Friday 14 May 2021

माझिया माहेरा जा

महाराष्ट्रात *स्त्री गीते* म्हणून गायन प्रकार विशेष प्रसिद्ध झालेला आहे. तसे पाहायला गेल्यास, *स्त्री गीते* ही लोकसंगीताच्या आविष्काराशी फार जवळचे नाते सांगतात. अर्थात पारंपरिक लोकसंगीत आणि स्त्री गीते जरी एकाच साच्यात बसवत असलो तरी सादरीकरणात बराच फरक पडतो. थोडे स्पष्ट लिहायचे झाल्यास, स्त्री गीते ही बव्हंशी आत्माविष्काराकडे झुकणारी असतात. अर्थात जसे लोकसंगीत हे अनादी-अनंत असते, तोच निकष स्त्री गीते यांबाबत लावता येतो. इथे सामूहिक आवाहन किंवा सामूहिक परिणाम दाखवायचा नसून, आत्मिक भावनांचे प्रगटीकरण महत्वाचे असते.तसेच फार गायकी जरुरीची नसते, भावावस्था महत्वाची ठरते. अर्थात कलासंगीताचे साहचर्य क्रमप्राप्तच असते परंतु कलासंगीतातील सगळे अलंकार जरुरीचे नसतात. आजचे आपले गाणे - *माझिया माहेरा जा* हे एक सुरेख स्त्री गीत म्हणून मान्यता पावलेले आहे आणि त्या दृष्टीनेच आस्वाद घ्यायचा आहे. या आपल्या आजच्या गीताचे कवी आहेत *राजा बढे*. राजा बढे हे नाव प्रामुख्याने रसिकांच्या लक्षात राहिले आहे ते *गीतकार* म्हणून. कवी म्हणून त्यांची गणना कधीही वरच्या श्रेणीतील कवी म्हणून झाली नाही. टपोरीदार गेयबद्ध कवी म्हणूनच ते ख्यातकीर्त होते. आजच्या गाण्यातील कविता म्हणून बघायला गेल्यास, वरील वर्णन चपखलपणे लागू पडेल. कवितेत कुठेही प्रतिभेचा कवडसा देखील दिसत नाही परंतु कवितेच्या पहिल्या ओळीतील कल्पना त्यांनी नेहमीच्या परिचित प्रतिकांनी मांडली आहे. त्यात कुठेही *नावीन्य* दिसत नाही. * मायेची साउली, सांजेची साउली* अशाच साध्या शब्दांनी त्यांनी कवितेत गेयता साधली आहे. भावगीत होण्यासाठीची पहिली पूर्तता अशा शब्दांनी साधली आहे. *भोळ्या रे सांबाची भोळी गिरीजा* या ओळीत तसे काहीही नवीन वाचायला मिळत नाही. याच ओळीतील *रे* सारखे अक्षर केवळ शाब्दिक लय पूर्ण करण्यासाठी वापरले आहे,अर्थात अशी *कारागिरी* ललित संगीतासाठी नेहमीच करावी लागते. शेवटचे कडवे मात्र *आकारमानाने* बरेच विस्ताराने लिहिले आहे तरीही * तुझी ग साळुंकी, आहे बाई सुखी* सारख्या बाळबोध ओळीने कवितेचा शेवट केला आहे. या गीताची चाल प्रख्यात आणि व्यासंगी व्यक्तिमत्व - पु.ल.देशपांडे यांनी प्रदान केली आहे. गाण्याची स्वररचना, हेच या गीताचे प्रमुख बलस्थान आहे आणि आजपर्यंत या गीताची टिकून राहिलेली लोकप्रियता आणि त्याचे गमक आहे. स्वररचना *मिश्र पिलू* रागावर आधारित आहे. आता *राग पिलू* हा लोकसंगीताच्या आधाराने कलासंगीतात आला आणि स्थिरावला. एक निरीक्षण, लोकसंगीतातून आल्यामुळेच की काय पण *संपूर्ण राग* कुणी कलाकाराने गायल्याचे फारसे आढळत नाही परंतु वादकांनी मात्र या रागावर अपरिमित प्रेम केले आहे!! एक संगीतकार म्हणून पु.लं. नी आपली कारकीर्द गाजवली नसली तरी हे गाणे आणि अशाच काही रचनांनी त्यांना *रचनाकार* म्हणून दखलपात्र ठरवले आहे, हे निश्चित. एकूणच थोडे मूल्यमापन करायचे झाल्यास, पु.लं.च्या स्वररचनेवर त्यावेळच्या नाट्यगीतांचा प्रभाव जाणवत आहे. विशेषतः: मास्तर कृष्णराव यांचा जाणवण्याइतका प्रभाव दिसतो. मास्तरांच्या रचनेतील प्रासादिकता, कल्पक छोट्या अशा ताना, आवाजाला तरलपणे फिरवण्याची हातोटी, एकाच अक्षराच्या पुनरावृत्तीत दोन वेगळ्या सुरांचा वापर करून चमत्कृती घडवायची आणि रचनेत रमणीयता आणायची इत्यादी खुब्यांचा आढळ पु.लं.