Saturday 10 December 2022

नवल वर्तले गे माये

भक्तिसंगीत स्वरूपत: *फॅशन* म्हणजे टूम आणि आधुनिकता यांचाच परिपोष करीत असते. त्यामुळे कशाचाही तडकाफडकी नकार घडत नाही. नवीन आणि मौलिक, आकर्षक तसेच आशयघन यात पारख करून निर्णय घ्यायला तसा समाजाला वेळ लागतो आणि तो जनसंस्कृतीने मिळून जातो. त्यामुळे नाविन्याची परीक्षा सुरवातीपासून जनसंगीतातून सुरु होते. याचाच दुसरा अर्थ *ताजेपणा* सातत्याने अबाधित राहतो. याच पार्श्वभूमीवर आपल्याला आजचे भक्तीगीत बघायचे आहे. भक्तिसंगीत पारंपरिक आहे हे नक्कीच परंतु त्याच्यावर बुरशीची पुटे न चढता, त्यात नावीन्य आणून, त्यातील ताजेपणा कायम राखला गेला आहे. एका बाजूने परंपरेची बूज ठेवली आहे पण त्याचबरीबर त्यात आधुनिकतेचे मिश्रण बेमालूमपणे मिसळलेले आहे. ललित संगीताची हीच खासियत म्हणायला हवी. इथे सातत्याने नाविन्याचा शोध घेतला जातो, समाजमनाचा कानोसा घेतला जातो आणि त्याच्या जोडीने बदल देखील घडवला जातो. जनसंगीत परिवर्तनशील राहते, त्यात साचलेपण किंवा पाणी साकळावे असे गढूळपण फारसे येत नाही. चिरंतन नित्यनूतन राहते. आजचे आपले भक्तीगीत हे *श्री संत निवृत्ती ज्ञानदेव* याला चित्रपटातील आहे. सुप्रसिद्ध कवी ग.दि.माडगूळकर यांची शब्दरचना आहे. माडगूळकरांची खासियत अशी होती, चित्रपटाच्या विषयानुरूप ते आपली शैली सुसंगत ठेवीत असत आणि चित्रपटाच्या सौंदर्यात अविरतपणे भर घालीत असत. आता प्रस्तुत चित्रपट उघडपणे संत ज्ञानेश्वरांच्या आयुष्यावर आधारित आहे तेंव्हा गीताची शैली त्यांनी ज्ञानेश्वर कालीन भाषेशी सुसंगत ठेवली आहे. ती इतकी जुळवून घेणारी आहे की स्वतंत्रपणे ऐकल्यास संतसाहित्यात कुठेही खपून जाईल. *वर्तले गे माये* किंवा *प्रकाशु* सारखे शब्द हे तत्कालीन संतसाहित्याशी नाळ जोडणारे आहेत. आता जरा बारकाईने वाचल्यावर, ध्रुवपदाचा शेवट काय किंवा कडव्यांचा शेवट काय, तसा करताना माडगूळकरांनी जाणूनबुजून *शु* या अक्षरांनी केलेला आहे. परिणामी ध्रुवपदातील कवितेतील वातावरण कायम संपूर्ण कवितेत दरवळत आहे. आणखी एक गंमत ध्रुवपदात. *होतसे विनाशु* लिहिताना खरेतर *होत असे विनाशु* हा प्रचलित शब्दप्रयोग परंतु माडगूळकरांनी चालीतील लयीचे भान राखले आणि *होतसे* असे जोडाक्षर केले. सुदृढ गाण्याची बांधणी ही अशाच छोट्या छोट्या गोष्टींनी होत असते. हे म्हटले तर Crafting. अर्थात इतकेच नव्हे तर कवितेतील इतर शब्दरचना आणि शब्दांची निवड तसेच केलेली घडण बघण्यासारखी आहे. *मनाचिये* किंवा *रातचिये* इथे शब्दांचे मूळ धातुस्वरूप बदलून घेतले आहे. त्यामुळे कवितेतील