Sunday 4 December 2022

ये जिंदगी उसी की है

"पिवळी पानगळ,कसा पाऊस सोनियाचा आणतो चोचीतून,विजा टिपल्या आभाळाच्या गडद संध्याकाळी, पानगळीत एकटी मी आसू टिपूनिया जावे,आता पिवळ्या पाखरांनी." सुप्रसिद्ध कवियत्री इंदिरा संत यांच्या कवितेतील या ओळी आहेत. इंदिराबाईंच्या नेमक्या शैलीची ओळख करून देणाऱ्या या ओळी आहेत - ऋजू आहेत पण तितक्याच अंतर्मुख करणाऱ्या आहेत. एकांतात राहायची सवय असल्याने, स्वतः:शीच संवाद करायचा आणि स्वतःशीच त्याची उत्तरे शोधायचा प्रयत्न करायचा, असा खेळ मांडण्यात इंदिराबाईंना विलक्षण रस आहे. अंतर्मुखता त्यातूनच दुखऱ्या वेदनेने प्रकट होते. सुरवातीचा *पाऊस सोनियाचा* लिहून प्रसन्न सुरवात करायची परंतु *आसू टिपूनिया जावे* लिहून त्याचा शेवट दु:खद करायचा!! हीच ती बाईंची अनन्यसाधारण शैली. याच शैलीला समांतर असे आजचे गाणे - *ये जिंदगी उसी की है* आहे. मी या २ भागातील गाण्यातील पहिला भाग निवडला आहे जो प्रणयी थाटाचा,आनंदी भाग आहे. अर्थात या आनंदी भागात देखील कुठेतरी व्यथेचा व्याकुळ धागा सापडतो. हिंदी चित्रपट गीतातील अतिशय लोकप्रिय गीतांच्या यादीतील फार वरच्या टप्प्यावरील हे गाणे आहे. आज जवळपास ७० वर्षे होत आली तरी या गाण्याच्या लोकप्रियतेत खंड पडलेला नाही आणि असे भाग्य फार थोड्या गाण्यांना लाभते. प्रस्तुत गीत प्रसिद्ध कवी राजेंद्र कृष्ण यांनी लिहिले आहे. उर्दू आणि हिंदी भाषेचा अप्रतिम वापर ते नेहमीच आपल्या रचनांमधून करत असायचे. *किसी की आरजू में अपने दिल को बेक़रार कर* किंवा शेवटच्या ओळी बघितल्यास - *आ रही है यह सदा*, इथे काही शब्द उर्दू भाषिक तर बाकीचे हिंदी भाषिक शब्द आहेत. आपल्या कवितेतून त्यांनी गेयता हे वैशिष्ट्य कायम जपलेले होते. ध्रुवपदाच्या ओळींतील शब्दसंख्या असमान आहे परंतु रचनाकौशल्य असे आहे की पहिली ओळ दीर्घ असूनही दुसरी ओळ संपताना त्याची शाब्दिक लयीला कुठेही बाधा येत नाही. तसेच पुढे बघितल्यास, पहिल्या कडव्यातील पहिली ओळ आणि दुसरी ओळ, इथे शब्दसंख्येत असमानता आहे पण त्याचा गेयतेवर कुठेही परिणाम होत नाही. एक कवी म्हणून ही बाब फार महत्वाची आहे. गंमत अशी की शेवटच्या कडव्यात पुन्हा सगळ्या ओळी जवळपास एकसारख्या आहेत. वाचताना जराही *विक्षेप* निर्माण न होता, सलग आशय दृष्टीस पडतो, याचे श्रेय कवीला द्यायलाच पाहिजे. अशी शब्दरचना, कुठल्याही संगीतकाराला नेहमीच प्रोत्साहित करत असते. ही रचना खऱ्या अर्थाने संगीतकार सी.रामचंद्र आणि गायिका लता मंगेशकर यांच्या प्रतिभेची साक्ष देणारी आहे. एक मुद्दा, सर्वसाधारणपणे रसिकांना *उच्चरवात* गायलेली गाणी लगोलग भुलवतात. त्यातील तार सप्तकातील स्वर रसिकांच्या पसंतीस पडतात परंतु मध्य सप्तकातील स्वर तसेच खर्जातील स्वर देखील फार अवघड असतात पण तिकडे फारसे लक्ष जात नाही, असा सर्वसाधारण अनुभव आहे. या गाण्याच्या बाबतीत असेच झाले आहे - दुसऱ्या भागातील *अलविदा अलविदा* ही सातत्याने वरच्या सुरांत जाणारी *पुकार* लॊकांना जास्त भावते. वास्तविक पहिल्या भागातील सौंदर्यस्थळे फार विलक्षण सुंदर आणि तितकीच कठीण आहेत आणि तेच इथे प्रामुख्याने बघायचे आहे. गाण्याची चाल भीमपलास रागावर आधारित आहे. या संगीतकाराचे एक वैशिष्ट्य म्हणजे रागदारीत चाल करताना, बहुतेकवेळा रागाचे नियम बाजूला सारून, स्वतःचे वैशिष्ट्य सिद्ध करत स्वरांची बांधणी करायची. आरोही चलनात *नि सा ग म प नि सा* असे स्वर आहेत आणि जेंव्हा आपण या गाण्याच्या संदर्भात बघताना, मुखड्याची ओळ - ये जिंदगी उसी की है, या ओळीचे स्वर ताडून बघताना - *ध ग म ग रे ग रे सा - रे ग* हे स्वर ऐकायला मिळतात. सहजपणे ध्यानात येईल के इथे *पंचम* स्वराला स्थान नाही पण *धैवत* स्वराला जागा दिली आहे!! तरीही रागाची सावली जरादेखील दूर होत नाही!! एक संगीतकार म्हणून सी.