Thursday 14 January 2021

आप के हसीन रुख पे

जनसंगीताविषयी ३ महत्वाचे निकष सांगता येतील. १) ते सहज उपलब्ध व्हावे, २) ते बहुतेकांना परवडणारे हवे, ३) ते सर्वांना समजणारे हवे. जनसंगीत तसे सहज सर्वत्र उपलब्ध असते कारण फार मोठ्या प्रमाणात त्याची निर्मिती केली जाते. तसेच ठिकठिकाणी विकायला ठेवण्याची धडपड केलेली असते. ते परवडण्यासारखे असावे याचा अर्थ ते स्वस्त हवे. मोठ्या प्रमाणावर ते निर्माण करण्याचा हेतू उघड असतो. सवलतीचे दर, खरेदी-विक्रीच्या सोयी, इतर विशेष प्रलोभने यांचा जनसंगीतात आढळ होणे म्हणूनच अपरिहार्य म्हणायला हवे. त्या शिवाय हे संगीत समजण्यासारखे म्हणजे आकलनसुलभ हवे - भाषा, रचना,विषय, आशय इत्यादी बाबतीत सुलभता अपेक्षित असते आणि तशी जाणवते देखील. आणखी एक विचार, जरी पटण्यासारखा नसला तरी, दुर्मिळपणा आणि निर्मितीतील परिश्रम यांमुळे कुठलीही कलाकृती ही *कलाकृती* होते !! कलाकृती केवळ एकसारखी दुसरी नसते म्हणून ती अनन्यसाधारण असते वगैरे वर्णने केली जातात परंतु कृतींचे पुनरुत्पादन होऊ शकले आणि त्याचा दुर्मिळपणा कमी झाले की त्यांना *उत्पादने* असे म्हटले जाते. तेंव्हा कोणत्याही आविष्कारास यापैकी कोणते मूल्य आहे ते ठरविले की त्याची गुणवत्ता ठरते. यापेक्षा अधिक काथ्याकूट जरुरीचा नाही आणि याच पातळीवर आजचे गीत *आप के हसीन रुख पे* तपासणार आहोत. कवी अंजान हे कधीही फार मोठ्या प्रतिभेचे कवी म्हणून मानले गेले नाहीत आणि त्यांना नेहमीच *गीतकार* म्हणून खालच्या पायरीवर ठेवले गेले.अर्थात त्यांनी देखील याचा फार विचार केल्याचे दिसले नाही. आपल्याकडे असा *पंक्तिप्रपंच* करण्यात नेहमीच धन्यता मानली जाते परंतु एखादे प्रसंगानुरूप गेयतापूर्ण गीत लिहिणे देखील प्रसंगी फार अवघड असते, याची जाण फारशी ठेवली गेली नाही. खरतर प्रस्तुत गीत, ही सुंदर कविता देखील आहे. फक्त *कविता* म्हणून वाचन करणे आवश्यक आहे. एक बाब इथे लक्षात घेण्यासारखी आहे. चित्रपटातील प्रसंग, नायक आपल्या मनातील भावना गाण्यातून व्यक्त करीत आहे परंतु तिथे हजार असलेल्या दोन्ही स्त्रियांना *आपल्यासाठी* गात आहे, असे वाटत असते आणि हाच प्रसंग डोळ्यासमोर ठेवला की मग या कवितेतील काही शब्दांची *द्विरुक्ती* का आहे? या प्रश्नाचे उत्तर सापडते आणि चित्रपटासाठी गाणे लिहिणे, ही सर्वस्वी वेगळी कला आहे, याचा अंदाज येऊ शकतो. संगीतकार ओ.पी. नैय्यर यांची स्वररचना आहे. थोडे बारकाईने ऐकल्यास *यमन* रागावर चाल आधारली असल्याचे समजून घेता येईल. आणखी एक विशेष इथे सांगता येईल. एकूणच या संगीतकाराची रूढ शैली बघितल्यास, या गाण्याचे चलन फार वेगळे असल्याचे दृष्टोत्पत्तीस येईल. रूढार्थाने रागाधारित चाल नाही परंतु भारतीय संगीताशी नाते जोडणारी चाल आहे. गाण्यातील ताल बघितला तर पाश्चात्य Waltz याच्याशी सांगड घालता येते. वाद्यमेळ ऐकायला गेल्यास, सुरवातीलाच *पियानो* वाद्याचे सूर ऐकायला मिळतात. संपूर्ण गाण्यात पियानो आणि व्हायोलिन वाद्याचेच सूर आणि तालाला पाश्चात्य ड्रम (जो मी वर म्हटल्याप्रमाणे Waltz वाजवतो) यामुळे गाण्याची धाटणी वेगळीच होते. प्रणयी थाटाचे गाणे आहे पण परंतु पारंपरिक साचा नाकारलेला आहे. अर्थात गाण्यातील