Monday 4 January 2021

तिन्ही सांजा सखे मिळाल्या

कवितेत सर्वसाधारणेपणे असे आढळते, शब्दांचे जुने दिवे घासून, पुसून नवे करण्याचा यत्न वारंवार दिसतो आणि त्यामुळेच कवितेची घडण, घाट आणि आशय यांच्यात नेहमी वेगळेपणा आढळतो. एखाद्या कावीळ अचानक एखादारचनेचा खास वापर अडगळीत पडलेला शब्द गवसला की एखाद्या निद्रिस्त सुंदरीला आपल्या स्पर्शाने जागे करणाऱ्या, परिकथेतील राजपुत्रांप्रमाणे हे कवी खुलतात आणि त्याच जुन्या शब्दांना नवीन झळाळी प्राप्त करून देतात. वास्तविक पाहता, कवी भा.रा.तांबे हे जुन्या पठडीतील कवी, इंदोरच्या सरंजामी वातावरणात वाढलेले. असे असून देखील तांब्यांच्या कवितेत अनेक जुन्या शब्दांचेच वेगळे रूप वाचायला मिळते. तांब्यांची कविता वाचताना एक विशेष लगेच जाणवतो. वृत्तांचा आणि छंदांचा असलेला विशिष्ट उपयोग - मात्रिक आणि आक्षर रचनेचा खास वापर. छंदःशास्त्राचा माझा अभ्यास नाही आणि ऐतिहासिक दृष्ट्या निरनिराळ्या लयींचा काव्यात केंव्हा, कुठे आणि कसा उपयोग केला, याबाबत मी अगदीच अनभिज्ञ आहे. म्हणून तांब्यांच्या कविता वाचताना लयीसंबंधी मला काय जाणवले, इतकेच मी लिहितो. एक तर तांब्यांच्या कवितेत लयबद्धता आणि गेयता ही इतकी अंगभूत असते, सहजगत्या अवतरते की ती पूर्णपणे काव्याच्या अंतरंगात विरून जाऊन आशयाचा भाग बनते. भाषा काव्यात्म करण्याच्या अनेक शक्यता दर्शविल्या जातात. आशयाला पूर्णरूप असा *स्वर* शोधून आणि मात्रा-अक्षरवृत्तांच्या अनेक प्रयोगातून भाषेची लय अधिक लवचिक केल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. आणखी एक बाब ध्यानात येते, आशयाच्या ओघाशी समांतर रहात लयभारातून येणारे सगळे आघात, उच्चारातील ऱ्हस्वदीर्घत्व, विरामस्थाने आणि लयीच्या कालमापाची अंत्यंत तरल जाणीव यांतून कवितेची बंदिश घडते. भाषेचा प्रत्यक्ष उच्चार आणि त्यातील लकबी यांच्यात केलेली घडण-मोडण हे यांच्या कवितेचे एक सूत्र आहे. मघाशी मी वर म्हटल्याप्रमाणे, अनेक जुने शब्द नव्या स्वरूपात मांडून वाचकाला नाविन्याचा प्रत्यय द्यायचा, हे तांब्यांच्या कवितेत वारंवार आढळते. *तिन्ही सांजा सखे मिळाल्या* या कवितेत *कनकगोल*, *मरिचीमाली* किंवा *चक्रवाल* सारखे अनेक संस्कृत प्रचुर शब्द वाचायला मिळतात. आजच्या मराठी वाचकांना हे शब्द अजिबात माहीत नसतील *सोने*, *सूर्य* आणि *क्षितिज* असे अनुक्रमे अर्थ आहेत परंतु अशा शब्दांनी कवितेला एक प्रकारची श्रीमंती मिळते, हे नाकारणे कठीण आहे. इथे शब्दांचे नादरूप हे भावलयीची स्पंदने सहजगत्या पेलत आहेत असेच वाटते. भावना, संकल्पना संवेदनांच्याच रूपात पाहण्याच्या छंद जाणवतो परंतु असे करताना, त्यांच्या अंधुक, धूसर, गूढ छटा त्यांची कविता सिद्ध करते. कवितेत संध्याकाळ हा काळ धरलेला आहे. अर्थात त्या काळाला अनुसरून