Saturday 9 January 2021

रात भी है कुछ भिगी भिगी

कुठल्याही कलाकृतीचा रसास्वाद घ्यायचा झाल्यास, प्रामुख्याने त्याचे ३ टप्पे ध्यानात घ्यावे लागतात. १) कलाकृतीची निर्मिती हा जीवनप्रवाहाचा एक अविभाज्य भाग आहे. २) कलाकृतीचे कलाकृतीपण अनुभव-घटकांच्या नवरचनेत असते. ३) या रचनेतून सचेतनत्वाचा प्रत्यय आल्याखेरीज कुठलीही घटना कलाकृती म्हणून सिद्ध होत नाही. आता या तिन्ही अंगाने दृष्टीसमोर ठेऊन आपल्याला रसग्रहणाकडे वळायचे आहे. या भूमिकेतून रसग्रहणासंबंधी विचार करताना काही प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. परंतु या प्रश्नांच्या ऐवजी आपण जर मूळ भूमिकेची व्याप्ती पाहण्याचा प्रयत्न केल्यास अधिक काही हाती लागू शकेल. अधिक सखोल आणि तरल होत जाणाऱ्या जाणिवेचा एक आविष्कार म्हणजे *सौंदर्य निर्मिती* होय! तसेच तिचा दुसरा आविष्कार हा जीवनातील, निसर्गातील आणि कलाकृतीतील सौंदर्यरूपाचा रसास्वाद घेण्याची वृत्ती व इच्छा असणे हा असतो. जगता जगताच जीवनाचे स्वरूप न्याहाण्याच्या वृत्तीतून सौंदर्याची जाणीव होते आन त्या सौंदयरुपात रसात्मकता आढळते आणि त्या प्रक्रियेतूनच रसग्रहण करता येण्याची शक्ती वाढत जाते. वर मी मांडलेल्या ३ अंगांच्या अनुरोधानेच आपण आजचे गाणे ऐकुया - *रात भी है कुछ भिगी भिगी* चित्रपटीय गाणे जरी अन्य (संगीतबाह्य घटक) घटकांवर अवलंबून असले तरीही मुळात गाणे ही सुंदर सांगीतिक आविष्कृती असते, हे कुणीही मान्य करेल. प्रस्तुत गाणे हे कोठीवरील नृत्य आहे. आता कोठीवरील गाणे म्हटल्यावर काही बाबी त्यात अंतर्भूत असतातच जसे की गाण्यातील शृंगारिक हावभाव तसेच प्रणयाचे लाडिक निमंत्रण इत्यादी आणि हे सगळे तर या गाण्यात आहेतच पण या व्यतिरिक्त हे गाणे म्हणून फारच वेगळ्या धाटणीचे आहे. आता एक कलाकृती म्हणून हे गाणे ऐकायला घेतल्यावर, एकेकाळी *कोठीवरील गाणे* हे प्रतिष्ठित मानले जायचे आणि हा मुद्दा ध्यानात घेतल्यावर मग स्वररचनेत *खानदानी आब* आणि * गायन* या बाबी मिळतात. कोठीवरील गाणे म्हणजे छचोरपणा असा जो एक प्रघात पडला, त्याला हे गाणे संपूर्ण वेगळ्या अभिव्यक्तीचे म्हणून दर्शवता येते. अशा प्रकारच्या गाण्यातील कविता ही नेहमीच *कामुक* हावभावांना पुढावा देणारी असते. अर्थात इथे शायर साहीर असल्याने, कुठेही निलाजरे, उथळ भाव व्यक्त होत नाहीत जसे *तपते दिल पर युं गिराती है,तेरी नज़र से प्यार की शबनम !* इथे बघा, कोठीवर आलेला रसिक आणि त्याच्या डोळ्यातील भाव, हे सांगायला *शबनम नजर* हेच शब्द योग्य आहेत. किंवा शेवटच्या कडव्यात *होश में थोडी बेहोशी हैं, बेहोशी में होश हैं कम कम !* इथे फक्त पहिल्या ओळीतील शब्दांची उलटापालट केली आहे पण कोठीवरील वातावरणात एक खास *निखार* असतो, तोच जाणवतो. संगीतकार जयदेव यांनी गाण्याची तर्ज *धानी* रागावर आधारित बांधली आहे. ललित संगीतात रागाचे मूळ शोधू नये, या ब्रीदाला हा संगीतकार कायम जागला आहे. गाण्याची स्वररचना करताना, रागाच्या बाहेरील स्वर योजायला त्यांनी कधीही मागे पुढे बघितले नाही आणि इथे नेमका तोच अनुभव येतो. गाण्याची सुरवात हार्मोनियमच्या वरच्या सुरांतून होते आणि धानी राग अंधुकसा समोर येतो. मुखड्याची पहिलीच ओळ *रात भी है कुछ भिगी भिगी* बांधताना *रात* शब्दावरच अवघड हरकत आहे. शब्दांवर अशा कठीण हरकती बांधायच्या आणि गाणे कठीण करून टाकायचे, ही या संगीतकाराची खासियत. जसे हार्मोनियमचेसुर वरच्या पट्टीत जातात, तीच