Saturday 3 December 2022

ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं....

या व्याकुळ संध्यासमयी शब्दांचा जीव वितळतो डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे .... मी अपुले हात उजळतो. सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांच्या कवितेतील या ओळी घेतल्या आहेत. ग्रेस साधारणपणे दुर्बोध, व्याकुळ भावनांचा कवी म्हणून ओळखला जातो. बऱ्याचशा कविता या दुर्बोध शब्दाला जागणाऱ्या आहेत हे नक्की पण जिथे आशय लगेच ध्यानात येतो, तिथे मात्र त्यांची कविता स्फुल्लिंगासारखी पेटून समोर येते. *संध्याकाळच्या कविता* या कविता संग्रहातील प्रस्तुत ओळी आहेत. संग्रहाच्या नावाप्रमाणे, या ओळींचा आशय स्पष्ट होतो. कवितेतील आशय स्पष्ट झाला की कुठलीही कविता आकळून घ्यायला फारसा प्रश्न पडत नाही. अशीच एक सुंदर कविता आज आपण बघणार आहोत, अर्थात गाण्याच्या स्वरूपातून. *ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं....* आजच्या गाण्यातील कविता ही सिद्धहस्त शायर साहिर लुधियान्वी यांची आहे. एक काळ असा होता, साहिरची कविता म्हटल्यावर त्यातील आशय, मध्यवर्ती कल्पना, प्रतिमा यांबाबत ठराविक कल्पना मनात यायच्या आणि बहुतांशी त्या कल्पनांना तडा जायचा नाही. अर्थात साहिर हा शेवटपर्यंत डाव्या विचारसरणीचा राहिला. असे असले तरी चित्रपट माध्यमात वावरताना, असा दृष्टिकोन कायम ठेवणे परवडणारे नसते आणि साहिरने तिथे वळण घेताना देखील आपल्या मतांना तिलांजली दिली नाही मग ते प्रणयगीत असो की विरहीगीत असो.कुठेतरी एखादा धागा तरी सापडायचाच. *मोहब्बत ही का ग़म तनहा नहीं, हम क्या करें* या ओळीतून ती दृष्टी दिसून येते. असे असले तरी साहिर हा हाडाचा कवी. त्यामुलें त्याच्या गीतांना कधीही शिळपटपणा चिकटला नाही. कधी नवीन प्रतिमा शोधून कधी तर कधी जुन्याच प्रतिमा वापरताना, त्याला नव्या रचनाकौशल्याचे कोंदण द्यायचे, जेणेकरून तीच प्रतिमा नव्याने झळाळून येईल.आता इथेच ध्रुवपदात *तसव्वूर* हा काहीसा अनवट शब्द आहे पण याचा अर्थ *प्रतिमा* असे ध्यानात आल्यावर लगेच सगळ्या ओळींची संगती लागते. साहिर आपल्या कवितेत नेहमी असेच काहीसे अनवट जातीचे शब्द वापरून, कवितेची श्रीमंती आणि भाषेची खोली वाढवतो. पहिल्या कडव्यात असाच प्रकार केला आहे. *किसी के दिल में बस के दिल को तडपाना नहीं अच्छा* ही ओळ अगदी सर्वसाधारण प्रतीची आहे पण पुढील ओळ *निगाहो को झलक दे दे के छुप जाना नहीं अच्छा* अशी लिहून पहिल्या साध्या ओळीला वेगळेच परिमाण देतो. *दिलों को बोझ लगते हैं कभी जुल्फों के साये भी* ही ओळ समंजसपणे वाचली तर त्यातील काव्यार्थ तर कळतेच पण काव्यमयता दृष्टीस पडते. साहिर अशावेळी आपली सिद्धता सिद्ध करतो. लक्ष्मीकांत प्यारेलाल या गीताचे रचनाकार आहेत. इथे पारंपरिक ढाच्याची चाल आणि वाद्यमेळ ऐकायला मिळत नाही. एखादी सुंदर कविता हाती मिळाल्यावर, त्यांच्यातील कुशाग्र संगीतकार बाहेर येतो आणि अगदी वेगळ्या ढंगाची चाल निर्माण करतो. *पहाडी* रागावर आधारलेली चाल आहे. सुरवातीच्या वाद्यमेळातून पहाडी रागाची झलक ऐकायला मिळते आणि पुढे *ग ग प प ध प म प म ग रे* ही स्वररचना, गाण्याचा मुखडा सिद्ध करते. खरंतर स्वररचना लिहून गाण्याचे अचूक सौंदर्य मांडणे अशक्य आहे तरी निदान *आराखडा* समजावा, यासाठीच स्वरलिपी घेतली आहे. अगदी सरळ, सरळ पहाडी राग आहे. गाण्यात हरकती तसेच छोट्या ताना इतक्या आहेत की सगळ्या इथे मांडायचे ठरवले तर दीर्घ निबंध होईल. या छोट्या छोट्या तानांनीच गाण्याची लय अवघड केली आहे आणि पर्यायाने गायन कठीण झाले आहे. *दादरा* तालात गाणे बसवले आहे. वास्तविक हा