेल तर ती कशा प्रकारची आहे, हे वाचकाला नुसती जाणवते असे नसून, ती प्रत्यक्ष कवीला देखील जाणवते. प्रतिभेच्या अनाकलनीय शक्तीने सृजन करणारा कवी आणि आसपासच्या सामाजिक संदर्भात सामील असलेला कवी, जो काहीवेळा अभिरुचीच्या सामाजिक पातळीवर उभा राहून आपल्याच कवितेकडे न्याहाळणारा कवी, हे एक नव्हेत. असे देखील बरेचवेळा घडते, तो खुद्द कवीच आपल्या कवितेकडे पुन्हा बघतो तेंव्हा अधिक भांबावलेला असतो. जाणीवलक्षी कवितावाचनाने दुर्बोध कविता कमी प्रमाणात अगम्य होऊ शकते. पण तादात्म्य पावून, जाणीवलक्षी कवितावाचन करणे, प्रत्येक कवीला शक्य असतेच असे नाही. यात आणखी एक मुद्दा महत्वाचा येतो, असामान्य प्रतिभेचा कवी देखील आपलीच कविता वाचताना, आपल्या कवितेच्या अंगाने रसिकाला नेण्याऐवजी, रसिकांचा कल बघून आपल्या कवितेला त्या अंगाने नेऊ शकतो. रसिकाला काय आवडते, ती आवड नेमकेपणाने लक्षात ठेऊन मग आपली कविता मांडणे, हेच प्रधान ध्येय ठेऊ शकतो. अर्थात यामुळे कविता आकळली नाही तरीही रसिक ती कविता उपभोगू शकतो!! अशा वेळी, कवीला नेमके काय म्हणायचे आहे/होते, याला पूर्णपणे गौणत्व प्राप्त होते. कविता बाजारू यशाला चटावली जाऊ शकते. अशावेळेस कवीने "भाष्यकार" बनणे कितपत योग्य ठरेल? काहि वेळा खुद्द कवी हाच चांगला टीकाकार होऊ शकतो पण असेलच ही शक्यता योगायोगाची ठरू शकते. कवीच्या सृजनप्रक्रियेत अंतर्भूत असलेली अटळ आणि अप्रकट आत्मटीका कितपत प्रस्तुत मानवी? हा प्रश्न देखील इथे उद्भवू शकतो. याशिवाय कवीची टीका ही पुष्कळदा एकांगी तसेच समर्थनपर होऊ शकते. कवीने स्वतःबाबत कितीही त्रयस्थ भूमिका घेतली तरी स्वतःचीच कलाकृती म्हटल्यावर त्रयस्थ वृत्ती कितपत त्रयस्थ राहू शकेल? त्यामुळे कविता लिहिणे, हीच आपली जबाबदारी असावी. कवितेतील अगम्यतेचे स्वरूप स्पष्ट करण्याची जबाबदारी, अखेरीस टीकाकार किंवा समीक्षकांची असावी. अशा कवितांमध्ये जे अनिर्वचनीय असेल ते स्पष्ट करण्याचा मोह टाळणे इष्ट.

No comments:

Post a Comment