शब्दयोजना केलेली आढळते आणि ते सुसंगतच आहे. तांब्यांच्या कवितेबाबत आणखी एक मुद्दा असा - त्यांच्या कवितेवर कवी जयदेव तसेच रवींद्रनाथ टागोर यांचा प्रभाव दाट दिसून येतो. अर्थात शब्दकळा आणि आशय दृष्ट्या बराच फरक दिसतो परंतु या शैलीचा प्रभाव मराठी कवितेवर, विशेषतः पुढील काळातील *रविकिरण मंडळातील* अनेक कवींवर पडला होता हे निश्चित. दुसरा मुद्दा विशेषत्वाने दिसतो, कवितेतील शब्द सत्कृतदर्शनी सहज, सोपे वाटले तरी त्यात अनेक अर्थच्छटा आढळतात. भावकवितेच्या प्रमुख अंगापैकी हे एक मुख्य अंग मानता येते. कविता वाचताना, त्यात *वाचिक लय* सहज अंगवळणी पडते पण त्याचा दुसरा परिणाम असा होतो, शब्दांकडे थोडे दुर्लक्ष होते आणि नेमका आशय गढूळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही कविता वाचताना मध्येच थोडे *गाभ्याचे* दर्शन घडलं, कविता सापडली, असं वाटत असतानाच ती पुन्हा शब्दांत हरवून जाते आणि अखेर शेवटी मनावर परिणाम उरतो, तो शब्दांचाच!! हा थोडा व्यदतोव्याध्यास आहे, हे खरे आणि याचे मुख्य कारण, कवितेत असलेली गेयता. कविता वाचत असतानाच आपल्याला शाब्दिक लय सापडते आणि त्या लयीत आपण गुंतत जातो. या कवीची अनुभव वेढून घेण्याची रीत वेगळी आणि स्वतःची असली तरी शब्द आणि अनुभव यांचे नाते सतत सांभाळले गेल्यामुळे ही कविता सखोल प्रत्यय देते. या कवितेला रसिक मनाशी संवाद साधणे कधीच अवघड गेले नाही. आणि रसिक मनाला देखील ती कधीही अगम्य वाटली नाही. या कवितेचा आणखी विशेष शोधायला गेल्यास, कवितेतील छंद आणि अंतर्गत लय याची सुंदर सांगड घातली गेली आहे. छंदोबद्ध कवितेचा हा खास विशेष कायम राहिला. संध्याकाळचे वर्णन करताना त्या वेळेची वैशिष्ट्ये, अनेक रूपकातून मंडळी गेली आहेत. जसे, *नाद जसा वेणूत* इथे *वेणू* हा शब्द तसा जुना आहे परंतु एकूण कवितेची धाटणी लक्षात घेता हाच शब्द योग्य वाटतो. इथे या कवींवर पडलेला त्यावेळच्या सरंजामी संस्कृतीचा परिणाम दिसतो. *मनोहर वर्ण सुवर्णात* इथे *वर्ण* शब्दासह *सुवर्ण* शब्द आल्याने शाब्दिक लय आणि आशयातील श्रीमंती दृग्गोचर होते. सुंदर कविता अशाच रीतीने रसिकांच्या मनाचा ठाव घेते. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला यांना आजपासुनी जिवे अधिक तू माझ्या हृदयाला कनकगोल हा मरिचीमाली, जोडी जो सुशया चक्रवाल हे पवित्र, ये जी शांत गभीर निशा, त्रिलोकगामी मारुत, तैशा निर्मल दाही दिशा साक्षी ऐसे अमर करुनि हे तव कर करि धरिला. नाद जसा वेणूत, रस जसा सुंदर कवनांत, गंध जसा सुमनांत, रस जसा बघ या द्राक्षात, पाणी जसे मोत्यांत, मनोहर वर्ण सुवर्णात, हृदयी मी साठवी तुज तसा, जीवित जो मजला. Tinhi Sanja Sakhe Milalya Lyrical | तिन्हीसांजा सखे मिळाल्या | Madhughat - YouTube

No comments:

Post a Comment