च्या बहुतेक रचनांमधून ऐकायला मिळतो. आजचे गाणे देखील फार अपवाद म्हणता येणार नाही. या गाण्यातील *हळूच उतरा खाली* इथे स्वर पायरीपायरीने उतरवून, शब्दांबाबतली औचित्याची भावना सुरेख मांडली आहे. एकूणच ही स्वररचना बरीचशी मराठी *स्त्री गीत* या स्वरूपाकडे झुकलेली आहे. अंतरे अगदी वेगळ्या *उठावणीवर* बांधून, एक संगीतकार म्हणून पु.लं. नी आपली सर्जनशीलता दाखवली आहे. विशेषतः दुसरा अंतरा मुद्दामून ऐकण्याइतका वेगळा बांधला आहे. परंतु एकूणच खोलात विचार करता, पु.लं.च्या संगीताचा साक्षेपाने विचार केल्यास, सारांशाने असे म्हणता येईल, की त्यांचा व्यासंग हा "साधना" या सदरात मोडणे अवघड आहे. त्यांच्या आस्वाद यात्रेतील एक वाटचाल असे म्हणता येईल. असे असले तरी, महाराष्ट्राने त्यांच्या विविध पैलूंवर अतोनात प्रेम केले पण यात या माणसाच्या सांगीतिक कर्तबगारीची विशेष जाण ठेवली नाही आणि कदाचित म्हणूनच पु.लं.नी देखील फार गांभीर्याने याकडे पाहिले नाही. गायिका ज्योत्स्ना भोळे आहेत. गळ्यावर नाट्यगीतांचा संस्कार स्पष्ट जाणवतो परंतु कलासंगीताचे पायाभूत शिक्षण घेतले नसल्याचे समजून घेता येते. आवाजाचा पल्ला फार विस्तृत नाही आणि त्याची परिणामकारकता मध्य सप्तकापुरती मर्यादित आहे.परंतु आवाजात एल प्रकारचा आश्वासक धर्म दिसतो. आवाजात किंचित अनुनासिकत्व आढळते. छोट्या ताना, मुरली, हरकती इत्यादी अलंकारात हा आवाज खुलून येतो.तांत्रिक तपशील नोंदवायचा झाल्यास असे म्हणता येईल की काही स्वरमर्यादांत सुरेल गाणे त्यांना सहजसुलभ जात असे. प्रसंगी तार सप्तकात इतर काहीं गाण्यांत गायल्याचे आढळते परंतु तिथे *ठेहराव* घेणे अवघड जात असे. परिणामी त्यांचा आवाज छोटे स्वरसमूह द्रुत गतीने आणि सफाईने घेऊ शकत असे. वास्तविक ही चाल तशी सुलभ आणि अति गोड चाल आहे आणि स्वररचनेत एकूण बघता, फार तयारीच्या ताना, हरकती दिसत नाहीत. बहुदा संगीतकाराने हेच लक्षण ओळखून स्वररचना केली असावी, इतके जवळचे नाते या गायिकेचे या गाण्याच्या संदर्भात जोडले गेले. इथे दुसरा अंतरा वरच्या स्वरांत सुरु होतो आणि चालीत थोडे वेगळेपण येते. वरच्या स्वरांत जाताना फार प्रयास पडला आहे, असे होत नाही परंतु तिथे *आर्तता* थोडी कमी पडली असे वाटते. शेवटच्या कडव्यात *हळूच उतरा खाली,फुलं नाजूक मोलाची* या ओळीशी आवाज अतिशय आर्जवी, नाजूक लावून आशयाची अभिवृद्धी समृद्धपणे केली आहे. इथे शब्दोच्चाराचे महत्व ध्यानात येऊ शकते. स्वररचनेतील व्याकुळ भाव आणि तसाच गोडवा, आपल्या सादरीकरणातून यथायोग्यपणे ऐकायला मिळतो. त्यामुळे हे गाणे संगीतकारासोबत गायिकेचे होते. कविता साधी, काहीशी बाळबोध असली तरी संगीतकार पु.ल.देशपांडे आणि गायिका ज्योत्स्ना भोळे यांच्या सादरीकरणाने हे गाणे मराठी भावसंगीताच्या इतिहासात आजही आपली लोकप्रियता टिकवून आहे. माझिया माहेरा जा, रे पाखरा, माझिया माहेरा जा देतें तुझ्या सोबतीला, आतुरले माझे मन वाट दाखवाया नीट, माझी वेडी आठवण मायेची साउली, सांजेची साउली माझा ग भाईराजा माझ्या रे भावाची उंच हवेली वहिनी माझी नवीनवेली भोळ्या रे सांबाची भोळी गिरीजा अंगणात पारिजात, तिथे घ्या हो विसावा दरवळे बाई गंध, चोहिंकडे गावोगावा हळूच उतरा खाली, फुलं नाजूक मोलाची माझ्या माय माऊलीच्या काळजाची की तोलाची "तुझी ग साळुंकी, आहे बाई सुखी", सांगा पाखरांनो, तिचिया कानी एवढा निरोप माझा. https://www.youtube.com/watch?v=0LmR9cIPuY4

No comments:

Post a Comment