ताल हिंदी चित्रपट गीतांत असंख्यवेळा ऐकायला मिळतो. इथे देखील *मात्रा* मोजायला घेतल्या तर तालाची ओळख होते पण ताल इतका मृदू आहे की मुद्दामून लक्ष देऊन ऐकल्यास, त्याची जाणीव होते आणि याचे मुख्य कारण म्हणजे कविता आणि स्वररचना, इतकी लोभस आहे की मुद्दामून जाणीव करण्याची गरजच नाही. बहुतांश वाद्यमेळ हा व्हायोलिन वाद्याने सजला आहे पण व्हायोलिन वादकांचे वेगवेगळे *सेक्शन* करून त्यांच्याकडून सुरावटीत वैविध्य आणले आहे. अर्थात नेहमीप्रमाणे अंतरे समान बांधणीचे आहेत. मुखड्याचीच चाल इतकी विलोभनीय आहे की पुढे आणखी काही वेगळी स्वररचना करायची फारशी गरज भासत नाही. तरीही पहिला अंतरा मुखड्यापेक्षा खालच्या पट्टीत घेतलेला आहे. शब्दांमधील वाद्ये तसेच प्रत्येक ओळीनंतरची वाद्ये आणि त्यांचा ध्वनी अगदी मोजका ठेवला आहे. त्यामुळे गाणे ऐकताना, स्वरांच्या जोडीने *शायरीचा अंदाज* घेता येतो. लताबाई आणि मोहमद रफी यांनी हे गीत गायले आहे आणि सर्वार्थाने समरसून गायले आहे. युगुलगीत असून त्यांनी एकमेकांच्या सुरांत आपापले सूर इतक्या सहजपणे मिसळले आहेत की तिथेच दाद द्यावीशी वाटते. मुखड्याच्या पहिल्या ओळीत *हम क्या करें* इथे *क्या* शब्दावर लताबाईंनी अतिशय अवघड अशी हरकत घेतली आहे आणि मुखड्याच्याच शेवटच्या ओळीतील तेच शब्द आणि त्याच अक्षरावर रफींनी घेतलेली हरकत बारकाईने ऐकावी. जेंव्हा गळ्याची परीक्षा द्यायची वेळ येते तेंव्हा हे दोन्ही गायक नेहमी आपला दर्जा सिद्ध करतात आणि असे कैक वेळा अनुभवायला मिळाले आहे. रफी तर बोलून चालून मुस्लिम पण लताबाई महाराष्ट्रीयन असून देखील कवितेतील * तसव्वूर*,*जान-ए-वफा* सारखे शब्द ऐकावेत. लताबाईंची भाषेवरील हुकूमत दिसून येते. मुखड्याची पहिली ओळ आणि तिसरी ओळ - *तुम ही कह दो अब ऐ जान-ए-वफ़ा हम क्या करें* याची चाल यात बराच फरक आहे. स्वरिक लय तीच आहे परंतु स्वरांची पट्टी वेगळी आहे, खालच्या सुरांत आहे. आता खालच्या सुरांत आहे म्हणून शब्दांवरील वजन कुठेही घसरलेले नाही. गायनातील आणखी खास वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, कवितेतील कुठलाही शब्द अकारण वजनाखाली दबलेला नाही. लयीच्या हिंदोळ्यावर शब्द जसे येतात तोच हिंदोळा घेऊन, शब्दांची खुमारी वाढवलेली आहे. या सगळ्या वैशिष्ट्यामुळे प्रस्तुत गाणे हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर होऊन राहिले तर नवल ते काय? ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं,हम क्या करें, तसव्वूर में कोई बसता नहीं, हम क्या करें. तुम ही कह दो अब ऐ जान-ए-वफ़ा हम क्या करें लुटे दिल में दिया जलता नहीं, हम क्या करे, तुम ही कह दो अब ऐ जान-ए-अदा हम क्या करें किसी के दिल में बस के दिल को तडपाना नहीं अच्छा, निगाहो को झलक दे दे के छुप जाना नहीं अच्छा, उम्मीदो के खिले गुलशन को झुलसाना नहीं अच्छा हमें तुम बीन कोई जँचता नहीं अच्छा, हम क्या करें। मोहब्बत कर तो लेकिन मोहब्बत रास आए भी दिलों को बोझ लगते हैं कभी जुल्फों के साये भी हजारों ग़म हैं इस दुनिया में अपने भी पराये भी मोहब्बत ही का ग़म तनहा नहीं, हम क्या करें। बुझा दो आग दिल की या उसे खुलकर हवा दे दो जो इसका मोल दे पाए, उसे अपनी वफ़ा दे दो तुम्हारे दिल में क्या हैं बस हमें इतना पता दे दो के अब तनहा सफ़र कटता नहीं हम क्या करें। (3) Yeh Dil Tum Bin Kahin Lagta Nahin | Mohammed Rafi, Lata Mangeshkar | Izzat 1968 Songs - YouTube Attachments area Preview YouTube video Yeh Dil Tum Bin Kahin Lagta Nahin | Mohammed Rafi, Lata Mangeshkar | Izzat 1968 Songs

No comments:

Post a Comment