भक्तिरंग कायम राहिला आहे. शेवटच्या कडव्यात शेवटच्या ओळीतील *चैत वाऱ्याची वाहणी* मधील *चैत* म्हणजे अधिक काळातील *चैत्र ऋतू*!! पण जर इथे जोडाक्षर आले तर अकारण सरळ, साध्या लयीवर उगीचच *दाब* पडेल म्हणून शब्दची घडणच बदलली! याच ओळीतील शेवटचा शब्दाच्या - *अंगणी* शब्दाशी नाते जुळले. ही रचना *ओवी* छंदात असल्याने, त्याचे नियम ओघाने पाळले गेले. माडगूळकरांची लेखणी अशी बहुप्रसवा होती आणि त्यांनी मराठी चित्रपट गीतांचे प्रांगण कमालीच्या वैविध्याने भारून टाकले. संगीतकार सी.रामचंद्र यांनी या गाण्याची *तर्ज* बांधली आहे. मुळातला मराठी माणूस तरीही केवळ नावामुळे हिंदी चित्रपट सृष्टीत आयुष्यभर वावरला. परिणामी मराठी रसिकांचा भरपूर तोटा झाला. गाण्याची स्वररचना वरवर ऐकताना *भूप* रागाशी जोडता येते तरी गाण्यात बऱ्याच ठिकाणी *शुद्ध कल्याण* देखील वावरतो. या संगीतकाराने सतत प्रयोगशील राहण्याचे ठरवले होते की काय, कल्पना नाही पण अगदी रागाधारित स्वररचना करताना, त्यात स्वतःचे *काहीतरी* असलेच पाहिजे, या जाणिवेने त्यात बदल करताना जराही मागेपुढे बघितले नाही. तसेच याच गाण्याचा विचार करायचा झाल्यास, सुरवातीला साधा *दादरा* ताल वापरला आहे पण अंतऱ्याच्या शेवटाला त्याच मात्रा *दुगणीत* घेऊन, लय वाढवून देखील परिणाम कुठेही जराही गढूळ होत नाही. तसेच प्रत्येक अंतरा बांधताना, मुखड्यापासून वेगळा बांधायचा, हे ब्रीद इथे देखील कायम राखलेले आहे. पहिल्या अंतऱ्याची घडण बघूया. मुखड्याच्याच स्वररचनेला फटकून सुरवात होते आणि हळूहळू वरच्या सुरांत प्रवेश करते. * हास्यचि विलसे ओठी,अद्भुतचे झाले गोठी, रातचिये स्वप्नी आला, कोवळा दिनेशु* इथे *कोवळा दिनेशु* प्रथम घेताना तेच स्वर कायम ठेवले आहेत परंतु पुनरावृत्ती करताना, स्वर हळूहळू एकेका पायरीने उतरी घेतले आहेत, जेणेकरून पुन्हा मुखड्याच्या स्वरांशी जोडणी करता येईल आणि ती कशी केली आहे, हा खास ऐकण्याचा सोहळा आहे. हा प्रवास खरोखरच विलोभनीय आहे. संगीतकार किती वेगवेगळ्या अंदाजाने कवितेकडे बघत असतो, याचा हा सुंदर पुरावा म्हणता येईल. वाद्यमेळात फारसे काही प्रयोगशील केलेले नाही. एकूणच वाद्यमेळ रचताना, या संगीतकाराने फार वेगळे प्रयोग केल्याचे फारसे आढळत नाही. बहुदा,आपली स्वररचना इतकी मोहक आहे की त्याला आणखी कशाने सजवण्याची जरुरी नाही, असेच बहुदा या संगीतकाराला वाटत असावे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या संगीतकाराच्या स्वररचना या सामान्य माणसाच्या ओठांवर सहज रुळू शकतात, नव्हे तशा रुळतात. त्यांचा असा स्पष्ट आग्रह