काही *खटके* या संगीतकाराच्या शैलीची आठवण करून देतात. पहिला अंतरा सुरु करतानाच *खुली लटों की छांव में* ही ओळ घेताना जे स्वरिक चलन आहे ते या संगीतकाराच्या प्रचलित शैलीशी जुळणारे आहे. असे म्हणता येईल पेहराव पाश्चात्य परंतु अंतरात्मा भारतीय!! गाण्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन, गाण्यातील शब्दांवर ठराविक *वजन* दिले आहे. एकीकडे स्त्री सौंदर्याचे वर्णन करताना, पहिल्या अंतऱ्यातील शेवटची ओळ - *जिधर नजर मुडी,उधर सुरुर ही सुरूर है* ही ओळ प्रथम अर्धीच घ्यायची आणि किंचित विराम घेऊन पुन्हा संपूर्ण ओळ घ्यायची!! संगीतकार म्हणून इथे ओ.पी.नैय्यर यांना पूर्ण श्रेय द्यावेच लागेल. हाच प्रकार पुढील अंतऱ्यात केला आहे. मघाशी मी म्हटले त्याप्रमाणे *मुखडा* यमन रागाशी साद्ध्यर्म्य राखतो परंतु अंतरे जरी समान स्वरिक वाक्यांशावर नसले तरी फार नावीन्य आढळत नाही. गायक मोहम्मद रफी, हे खऱ्या अर्थी या गाण्याचे खरे *नायक* !! अतिशय नाजूक अशी स्वररचना आणि वाद्यमेळ देखील हात राखून ठेवलेला. हे ध्यानात ठेऊन, रफींनी आपल्या गायनात *शब्दोच्चार* या घटकाला यथोचित न्याय दिला आहे. कवितेत काही ठिकाणी उर्दू शब्द आहेत पण बव्हंशी कविता हिंदी भाषिक आहे. असे असले तरी काही ठिकाणी रफींच्या गायकीचा मूळ स्वभाव दिसतो. *खुली लटों की छांव में,खिला खिला ये रूप है* ही ओळ आणि त्याच हिशेबात पुढील अंतऱ्यातील पहिल्या ओळी गाताना काहीसा *नाट्यात्म* सूर लागतो. अर्थात स्वररचनाच इतकी विलोभनीय आहे की तसे उच्चारण फारसे खटकत नाही. *शबाब आप का नशें में खुद ही चूर चूर हैं* ही ओळ घेताना *नशे में* हे शब्द माझ्या वरील विधानाला पूरक असे दाखवता येतील. वास्तविक तशा प्रकारे हा शब्द घ्यायची गरज नव्हती पण तो या गायकाचा स्वभाव आहे. याचे उलट उदाहरण बघायचे झाल्यास, *कि जैसे सर-बसर बहार आप ही में ढल गयी* ही ओळ मुद्दामून ऐकण्यासारखी आहे. *सर-बसर* हा एक शब्द नाही तसेच अक्षरांच्या दृष्टीने दोन्ही शब्दांतील वेगळेपण दर्शवणे आवश्यक होते आणि याची वाजवी जाणीव, रफींनी आपल्या गायनातून दाखवून दिली. मी सुरवातीच्या परिच्छेदात जे म्हटले आहे - *जनसंगीत आकलनसुलभ हवे*. आणि या विधानाकडे, या गाण्याच्या संदर्भात बघताना, हे गाणे निश्चितच सहज, सोपे आहे आणि त्यामुळे आकलन व्हायला कसलीच अडचण येत नाही. असे गाणे आजही बऱ्याच जाणकार रसिकांच्या मनात ठाण मांडून बसले आहे अंडी हा काही योगायोग नव्हे. आप के हसीन रुख पे,आज नया नूर है, मेरा दिल मचल गया,तो मेरा कसूर है; आप की निगाह ने,कहा तो कुछ जरूर है, मेरा दिल मचल गया,तो मेरा कसूर है; खुली लटों की छांव में,खिला खिला ये रूप है, घटा से जैसी छन रही,सुबह सुबह की धूप है; जिधर नजर मुडी,उधर सुरुर ही सुरूर है. झुकी झुकी निगाह में भी बला की ये शोखियां दबी दबी हँसी में भी तडप रही हैं बिजालियाँ शबाब आप का नशें में खुद ही चूर चूर हैं जहां जहां पडे कदम वहा फिजा बदल गयी कि जैसे सर-बसर बहार आप ही में ढल गयी किसी में ये कशिश कहां जो आप में हुजूर हैं Aap Ke Haseen Rukh Pe - Mohammed Rafi, Dharmendra, Baharen Phir Bhi Aayengi, Romantic Song - YouTube

No comments:

Post a Comment