पट्टी घेऊन शब्द आपल्याला ऐकायला मिळतात. तालाला साधा *दादरा* योजला आहे पण प्रत्येक मात्रा आणि त्या मात्रेसोबत जोडलेली स्वरिक लय, याचा मनोहारी खेळ ऐकायला मिळतो. हे गाणे मन लावूनच ऐकायला हवे. रेडियोवर गाणे सुरु आहे आणि आपण दुसरे काही तरी काम करीत आहोत, ही आस्वादाची पद्धत चुकीची. हे गाणे, रसिकाला सतत एकाग्रतेने ऐकायला भाग पाडते आणि तरच या गाण्याची खरी खुमारी लक्षात येते. मुखड्याची दुसरी ओळ खालच्या सुरांतून येते आणि एका क्षणात तसे येणे हे नेहमीच आव्हानात्मक असते. याच मुखड्यातील शेवटची ओळ - सोई हुवी पायल की छम छम, इथे स्वररचना एकदम शब्दाभोगी होते. बाजूला पडलेली पैंजणे पण त्या साध्या गोष्टीला *सोई हुवी पायल* असे वर्णन करणे आणि तोच आशय तितक्याच नाजुकपणे आपल्या स्वरांत गुंफणे!! पहिला अंतरा तसा मध्य सप्तकात घेतला आहे. एक मजेचे निरीक्षण - कवितेत ओळीचा शेवट करताना, शब्दाची *द्विरुक्ती* केलेली आहे आणि ती हेतुपूर्वक केलेली आहे. ही शाब्दिक द्विरुक्ती, या संगीतकाराने *कोरस* गायनातून घेऊन, आपल्या मनावर अचूकपणे ठसवले आहे. हा कोरस एकदम अंगावर येत नाही तर गाण्याच्या भावाशयाशी संलग्न होतो. याचा वापर अतिशय शांत पण गाण्याचे सौंदर्य वाढवणारा आहे. दुसरे वैशिष्ट्य असे, आहे अंतऱ्याची शेवटची ओळ घेताना गाण्याची लय दुगणित बांधलेली आहे. त्यामुळे कोरस स्वर आणखी सुंदर होतात. संगीतकार म्हणून हे यश जयदेव यांचे स्पृहणीय ठरते. अशी आव्हानात्मक स्वररचना मिळाल्यावर साहजिकच लताबाईंची गायकी खुलून आली तर त्यात नवल ते कुठले. एकतर बांधणी पारंपरिक कोठीवरील गाण्यासारखी नाही आणि पुन्हा त्यात स्वरविस्ताराला बऱ्याच जागा सोडलेल्या!! खरतर अशा धाटणीची रचना हिंदी चित्रपटात अभावानेच ऐकायला मिळते. वरती मी उल्लेख केलेली *रात* शब्दांवरील निमुळती हरकत किती गायिका घेऊ शकतील? प्रश्नच आहे. गाणे क्षणात वरच्या पट्टीत जाते तर पुढल्या क्षणी खालच्या पट्टीत येते आणि असे करताना प्रत्येक शब्दाचे *अचूक वजन* घेऊन येते. जिथे कोरस स्वर येतो, तिथे लताबाईंचा स्वर ऐकावा. *बरखा बरसे रुक रुक, थम थम* हे गाताना द्विरुक्ती शब्दांवरील स्वरिक वजन ऐकण्यासारखे आहे. इथे भारतीय संगीतातील *श्रुती* या अलंकाराचे दर्शन होते. लताबाईंची गायकी अशा असंख्य वैशिष्ट्यांनी भरलेली आहे. हे नेमक्या शब्दात मांडणे सर्वथा अशक्य आहे. मघाशी मी एकाग्रतेचा उल्लेख केला तो याचसाठी. गाण्यात एखादी अवघड पण सुस्पष्ट तान घेणे अशक्य नाही, सततच्या रियाजाने जमणारे आहे परंतु अक्षरांमधील *विराम* देखील बोलके करणारी ही गायकी आहे. गाताना शब्द कसे उच्चारावेत, याचा हे गायन म्हणजे वस्तुपाठ आहे. अशी गाणी एकूणच चित्रपटात का फारशी तयार होत नाहीत? याचे उत्तर, हे गाणे एकाग्रतेने ऐकले की आपसूक कळून घेता येते. रात भी है कुछ भिगी भिगी चाँद भी है कुछ मद्धम मद्धम तुम आओ तो आँखे खोले सोई हुवी पायल की छम छम किसको बतायें, कैसे बतायें आज अजब है दिल का आलम चैन भी है कुछ हलका हलका दर्द भी है कुछ मद्धम मद्धम तपते दिल पर युं गिराती है तेरी नज़र से प्यार की शबनम जलते हुए जगल पर जैसे बरखा बरसे रुक रुक, थम थम होश में थोडी बेहोशी हैं बेहोशी में होश हैं कम कम तुझको पाने की कोशिश में दोनो जहां से खो गये हम Raat Bhi Hai Kuchh Bheegi Bheegi - Lata Mangeshkar - MUJHE JEENE DO - Sunil Dutt, Waheeda Rehman - YouTube

No comments:

Post a Comment