रामचंद्र यांना, या खेळाचे श्रेय द्यायलाच हवे. दुसरे एक वैशिष्ट्य सांगता येईल. सी.रामचंद्र यांनी एकदा सांगितले होते, या गाण्याची चाल ही मराठी *शारदा* नाटकातील *मूर्तिमंत भीती उभी* या गाण्याच्या आधाराने बनवली आहे!! आता याच्या तांत्रिक भागाला बाजूलाठेऊ पण जर का साधे गुणगुणायला घेतले तर कुठेतरी साद्ध्यर्म्य आढळते. पण मग असे म्हणता येईल का, संगीतकाराने सरळसरळ मराठी नाट्यगीतावरून चाल उचलली आहे? वरकड ऐकल्यास, साम्य दिसत असले तरी त्यात बराच फरक आहे. संगीतकाराने चालीचा *आराखडा* घेतलेला आहे परंतु चाल बांधतांना, त्या चालीची *पुनर्रचना* केली आहे जेणेकरून चालीत आपले वैशिष्ट्य असावे. अशा पुनर्रचना करणे, सी.रामचंद्र यांच्या संगीताचे दुसरे अप्रतिम वैशिष्ट्य मनात येईल. एखाद्या चालीचा प्रभाव आपल्यावर पडणे सहज शक्य असते परंतु त्या चालीवरून *प्रेरित* होऊन, स्वतःची *बंदिश* तयार करणे, इथे अभ्यासाचा भाग येतो. अर्थात संगीतकाराने जर का स्वतःहुन स्पष्टपणे सांगितले नसते तर कितीजणांना या २ गाण्यातील साम्यस्थळे सापडली असती? असे ऐकिवात आले आहे की या गाण्यात उस्ताद अब्दुल हलीम जाफर ख़ान यांनी सतार वाजवली आहे. आता खरे खोटे बाजूला ठेवले तरी गाण्यातील सतारीचे अस्तित्व खरोखरच जाणवण्याइतके महत्वाचे आहे. वाद्यमेळ प्रामुख्याने सतार आणि बासरी, या दोन वाद्यांवर आधारलेला आहे तर ताल *दादरा* आहे. सी.रामचंद्र यांनी तालाबाबत फार प्रयोग केल्याचे आढळत नाही. आपण निर्माण केलेली चाल सर्वसाधारण माणसाने देखील गुणगुणावी, नव्हे तर त्याने वारंवार प्रयत्न करावा, अशा साध्या पद्धतीने गाण्याची बांधणी केलेली आहे परंतु पुन्हा, त्यात *लपलेली* अवघड स्वरिक वळणे असतात, जिथे गायक/गायिकेचा कस लागतो. गायिका म्हणून लताबाईंनी इथे खरोखर कमाल केली आहे. अगदी सुरवातीच्या दीर्घ आलापापासून या आवाजाचे गारुड आपल्या मनावर पडते आणि ते शेवटपर्यंत कायम राहते. स्वररचनेबद्दल आपण वरती थोडी चर्चा केली असल्याने इथे आता फक्त *गायन* हाच मुद्दा इथे घेऊया. शेवटच्या अंतऱ्यात *धड़क रहा है दिल तो क्या,दिल की धड़कने ना गिन* या ओळीतील *धड़क* शब्द कसा गळ्यावर घेतला आहे, हे मुद्दाम ऐकावे. हृदयाची सगळी धडधड या एकाच शब्दोच्चारातून व्यक्त झाली आहे. भावनेच्या परिप्रेक्षाचा अवकाश अशा पद्धतीने साकार करायचा, ही बाब तशी साधी वाटते, पण प्रत्यक्ष गायनातून स्पष्ट करायची, हे शिवधनुष्य आहे. अर्थात पुढील ओळीत *धड़कने* कवीने जो भावार्थ मांडला आहे, त्याचे असामान्य सादरीकरण संगीतकार म्हणून सी.रामचंद्र आणि गायिका म्हणून लता मंगेशकर, यांच्याचकडे जाते. वास्तविक संगीतकार हा स्वररचनेचा आराखडा तयार करतो पण त्याच्यात प्राणतत्त्व हे गायक/गायिका(च) भरतात आणि या २ शब्दांच्या उच्चारातून लताबाईंनी सिद्ध केले आहे. अशी बरीच उदाहरणे या गाण्यात सापडतात. *ये बहार ये समां कह रहा हैं प्यार कर* या ओळीतील *प्यार* शब्द इतक्या लाडीकपणे, स्वरांना किंचित *झोल* देऊन उच्चारल्यामुळे, गाण्याच्या सौंदर्यात विलक्षण भर पडते. खरतर या गाण्याबद्दल अजूनही खूप काही लिहिण्यासारखे आहे पण कुठेतरी विश्रांती ही घ्यायला हवी. ज्या गाण्यात इतकी अप्रतिम गुणवैशिष्ट्ये आहेत, ते गाणे इतकी वर्षे झाली तरी आपली लोकप्रियता टिकवून आहे, यात फारसे नवल ते कुठले!! ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया प्यार ही में खो गया ये बहार ये समां कह रहा हैं प्यार कर किसी की आरजू में अपने दिल को बेक़रार कर जिंदगी है बेवफा ये जिंदगी उसी की हैं धड़क रहा है दिल तो क्या दिल की धड़कने ना गिन फिर कहाँ ये फुर्सते फिर कहाँ ये रात,दिन आ रही है यह सदा ये जिंदगी उसी की हैं Yeh Zindagi Usi Ki Hai (Happy) | Lata Mangeshkar | Anarkali @ Pradeep Kumar, Bina Rai - YouTube

No comments:

Post a Comment