दिसतो की सानी माणसाने देखील आपली गाणी गावीत. स्वररचना करताना तितका *सोपेपणा* राखलेला असतो. अर्थात संगीतकार म्हणून त्यातही एखादा हरकत, एखादी तान, ते गाणे एकदम वेगळ्या स्तरावर नेते, हा भाग वेगळा. सहज गुणगुणता येऊ शकतील, असा भास निर्माण करणाऱ्या चाली त्यांनी नेहमीच निर्माण केल्या. गायिका आशा भोसल्यांनी या गीताला आवाज दिला आहे. आशाबाईंची मराठी गाण्याची खऱ्या अर्थाने *सद्दी* होती असे म्हणता येईल. तिन्ही सप्तकात सहज फिरणारा आवाज, असे वर्णन करता येईल. आवाजाचा पल्ला विस्तृत असून, सहजपणे आणि वेगाने गीताच्या प्रारंभी देखील तसेच गायन करणे, यात कुण्या गायिकेला बरोबरी शक्य नाही. आता हेच गाणे बघा, सुरवातीपासून द्रुत लय आहे, भक्तिसंगीतात अशी द्रुत लय सहसा आढळत नाही पण आशाबाईंनी सहजपणे गायला सुरवात केली आहे. कुठेही *ओढून ताणून* आवाज लावला आहे, असे अजिबात वाटत नाही. शब्दांच्या मधील कितीतरी सांगीतिक जागा हुडकून घेतल्या आहेत जसे, पहिल्या अंतऱ्याच्या पहिल्या ओळींनंतर घेतलेला *आलाप* या विधाना साक्ष हणून निर्देशित करता येईल. नेहमीच्या पठडीतील शब्द नाहीत तरीही शब्दोच्चार अस्खलित (अस्खलित म्हणजे नको तितके ठळक नव्हे) आहेत. गाताना, शब्दांचे ऋजुत्व सांभाळायचे, हे तर प्राथमिक झाले परंतु त्यातही उच्चारताना त्याला सुरांच्या साहाय्याने नवे सौंदर्य प्रदान करायची खासियत निव्वळ अनुपमेय आहे. यासाठी कलाकाराकडे वेगळीच नजर असावी लागते आणि ती नजर आशाबाईंकडे निश्चितच आहे. आपल्या हातात ओवी छंदातली रचना आहे की ज्यात प्रत्येक ओळीचे २ खंड पडतात आणि त्यानुरूप गायनात कुठे क्षणभर थांबायचे याचा अचूक अंदाज घ्यायचा असतो. क्षणभराचा विश्राम देखील बोलका असावा लागतो आणि इथे आशा भोसले आपली कमाल दाखवतात. *अंग मोहरूनी आले* ही ओळ म्हणताना ढोबळपणे स्वरात *मोहरणे* आणले नसून, त्यातील नेमका संयत भाव ध्यानात घेऊन उच्चारले आहे. परिणामी गाणे फारच वरच्या स्तराला जाऊन पोहोचते. खरंतर हे गाणे चित्रपटातील गाणे वाटत नाही तर कुणा संगीतकाराने, एखाद्या खाजगी अल्बम साठी बनवले असावे, असा भास होतो आणि असा भास निर्माण करण्याचे अलौकिक भाग्य या गाण्याला लाभले आहे आणि म्हणूनच हे गाणे आजही लोकप्रिय आहे. नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु हास्यचि विलसे ओठी,अद्भुतचे झाले गोठी रातचिये स्वप्नी आला, कोवळा दिनेशु पहाटली आशानगरी, डुले पताका गोपुरी निजेतुनी जागा झाला, राउळी रमेशु चैत वाऱ्याची वाहणी, आली देहाचे अंगणी अंग मोहरूनी आले, जसा का पलाशु

No comments:

Post a Comment